* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAHATMA ( JOTIRAO PHULE )
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618811
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 484
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS INDEED A HERCULEAN TASK TO WRITE A BIOGRAPHY. THE WRITER SHOULD POSSESS THE QUALITIES OF A NOVELIST AND A BIOGRAPHER TOO. THE BIOGRAPHER MAINLY HAS A MIND THAT OF A RESEARCHER, AT THE SAME TIME, HE IS A COLLECTOR OF THINGS. A NOVELIST MAINLY WORKS ON INNOVATIVE IDEAS, HE CREATES IDEAS AND THE BIOGRAPHER SIMPLY PUTS THE PAST THINGS INTO WORDS NOT CHANGING ANY ASPECT OR NOT GIVING ANY DIMENSION TO THINGS. BOTH THE NOVELIST AND THE BIOGRAPHER HAVE TO RESEARCH A LOT BEFORE STARTING ON SOME WORK, AND THAT TOO WITH UTMOST DEDICATION. AN AUTHOR HAS TO STUDY THE CHARACTER IN DETAIL, NOT ONLY THIS, HE HAS TO STUDY THE CONTEMPORARY SITUATION, THE PEOPLE, THE FAMILY MEMBERS OF THE ONE WHOSE BIOGRAPHY IS TO BE WRITTEN, HIS FRIENDS, HIS RIVALS, HIS RELATION WITH THE SOCIETY AS SUCH, HIS WORK, ITS NATURE, ITS IMPORTANCE, ETC. HE HAS TO STUDY EVERYTHING WITH A NEW ANGLE. EVEN THOUGH THE READY MATERIAL IS AVAILABLE FROM THE BIOGRAPHER THE NOVELIST HAS TO GO THROUGH IT AGAIN AND AGAIN, NOT MISSING ANY SINGLE DETAIL. MANY A TIMES HE HAS TO RESEARCH AGAIN NOT JUST FOR CONFIRMATION OR VERIFICATION BUT TO MAKE SURE THAT NO FALSE INFORMATION IS QUOTED ANYWHERE. HE PREPARES HIMSELF FULLY AS GOOD AS THE BIOGRAPHER, BUT THEN SETTLES DOWN TO GIVE IT A FORM OF NOVEL. HE DOES NOT INTEND TO NARRATE ABOUT THE LIFE OF THE CONCERNED PERSON. ON THE CONTRARY, HE HAS TO REVEAL THE TRUE QUALITIES OF THE GREAT PERSONALITY TO PEOPLE. HE HAS TO PEN DOWN VERY PRECISELY THE EVENTS RELATED TO THE CONCERNED PERSON AND THE OTHERS AROUND HIM. A RESEARCHER DOES NOT WRITE ANYTHING WHICH HAS NO BASE. BUT A BIOGRAPHER CUM NOVELIST HAS TO COME OUT OF THIS ROLE, HE HAS TO THINK AND ACT LIKE A CREATOR. WHEN HE IS AN INNOVATOR HE STILL HAS TO RETAIN THE ROLE OF A RESEARCHER. WHEN THE BEST OUT OF THESE TWO IS BLENDED TOGETHER PROPERLY THEN ONLY THE BIOGRAPHY CUM NOVEL IS A SUCCESS. M. V. DHOND. MAHATMA IS A BIOGRAPHY CUM NOVEL, EXPLORING THE WONDERFUL BLEND OF THE PERSONALITY, THE WORK DONE AND THE REVOLUTIONARY THINKING OF JYOTIBA PHULE.
....चरित्रात्मक कादंबरी लिहिणे ही एक मोठी कठीण साधना आहे. त्याकरिता लेखकाच्या अंगी चरित्रकार व कादंबरीकार या दोहोंचेही गुण असावे लागतात. चरित्रकार हा मुख्यत: संशोधक व संचयक असतो; तर कादंबरीकार हा मुख्यत: सर्जक असतो. चरित्रात्मक कादंबरीचा लेखक हा संशोधक, तसाच सर्जकही असावा लागतो. कादंबरी लिहायला घेण्यापूर्वी त्याला चरित्रकाराएवढीच पूर्वतयारी करावी लागते; आणि ती करीत असता संशोधकाचे व्रत कठोरपणे पाळावे लागते. ज्याच्यावर कादंबरी लिहावयाची, त्याचे उत्कृष्ट चरित्र आधीच लिहिले गेले असले, तरीही चरित्रनायकाचा काळ, त्याचे कुटुंबीयांशी, स्नेह्यांशी, विरोधकांशी – एकंदर समाजाशी असलेले संबंध, भावबंध, त्याच्या कार्याचे स्वरूप व महत्त्व, इ.इ. गोष्टींचे पुरे आकलन होण्याकरता चरित्रकाराने केलेल्या संशोधनाचा त्याला नव्याने मागोवा घ्यावा लागतो; एवढेच नव्हे, तर त्याच्याहूनही अधिक संशोधन करावे लागते. ही सर्व पूर्वतयारी झाल्यावरच तो कादंबरी लिहिण्यास पात्र होतो. चरित्रलेखकाएवढीच पूर्वतयारी केल्यावर तो चरित्र लिहावयास न घेता कादंबरी रचण्यास प्रवृत्त होतो, याचे कारण त्याला त्या व्यक्तीच्या जीवनाचे निवेदन करावयाचे नसते, तर त्याच्या जीवनाचा साक्षात्कार घडवावयाचा असतो. त्याकरता त्याचा चरित्रनायक व त्याच्याशी संबंध आलेल्या व्यक्ती यांच्या मनांचे व्यापार कृती-उक्तींच्या द्वारे चित्रित करणे आवश्यक असते. हे साधण्याकरता ‘नामूलं लिख्यते किंचित्’ ही संशोधकाची प्रतिज्ञा विसरून, सर्वज्ञ अशा सर्जकाची भूमिका घेणे त्याला प्राप्त होते; परंतु केवळ पूर्वतयारीच्या वेळी संशोधक आणि निर्मितीच्या वेळी मात्र सर्जक, अशा या दोन अलग अलग भूमिका नसतात. सर्जकाची भूमिका वठवताना संशोधकाची भूमिका त्याला टाकता येत नाही. या दोन्ही भूमिकांतील गुणांची शय्या त्याच्या लेखनात जेव्हा उत्कृष्ट जमते, तेव्हाच चरित्रात्मक कादंबरी यशस्वी होते. –म. वा. धोंड उत्कृष्ट चरित्रात्मक कादंबरी-लेखनाचे उपर्युक्त निकष तंतोतंत पाळून लिहिली गेलेली, द्रष्टे महामानव जोतीराव फुले यांचे क्रांतदर्शी विचार, जीवनकार्य आणि व्यक्तिमत्त्व यांचे एकरस दर्शन प्रथमच घडवणारी चरितकहाणी : ‘म हा त्मा’.
