* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789394258006
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE SMALL FAMILY CONSISTING OF AAI, BABA, SHAMI AND BALU IS A HAPPY AND SATISFIED FAMILY. THESE MEMBERS ARE ALWAYS LOST IN POEMS, INTERESTING TOPICS RELATED WITH LANGUAGE OR SOMETIMES IN NATURE AND ENCHANTING SUNSET ALSO. READERS WILL ENJOY THIS TREASURE OF PLEASURE OF NATURE, NEIGHBOURHOOD, LOVE AND AFFECTION WITH FAMILIAR ATMOSPHERE, INTERESTING AND KNOWLEDGE PROVOKING CONVERSATIONS, SIMPLE BUT APT AND SHORT POEMS THROUGH THESE STORIES.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा खास मुलांसाठीचा हा नवा कथासंग्रह... ‘खळाळता अवखळ झरा!’ यातील सर्व कथा मनोरंजक तर आहेतच, पण रंजनाबरोबर त्यात विज्ञान, भाषाज्ञान, जीवनमूल्ये, सामाजिक भान वगैरे कथेच्या ओघात स्वाभाविकरीत्या येत असल्याने मुलांकडून सहजगत्या आत्मसात होण्याजोग्या गोष्टी आहेत. कथांच्या ओेघातच मुलांनी आनंदाने म्हणाव्यात अशा कविताही आहेत. मुलांना जे जे रुचेल ते देतानाच खुबीने त्यातून संस्कार घडावेत अशी प्रत्येक कथेची रचना आहे. एकनाथ आव्हाड यांचा हा सातवा बालकथासंग्रह आहे. पहिल्या सहा कथासंग्रहांप्रमाणेच यातील मुख्य व्याQक्तरेखा शमी आणि बाळू हे बहीण-भाऊ आहेत. ही दोन्ही पात्रे बालवाचकांना आव्हाड यांच्या कथासंग्रहांमधून सतत भेटल्याने, परिचित झाल्याने आपलीशी वाटणे, त्यामुळेच शमी आणि बाळूच्या या नव्या कथा वाचण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या कथांची कथानकेसुद्धा मुलांचा उत्साह, उत्सुकता वाढविणारी आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#खळाळताअवखळझराआणिइतरकथा #एकनाथआव्हाड #बालकथा #बाळू #शमी #आई-बाबा #सुंदरलखलखीतमन #भाषेचीगोडी #गूगलआजी #कमलची जिद्द मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #KHALALTAAWAKHALZARAANIITARKATHA #EKNATHAWHAD #BALKATHA #BALU #SHAMI #AAIBABA #SUNDAR LAKHLAKHITMANN #BHASHECHIGODI #GOOGLEAAJJI #KAMALCHIJIDDA #MARATHIBOOKS #MARATHIPRAKASHAK #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Starसाप्ताहिक सकाळ.. अशोक कौतिक कोळी १९.डिसेम्बर २०२२

    एकनाथ आव्हाड यांचे `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हे बाल -किशोर कथांचे बहुरंगी, दर्जेदार पुस्तक, आकर्षक मुखपृष्ठ, बहुरंगी चित्र व सुबक मांडणी यामुळे हे पुस्तक फारच देखणे झाले आहे. एकनाथ आव्हाड यांनी खास मुलांसाठी म्हणून लिहिलेल्या ` खळाळताअवखळ झरा आणि इतर कथा ` या पुस्तकामध्ये नाविन्यपूर्ण, मनोरंजक तसेच डोक्याला खुराक पुरविणारा अद्भुत खजिना आहे. त्यात मौजमजेचा खजिना तर आहे, पण त्याशिवाय कल्पनाशक्तीला वाव आणि सर्जनशीलतेचा विकासही आहे. पुस्तकातील पहिलीच कथा `खळाळता अवखळ झरा` खूपच टवटवीत रसरशीत झाली आहे. खरेतर हा झरा केवळ खळाळता नाही, तर चैतन्यदायी आहे. या कथेत एवढे चैतन्य, साहस, कल्पना, अद्भुतता, भूतदया भरलेली आहे,की ती एक सर्वांगसुंदर कथा होऊन जाते. साने गुरुजींप्रमाणे प्रचंड निरागसता, यशोदाबाईंची अतोनात प्रेमळ करूणा तीत काठोकाठ भरलेली