Madhavi Shahade
नेहमीच्या सरधोपट आयुष्यात आपण कल्पनाही करु शकणार नाही असं एक वेगळं खळबळजनक आयुष्य प्रोतिमा बेदी सत्तर ऐंशीच्या दशकात जगली.
कबीर बेदीची (एके काळची) बायको, पूजाची आई आणि गोवा बीचवरती पळताना न्यूड फोटो काढलेली बाई इतपतच हिची आधी माहिती होती.
पणयापलिकडेही अफाट , बेभान आणि मनस्वी वागणारी ही बाई होती. जेव्हा जे करावं वाटेल ते केलं. कपडे बदलल्यासारखे प्रियकर बदलले. (वाचताना नंतर नंतर मी नावं लक्षात ठेवायचं आणि एकूण आकडा मोजायचं सोडून दिलं.)
त्या काळातले कॉंग्रेसचे मोठे नेते रजनी पटेल (अमिषाचे आजोबा) , पं.जसराजांपासून ते तेव्हाच्या एका रसिक नभोवाणी मंत्र्यांपर्यंत तिचे `संबंध` होते, चांगली वट होती. या नागपूरी मंत्र्यांचं पुस्तकात नाव `मनू` असलं तरी ते सहज ओळखू येतात. तिचा शब्द झेलायला हे लोक सदैव तयार असायचे. रजनी पटेलांनी तर तिला एकदा `मुंबईची मेयर होणार का?` विचारलं होतं. ती `हो` म्हणाली असती तर झालीही असती. तिला या सगळ्या राजकीय गोष्टींच्यात काही रस नव्हता, पण आपल्यासारख्या नगण्य स्त्रीला ते मेयर बनवू शकतात तर ब-याचशा पदावर बसलेली माणसं कशी बसली असावीत हे लक्षात येतं असं तिने लिहिलंय. दुर्दैवाने आजही ते तितकंच खरं आहे.
घडलेल्या घटना अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याचं जाणवतं. वरुन कठोर दिसणारी आणि आतून हळवी असणारी ही बंडखोर बाई आपल्या टर्म्सवरती जगली , समाजाच्या नैतिकतेच्या कल्पनांना सुरुंग लावला. त्याचे परिणामही हिंमतीने स्वीकारले.
तिच्या लिखाणाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लहानपणीच्या कटू आठवणी , लैंगिक अत्याचार , मॉडेलिंगचे अनुभव, आपण मनाला येईल तसं वागलो... मुलांना पुरेसा वेळ दिला नाही याची बोचरी जाणीव , आई म्हणून मुलांसाठी तीळतीळ तुटणं , एक बायको म्हणून वेळेला पझेसिव्ह होणं , नव-याच्या अफेअर्समुळे काळजीत असणं , त्याला आणि त्याच्या प्रेयसींना समजून घेणं , एक प्रेमिका म्हणून जीवाच्या आकांताने तडफडणं , एक भक्त म्हणून आलेले देवीच्या चमत्काराचे समाधानी अनुभव , गुरुंच्या, शिष्यांच्या आठवणी आहेत. घडलेल्या घटनांचा धांडोळा घेताना चुकांची कबुली, यशाचा उल्लेख आहे. तेही अगदी सहजतेने , कुठलाही आव न आणता.
राजकीय नेते, त्यांची कुटूंबं आपल्यामुळे अडचणीत येऊ नयेत याची तिला जाणीव आहे. त्यासाठी तिने आणि पटेलांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे (जी तिला प्रकाशित करायची होती) तिने त्यांच्या मुलाला परत केली.
प्रोतिमाच्यात सतत एक प्रेमिका, अभिसारिका जाणवते. लहानपणापासून मायेला, कौतुकाला पारखी झालेली ही मनस्वी मुलगी पुढे आयुष्यभर प्रेम शोधत राहिली. हातातून काहीतरी निसटून चाललंय आणि आत्ता या क्षणी ते पकडायलाच हवं अशा भावनेने जगण्याच्या प्रवाहात भटकत राहिली. अडखळत पावलं टाकत टाकत लहान मूल जसं फुलपाखरु पकडायचा प्रयत्न करेल.. पडेल...उठेल आणि परत चालेल अगदी तसंच तिचं आयुष्य जाणवतं.
