* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS A FICTIONAL WORK BY DHRUV BHATT, IN THE FORM OF MEMOIRS OF A YOUNG CIVIL ENGINEER DEPUTED TO SURVEY AN ARID COASTAL PART OF SAURASHTRA. THE NOVEL HAS AT ITS CENTRE THE QUEST FOR A FINE BALANCE BETWEEN A TRADITIONAL, NON-SCIENTIFIC, FAITH-DRIVEN SOCIETY AND CYNICAL, PROFIT DRIVEN ECONOMY. WEAVING TOGETHER THE CHARACTERS, REAL AND IMAGINARY, EVENTS AND LEGENDS FROM THE FOLKLORE OF THE REGION, DHRUV BHATT HAS IMPARTED HIS OWN SENSITIVITY TO THE LEADING CHARACTERS AND AT THE SAME TIME NARRATED A GRIPPING STORY.
रात्री त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो. आज या अगदी नवख्या जागेची ओळख झाली. एका संध्याकाळच्या या ओळखीत असं काही अनुभवलं जे माझ्या आयुष्याचा न विसरणारा भाग बनून गेलं. छोटी जानकी माझी जणू खूप वर्षांच्या ओळखीची वाटू लागली! उद्या मी इथून पुढे जाईन, पुन्हा कधी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SAGARTEERI # DHRUV BHAT# ANJANI NARAVANE# SAMUDRA# BHARATI# KHADAK# SHANKHSHIMPALE# KHADI# KINARA# BANDAR# KHADAK# OHOTI# RETI# KHARAT# NARALI# DARIYA# SAGAR# DIVADANDI# SABUR# NOORABHAI# KRISHNA# SHYAMJI SARPANCH# HADABHATT# BANGALI BABAJI# AVAL
Customer Reviews
  • Rating StarRavindra Ogale

    સમુદ્રાન્તિકે या ध्रुव भट्ट यांच्या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद - `सागरतीरी` - वाचला. त्याबद्दल थोडंसं. भट्ट यांनी विविध पुस्तकांतून गुजरातच्या निरनिराळ्या भागांचं, तिथल्या-तिथल्या समाजजीवनाचं अत्यंत प्रगल्भ दर्शन घवलेलं आहे. तत्त्वमसि, अकूपार या कथा अनुक्रमे नर्मदा खोरं आणि गीर अभयारण्याच्या परिसरात घडतात तर सागरतीरीमध्ये भट्ट आपल्याला सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर नेतात. त्यांच्या या कादंबरींमध्ये काही समान दुवे आहेत. `सागरतीरी`तही कथानायकाचं नाव शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही. या निनावीपणामुळे ती कथा प्रथमपुरूषातूनच वाचली जाते आणि vicariously ती कथा आपण आपोआपच जगतो. संपन्न अनुभव म्हणजे काय याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. ती कथा तुमची, माझी प्रत्येक वाचणाऱ्याचीच होऊन जाते. भट्टांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही ‌निसर्गाप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यातल्या समस्त जैवविविधतेसह आनंदानं एकत्र जगणाऱ्या, साध्या पण उदात्त, रूढार्थाने आर्थिकदृष्ट्या गरीब पण सुखासमाधानाच्या बाबतीत अतिशय संपन्न राहणीमान असलेल्या लोकांच्या आयुष्याचे फार जवळून आणि सुंदर दर्शन त्यांनी घडवलं आहे. अकूपारची सांसाई, तत्त्वमसिची सुप्रिया आणि सागरतीरीची अवल. मुक्त-निर्बंध, खंबीर, स्वाभिमानी, निःस्वार्थी आणि स्पष्ट विचारांची नायिका हेही भट्ट यांच्या कादंबरींचं लक्षण. अवल अशीच आहे, पुस्तकी शिक्षण थोडंफारच झालेली पण व्यवहार, धर्म, भावना, नैतिकता या साऱ्या गोष्टींची तिला व्यवस्थित जाण आहे. तसं पाहायला