आहे,. एकनाथ आव्हाड यांनी निर्माण केलेल्या पात्रांना निसर्गाची व गावाकडची ओढ आहे. `खळाळता झरा` या कथेतील बाळू आणि शमी यांना अशी ओढ आतुरतेने लागलेली आहे,. प्रचंड उकाडा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता ती गावाकडे जाता. अर्थातच हा गाव मामाचा आहे. तेथील गमती जमती, निसर्गात ते आकंठ बुडून जातात. पोहणे, खेळणे, मजा करणे, गप्पा करणे यात रमून जातात. केवळ मजाच नाही , तर गावगाडा, तेथील निसर्गाशी एकरूप होऊन जातात, त्याही पुढे जाऊन गावात आलेल्या सर्कशीमधील जोकर मुलाशी मैत्री करत त्याला मदत करतात. अशी सुंदर कथा आहे. मनोरंजनासोबतच मुलांवर संस्काराची झूल पांघरते. त्यात कुठलाही बडेजाव किंवा अधिकारवाणीचा लवलेश नाही. हीच तर खरी गंमत आहे. आनंद, अभिमान आणि आचरण सहज शिकायला मिळते. लेखक एकनाथ आव्हाड यांच्या लेखनाचे हेच तर वैशिष्ट्ये आहे. `सुंदर लखलखित मन` या कथेत कल्हई करणाऱ्या कारागिरावर लेखकाने लिहीले आहे. मला लेखकाचे कौतुक यासाठीच आहे, की ते शहरी-ग्रामीण अशा चौखूर विषयांना हात घालतात व आपल्या बालवाचकांची मने समृद्ध करतात. मनांना उभारी देत ज्ञानात भर घालतात. या कथेतून कल्हई म्हणजे काय? ती कोणत्या भांड्याना करतात? का करतात? याची सविस्तर माहिती मळते. या कथेत पण कल्हई करणाऱ्या कारागिरांवर, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नाह्कच शंका घेतली, याबाबतची पश्चातापाची भावना बाळू, शमी आणि त्यांच्या आईच्या मनात निर्माण होते. खरेतर हा सहअनुभव वाचकांनाही मिळतो. म्हणून हि गोष्ट सुंदर आणि परिणामकारक होते. मानलं लखलखकीत करून जाते. एकनाथ आव्हाड पुस्तकात विविध प्रयोग करतात. पुस्तक गोष्टीचे असले तरी त्यात गाणी, कविता, कोडी, खेळाचे विविध प्रकार, नाविन्यपूर्ण माहितीचा खजिना-असे खूप काही असते. या संग्रहातसुद्धा अशी धमाल आहे. एक कथा तर केवळ म्हणींवर आधारित आहे. मुलांच्या रोजच्या खेळातून कथा फुलत जाते व मजेशीर अनुभव देत जाते. याच आशयाची `भाषेची गोडी` लावणारी दुसरी एक कथा या संग्रहात आहे. त्यामधून तर नवीनच गोष्ट शिकायला मिळते. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कसे असतात व त्यांचा मराठी भाषेत उच्चार कसा कला जातो, याची गोष्टीतून छान गुंफण केली आहे. हि गुंफण गंप्पाच्या ओघात काव्यमय आहे. यातून पक्ष्यांची किलबिल, कावळ्यांची कावं काव, कोकिळेची कुहूकुहू, गाईचे हंबरणे, म्हशीचे रेकणे, मोराचा केकराव, हंसाचा कलरव, मधमाशांचा गुंजारव, कुत्र्याचे भुंकणे, कोंबड्याचे आरवणे, बेडकाचे डरावणे, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, घोड्याचे खिंकाळणे ,हत्तीचे चित्कारणे अशा आवाजांची माहिती होते. मनोरंजनाबरोबरच शब्दसंग्रह वाढतो. मराठी भाषा आणि या भाषेतील सौंदर्य जणू लेखक येथे उलगडत जातात. गोष्टीतून भाषेचा संस्कार रुजवण्याचे मोठेच काम लेखकाने केले आहे . हा संस्कार चिरकाल टिकणार आहे. `श्रावणसरी आल्या घरी` या कथेतून तर लेखकाने चक्क नामवंत कवी आणि त्यांच्या टोपणनावांची माहिती करून दिलेली आहे. सोबतच त्या त्या कवींच्या पावसावरील कवितांची मेजवानी सादर केली आहे. हा प्रयत्न मला खूपच मोलाचा आणि अनोखा वाटतो. अगदी घरातील गप्पांमधून हा प्रवास उलगडत