वयाच्या २६ व्या वर्षी गुरु केलुचरण महापात्रांच्याकडून ओडिसी नृत्य शिकून मग यातच काही करावं या ध्यासाने ती कर्नाटकात बेंगलुरू जवळ नृत्याचं गुरुग्राम उभा करते. गरजू मुलांना नृत्य शिकण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी धडपडते. नंतर योग्य व्यक्तींना ते हस्तांतरीत करुन त्यातून बाहेरही पडते. मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येनंतर ती ढासळते. पुढे कैलास मानस सरोवर यात्रेदरम्यान दरड कोसळून तिचं निधन होतं.
पुस्तक वाचून संपल्यानंतर आपण काही काळ दिग्मुढ होतो. विषण्ण व्हायला होतं. एखाद्याचं आयुष्य किती प्रवाहपतीत असू शकतं असं वाटतं. दारु , ड्रग्ज , सेक्स , सोशल लाईफ , पार्ट्या हेच आयुष्य असणारी ही बाई अचानक नृत्य काय शिकते , त्यात प्राविण्य मिळवते , संस्था उभारण्यासाठी जीवाचं रान करते. मग ऐहिक गोष्टी त्यागून अध्यात्मिक होते, `स्व`चा अर्थ शोधायचा प्रयत्न करते.
हे पुस्तक बायोपिक किंवा वेब सिरीजसाठी उत्तम आहे. सतत घडणा-या घटना , नात्यांची गुंतागुंत , परदेशातील अनुभव, प्रेम, अफेअर्स असं सगळ्या प्रकारचं वैविध्य यात आहे.
सुप्रिया वकील यांनी मूळ पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. एकदाही आपण अनुवाद वाचतोय याची जाणीव होत नाही. ...Read more
सुरेखा मोंडकरआपल्या समाजानं अगदी काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम न नियम मी मोडला . मी कसलीच बंधनं मानली नाहीत . मला जे जे करावसं वाटलं , ते ते मी केलं ; अगदी सपाटून केलं . कोण काय म्हणेल याला मी काडीचीही किंमत दिली नाही . माझं तारुण्य , माझं लैंगिक जीवन , माझी ुद्धीमत्ता - सारं सारं काही मी दिमाखानं मिरवलं .आणि हे सारं मी निलाजरेपणे केलं . मी खुप जणांवर जीव ओतून प्रेम केलं , आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केलं . " हे म्हणताहेत प्रोतिमा बेदी त्यांच्या टाईमपास ह्या आत्म चरित्रात !
.
प्रोतिमा म्हणजे एक वावटळ होती , जमिनीपासून उंच आकाशात गरगरत जाणारं चक्रीवादळ होतं . ते तिलाच फक्त झेपत होतं . जो त्या वादळात सापडला त्याला सावरणं पण शक्य नव्हतं . तिच्या सहवासात येणार्यांवर तिच्या धुंद आयुष्य शैलीचं गारुड पडायचं . तिचं स्वच्छंद आयुष्य ती आपल्या जबाबदारीवर जगली . तिची लढाई , तिची बंडखोरी , तिचं बेफाम -बेफाट आयुष्य , तिचं यश ..अपयश , तिची बेमुर्वतखोरी , तिची आढ्यता आणि जगाच्या दृष्टीने असणारा निलाजरेपणा .. निर्लज्जपणा ह्या सगळ्याची बरी वाईट फळ तिने धाडसाने , ताठ मानेने भोगली , जगाची पर्वा न करता .
.
