* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SO OFTEN, IT`S THE SIMPLEST ACTS OF COURAGE THAT TOUCH THE LIVES OF OTHERS. SUDHA MURTY-THROUGH THE EXCEPTIONAL WORK OF THE INFOSYS FOUNDATION AS WELL AS THROUGH HER OWN YOUTH, FAMILY LIFE AND TRAVELS-ENCOUNTERS MANY SUCH STORIES... AND SHE TELLS THEM HERE IN HER CHARACTERISTICALLY CLEAR-EYED, WARM-HEARTED WAY. SHE TALKS CANDIDLY ABOUT THE MEANINGFUL IMPACT OF HER WORK IN THE DEVADASI COMMUNITY, HER TRIALS AND TRIBULATIONS AS THE ONLY FEMALE STUDENT IN HER ENGINEERING COLLEGE AND THE UNEXPECTED AND INSPIRING CONSEQUENCES OF HER FATHER`S KINDNESS. FROM THE QUIET JOY OF DISCOVERING THE REACH OF INDIAN CINEMA AND THE ORIGINS OF INDIAN VEGETABLES TO THE SHALLOWNESS OF JUDGING OTHERS BASED ON APPEARANCES, THESE ARE EVERYDAY STRUGGLES AND VICTORIES, LARGE AND SMALL. UNMASKING BOTH THE BEAUTY AND UGLINESS OF HUMAN NATURE, EACH OF THE REAL-LIFE STORIES IN THIS COLLECTION IS REFLECTIVE OF A LIFE LIVED WITH GRACE.
लेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. त्यानंतर त्यांनी देवदासींची संघटना बांधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय व वगैरे मार्ग काढले. याबद्दल त्यांचा गौरव करताना त्या देवदासी भगिनींनी आपल्या प्रेमाची ऊब देणारे टाके प्रत्येकीने विणून अशा तीन हजार टाक्यांचे भरतकाम केलेल्या गोधडीची भेट दिली. ‘मुलांवर मात’या लेखातून लेखिकेने त्यांच्या काळातील शैक्षणिक परिस्थितीत मुली इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून कशा दूर होत्या, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये त्या एकट्याच असल्याने, मुले प्रथम कशी त्यांच्या खोड्या काढायची याविषयी लिहिले आहे. पण नंतर इंजिनिअरिंग हे पुरुषांचं क्षेत्र आहे, हे साफ खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवलं. लेखिकेनं सगळा अभ्यास व्यवस्थित समजून केला, व त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्यावर कशी मात केली, त्याविषयी वर्णन केले आहे. लेखिका एकदा सहजच मैत्रिणीच्या घरी गेली असता, फक्त मूळ भारतीय असलेल्या अन्नपदार्थांपासूनच श्राद्धाचा स्वयंपाक केला जातो, असं त्यांना कळलं. आपण ज्या गोष्टींना ‘भारतीय’ म्हणतो, त्यांपैकी अनेक गोष्टी भारतीय नाहीत. मिरची, ढबू मिरची, मका, शेंगदाणे, काजू, विविध प्रकारच्या शेंगा, बटाटा, पपई, अननस, सीताफळ, पेरू, चिकू या सर्व भाज्या आणि फळं दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आल्याचं त्यांच्या मैत्रिणीच्या वनस्पतिशास्त्रज्ञ वडिलांनी त्यांना सांगितलं. त्याबद्दलच्या विस्मयकारक पौराणिक व वैज्ञानिक गोष्टीही त्यांनी लेखिकेस सांगितल्या. अशा तऱ्हेने जेवायला गेल्या असता वैचारिक खाद्यही त्यांना लाभले. ‘तीन ओंजळी पाणी’ या लेखात लहानपणी आजीबरोबर लेखिका गंगापूजनाला गेली असता, त्याविषयीची माहिती- ते का करतात, कसं करतात हे कळतं. काही वर्षांनी प्रत्यक्ष काशी-बनारसला गेल्यावर त्याविषयीचा तिचा अनुभव काय, याविषयी लेखिकेने या लेखात लिहिले आहे. ‘घरासारखं दुसरं काही नाही’ या लेखात लेखिकेला मध्यपूर्वेत महिला संघटनांच्या आमंत्रणावरून गेल्या असता, स्वतःजवळचे सर्व पैसे घालवून, अधिक पैसे मिळतात, या आशेने गेलेल्या