गेलं तर जेमतेम सव्वाशे पानांच्या या कथेत अवल मोजक्याच वेळी आपल्याला भेटते पण त्यातही तिचं पात्र लेखकाने इतकं सुबक रेखाटलं आहे की हिला तर आपण नीटच ओळखतो असा भास होत राहतो. त्यांच्या इतर कथांप्रमाणेच `सागरतीरी`तही नायक-नायिकेमध्ये असणारं एक अव्यक्त, गूढ, आदरणीय नातं दिसून येतं. म्हटलं तर ठसठशीतपणे जाणवणारं, नि काही प्रसंगात हळुवारपणे काळजाला हात घालणारं असं. या नात्याचं वर्णन इतकं प्रभावशाली आहे की अवल नि नायकाचा शेवटचा संवाद संपताना, हा अवलचा कथेतला शेवटचा सहभाग आहे हे जाणवत असल्याने हुरहूर लावून जातो. कथेची सुरुवात तिथल्या परिसराप्रमाणे थोडी रूक्ष (कथानायकाच्या त्यापरिसराप्रति सुरूवातीला असणाऱ्या भावनांमुळे कदाचित) भासते. पण जसजसे नायकाचे त्या परिसराशी, तिथल्या लोकांशी बंध जुळत जातात तसा वाचकही अलगद बांधला जातो. आणि हळूहळू चाललेली कथा शेवटच्या वादळाच्या प्रकरणात सुरेख वेग घेते आणि वाचकाला crescendo चा अनुभव होतो. आणि शेवटाला या वादळी अनुभवातून निसर्गाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या जाणिवांची आणि या सगळ्यांच्या एकसामायिक जगण्याची नायकाला पटलेली ओळख व त्यातून आपणही इथलेच होऊन गेल्याची त्याची भावना अशा समतोलानं कथेचा शेवट करत लेखकाने हा काहीसा Ascending storytelling (which has a rather scholarly name of `Fichtean curve`) परिणाम फार सुंदर साधला आहे. बाकी सबूरिया, सर्वण, किष्ना तांडेल, बेली, मुखिया, हादाभट्ट, बंगालीबाबा आणि मुख्य `अनंतमहाराज` दर्या या लोभस पात्रांना भेटण्याकरता पुस्तक वाचा. सागरतीरी मूळ पुस्तक સમુદ્રાન્તિકે : ध्रुव भट्ट मराठी अनुवाद: अंजनी नरवणे जाता जाता: ध्रुव भट्ट हे गुजराथी साहित्याचा शाश्वत, पथदर्शी ध्रुवतारा आहेत. त्यांची तत्त्वमसि, अकूपार, अतरापि आणि आता हे सागरतीरी ही सगळी मराठीत अनुवादित पुस्तके वाचल्यामुळे त्यांचं इतर साहित्य वाचण्याची प्रबळ इच्छा होते आहे. पण इतर पुस्तके तिमिरपंथी, कर्णलोक, अग्निकन्या इ. मराठीत अनुवादित सापडत नाहीत. कुणाला कल्पना असल्यास कळवावे. अन्यथा गुजराथीतच वाचावी लागतील. ...Read more

  • Rating StarMANISH UGALE

    इंजिनिअर असलेल्या नायकाचं बोट पकडून आपण सौराष्ट्राच्या प्रवासाला निघतो. सागर किनाऱ्यावरच्या एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या मागासलेल्या प्रदेशात नायकाची नियुक्ती झालेली आहे. रासायनिक कारखाने उभे करण्यासाठी सरकारी जमिनींची मोजणी करायला तो आलाय. दूरवरच्याएका गजबजलेल्या शहरातून एकदम या वैराण प्रदेशात येऊन पडल्यावर तो काहीसा निराश आणि अस्वस्थ झाला आहे. या भूमीत पाऊल टाकल्यापासून जसा अभावग्रस्त जीवनाला तो सामोरा जातो आहे, त्याच जोडीला त्याला भेटत आहेत ती इथली अनोळखी माणसावर सुद्धा जीवापाड प्रेम करणारी माणसं. ज्यांच्या घरात खायला दाना नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, आरोग्याच्या सोयी तर सोडाच पण होड्या, गाढवं आणि एखादा घोडा याशिवाय वाहतुकीची साधनं नाहीत अशी वंचित माणसं इतकी आनंदी आणि उदार मनाची कशी? हे पाहून नायक चकित होतो. नायकाला रहाण्यासाठी आणि ऑफिस थाटण्यासाठी