अपूर्व मराठे.नुकताच ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. कादंबरीची सुरुवात शहाजीराजे भोसले ह्या व्यक्तिमत्वापासून होते शहाजी राजांचा पराक्रम, त्यांची धोरणी बुद्धी, लष्करशक्ती आणि मराठ्यांचे स्वतंत्र तख्त निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्या भोवतीचे त्यांचे अटीतटीचे प्रयत्न ादंबरीची सुरुवात करते. जिजाऊमासाहेब त्यांची मानसिकता आणि त्यांनी उरी बांधलेली स्वप्ने आणि आपले पती शहाजी राजे ह्यांना दिलेली साथ कादंबरीला भावनिक रूप आणते. लखोजीराव जाधव, मलिक अंबर, ही अनेक पात्रे व त्यांची वर्णन वाचताना ती आपल्यासमोरच आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट अगदी 360 अंशात सांगितली आहे.
ऐतिहासिक कादंबरी प्रमाणे ह्यात फक्त वर्णन नाहीत लष्करी, राजकीय, प्रशासनिक, महसूली, सामाजिक, भावनिक, मुत्सद्दी अश्या अनेक तत्कालीन गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
श्री विश्वास पाटील ह्यांच्या लिखाणची खासियत म्हणजे युद्धवर्णन ते अगदी जबरदस्त शब्दात करतात. हत्यार त्याचे वैशिष्ट्य तर त्याचा वार आणि झालेली जखम सुद्धा सांगण्याची ताकत त्यांच्या लिखानातं आहे..
बंगळूर प्रांतातुन परत आल्यावर शिवाजी राजांना राज्य निर्माणकरण्यासाठी प्रेरणा कश्या महत्वाच्या ठरल्या व मावळ आणि किल्ले सुलतान का देत नाही त्यांचे गमक महाराजांनी कसे हेरले हे अतिशय वाचनीय.मावळातून मिळवलेली मदत पुरंदरची लढाई आणि हळूहळू सुरु स्वराज्याची प्रदीर्घ मोहीम.
अफजल खानाचे प्रकरण अतिशय रुपक पण अभ्यासपूर्ण लिखाणाने रंगवले आहे. अगदी आपण स्वतः त्या लढाईचे साक्षीदार आहोत असच ते प्रकरण वाचताना वाटत. अफजलखानाच्या मोहिमेपर्यत शिवाजी महाराज किल्ले आणि सभोवतालची व्यवस्था लावताना दिसतात. प्रशासन, महसूल,न्याय, शेती आणि राज्यकारभार इत्यादी त्यांचे मुख्य विषय होते परंतु अफजलखानाच्या स्वारीनंतर महाराज
वेगळ्या स्वरूपात दिसतात दिसतो तो त्यांच्यातला मुत्सद्दि, राजकारणी, कुठनीतीज्ञ आणि धोरणी योद्धा.
अफजल खान वधानंतरच्या भागात कादंबरीचा शेवट होतो आणि आस लागते ती पुढच्या रणखैदाळाची. ...Read more
१३.११.२०२२ सकाळ छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीच्या संघर्षमय कालखंडावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजे झंझावात. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर कादंबरी मालिकेचा संकल्प सोडला आणि त्यातला पहिला भाग म्हणजे हे पुस्तक. आतापर्यंत शिवरायांच्या पराकरमावर व जीवनावर आधारित अनेक पुस्तके आली आहेत. अजूनही काही येत आहेत. या कादंबरीमालिकेचे वैशिष्टये म्हणजे नवे पुरावे विचारात घेत लेखकाने येथे इतिहासाशी फारकत घेतलेली नाही. तसेच सत्य झाकोळले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. दंतकथांना स्थान दिलेले नाही.
केवळ कल्पनेचा आधार घेतलाय तो वातावरण निर्मितीसाठी. मात्र अनेक अपरिचित ऐतिहासिक बाबींना या खंडात स्थान मिळाले आहे.