महिलांवर तेथे गेल्यावर काय परिस्थिती ओढवते, व परत मायदेशी येणे किती मुश्किल होते, याविषयी लेखिका सजग करते. ‘खरा राजदूत’ या लेखात परदेशी गेल्यावर आपली हिंदी सिनेसृष्टी इतर देशांमध्ये आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी कशी उत्सुकता निर्माण करते, तेथील लोकांशी जोडले जाण्याचा अनुभव देते, याची झलक दिसल्यावर चकित होते, त्याविषयी लिहिते. ‘रसीला आणि पोहोण्याचा तलाव’ या लेखात कर्नाटकातील हरिकथेत सांगितल्या जाणाऱ्या कृष्णाच्या आणि गोपिकांच्या रासलीलांच्या गोष्टी आपल्या परदेशातल्या नातींना लेखिका सांगते. याच गोष्टी परदेशी वातावरणाशी जुळवून त्यांच्या नाती त्यांना कशा मार्मिक रीतीने सांगतात, हे वाचणे खूपच रंजक आहे. ‘इन्फोसिस फाउंडेशनमधील एक दिवस’ या लेखात लेखिकेची मैत्रीण ‘तिला लेखिका निवांत भेटत नाही’ अशी तक्रार करते, तेव्हा त्या मैत्रिणीलाच आपल्या कामाच्या ठिकाणी बोलवते, व तिचा दिनक्रम कसा व्यस्त आहे, याचा अनुभव दिवसभर देते. ‘मला जमणार नाही; आपल्याला जमेल’ या लेखातून लेखिकेचा अचानकच व्यसनाधीनांच्या व्यसनांपासून सुटकेसाठी काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक अॅपनॉनिमस’ या संस्थेच्या संपर्कात आली. त्यांचे काम कसे चालते, याविषयीच्या मीटिंगला उपस्थित राहण्याची संधीही लेखिकेस मिळाली. त्याविषयीची समस्या सोडवण्यासाठी वाचकास जागृत करणारा, अंगावर शहारा आणणारा अनुभव लेखिकेने आपल्यासमोर ठेवला आहे. एकूणच समाजातील समस्या, माहिती, ज्ञान, चालीरीती अशा सगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श करणारे रंजक पण विचार करायला भाग पाडणारे विषय लेखिकेने समर्थपणे हाताळले आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating Starडॉ. अनिल कुलकर्णी, सामना

    काही पुस्तके वाचायलाच हवीत. कारण पुस्तके प्रेरणा देतात, संघर्षात जगायला शिकवतात आणि संघर्ष माणसाला घडवतो. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढग काही काळ अवकाश व्यापून राहतात पण जेव्हा बरसतात ते अंकुरसोबत घेऊन आसमंत उजळून टातात. केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही, तर या स्त्रियांचे आत्मसन्मानाने मनोबल वाढवण्याची गरज आहे हे सुधा मूर्तीना कळून चुकले. मग त्यांनी व देवदासींनी एकत्र येऊन एक संघटना उभी केली. परमेश्वराला काही सगळीकडे.. उपस्थित राहणे शक्य नसते. म्हणून तो काही काही व्यक्तींच्या रूपाने मदतीला धावून येतो या गोष्टीवर प्रतिकूल परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण त्यांचा ठाम विश्वास होता. तीन हजार टाके.... घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून त्या जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासी प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले. १९९६ मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना झाली. इन्फोसिस फाऊंडेशन सुरू करण्याची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणे ही होती. म्हणजेच `बहुजन हिताय बहुजन सुखाय` गरजवंताची जात, धर्म, भाषेचा विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणे हे त्यात मायेची ऊब होती. फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट होते. `देवदासी" या शब्दाचा खरं तर अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे. पूर्वीच्या काळी देवदासी गायन, वादन, नृत्य