जनसारस्वत पुरस्कार २००४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MAHATMA(JYOTIRAOPHULE) #MAHATMA(JYOTIRAOPHULE) #महात्मा(जोतीरावफुले) #BIOGRAPHY #MARATHI #RAVINDRATHAKUR #रवींद्रठाकूर "
Customer Reviews
  • Rating StarDevidas Saudagar, Pustak Bistak

    नुकतंच महात्मा हे पुस्तक वाचून झालं... या पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले यांचे चरित्र उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे त्यांच्या बालपणीच्या आठवणी व तरूणपणी केलेलं कार्य यांचा वेध घेण्यात आला आहे. लिखाणात जिवंतपणा जाणवतो. त्या काळात मन हरवून जातं..! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    नव्या सहस्त्रकातील सामाजिक चळवळींना ‘महात्मा’ ही कादंबरी बळ देईल... या कादंबरीच्या उत्तम निर्मितीचा पहिला पुरावा म्हणजे या कादंबरीच्या मुखपृष्ठावर छापलेले अस्सल छायाचित्र होय. माझ्या पाहण्यातली ही पहिली कादंबरी आहे की जिच्या मुखपृष्ठावर महात्मा फुलेचे अस्सल छायाचित्र आले आहे. चरित्रांवर ते यापूर्वी आलेले आहे; पण कादंबरीवर ते पहिल्यांदाच आलेले आहे. मी आपणास एवढेच सांगेन की मराठीतील महात्मा फुले यांच्यावरील निदान तो कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या आहेत, ही चौदावी आहे. या सगळ्या कादंबऱ्या बारकाईने वाचल्यानंतर मी एवढेच म्हणेन की मेहता साहेबांनीच प्रसिद्ध केलेली अनिरुद्ध पुनर्वसू यांची ‘प्रभंजन’ ही कादंबरी सगळ्या सरस होती. खरं म्हाजे इंदूताई केळकर यांनी लिहिलेली ‘सावित्री जोती’ ही सुद्धा चांगलीच कादंबरी होती. नयनतारा देसार्इंचा ‘तेवतो नंदादीप हा’ हा प्रयत्नही बरा होता. आणखी काही प्रयत्नांचे उल्लेख करत बसण्याऐवजी एवढेच सांगतो की, त्या सर्वांवरचा अत्यंत उत्कृष्ट आणि आजपर्यंतचा सर्वांत श्रेष्ठ असा प्रयत्न हा आहे. मला सर्वांत जास्त आवडलेली कादंबरी ही आहे. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी अद्ययावत साधनांचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिलेली आहे. त्यांनी जुन्या माहितीच्या आधारे लिहिलं असतं तरी ते चुकीचं झालं नसतं. पण त्यांनी अगदी अद्ययावत साधनांचा अभ्यास केला आहे आणि म्हणून या कादंबरीच्या ब्लर्बवर म. वा. धोंड यांनी म्हटल्याप्रमाणे चरित्रात्मक कादंबरी लिहिणारा कादंबरीकार हा एका अर्थाने संशोधकही असतो आणि सर्जकही असतो, तर ते खऱ्या अर्थाने डॉ. रवींद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. उत्तम प्रकारची संशोधनशीलता आणि सर्जकता त्यांच्याकडे असून कूठेही सत्याशी आणि वास्तवाशी तडजोड त्यांनी केलेली नाही. किरकोळ स्वातंत्र्य आपण मान्यचं केले पाहिजे. तेवढं आपण लेखकाला दिलचं पाहिजे. पण कादंबरी लेखक याहीपेक्षा जास्त स्वातंत्र्य घेऊन गेला असता तरी तक्रार करण्याचं कारण नव्हतं. हे स्वातंत्र्य त्याने घेतलंच पाहिजे आणि आम्ही दिलंच पाहिजे. तरी उदाहरणादाखल नमूद करून ठेवतो की त्यांनी दिलेला मुक्ताचा निबंध १८५५ मध्ये प्रसिद्ध झालेला असून तो १८५२ मध्ये झालेल्या म. फुलेंच्या सत्काराआधी आलेला आहे. पण लेखकाला गरजेनुरुप असं करावसं वाटलं असेल तर त्यात वावगं काहीच नाही. अशासारख्या किरकोळ गोष्टी सोडल्या तर असं कूठेही दिसलं नाही की लेखकाने आवर्जून कूठे काही स्वातंत्र्य घेतलं आहे वा पडझड केली आहे किंवा काही बदल केले आहेत. मला स्वत:ला असं वाटतं की ही कादंबरी असूनसुद्धा इतकं त्या सत्याशी, संशोधनाशी, त्या अभ्यासाशी प्रामाणिक राहत राहत हा लेखक पुढे गेलेला आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे. दुसरी बाजू नोंदवली पाहिजे ती अशी की, सत्याशी, फुलेंच्या जीवनातील घटना प्रसंगाची एकरूप होणाऱ्या आणि त्याचप्रमाणे संशोधनात अतिशय प्रावीण्य असलेल्या या लेखकाने आपण कादंबरी लिहितो आहोत याचं भान कूठेही सोडलेलं नाही. म्हणजे चरित्रग्रंथामध्ये ज्या साधक बाधक चर्चा करावयाच्या असतात तशा प्रकारच्या चर्चा करत न बसता खुबीने म. फुल्यांच्या साहित्यातील वाक्ये त्यांच्या तोंडी घालून या चर्चा त्यांनी पुढे नेल्या आहेत. इतका चांगला प्रयत्न मला अन्यत्र आढळला नाही. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म यातील विचार प्रश्नोत्तरांच्या रूपाने फुल्यांच्या तोंडी घालून त्यांनी उत्तम मेळ साधला आहे. समग्र फुले साहित्यसुद्धा या रूपाने आपल्याला निवडक स्वरूपात या कादंबरीत वाचायला मिळते. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवलं आणि ते मला फार मनापासून आवडलं. या कादंबरीत असे कितीतरी प्रसंग आहेत, की हा लेखक आपल्याला हलवून सोडतो, डोळ्यात पाणी आणतो. ते वाचताना आपा गदगदून जातो. मला अतिशय आवडलेला प्रसंग म्हणजे, जेव्हा मारेकरी म. फुले यांचा खुन करायला येतात हा आहे. हा प्रसंग ठाकूरांनी अतिशय नाट्यपूर्ण वर्णन केला आहे. मुळातच तो प्रसंग आव्हानात्मक आणि लेखकाला पेलण्यासाठी खूप ताकद हवी अशी मागणी करणारा आहे. परंतु ठाकूरांनी तो इतका जिवंत केला आहे आणि ते प्रसंगचित्र हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ते मारेकरी आपल्यासमोर उभे आहेत. म. फुल्यांशी बोलत आहेत आणि म. फुले त्यांना जिंकत आहेत असं सारं दृश्य आपल्या समोर उभं राहतं आणि आपल्या काळजाला ते छेदून जातं. याशिवाय म. फुलेंच्या सत्काराचा प्रसंग, त्यांच्या मृत्यूनंतर झालेला आकांत आणि सावित्रीबार्इंनी घेतलेला पुढाकार अगदी शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी म. फुलेंनी केलेला आटापिटा असे कितीतरी हेलावून टाकणारे प्रसंग या कादंबरीत आले आहेत. मला स्वत:ला असं वाटतं की म. फुले यांच्या चरित्रात्मक लेखनामध्ये आणि त्यांच्यावरील कादंबरीलेखनामध्ये वाचकांना वाचायला लावणारी, वाचकांना सतत पुढे पुढे जात राहावं अशी प्रेरणा देणारी, पकडून ठेवणारी आणि तरीही चरित्राशी कूठल्याही प्रकारची धरसोड न करता सतत प्रामाणिक राहिलेली अशी अत्यंत सुंदर कादंबरी या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळते आहे. त्यांनी तीस संदर्भग्रंथांची यादी येथे दिलेली आहे. परंतु माझी खात्री आहे की किमान तीनशे ग्रंथ तरी त्यांनी वाचले असतील. कारण त्याशिवाय तो सारा काळ, त्यावेळचं पुण्यातलं वातावरण शब्दात पकडणं एवढं सोपं नव्हतं. परंतु ठाकूर त्यात यशस्वी झाले आहेत. त्याकाळी पुण्यातील सुधारकांनी ‘दक्षिणा प्राइज कमिटीला’ जो अर्ज लिहिला होता आणि त्यामुळे जी काय त्रेधा तिरपिट उडाली त्याचं ठाकूरांनी अत्यंत बहारदार असं वर्णन केलं आहे. हे प्रसंग फार कमी प्रमाणात आपल्यासमोर आले आहेत. घडतं ते असं की, पुण्यातील सुधारक तरुण सरकारला विनंती करत आहेत, की पेशवाईपासून ब्राह्मणांना दक्षिणा वाटपाची पद्धत चालत आलेली आहे. तुम्हीही ती सुरू ठेवली आहे तेव्हा त्यातली काही रक्कम चांगल्या पुस्तकांना बक्षीस म्हणून दिली जावी. अशा प्रकारचा हा विनंतीचा अर्ज लोकहितवादी, बापूसाहेब मांडे आणि त्यांच्या भवाकरांसारख्या इतर सुधारक मित्रांनी केलेला आहे. हे घडताना पुण्यात हलकल्लोळ माजला, की या धर्मबुडव्यांनी सरकारकडे आपल्या दक्षिणेवर डाव आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालवले आहेत. पुण्यातल्या मंडळींनी तुळशीबागेत सभा बोलविली आहे आणि ती सभा बोलवल्यामुळे हे सगळे सुधारक घाबरलेले आहे. आता हे गेल्या शतकातलं सामान्यपणे नेहमीच दिसणारं चित्र होतं. काहीतरी करायला जायचं पण संकटाची वेळ आली. परीक्षेची घडी आली की घाबरून जायचं हे पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या उच्चवर्गीय सुधारकांमध्ये आपल्याला सतत दिसतं. अशावेळी म. फुले यांच्यासारखा एक निधड्या छातीचा तरुण, जगाचं वय जेमतेम पंचवीस वर्षांचं आहे तो उभा राहतो, त्यांना संरक्षण देतो. सुमारे पन्नास तरुण अंगरक्षकांच्या तैनातीत सुधारक तुळशी बागेत पोहचतात. बागेत प्रचंड ब्रह्मवृंद जमलेला आहे. संतापलेला आहे. त्यावेळी त्या तरुण सुधारकांशी जी झाडाझडती घेतली जाते. तेव्हा ते शांतपणे सांगतात की, हा अर्ज आम्ही लिहिलेला नसून तो जोतिबा फुलेंनी लिहिलेला आहे. त्यावेळी अक्षरश: टाचणी लागून फुगा फुटावा त्याचप्रमाणे सगळा ब्रह्मवृंद हतबल होतो. हा जो सगळा वृत्तांत या कादंबरीत आला आहे. तो वाचल्यानंतर फुले या नावाची ताकद त्यावेळी पुण्यात काय असेल याची साक्ष पटते. कारण शेकडो नव्हे तर हजारोंच्या संख्येने जमलेले सगळे ब्राह्मण त्यावेळी संतापलेल्या अवस्थेत आहेत. परंतु तो अर्ज फुलेंनी लिहिलेला आहे म्हटल्यानंतर सगळेच एकदम गर्भगळीत होतात. काय करणार मुकाट्याने निघून जातात. मला स्वत:ला असं वाटतं की, फुलेंच्या मागे लोक नव्हते असं जी काही मंडळी नेहमी म्हणत असते. त्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा थोडसं चिंतन करावं, शोध घ्यावा. सांगण्यासारखं असं खूप आहे. परंतु कादंबरीत काय काय देणार शेवटी ही कादंबरी आहे आणि जागेचीही मर्यादा आहेच यांचेही भान आपल्याला ठेवलं पाहिजे. ‘सत्सार’ चे दोन अंक निघाले असं त्यांनी म्हटलं आहे, परंतु मला शंका आहे. ‘सत्सार’चा तिसरा अंक निघालाच नसेल असं म्हणता येणार नाही, कारण म. फुलेंचं अजून न मिळालेलं असं खूप साहित्य असावं पुरावा द्यायचा म्हणून एवढंच सांगतो की, म. फुलेंच्या टीकाकारांनी टीकेखाली म. फुलेंची जी विधानं वापरली आहेत, ज्या कविता वापरल्या आहेत त्यांचा समावेश अजूनही ‘म. फुले समग्र वाङ्मयात’ झालेला नाही. याचा अर्थच असा की, ते साहित्य अजून आपल्याला मिळालेलं नाही. त्याचा कसून शोध घेतला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. ‘सत्सार’ चा तिसरा अंक कदाचित