DAINIK LOKSATTA 07-07-2021लालित्यपूर्ण कादंबरी...
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तसेच बलाढ्य मोगलांच्या कैदेतून आग्र्याहून महाराज यशस्वीपणे सुटून महाराष्ट्रात परत गेले याचा विसर औरंगजेबाला कधीही पडला नाही. दक्षिणेत तळ ठोकून मरेपर्यंत त्याने महाराष्ट्राला होरपळवले. महााजांच्या दोन्ही पुत्रांना, त्यांच्या कुटुंबीयांना मनस्वी छळले. या प्रसंगाची मनाला खिळवणारी गुंफण डॉ. प्रमिला जरग लिखित ‘शिवपुत्र राजाराम’ या कादंबरीत करण्यात आली आहे. १७ व्या शतकातील ऐतिहासिक प्रसंगांच्या वर्णनाबरोबरच पिता-पुत्र, पत्नी, भाऊ-भावजय-दीर अशा कौटुंबिक नाती महाराष्ट्रात कशी नांदत होती हे या कादंबरीत ऐतिहासिक दाखल्यांसह दाखविले आहे.
राजाराम महाराजांच्या आयुष्यातील रायगड ते जिंजी आणि जिंजी ते महाराष्ट्र हा प्रवास कादंबरीत आहे. याबरोबरच सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधवराव यांनी औरंगजेबाच्या तंबूचे लुटलेले सोन्याचे कळस, मोगलांशी केलेल्या रोमहर्षक छुप्या लढाया समर्पकरीत्या कादंबरीत आल्या आहेत.
औरंगजेबाने संभाजीराजांवर घेतलेला सूड, राणी येसूबाई आणि राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील रयतेला औरंगजेबाच्या क्रौर्यातून वाचवण्यासाठी केलेला पराकोटीचा संघर्ष... रायगड व इतर किल्ल्यांची हार, शूर मराठा वीरांचे बलिदान, पत्नी, दोन सुना, नातू व इतर नातेवाईक असे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे कुटुंबीय औरंगजेबाच्या कैदेत सापडणे... हे प्रसंग वाचताना वाचकाचे डोळे पाणावले नाही तरच नवल!
जिंजीपर्यंतचा प्रवास व साधुसंतांच्या मठांतील वास्तव्यात राजाराम महाराजांच्या वाट्याला आलेले आव्हानात्मक प्रसंग, राजाराम महाराजांचे व महाराणी ताराराणींचे सुखरूप जिंजीला पोहोचणे, राजाराम महाराजांना पुत्र-पुत्रीप्राप्ती, मराठी जनतेने सुखरूप पोहोचलेल्या आपल्या राजाला जिंजीला जाऊन भेटणे... अशा घटनांतून हा क्रम उलगडत जातो. सरदार, जहागीरदार, वतनदार, साधुसंत असे महाराष्ट्रातील लोक जिंजीला जाऊन महाराजांना भेटून आले. या सर्वांचा महाराजांनी केलेला मानसन्मान, त्यांना वंशपरंपरेने जहागिरी देण्याचा निर्णय याचे यथार्थ वर्णन ऐतिहासिक पुराव्यांना धरून लेखिकेने केले आहे.
कपटी औरंगजेबाने घेरलेल्या महाराष्ट्रपासून शेकडो कोस दूर जिंजीलाही मोगलांचा बलाढ्य वेढा पडला असताना ‘दिल्लीवर विजय मिळवलात तर एक लाख सुवर्णमुद्रा मी तुम्हाला देईन.’ असे आपल्या शूर सरदाराला लिहून देणारा शिवरायांचा हा पराक्रमी पुत्र दिल्ली जिंकण्याच्या ध्येयापासून यत्किंचितही ढळत नाही.
ऐतिहासिक कादंबरीचा गाभा म्हणजे ललित शैली, सौदर्यपूर्णतेने गुंफलेले ऐतिहासिक संदर्भ, या दोन्हींचा मेळ म्हणजे तारेवरची कसरतच. पण या कादंबरीत ललित शैलीत ऐतिहासिक रूक्ष संदर्भाची गुंफण करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.