अशा कलांत निपुण असत. कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची उपासना करत. पण काही दिवसांनी `देवदासी` या शब्दाला `शरीरविक्रय करून उदरनिर्वाह करणारी स्त्री असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. ज्या देवदासीच्या पोटी जन्माला आल्या त्याही पुढे देवदासी बनल्या. काही मुलींना त्यांचे आईवडीलच वेगवेगळ्या कारणाने देवाला अर्पण करायचे दारिद्र्याने अस्वच्छ, अनारोग्यपूर्ण राहणीमुळे एखाद्या मुलीच्या केसात जट आली की, ती देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे असा साक्षात देवानेच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिचे देवाच्या चरणी सेवेसाठी लग्न करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली. देवदासी समस्येचे काम सुधा मूर्तीनी हातात घेतले. संवाद साधणे अतिशय अवघड होते. त्यांनी खूप अपमान सहन केले. "तुम्ही काय सरकारी दलाल आहात का ?" वगैरे त्यांची हेटाळणी झाली, त्यांच्या अंगावर चपला फेकून मारल्या गेल्या तरी त्या डगमगल्या नाहीत या उपक्रमाचे यश म्हणजे तीन वर्षांच्या आत बँकेकडे डिपॉझिट स्वरूपात ऐंशी लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली, परंतु या उपक्रमाचे सर्वात मुख्य यश म्हणजे ३००० देवदासी शरीरविक्रय व्यवसायातून बाहेर पडल्या. अनेकांची मुलं शिकून, मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली. त्यात डॉक्टर, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बैंक अधिकारी असे सगळे होते. देवदासी प्रथेतून बाहेर पडलेल्या महिलांनी एका कार्यक्रमामध्ये भरतकाम केलेली गोधडी सुधा मूर्ती यांना भेट दिली. तीन हजार टाके घातलेल्या या गोधडीवर सुंदर नक्षीकाम नसलं तरी त्याला प्रत्येकीचा हात लागला होता. आपल्या मनोगतात त्या म्हणतात, "ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट आहे. हे पांघरूण तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल. आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही." सुधा मूर्ती म्हणतात, आजवर मला मिळालेली ही सर्वात सुंदर भेट आहे. सुधा मूर्तीच्या शब्दांत सांगायचं झालं तर "मानवी स्वभावाचे सर्व पैलू नीट समजावून घेणं आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदतीचा हात देऊन त्यांना त्या संकटातून बाहेर काढण हेसुद्धा आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत. आपण सगळेच आयुष्यात छोटया छोटया लढाया जरी हरलो तरी महासंग्राम जिंकू शकतो. आयुष्यात आशेला नेहमीच स्थान असतं. " व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार करायचा असेल तर कोषातून बाहेर यायलाच हवं. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वानेच बदलाची प्रक्रिया सामूहिक व्हायला सुरुवात होते. काही पुस्तके, काही माणसे आजच्या पिढीला माहीत व्हायलाच हवीत. ...Read more

  • Rating StarNiren Apte

