NEWSPAPER REVIEWनव्या सहस्त्रकातील सामाजिक चळवळींना ‘महात्मा’ ही कादंबरी बळ देईल...
या कादंबरीच्या उत्तम निर्मितीचा पहिला पुरावा म्हणजे या कादंबरीच्या मुखपृष्ठावर छापलेले अस्सल छायाचित्र होय. माझ्या पाहण्यातली ही पहिली कादंबरी आहे की जिच्या मुखपृष्ठावर महात्मा फुलेंचे अस्सल छायाचित्र आले आहे. चरित्रांवर ते यापूर्वी आलेले आहे; पण कादंबरीवर ते पहिल्यांदाच आलेले आहे.
मी आपणास एवढेच सांगेन की मराठीतील महात्मा फुले यांच्यावरील निदान तो कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या आहेत, ही चौदावी आहे. या सगळ्या कादंबऱ्या बारकाईने वाचल्यानंतर मी एवढेच म्हणेन की मेहता साहेबांनीच प्रसिद्ध केलेली अनिरुद्ध पुनर्वसू यांची ‘प्रभंजन’ ही कादंबरी सगळ्या सरस होती. खरं म्हाजे इंदूताई केळकर यांनी लिहिलेली ‘सावित्री जोती’ ही सुद्धा चांगलीच कादंबरी होती. नयनतारा देसार्इंचा ‘तेवतो नंदादीप हा’ हा प्रयत्नही बरा होता. आणखी काही प्रयत्नांचे उल्लेख करत बसण्याऐवजी एवढेच सांगतो की, त्या सर्वांवरचा अत्यंत उत्कृष्ट आणि आजपर्यंतचा सर्वांत श्रेष्ठ असा प्रयत्न हा आहे. मला सर्वांत जास्त आवडलेली कादंबरी ही आहे.
डॉ. रवींद्र ठाकूर यांनी अद्ययावत साधनांचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिलेली आहे. त्यांनी जुन्या माहितीच्या आधारे लिहिलं असतं तरी ते चुकीचं झालं नसतं. पण त्यांनी अगदी अद्ययावत साधनांचा अभ्यास केला आहे आणि म्हणून या कादंबरीच्या ब्लर्बवर म. वा. धोंड यांनी म्हटल्याप्रमाणे चरित्रात्मक कादंबरी लिहिणारा कादंबरीकार हा एका अर्थाने संशोधकही असतो आणि सर्जकही असतो, तर ते खऱ्या अर्थाने डॉ. रवींद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. उत्तम प्रकारची संशोधनशीलता आणि सर्जकता त्यांच्याकडे असून कूठेही सत्याशी आणि वास्तवाशी तडजोड त्यांनी केलेली नाही. किरकोळ स्वातंत्र्य आपण मान्यचं केले पाहिजे. तेवढं आपण लेखकाला दिलचं पाहिजे. पण कादंबरी लेखक याहीपेक्षा जास्त स्वातंत्र्य घेऊन गेला असता तरी तक्रार करण्याचं कारण नव्हतं. हे स्वातंत्र्य त्याने घेतलंच पाहिजे आणि आम्ही दिलंच पाहिजे. तरी उदाहरणादाखल नमूद करून ठेवतो की त्यांनी दिलेला मुक्ताचा निबंध १८५५ मध्ये प्रसिद्ध झालेला असून तो १८५२ मध्ये झालेल्या म. फुलेंच्या सत्काराआधी आलेला आहे. पण लेखकाला गरजेनुरुप असं करावसं वाटलं असेल तर त्यात वावगं काहीच नाही. अशासारख्या किरकोळ गोष्टी सोडल्या तर असं कूठेही दिसलं नाही की लेखकाने आवर्जून कूठे काही स्वातंत्र्य घेतलं आहे वा पडझड केली आहे किंवा काही बदल केले आहेत. मला स्वत:ला असं वाटतं की ही कादंबरी असूनसुद्धा इतकं त्या सत्याशी, संशोधनाशी, त्या अभ्यासाशी प्रामाणिक राहत राहत हा लेखक पुढे गेलेला आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे. दुसरी बाजू नोंदवली पाहिजे ती अशी की, सत्याशी, फुलेंच्या जीवनातील घटना प्रसंगाची एकरूप होणाऱ्या आणि त्याचप्रमाणे संशोधनात अतिशय प्रावीण्य असलेल्या या लेखकाने आपण कादंबरी लिहितो आहोत याचं भान कूठेही सोडलेलं नाही. म्हणजे चरित्रग्रंथामध्ये ज्या साधक बाधक चर्चा करावयाच्या असतात तशा प्रकारच्या चर्चा करत न बसता खुबीने म. फुल्यांच्या साहित्यातील वाक्ये त्यांच्या तोंडी घालून या चर्चा त्यांनी पुढे नेल्या आहेत. इतका चांगला प्रयत्न मला अन्यत्र आढळला नाही. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म यातील विचार प्रश्नोत्तरांच्या रूपाने फुल्यांच्या तोंडी घालून त्यांनी उत्तम मेळ साधला आहे. समग्र फुले साहित्यसुद्धा या रूपाने आपल्याला निवडक स्वरूपात या कादंबरीत वाचायला मिळते.