निघालाही असेल. ‘सत्सार’च्या पहिल्या अंकाच्या एक हजार प्रती खपल्या होत्या असा उल्लेख त्यांनी केला आहे. १८५५ साली एका नियतकालिकाच्या एक हजार प्रती खपतात ही घटना लक्षणीय आहे. याचा अर्थ काय होतो फुलेंच्या मागे लोक नव्हते फुलेंचं लोक वाचत नव्हते त्याशिवाय का हे घडलं सांगायला अभिमान वाटतो की, फुले समग्र वाङ्मयाच्या दहा हजार प्रतींची पहिली आवृत्ती निघाली तेव्हा लोकांनी रेशनसारख्या रांगा लावून प्रति घेतल्या नंतरची पन्नास हजार प्रतींची नवी आवृत्तीही आता संपत आली आहे. मला सांगायचं ते हे, की अजूनही पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या काही लोकांना फुलेंचं नेमवंâ मोठेपण कळालेलं नाही. लेखक प्रकाशकांचं अभिनंदन यासाठी करणं आवश्यक आहे की ठाकूरांनी कोल्हापुरात राहून ही कादंबरी लिहिली आणि मेहतांनी पुण्यात असून ती प्रसिद्ध केली. कादंबरी लिहायला घेतली हे शतक संपत असताना ती प्रसिद्ध होत आहे, नव्या सहस्त्रकात आपण प्रवेश करीत आहोत, अशा वेळी हे पुस्तक येत आहे. मला असं वाटतं की नव्या सहस्त्रकात म. फुलेंचं जे मूल्यमापन केले जाणार आहे त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. फुले-आंबेडकरांचं, शाहू महाराजांचं मोल आज या देशातल्या बहुजनांना कळू लागलेलं आहे. त्या सगळ्यांच्या जाणिवा विकसित करण्याचं काम ही कादंबरी करेल असा मला विश्वास वाटतो. उद्याच्या सामाजिक चळवळींना बळ देण्याचं काम ही कादंबरी करेल. तरुण पिढीला कदाचित संशोधनपर लेखनात आणि चरित्रपर ग्रंथात फारसा रस वाटत नसेल, परंतु या कादंबरीमध्ये मात्र त्यांना खेचून नेण्याची, पकडून ठेवून सतत पुढे नेण्याची, वाचायला लावण्याची क्षमता आहे आणि शिवाय अतयंत सहज सोप्या भाषेत हे सारे लेखन झाले आहे. भाषेचा मुद्दा थोडासा वादग्रस्त होऊ शकतो. कारण लेखकाची अडचण अशी आहे की, काही ठिकाणी त्या काळातील लेखकांनी लिहिलेली त्या काळची मूळ भाषा उपलब्ध आहे. आणि काही ठिकाणी आता कल्पनेने लिहायचं आहे. त्यामुळे कल्पनेनेन लिहिताना आजची भाषा आणि काही ठिकाणी उपलब्धतेनुसार त्या लेखकांची त्या काळची भाषा असं झालं आहे. त्यामुळे काही वेळा एकाच माणसाच्या तोंडी दोन वेगवेगळ्या प्रकारची भाषा आलेली आहे. परंतु ते अगदी अटळ आहे. कारण गेल्या शतकात त्या भाषेचं जसंच्या तसं कल्पनेने तांडणं किंवा आकलून लिहिणं तसं अवघडचं आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. त्यांनी कादंबरीला लिहिलेल्या मनोगतात असं म्हटलं आहे, की महाराज सयाजीराव गायकवाड यांची म. फुले यांना जी मदत केली. ती म. फुले यांच्या मृत्युनंतर घडलेली घटना असल्याने ती या कादंबरीत आलेली नाही. हे अगदी खरं आहे. म. फुले यांच्या मृत्यूनंतरच्या अत्यंयात्रा, त्याबाबत सावित्रीबार्इंनी घेतलेला पुढाकार या दोन मुख्य घटनांनंतर कादंबरी संपते. म. फुले यांची ही चरित्र कहाणी असल्यामुळे त्यांच्या शाळांच्या कामापासून ती सुरू होते आणि त्यांच्या मृत्युजवळ थांबते. पहिल्या भागात १८५७ पर्यंतचा कथाभाग येतो. दुसऱ्या भागात १८५७ ते १८८५ पर्यंतचा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतचा कथा भाग आहे. आणि १८८५ ते १८९० पर्यंतचा कथा भाग तिसऱ्या आणि चौथ्या भागात आला आहे. अशाप्रकारे एकूण चार भागात विभागलेली एकूण चारशे ऐंशी पृष्ठांची एक चांगली बलदंड कादंबरी या चरित्रकहाणीच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळते आहे. बडोद्याहून मदत मिळायला जो उशीर झाला, त्याबाबत नेमके काय घडले याचा शोध घेतला गेला पाहिजे। महाराजांकडे मामा परमानंदांनी तीन पत्रं पाठवली होती. पहिलं पत्र त्यांनी ३१ जुलै १८९० ला लिहिलं. दुसरं लगेच १८९० ला लिहिलं. दुसरं लगेच १८९०च्या ऑगस्ट महिन्यात लिहिलं आणि तिसरं पत्र म. फुले यांच्या मत्यूनंतर लगेच डिसेंबर महिन्यात लिहिलं. या तीनही पत्रांमध्ये पुन:पुन्हा एकच मागणी होती की, महात्मा फुलेंसारख्या एका मराठा मानसिकतेची बंध मुक्ती करणाऱ्या, बहुजन समाजाची मानसिकता बदलण्याचं काम करणाऱ्या माणसाला मदत करा. म. फुले यांचं फार मौलिक असं र्वान मामा परमानंदांनी केलेलं आहे. त्यांचं इतकं चांगलं वर्णन इतर कोणत्याही समकालीन लेखकाने केलेलं नाही. म. फुले यांची खरी ताकद ओळखणारा हा मामा परमानंद नावाचा एक ब्राह्मणेतर विद्वान आहे. मला सांगायचं आहे ते असं, की मामांनी सयाजीरावांना तीन तीन पत्र लिहिल्यानंतरसुद्धा मदत मिळायला जुलै १८९० ते फेब्रुवारी १८९२ एवढा मोठा कालखंड जावा लागलेला आहे. म्हणजे त्यावेळची नोकरशाहीसुद्धा आजच्या सारखी मध्ये काड्या घालायचं काम करत होती का ती पत्रं महाराजांपर्यंत पोचलीच नाहीत का पत्रं पोचल्यानंतर सुद्धा महाराजांना निर्णय घेऊ नये असं काही कारस्थान काही लोकांनी केलं होतं का कारण म. फुले गेल्यानंतरची पुढची दोन पत्रं आणखी