- DAINIK LOKSATTA 23-12-2007
स्थलांतरितांच्या जीवनकथा...
अमेरिकन समाज कोणतीही गोष्ट थेट व्यक्त करतो. त्यांच्या बोलीभाषेत एक सपक सारखेपणा आहे. अमेरिकन कॉफीशॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो-‘वुईथ शुगर ऑर वुइथ नो शुगर?’ ‘विदाऊट शुगर’ हा शब्दप्रयोग काही तो सेल्सपर्सनवापरत नाही. अमेरिकन समाजाचा हा स्वभाव अपर्णा वेलणकर यांनी नीट ओळखलाय, हे तिच्या पुस्तकाच्या शीर्षकातून व्यक्त होतं. ‘फॉर हिअर ऑर टू गो?’ हे तिच्या पुस्तकाचं टिपिकल मॅकडोनाल्डी शीर्षक! ‘इथेच खाणार की पार्सल नेणार?’ या प्रश्नाचं हे मॅकडोनाल्डी रूप. चार दशकांपूर्वी उत्तर अमेरिकेत गेलेल्या मराठी माणसांच्या देशान्तराची कहाणी अपर्णा वेलणकर यांनी मार्मिकपणे शब्दबद्ध केली आहे. ४०-४५ वर्षांपूर्वी मराठी मध्यमवर्गीय माणसांनी कोमट मानसिकतेची कुंपणं तोडून चिल्ड वातावरणाच्या अमेरिकेत जाऊन नवं जीवन सुरू केलं. तेव्हा ते धाडस होतं. आज अमेरिकेला जाण्याची वाट मळलेली आहे. तेव्हा त्या ठसे नसलेल्या वाटेवरून प्रवास सुरू केलेल्या मराठीजनांनी ठिकठिकाणी धडपड, झगडा, नैराश्याचे स्पीडब्रेकर्स ओलांडले, तेव्हा कुठे आजच्या ‘एच-वन’वर अमेरिकेत जाणाऱ्या पिढीला ‘फ्रीवे’ अनुभवायला मिळतोय.
स्थलांतरितांची ती पहिली पिढी अमेरिकेत-कॅनडात का गेली, तिथे कशी राहिली, तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या मनातल्या संघर्षाचा पोत कसा बदलत गेला, याचा सखोल अभ्यास या पुस्तकात मांडला गेला आहे. कोणत्याही पूर्वग्रहदूषित नजरेतून न मांडला गेलेला हा सामाजिक अभ्यास आहे. प्रगल्भ पत्रकाराच्या दृष्टिकोनातून चौफेर वृत्तीने केलेला हा अभ्यास आहे; तरी शैली फक्त रिपोर्टिंगची नाही. अनुभवकथनांची मस्त गुंफण करत ओघवत्या शैलीत केलेलं हे लालित्यपूर्ण लेखन आहे. यातून एन.आर.आय.च्या पहिल्या पिढीच्या जगण्याचा पट अतिशय भावोत्कटतेने रेखाटला गेला आहे. त्यांच्या जीवनाचा जमाखर्चही मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
आज मध्यमवर्गीय मराठी समाजातील प्रत्येकाचा कोणी ना कोणी जिवलग अमेरिकेला आहे. त्यांच्या वर्णनातून दिसणारी आजची अमेरिका आणि ३०-४० वर्षांपूर्वीची अमेरिका यात खूप फरक आहे. तेव्हाचा भारत आणि आजचा भारत यातला फरकही फारच मोठा आहे. आजच्या ग्लोबल भारतात एका माऊसच्या क्लिकवर माहितीचं दालन खुलं होतं; ज्यात शिरून अमेरिकेतलं अपार्टमेंट बुक करता येतं, कार रेंट करता येते, ऑफिस ते घर रोड मॅप डाऊनलोड करता येतो. आणि तिथे पोहोचल्यावर एका ई-मेलवरून दिवाळीचा फराळ आणि पुरणपोळ्याही थेट भारतातून मागवता येतात किंवा सॅनहोजेच्या इंडियन ग्रोसरकडे जाऊन बनारसी पान खाता येतं. आता इंडिया आणि अमेरिका सुपरसॉनिक वेगाने अंतर कापून एकमेकांना जोडले गेले आहेत. तिथला ऑफिस अटाअर इथेच खरेदी करून ट्राऊझरधारी मराठी तरुणी अमेरिकेत जाते तेव्हा तिच्यासाठी जीवनशैलीतील तफावत फार मोठी नसते.