जातो. एक आनंदी वातावरण पसरते. डोक्यात सकारात्मक विचार येतात. पहिल्या पावसासोबत येणार मृदगंध जणू आपल्या आसपास दरवळू लागतो. भाषेतील हेच पावसाळी वातावरण लेखक बाळूच्या घरातून थेट शाळेत घेऊन जातात. घरी बाळूचे आई-वडील ज्ञानात भर घालतात, शाळेत हेच कार्य थोरात सर करतात. ते त्याचे मराठीचे शिक्षक आहेत. थोरात सर `पावसाची कविता` एवढ्या तन्मयतेने शिकवितात, की जणू पाहल्या पावसातील भाजलेला मातीचा मृदगंध वाऱ्याबरोबर वर्गात शिरतो. पाऊस नटखट होऊन नाचू-गाऊ लागतो. असे भारावलेले वातावरण येथे आहे. या संग्रहातील सगळ्याच गोष्टी वाचनीय आहेत. यातील पात्रे परोपकारी आहेत. बाळू आणि शमी हि मुख्य पात्रे येथे भेटतात. त्यांच्याभोवती बहुतेक कथांचे कथानक गुंफलेले आहे. शिवाय या पात्रांचे आई-वडील, शिक्षक,मित्र, निसर्ग यांची खास मांडणी आहे. शमीची आई यशोदाबाईंसारखी परोपकारी आहे. वेळोवेळी प्रसंगातून ती शिकवण देते. मुलांचे वडीलसुद्धा तसेच आहेत. मुलांच्या आवडी निवडीची ते जोपासना करतात. शमी गावावरून आलेल्या सीताला शाळेत प्रवेश मिळवून देऊन `मदतीचा चिमुकला हात` पुढे करते. बाळू पिंजऱ्यातल्या पोपटांची सुटका करून `स्वातंत्र्याचे मोल` जोपासतो. पुस्तकाचे महत्व सांगणारी `गुगल आजी` येथे भेटते, तशाच चित्रकला व निसर्गाची गोडी लावणाऱ्या मुळे बाईसुद्धा भेटतात. निसर्ग जणू `परोपकारी संत` असे त्या सांगतात. यात पारंपरिक कथानकाला फाटा देत लेखकाने नवेनवे प्रयोग केले आहेत, यासाठी `खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा` हा कथासंग्रह महत्वाचा आहे. केवळ चिऊ चिऊ आणि पानाफुलांमध्ये रमणाऱ्या या काथा नाहीत. तसेच पारंपरिक सरळधोपट कथन पद्धतही टाकून दिलेली आहे. त्याउलट गप्पा, गोष्ट, खेळ, कोडी, दैनंदिनी प्रसंग यांतून कथा फुलत जातात. यातून नवनीताची शिकवण व प्रेरणादायी सर्जनाची निर्मिती घडत जाते. ...Read more

  • Rating Starप्रा. सुहासिनी कीर्तिकर

    छोट्यामोठ्यांच्या मनाचा ठाव घेणारा खळाळता अवखळ झरा सुप्रसिध्द बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी आजवर जवळपास तीस पुस्तके वाचकांहाती देऊन आनंदाचा झरा खळाळता ठेवला आहे. चाळीसच्या दशकात लोकप्रिय असलेली कवितेतील एक ओळ या संदर्भात सहज आठवून गेली. जो मनोरंजन करी मुलांचे। त्याच्या मुखीं देव वसे।।’ इथे आव्हाडांच्या बाबतीत थोडा बदल करुन ‘मुखीं’ न म्हणता ‘लेखीं’ (म्हणजे लेखणीत असा दूरान्वयाने अर्थ घेऊन) म्हणावेसे वाटते. हे असे मनोरंजन पुस्तकाद्वारे करणे हेदेखील विशेषच कौतुकाचे आणि महत्त्वाचेही. कारण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी होणारे पूर्वीचे संस्कार बदलत गेले. दैनंदिनी बदलली. समस्या वाढल्या. अशावेळी वाचनछंद हा सुखाचा ‘तिळा उघड’ मंत्र ठरतो. पण बालविश्वाशी एकरूप होऊन, त्यांच्या मानसिक जाणिवा समजून घेऊन, त्यांच्या आनंदाच्या कल्पनांशी समरस होऊन आणि ‘कुटुंब’ संस्थेतील जमेच्या बाजू ठळकपणे स्वीकारून ‘आज’च्या संदर्भातील तरीही काही नवे, अनोखे दिले तरच मुले हा मंत्र म्हणणार. वाचनछंद जोपासून त्यात डुंबणार. एकनाथ आव्हाड हे जाणतात. ‘डुंबणार’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण आव्हाडांनी कथासंग्रहाचे नावच ‘खळाळता अवखळ झरा’ असे ठेवले आहे. (...