.१२ ऑक्टोबर १९४८मध्ये जन्मलेली प्रोतिमा लक्ष्मीचंद गुप्ता , चार भावंडांतील दुसरं अपत्य . लहानपणापासूनच तिच्यावर कोणी प्रेम करत नाही अशी तिची भावना होती . ह्या प्रेमाचा शोध ती आयुष्यभर शरीराच्या माध्यमातून शोधत राहिली . त्यातून अधिकाधिक लढाऊ वृत्तीची , बिनधास्त आणि बंडखोर बनत गेली . रूढार्थाने जी समाजमान्य आहे अशी प्रत्येक गोष्ट तिने फाट्यावर मारली . बेधडक धुडकावून लावली . तंग , शरीरप्रदर्शन करणारे .. झिरझिरीत , बिन पाठीचे , मोठ्या ,खोल गळ्याचे , टाचके कपडे घालणे . नशा करणे , पार्ट्यांमध्ये रात्र जागवणे , अनेक पुरुषांबरोबर जवळीकीचे संबंध ठेवणे ; ही तिची जीवनशैली घरी पसंत पडणं शक्यच नव्हतं . वडिलांनी हात उगारल्यावर , एका रात्री , तडकाफडकी , कसलाही विचार न करता तिने घर सोडलं . अशीच होती ती .. झोकून देणारी ; स्वतःच्या मर्जीने , स्वतःला आवडेल तशी जगणारी ; आणि त्यासाठी जबरदस्त किंमत मोजणारी .
.
७० च्या दशकात ती नावाजलेली , प्रथमश्रेणीची मॉडेल होती . यशाच्या शिखरावर होती . स्तुतिपाठक भरपूर होते , तिच्या एका दृष्टीक्षेपासाठी कासावीस होणारे ! , पैसा , यश तिच्या पायाशी लोळण घेत होतं . १९६८च्या सप्टेंबर मध्ये एक देखणा , राजबिंडा , उंचापुरा मर्दानी मदनाचा पुतळा तिच्या सहवासात आला . अगदी ठरवून तिने त्याला तिच्या प्रेमात पाडलं . तो होता तेव्हांचा उगवता तारा , #कबीर_बेदी ! त्या काळात जेव्हां प्रेम चोरी चुपके केलं जात होतं तेव्हां ती बेछूटपणे त्याच्याबरोबर राहात होती . १९६९मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्या नंतर सात महिन्यांनी पूजा बेदी जन्माला आली .
.
. प्रोतिमा सर्व सिने मासिकांची आणि वृत्तपत्रांची अत्यंत आवडती होती . प्रदर्शन करणं आणि त्याचा गाजावाजा करणं तिला अत्यंत प्रिय होतं . ती ह्या सर्वांना खुशीने भरपूर मालमसाला पुरवायची . आता सिद्धार्थचा पण जन्म झाला होता . विवाहित , दोन मुलांची आई असुनही तिच्या वागण्यात काहीही फरक पडला नव्हता . जगप्रसिद्ध उद्योगपती , वंदनीय कलाकार , केंद्रीय मंत्री , देखणे परदेशी असे अनेक पुरुष तिच्या सहवासात होते . आणि १९७४मध्ये तिने एकच खळबळ उडवून दिली . तिने streaking केलं . जुहू बीचवर ती विवस्त्रावस्थेत धावली . सिने ब्लिट्झच्या मुखपृष्ठावर तिचा नग्न फोटो झळकला ; त्या मासिकाचा प्रचंड खप झाला आणि सर्वत्र एकच धुरळा उडाला .
.
. लहानग्या पूजाने तिला बिथरून जाऊन म्हटलं, " माझ्या शाळेतील सगळी मुलं म्हणतात , तू नंगी पळत सुटली होतीस ! "
प्रोतिमाने धारदार स्वरात सांगितलं , " हे माझं आयुष्य आहे , मी ते कसं जगावं , हे मला सांगायचा कुणालाही अधिकार नाही ...ज्या माणसांची स्वतःची कंटाळवाणी आयुष्य असतात , त्यांना शिळोप्याच्या गप्पांसाठी मी खाद्य पुरवलं याचा मला आनंद वाटतो . ..! " तिच्या आयुष्यावर तिने कोणालाच अधिकार गाजवू दिला नाही . अगदी तिच्या मित्रांनाही ! त्यांनाही हवं तेव्हां जवळ केलं , नको तेव्हां भिरकावून दिलं.
