Aarti Sandip Shukla
केंब्रिज विद्यापीठातील नावाजलेला प्राध्यापक,प्रचंड बुद्धिमत्ता असलेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा वैज्ञानिक, आइंस्टाईन चा खरा वारसदार अशी ख्याती असलेल्या स्टीफन हॉकिंग च्या अर्धांगिनीच, जेन हॉकिंगच हे आत्मचरित्र.
ऐन तारुण्यात `मोटर न्यू्रॉन` सारखया जीवघेण्या आजाराने, स्टीफनना व्हील चेअर ला कायमच खिळवून ठेवलं. पण तरीही दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि प्रखर बुद्धिमत्तेने,त्यांनी भौतिकशास्र आणि विश्वउत्पत्तीशास्त्र ह्यात अतुलनीय कामगिरी केली.
ह्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना सावली प्रमाणे साथ देणारी त्यांची पत्नी जेन म्हणजे स्री शक्तीचा, सोशिकतेचा मानदंडच म्हणावा लागेल.किती भूमिका जेन ने एका आयुष्यात निभावल्या याच राहून राहून आश्चर्य वाटत.विकलांग नवऱ्याची दिवस रात्र सुश्रुषा करणारी नर्स, त्याची ड्राईव्हर, सेक्रेटरी, टायपिस्ट, देशविदेशात प्रबंध/परिषदा/पुरस्कारांच्या निमित्त्याने नवऱ्या बरोबर जाणारी त्याची सहकारी ,तीन मुलांचं निगुतीने संगोपन करणारी आई, तुटपुंज्या पगारात घराचं आर्थिक नियोजन करणारी ते घर बदलताना वेळप्रसंगी घराचं रंगकाम करणारी रंगारी, घरी कायम होणाऱ्या वैज्ञानिक /शास्त्रज्ञा च्या पार्ट्याना, पार्टी ची संपूर्ण व्यवस्था बघणारी मॅनेजर . नवरा दिवस रात्र त्याच्या संशोधनात, कामा च्या व्यापात बुडालेला आणि इंग्लंड मध्ये घर कामाला मदतनीस मिळणे कठीण त्या मुळे एकटीने एवढ्या जवाबदाऱ्या पार पडताना त्यांची फार शारीरिक , मानसिक दमछाक व्हायची.
हॉकिंग कुटुंबाला इंग्लंड च्या खडूस, कोत्या मनोवृतीच्या लोकांचा बराच त्रास सहन करावा लागला. अपंग स्टीफन साठी कामाच्या ठिकाणी छोट्या मोठ्या सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी, त्यांच्या कामाचं योग्य ते मानधन मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
त्यात स्टीफन कमालीचे लहरी आणि विक्षिप्त.नवऱ्या च्या तर्हेवाईक स्वभावाशी जुळवून घेताना जेन ना कठीण जायचं.पण त्याच्या असामान्य कर्तृत्वा कडे पाहून त्या निमूटपणे सहन करायच्या.
एवढं सगळं करून,सोसून स्टीफन नी एका नर्सच्या प्रेमात पडून 25 वर्षाचा संसार मोडून टाकला तेव्हा मात्र जेन आतून फार दुखावल्या गेल्या,त्यांना फार मानसिक यातना झाल्या.
हे पुस्तक जेन आणि स्टीफन ह्यांच्या सहप्रवासाच असल तरी माहितीचा खजाना सापडतो ह्यात. देशविदेशातील प्रसिद्ध स्थळे/शहरे , विद्यापीठे , वैज्ञानिक, नेते, संगीतकार, चित्रकार ह्यांचे उल्लेख आहेत.आपण शाळेत असताना वाचलेल्या /शिकलेल्या बऱ्याच गोष्टी आठवतात.
एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिका चा शारीरिक व्याधिंवर मात करत केलेला झुंजार प्रवास आणि एका स्त्री च्या कष्टाच,सहन शक्तीच्या परिसीमे च दर्शन घडवणार हे पुस्तक नक्कीच आपल्या संग्रही असाव. ...Read more
LOKPRABHA 14-08-2015प्रांजळ आणि प्रामाणिक रुदन…
असामान्य, अलौकिक, जगावेगळी बौद्धिक प्रतिभा असणाऱ्या आणि आपल्या विषयात सर्वोच्च सन्मान मिळवलेल्या अनेक व्यक्ती, त्यांचे चरित्र वा संशोधनाच्या रूपाने ते आपल्याला माहीत असतात. अशा व्यक्तींना या सर्वोच्च पदाला गवसणी घालताना कणकोणत्या शारीरिक, मानसिक आघाड्यांवर संघर्ष करावा लागला, त्या संघर्षात त्यांना कोणाचा मदतीचा हात मिळाला हे जाणून घेण्याची तर आपल्याला नेहमी उत्सुकता असते. जनसामान्यांना स्तिमित करणाऱ्या अशा असामान्य व्यक्तींच्या गगनभरारीला, त्यांच्या पंखात बळ भरायला जर त्यांच्या स्वत:च्या पत्नीनेच मदत केली असेल तर?
अशा वटवृक्षाच्या छायेत स्वत:ची सावली दिसू न देता आणि स्वत:चे स्वत्त्व जपून जेव्हा अशा व्यक्तीच्या पत्नीचे आत्मचरित्र हाती लागते, तेव्हा ते वाचायची उत्कंठा लागते.
‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी - माय लाइफ विथ स्टीफन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचल्यानंतर त्याचा रोकडा अनुभव मिळतो. एका बैठकीत वाचून या पुस्तकाचा फडशा पाडता येत नाही, मात्र एकापाठोपाठ एक सर्व भाग वाचण्याची उत्सुकता नक्कीच लागते. या पुस्तकाची मूळ लेखिका, महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांची प्रथम पत्नी जेन हॉकिंग या असून, त्याचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे.
समकालीन युगातील जगविख्यात वैज्ञानिकांच्या यादीत स्टीफन हॉकिंग यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. त्यांनी लिहिलेले काळाच्या इतिहासाचा संक्षिप्त मागोवा (अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम) हा विज्ञाननिष्ठ ग्रंथ इतका लोकप्रिय झाला की, त्याच्या अडीच कोटींच्या वर प्रती विकल्या गेल्या. अशा महान प्रतिभावान आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांची पत्नी जेन यांनी त्यांच्या सहजीवनाबद्दल लिहिलेले सडेतोड पण हृदयस्पर्शी अनुभवकथन म्हणजे ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी - माय लाइफ विथ स्टीफन (माझा अनंतापर्यंतचा प्रवास... स्टीफनबरोबरचे माझे जीवन) हे पुस्तक.
जेन यांच्या या आत्मकथनाची १९६० च्या दशकातील ही कहाणी. जेनचे शालीय जीवन, त्या शाळेतच शेजारच्या वर्गात शिकणारा सोनेरी, रेशमी केसांची झुलपं सतत डोळ्यांवर येणारा, निळ्या डोळ्यांचा,स्वत:च्याच तंद्रीत राहणारा मुलगा स्टीफन, नंतर त्याच्याशी ओळख, काही दिवसांतच त्याला जडलेल्या भयंकर आजाराची माहिती होणं पण त्याने न डगमगता स्टीफनबरोबरच विवाह करण्याचा स्वत:च्या नि:श्चयावर ठाम राहून तो कृतीत आणणं, विवाहानंतरच्या खडतर मार्गावर आजारी स्टीफनची दिवसरात्र सेवा करता करता आणि सांसरिक जबाबदाऱ्या पेलताना सतत ठेचकाळत राहणं, या सर्वांवर कडी म्हणजे २५ वर्षांच्या वैवाहिक जीवनाची परिणती घटस्फोटात होणं, आणि कालांतराने जेनने आपल्या जुन्या मित्राबरोबर विवाह करणं या घटनाक्रमावर येऊन थांबते.