या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवलं आणि ते मला फार मनापासून आवडलं. या कादंबरीत असे कितीतरी प्रसंग आहेत, की हा लेखक आपल्याला हलवून सोडतो, डोळ्यात पाणी आणतो. ते वाचताना आपा गदगदून जातो. मला अतिशय आवडलेला प्रसंग म्हणजे, जेव्हा मारेकरी म. फुले यांचा खुन करायला येतात हा आहे. हा प्रसंग ठाकूरांनी अतिशय नाट्यपूर्ण वर्णन केला आहे. मुळातच तो प्रसंग आव्हानात्मक आणि लेखकाला पेलण्यासाठी खूप ताकद हवी अशी मागणी करणारा आहे. परंतु ठाकूरांनी तो इतका जिवंत केला आहे आणि ते प्रसंगचित्र हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ते मारेकरी आपल्यासमोर उभे आहेत. म. फुल्यांशी बोलत आहेत आणि म. फुले त्यांना जिंकत आहेत असं सारं दृश्य आपल्या समोर उभं राहतं आणि आपल्या काळजाला ते छेदून जातं. याशिवाय म. फुलेंच्या सत्काराचा प्रसंग, त्यांच्या मृत्यूनंतर झालेला आकांत आणि सावित्रीबार्इंनी घेतलेला पुढाकार अगदी शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी म. फुलेंनी केलेला आटापिटा असे कितीतरी हेलावून टाकणारे प्रसंग या कादंबरीत आले आहेत.
मला स्वत:ला असं वाटतं की म. फुले यांच्या चरित्रात्मक लेखनामध्ये आणि त्यांच्यावरील कादंबरीलेखनामध्ये वाचकांना वाचायला लावणारी, वाचकांना सतत पुढे पुढे जात राहावं अशी प्रेरणा देणारी, पकडून ठेवणारी आणि तरीही चरित्राशी कूठल्याही प्रकारची धरसोड न करता सतत प्रामाणिक राहिलेली अशी अत्यंत सुंदर कादंबरी या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळते आहे.
त्यांनी तीस संदर्भग्रंथांची यादी येथे दिलेली आहे. परंतु माझी खात्री आहे की किमान तीनशे ग्रंथ तरी त्यांनी वाचले असतील. कारण त्याशिवाय तो सारा काळ, त्यावेळचं पुण्यातलं वातावरण शब्दात पकडणं एवढं सोपं नव्हतं. परंतु ठाकूर त्यात यशस्वी झाले आहेत.
त्याकाळी पुण्यातील सुधारकांनी ‘दक्षिणा प्राइज कमिटीला’ जो अर्ज लिहिला होता आणि त्यामुळे जी काय त्रेधा तिरपिट उडाली त्याचं ठाकूरांनी अत्यंत बहारदार असं वर्णन केलं आहे. हे प्रसंग फार कमी प्रमाणात आपल्यासमोर आले आहेत. घडतं ते असं की, पुण्यातील सुधारक तरुण सरकारला विनंती करत आहेत, की पेशवाईपासून ब्राह्मणांना दक्षिणा वाटपाची पद्धत चालत आलेली आहे. तुम्हीही ती सुरू ठेवली आहे तेव्हा त्यातली काही रक्कम चांगल्या पुस्तकांना बक्षीस म्हणून दिली जावी. अशा प्रकारचा हा विनंतीचा अर्ज लोकहितवादी, बापूसाहेब मांडे आणि त्यांच्या भवाकरांसारख्या इतर सुधारक मित्रांनी केलेला आहे. हे घडताना पुण्यात हलकल्लोळ माजला, की या धर्मबुडव्यांनी सरकारकडे आपल्या दक्षिणेवर डाव आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालवले आहेत. पुण्यातल्या मंडळींनी तुळशीबागेत सभा बोलविली आहे आणि ती सभा बोलवल्यामुळे हे सगळे सुधारक घाबरलेले आहे. आता हे गेल्या शतकातलं सामान्यपणे नेहमीच दिसणारं चित्र होतं. काहीतरी करायला जायचं पण संकटाची वेळ आली. परीक्षेची घडी आली की घाबरून जायचं हे पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या उच्चवर्गीय सुधारकांमध्ये आपल्याला सतत दिसतं. अशावेळी म. फुले यांच्यासारखा एक निधड्या छातीचा तरुण, जगाचं वय जेमतेम पंचवीस वर्षांचं आहे तो उभा राहतो, त्यांना संरक्षण देतो. सुमारे पन्नास तरुण अंगरक्षकांच्या तैनातीत सुधारक तुळशी बागेत पोहचतात. बागेत प्रचंड ब्रह्मवृंद जमलेला आहे. संतापलेला आहे. त्यावेळी त्या तरुण सुधारकांशी जी झाडाझडती घेतली जाते. तेव्हा ते शांतपणे सांगतात की, हा अर्ज आम्ही लिहिलेला नसून तो जोतिबा फुलेंनी लिहिलेला आहे. त्यावेळी अक्षरश: टाचणी लागून फुगा फुटावा त्याचप्रमाणे सगळा ब्रह्मवृंद हतबल होतो. हा जो सगळा वृत्तांत या कादंबरीत आला आहे. तो वाचल्यानंतर फुले या नावाची ताकद त्यावेळी पुण्यात काय असेल याची साक्ष पटते. कारण शेकडो नव्हे तर हजारोंच्या संख्येने जमलेले सगळे ब्राह्मण त्यावेळी संतापलेल्या अवस्थेत आहेत. परंतु तो अर्ज फुलेंनी लिहिलेला आहे म्हटल्यानंतर सगळेच एकदम गर्भगळीत होतात. काय करणार मुकाट्याने निघून जातात. मला स्वत:ला असं वाटतं की, फुलेंच्या मागे लोक नव्हते असं जी काही मंडळी नेहमी म्हणत असते. त्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा थोडसं चिंतन करावं, शोध घ्यावा. सांगण्यासारखं असं खूप आहे. परंतु कादंबरीत काय काय देणार शेवटी ही कादंबरी आहे आणि जागेचीही मर्यादा आहेच यांचेही भान आपल्याला ठेवलं पाहिजे.