३०-३५ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्यांना ना त्या देशाची पूर्ण माहिती होती, ना संपर्क साधनं. त्यांना थरारक दिव्यातून जावं लागलं होतं. खिशात ८-१० डॉलर्स, बॅगेत २० किलो सामान, शैक्षणिक कर्जाचं ओझं आणि भांबावलेलं मन घेऊन अमेरिकेत गेलेल्या त्या पिढीला तिथं रुजणं हे मोठं आव्हान होतं. मोठ्या क्षितिजाची आस असलेले, महत्त्वाकांक्षेने भारलेले पंख घेऊन दहा हजार मैलांवर स्थलांतर केलेले हे पक्षी तिथे गेले संघर्षाचा होता. आधी साडी, सलवार-कमीज, कुंकू अशा वेशात वावरून वेगळेपण जपणाऱ्या त्या, जेव्हा तिथे नोकरी-व्यवसायात उतरल्या तेव्हा हा विअर्ड पोषाख उतरवून त्यांना ट्राऊझरमध्ये यावं लागलं. १९६०-७० च्या सुमारास या मध्यमवयीन बायांसाठी ती क्रांती होती. शिवाय सपोर्ट सिस्टिम नसताना बेबी सीटरला अवाच्या सव्वा डॉलर मोजत, त्यांच्या वेळा पाळत नोकरी आणि ग्रोसरी, बँका, पोस्ट अशी कामं उरकण्यासाठी होणारी तारांबळ ही त्यांच्यासाठी नवखी आणि अचानक अंगावर आदळलेली बाब होती.
घरातले सुतारकाम, वायरिंग, प्लंबिंग प्रसंगी स्वत: करणं हा अमेरिकन जीवनाचा शिरस्ता होता. ही लाइफ ही मराठी माणसं एकमेकांना घट्ट आधार देत स्थिरावली. एकमेकांच्या अडचणींच्या वेळी मदतीचा हात देत त्यांनी मैत्रीची वीण घट्ट केली. आर्थिक, सामाजिक गरजा भागवताना भावनिक गरजांचंही पोषण करू लागली. त्यातून महाराष्ट्र मंडळ, संडे स्कूल, एकता मासिक, गाण्याचे कार्यक्रम, नाटक बसवणं असं संस्कृतिरक्षण सुरू झालं. लेखिकेने या व्यासपीठांची दखलही व्यवस्थित घेतली आहे. अमेरिकेतील भारतीयांकडून प्रसृत झालेलं साहित्य, त्यातील वाद-चर्चा आणि मराठी साहित्यिकांनी अमेरिकावारीनंतर केलेलं शेरेबाजीवा लेखन याबद्दल लेखिकेने सडेतोडपणे लिहिलंय. या स्थलांतरितांचीपुढची पिढी हा या लेखिकेचा विशेष कुतूहलाचा विषय आहे. त्यातून तिने काही तरुण-तरुणींशी थेट संवाद साधलाय. स्वत: अमेरिकन संस्कृतीत व समाजात शैक्षणिक कर्जाचं ओझं आणि भांबावलेलं मन घेऊन अमेरिकेत गेलेल्या त्या पिढीला तिथं रुजणं हे मोठं आव्हान होतं. मोठ्या क्षितिजाची आस असलेले, महत्त्वाकांक्षेने भारलेले पंख घेऊन दहा हजार मैलांवर स्थलांतर केलेले हे पक्षी तिथे गेले ते काही वर्षांत परत येण्यासाठी. पण X = X + १ या सिंड्रोममध्ये अडकले आणि कायमचे तिथले झाले. त्यांच्या अपार कष्टांच्या आणि तीव्र संघर्षाच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळतात.
अमेरिकेत पाऊल ठेवताक्षणी निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना कराव्या लागलेल्या तडजोडी व आटापिटा विलक्षण होता. स्वत:चं घरटं उभारण्यासाठी जिवाची जी तगमग सहन करावी लागली तीही भयंकर होती. कोणी शिकता शिकता तर कोणी अमेरिकन मंदीत स्वत:चा टिकाव लागावा म्हणून कष्टांचे डोंगर उपसले. इथले संकोच उतरवून टाकत त्यांनी अगदी मिळतील ती कामं केली. नित्याचा व्हाइट कॉलर जॉब करून शिवाय लॉन्ड्री, रखवालदारी, हरकाम्या, शोफर असे एखादे काम काही तास करत ‘एक्स्ट्रा माइल’ धावून त्यांनी लौकिक यश मिळवलं. स्वत:ची घरटी उभारली. सन्मानाने जगण्याइतकी डॉलरची ऊब मिळवली.
पहिल्या पिढीच्या इमिग्रन्ट महिलांसाठीही तो काळ मोठा स्किल्स नसलेली भारतीय जोडपी आधी भांबावली, पण पुढे ते सारं शिकलीही. अमेरिकेच्या मेल्टिंग पॉटमध्ये स्वत्व विरघळवत असं रुजणं ही काही सोपी बाब नव्हती.
स्वत:च्या क्षमता ताणत, स्वत:ची रेघ दुसऱ्याच्या रेघेहून मोठी आणि ठळक करण्याच्या जिद्दीतून ही माणसं तिथे समृद्ध झाली. आज त्यांच्या यशोगाथा अभिमानास्पद वाटतात. त्या यशाचा मार्ग किती खडतर होता, हे वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.
तिथल्या इमिग्रन्ट संसाराच्या गोष्टी फार रंजक आहेत. भारतीय चटकदार रसनेला तिथे काय मिळत होतं? ना मसाले, ना डाळी, ना कोथिंबीर. मोठ्या मोजक्या शहरांत एखादं एशियन ग्रोसरी शॉप असे. बाकीच्या शहरांत राहणाऱ्यांना तेही नाही. मग अमेरिकन बीन्सच्या उसळी, मैदा व मक्याचं पीठ मिक्स करून त्याच्या पोळ्या, अनसॉल्टेड बटरचे तूप, झुकिनीची भजी, रिकोटो चीजचे पेढे, सीरियल फ्लेक्सचा चिवडा असे खमंग शोध लावत, ते एकमेकींना सांगत रसनेचे चौचले पुरवले गेले.