स्टीफन यांना मज्जासंस्थेवर हल्ला करणारा ‘मोटार न्यूरॉन` हा महाभयंकर आजार अगदी लहान वयातच जडतो. शारीरिक विकलांगता आणणारा आणि अशा विकलांगतेमुळे मनोबल खच्ची करणारा हा आजार आजही स्टीफन यांना ग्रासून आहे. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आजही व्हीलचेअरला खिळलेले स्टीफन, परग्रहावरील जीवनसृष्टीच्या शोधासाठी रशियातील अब्जाधीश युरी मिलनर यांच्या पुढाकाराने ‘ब्रेकथू लिसन` या प्रकल्पात मदत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. आपल्यापेक्षा अधिक बुद्धिवान जीव या ब्रम्हांडात असणे शक्य आहे फक्त त्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे आणि तो पूर्णत्वास गेल्यास स्टीफन यांचे त्यात फार मोठे योगदान राहणार आहे.
स्टीफन यांच्या या आजाराचे निदान होण्याआधीच जेन यांचे त्यांच्या जीवनात आगमन होते. तो काळ होता १९६० च्या दशकातला. इंग्लंडमध्ये सेंट अल्बान्स या मुलींच्या शाळेत जेन शिकत होती. दुसऱ्या वर्गात मागच्या बेंचवर भिंतीला लागून बसायचा एक शांत, सोनेरी मुलायम केसांचा आणि निळ्या डोळ्यांचा आपल्याच भावविश्वात रमणारा स्टीफन. खरं तर तेव्हाच तो तिला तिच्या स्वप्नातील बाहुला भासला. हळूहळू त्यांची मैत्री होऊ लागली आणि १९६५ मध्ये जेनच्या वयाच्या २१ व्या वर्षी या मैत्रीची परिणती विवाहात झाली.
खरं तर स्टीफनच्या वडिलांनी जेनला त्याच्या आजाराची आणि त्याच्या भयंकर परिणामांच्या दु:स्वप्नाची स्पष्ट चाहूल दिलेली असते. ती स्वत: आणि कुटुंबाच्या मन:स्थितीवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचीही तिला जाणीव करून दिलेली असते. तिने स्वत:च स्टीफनच्या या आजाराची लक्षणे अधूनमधून अनुभवलेली असतात. विवाहवेदीवर काठीचा आधार घेऊन स्टीफन चढला होता, अगदी तेव्हाही जेनचाही निर्धार पक्का होता.
लग्नानंतरच्या सहजीवनात मात्र जेनची खरी स्वत्त्वपरीक्षा सुरू होते. लग्नाला काही वर्षे लोटल्यानंतर धर्म आणि विज्ञान यांच्यातील निरंतर झगडा जेनच्याही आयुष्यात डोकावू लागतो. अत्यंत बुद्धिवान, त्यात एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीचा, विक्षिप्तपणा हा बहुधा अंगभूत गुणधर्म असतो. जेन पावलोपावली त्याचा अनुभव घेऊ लागते. दिवसांमागून दिवस जात होते, रॉबर्ट, ल्युसी आणि टीम यांच्या रूपाने जेन आणि स्टीफन यांची संसारवेल बहरून आली होती.
वैज्ञानिक संशोधनात जगन्मान्यता पावत चाललेला पती, त्याचा जीवघेणा आजार, लहान मुले, स्टीफनसह त्यांचे पालनपोषण, स्टीफनची २४ तास शुश्रूषा, निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने स्टीफनबरोबरची तिची भटकंती याद्वारे पत्नी, आई या नात्याने सर्व आघाड्यांवरची भूमिका बजावताना तिने साधलेल्या समतोलाचे वर्णन अत्यंत भावस्पर्शी आहे. अगदी छोट्या छोट्या प्रसंगांतून स्वत: जेनच आपल्याला त्याची माहिती करून देते. आपल्या अनुभवविश्वाचे पदर तिने ज्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडले आहेत, त्यातून जेनची आंतरिक स्त्रीशक्ती, स्वयंसिद्ध चारित्र्य आणि स्टीफनने मिळवलेलं अलौकिक यश यांना एका माळेत गुंफले आहे. मनात किंतु-परंतु येऊ न देता जेनने स्टीफनकरता खर्ची घातलेल्या तिच्या उमेदीच्या वर्षांचा रोखठोक पण प्रामाणिक हिशोब मांडला आहे.