शिवराय हि व्यक्ती नव्हती , तर एकाच वेळी सात ते आठ माणसांचे काम करणारी हि संस्था होती, असावं विधान पाटील यांनी मनोगतामध्ये केले आहे. याला बांधील राहून पाटील यांनी या महामालेचे लेखन केले आहे. छत्रपती शिवराय यांच्या आधी शहाजीराजांनी जे काम केले ते इतिहासात फारसे सांगितले गेलेलं नाही. मात्र हा काळ सांगितल्याशिवाय छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीचा कालखंड समजणार नाही. शहाजीराजांनी १६२४ मध्ये भातवडीची लढाई केली ती प्रत्यक्ष दिल्लीचा बादशहा जहांगीर याच्या फौजेशी, तर १६३५ मध्ये शहाजहानशी त्यांनी युद्ध केले. विजापूरच्या आदिलशाहीचे शहाजीराजांनी प्रचंड नुकसान करूनही त्याच आदिलशाहीने शहाजीराजांना सरनोबत म्हणून सन्मानाने पाचारण केले हे वेगळे उदाहरण आहे. विश्वास पाटील यांनी या महाकादंबरीची रचना करताना अशा अपरिचित गोष्टींचा मागोवा घेतला आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीत शहाजीराजांचे आणि जिजाऊंमातांचे कसे मोठे योगदान होते. याचा तपशील या खंडामध्ये मिळतो. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभारणीचे काम सुरु झाल्यानंतर या स्वराज्यावर मोठा आघात झाला तो म्हणजे अफजखानाच्या स्वारीने, अफजखानाच्या स्वारीने स्वराज्यापुढे मोठे आव्हान उभे केले; मात्र छत्रपती शिवरायांनी योग्य ती व्हुहरचना रचून अफजल खानाची स्वारी संपवलीच; पण अफजल खानाचा वधही केला. हा सारा घटनाक्रम याच खंडामध्ये आलेला आहे. छत्रपती शिवरायांवरील या कादंबरीत ललित लेखनाची शैली असली तरी कौटुंबिक वातावरणाला अवास्तव स्थान देण्यात आलेले नाही. इतिहासाशी जितके प्रामाणिक राहता येईल तितके राहून पाटील यांनी हा सगळा कालखंड प्रेरणादायी शब्दांत उभा केला आहे. यातील प्रत्येक प्रकरणाचे शीर्षकही लक्षवेधी आणि चपखल असे आहे. `कडोविकडीची लष्करपेरणी` हे शीर्षक ज्या प्रकरणाला दिले आहे, या प्रकरणात अफजल खानाभोवती प्रतापगडाच्या परिसरात महाराजांनी कशी व्यूहरचना केली होती त्याचा तपशील कळतो. नेताजी पालकर यांच्यावरील प्रकरणातून महाराजांच्या बरोबर किती ताकदीची माणसे होती हे लक्षात येते.
बंगळूर येथे शहाजीराजांच्या तालमीत छत्रपती शिवरायांना राजधर्माचे धडे कसे मिळाले, तसेच वेगवेगळ्या लढायांमध्ये शहाजीराजांनी कोणती भूमिका घेतली, मुस्तदेगीरीने संकटावर कसा मार्ग काढला याचे मार्गदर्शन शिवरायांना या काळात मिळाले. `झंझावात` या पहिल्या खंडात निम्म्यापेक्षा जास्त भाग शहाजीराजांनी विविध लढायांमध्ये केवढा मोठा पराक्रम केला होता त्याचा तपशील कळतो. इतिहास हा जसेजसे नवेनवे संशोधन होईल तसतसा उलगडला जात असतो. गेल्या शंभर वर्षात छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर अनेक पुस्तके अली; मात्र जास्तीत जास्त नव्या संशोधनाचा समावेश करीत, तसेच वस्तुनिष्ठ भूमिका घेत केवळ भाषेच्या प्रेमात न पडत ऐतिहासिक सत्य मांडण्याचा प्रयत्न विश्वास पाटील यांनी कादंबरी मालेच्या लेखनात केला आहे. जवळजवळ २५० पेक्षा जास्त किल्ल्यांना पाटील यांनी भेट दिली आहे. शिवचरित्राचे अभ्यासक व इतिहास संशोधक विविध बखरींचा ,तसेच परदेशी इतिहासकारांनी नोंदविलेल्या तपशिलाचा सांगोपांग विचार करून महाराजांच्या जडणघडणीचा काळ या खंडात पाटील यांनी मांडला आहे. ...Read more
सुनील माने, पुणेछत्रपती शिवरायांचे नाव घेतले की रणजीत देसाई यांची “श्रीमान योगी”, बाबासाहेब पुरंदरे यांची “राजा शिवछत्रपती”, शिवाजी सावंत यांची “छावा”, गो नि दांडेकर यांची “कादंबरीमय शिवकाल” या कादंबर्या हमखास आठवतात आणि सर्व माझ्या आवडत्या आहेत.