‘सत्सार’ चे दोन अंक निघाले असं त्यांनी म्हटलं आहे, परंतु मला शंका आहे. ‘सत्सार’चा तिसरा अंक निघालाच नसेल असं म्हणता येणार नाही, कारण म. फुलेंचं अजून न मिळालेलं असं खूप साहित्य असावं पुरावा द्यायचा म्हणून एवढंच सांगतो की, म. फुलेंच्या टीकाकारांनी टीकेखाली म. फुलेंची जी विधानं वापरली आहेत, ज्या कविता वापरल्या आहेत त्यांचा समावेश अजूनही ‘म. फुले समग्र वाङ्मयात’ झालेला नाही. याचा अर्थच असा की, ते साहित्य अजून आपल्याला मिळालेलं नाही. त्याचा कसून शोध घेतला पाहिजे.
अशा अनेक गोष्टी आहेत. ‘सत्सार’ चा तिसरा अंक कदाचित निघालाही असेल. ‘सत्सार’च्या पहिल्या अंकाच्या एक हजार प्रती खपल्या होत्या असा उल्लेख त्यांनी केला आहे. १८५५ साली एका नियतकालिकाच्या एक हजार प्रती खपतात ही घटना लक्षणीय आहे. याचा अर्थ काय होतो फुलेंच्या मागे लोक नव्हते फुलेंचं लोक वाचत नव्हते त्याशिवाय का हे घडलं सांगायला अभिमान वाटतो की, फुले समग्र वाङ्मयाच्या दहा हजार प्रतींची पहिली आवृत्ती निघाली तेव्हा लोकांनी रेशनसारख्या रांगा लावून प्रति घेतल्या नंतरची पन्नास हजार प्रतींची नवी आवृत्तीही आता संपत आली आहे.
मला सांगायचं ते हे, की अजूनही पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या काही लोकांना फुलेंचं नेमवंâ मोठेपण कळालेलं नाही. लेखक प्रकाशकांचं अभिनंदन यासाठी करणं आवश्यक आहे की ठाकूरांनी कोल्हापुरात राहून ही कादंबरी लिहिली आणि मेहतांनी पुण्यात असून ती प्रसिद्ध केली. कादंबरी लिहायला घेतली हे शतक संपत असताना ती प्रसिद्ध होत आहे, नव्या सहस्त्रकात आपण प्रवेश करीत आहोत, अशा वेळी हे पुस्तक येत आहे. मला असं वाटतं की नव्या सहस्त्रकात म. फुलेंचं जे मूल्यमापन केले जाणार आहे त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. फुले-आंबेडकरांचं, शाहू महाराजांचं मोल आज या देशातल्या बहुजनांना कळू लागलेलं आहे. त्या सगळ्यांच्या जाणिवा विकसित करण्याचं काम ही कादंबरी करेल असा मला विश्वास वाटतो. उद्याच्या सामाजिक चळवळींना बळ देण्याचं काम ही कादंबरी करेल.
तरुण पिढीला कदाचित संशोधनपर लेखनात आणि चरित्रपर ग्रंथात फारसा रस वाटत नसेल, परंतु या कादंबरीमध्ये मात्र त्यांना खेचून नेण्याची, पकडून ठेवून सतत पुढे नेण्याची, वाचायला लावण्याची क्षमता आहे आणि शिवाय अतयंत सहज सोप्या भाषेत हे सारे लेखन झाले आहे. भाषेचा मुद्दा थोडासा वादग्रस्त होऊ शकतो. कारण लेखकाची अडचण अशी आहे की, काही ठिकाणी त्या काळातील लेखकांनी लिहिलेली त्या काळची मूळ भाषा उपलब्ध आहे. आणि काही ठिकाणी आता कल्पनेने लिहायचं आहे. त्यामुळे कल्पनेनेन लिहिताना आजची भाषा आणि काही ठिकाणी उपलब्धतेनुसार त्या लेखकांची त्या काळची भाषा असं झालं आहे. त्यामुळे काही वेळा एकाच माणसाच्या तोंडी दोन वेगवेगळ्या प्रकारची भाषा आलेली आहे. परंतु ते अगदी अटळ आहे. कारण गेल्या शतकात त्या भाषेचं जसंच्या तसं कल्पनेने तांडणं किंवा आकलून लिहिणं तसं अवघडचं आहे.
आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. त्यांनी कादंबरीला लिहिलेल्या मनोगतात असं म्हटलं आहे, की महाराज सयाजीराव गायकवाड यांची म. फुले यांना जी मदत केली. ती म. फुले यांच्या मृत्युनंतर घडलेली घटना असल्याने ती या कादंबरीत आलेली नाही. हे अगदी खरं आहे. म. फुले यांच्या मृत्यूनंतरच्या अत्यंयात्रा, त्याबाबत सावित्रीबार्इंनी घेतलेला पुढाकार या दोन मुख्य घटनांनंतर कादंबरी संपते. म. फुले यांची ही चरित्र कहाणी असल्यामुळे त्यांच्या शाळांच्या कामापासून ती सुरू होते आणि त्यांच्या मृत्युजवळ थांबते. पहिल्या भागात १८५७ पर्यंतचा कथाभाग येतो. दुसऱ्या भागात १८५७ ते १८८५ पर्यंतचा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतचा कथा भाग आहे. आणि १८८५ ते १८९० पर्यंतचा कथा भाग तिसऱ्या आणि चौथ्या भागात आला आहे. अशाप्रकारे एकूण चार भागात विभागलेली एकूण चारशे ऐंशी पृष्ठांची एक चांगली बलदंड कादंबरी या चरित्रकहाणीच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळते आहे.
