Categories List

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more