या कादंबर्या वाचताा वाचक शिवकालात जातो. एक एक प्रसंग वाचताना अंगावर रोमांच उभे रहातात. छाती गर्वाने फुगून येते. छत्रपती शिवरायांच्या विशाल व्यक्तित्वासमोर नतमस्तक होतो.
पण या कादंबर्यांमध्ये जे वर्णन आहे ते किती इतिहासाला धरून आहे? शिवचरित्रात अनेक वादाचे मुद्दे आहेत. शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल तर जदूनाथ सरकार, वा सी बेंद्रे, गजानन मेहेंदळे, जयसिंगराव पवार, इत्यादि दिग्गज इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तकेही अभ्यासायला हवी. तत्कालीन बखरी, पत्राचार, विदेशी इतिहासकार, फिरंगी कागदपत्रे, यांचाही अभ्यास करायला हवा. सर्व लेखक असा अभ्यास करून लिहित असतात. पण आपण पडलो सामान्य वाचक. कादंबरीकार जे सादर करतो, ते आपण विश्वास ठेऊन वाचतो. कधी तेच सत्य ही समजतो.
विख्यात लेखक पानीपतकार श्री विश्वास पाटील यांनी गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून छत्रपती शिवरायांवर कादंबरी लिहायचे ठरवले. शिवचरित्राचा विशाल पट एका कादंबरीमध्ये मावणार नाही, हे उमजून त्यांनी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर कादंबरीमाला लिहायचे ठरविले. मेहता पब्लिशिंग हाउसने हा महायज्ञ प्रसिद्ध करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. “महासम्राट-भाग पहिला-झंझावात” या नव्या कोर्या कादंबरीचा परिचय देत आहे.
या कादंबरीच्या प्रस्तावनेत विश्वास पाटील सर लिहितातः-
“महाराष्ट्रातील तमाम इतिहासकारांनी शिवरायांच्या जीवनाचे शिल्पकार त्यांचे महापिता शहाजीराजे यांच्या कर्तृत्वाकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. शहाजीराजे, जिजाऊ साहेब आणि शिवराय या तिघांतील नातेसंबंधाचा इंद्रधनुषी गोफ जोपर्यंत नीट अभ्यासला जात नाही, तोपर्यंत शिवपूर्वकाळ आणि शिवरायांचा बालपणाचा व जडणघडणीचा कालखंड खर्या अर्थी उभाच राहू शकत नाही.”
१६२४च्या भातवडीच्या लढाईत दिल्लीकर बादशहा जहांगीरच्या फौजेशी तर १६३५च्या लढाईत बादशहा शहाजहानशी शहाजीराजे प्रत्यक्ष लढले होते. भातवडीच्या लढाईत ज्या आदिलशाही फौजेला पराभूत केले होते, त्याच आदिलशाहने विजापूरचे सरनोबत म्हणून शहाजी महाराजांना पाचारण करावे लागले!
शिवरायांना शहाजीराजांनीच गनिमी काव्याची दीक्षा आणि स्वलिखित राजमुद्रा दिली होती.
कादंबरीची सुरूवात जिजाऊ आपल्या माहेरी निघालेल्या. देवगिरी (दौलताबाद) किल्याला वळसा घालून पुढे निघतो त्यांचा मेणा. सिंदखेडराजाचे लखोजीराव जाधवराव दौलताबादच्या दरबारात निझामाचे मुख्य सरदार असतात, त्यांच्या गोटावर पोहोचतात. आई वडील, भाऊ सगळे जंगी स्वागत करतात. शहाजीराजांचे वतन वेरूळ ही जवळच असते. दुसर्या दिवशी दरबारात दगा करून निज़ाम लखोजीराव, त्यांचे दोन पुत्र व दोन नातू यांची भर दरबारात निर्घृण हत्या करतो कारण त्याला भीति वाटते की ते वरचढ होतील… मोगलांना जाऊन मिळतील. जिजाऊ साहेबांवर आभाळ कोसळते. खाली गोटावर सर्व कनाती जाळलेल्या, भयंकर हत्याकांड झालेलं. सर्वत्र प्रेतं विखुरलेली. आई विषण्ण होऊन बसलेल्या! याची खबर लागल्यामुळे लगेच स्वारांबरोबर शहाजीराजे तिथे पोहोचतात व गर्भवती जिजाऊंना घेऊन परांड्याला जातात.