स्टीफनची बुद्धिमत्ता ११ त्रिमितीमध्ये वावर करू शकणारी असली तरी जेनने मात्र अनेकानेक मितींमधून स्टीफनवर प्रेम केले. तिचे जीवन स्टीफनच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनले होते. तिच्या या बाह्यरूपी दिसणाऱ्या संघर्षात तिच्या मनाचा आक्रोश मात्र ठळकपणे दिसत असतो.
‘शादी एक ऐसा लड्डू है, जो खाये तो पछताए ना खाये तो भी पछताए` असं नेहमीच म्हटले जाते. विवाहबंधन स्वीकारल्यानंतर वेळ, काळ यांचे संदर्भ कसे बदलत जातात. विशेष म्हणजे ज्या स्त्रीने स्वत:ला कुटुंबाच्या परिघात झोकून दिलेलं असते अशा स्त्रीच्या स्वअस्तित्वाचे काय ‘वक्त नही बदलता अपनो के साथ, पर अपने जरूर बदल जाते है वक्त के साथ` याची जेनला हळूहळू प्रचिती येऊ लागते. जेनच्या बाबतीत तर विवाहातील भौतिक फायदे-तोटेही स्वत:च्या अत्यंत खासगी विश्वात तिला बांधून घ्यावे लागतात.
या संपूर्ण परिस्थितीचा कडेलोट होतो तो २५ वर्षांच्या स्टीफनबरोबरच्या वैवाहिक आयुष्याची अखेर घटस्फोटात होते तेव्हा. स्टीफन त्याची सेवा-शुश्रूषा करणाऱ्या एका एलन मॅसन या परिचारिकेबरोबर विवाह करतो. त्यानंतर जेनही आपल्या जोनाथन या जुन्या, परिचित कौटुंबिक मित्राबरोबर लग्न करते. स्टीफनबरोबर घटस्फोटानंतरचे आघात एवढ्यावर थांबत नाहीत. जेन ज्या परोपकारी संस्थाबरोबर काम करत असतात त्या संस्थांनी घटस्फोटित व्यक्ती कामावर ठेवून संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात आणायची नाही असे सांगून तिला झिडकारतात, त्याचवेळी स्टीफन मात्र यशाच्या अत्युच्च शिखरावर असल्यामुळे त्यांना वगळणे संस्थेला परवडणारे नसते, तेव्हा जेनला उमगते ती स्वत:ची मर्यादित ओळख. स्टीफनची पत्नी एवढीच आपली ओळख असल्याचे तिला समजून चुकते, त्यानंतर काही दिवसांनी स्टीफनमुळे मिळालेले घर सोडावे लागल्याने एक वेगळेच निराधारपण येते, त्यातच ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम` पुस्तकाच्या मानधनाच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. अशा भग्न मन:स्थितीतून जेन यांचा त्यांच्या जिव्हाळ्याच्या मित्र-मैत्रिणी बाहेर काढतात. मोठ्या आत्मियतेने सावरतात. स्टीफनच्या स्वास्थ्यासाठी आजवर खर्ची घातलेली उर्जा दुसऱ्या एखाद्या सर्जनशील कार्यासाठी उपयोगात आणता येईल हे पटवून देतात. या सर्वामुळे १९९४ मध्ये त्यांचे ‘अॅट होम इन फ्रान्स` व त्यानंतर १९९९ मध्ये ‘म्युझिक टू मुव्ह द स्टार्स` ही पुस्तके प्रसिद्ध झालीत. त्या आधुनिक भाषांचे अध्यापन करायला लागल्या. गायन आणि वृंदगान हे त्यांचे छंद नव्याने जोपासू लागल्या.
या शोकांतिकेची हाताळणीसुद्धा स्टीफनविषयी तसूभरही द्वेष, सूड, वैरभावना, पश्चात्ताप किंवा असूया यापैकी कुठल्याही भावनेचे जेन यांनी ना प्रगटीकरण केले आहे ना त्यांच्या कथनात कुठेही कडवटपणा डोकावतो. दिसतो तो फक्त त्यांचा प्रामाणिक स्पष्टवक्तेपणा.