बडोद्याहून मदत मिळायला जो उशीर झाला, त्याबाबत नेमके काय घडले याचा शोध घेतला गेला पाहिजे। महाराजांकडे मामा परमानंदांनी तीन पत्रं पाठवली होती. पहिलं पत्र त्यांनी ३१ जुलै १८९० ला लिहिलं. दुसरं लगेच १८९० ला लिहिलं. दुसरं लगेच १८९०च्या ऑगस्ट महिन्यात लिहिलं आणि तिसरं पत्र म. फुले यांच्या मत्यूनंतर लगेच डिसेंबर महिन्यात लिहिलं. या तीनही पत्रांमध्ये पुन:पुन्हा एकच मागणी होती की, महात्मा फुलेंसारख्या एका मराठा मानसिकतेची बंध मुक्ती करणाऱ्या, बहुजन समाजाची मानसिकता बदलण्याचं काम करणाऱ्या माणसाला मदत करा. म. फुले यांचं फार मौलिक असं र्वान मामा परमानंदांनी केलेलं आहे. त्यांचं इतकं चांगलं वर्णन इतर कोणत्याही समकालीन लेखकाने केलेलं नाही. म. फुले यांची खरी ताकद ओळखणारा हा मामा परमानंद नावाचा एक ब्राह्मणेतर विद्वान आहे. मला सांगायचं आहे ते असं, की मामांनी सयाजीरावांना तीन तीन पत्र लिहिल्यानंतरसुद्धा मदत मिळायला जुलै १८९० ते फेब्रुवारी १८९२ एवढा मोठा कालखंड जावा लागलेला आहे. म्हणजे त्यावेळची नोकरशाहीसुद्धा आजच्या सारखी मध्ये काड्या घालायचं काम करत होती का ती पत्रं महाराजांपर्यंत पोचलीच नाहीत का पत्रं पोचल्यानंतर सुद्धा महाराजांना निर्णय घेऊ नये असं काही कारस्थान काही लोकांनी केलं होतं का कारण म. फुले गेल्यानंतरची पुढची दोन पत्रं आणखी आहेत. त्यापैकी एका पत्राचा उल्लेख कादंबरीत आला आहे. पुढे आणखी एक पत्र असं आहे की, यशवंताच्या हातून पुनहा नव्याने अर्ज लिहून घेऊन पाठवावा लागलेला आहे. ही पत्रं तरी कशी उपलब्ध झाली ते माहीत आहे सयाजीरावांच्या दरबारातील दिवाण रामचंद्रराव धामणस्करांना मामा पुन:पुन्हा पत्रं लिहित आहेत आणि मग ती तीनही पत्रं धामणस्करांनी परत पाठविली आहेत. आणि पुन्हा एकदा नव्याने अर्ज मागविला आहे. अशाप्रकारे ही पत्रं आज आपल्याला उपलब्ध झाली आहेत. पुढची जी पत्रं आहेत त्यात सुद्धा म. फुले मरण पावले आहेत आता तरी निदान सावित्रीबार्इंना आणि यशवंतला मदत पाठवा अशी विनंती मामांनी केलेली आहे. तेव्हा असं दिसून येतं की, फेब्रुवारी १८९२ मध्ये मदतीचा पहिला चेक येतो आणि त्यानंतर दर तीन महिन्याला पन्नास रुपये अशी मदत चालू राहते. हा सगळा पुढचा इतिहास या कादंबरीत येणे शक्यच नव्हते.
परंतु पुढे जे घडलं, म. फुले यांच्या कूटुंबाची जी वाताहत झाली ती प्रचंड चटका लावून जाणारी आहे. ‘पूना कमर्शिअल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी’ सारख्या एका फार मोठ्या कंपनीचा मॅनजिंग डायरेक्टर असलेला हा माणूस स्वत:च्या बळावर सामाजिक कार्य करत होता. स्वत:च्या तेलाने जळणं असं त्याला म्हणतात. सरकारच्या मदतीवर किंवा लोकांच्या वर्गणीवर नव्हे! स्वत: कमवलेल्या पैशांवर सामाजिक कार्य करणारा हा माणूस होता. लक्षावधी रुपये ज्याने कष्टाने कमावले आणि सामाजिक कार्यासाठी खर्ची घातले त्याच्याजवळ शेवटच्या आजारपणात औषधपाण्यासाठी लागतील इतकेही पैसे शिल्लक नव्हते. हे सगळं वाचतांना डोळ्यात पाणी उभं राहत. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी फार ताकदीने ते सगळं उभं केलं आहे.