याच निजामाची चाकरी शहाजीराजे ही करत असतात. शहाजी व मलिक अंबर हे दोन मुख्य सरदार. शहाजींचा भाऊ शरीफ त्यांच्याबरोबरच असतात. वेरूळचे भोसले घराण्यात मालोजीरावांचे हे दोन चिरंजीव. १६२४ मधे मोगल बादशहा जहांगीर निजामशाहीचा अस्त करण्याच्या इराद्याने ऐंशी हजाराची फ़ौज घेऊन दौलताबादकडे कूच करतो. आदिलशाह त्याची फौज पण पाठवतो. शहाजी, शरीफजी आणि मलिक अंबर यांच्या फौजा मोगलांना मेहेकरच्या तलावाजवळ आडव्या येतात. तिथे गनिमी काव्याने तलावाची भिंत फोडून रात्रीच मोगलांच्या सेनेची वाताहत करतात. त्यांचे अन्नधान्य, बारूद, चंदीचारा, सगळं रफादफा करतात. मागे फिरलेल्या मोगली फौजांवर वरच्या टेकड्यांवरून भातवडीच्या मैदानावर शहाजींची फ़ौज तुटून पडते. तीनशे हत्तींवर तोफांची बरसात करते. ते पळून जातात पण पाठलाग करायला शरीफजी जातात आणि बळी पडतात. मात्र मोगलांचा आणि आदिलशाही फौजेचा पूर्ण पराभव करतात. अनेक सरदारांना बंदी बनवतात. या विजयाप्रित्यर्थ दौलताबादेत ईद व दिवाळी साजरी होते! पण त्याच दरबारात शहाजी भोसलेंचा सत्कार करण्याऐवजी त्यांचे चुलतबंधु खेळोजींचा केला जातो. शरीफजींच्या बलिदानाचा उल्लेख नाही होत. त्यांचा जाणूनबुजून अपमान केला जातो.
काही दिवसांनी आदिलशाह कडूनच “सरलष्कर” या पदावर नेमणूक करण्याचे आमंत्रण येते व ते विजापूरला जातात.
कादंबरीचा पट विस्तारत जातो.
*शहाजीराजांना पुण्याची जहागिरी.
* मावळातील काही सरदारांना जवळ करून शहाजी राजे स्वराज्य बनविण्याचे स्वप्न.
* शिवनेरीच्या किल्लेदारांच्या मुलीशी संभाजीराजांचा (शिवाजी महाराजांचे थोरले बंधु) विवाह.
* सगळीकडे चाललेल्या धामधुमीत गर्भवती जिजाऊंना शिवनेरीला पाठवतात. तिथेच शिवरायांचा जन्म.
* भुलेश्वरच्या डोंगरावर नवा किल्ला बांधायचा असतो. “महाराष्ट्र” हे स्वराज्य उभे करायचे असते. मुरार जगदेव तो नष्ट करतो आणि सर्व उध्वस्त करत पुण्याच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवतो. लुटालूट, जाळपोळ करून मावळात दहशत पसरवतो.
* मावळात दुष्काळ
* चंदनपुरी येथे शहाजीराजांना बादशहा शाहजहाँ कडून खिल्लत व नगद दोन लाख मोहरा आणि दख्खनची सुभेदारीचे आश्वासन मिळते.
* संगमनेरजवळ पेमगिरी/ पेमगडावर मुक्काम
* जिवधनच्या किल्ल्यातून शाहज़ादा मुर्तुजा व त्याच्या आईची सुटका व निज़ामशाहीची स्थापना, मात्र सर्व राज्यकारभार शहाजीराजेच करत असतात.
* शहाजहॉंचा दौलताबाद व जवळचा मुलुखावर हल्ला. पेमगडावरही हल्ला.
* परत विजापूरच्या आदिलशाहकडे. मात्र पुणे व सुपे जहागिरी आपल्या कडेच ठेवण्यात यश. पुन्हा उठाव करू नये म्हणून बेंगलोरला रवानगी.
* पुण्यात शिवरायांचे फलटणच्या निंबाळकरांच्या सईबाईंशी लग्न.
* बेंगलोरला पाचारण व दोन वर्षे संभाजी व शिवाजी या पुत्रांना शस्त्र, गनिमीकाव्याचे व राजकाजाचे शिक्षण. पुण्याला जिजाऊंसोबत शिवरायांना राजमुद्रा देऊन पाठवणी.