आहेत. त्यापैकी एका पत्राचा उल्लेख कादंबरीत आला आहे. पुढे आणखी एक पत्र असं आहे की, यशवंताच्या हातून पुनहा नव्याने अर्ज लिहून घेऊन पाठवावा लागलेला आहे. ही पत्रं तरी कशी उपलब्ध झाली ते माहीत आहे सयाजीरावांच्या दरबारातील दिवाण रामचंद्रराव धामणस्करांना मामा पुन:पुन्हा पत्रं लिहित आहेत आणि मग ती तीनही पत्रं धामणस्करांनी परत पाठविली आहेत. आणि पुन्हा एकदा नव्याने अर्ज मागविला आहे. अशाप्रकारे ही पत्रं आज आपल्याला उपलब्ध झाली आहेत. पुढची जी पत्रं आहेत त्यात सुद्धा म. फुले मरण पावले आहेत आता तरी निदान सावित्रीबार्इंना आणि यशवंतला मदत पाठवा अशी विनंती मामांनी केलेली आहे. तेव्हा असं दिसून येतं की, फेब्रुवारी १८९२ मध्ये मदतीचा पहिला चेक येतो आणि त्यानंतर दर तीन महिन्याला पन्नास रुपये अशी मदत चालू राहते. हा सगळा पुढचा इतिहास या कादंबरीत येणे शक्यच नव्हते. परंतु पुढे जे घडलं, म. फुले यांच्या कूटुंबाची जी वाताहत झाली ती प्रचंड चटका लावून जाणारी आहे. ‘पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी’ सारख्या एका फार मोठ्या कंपनीचा मॅनजिंग डायरेक्टर असलेला हा माणूस स्वत:च्या बळावर सामाजिक कार्य करत होता. स्वत:च्या तेलाने जळणं असं त्याला म्हणतात. सरकारच्या मदतीवर किंवा लोकांच्या वर्गणीवर नव्हे! स्वत: कमवलेल्या पैशांवर सामाजिक कार्य करणारा हा माणूस होता. लक्षावधी रुपये ज्याने कष्टाने कमावले आणि सामाजिक कार्यासाठी खर्ची घातले त्याच्याजवळ शेवटच्या आजारपणात औषधपाण्यासाठी लागतील इतकेही पैसे शिल्लक नव्हते. हे सगळं वाचतांना डोळ्यात पाणी उभं राहत. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी फार ताकदीने ते सगळं उभं केलं आहे. म. फुले गेल्यानंतर यशवंत आणि सावित्रीबाई अन्नपाण्याला महाग झालेले आहेत. पुढच्या काळातलं चित्रं असं आहे की, १० मार्च १८९७ ला सावित्रीबाई जातात. त्या गेल्यानंतर यशवंताचं पुढे काय झालं ते आपल्याला फारसं माहीत नव्हतं. परंतु आता कागदपत्रांवरून आपण हे सिद्ध करू शकलो आहोत की, यशवंत सैन्यात डॉक्टरची नोकरी करत होता. चीन, बँकॉक, आफ्रिका इत्यादी अनेक ठिकाणी त्याने भ्रमंती केली. तोही १९०६ मध्ये मरण पावला आहे. तो गेल्यानंतर त्याची पत्नी निराधार झालेली आहे. त्याला एका मुलगी आहे. त्याच्या मृत्यूनंतर पत्नीने आणि मुलींना काय केले. प्रथम म. फुले आणि सावित्रीबार्इंची सर्व ग्रंथसंपदा रद्दीत विकली. त्यानंतर घरातली भांडी विकली आणि शेवटी ११ ऑक्टोंबर १९१० ला मत्र. फुलेंच ते प्रिय घर, जिथे सत्यशोधक समाज जन्माला आला, जिथे अस्पृश्यांसाठी विहीर खुली करून देण्यात आली, जिथे बालहत्या प्रतिबंधक गृह चालवलं गेलं, जिथे रात्रीच्या शाळा चालल्या, सारं सारं क्रांतिकारक कार्य ज्या घराने पाहिलं आणि जिथे महात्मा फुले यांच्या अस्थी आजही आहेत ते घर अनदगा शंभर रुपयाला या बाईने विकलं. मित्रहो, नव्या शतकात म. फुले यांचं नवं आकलन आणि मूल्यमापन होत असताना त्यांच्या कूटुंबाची झालेली ही वाताहत मला आपल्यासमोर एवढ्यासाठी ठेवायची आहे की, म. फुले यांचा हा ध्येयवाद पुन्हा जागवला पाहिजे. या समाजाला पुन्हा नव्या बळानं, पुरुषार्थानं उभं करायचं असेल त्या माणसांना काय सोसावं लागलं हे ही सांगितलं पाहिजे. घर विकल्यानंतर ती बाई रस्त्यावर आली. तिला बेवारस म्हणून मरण पत्करावं लागलं. म. फुले यांची सून रस्त्यावर बेवारस म्हणून मरण पावली. त्यांची नात लग्न करायला कोणी तयार नाही अशा भजंग अवस्थेत फिरत होती. तेव्हा होले नावाच्या एका बिजवर माणसाशी तिला लग्न करावं लागलं. तिला दोन मुलं झाली ती दोन्ही मुलं आज हयात आहेत. कदाचित ती आज म्हणत असतील महात्मा फुलेंनी आम्हाला काय दिलं त्यांच्या मनात कदाचित कटुताही असू शकेल. माळी समाजसुद्धा असं म्हणतो की, म. फुलेंनी आमच्यासाठी फारसं काही केलं नाही. जातीचे लोक तर त्या काळातही त्यांच्या विरोधात होते. परंतु मित्रहो, म. फुले हे गेल्या शतकातले एकच असे अद्वितीय क्रांतीकारक आहेत की, ज्यांनी स्वत:च्या कूटुंबासाठी आणि स्वत:च्या जातीसाठी काहीही केलेलं नाही. साऱ्या समाजासाठी आणि देशासाठी मात्र खूप काही केलं. फुले हे बांधकाम व्यवसायात होते म्हणून ‘बिल्डर’ हा शब्द वापरायची मला भीती वाटते. कारण ‘बिल्डर’ हा शब्द आता एवढा बदनाम झालाय की म. फुले हे ‘बिल्डर’ होते असं म्हटलं तर ती त्यांची बदनामी ठरेल. परंतु मी जर असं म्हटलं तर ते आपल्याला जरूर पटेल की, फुले हे बिल्डर असतील नसतील परंतु ते टनेशन ‘बिल्डर’मात्र नक्कीच होते. म्हणून एकविसाव्या शतकात या राष्ट्रनिर्मात्याचं नवं आकलन होत असताना तरुण पिढीला, बहुजनांना, नव्याने शिकू लागलेल्या दलित, आदिवासींना वाचायला प्रवृत्त करील. त्यांना एक नवी जगण्याची ताकद देईल अशी एक सुंदर कादंबरी डॉ. ठाकूर यांनी दिली आहे. -हरि नरके ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 22-09-2002