    3000 टाक्यांची जन्मकथा -निरेन आपटे. सौ. सुद्धा मूर्ती आणि नारायण मूर्ती ह्यांनी इन्फोसिसद्वारे संपूर्ण जगभर आपले कार्य पोहोचवले आहे. नारायण मूर्तींच्या इन्फोसिस कंपनीने जगभर व्यवसाय नेला तर सौ. सुद्धा मूर्ती ह्यांनी त्यातून मिळणाऱ्या नफ्यामधून ामाजिक कामे केली. अनेकांना आर्थिक मदत केली, शाळांमधून संगणक वाटले, ग्रंथालय उभे केले. कपडे-आवश्यक वस्तूंचे वाटप केले. नैसर्गिक आपत्तीनंतर मदत कार्य केले. सुद्धा मूर्ती ह्या लेखिकाही आहेत. wise and otherwise , dollar bahu , magic of lost temple , महाश्वेता अशी त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. त्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यांचे आणखी एक पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याचे नाव आहे -3000 स्टिचेस. मराठीमध्ये हे पुस्तक ``3000 टाके`` नावाने उपलब्ध असून त्याचा अनुवाद लीना सोहोनी ह्यांनी केला आहे. देवदासी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आधारित हे पुस्तक आहे. ह्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके असलेली एक गोधडी भेट दिली. सुधाजींनी ह्या महिलांसाठी जे काम केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गोधडी दिली आहे. हे पुस्तक वाचनीय आहे आणि त्या पुस्तकाची जन्मकथाही खूप काही सांगणारी आहे. सुद्धा मूर्ती इंजिनिअर झाल्या. पण त्यांचा ओढा सामाजिक कामांकडे जास्त होता. देवदासी प्रथा बंद व्हावी असे त्यांना मनापासून वाटे. म्हणून त्या एकदा देवदासी महिलांच्या वस्तीत गेल्या. त्या महिलांशी संवाद साधायचा होता. त्यावेळी सुधाजी आधुनिक कपड्यात होत्या. देवदासींच्या वस्तीत गेल्यावर तिथल्या महिलांना त्या आपल्यातल्या वाटल्या नाही. सुधाजींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलांनी चप्पल फेकून त्यांना हाकलून दिले. सुधाजींना वाईट वाटले. पण त्या हरल्या नाहीत. दोन आठवड्याने पुन्हा तिथे गेल्या. त्यावेळी टोमॅटोचा हंगाम होता. त्या बायका टोमॅटो निवडण्याचं काम करत होत्या. सुधाजी पुन्हा आल्या हे पाहून त्यांनी सुधाजींच्या अंगावर टोमॅटो फेकून मारले. पुन्हा मागे फिरावे लागले. सुधाजी हतबल झाल्या. त्यांनी हा किस्सा आपल्या वडिलांना सांगितला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांनी सुधाला सांगितले, तू आधुनिक वेशभूषेत तिथे गेलीस. त्यामुळे त्या महिलांना तू परकी वाटलीस. जर तू साडी नेसून गेलीस तर त्या तुला आपल्यातली एक समजतील. तुझे बोलणे ऐकतील. सुधाजींना हा सल्ला पटला. त्या साडी नेसून पुन्हा देवदासींच्या वस्तीत गेल्या आणि मोठा फरक झाला. त्या महिला सुधाजींशी बोलू लागल्या. त्या महिलांपैकी काही जण वेश्या व्यवसाय करत होत्या. त्या वस्तीमध्ये काहीच सुविधा नव्हत्या. सुधाजींनी त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली. बँक हा प्रकार त्या महिलांना माहित नव्हता. मग तिथे एक बँक आणली. एड्स आजाराची माहिती दिली. एड्सपासून रक्षण करण्याचे उपाय सांगितले. त्या महिलांचा सुधाजींवर विश्वास बसू लागला. एक नातं तयार झालं. त्यांचे अनेक प्रश्न सुटू लागले. सुधाजी इन्फोसिस फौंडेशन चालवतात ह्या गोष्टी त्या महिलांना माहीतही नव्हत्या. आपली मुले शिक्षण घेत आहेत. परिवर्तन होत आहे हे त्यांना दिसू लागलं. सुधाजींच्या चिकाटीला आणि कष्टाला फळ आलं. त्या महिलांनी एक कार्यक्रम करायचं ठरवलं. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून सुधाजींनी यावं इतकाच आग्रह करून त्या थांबल्या नाहीत तर सुधाजींना बंगलोरवरून येणं सोपं व्हावं म्हणून वोल्वो एसी बसचं तिकीट पाठवलं. सुधाजी त्या कार्यक्रमाला गेल्या. सुधाजींमुळे 3000 पेक्षा जास्त महिलांचे जीवन बदलले होते. म्हणून त्या महिलांनी सुधाजींना 3000 टाके घातलेली गोधडी भेट दिली. ह्याच घटनेवरून सुधाजींनी 3000 स्टिचेस हे पुस्तक लिहिले आहे. माणुसकीचं एक निराळं उदाहरण ह्या पुस्तकातून दिसून येतं, म्हणून हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं. ...Read more