रुजू बघणाऱ्या या पालकपिढीला मुलांवर मात्र इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही संस्कारांचा संकर अपेक्षित होता. मराठी भाषा, मराठी श्लोक-गाणी, श्रद्धाळूपणा आणि अमेरिकन मुलांचा आत्मविश्वास व स्वतंत्र बाणा हे सारं ‘पॅकेज’ हवं होतं. त्यांचं पालकत्व आणि मुलांचं स्वत्व यांच्यातली रस्सीखेच लेखिकेने विस्तृतपणे लिहिली आहे.
तिथे वाढणाऱ्या नेक्स्ट जनरेशनवर मराठी संस्कार करू पाहणारे पालक आणि आज इथे कॉन्व्हेंट कल्चरमध्ये वाढणाऱ्या मराठी मुलांची अमेरिकनाइझ्ड भाषा व संस्कृती यातला विरोधाभासही चांगला मांडलाय.
महाराष्ट्र मंडळांची रुजवात घातली गेली त्या काळातली आणि त्या पिढीतली एकत्रीकरणं आणि आजच्या महाराष्ट्र मंडळांमधली संमेलनं यात फरक आहे. तेव्हाच्या एकत्र जमण्याला स्मरणरंजनाची किनार होती, व्यक्तिगत ओढ होती. आजच्या पिढीत तिथे गेलेले ‘एच वन’ वाले किंवा ग्रीनकार्ड असावा म्हणून. स्मरणरजन ही त्यांची गरज नाही. मग या बदलत्या संदर्भानुसार मंडळांचे कार्यक्रम बदलले का, याचीही चर्चा या पुस्तकात आहे.
अमेरिकेत कायम वास्तव्य केलेल्या पहिल्या पिढीतले बहुतेकजण आता निवृत्त झाले आहेत. त्यांचं उत्तररंगी जीवन कसं आहे, याचा शोधही या पुस्तकात घेतला गेलाय. बदलत्या भारतात तर त्यांचे जुने संदर्भच पुसले गेले आहेत. परतीच्या वाटा गोठल्या आहेत. त्यांचं तिथलं निवृत्त जीवन कसं आहे, यातही डोकावण्याची संधी लेखिकेने साधली आहे.
आज भारतातूनच डील करून लाख लाख डॉलर्सची नोकरी मिळवून अमेरिकेत येणारी, येताना सर्व व्यवस्थांची तजवीज करणारी आणि पाऊल ठेवताक्षणीच कम्फर्टेबल होणारी एचवनवरची तरुणाई बघून या जुन्यांना कौतुक वाटतं, पण हेवाही वाटतो. पूर्वी नवख्यांना अमेरिेत आल्यावर वाट्टेल ती मदत करणारे त्यांचे हात आजही शिवशिवतात. पण आज ते हात पुढे करण्याची वेळच फारशी येत नाही. माहिती जगतातली ही तरुणाई स्वयंपूर्ण असते, स्थिरावायला सुसज्ज असते. जुन्यांना वाटतं, ‘आता तेवढाही उपयोग नाही उरला आपला!’
हीच तरुणाई मनात आलं तर अमेरिकेत सेटल होते, नाही जमलं किंवा नाही रुचलं तर अमेरिकेतच बसून परत भारतातला जॉब मुक्रर करते, भारतातही डॉलरमध्ये किंवा निदान त्याची बरोबरी होईल इतक्या रुपयांचं पे-पॅकेज मिळवते. हे सारं बघताना आधीच्या पिढीच्या स्थलांतरितांच्या हृदयात कालवाकालव होते. त्यांच्या परतीच्या वाटा किती कठीण होत्या, हे त्यांना आठवत राहतं. तेव्हाच्या भारतातली बेकारी, गॅस-फोनच्या वेटिंग लिस्ट, व्यवसायात पडायचं असल्यास लायसन्सची कुंपणं अशा प्रतिकूलता ही पिढी आठवत बसते. तेव्हाचा भारत आणि आजचा इंडिया यातली तफावत त्यांना वरकरणी सुखावते आणि आतून हलवतेही.
अमेरिकेने त्या पिढीत जागवलेली जिद्द, हुशारीची केलेली कदर, त्यांच्या प्रयत्नांतून मिळवून दिलेलं यश, कर्तृत्व विस्तारत संपन्न होण्याची संधी, समृद्ध राहणीमान, अभिमान असं बरचं काही स्थलांतरिताच्या पहिल्या पिढीने कमावलंय. भावनिक पातळीवर स्वदेशात आणि लौकिकार्थाने परदेशात असलेल्या त्या पिढीने अमेरिका आपलीशी केली तरी स्वदेशप्रेमही जपण्याचा प्रयत्न केला. भारतातील प्रकल्पांना फंडिंग करणं, ‘अॅडॉप्ट अ व्हिलेज’ सारख्या योजना राबवणं असं करत उतराई होण्याचा प्रयत्नही ते करत राहिले. दुहेरी नागरिकत्व त्यांच्या मनात कायम वास्तव्य करून होतं आणि आजही आहे.
‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला लाभलेली दिलीप चित्रे यांची प्रस्तावना फारच छान आहे. लेखिकेचे मनोगतही वाचण्यासारखे आहे. त्यातून त्यांच्या लेखनाचा उद्देश नेमकेपणाने व्यक्त होतो.
आज अमेरिकेत आणि भारतात जा-ये करणाऱ्या ग्लोबल तरुणाईच्या कौतुकाचे गोडवे गायले जात असताना स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीला काय वाटते ती भावना लेखिकेने शब्दबद्ध केलीय. त्या पिढीला वाटतेय- ‘जगाचे डोळे दिपवणाऱ्या या आधुनिक जल्लोषात ऐकू येत नाही तो रात्रीच्या नीरव अंधारात समुद्राच्या पोटात घुसलेल्या वल्ह्यांभोवती उठलेला लाटांचा कल्लोळ... ज्याचा ठाव लागणं मुश्कील अशा अफाट महासागरात पातळ शीड उभारलेली आपली होडी लोटून नेणारे कित्येक नावाडी, लाटांच्या ताडवाशी त्यांनी एकेकट्याने झुंज दिली.’
स्थलांतरितांच्या जीवनाचा हा अभ्यासपूर्णतेने साकारलेला आलेख प्रत्येक संवेदनशील आणि समाजशील वाचकाने जरूर वाचावा. अमेरिकेत राहणाऱ्या, अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या आणि भविष्यात अमेरिकेत जाण्याकडे डोळे लावून पाहणाऱ्या आजच्या तरुणाईने तसेच त्यांच्या पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. एखादी वाट मळवणाऱ्या पिढीने तेव्हाच्या त्या पाऊलवाटा कशा तुडवल्या, हे आजच्या मराठी समाजाने जाणून घेतलंच पाहिजे.
अपर्णा वेलणकर यांनी अमेरिकेतील अनेक मराठी जनांशी संवाद साधून, त्यापैकी काहींच्या घरात राहून मोकळ्या गप्पांतून त्यांनी एन.आर.आय.च्या पहिल्या पिढीची जीवनगाथा नीट समजून घेतलीय. त्यांच्या कथा, त्यांचे उद्गार आणि स्वत:चे विश्लेषण यांचा चांगला संगम साधलाय. ...Read more
- DAINIK LOKMAT (MANTHAN) 14-10-2007
पन्नास वर्षांपूर्वी महासागर ओलांडून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांची वेधक कहाणी...
अनेक गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अर्थपूर्ण, सरस अनुवाद केलेल्या आणि अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या अपर्णा वेलणकर यांचे पहिले स्वतंत्र पुस्तक ‘फॉर हिअर ऑर टू गो?’
इंग्रजी भाषा आणि संस्कृती यांचा प्रभाव पचवून आपल्या भाषेला टिकवून ठेवणे, परक्या संस्कृतीशी खुलेपणाने संवाद साधणे, परकी संस्कृती स्वीकारलेल्या भारतीय आप्तस्वकीयांशी संवादाचा सेतू बांधणे हे साध्य करून लेखिकेने प्रस्तुत पुस्तकात १९६०च्या दशकात उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या देशांतराचा अध्या शतकाचा सांस्कृतिक पट समतोल आणि विवेकी पद्धतीने मांडला आहे.
स्वत:ची भाषा, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था यांच्याशी एक गंभीर नाते असणाऱ्या तिसऱ्या जगातील या पत्रकार स्त्रीच्या पहिल्याच ‘स्वतंत्र’ पुस्तकात तिने जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांचे भलेबुरे परिणाम अनुभवलेल्या आणि तरीही आपल्या देशाशी, संस्कृतीशी असणारी देशी नाळ टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या ‘अमेरिकन’ मराठी माणसांची गोष्ट अतिशय रोचक पद्धतीने कथन केलेली आहे.
या मराठी पुस्तकाच्या इंग्रजी शीर्षकामुळे सनातनी भाषा पंडितांची भुवई नक्कीच उंचावली गेली असणार. जगभरातल्या सर्व ‘मॅकडोनल्डस्’मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे - ‘फॉर हिअर, ऑर टू गो?’ इथेच थांबून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणार की हे पदार्थ बरोबर घेऊन जाणार? लेखिकेने या प्रश्नाला विस्तृत आयाम दिलेला आहे. ४०-४५ वर्षांपूर्वी भारतातून परदेशात गेलेल्या मराठी माणसांनाच पडलेला हा प्रश्न! इथेच, परदेशात राहणार की मिळवलेल्या डॉलर्सची पुंजी घेऊन मायदेशी परत जाणार?
१९६०च्या दशकात उत्तर अमेरिकेत गेलेल्या, त्या परक्या भूमीत संस्कृतीत रुजण्याकरता मराठी माणसाने दिलेल्या झुंजीची, कष्टांची, ससेहोलपटीची आणि कैक सुखांच्या देदीप्यमान वैभवशाली क्षणांची ही भुरळ पाडणारी कहाणी आहे.