    ‘महात्म्या’ची आकाशवाणी... डॉ. रवींद्र ठाकूर लिखित ‘महात्मा’ या कादंबरीचे सध्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दर रविवारी सकाळी ७.४५ क्रमश: वाचन होत आहे. येत्या रविवारी या कादंबरीच्या वाचनाचे ७५ आठवडे पूर्ण होत आहेत या अमृत महोत्सवी भागानिमित्त या कांबरीच्या निर्मितीप्रक्रियेवर टाकलेला एक प्रकाशझोत. समताधिष्ठित भारतीय समाजक्रांतीचे स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी आमरण झटणारे थोर क्रांतीकारी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांचे स्थान अद्वितीय आहे. कोणत्याही महात्म्याला त्याच्या समकालीन सनातन्यांच्या मूलतत्त्ववादी मूल्यांच्या भोगळपणाविरुद्ध संघर्ष करावाच लागतो. महात्मा फुलेंनाही तो चुकला नाही. त्याची पोचपावती त्यांना व त्यांच्या विचारधारेला नजिकच्या काळातच मिळायला हवी होती, परंतु त्यांसाठी फुलेवाद्यांना सुमारे १५० वर्षांचा वनवास ओलांडावा लागला. तेव्हा कुठे आज आम्हाला साक्षात्कार होऊ लागला आहे, की जोतीराव फुले हे खरोखरच महान होते. जोतीरावांनी आपल्या लेखनातून बहुजन समाजाच्या उद्धाराची सूत्रे पेरली. हाच कोणत्याही देशाच्या आर्थिकतेचा कणा असू शकतो हा विचार त्यांनी तळमळीने मांडला. ब्राह्मणी हिंदू धर्म आणि त्याचया अनुषंगाने येणारी जातीयता आणि विषमता ही आपल्या समाजाव्यवस्थेला लागलेली कीड आहे हे त्यांनी आपल्या साहित्यातून पटवून दिले. महात्मा फुले यांच्या या सर्व कार्य-कर्तृत्वाची दखल घेतली जाणे गरजेचे होते. थोर लेखक धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहून ती चांगल्या प्रकारे घेतली आहे. आजही धनंजय कीर लिखित महात्मा फुले चरित्राला पर्याय नाही. डॉ. रवींद्र ठाकूर यांना मात्र या विषयावर कादंबरीलेखन तेही चांगल्या प्रकारे झाले पाहिजे, असे वाटत होते. त्या दृष्टिकोनातून वाचन करताना त्यांनी या विषयावर उपलब्ध असलेल्या काही कादंबऱ्यांचे वाचन केले, परंतु त्या वाचून ते अधिकच अस्वस्थ झाले. कारण त्यांना आकळलेले जोतीराव फुले कादंबरीरूपाने मांडायचे असतील तर कुठलीही तडजोड न करता ते करावे लागेलख् याची खूणगाठ बांधून त्यांनी लेखनकार्यास प्रारंभ केला. सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे सन १९९३-९४ सालची, एके संध्याकाळी ठाकूर सरांच्या हाती आखीव कागदाची लिहिलेली काही पाने होती. आम्ही दोघं नेहमीप्रमाणे फिरायला निघालो होतो आणि सरांनी कादंबरीलेखनाचा विषय काढला. या अगोदर आपल्याला महात्मा फुलेंच्या जीवनावर लिखाण करणे कसे आवश्यक वाटते आहे आणि ते कशा पद्धतीने लिहिता येईल या विषयावर ते रोज बोलायचे. आता तर त्यांच्या हातात सुरुवातीच्या काही प्रकरणांचे हस्तलिखितच होते. नकळत माझ्याही मनावर त्याचा ताण आला. त्यांच्या मनावरही तो जाणवत होताच. थोर क्रांतीकारी विचारवंत महात्मा फुले यांचे जीवनकार्य आणि त्यांची ईहवादी विचारप्रणाली कादंबरीच्या रूपात मांडणे एवढे सोपे नाही हे एव्हाना सरांमुळे मलाही जाणवायला लागले होतेच. पहिल्या प्रकरणाच्या हस्तलिखिताचे प्रकट वाचन संपले तेव्हा आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. वास्तवाची कास कुठेही सुटलेली दिसत नव्हती. त्यासाठी घेतलेले परिश्रम ओळीओळीतून जाणवत होते. एवढेच नव्हे तर संशोधन आणि सर्जन या दोन्ही गोष्टी सांभाळताना होत असलेली कष्टदायक कसरत स्पष्ट दिसत होती, परंतु या कसोटीवर कादंबरीलेखन पूर्णपणे उतरले आहे, असेही जाणवत होते. लेखनपूर्व संशोधनासाठी करावे लागणारे वाचन सर अव्याहतपणे करत असल्याचे मी रोज पाहत होतो. प्रत्येक क्षण न क्षण ते वाचनासाठी उपयोगात आणत होते. मला वाटते मी जेव्हा त्यांना भेटायला जाई, तेव्हाच काही वेळापुरते त्यांचे वाचन थांबे. एवढ्या झपाटलेपणामुळे त्यांना कादंबरीतील प्रसंगांची स्वप्ने न पडती तरच नवल झाले असते. प्रकाशक अनिल मेहता यांच्याकडे कादंबरीचे पूर्ण हस्तलिखित दिल्यानंतर आणि काही महिन्यात प्रकाशनासाठी ती स्वीकारली असल्याचा निरोप आल्यानंतरही सरांचे संशोधन आणि लेखन सुरूच होते. छापून बाहेर पडेपर्यंत ही कादंबरी चार वेळा लिहिली गेली. हे लेखन तडजोड करण्यासाठी नाही तर गुणवत्ता वाढविण्यासाठी झाले हे महत्त्वाचे. सुरुवातीपासूनच जो विषय चर्चेपासून काळजीपूर्वक टाळला गेला त्या विषयावर झालेले नेटके लेखन समोर ज्या ब्राह्मणवाद्यांनी कादंबरीचे हस्तलिखित वाचले त्यांनी सरांच्यासमोर तडजोडीचे मुद्दे मांडले. महात्मा फुले यांच्या लेखनातील विखार– जो अनेकांनी बराच बोथट करून वाचकांसमोर आणला होता. तो त्यांनी आहे तसा साक्षात केला; त्यामुळे महात्मा फुले यांनी प्रस्थापित धर्मव्यवस्थेवर केलेल्या विखारी टीकेची हार थोडी