  • Rating StarDrPawan S Chandak

    `तीन हजार टाके` हे सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित पुस्तक नुकतेच वाचले या पुस्तकात `सामान्य व्यक्तींचे पण त असामान्य असे कर्तृत्व` रेखाटले आहे. हे पुस्तक वाचताना विविध व्यक्तिमत्त्वाविषयी सुधा मुर्तींना आलेले अनुभव त्यांचे विचार यातून वाचयला मिळते. देवदासींच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व सुरुवातीला जरी प्रतिकूल अनुभव आला तरी त्यास त्यांच्या वडिलांची मिळालेली साथ यामुळे त्या देवदासींच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले काम तसेच या देवदासींना स्वावलंबी बनवून त्यांचे विविध बचत गट किंवा पतसंस्था निर्माण आदी कार्य प्रेरणादायी आहे. `एकटी मुलगी` या कथेतून सुधा मूर्ती यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्या कॉलेजमधील त्या एकटी मुलगी होती. तरी देखील कॉलेजमध्ये शिक्षण घेताना आलेले विविध प्रतिकूल अनुभव, मुलांची teasing तरी सुद्धा त्यांनी तितक्याच जिद्द व चिकाटीने या सर्व अनुभवांकडे कोणाकडे सुद्धा तक्रार न करता त्यांचे इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले व एक प्रकारे पुरुषी अहंकारावर आपल्या कर्तृत्वाने मात केली. `विचारांसाठी खाद्य` मधून एकदा त्या मैत्रिणीकडे जेवायला गेले असता तेथील यजमानांनी श्राद्ध निमित्त भोजनात देशी भाज्यांचे नैवेद्य केले असता. त्यात त्यांच्या चर्चेतून आपण रोज वापरत असलेल्या विविध भाज्या त्यांचे उगम स्थान यावरून देशी आणि विदेशी भाज्या याविषयी आपल्याला वाचायला खूप मजा येते. `तीन ओंजळी पाणी` या कथेमध्ये कदाचित आपल्या माहीत असेल की वाराणसीमध्ये गंगेत स्नान केल्यावर ओंजळीत पाणी घेऊन आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करायचा असतो. मग सुधा मूर्तींनी काय केले असेल बरं ? त्यांनी त्यांच्या सर्वात आवडती वस्तू म्हणजे नवीन साड्या खरेदी करणे या आवडीच्या वस्तूच्या नावे ओंजळीत पाणी घेऊन गंगेत सोडून त्याग केला. `कॅटल क्लास` मधून त्यांना आलेले बिझनेस क्लास vs इकॉनोमिक क्लास आदी विषयी व पेहरावा वरून भेदभावाचा अनुभव व तरीसुद्धा त्यांनी संयम ढळू देता अशा मानसिकतेच्या लोकांना दिलेले उत्तर हे वाचायला खरच मजा आहे `अलिखित आयुष्य` मधून त्यांच्या वडिलांनी डॉक्टर पेशीतून ग्रामीण भागातील दुर्गम भागात केलेली वैद्यकीय सेवा या सेवेतून ज्या पेशंटची त्यांनी प्रसूती केली त्या पैशांची मुलगी पुढे एक नावाजलेली स्त्री रोग तज्ञ होते असा हा प्रवास वाचताना खूप ऊर्जा मिळते. `घरासारखे दुसरे ठिकाण नाही` ही अत्यंत हृदयास हेलावणारी कथा, कारण या कथेमध्ये सुधा मूर्ती जेंव्हा एका शेलटर होम ला भेट देतात तेव्हा त्या ज्या पीडित घरकामगार स्त्रियांना भेटल्यावर त्यांनी सौदी किंवा त्या भागात घरकाम साठी गेलेल्या स्त्रियांना आलेले अत्यंत कटू अनुभव, त्यांच्या वर झालेले अत्याचार, पुढे त्या तिथे अडकून बसल्याने त्यांना परत भारतात आणून त्यांचे पुनर्वसन करणे आदींसाठी इन्फोसिस फाउंडेशन द्वारे सुधा मूर्ती ने केलेली मदत वाचण्यासारखी आहे. इन्फोसिस फाउंडेशन मधील एक दिवस मधून फाउंडेशनची शिष्ट सुधा मूर्ती यांचे उत्कृष्ट प्रशासन एकदा वाचा म्हणजे त्यांच्या कामाविषयी कल्पना येईल. तसेच पुढे `मला जमणार नाही पण आम्हाला जमेल` मधून अल्कोहोल ॲनॉनिमस चे कार्य त्यांनी खूप छान रेखाटले आहे . एकंदरीत मी काही सांगण्यापेक्षा आपण स्वतः पुस्तक वाचून एकदा अनुभव घ्यावा ...Read more