म. फुले गेल्यानंतर यशवंत आणि सावित्रीबाई अन्नपाण्याला महाग झालेले आहेत. पुढच्या काळातलं चित्रं असं आहे की, १० मार्च १८९७ ला सावित्रीबाई जातात. त्या गेल्यानंतर यशवंताचं पुढे काय झालं ते आपल्याला फारसं माहीत नव्हतं. परंतु आता कागदपत्रांवरून आपण हे सिद्ध करू शकलो आहोत की, यशवंत सैन्यात डॉक्टरची नोकरी करत होता. चीन, बँकॉक, आफ्रिका इत्यादी अनेक ठिकाणी त्याने भ्रमंती केली. तोही १९०६ मध्ये मरण पावला आहे. तो गेल्यानंतर त्याची पत्नी निराधार झालेली आहे. त्याला एका मुलगी आहे. त्याच्या मृत्यूनंतर पत्नीने आणि मुलींना काय केले. प्रथम म. फुले आणि सावित्रीबार्इंची सर्व ग्रंथसंपदा रद्दीत विकली. त्यानंतर घरातली भांडी विकली आणि शेवटी ११ ऑक्टोंबर १९१० ला मत्र. फुलेंच ते प्रिय घर, जिथे सत्यशोधक समाज जन्माला आला, जिथे अस्पृश्यांसाठी विहीर खुली करून देण्यात आली, जिथे बालहत्या प्रतिबंधक गृह चालवलं गेलं, जिथे रात्रीच्या शाळा चालल्या, सारं सारं क्रांतिकारक कार्य ज्या घराने पाहिलं आणि जिथे महात्मा फुले यांच्या अस्थी आजही आहेत ते घर अनदगा शंभर रुपयाला या बाईने विकलं. मित्रहो, नव्या शतकात म. फुले यांचं नवं आकलन आणि मूल्यमापन होत असताना त्यांच्या कूटुंबाची झालेली ही वाताहत मला आपल्यासमोर एवढ्यासाठी ठेवायची आहे की, म. फुले यांचा हा ध्येयवाद पुन्हा जागवला पाहिजे. या समाजाला पुन्हा नव्या बळानं, पुरुषार्थानं उभं करायचं असेल त्या माणसांना काय सोसावं लागलं हे ही सांगितलं पाहिजे.
घर विकल्यानंतर ती बाई रस्त्यावर आली. तिला बेवारस म्हणून मरण पत्करावं लागलं. म. फुले यांची सून रस्त्यावर बेवारस म्हणून मरण पावली. त्यांची नात लग्न करायला कोणी तयार नाही अशा भजंग अवस्थेत फिरत होती. तेव्हा होले नावाच्या एका बिजवर माणसाशी तिला लग्न करावं लागलं. तिला दोन मुलं झाली ती दोन्ही मुलं आज हयात आहेत. कदाचित ती आज म्हणत असतील महात्मा फुलेंनी आम्हाला काय दिलं त्यांच्या मनात कदाचित कटुताही असू शकेल. माळी समाजसुद्धा असं म्हणतो की, म. फुलेंनी आमच्यासाठी फारसं काही केलं नाही. जातीचे लोक तर त्या काळातही त्यांच्या विरोधात होते. परंतु मित्रहो, म. फुले हे गेल्या शतकातले एकच असे अद्वितीय क्रांतीकारक आहेत की, ज्यांनी स्वत:च्या कूटुंबासाठी आणि स्वत:च्या जातीसाठी काहीही केलेलं नाही. साऱ्या समाजासाठी आणि देशासाठी मात्र खूप काही केलं. फुले हे बांधकाम व्यवसायात होते म्हणून ‘बिल्डर’ हा शब्द वापरायची मला भीती वाटते. कारण ‘बिल्डर’ हा शब्द आता एवढा बदनाम झालाय की म. फुले हे ‘बिल्डर’ होते असं म्हटलं तर ती त्यांची बदनामी ठरेल. परंतु मी जर असं म्हटलं तर ते आपल्याला जरूर पटेल की, फुले हे बिल्डर असतील नसतील परंतु ते टनेशन ‘बिल्डर’मात्र नक्कीच होते.
म्हणून एकविसाव्या शतकात या राष्ट्रनिर्मात्याचं नवं आकलन होत असताना तरुण पिढीला, बहुजनांना, नव्याने शिकू लागलेल्या दलित, आदिवासींना वाचायला प्रवृत्त करील. त्यांना एक नवी जगण्याची ताकद देईल अशी एक सुंदर कादंबरी डॉ. ठाकूर यांनी दिली आहे.
-हरि नरके
DAINIK PUDHARI 22-09-2002‘महात्म्या’ची आकाशवाणी...
डॉ. रवींद्र ठाकूर लिखित ‘महात्मा’ या कादंबरीचे सध्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दर रविवारी सकाळी ७.४५ क्रमश: वाचन होत आहे. येत्या रविवारी या कादंबरीच्या वाचनाचे ७५ आठवडे पूर्ण होत आहेत या अमृत महोत्सवी भागानिमित्त या कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेवर टाकलेला एक प्रकाशझोत.
समताधिष्ठित भारतीय समाजक्रांतीचे स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी आमरण झटणारे थोर क्रांतीकारी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांचे स्थान अद्वितीय आहे.
कोणत्याही महात्म्याला त्याच्या समकालीन सनातन्यांच्या मूलतत्त्ववादी मूल्यांच्या भोगळपणाविरुद्ध संघर्ष करावाच लागतो. महात्मा फुलेंनाही तो चुकला नाही. त्याची पोचपावती त्यांना व त्यांच्या विचारधारेला नजिकच्या काळातच मिळायला हवी होती, परंतु त्यांसाठी फुलेवाद्यांना सुमारे १५० वर्षांचा वनवास ओलांडावा लागला. तेव्हा कुठे आज आम्हाला साक्षात्कार होऊ लागला आहे, की जोतीराव फुले हे खरोखरच महान होते.
जोतीरावांनी आपल्या लेखनातून बहुजन समाजाच्या उद्धाराची सूत्रे पेरली. हाच कोणत्याही देशाच्या आर्थिकतेचा कणा असू शकतो हा विचार त्यांनी तळमळीने मांडला. ब्राह्मणी हिंदू धर्म आणि त्याचया अनुषंगाने येणारी जातीयता आणि विषमता ही आपल्या समाजाव्यवस्थेला लागलेली कीड आहे हे त्यांनी आपल्या साहित्यातून पटवून दिले.