.
.पूजा बेदी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणते , " तिचं चैतन्य ,तिच्यातील सर्जनशीलता , तिच्यातील अमर्याद ऊर्जा आणि तिचं बिनशर्त प्रेम , यांच्यामुळे सिद्धार्थच्या आणि माझ्या जीवनात सुखाची हिरवळ फुलली . अतिशय खुल्या मनाची आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होण्याची इच्छा असणारी आई लाभण हे आमचं खरोखरच भाग्य होतं . "
.
प्रोतिमा सगळीकडे पूजाला घेऊन जायची . अगदी डिनर डेटला पण ! मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या . मला कळत नव्हतं का वाचतेय मी हे पुस्तक ? वेळ फुकट घालवतेय . माझ्या मातृत्वाच्या , पालकत्वाच्या कल्पनां मध्ये हे सर्व बसत नव्हतं. तिच्यासारखं वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं आयुष्य अभावानेच आढळेल . या तिच्या अत्युत्कट स्मृती आहेत . धक्कादायक वाटतील इतक्या मुक्तपणे लिहिलेल्या . एक स्वच्छंद आयुष्य जगलेली , निर्भीड स्त्री ..काळाच्या खूप लवकर जन्माला आलेली ! खरं म्हणजे आजही तिच्यासारखं जगणार्या आणि ते उजळ माथ्याने कबूल करणाऱ्या स्त्रिया नाहीत .सगळं सगळं कबूल आहे , पण ते मला कळून माझा काय फायदा होणार आहे !
.
भारतात नव्याने उदय पावणाऱ्या मुक्त जीवन पद्धतीचे प्रोतिमा आणि कबीर मूलाधार होते . पण आता हळूहळू त्यांच्यात दुरावा यायला लागला होता . दारिद्र्य , आजारपण , म्हातारपण , दु:ख अशा जगातल्या कुरूप गोष्टी कधी तिच्या जवळपास पण फिरकल्या नव्हत्या . मॉडेलिंग , इंटिरियर डिझाईनिंग , दागिने -कपडे यांचे डिझाईनिंग अशा विविध क्षेत्रात तिने भरपूर काम केलं . मुंबईत डिस्कोथेक , बुटिक सुरु करणारी ती सर्वात लहान वयाची उद्योजिका होती . पार्ट्या , क्लब , गाड्यांच्या शर्यती तिच्या जीवनाच्या अविभाज्य गोष्टी होत्या . सर्व कसं परिपूर्ण होतं . पण एक अनामिक बचैनी तिला छळत होती . १९७५च्या ऑगस्ट महिन्यात तिचं सगळं जीवनच बदलून गेलं .
.
.धो धो पाऊस कोसळत होता . डिनरला जाईपर्यंत कुठेतरी वेळ काढायचा म्हणून ती भुलाभाई ऑडिटोरियममध्ये शिरली . तिथे मंचावर जे नृत्य चाललं होतं ते बघून तिचं देहभान हरपलं . तो होता ओडिसी नृत्य प्रकार . त्या नृत्यासाठी ती व्याकूळ झाली . गुरु केलुचरण महापात्रा यांच्या समोर तिने अक्षरशः लोटांगण घातलं , पदर पसरला , त्यांचं शिष्यत्व देण्याची भीक मागितली . " इंडीयाज क्वीन ऑफ आउटरेज " हा किताब मिळवणारी आणि ते भूषण मानणारी प्रोतिमा नखशिखांत बदलून गेली .कटकमध्ये गुरुकुल पध्दतिने ती नृत्य शिक्षण घेऊ लागली . सुती साड्या हा तिचा वेश बनला .तिने व्यसनं सोडली . वयाच्या २६व्या वर्षी तिने ओडिसी नृत्याचा रियाज सुरु केला . रोज १२ ते १४ तास ती सराव करायची . नाचून पाय दुखायचे , पायांची कातडी सोलवटून निघायची . ती निरीश्वरवादी होती . पण ती कालीमातेच्या दर्शनाला जाऊ लागली . तिच्यात प्रत्यक्ष कालीमातेची प्रचिती येऊ लागली . तिचे गुरु ही एकमात्र व्यक्ती होती , ज्यांना तिने चरणस्पर्श करून वंदन केलं . अफाट श्रम , अथक मेहनत .. तिचं अवघं आयुष्य नृत्यमय झालं . थोड्याच काळात ती नामवंत ओडिसी नृत्यांगना झाली . १९७८मध्ये ती कबीर पासून विभक्त झाली . तिच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला .कबीरला जेव्हां नावलौकिक मिळत होता , तेव्हांच ती त्याच्यापासून दूर होती . त्याच्या यशाची चव आपल्यालाही मिळावी असं मनातून तिला वाटत होतं , पण तो आता परवीन बाबीच्या प्रेमात पडला होता .