ऐतिहासिक स्थळे, व्यक्ती, प्रसंग, काळ यांची सांगड कादंबरीतील सर्व प्रकरणांतून उत्तम प्रकारे घातली गेली आहे. लिखिताला पुराव्याची जोड म्हणून लेखिकेने प्रसंगांतील प्रमुख व्यक्तिरेखा, इतर राज्यकर्ते, मराठा राज्याचे अधिकारी, ज्याच्याशी प्रत्यक्ष लढा दिला त्या औरंगजेबाचे अधिकारी त्याची आठ पानी परिशिष्ट आणि घटनांची १८ पानी यादी पुस्तकात दिली आहे. कादंबरी असली तरी ती ऐतिहासिक आहे याचे भान राखून लेखिकेने ४३ संदर्भग्रंथांची सूचीही दिली आहे.
शिवछत्रपतींच्या निधनानंतर शिवरायांचे दोन्ही पुत्र व त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्रातील रयतेसाठी, मराठा राज्यासाठी केलेल्या बलिदानाचे स्फूर्तिदायक चित्रण करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.
रुक्ष ऐतिहासिक कागदपत्रांमधूनही मनाला भिडणारे प्रसंग, लढायांची स्फूर्तिदायक व रोमहर्षक प्रसंगांची वर्णने, प्रवासवर्णने यांचे एकजिनसीकरण करून लालित्यपूर्ण ऐतिहासिक कादंबरी कशी लिहावी याचा हा वस्तुपाठ आहे. ललित वाङ्मगयप्रेमींप्रमाणेच इतिहासाच्या अभ्यासकांनीही ही कादंबरी वाचनीय वाटेल. छत्रपती राजाराम महाराजांचा जीवनपट ऐतिहासिक संदर्भासह उत्तर रीतीने यात शब्दबद्ध झालेला आहे.
– डॉ. अनुराधा कुलकर्णी ...Read more
सार्थक जाधव."शिवपुत्र राजाराम !"
शिवछत्रपतींच्या पोटी जन्माला येणं म्हणजे थोर भाग्यचं ! आणि अस बलवत्तर नशीब घेऊन जन्माला आलेले दोन राजहंस, दोन राजपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. पण खरचं, शिवपुत्र होणं "किती" भाग्यचं होतं ह्या दोघासाठी ? त्यांच्या `युवराज` आणि `राजपुत्र` असण्याने अशा किती मखमली पायघड्या नशिबाने त्यांच्यासाठी अंथरल्या ? की फक्त संघर्षचं ह्या दोघांच्या वाट्याला आला ?
आपल्या मराठी मुलखात नेहमी म्हटल्या जातं, `आपल्या बापजाद्यानी केलेली मेहनत ही पुढच्या पिढ्यांच्या सुखाला कारणीभूत असते` तसं सुख ह्या दोन शिवपुत्रांच्या वाट्याला आलं का ?
शिवछत्रपतींच्या अकाली निर्वाणानंतर स्वराज्याची सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन असंख्य आघाड्यांवर, अंतर्गत बंडाळ्यावर मात करून अजिंक्य राहिले ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. आपल्या महान पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याच्या मातीचा साधा एक कणसुद्धा, अस्मानी संकट होऊन, पाच लाखांचा सेनासागर घेऊन, कंदहार ते काबुल अशा सलतनतीचा बादशाह स्वतः मैदानात उतरून निकराने लढत असूनसुद्धा त्याच्या हाती पडू न देणारे, सोबतच स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळाने उठवलेल्या सगळ्या बंडाळ्या मोडून स्वराज्याची घडी नीट बसवणारे, रयतेच असीम प्रेम मिळालेले आणि आपल्या बलिदानाने अवघा मरहट्टा पेटवून टाकणारे धाकले धनी इतिहासाचा अवघ्या नऊ वर्षाचा कालावधी तेजस्वी करून टाकतात.