‘आणि इतर कथा’ हे अनुषंगाने येते.) मुखपृष्ठावर या झऱ्यात डुंबणारी, आनंद लुटणारी मुले दिसताहेत... म्हणून ‘डुंबणे!’ इथेच आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करावेसे वाटते की, मुलांचे मानस रमेल अशा पद्धतीने सर्वभर रंगीत चित्रे येतात, रंगीबेरंगी पाने येतात आणि या कडेकडेने मजकुरातून वाचक पुस्तकभर वाचनप्रवास करतो. ही सर्वच मांडणी आनंददायी आहे. एकूण सोळा कथा आहेत या संग्रहात. पण बाळू, शमी, आई, बाबा, मामा-मामी, मित्रमंडळ असे हसरे, आनंदी कुटुंबच सर्व कथांत नांदते आहे. अक्षरश: ‘नंदंति देवता इति नांदी’ या व्याख्येनुसार हे नांदते कुटुंब वाचकांना आनंद देते. स्वत:चा एक मित्र बनविते. बाळू हा बालनायक सर्वांचाच मित्र बनतो. तो हुशार आहे, कामसू आहे, संस्कारी आहे अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला अक्षरांची, शब्दांची जादू माहीत आहे. त्यामुळे साध्या साध्या प्रसंगी त्याची कल्पना बहरून येते, तो यमक- अनुप्रास इत्यादी अलंकार न आठवताही त्यांच्याशी सहजपणे खेळतो, कविता करतो. शब्दांच्या लयीतील गंमत त्याला खुणावते... अगदी सहजपणे त्याला शमीचीही (बहिणीची) साथ आहे. जसे की; सुरुवातीच्याच पानांवर मामाच्या गावाला जाण्याची ओढ येते. संवाद येतो तेव्हा - बाळू म्हणाला, “आई, अगं मामाच्या गावी झाडांची दाटी, लपाछपी खेळण्याची तिथे गंमतच मोठी.” शमी लगेच म्हणाली, “आई, मामाचा गाव नदीच्या काठावर, आनंदाचे गाणे तिथे मुलांच्या ओठावर.” किती सहज असा वहाता संवाद हा. अशा संवादाने कौटुंबिक, खेळकर, प्रसन्न वातावरण तयार होते. या मुलांना आवडतो तो ‘पुस्तकांचा खाऊ.’ हा खाऊ इतका सकस की बाळू कविताच करू लागतो उत्स्फूर्तपणे. विदूषकावर कविता येते ती अशी. फक्त कवितांच्या नादात नाहीत ही मुलं. चांगले शिकण्याच्या आणि घडण्याच्या संस्कारांचे चुंबकही आहे त्यांना माहीत. मासला म्हणून ‘स्वातंत्र्याचे मोल’ ही कथा पाहता येते. पिंजऱ्यात अडकवलेले पक्षी, त्याचीच होते मग कथेत नक्षी. प्रयत्नें बाळू समजावी, पक्षीविक्याही प्रतिसाद देई... हे प्रतिसाद देणे म्हणजे आदर्श माणुसकीचे दर्शन आहे. त्यामुळे या कथा आदर्श घडविणाऱ्या, कवितांचे सर्जन करणाऱ्या संस्कारी घटना आहेत. ‘ऐकू या चला’ ही बाळूची कविता ध्वनिदर्शक शब्दांची रेलचेल असलेली अनोखी कविता आहे. एकाच पुस्तकाच्या या जादूमय पोतडीत संवादनाट्य, घटनाचित्र, कुटुंबदर्शन, संस्काराचे ठसे, प्रसंगचित्रण, कविता अशी आनंदाचा आस्वाद असणारी भेळ आहे. शेवटच्या कथेत शेवटी आई म्हणते, “बाळांनो, ‘थँक्यू’त मोठी जादू आहे बरं.” ...आपण ही जादू अनुभवून आव्हाडांना वाचनानंद दिल्याबद्दल मनापासून ‘थँक्यू’ म्हणूया. अशीच पुस्तके यापुढेही देत चला, फुलवित आनंदाचा मळा. बाळूला जशा आपल्या प्रतिक्रिया काव्यमय वाहत्या शब्दांत द्याव्याशा वाटतात ना; तसेच वाचक म्हणून ‘थँक्यू’ म्हणताना इतर वाचकांसाठी म्हणावेसे वाटते, - काढून मुद्दाम वेळ आस्वादा ही लेखनभेळ गोष्ट, गाणी, संस्कारांचा हा मेळ खाता खाता जाईल भुर्रकन् वेळ. लेखक आपुले आव्हाड आनंदाचे लाविले झाड संस्कारांची येत त्यास फुले ओंजळीत मग आनंद डुले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more