.
नृत्य आता तिच्या जगण्याचा , अस्तित्वाचा भाग बनलं . तिने पृथ्वी थिएटरमध्ये स्वतःची नृत्य शाळा काढली . नंतर तिचं ओडिसी नृत्यकेंद्रात रुपांतर झालं . आता ते एसएनडीटी महिला विद्यालयाशी संलग्न आहे .
.
प्रोतिमा आणि कालीमातेत एक घट्ट दुवा तयार झाला . तिचं नृत्य अधिकाधिक अर्थपूर्ण आणि सखोल झालं . चैतन्यपूर्ण आणि उत्कट झालं . भारतभर , परदेशात तिचे आणि तिच्या शिष्यांचे कार्यक्रम होऊ लागले . तेव्हां सुद्धा सत्ताधारी तिच्या सहवासात होते . प्रोतिमा म्हणते ," जसजशी मी अधिक यशस्वी आणि श्रीमंत झाले , तशी स्वच्छंद वृत्तीच्या , माझ्यात रस घेणाऱ्या पुरुषांची संख्या कमी झाली . माझ्यापर्यंत कसं पोचावं , संभाषण कुठून सुरु करावं , तेच त्यांना कळायचं नाही . आपली तेवढी पात्रता नाही , वकूब नाही , याची जाणीव झाल्यामुळे कुणीही तसं धाडस करू धजत नसे . ..खंबीरपणे उभं राहण्याकरता त्याला अहंकाराचा भक्कम आधार हवा असतो ...तो नसेल तर तो अधिकाधिक दांभिक होत जातो . अहंकार हीच त्याची कवचकुंडले होतात . "
.
प्रोतिमाच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी होत होत्या .. ती म्हणते , " मी माझ्या वैयक्तिक लैंगिक सुखासाठी मी हवा तेव्हां अन्यत्र आश्रय घेत होते ; परंतु मला जे तीव्रतेनं , उत्कटतेनं हवं होतं ; ते समाधान दुर्दैवाने मला कुठंच लाभलं नव्हतं . " प्रोतीमाचा प्रवास साध्वी , भिक्षुणी होण्याकडे चालला होता . तिचा आयुष्यातला रस संपत चालला होता . पण तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण व्हायचं होतं .अथक प्रयत्न करून बेंगळूरुला गावाबाहेर तिने एक ओसाड जमीन मिळवली .गेरार्ड दा कुन्हा ह्या अशाच एका पछाडलेल्या वास्तुशिल्पकाराच्या सह तिने नृत्यग्राम उभारलं . तिथे ७ प्रकारच्या नृत्य शैली आणि मार्शल आर्टचे दोन प्रकार शिकवले जातात . १९९०मध्ये मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं . ह्या स्वप्नपूर्तीसाठी , त्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी तिने अनेक दारं ठोठावली .
.
ह्याच सुमारास प्रोतिमा बेदीची प्रोतिमा गौरी झाली . प्रोतिमा म्हणते , ` कानडी भाषेत बेदी म्हणजे पोट बिघडणं , जुलाब होणं . मला मिस डायरिया म्हणून ओळखलं जाण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे मी बेदी आडनाव वगळलं आणि मी गौरी अम्मा झाले . " नृत्यग्राममध्ये तिने हरितक्रांती केली , देखणी शिल्पं केली .तिला आणि गेरार्डला अनेक पुरस्कार मिळाले . पण प्रोतिमा विझत चालली होती .