एक सरकारी हवेली मिळाली आहे. समुद्रकिनारी इतक्या उजाड परिसरात उभ्या असलेल्या या एकमेव वास्तूच्या पोटात अनेक रहस्यं दडलेली आहेत. हवेलीवर साहेबाला (नायकाला) मदत करण्यासाठी काही स्थानिक स्टाफ नेमलेला आहे. अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेला नोकर सबूर, या वैराण प्रदेशात निगुतीनं वाढवलेल्या बाभळींवर आणि पक्ष्यांवर प्रेम करणारा जंगलअधिकारी नूरभाई, दर्यादेव येऊन राहतो त्या एका भेंसल्यावर की जिथे कोणीही जायची हिंमत करत नाही अशा ठिकाणी जाऊन येणारा शूर तांडेल किष्ना अशी काही इंटरेस्टिंग पात्रं साहेबाला या प्रदेशात भेटतात. सगळ्यात रोचक पात्रं आहेत ती म्हणजे बंगालीबाबा आणि अवल. किड्यामुंग्यांपासून समुद्रासोबत सुद्धा बोलू शकणारा बंगालीबाबा हा एक गूढ मनुष्य आहे. निसर्गाची भाषा त्याला अवगत आहे. अवल ही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्त्री आहे, ती कोण आहे, हवेलीशी तिचा काय संबंध आहे हे जाणून घेणं फार रंजक आहे. स्थानिक जीवनाशी जुळवून घेताना साहेब हळूहळू इथलाच एक होऊन जातो. या भूमीवर, समुद्रावर आणि माणसांवर त्याचा जीव जडतो. ही भावनाशीलता त्याला `नेमून दिलेलं काम करू नकोस` असा आंतरिक साद घालू लागते. निसर्ग आणि मनुष्यजीवन यांचा सहसंबंध कथानकातून हळुवारपणे उलगडताना लेखकाने केलेलं सुरेख चिंतन या कादंबरीतून आढळतं. हे केवळ कथेसाठी कथा सांगणं नाही. घटनांतल्या `मधल्या` जागांतून जीवनाकडे बघण्याचा लेखकाचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. काम पुढे नेऊ की राजीनामा देऊ या द्वंद्वात सापडलेला साहेब पुढे काय करतो? समुद्री वादळाबद्दल बंगालीबाबाने वर्तवलेल्या भाकिताचं पुढे काय होतं? साहेबाची गूढ भेंसल्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होते का? कादंबरी वाचताना ही सारी रहस्ये उलगडत जातात. बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर भव्य निर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षा माणूसप्राणी बाळगून असतो. पण सर्वव्यापी, सर्वपोषी आणि सर्वनाशी क्षमता बाळगून असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर, त्याला समजून घेतल्यावर माणसाच्या वृत्तीत, विचारांत कसा बदल होत जातो याची ही गोष्ट आहे. थोर गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या `समुद्रान्तिके` या गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचा अनुवाद अंजली नरवणे यांनी `सागरतीरी` नावाने केला आहे. साहित्य अकादमी मिळण्यासारखं या कादंबरीत काय विशेष आहे हे ती वाचायला घेतल्यावर लगेचच लक्षात येतं. ध्रुव भट्ट हे गुजरातीतले फार महत्त्वाचे लेखक आहेत. कथासूत्राला व्यक्तीकडून समष्टीकडे नेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कथानक `प्रेडिक्टेबल` नसणं हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणखी गंमत तर यात आहे की ध्रुव भट्टांच्या कादंबरीतील नायकाचं नाव आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही आणि तरीही तो आपल्याला आपल्यातलाच एक वाटत राहतो. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी आणि जीवनाची भव्यता दाखवणारी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे. - मनीषा उगले (एका सन्मित्राने ध्रुव भट्ट यांच्या पुस्तकांची ओळख करून दिली, त्याच्या ऋणात रहायला मला आवडेल.) ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 20-07-1997