या अपवादात्मक हृदयस्पर्शी, खुल्या व बऱ्याचदा विनोदी अंगाने जाणाऱ्या आठवणीची मांडणी करताना जेन यांनी केवळ स्वत:च्या अनुभवातील क्लिष्ट व वेदनादायी द्विधा मन:स्थितीचेच वर्णन केले नाही तर पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरच्या नात्यामध्ये आलेला दुरावा, सार्वत्रिक दुष्परिणामांवरही सहज भाष्य केले आहे. त्याच्याच परिणामस्वरूप सदर पुस्तक हे प्रत्येक वाचकाला स्वत:च्याच जीवनाभूतीचे साधम्र्य दाखवून देण्यास भाग पाडते.
स्टीफनचा जीवनसंघर्ष तर एखाद्या हिरोला शोभेल असाच आहे, पण जेननेसुद्धा तिच्या तीव्र मानसिक वेदनांचे शब्दचित्रण अत्यंत समर्थपणे वाचकांसमोर मांडलं आहे.
या पुस्तकांत गॅलिलिओ, कोपरनिकस आदीसारख्या अव्वल वैज्ञानिकांचीही माहिती मिळते. इंग्लंडच्या आजूबाजूचे देश, तेथील तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती याचीही आपल्याला माहिती होते. जेन यांची मुले, स्टीफन व इतर कुटुंबियांबरोबरचे फोटो पुस्तकात असल्यामुळे तिचे आत्मकथन वाचताना तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती होते. जेनची सत्त्वपरीक्षा पाहणारे काही कडू, गोड प्रसंग, स्टीफनचे घवघवीत यश या सर्वांना स्पर्श करत मराठी अनुवाद केलेले जेन हॉकिंग यांचे हे आत्मकथन हृदयस्पर्शी बनले आहे. मात्र काही ठिकाणी प्रसंगांमधील सातत्य साधले गेले नसल्याचेही जाणवते. हे प्रसंग छोट्या छोट्या वाक्यरचनेतून अधिक प्रभावीपणे वाचकांना समजावून घेणे जास्त सोपे झाले असते.
इंग्लंडमध्ये एका लायब्ररीत हे इंग्रजी पुस्तक अनुवादाकाच्या हातात पडल्यानंतर त्यांना मराठी वाचकांसाठी त्याचा अनुवाद करावा असं मनापासून वाटल्यामुळे प्रथम स्वत: ते जेनला इंग्लंडमध्ये केम्ब्रिजला प्रत्यक्ष भेटल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्वाचे अनेकानेक पैलू अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकले, या भेटीमुळेच ते जेन यांच्या आत्मकथनाला न्याय देऊ शकले, त्यामुळेही जेनच्या लिखाणातील शक्तिस्थळे त्यांना अनुवादात अचूकपणे हेरता आली. त्यांच्या लिखाणाची अचूक नस सापडल्यामुळेच अनुवादाची भाषा प्रवाही झाली आहे.
जेन यांनी हे आत्मकथन लिहून पूर्ण केल्यानंतर स्टीफन अनंतातील यशस्वी गरूडभरारी पूर्ण करून परतले होते. संपूर्ण जगाने त्यांचे हे यश ‘याची देही याची डोळा` अनुभवले. जेन यांना तर आनंदाश्रू अनावर झाले. स्टीफनच्या या यशोशिखराच्या मार्गावर बराच मोठा काळ त्यांनाही स्वत:चे पंख हलवण्यास मिळाले याबद्दलही त्या स्टीफन यांच्याप्रती सात्विक कृतज्ञता व्यक्त करतात. रॉयल सोसायटीचे अत्यंत प्रतिष्ठित ‘कोपले मेडल` प्रदान समारंभासाठी चक्क जेन यांना निमंत्रण येते, तेव्हा तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. जेन यांनी या सर्व प्रसंगांचे रसभरित सुंदर वर्णन केले आहे.
...Read more