शंभू महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्याच्या गादीवर त्यांचे पुत्र येतील, आणि त्यांना आणि सोबतच मराठी दौलतीलाआपण चुटकीसरशी संपवून टाकू असा मानस बाळगून असणाऱ्या आलमगीर औरंगजेबाला पहिला शह दिला तो महाराणी येसूबाई ह्यांनी, पतीच्या निधनानंतर अल्पवयीन पुत्राला गादीवर बसवून स्वराज्याची सूत्र हातात घेण्यापेक्षा त्यांनी आपल्या तरुण दिरास, शिवछत्रपतींच्या पुत्रास स्वराज्याचे छत्रपती करवून आपल्या मुरब्बीपणाची चुणूक औरंगजेबाला दाखवली. आणि इथे सुरू झाली शिवपुत्र राजाराम महाराजांची खरी कहाणी.
आभाळाएव्हढा कर्तृत्ववान बाप आणि सागरासारखा तुफानी कर्तृत्वाचा भाऊ अशा दोन परमप्रतापी छत्रपतींच्यानंतर गादीवर आलेल्या राजाराम महाराजांच्या हाती अवघे काही किल्ले आणि आणि मूठभर मावळे होते. इतिकदखान नावाचा अजगर रायगडाला विळखा घालून बसलेला असताना रात्रीच्या अंधारात ह्या नवख्या छत्रपतीला दौलतीच्या अस्तित्वासाठी राजधानी सोडून प्रतापगड गाठावा लागला, तिथून पुढे पन्हाळा आणि नंतर विशाळगड. घरभेदी लोकांमुळे औरंगजेबास रायगड पाडणे जास्त काही अवघड गेले नाही आणि आपल्या मातोश्री, थोरल्या वहिनी येसूबाई, शंभुपुत्र शाहू आणि प्रथमपत्नी जानकीबाई ह्यांना होणारी कैद महाराज थांबवू शकले नाही. मराठ्यांचा हा तिसरा छत्रपती संपवून अवघा दख्खन आपल्या घोड्याच्या टापाखाली घेण्याच्या विचाराने औरंगजेब पछाडलेला असल्याने राजाराम महाराजांचे एका ठिकाणी अस्तित्व असणे अवघड होऊन बसले. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी सचिव, आणि रायगडावरच "जिंजी"ला जाण्याचा सल्ला देणाऱ्या येसूबाई ह्यांची सल्ल्याने राजाराम महाराजांनी अवघ्या काही मावळ्यांच्या सोबतीने कर्नाटकाचा प्रवास चालू केला, संताजी, धनाजी, खंडोजी अशा गादीशी इमान असणाऱ्या मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जीवाचं रान करून हा शिवपुत्र बिदनूर, वेल्लोर मार्गे शिवछत्रपतींच्या काळी स्वराज्यात आलेला "चंदी"चा किल्ला गाठला आणि आपला छत्रपती सुरक्षित असण्याची सोय केली. ह्यासगळ्या प्रवासात बिदनूरची राणी चेनम्मा मराठ्यांच्या मदतीला आली. अवघ्या मराठी मुलखाचा छत्रपती, शिवपुत्र आणि शंभू महाराजांचा धाकटा भाऊ, ज्याच्या पायी सगळ्या सुखांनी लोळण घ्यायला हवी तो दौलतीसाठी आपल्या वडील-बंधूंच्या अस्मितेसाठी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू पाठीवर घेऊन, घरादारापासून, आपल्या माणसांपासून, आपल्या मूलखापासून दूर एकटाच एका अनोळखी प्रदेशाच्या मंदिरात बसलेला दिसतो तेव्हा त्यांचा यातना जाणवतात. जिंजीला जाऊन पोहल्यास स्वराज्याची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपल्याजवळ असणाऱ्या मूठभर लोकांची मदत ह्या छत्रपतींना होते, मराठी मुलखात अवघे दोन गड हाताशी बाळगून असणारे, फक्त काही हजार मावळे संगती असताना परिस्थितीने पुरते कोलमडून जावे, अशी वेळ असताना हा शिवपुत्र मुरब्बी असं राजकारण करतो. आपल्या पित्याने आणि भावाने ज्या गोष्टींमुळे