सौम्य करावी, अशा सूचनाही त्यांना करण्यात आल्या; पण सरांनी तसे काही करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यात आपण काहीही बदल करू शकत नाही, अशीच भूमिका घेतली. तसे करणे म्हणजे आपल्या कादंबरी नायकाचा आपणच घात करणे आहे, अशी त्यांची भूमिका होती. एकूण या महात्म्याला न्याय देताना लेखकाच्याही चांगुलपणाचा कस तपासला गेला. हे येथे आवर्जून सांगितले पाहिजे. तरीही काही सनातनी लोक दुखावले गेलेच आणि त्यांनी लेखकाला आपल्या हीन मनोवृत्तीचा प्रताप दाखवला देखील; पण ते लेखकाने नम्रपणे स्वीकारले. याउलट काही गुणग्राहक वृद्धांनी आदरापोटी लेखकाच्या पाया पडण्यासारखं रोमांचक प्रसंगही दाखविले. आज प्रकाशनानंतर चार वर्षांतील या कादंबरीच्या लोकप्रियतेचा आलेख पाहता ‘महात्मा’ मुळे लेखकाला अनेक ठिकाणाहून व्याख्यानासाठी पाचारण केले जात आहे. हिंदी आणि इंग्रजी मधील भाषांतरे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तर कन्नड, तेलगू, गुजराथी भाषेत भाषांतराचे काम सुरू आहे. सोलापूर व कोल्हापूर या दोन आकशावाणीवरून या कादंबरीचे क्रमश: वाचन अद्याप सुरू आहे. कोल्हापूर आकाशवाणीवर गोविंद गोडबोले आपल्या भारदस्त व लवचिक स्वरात आशयाची वाक् वळणे आविष्कृत करून दर रविवारी ७.४५ वाजता क्रमश: वाचन करीत आहेत. त्याबद्दल त्यांना व आकाशवाणीला धन्यवाद अशाच यशस्वी स्वरूपात ही कादंबरी वाचकांच्या कानातून अंतरात व आचारात उतरो ही सदिच्छा. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI

    महात्मा फुल्यांवरील लक्षवेधी कादंबरी... महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील एक नवी कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी कादंबरीत महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र जीवनचरित्र कादंबरीत मांडण्यासाठी डॉ. ठाूर यांनी घटना-प्रसंगांची जी साखळी वापरली आहे, त्याला खरोखरच तोड नाही. कारण म. फुले यांचे विचार घटना प्रसंगांच्या माध्यमातून मांडणे हे खरोखर कठीण होते. परंतु ते अवघड असे कार्य डॉ. ठाकूर यांनी सहजपणे साध्य केले आहे. शुद्रातिशुद्र मुलामुलींसाठी शाळा स्थापना, विधवापुनर्विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, दुष्काळग्रस्तांसाठी सुरू केलेले अन्नछत्र, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे लेखन, शेवटी मनाला चटका लावून जाणारा म. फुले यांच्या मृत्यूचा दु:खद प्रसंग आणि त्याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेले धैर्य व प्रसंगावधान अशा कितीतरी घटना या कादंबरीत अगदी सहजपणे समोर येत राहतात. कादंबरीत कंटाळवाणा किंवा रुक्ष असा प्रसंग नाहीच. स्त्रीशुद्रातिशुद्रांना ब्राह्मण आणि तत्कालीन प्रतिष्ठितांच्या दास्यातून मुक्त करण्याचे फार मोठे कार्य म. फुले यांनी केले. त्यांच्या जीवनातील कित्येक घटना हृदयद्रावक, संघर्षमय, आणि थरारक स्वरूपाच्या आहेत. त्या सर्व घटनांचे चिंताकर्षक असे वर्णन या कादंबरीत आले आहे. ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याची स्वप्ने पाहणारे जोतिराव आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नसमारंभात झालेल्या घोर अपमानामुळे अंतर्मुख होतात. आपण ब्रिटिशांच्या दास्यातून भारताला मुक्त करण्याचे स्वप्न पाहत आहोत, परंतु त्यानंतर आपल्या समाजाला खरे स्वातंत्र्य मिळणार आहे काय, हा प्रश्न त्यांना छळू लागतो. कंपनी सरकार गेल्यानंतर पुन्हा पेशवाईचीच स्थापना होणार असेल तर स्त्रीशूद्रातिशूद्रांना पुन्हा अन्याय अत्याचारच सोसावे लागणार आहेत ही वस्तुस्थिती त्यांना बेचैन करू लागते. त्यातूनच त्यांचे मतपरिवर्तन होते आणि त्यांच्या मनात समाजक्रांतीची बिजे पेरली जातात. टॉमस पेन यांच्या विचारांनी भारावून जाऊन आणि डॉ. मरेमिचेल यांच्यासारख्या खिस्ती मिशनऱ्यांच्या सहवासाने प्रेरित होऊन ते स्वत:ला शिक्षणकार्यासाठी वाहून घेतात. जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या क्रांतिकारक कार्यात त्यांचे ब्राह्मण मित्रही सहभागी झाले. सुरुवातीला ते सर्वजण एकाच विचाराने प्रेरित झालेले होते. त्यांच्यात वैचारिक एकोपा होता. परंतु नंतर ध्येयधोरणाविषयी मतभेद होऊन फुट पडते. ते सगळे कसकसे घडते त्याचे फार उत्कृष्ट असे चित्रण डॉ. ठाकूर यांनी केले आहे. शिक्षणकार्याला वाहून घेतलेल्या त्या मित्रांमध्ये मतभेद होतो, ते ती शाळेत काय शिकवले जावे या प्रश्नावरून, परंतु म. फुले आप्ल्या विचारांवर ठाम आहेत. जे न्याय्य वाटते, सत्य वाटते त्यासाठी ते कुठलीही तडजोड करत नाहीत. अशा या उमेदीच्या काळात जोतिरावांवर टॉमस पेन या अमेरिकन विचारवंतांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडतो. त्याने लिहिलेल्या ‘राइटस् ऑफ मॅन’, ‘एज ऑफ रिझन’ या ग्रंथांच्या