महात्मा फुले यांच्या या सर्व कार्य-कर्तृत्वाची दखल घेतली जाणे गरजेचे होते. थोर लेखक धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहून ती चांगल्या प्रकारे घेतली आहे. आजही धनंजय कीर लिखित महात्मा फुले चरित्राला पर्याय नाही. डॉ. रवींद्र ठाकूर यांना मात्र या विषयावर कादंबरीलेखन तेही चांगल्या प्रकारे झाले पाहिजे, असे वाटत होते. त्या दृष्टिकोनातून वाचन करताना त्यांनी या विषयावर उपलब्ध असलेल्या काही कादंबऱ्यांचे वाचन केले, परंतु त्या वाचून ते अधिकच अस्वस्थ झाले. कारण त्यांना आकळलेले जोतीराव फुले कादंबरीरूपाने मांडायचे असतील तर कुठलीही तडजोड न करता ते करावे लागेलख् याची खूणगाठ बांधून त्यांनी लेखनकार्यास प्रारंभ केला.
सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे सन १९९३-९४ सालची, एके संध्याकाळी ठाकूर सरांच्या हाती आखीव कागदाची लिहिलेली काही पाने होती. आम्ही दोघं नेहमीप्रमाणे फिरायला निघालो होतो आणि सरांनी कादंबरीलेखनाचा विषय काढला. या अगोदर आपल्याला महात्मा फुलेंच्या जीवनावर लिखाण करणे कसे आवश्यक वाटते आहे आणि ते कशा पद्धतीने लिहिता येईल या विषयावर ते रोज बोलायचे. आता तर त्यांच्या हातात सुरुवातीच्या काही प्रकरणांचे हस्तलिखितच होते. नकळत माझ्याही मनावर त्याचा ताण आला. त्यांच्या मनावरही तो जाणवत होताच. थोर क्रांतीकारी विचारवंत महात्मा फुले यांचे जीवनकार्य आणि त्यांची ईहवादी विचारप्रणाली कादंबरीच्या रूपात मांडणे एवढे सोपे नाही हे एव्हाना सरांमुळे मलाही जाणवायला लागले होतेच. पहिल्या प्रकरणाच्या हस्तलिखिताचे प्रकट वाचन संपले तेव्हा आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. वास्तवाची कास कुठेही सुटलेली दिसत नव्हती. त्यासाठी घेतलेले परिश्रम ओळीओळीतून जाणवत होते. एवढेच नव्हे तर संशोधन आणि सर्जन या दोन्ही गोष्टी सांभाळताना होत असलेली कष्टदायक कसरत स्पष्ट दिसत होती, परंतु या कसोटीवर कादंबरीलेखन पूर्णपणे उतरले आहे, असेही जाणवत होते.
लेखनपूर्व संशोधनासाठी करावे लागणारे वाचन सर अव्याहतपणे करत असल्याचे मी रोज पाहत होतो. प्रत्येक क्षण न क्षण ते वाचनासाठी उपयोगात आणत होते. मला वाटते मी जेव्हा त्यांना भेटायला जाई, तेव्हाच काही वेळापुरते त्यांचे वाचन थांबे. एवढ्या झपाटलेपणामुळे त्यांना कादंबरीतील प्रसंगांची स्वप्ने न पडती तरच नवल झाले असते. प्रकाशक अनिल मेहता यांच्याकडे कादंबरीचे पूर्ण हस्तलिखित दिल्यानंतर आणि काही महिन्यात प्रकाशनासाठी ती स्वीकारली असल्याचा निरोप आल्यानंतरही सरांचे संशोधन आणि लेखन सुरूच होते. छापून बाहेर पडेपर्यंत ही कादंबरी चार वेळा लिहिली गेली. हे लेखन तडजोड करण्यासाठी नाही तर गुणवत्ता वाढविण्यासाठी झाले हे महत्त्वाचे.
सुरुवातीपासूनच जो विषय चर्चेपासून काळजीपूर्वक टाळला गेला त्या विषयावर झालेले नेटके लेखन समोर ज्या ब्राह्मणवाद्यांनी कादंबरीचे हस्तलिखित वाचले त्यांनी सरांच्यासमोर तडजोडीचे मुद्दे मांडले. महात्मा फुले यांच्या लेखनातील विखार– जो अनेकांनी बराच बोथट करून वाचकांसमोर आणला होता. तो त्यांनी आहे तसा साक्षात केला; त्यामुळे महात्मा फुले यांनी प्रस्थापित धर्मव्यवस्थेवर केलेल्या विखारी टीकेची हार थोडी सौम्य करावी, अशा सूचनाही त्यांना करण्यात आल्या; पण सरांनी तसे काही करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यात आपण काहीही बदल करू शकत नाही, अशीच भूमिका घेतली. तसे करणे म्हणजे आपल्या कादंबरी नायकाचा आपणच घात करणे आहे, अशी त्यांची भूमिका होती. एकूण या महात्म्याला न्याय देताना लेखकाच्याही चांगुलपणाचा कस तपासला गेला. हे येथे आवर्जून सांगितले पाहिजे. तरीही काही सनातनी लोक दुखावले गेलेच आणि त्यांनी लेखकाला आपल्या हीन मनोवृत्तीचा प्रताप दाखवला देखील; पण ते लेखकाने नम्रपणे स्वीकारले.
याउलट काही गुणग्राहक वृद्धांनी आदरापोटी लेखकाच्या पाया पडण्यासारखं रोमांचक प्रसंगही दाखविले.