.
तिचे आणि पुत्र सिद्धार्थचे भावबंध घट्ट होते . अमेरिकेला शिकत असणारा सिद्धार्थ हळू हळू मनोविकाराचा शिकार झाला . खूप औषधोपचार करूनही तो निराशेच्या गर्तेत कोसळू लागला . त्याला स्किझोफ्रेनियाने वेढलं . जुलै १९९७मध्ये त्याने आत्महत्या केली . आणि प्रोतिमा पूर्णपणे कोसळली
.प्रोतिमाने संन्यास घेतला . मुंडण केलं . निळ्या रंगाची कफनी परिधान करू लागली .सिद्धार्थच्या मृत्यूच्या आधीपासूनच तिच्या अंतर्बाह्य परिवर्तनाला सुरुवात झाली होती . हृदयविकार होता . तीन झटके येऊन गेले होते . ती हिमालयात भ्रमण करीत होती . धम्मगिरी विपश्यना केंद्रात शांती शोधत होती . नृत्यग्रामची तिने नीट व्यवस्था लावली .त्याचं योग्य व्यक्तींकडे हस्तांतरण केलं . निपुण शिक्षकांची तिथे योजना केली . तिची इच्छा होती जिप्सी सारखं भारतभर फिरून साऱ्या जगावर करुणेचा वर्षाव करत , रंजल्या गांजल्यांची सेवा करत आपल्या पैशाचा योग्य विनियोग करावा .
.
हेमकुंड साहिब , गंगोत्री , हृषीकेश , तिरुपती आणि लडाखच्या मठांत ती यात्रा करीत होती . भविष्य कळल्यासारखी तिने सर्व निरवानिरव केली होती . कैलास मानसच्या खडतर यात्रेला निघाली . १७ ऑगस्ट १९९८ च्या रात्री तिच्या समूहाचा हिमालयात गढवालमध्ये पिठोरगड जवळ मालपा इथं मुक्कामाचा तळ पडला . त्या दिवशी बेभान पाऊस कोसळत होता . रात्री दरड कोसळली . यात्रेकरूंपैकी कोणीही वाचलं नाही (१८ ऑगस्ट ). प्रोतिमाच्या वस्तू आणि पासपोर्ट सापडला . मृतदेह मिळाला नाही .
.
तिला , तिचा शेवट निसर्गाच्या सोबत व्हावा असं वाटायचं . सर्वसामान्य , वेदनामय , क्लेशकारक मृत्यू आणि त्यानंतर एखाद्या रुक्ष स्मशानात देह अग्नीच्या स्वाधीन करणं , याकल्पनेने ती शहारायची .मृत्यूला कवटाळतानासुद्धा तिनं आपल्याला हवा तोच मार्ग तिने निवडला .
.
प्रोतिमाच्या जीवनाचे दोन भाग होतात . पण तिच्या बेफाम जीवनाचीच जास्त चर्चा होते .जशी ओशोंच्या `संभोगातून समाधीकडे ` ह्याचीच जास्त चर्चा होते ! तिच्या जीवनातील हा कर्तबगारीचा आणि अध्यात्माचा भाग तुमच्या पर्यंत पोचावा हीच इच्छा
..
प्रोतिमाने हजारो कागद लिहून ठेवले होते . तिच्या मृत्युनंतर , त्यातील मजकुराची निवड करून मांडणी करायचं अत्यंत कठीण काम पूजा बेदीने केलं, त्याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला . टाईमपास ! त्या पुस्तकाच्या आधारेच , अपरिमित ऊर्जा आणि धैर्य असणाऱ्या ह्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी मी तुमच्यापर्यंत पोचवली आहे . पुस्तक विकत घेऊन जरूर वाचा .#सुरेखा_मोंडकर ...Read more