कितीतरी आपले लोक दुखावले त्या "वतनदारी"ला पुन्हा सुरू करण्याचा धाडसी निर्णय ह्या मुरब्बी राजकारण्याने घेतला, ह्या निर्णयाचा आपल्या कर्तृत्वावर होणारा परिणाम ह्यापेक्षा स्वराज्याच अस्तित्व महत्वाचं ठरवून काही वेळेस बदलावं लागतं ही समजूत स्वतःला घालून दिली. ह्या वतनदारीच्या लोभापायी कितीतरी मुघल सरदार महाराजांच्या पदरी आले, फौजफाटा जमा ह्यायला सुरवात झाली आणि जिंजीला इतिकदखान म्हणजेच झुल्फिकारखान ह्याचा वेढा पडला. सरदारांची जुळवाजुळव, रायगडावर झालेलं मंचकारोहन ह्यात राहिलेला महाराजांचा राज्याभिषेक उरकून घेऊन, "चंदी" (जिंजी) ही मराठा साम्राज्याची राजधानी झाली, अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली, संताजी ह्यांना सरसेनापती तर खंडोजी ह्यांना चिटणीस, आणि निळोपंतांना पेशव्यांची वस्त्रे देऊन अष्टप्रधान मंडळ स्थिर केलं, आणि नंतर सुरू होते ती औरंगजेबाच्या सरदारांशी रणधुमाळी, अवघ्या जगात ज्या लढवय्या सरदारांना कोणी मात दिलेली नाही त्यांना मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं, चार सरदारांचा मृत्यू हा फक्त मराठ्यांच्या रणांगणात होणाऱ्या भेदक हल्ल्याच्या चरकापाने होतो, शत्रूपेक्षा अर्धी फौज घेऊन शत्रुच्याच रस्त्यात ठाण मांडून त्याला पळवून लावण्याची धमक मराठ्यामध्ये आलेली असते, राजा वेढ्यात अडकला म्हणून मावळ्यांनी तलवार गाजवण थांबवलं नाही, उलट आलमगीर दक्षिणेत उतरलेला पाहून त्याचा उत्तरेतील बराच प्रदेश मराठ्यांनी मारला, औरंजेबास पुरता सरदर्द देऊन टाकण्याचा मानस मराठ्यांनी उचलून धरला, ह्यातच औरंजेबाचा संशयी स्वभाव त्याचा पथ्यावर पडला आणि जिंजीला वेढा घातलेला त्याचा `नुस्त्रातजंगबहादूर खान` म्हणजेच झुल्फिकारखान हा त्याच्याकडून फुटला, महाराजांशी आतून सलोखा करून त्याने वेढा फक्त शोभिवंत असा केला, आणि महाराज दक्षिणेत मोकळे झाले, महाराजांचे बंधू तंजावरचे अधिपती शहाजीराजे ह्यांच्या मदतीने दक्षिणेकडे असणाऱ्या इतर राज्यांशी सलोखा करून, भविष्यात त्याना अभय देण्याची शाश्वती देऊन महाराजांनी मुघल बादशहाच्या विरोधात मोठी मोर्चेबांधणी केली. औरंगजेबाचे दक्षिणेकडे असणारे सगळे मोठे सरदार संताजी आणि धनाजी ह्यांच्या तलवारीने गारद झाले होते आणि म्हणून आता मराठ्यांना आवर घालणारा कोणीही ह्या भूमीवर उरला नव्हता, उत्तरेतील बुऱ्हाणपूर, सुरत, औरंगाबाद आणि सगळे मोठे शहर मराठ्यांनी लुटून मुघलांच्या नाकीनऊ आणली,हल्ला केलेला एक एक किल्ला मराठ्यांनी वर्ष वर्ष लढवला आणि शिबंदी संपल्यास तो भली मोठी रक्कम घेऊन मुघलांना दिला आणि फिरून काही महिन्यांनी जिंकला असे करून मराठ्यांनी मुघलांना पुरती मात दिली. राजाराम महाराज महाराष्ट्रात आले, आणि त्यांनी सातारा ही "तख्ताची जागा" केली. पण तख्त म्हणजेच स्वतःला सतत फिरस्ती ठेऊन मुलुख सुरक्षित केला. सतत राजकिय उलाढाली करत औरंजेबाच्या हाती एक चिमूटभर माती सुद्धा लागू दिली नाही. असा हा मुरब्बी राजकारणी `देवीच्या ज्वरा`स मात्र शह देऊ शकला नाही आणि मराठ्यांच्या तिसऱ्या छ्त्रपतीने औरंगजेबास ११ वर्ष झुंजवत ठेऊन मात देऊन सिंहगडावर आपला देह ठेवला. आपल्या पित्यास आणि बंधुस तोलाच कर्तृत्व दाखवून मराठ्यांचे तिसरे छत्रपती अमर झाले. ...Read more