१९६०च्या दशकात मराठी मध्यमवर्गातील पांढरपेशी तरुणांनी स्थलांतर करून अमेरिका गाठली आणि परिचित भूमीतून उपसलेली मुळे नव्या जगात रुजवण्याचा, यशस्वी होण्याचा धडपडाट सुरू झाला. एकीकडे अमेरिकन संस्कृती, भाषा, संपूर्णत: वेगळी मूल्यव्यवस्था यांचा अंगीकार करून ‘त्यांच्यात’ मिसळून जाण्यासाठी प्रयत्न करत राहणे भाग होते; पण त्याबरोबरच आपली भाषा, संस्कृती मूल्ये टिकवण्याची, आपले ‘सत्व’ जपण्याची कसरतही करायची होती. शिवाय मुलांनी भारतीय मूल्यव्यवस्थाच स्वीकारावी, अमेरिकन खिसमसऐवजी दिवाळी, दसऱ्याचा आनंद मानावा आणि ‘शुभंकरोती’ म्हणावे, याकरता त्यांच्यावर सक्ती करण्याची केविलवाणी धडपड करण्याचा प्रचंड ताण होता तो वेगळाच! जगातल्या कुठल्याही स्थलांतरित माणसांना सोसावी लागणारी ही ‘सँडविच’ अवस्था लेखिकेने अत्यंत नेमकेपणाने या पुस्तकात अधोरेखित केलेली आहे.
यापूर्वीही अनेक मराठी लेखकांनी अमेरिकेवर पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तकांचा खरपूस समाचार लेखिकेने या पुस्तकात घेतला आहे. अमेरिका म्हणजे भूतलावरील साक्षात स्वर्ग किंवा अमेरिका म्हणजे निव्वळ नरक! अशा कुठल्याही टोकाच्या भूमिका न घेता, कुठलेही ‘इझम’ मनाशी न बाळगता, कसलेही अभिनिवेष न ठेवता कलात्मक तटस्थता राखून अत्यंत गांभीर्याने समतोल विचारसरणीतून लिहिले गेलेले मराठीतले हे कदाचित पहिलेच आणि म्हणून महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.
कॅनडा, अमेरिकेचा प्रदीर्घ प्रवास, तेथील अनेक शहरांना भेटी, शेकडो कुटुंबांमधून केलेले वास्तव्य, त्यांच्यासह केलेले हितगुज आणि चर्चा, अमेरिकेतील स्थलांतरितांच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी कोलंबिया, प्रिन्स्टन यासारख्या विख्यात विद्यापीठांच्या ग्रंथालयात जमवलेली बैठक, संशोधन, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी पुन:पुन्हा चर्चा, वाचन, चिंतन या अथक मेहनतीतून ही ग्रंथमिर्निती झालेली आहे. टुरिस्ट म्हणून अमेरिका भेट, वरवरचे निरीक्षण, विकृत कुतूहलातून केलेली सवंग चित्रणे किंवा दिपून जाऊन केलेली रसभरीत वर्णने असे धोके पूर्णत: टाळलेले असणे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. माणसांच्या जगण्याबद्दल अदम्य कुतूहल असणाऱ्या, इतरांच्या अनुभवाच्या तळ्यात सहज उतरून सहअनुभूती घेऊ शकणाऱ्या तरुण पत्रकार मनाने टिपलेली आणि ताज्या टवटवीत शैलीत आपल्याशी नुसताच संवाद नव्हे, तर गप्पा मारत सांगितलेली ही एक वास्तववादी तरीही सुरस कहाणी आहे. उत्तर अमेरिकेत मुळे रुजवलेल्या आणि मायभूमीशी बंध टिकवून धरलेल्या मराठी माणसांची कहाणी.
उत्तर अमेरिकेतील भौगोलिक स्थळे, माणसे आणि मराठी सांस्कृतिक संस्था यांची नुसती जंत्री देणारे, थंड शैलीतून रिपोर्ट करणारे हे टुरिस्ट गाईड अथवा प्रवासवर्णन नव्हे. व्यक्तिगत मतमतांतरे आणि राजकीय रंग येऊ न देता, आत्मीयतेच्या धाग्याने रंजक गुंफण करणाऱ्या प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनातून उलगडणारी एका पत्रकाराची ही शोधक भ्रमंती आहे.
गेली चाळीस वर्षे अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या दिलीप चित्रेंनी (कवी दिलीप चित्रे नव्हे) पुस्तकाच्या प्रस्तावनेत नेमकेपणाने म्हटले आहे.
‘हे पुस्तक म्हणजे ललित लेखनाच्या शैलीत लिहिलेला, देशांतरितांच्या एका पिढीच्या जीवनाचा एक ऐतिहासिक ‘दस्तावेज’ आहे. भविष्यात याला शैक्षणिक मूल्य प्राप्त होणार आहे आणि या विषयाच्या अभ्यासकांच्या पिढ्या या ग्रंथाचा शिडीसारखा उपयोग करणार आहेत.’
एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशींपासून पोट भरायला परदेशात गेलेल्या पंजाबातील अशिक्षित मजुरांपर्यंतचे ऐतिहासिक संदर्भ लेखिकेने धुंडाळले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वप्नभारले दिवस संपल्यावर देशउभारणीच्या कामाकडे पाठ फिरवून परदेशी चालते होण्याची मानसिकता, त्यावेळची उलाघाल आणि नंतर दुभंगलेले जीणे सावरताना झालेली तारांबळ याचे तपशील मुळातून वाचावे असेच.
लेखिकेने म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक हा एका समूहाचा अभ्यास आहे; पण तरीही यातील अनेक माणसं आपल्या मनात घर करतात. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्टस्, आयआयटीयन्स्, शास्त्रज्ञ आणि त्यांच्याशी लग्न करून नवऱ्यामागून परदेशगमन केलेल्या एका मुशीतून काढल्यासारख्या दिसणाऱ्या त्यांच्या देखण्या अर्धांगीनी, त्यांचे मैत्रीगट... संसाराचा गाडा ओढताना झालेली त्यांची तारांबळ, अस्तित्वासाठीचे तुंबळ संघर्ष, मराठी मंडळींचे गट व गटबाजीचे राजकारण, परदेशात गेल्यावर उफाळून आलेली धार्मिकता आणि उत्सवप्रियता याचे नेमके चित्रण इथे केलेले आहे. अमेरिकेत या स्थलांतरित भारतीय माणसांना येणारे दोन महत्त्वाचे प्रश्नही या पुस्तकात चर्चिले गेले आहेत- ग्लाससिलिंग आणि डिस्क्रिमिनेशन-वर्णभेद! ‘दे नीड अस, बट दे डोन्ट वॉन्ट अस!’चा भेदक अनुभव!
तब्बल तीन पिढ्या आजी आजोबा, आई-बाबा आणि तरुण नातवंडं यांच्यातील संघर्ष व सामंजस्य! मुलांवर संस्कार करण्याचा, अमेरिकन मातीतून ‘इंडियन मडके’ घडवण्याचा मागील पिढीचा प्रयत्न व त्यातून उडणाऱ्या ठिणग्या! मागच्या पिढीच्या- एबीसीडीजच्या (अमेरिका बॉर्न, कॉन्फिडंट देसीज) अनोख्या भावविश्वातही फेरफटका करून येते.
यशस्वी, चकचकीत वैभवशाली समृद्ध घरांबरोबर अपयशी, थकलेली, रखडलेली काही घरेही इथे भेटतात. तसेच सधन, सुशिक्षित अमेरिकन भारतीयांच्या घरातही काही स्त्रियांच्या वाट्याला आलेली मारहाण, पन्नाशीत घटस्फोट घेऊन वेगळी होणारी तेथली मराठी जोडपी यांचे जगणे अंतर्मुख करून जाते.
ही गोष्ट फक्त भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या समूहाची रहात नाही तर अनादीकाळापासून स्थलांतर करणाऱ्या अखिल मानवजातीची होते. या स्थलांतरित माणसांची सामूहिक व व्यक्तिगत पातळीवरील सुख-दु:खं, आशा-निराशा-संघर्ष- जिथे जाऊ तिथल्या संस्कृतीत विलीन होण्याचा अट्टाहास; पण त्याचबरोबर स्वत:चा चेहरा टिकवण्याची धडपड आणि यातून घडत जाणारे मानवी नातेसंबंध... या साऱ्याचा हा विस्मयकारक असा समग्र शोध आहे. ...Read more
- MAHARASHTRA TIMES 18-11-2007
राहिले दूर घर माझे...
अनेकांना भेटून, त्यांना बोलतं करून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनातली उलघाल जाणून घेऊन अपर्णा वेलणकर यांनी ‘फॉर हिअर, ऑर टू गो’ हे आपलं पुस्तक सिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवणाऱ्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीच्या संर्षाची ही कहाणी म्हणजे म्हणाल तर ‘यशोगाथा’ आहे; म्हणाल तर साता समुद्रपारचं राज्य जिंकूनही मनात होणाऱ्या तगमगीचा अध्याय आहे.
अमेरिका म्हटलं की न्यूयॉर्कचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा. अमेरिका म्हटलं की डिस्नेलँड आणि मॅनहटन स्वेकर. अमेरिका म्हणजे अमुक आणि अमेरिका म्हणजे तमुक. मुख्य म्हणजे अमेरिका म्हणजे स्वदेशापेक्षा चांगला देश; कारण अमेरिका म्हणजे पगाराच्या नोकऱ्या. अमेरिका म्हणजे आलिशान घरांत ऐषारामी वास्तव्य आणि अमेरिका म्हणजे भलतं सलतं काहीही करायचं स्वातंत्र्य.