वाचनाने जोतिरावांच्या मनात निर्माण झालेली भावनिक प्रतिक्रिया म्हणजेच त्यांनी उभारलेले सामाजिक क्रांतीचे कार्य! म. फुले यांनी उभारलेल्या त्या बंडाचा समग्र इतिहास या कादंबरीत ग्रंथित झाला आहे. म. फुले यांच्या जीवनात घडलेल्या त्या सर्व घटनांना कादंबरीचे रूप देण्यात लेखक डॉ. ठाकूर यांनी असामान्य यश मिळविले आहे. ‘महात्मा’ वाचणारा प्रत्येक वाचक त्या घटनांचे चित्रमय वर्णन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. अर्थात त्याचे श्रेय लेखकाचया वर्णनकौशल्यालाच द्यावे लागेल. ‘महात्मा’ ही कादंबरी म्हणजे जोतिराव फुल्यांची चरितकहाणी असली तरी या कादंबरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेही चरित्र आले आहे. पतीवर नि:स्सीम प्रेम करणारी, त्याने अंगिकारलेल्या कार्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यात सहभागी होणारी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणून सावित्रीबार्इंचे व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे नजरेत भरते. म. फुल्यांनी अंगीकारलेल्या कार्यात त्यांनी महत्त्वाटा उचलला आहे. कदाचित सावित्रीबार्इंच्या सहाकार्याशिवाय म. फुले एवढं कार्य करूच शकले नसते. आपला गृहिणीधर्म सांभाळून शिक्षिकेच्या नात्याने सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. एकशे एकोणनव्वद व्यक्तिरेखा असलेल्या या कादंबरीत सावित्रीबाई यांच्याखेरीज सदाशिव गोवंडे, सरस्वतीबाई गोवंडे, मोरोपंत वाळवेकर, कृष्णराव भालेकर, ग्यानोबा ससाणे शाहीर धोंडिराम कुंभार, धोंडिबा रोडे, तात्यासाहेब रोडे, लहुजी बुवा, डॉ. मिचेल, भाऊ पाटील, सगुणा आऊ, नारायणराव लोखंडे, लोकहितवादी न्या. रानडे, बाबा पद् मनजी इ. अनेक लहानमोठ्या व्यक्तिरेखांचा समावेश असून त्या त्या व्यक्तींचे अत्यंत मार्मिक असे स्वभावरेखन लेखकाने केले आहे. गेल्या शतकातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांची मुळातून होत असलेली ही ओळखसुद्धा या कादंबरीची महत्त्वाची बाजू आहे. कारण त्यामुळे वाचकाच्या ज्ञानात बरीच मौलिक अशी वैचारिक भर पडते. या कादंबरीच्या वैचारिक बाजूविषयी खूप लिहिता येईल. उदाहरणार्थ, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेविषयी जोतिरावांनी केलेलं भाषण हा या कादंबरीतील वैचारिकतेचा उत्तम नमुना आहे. या भाषणातून म. फुल्यांची सत्यधर्माच्या स्थापनेविषयी भूमिका सहजच स्पष्ट होते. माझ्या मनात म. जोतिबा फुल्यांविषयी असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या कादंबरीने मला दिली आहेत. संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी म. फुले यांनी जे कार्य केले ते पाहून माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर अधिक द्विगुणित झाला. ‘महात्मा’ ही कादंबरी वाचून इतरांनाही हाच अनुभव येईल, अशी मला खात्री आहे. लेखकाच्या स्पष्ट, निर्भिड, रोकठोक भाषाशैलींचे प्रत्यंतर कादंबरी वाचताना ठिकठिकाणी येत राहते. कादंबरीची निवेदनशैली परखड तशी प्रसंगी मृदू मुलायमही आहे. लेखकाची निवेदनशैलीच अशी ओघवती आणि धारदार आहे की, तिच्याद्वारे महात्मा फुले यांचे विचार अगदी थेटपणे वाचकांच्या मनात जाऊन पोचतात. त्यावरून म. फुले यांची भाषा कशी होती, याचीही कल्पना आपणास या कादंबरीमुळे अनेक प्रसंगांची चित्रदर्शी वर्णने वाचत असताना ते प्रसंग अगदी सहजपणे डोळ्यांसमोर उभे राहतात. या कादंबरीच्या भाषेचे रूप ठिकठिकाणी आलेल्या संवदातूनही प्रकट झाले आहे. कादंबरीतील अनेक संवाद वाचकाला विचारप्रवृत्त करतात. ‘उद्या महारमांगांची पोरे शिकून अंमलदार झाली तर आम्ही काय त्यांना मुजरे करायचे काय? होय रे?’ संवादातून झालेली अनेक वाक्ये अशी सूचक व अर्थगर्भ आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही कादंबरी कुठेही सनावळीत आणि अनावश्यक अशा तपशीलात अडकून राहत नाहीत. त्यांचा संदर्भ चार ते पाचच उल्लेख या कादंबरीत येतात. तेही आवश्यक आहेत म्हणून काळाचे उल्लेख फार नाहीत म्हणून लेखकाचे काळाचे भान सुटले आहे असे मात्र नाही. त्याकाळाचे वातावरण निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. म. फुले या लोकोत्तर महामानवाविषयी कितीही लिहिले तरी ते कमीच ठरते. म्हणूनच त्यांच्यावर कादंबरी लिहिणे ही निश्चितच सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉ. रवींद्र ठाकूर यांनी कष्ट व कुशलता या बळावर ते अवघड कार्य पार पाडले आहे. एवढे मात्र निश्चित की, म. फुले यांच्याविषयी आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, परंतु त्या सर्व पुस्तकांमध्ये ‘महात्मा’ ही कादंबरी अधिक लक्षवेधी आहे आणि उद्याही कदाचित ती तशीच राहील. -तातोबा बदामे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more