Madhavi Kishor Thanekarएक दुर्लक्षित छत्रपती
----------------------------------छत्रपती राजाराम राजे यांच्या आयुष्यावर लिहिलेले "शिवपुत्र राजाराम `हे Dr. आशा जरग यांनी लिहिलेले पुस्तकं नुकतेच वाचले. युगपुरुष पित्याचे दुसरे चिरंजीव, स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे यंच्या उण्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्याचा पट ही कादंबरी मांडते... संभाजी राजा सारखा सावत्र पण प्रचंड माया प्रेम करणारा भाऊ, येसूबाई सारखी धीरोदात्त वहिनी, सोयराबाई सारखी अभिषिक्त पट्टराणी ही आई म्हणून लाभलेल्या राजाराम महाराजांची कारकीर्द तशी दुर्लक्षितच राहिली...अगदी त्यांची दुसरी पत्नी ताराराणी यांच्या इतकेही लक्ष आणि महत्व इतिहास पुरुषाने त्यांना दिले नाही... हे पुस्तक वाचण्यापूर्वी माझ्यासाठी ही हा राजा तसा अनोळखीच होता...
त्यांची ओळख मला होती ती संभाजी राजांच्या चरित्रातून सोयराबाईंचे "राजमाता " पदाच्या स्वप्नातील एक प्यादे म्हणूनच... पण त्याहूनही हे स्वराज्याचे तिसरे अभिषिक्त छत्रपती खूप मोठ्या पात्रतेचे आणि योग्यतेचे होते हे निश्चित... वयाच्या 10व्या वर्षी पितृछत्र हरपले आणि सोयरामातोश्रींच्याराजकारणामुळे कोवळ्या वयात राजाराम महाराजांचे मंचकारोहण झाले. पण हे बंड फसले आणि संभाजी महाराज छत्रपती झाले.
औरंगजेब स्वराज्यावर चालून आलाच. त्याच्याशी तब्बल 9 वर्ष संभाजी राजे झुंजले. पण अखेर 9 वर्षातच त्यांना दगाबाजी मुळे कैद झाली आणि त्यांचा महिन्या सव्वामहिन्याच्या अपरिमित छळ झाल्यानंतर निघृण वध झाला... त्याआधीच वेळेचा तकाजा लक्षात घेऊन येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला होता...
केवढं भयानक संकट होतं ते...
औरंगजेबानेआधीचआदीलशाही, कुतुबशाही गिळंकृत केली होती... मराठ्यांच्या शूर छत्रपती ला ठार मारले होते... आणि बरोब्बर 15 दिवसात त्याच्या शूर पराक्रमी इतिकदखान नावाचा सरदार रायगडाला वेढा घालून बसला होता... तेवढी राजधानी ताब्यात यायची फुरसत की मराठ्यांचे साम्राज्य नष्ट झाल्यात जमा होते...
औरंगजेबाला गगन ठेंगणे झाले होते... त्याच्या फौजेत तर जल्लोषाला सूरूवात झालीच होती... पण अशा कठीण प्रसंगी येसूबाई आपले दुःख विसरून कणखर पणे उभ्या राहिल्या... त्यांनी राजाराम राजाना वेढ्यातून निसटूनप्रतापगडाकडे पाठवले... त्यांच्या दोन पत्नी ताराराणी आणि राजसबाई यांच्यासह ..थोरल्याजानकीबाई येसूबाई बरोबरच राहिल्या, पुढे त्यांच्या बरोबरच औरंगजेबाच्या कैदेत सापडल्या आणि तिथेच निवर्तल्या... यावेळी राजाराम महाराज वेढ्यातून निसटले अगदी शिवाजी महाराज पन्हाळ्याहून निसटले तसेच... परिस्थिती त्याहूनही कठीण असतांना... राजाराम राजे प्रतापगडावर आहेत म्हटल्यावर त्याला मुक्रबखानने वेढा दिला.