आज प्रकाशनानंतर चार वर्षांतील या कादंबरीच्या लोकप्रियतेचा आलेख पाहता ‘महात्मा’ मुळे लेखकाला अनेक ठिकाणाहून व्याख्यानासाठी पाचारण केले जात आहे. हिंदी आणि इंग्रजी मधील भाषांतरे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तर कन्नड, तेलगू, गुजराथी भाषेत भाषांतराचे काम सुरू आहे. सोलापूर व कोल्हापूर या दोन आकशावाणीवरून या कादंबरीचे क्रमश: वाचन अद्याप सुरू आहे.
कोल्हापूर आकाशवाणीवर गोविंद गोडबोले आपल्या भारदस्त व लवचिक स्वरात आशयाची वाक् वळणे आविष्कृत करून दर रविवारी ७.४५ वाजता क्रमश: वाचन करीत आहेत. त्याबद्दल त्यांना व आकाशवाणीला धन्यवाद अशाच यशस्वी स्वरूपात ही कादंबरी वाचकांच्या कानातून अंतरात व आचारात उतरो ही सदिच्छा.
DAINIK PUDHARIमहात्मा फुल्यांवरील लक्षवेधी कादंबरी...
महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील एक नवी कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी कादंबरीत महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र जीवनचरित्र कादंबरीत मांडण्यासाठी डॉ. ठाकूर यांनी घटना-प्रसंगांची जी साखळी वापरली आहे, त्याला खरोखरच तोड नाही. कारण म. फुले यांचे विचार घटना प्रसंगांच्या माध्यमातून मांडणे हे खरोखर कठीण होते. परंतु ते अवघड असे कार्य डॉ. ठाकूर यांनी सहजपणे साध्य केले आहे. शुद्रातिशुद्र मुलामुलींसाठी शाळा स्थापना, विधवापुनर्विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, दुष्काळग्रस्तांसाठी सुरू केलेले अन्नछत्र, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे लेखन, शेवटी मनाला चटका लावून जाणारा म. फुले यांच्या मृत्यूचा दु:खद प्रसंग आणि त्याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेले धैर्य व प्रसंगावधान अशा कितीतरी घटना या कादंबरीत अगदी सहजपणे समोर येत राहतात. कादंबरीत कंटाळवाणा किंवा रुक्ष असा प्रसंग नाहीच.
स्त्रीशुद्रातिशुद्रांना ब्राह्मण आणि तत्कालीन प्रतिष्ठितांच्या दास्यातून मुक्त करण्याचे फार मोठे कार्य म. फुले यांनी केले. त्यांच्या जीवनातील कित्येक घटना हृदयद्रावक, संघर्षमय, आणि थरारक स्वरूपाच्या आहेत. त्या सर्व घटनांचे चिंताकर्षक असे वर्णन या कादंबरीत आले आहे. ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याची स्वप्ने पाहणारे जोतिराव आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नसमारंभात झालेल्या घोर अपमानामुळे अंतर्मुख होतात. आपण ब्रिटिशांच्या दास्यातून भारताला मुक्त करण्याचे स्वप्न पाहत आहोत, परंतु त्यानंतर आपल्या समाजाला खरे स्वातंत्र्य मिळणार आहे काय, हा प्रश्न त्यांना छळू लागतो. कंपनी सरकार गेल्यानंतर पुन्हा पेशवाईचीच स्थापना होणार असेल तर स्त्रीशूद्रातिशूद्रांना पुन्हा अन्याय अत्याचारच सोसावे लागणार आहेत ही वस्तुस्थिती त्यांना बेचैन करू लागते. त्यातूनच त्यांचे मतपरिवर्तन होते आणि त्यांच्या मनात समाजक्रांतीची बिजे पेरली जातात. टॉमस पेन यांच्या विचारांनी भारावून जाऊन आणि डॉ. मरेमिचेल यांच्यासारख्या खिस्ती मिशनऱ्यांच्या सहवासाने प्रेरित होऊन ते स्वत:ला शिक्षणकार्यासाठी वाहून घेतात.
जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या क्रांतिकारक कार्यात त्यांचे ब्राह्मण मित्रही सहभागी झाले. सुरुवातीला ते सर्वजण एकाच विचाराने प्रेरित झालेले होते. त्यांच्यात वैचारिक एकोपा होता. परंतु नंतर ध्येयधोरणाविषयी मतभेद होऊन फुट पडते. ते सगळे कसकसे घडते त्याचे फार उत्कृष्ट असे चित्रण डॉ. ठाकूर यांनी केले आहे. शिक्षणकार्याला वाहून घेतलेल्या त्या मित्रांमध्ये मतभेद होतो, ते ती शाळेत काय शिकवले जावे या प्रश्नावरून, परंतु म. फुले आप्ल्या विचारांवर ठाम आहेत. जे न्याय्य वाटते, सत्य वाटते त्यासाठी ते कुठलीही तडजोड करत नाहीत.
अशा या उमेदीच्या काळात जोतिरावांवर टॉमस पेन या अमेरिकन विचारवंतांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडतो. त्याने लिहिलेल्या ‘राइटस् ऑफ मॅन’, ‘एज ऑफ रिझन’ या ग्रंथांच्या वाचनाने जोतिरावांच्या मनात निर्माण झालेली भावनिक प्रतिक्रिया म्हणजेच त्यांनी उभारलेले सामाजिक क्रांतीचे कार्य! म. फुले यांनी उभारलेल्या त्या बंडाचा समग्र इतिहास या कादंबरीत ग्रंथित झाला आहे.