    अनवट वाटेवरचा अनुभव… गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांची ‘समुद्रान्तिके’ ही लेखाकृती रुढार्थाने कुठल्याच साहित्यप्रकारात न मोडणारी. कथेचा एकजिनसी अनुभवतीत नाही आणि कादंबरीचं बहुआयामित्वही तीत आढळत नाही, त्यामुळेच असेल बहुधा सोय म्हणून तिला ‘कादंबरी’ प्रकरात समाविष्ट केलं गेलं आहे. ‘सागरतीरी’ या नावाने अंजली नरवणे यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे. ‘सागरतीरी’त सलग असं कथानक नाही. आहेत ते विलक्षण अनुभव आणि विविध व्यक्तिरेखांचे तुकडे ! ज्यांची कधी सुसंगत वाटणारी, पण बरीचशी विस्कळीत अशी सांधेजोड करण्यात आली आहे. इंजिनियरिंगची पदवी पदरात असूनही दोन वर्षे बेकारीत काढलेल्या एका तरुण, संवेदनशील इंजिनियरच्या वाट्याला आलेल्या अकल्पित अनुभवांचं हे संचित आहे. बेकारीने संत्रस्त झालेल्या या तरुणाला एके दिवशी अनपेक्षितपणे एका सरकारी प्रकल्पात काम मिळते. लाभ-हानीचा यत्किंचितही विचार न करता तो ही नोकरी स्वीकारतो आणि त्या बिंदूपासून त्याच्या आयुष्यातील एका अज्ञाताच्या प्रवासाची सुरुवात होते. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरील विरळ लोकवस्ती असलेल्या अत्यंत मागास प्रदेशात सरकारला एक रासायनिक कारखाना उभारावयाचा असतो त्यावर प्रकल्प अभियंता म्हणून त्यांची नेमणूक होते. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करुन ती संपादन करणं आणि प्रकल्प अहवाल तयार करणं हे त्याचं काम असतं. शहरी संस्कृती, सोयी-सुविधांपासून शेकडो मैल दूर आणि पदोपदी येणाऱ्या असंख्य अडचणींचा सामना करत त्याला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. याची जाणीव तिथे रुजू होण्यापूर्वीच त्याला होते. प्रारंभी तर, या अशा सर्व तऱ्हेच्या अभावांशी दोन हात करत आपण आपलं विहित काम कसं पुरं करणार, असा प्रश्न त्याला पडतो, त्यापेक्षा ‘नको हे काम’ म्हणून आपल्या जीवाभावाच्या माणसांत परतलेलं काय वाईट, असा टोकाचा विचारही क्षणभर त्याच्या मनात आपली बेकारीतील दोन वर्षे आठवतात आणि भरकटणारं त्याचं मन ताळ्यावर येतं. शहरी कोलाहलापासून दूर शांत निसर्गात, कोणतीही तक्रार न करता जगणारी तिथली आनंदी वृत्तीची माणसं पाहिल्यावर तर त्याचं कुतूहल भरलं मन मागे न फिरता पुढं पुढंच जायला त्याला भाग पाडतं. कळत-नकळत तोही त्यांच्यात गुंतत जातो. नोकरीवर रुजू होण्याचा प्रवासातच त्याला इथल्या प्रदेशाची, साध्या - सरळ जीवनपद्धतीची, वैचित्र्याचा परिचय देणाऱ्या माणसांची, त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची ओळख होते. नंतर तीन वर्षांच्या तिथल्या वास्तव्यात त्याला माणसांचे असंख्य नमुने पाहायला, अनुभवायला मिळतात. कोणत्याही पाशांत स्वत:ला अडकवून न घेता काहीसं दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या सबूरची एकमात्र इच्छा आहे ती - स्वत:च्या मालकीच्या (लहानशा का होईना) जमिनीच्या तुकड्याची ! पण तोही त्याच्या नशिबी नाही. या एकाच जीवनध्यासाने पछाडलेला सबूर कथनायकाकडून मिळालेल्या नापीक, ओसाड जमिनीच्या तुकड्यानेही कृतार्थ होतो. तीच गोष्ट नूरभार्इंची. जंगल खात्यातला हा माणूस ! सर्वार्थाने पशु-पक्ष्यांच्या जगातच ते वावरतात. त्यांच्याच भाषेत बोलतात. बंगाली बाबाजी ही आणखी एक वल्ली. निसर्गाशी त्यांची अतूट नाळ जोडली गेली आहे. त्यांच्या फटकळपणातूनही माणुसकीचा निर्मळ झराच वाहात असतो. बेटावरचा धाडशी खलाशी किष्ना हे तर अजबच रसायन. ‘भीती, अशक्य’ असले फालतू शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीतच. तुफानाला सामोरं जातानाही त्याचं अप्रूप त्याला वाटत नाही. तो त्याच्या जगण्याचाच एक भाग आहे जणू ! इथले शामजी सरपंच हे या मातीतच घडलेलं एक धीरोदात्त व्यक्तिमत्व. इथल्या माणसांचं ते खरंखुरं प्रतिनिधित्व करतात. गावात सरपंच म्हणून प्रतिष्ठित जीवन जगणारे शामजी उन्हाळ्यात मात्र इतरांबरोबर मोलमजुरीसाठी वणवण भटकतात, त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. ‘सागरतीरी’ त एक व्यक्ती मात्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसूनही सर्वव्यापी होऊन राहिलीय. ती म्हणजे हादा भट्ट! संपूर्ण कथानकभर हादा भट्टांबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक राहतो. तीच गोष्ट अवलची! या लोकविलक्षण स्त्रीचं वागणं-बोलणं-व्यवहार वाचकाचं कुतूहल जागृत करतं. ती नेमकी कोण, कुठली या आडगावात ती कशी रुजली, तिच्या या अलिप्त जगण्याचा मतलब काय, अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ वाचकाच्या मनात उठतं, त्याची उत्तरं जरी कादंबरीच्या शेवटी मिळत असली तरी ती मिळेपर्यंत उगीचच बेचैन व्हायला होतं. निसर्गाशी एकरुप झालेल्या या निरनिराळया मुशीतील वाटाव्यात अशा पण अंतर्यामी निर्झरासारख्या निर्मळ व्यक्तींचा कथानायकाला परिचय होत जातो. त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवाद-विसंवादातून आपणही हळुहळू अंतर्बाह्य बदलत चाललो आहोत, याची जाणीव त्याला होते. ‘माणूस’या शब्दाला अर्थ देणाऱ्या खऱ्याखुऱ्या माणसांना भौतिक प्रगतीच्या वरवंटयाखाली आपण उद्वस्त करायचं का, हा प्रश्न त्याचा पिच्छा पुरवतो. कामातलं लक्ष उडतं. मन द्विधा होतं. बंगाली बाबा त्याची मन:स्थिती ओळखतात. त्याचं वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात. त्यांच्याशी बोलल्यावर त्याच्या मनात घोंघावणारं वादळ शांत होतं आणि निश्चिंत होऊन तो आपल्या कामाला लागतो. चाकोरीबद्ध कथानकाची अपेक्षा ठेवून ‘सागरतीरी’ हाती घेणाऱ्यांच्या पदरी निराशाच येईल. कारण ‘सागरतीरी’ हा एक अनवट वाटेवरचा अनुभव आहे. कथानकच नसल्याने यातल्या व्यक्तिरेखाही अचानक येतात आणि गायब होतात. या व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे मात्र मनावर ठसतात. अपरिचित प्रदेश, तिथली लोकसंस्कृती आणि विलक्षण माणसं यांचं दर्शन घडवणारी ‘सागरतीरी’ कोणताही पूर्वग्रह मनी न बाळगता वाचल्यास वाचकाला अनोख्या जगात निश्चितच नेईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more