मग पुन्हा तिथून राजाराम राजे निसटले ते पन्हाळ्यावर...तिथून त्यांनी आपला कबिला पाठवला सुरक्षित अशा विशाळगडावर...
लगेच राजाराम राजांनी स्वतःजिंजीच्या किल्ल्यावर निसटायचं ठरवलं... हा जिंजीचा (इंदीचा ) किल्ला आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर साधारण पणेआत्ताच्यापाँडिचेरी जवळ... याठिकाणी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती ते दिसते... दक्षिण मोहिमेवर असताना त्यांनी जिंजीचा अभेद्य किल्ला जिंकला होता.. आणि तिथे महाराजांची कन्या अंबिकाबाई हिचे पतीहरजीराजे महाडिक यांची नियुक्ती केली होती...किल्ला बेलाग होता हे खरच... मध्यभागी किल्ला, त्याच्या दोन्ही बाजूस दोन उंचावर किल्ले प्रत्येक किल्ल्याला तटबंदी खंदक आणि पुन्हा तिन्ही किल्ल्याना मिळून एक तटबंदी होती...
त्यामुळे राजांना सुरक्षितता लाभणार होती पण. ... पण टप्पा खूप लांबहोता..जवळपास 600-800 किमी जायचे होतं मुघल साम्राज्यातून... पण पर्याय नव्हता... यावेळी या छत्रपती चे वय होते 18-19 वर्षाचेच... लिंगायत स्वामींच्या वेषात मोजक्या लोकांच्या बरोबर अपरिमित संकटाना तोंड देऊन राजे इन्दिच्या अलीकडे असलेल्या वेल्लोर ला पोचले...अगदी आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका या प्रसंगाची आठवण करुन देणारा हा राजाराम राजांच्या आयुष्यातला प्रसंग...
दरम्यानच्या काळात दोन दुर्दैवी घटना घडल्या.. एक कोणताही विरोध न होता राजकारण करुन औरंगजेबाने रायगड पदरी घेतला... राजाराम राजांच्या अटकेची आणि वधाची खोटी अफवा उठवून... येसूबाई, शाहूराजे, जानकीबाई यांना जीव न घेण्याच्या बोलीवर औरंगजेबाने ताब्यात घेतले...
स्वराज्यात फक्त्त विशाळगड हा एकच किल्ला राहिला होता ज्यामध्ये राजांचा कुटुंब कबीला होता.. आणि दुसरी दुर्देवी गोष्ट म्हणजे ज्यांच्या जीवावर राजांनी एवढे मोठे साहस केले होते ते हरजीराजे मरण पावले होते आणि त्यांची पत्नी आणि मुलगा हे राजांच्या वर उलट चालून येणार होते. अशा अतिशय खडतर परिस्थितीत शांत चित्ताने राजकारण करुन, सैन्याची पुन्हा एकदा जमवाजमव करुन, आजूबाजूच्या छोट्या राजांना आपल्याकडेवळवून,औरंगजेबासारख्या सामर्थ्यशाली शत्रूला समर्थपणे सामोरे जाऊन ज्या तडफेने राजाराम राजे पुन्हा स्वराज्य उभे करतात हे खरंच मुळापासूनच वाचण्याजोगे...
निव्वळ 2 किल्ल्यापुरते उरलेले स्वराज्य पुन्हा 225-250 किल्ले जिंकून समृद्ध बनवले... शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला सगळा मुलुख परत मिळवला...पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊन साताऱ्याला राजधानी वसवली.. मराठेशाहीला परत एकदा गतवैभव मिळवून दिले...
आणि हे सगळे फक्त 11 वर्षाच्या कारकिर्दीत... संभाजी राजांची कारकीर्द फक्त 9 वर्षांची होती...
राजाराम महाराजांना `देवी ` या रोगामुळे अवघ्या 32 व्या वर्षी मरण आले...
पण त्या पूर्वीच त्यांनी मराठेशाही पुन्हा मानाने उभी केली होती... संताजी घोरपडे
आणि धनाजी जाधव या दोन शिलेदारानी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले होते...
भगव्याला पुन्हा मानाचे वैभव मिळवून देणाऱ्या या छत्रपतींना मनापासून त्रिवार मुजरा....
...Read more