* शहाजीराजांनी आपले स्वप्न स्वराज्याचे बीज शिवरायांमधे पेरले.
* तोरणा जिंकून सुरूवात. जवळचा मुरूंबदेवाचा डोंगरही जिंकून स्वराज्याच्या राजधानी “राजगड” निर्मिती.
* शहाजीराजांवर दडपण, जिंजीजवळ अटक.
* स्वराज्याचा बिमोड करण्यासाठी विजापूरी फौजा शिरवळ, पुरंदराकडे. पण शिवाजीराजे त्यांच्या स्वराज्याचे शिलेदारांना घेऊन आदिलशाही फौजेला पराभूत करून पळवून लावतात.
* शहाजीराजांच्या सुटकेसाठी मोगलांकडे मदत व बादशहाच्या खलित्यामुळे विजापूरातून सुटका.
* थोरले बंधु संभाजींचा अफजलखानामुळे कनकगिरी येथे दुर्दैवी मृत्यु.
* जावळी मोर्यांकडून हस्तगत.
* जावळीबरोबर रायरी (रायगड) ही.
* कोकणची किनारपट्टी जिंकली. विजयदुर्गाचे निर्माण.
* विजापूरच्या दरबारात अफजलखान शिवरायांना मारण्याचा विडा उचलतो. हजरत पीराकडून त्याला धोक्याचा इशारा मिळतो. “जाओगे, तो लौट नहीं पाओगे”.
इथून कादंबरीची शेवटची दिडशे पानं अफजलखानाची स्वराज्यावर चढाईची तयारी, भव्य लष्कराची उभारणी, याचे वर्णनात रंगतात. विजापूरजवळच अफजलपूरला त्याचा भव्य वाडा आणि ६२ बेगमा असतात. लष्कराची जमवाजमव चालू असताना आठ दिवस त्यांच्या संगतीत घालवतो. लढाईत जर तो मेला, तर त्याच्या बेगमांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्वांची हत्या करतो. त्यांच्या दिडशे दासींना दोरखंडाने बांधून विहिरीत ढकलून देतो. आणि मग आपल्या शामियानात दाखल होतो.
अनेक सरदारांसह विशाल सैन्य, अगणीत संपत्ती, घोडे, तोफा, हत्ती, बाजारबुणगे, धान्य, वगैरे घेऊन प्रस्थान करतो स्वराज्यावरचा हल्ला करायला!
शिवाजीराजांना मैदानात आणण्यासाठी तो पंढरपुर, तुळजापूर या महाराष्ट्राच्या कुलदैवतांवर हल्ला करून मंदिरांचा नाश करतो. पण गुप्तहेरांकडून आधीच सुगावा लागल्याने, मंदिरातील मूळ मूर्ती लपवून ठेवण्यात राजे यशस्वी होतात.
शिवाजीराजे अल्पशा सैन्याने त्याला समोरासमोर न लढता गनिमी कावा रचतात. नुकत्याच हाती आलेल्या जावळीच्या घनदाट जंगलात त्याला येण्यासाठी मजबूर करतात.
छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा, जावळी व प्रतापगडाचा उपयोग, सईबाईंचे निधन, रडतोंडीचा घाट, सर्व मावळ्यांनी दिलेली साथ आणि अफजलखानाचा चित्तथरारक शेवट! वाचक “झंझावात” अक्षरशः अनुभवतो!
पानीपतकार श्री विश्वास पाटील यांच्या या कादंबरीतील अप्रतिम शब्दांकन वाचकाला खिळवून ठेवते. शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ, त्यांचे पिताश्री शहाजीराजे यांचे विस्तृत कार्य आपल्या समोर चितारते. स्वराज्य निर्मितीमागची त्यांची भूमिका मांडते आणि शिवरायांचा प्रताप रंगवते. हा सर्व इतिहास एका कादंबरीत मावणारा नाहीच! म्हणून या कादंबरी मालिकेतील “झंझावात” या प्रथम खंडानंतर पुढचा भाग “रणखैंदळ” कधी प्रकाशित होतो याकडे लक्ष लागते. ही अप्रतिम व भव्य कादंबरी मालिका प्रसिद्ध करण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाउसचे विशेष आभार.
*सुनील माने, पुणे* ...Read more