मग जेहत्ते काळाच्या ठायी काहीही होवो; आपण आपला देश सोडून अमेरिकेतच जायचं. याचाच कंसातला अर्थ असा होता की, तिथं जाऊन खूप मज्जा मारायची. इकडे जे स्वातंत्र् आई-वडिलांनी, बाहेरच्यांनी मिळू दिलं नाही, ते ओरबाडून घ्यायचं. मग त्यासाठी भले जी किंमत द्यायची असेल, ती आम्ही देणारच. नव्हे तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. ही आणि अशी भावना अनेक देशांतल्या अनेकांच्या मनात अनेकदा जागृत झाली आणि लोक आपापले देश सोडून अमेरिकेच्या दिशेनं धाव घेऊ लागले. भारतात आणि विशेषत: मराठी माणसाच्या मनात ही भावना खऱ्या अर्थानं जागृत झाली. ती १९६०च्या दशकात. याच दशकात ‘खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपत मनाचा हिय्या... एवढ्या भरवशावर या माणसांनी दहा हजार मैलांची उडी मारली.
ऐहिक पातळीवर त्यांचं आरपार नवं आयुष्य सुरू झालं. कुणाच्या हाती एकदम पैसा खुळखुळू लागला. तर कुणाला साधं एक बर्गर विकत घेण्यासाठी झाडूपोत्याची कामं करावी लागली. पण तसं ‘इकड’च्या माणसांना कळवायची त्यांची हिंमत नव्हती. कारण घरच्यांच्या-बाहेरच्यांच्या आणि मुख्य म्हणजे स्वत:च्या अंतर्मनाच्या एका कोपऱ्यातून झालेल्या विरोधाला तोंड देऊन त्यांनी हे ‘स्थलांतर’ केलं होतं.
त्या काळात अमेरिकेत जाणं आजच्या इतकं सोपं नव्हे तर कमालीचं कठीण होतं. आजच्या अमेरिकेतल्याच काय भारतातल्याही तरुणांना त्याची कल्पना येणार नाही. अमेरिकेची स्वप्नं पाहणाऱ्या मराठी माणसाचा आचारविचारांचा आवाका कमालीचा मध्यमवर्गीय होता. शुभंकरोती, दिव्यादिव्या दीपत्कार, आमटीभाताचं किंवा फार झालं तर सोड्याच्या खिचडीचं जेवण आणि वर्षाकाठी राज कपूर वा देव आनंद यांचे दोन सिनेमे या पलीकडे त्याची मजल जायची होती. घराघरांत घुसलेली शेकडो केबल चॅनेल सोडाच, साधा टीव्हीही त्यांनी पाहिलेला नव्हता. सॅटेलाईट फोन्स, थर्ड जनरेशनचे मोबाइल सोडा, त्या त्या घराच्या परिघातही साधी लँडलाईन नव्हती. इंटरनेट सोडाच ‘फोटोकॉपी’चाही (म्हणजे ज्याला आजचे सारेच पुढारलेले लोक ‘झेरॉक्स’ म्हणतात!) शोध लागलेला नव्हता. एकदा अमेरिकेला जाऊन पोहोचलात की इकडचे सारे पाश तुटलेच म्हणून समजा.
तरीही अनेक मराठी तरुणांनी या अज्ञाताच्या प्रदेशात उडी घेतली आणि सामोऱ्या आलेल्या अकटोविकट संकटांशी शर्थीनं झुंज देऊन शिवाय वर ‘मराठी बाणा’ ही कायम राखला. हाताला यश आलं. खिशात डॉलर्सच्या चळती, शिवाय बऱ्यापैकी स्थावर-जंगम इस्टेटही त्या विदेशी भूमीवर उभी राहिली. बघता बघता पासपोर्टवर ‘नॅशनॅलिटी’च्या कॉलमात ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’अशी अक्षरं उमटू लागली आणि त्या पाठोपाठ मनाची जीवघेणी उलघाल सुरू झाली. या अमेरिकेत ‘सेटल’ झालेल्या लोकांच्या घरातली दुसरी पिढीही तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी राहिली. इकडचे पाश तुटले होतेच. माणसं नुसती दुरावली नव्हतीच, तर काही दंगावलीही होती...
पाऊल थकले, माथ्यावरती जड झाले ओझे...
हे इंटरनेटवरून डाऊनलोड करून एकांतात ऐकण्यापलीकडे काही उरलं नव्हतं. अशा लोकांना भेटून, त्यांना बोलतं करून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनातली उलघाल जाणून घेऊन अपर्णा वेलणकर यांनी ‘फॉर हिअर, ऑर टू गो?’ हे आपलं पुस्तक सिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवणाऱ्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी म्हणजे म्हणाल तर ‘यशोगाथा’ आहे; म्हणाल तर साता समुद्रापारचं राज्य जिंकूनही मनात होणाऱ्या तगमगीचा अध्याय आहे. लेखिकेला २००३ सालच्या पहिल्या अमेरिका भेटीतच ही तगमग आणि उलघाल जाणवली होती. वरवरची ऐहिक सुबत्ता मोठी होती आणि त्याचवेळी मनात खूप काही खदखदत होतं. त्यात ‘नोस्टॅल्जिया’ ची भावना होतीच; शिवाय काहीशी अपराधीपणाचीही. विजय तेंडुलकर यांच्याशी अमेरिकतेच झालेल्या गप्पांतून या विषयानं आकार घेतला आणि वेलणकर यांनी जिद्दीनं या विषयावर काम करायचं ठरवलं. पुढं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांच्या निमित्तानं त्या अमेरिकेला जात राहिल्या आणि अधिवेशन संपल्यावरही तिथल्या ‘मराठी माणसां’बरोबर बोलत राहिल्या. त्यांना कोणीतरी ऐकणारं हवंच होतं. बोलायला त्यांच्यापाशी खू होतं; पण नुसतं त्यांचं ऐकून घेऊन शुद्धलेखन न लिहिता, त्यापुढे जाण्याचं लेखिकेने ठरवलं. हे काम अवघड होतं; पण न्यूजर्सीतील प्रिन्स्टन आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया या दोन विद्यापीठांच्या ग्रंथालयात बसून तिथल्या स्थलांतरितांविषयी जे काही मिळेल ते काढलं. इकडे भारतात आल्यावरही अनेकांना भेटत राहिली आणि अनेक धुंडाळत राहिली. त्या समाजशास्त्रीय प्रवास घडवणारं हे कादंबरीसारखं ओघवतं झालं आहे.