म. फुले यांच्या जीवनात घडलेल्या त्या सर्व घटनांना कादंबरीचे रूप देण्यात लेखक डॉ. ठाकूर यांनी असामान्य यश मिळविले आहे. ‘महात्मा’ वाचणारा प्रत्येक वाचक त्या घटनांचे चित्रमय वर्णन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. अर्थात त्याचे श्रेय लेखकाचया वर्णनकौशल्यालाच द्यावे लागेल.
‘महात्मा’ ही कादंबरी म्हणजे जोतिराव फुल्यांची चरितकहाणी असली तरी या कादंबरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेही चरित्र आले आहे. पतीवर नि:स्सीम प्रेम करणारी, त्याने अंगिकारलेल्या कार्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यात सहभागी होणारी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणून सावित्रीबार्इंचे व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे नजरेत भरते. म. फुल्यांनी अंगीकारलेल्या कार्यात त्यांनी महत्त्वाटा उचलला आहे. कदाचित सावित्रीबार्इंच्या सहाकार्याशिवाय म. फुले एवढं कार्य करूच शकले नसते. आपला गृहिणीधर्म सांभाळून शिक्षिकेच्या नात्याने सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. एकशे एकोणनव्वद व्यक्तिरेखा असलेल्या या कादंबरीत सावित्रीबाई यांच्याखेरीज सदाशिव गोवंडे, सरस्वतीबाई गोवंडे, मोरोपंत वाळवेकर, कृष्णराव भालेकर, ग्यानोबा ससाणे शाहीर धोंडिराम कुंभार, धोंडिबा रोडे, तात्यासाहेब रोडे, लहुजी बुवा, डॉ. मिचेल, भाऊ पाटील, सगुणा आऊ, नारायणराव लोखंडे, लोकहितवादी न्या. रानडे, बाबा पद् मनजी इ. अनेक लहानमोठ्या व्यक्तिरेखांचा समावेश असून त्या त्या व्यक्तींचे अत्यंत मार्मिक असे स्वभावरेखन लेखकाने केले आहे. गेल्या शतकातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांची मुळातून होत असलेली ही ओळखसुद्धा या कादंबरीची महत्त्वाची बाजू आहे. कारण त्यामुळे वाचकाच्या ज्ञानात बरीच मौलिक अशी वैचारिक भर पडते. या कादंबरीच्या वैचारिक बाजूविषयी खूप लिहिता येईल. उदाहरणार्थ, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेविषयी जोतिरावांनी केलेलं भाषण हा या कादंबरीतील वैचारिकतेचा उत्तम नमुना आहे.
या भाषणातून म. फुल्यांची सत्यधर्माच्या स्थापनेविषयी भूमिका सहजच स्पष्ट होते. माझ्या मनात म. जोतिबा फुल्यांविषयी असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या कादंबरीने मला दिली आहेत. संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी म. फुले यांनी जे कार्य केले ते पाहून माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर अधिक द्विगुणित झाला. ‘महात्मा’ ही कादंबरी वाचून इतरांनाही हाच अनुभव येईल, अशी मला खात्री आहे.
लेखकाच्या स्पष्ट, निर्भिड, रोकठोक भाषाशैलींचे प्रत्यंतर कादंबरी वाचताना ठिकठिकाणी येत राहते. कादंबरीची निवेदनशैली परखड तशी प्रसंगी मृदू मुलायमही आहे. लेखकाची निवेदनशैलीच अशी ओघवती आणि धारदार आहे की, तिच्याद्वारे महात्मा फुले यांचे विचार अगदी थेटपणे वाचकांच्या मनात जाऊन पोचतात. त्यावरून म. फुले यांची भाषा कशी होती, याचीही कल्पना आपणास या कादंबरीमुळे अनेक प्रसंगांची चित्रदर्शी वर्णने वाचत असताना ते प्रसंग अगदी सहजपणे डोळ्यांसमोर उभे राहतात. या कादंबरीच्या भाषेचे रूप ठिकठिकाणी आलेल्या संवदातूनही प्रकट झाले आहे. कादंबरीतील अनेक संवाद वाचकाला विचारप्रवृत्त करतात. ‘उद्या महारमांगांची पोरे शिकून अंमलदार झाली तर आम्ही काय त्यांना मुजरे करायचे काय? होय रे?’ संवादातून झालेली अनेक वाक्ये अशी सूचक व अर्थगर्भ आहेत.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही कादंबरी कुठेही सनावळीत आणि अनावश्यक अशा तपशीलात अडकून राहत नाहीत. त्यांचा संदर्भ चार ते पाचच उल्लेख या कादंबरीत येतात. तेही आवश्यक आहेत म्हणून काळाचे उल्लेख फार नाहीत म्हणून लेखकाचे काळाचे भान सुटले आहे असे मात्र नाही. त्याकाळाचे वातावरण निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
म. फुले या लोकोत्तर महामानवाविषयी कितीही लिहिले तरी ते कमीच ठरते. म्हणूनच त्यांच्यावर कादंबरी लिहिणे ही निश्चितच सोपी गोष्ट नव्हती. परंतु डॉ. रवींद्र ठाकूर यांनी कष्ट व कुशलता या बळावर ते अवघड कार्य पार पाडले आहे. एवढे मात्र निश्चित की, म. फुले यांच्याविषयी आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, परंतु त्या सर्व पुस्तकांमध्ये ‘महात्मा’ ही कादंबरी अधिक लक्षवेधी आहे आणि उद्याही कदाचित ती तशीच राहील.
-तातोबा बदामे