  • Rating StarGayatri Pangarkar, Amravati

    *`पुस्तकप्रेमी`* whatsapp समूह    काही दिवसांपूर्वी KBC च्या `कर्मवीर स्पेशल` एपिसोड मध्ये सुधा मूर्ती जी आल्या होत्या.. तेव्हा अमिताभ त्यांच्या पाया पडून म्हणाले होते ‘हम गर्व से कहते हैं कि, हम उस देश के वासी हैं जिस देश में ‘सुधा मूर्ती’ जी रहत हैं”...काय यथार्थ भावना व्यक्त केल्या एका महापुरुषाने...   आज हे आठवायच निमित्त झालं ते म्हणजे सुधा मूर्ती हस्ते लिखित “तीन हजार टाके” हे वाचनात आलेलं पुस्तकं... या कथा म्हणजे रोजच्या जीवनातील सामान्य व्यक्तींच्या असामान्य जीवन कथा आहे. त्यांना कथा म्हणा, वर्णन म्हणा किंवा अनुभव संकलन आहे म्हणा... ज्याला जे नाव रुचेल ते देऊ शकता.. काय नाहीये या पुस्तकात? या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवतं, अंतर्मुख करत.  असं हे नितांत सुदंर पुस्तक मी एका बैठकीत वाचून संपवलं... किती तरी गोष्टी शिकले मी यातून.. सगळ्यात जास्त गारुड घातलं ते सुधा ताईंच्या साधेपणाने... त्यां नेसत असलेल्या अगदी साध्या साड्या हीच त्यांची ओळख आहे.. बऱ्याच वेळा आपल्याला वाटत राहतं कि आपले कपडे अगदी out of style आहेत..त्यातून एक न्यूनगंड जन्माला येतो...पण सुधा ताईंना पाहून लक्षात येतं कि class आणि style हे inbuilt असावे लागतात.. घातलेल्या कपड्यांवरून class ठरत नाही ... आजकाल "classy" ची व्याख्या वापरत असलेला महागडा मोबाईल, त्यावर पाहिल्या जाणाऱ्या अगम्य वेब सिरीज, ट्विटर, इंस्टा वर किती फॉलोअर्स ह्या आणि यासारख्या अनेक दिखाऊ गोष्टींवरून ठरवली जाते.. ते किती चुकीचं आहे हेच सुधाताईंकडे पाहून लक्षात येतं.. दुसरी भावलेली गोष्ट म्हणजे सुधा ताईंचा आत्मविश्वास.. आणि तो मिळवायला करावा लागतो अखंड अभ्यास आणि अथक परिश्रम... there is no substitute to hard work...कित्येक वेळा एखाद काम टाळून ते का टाळलं यासाठी आपण स्वतःला excuses देत असतो.. सुधा ताईंना समजून घेतल्यावर आपल्या या सवयीत नक्की बदल व्हायला मदत होईल... आणि लास्ट बट नॉट लिस्ट, खूप खूप महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे “ पालकत्व हि एक जवाबदारी आहे” सुधा ताईंचं असामान्य व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांच्या पालकांचा मुख्य वाटा आहे.. "संस्कार करावे नाही तर पेरावे लागतात" मुलं आपल्या पालकांच अनुकरण करत, त्यांना निरखत च मोठी होतात.. संस्कारी आणि यशस्वी मुलं त्यांच्या पालकांचं च प्रतिकरूप असतात..  केवळ पालकत्वाची पुस्तक वाचून responsible पालक होता येत नाही... मदत जरूर होते.. पण प्रत्येक पालकत्वाची काही ना काही व्यथा ही असतेच.. ज्याला त्या व्यथेची कथा करता आली तेच जवाबदार पालकत्व म्हणून नावाजलं जातं... पुस्तकाविषयी आणि सुधा ताईंविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे..कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी या समर्थ व्यक्तिमत्वाकडे आहेत... इतिहास, पुराण आणि अंडरवल्ड चा फेरफटका मारल्यावर वास्तवात परतण्यासाठी ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचा च....👌👌👌👌👌👌👌👌   ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more