हे पुस्तक वाचलं की या प्रश्नाचं उत्तर ‘तिथल्या’ मराठी माणसांबरोबरच आहे. किती कठीण होऊन बसलंय ते लक्षात येतं. वेलणकरांच्या परिश्रमांना एका अर्थानं ती पावतीच आहे.
-प्रकाश अकोलकर ...Read more
- DAINIK LOKSATTA 10-08-2007
रिटर्न गिफ्ट …
एका मराठी पुस्तकाचा सध्या अमेरिका-कॅनडात प्रचंड बोलबाला आहे. प्रत्येक अमेरिकन, कॅनेडिअन मराठी घरात हे पुस्तक मनोभावे वाचलं जातयं. कारण हे पुस्तक ‘त्याचं’ आहे. त्यांच्या स्थलांतराच्या कहाण्या सांगणारं आहे. चार दशकांपूर्वी महासागर ओलांडन उत्तर अमेरिकेत गेलेल्या मराठी माणसांच्या देशांतराचं सविस्तर वर्णन करणारं हे छान पुस्तक. अपर्णा वेलणकरने लिहिलेलं आणि मेहता प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं – फॉर हिअर, ऑर टू गो?’ बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या सिअॅटल अधिवेशानात हे जाडजूड पुस्तक प्रसिद्ध झालं. हे पुस्तक बीएमएम स्पॉन्सर्ड असल्याचंही तिथे बोललं जात होतं.
इथे या पुस्तकाचा अजून फार बोलवाला नाही तर कुजबूज जोरात आहे. विशेषत: साहित्य वर्तुळात त्यातील काही पानं एकमेकांना चवीने वाचून दाखवली जाताहेत. अमेरिकेतील मराठी कुटुंबाचा यथेच्छ पाहुणचार उपभोगून वर तिथल्या जीवनाचं ‘एकरंगी’ चित्रण करण्याचा ‘लेखी अपराध’ काही मराठी लेखकांनी केला होता. अजूनही त्या जखमा भळभळताहेत. रमेश मंत्रींनी दर्यापारच्या सहोदरांशी गप्पा मारून त्यांच्या जीवनाबद्दल न लिहिता गोऱ्या अमेरिकन पोरींची चावट वर्णन. तिथल्या सेक्स शोची आंबट वर्णन असं रंगेल चित्रण केलं, त्याचा संताप तिथले मराठी लोक कसा व्यक्त करतात हे फारच बोल्ड वाक्यात लेखिकेने मांडलंय.
सुभाष भेंडे यांच्या ‘गड्या आपुला गाव बरा’मध्ये काढलेल्या निष्कर्षाचाही समाचार या पुस्तकात घेतला गेलाय. अमेरिकेचा ‘निदर्य, खुनशी, एककल्ली आणि चक्रम’ असा भेंडे यांनी केलेला उल्लेख त्या मराठी लोकांना फारच डाचला होता. बाळ सामंत यांच्या ‘अमेरिकेतील मराठी माणसं : कथा आणि व्यथा’ या लेखातील टीकाही त्या मंडळींना फारच झोंबली होती. या तिन्ही लेखकांबद्दलचा अमेरिकन मराठी माणसांचा संताप लेखिकेने या पुस्तकात तितक्याच तीव्रतेने शब्दबद्ध केलाय – अगदी त्या मराठीजनांच्या फणकाऱ्यांसह! पुलंनीही असं ‘लेखी पाप’ केलं होतं, पण त्याचं परिमार्जन करण्याची संधी त्यांना बीएमएमच्या एका अधिवेशनात मिळाली आणि त्यात त्यांनी स्वत:ची चूक पद्धतशीर निस्तरलीही. ते भाग्य या बाकीच्या तीन लेखकांना कुठलं मिळायला? एव्हाना विस्मृतीतही गेलेले त्यांचे शब्द असे या पुस्तकातून रिटर्न गिफ्टच्या रूपाने पुनश्च जागे झाले.
बाकी या पुस्तकात तिथल्या मराठीजनांच्या जगण्याचं, आव्हानाचं, भावभावनाचं मनस्वी आणि वास्तवपूर्ण चित्रण आहे. पण सध्या मराठी सारस्वतांत कुजबूज होतेय या चार पानांची! ...Read more