THE GUNS OF NAVARONE by Alistair MacLean

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE GUNS OF NAVARONE
 • Availability : Available
 • ISBN : 9788184989571
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 328
 • Language : Translated into Marathi
 • Category : Fiction
 • e-Book AMAZON
 • e-Book GOOGLE PLAY
Quantity
Keith Mallory, a mountain climber from New Zealand, must infiltrate the Aegean island of Navarone, and destroy the guns on the German fortress there, in order to save the lives of 1,200 British soldiers. He gets a team together, boards a small craft, and heads to Navarone. On the way there, his small ship is nearly destroyed in a storm, and he then must climb a 400 foot sheer cliff in the middle of the storm. In the process, they lose all their food, and one of their team members breaks his leg. The next section of the book describes their working their way over to the other side of the island of Navarone, while dodging German patrols, and nursing their wounded comrade. They meet up with the resistance movemment on Navarone, but the Germans keep on their trail. They soon find out that one of the resistance men was giving them away and have nearly half their team captured. They break them out and blow up the guns, and then are able to escape onto a waiting British submarine
दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले ?
Keywords
Customer Reviews
 • Rating StarMAHARASHTRA TIMES 27-03

  खिळवून ठेवणारी युद्धकथा... युद्धकथा, साहसकथा यांकडे वाचकांचा कामयच मोठा ओढा राहिलेला आहे, मग तो पाश्चात्त्य वाचक असो वा भारतीय. इंग्रजी वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या युद्धकथा लेखकाची ‘द गन्स ऑफ नॅव्हारन’ ही कादंबरी.’ दुसऱ्या महायु्धातील एका काल्पनिक लढाईवर आधारलेली ही इंग्रजी कादंबरी वेगवान कथानक, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी वर्णनात्मक शैली आणि लष्करी डावपेचांचे रंजक तपशील, यांमुळे लोकप्रिय ठरली होती. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंरीवर साठीच्या दशकात प्रदर्शित झालेला त्याच नावाचा चित्रपटही अफाट यशस्वी ठरला होता. अशा या वेगवेगळ्या माध्यमात पसंती मिळवलेल्या कथानकाचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच खिळवून ठेवणारा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत भूमध्य समुद्रातील एका बेटावर अडकून पडलेल्या बाराशे ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असलेल्या नॅव्हारन नामक बेटावरच्या अजस्त्र तोफा नष्ट करण्याची, विमाने आणि आरमाराच्या ताफ्यांना प्रयत्नांनी न जमलेली जबाबदारी कॅप्टन कीथ मॅलरी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडते. खिळखिळ्या बोटीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास समुद्रातील वादळ, नॅव्हारन बेटावर पोहोचल्यावर सरळसोट उभा कडा, हाडे गोठवणारी थंडी, जायबंदी झालेला सहकारी अशा सगळ्या संकटांच्या मालिका घेऊन येतो. अधूनमधून भेटणाऱ्या शत्रू सैनिकांना कधी आपल्या वेशांतराने चकवत तर कधी लष्करी सराईतपणे दोन हात करत आपल्या लक्ष्याच्या, तोफांच्या दिशेने ही तुकडी मार्गक्रमण करते, हा सगळा प्रवास अत्यंत रोमांचक, वेगवान आहे. लेखक मॅक्लीन यांनी स्वत: काही वर्षे नौदलातील कामाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे कथेत उतरलेल्या बारीकसारीक तपशिलांमुळे हा थरार वाढत जातो. कथा पुढे सरकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भौगोलिक प्रदेशाचे वर्णन एवढे बारकाईने आले आहे की, नकाशासह तेथील समुद्र, बेटे, किल्ला, गुहा आदी तपशील चित्रासारखे डोळ्यापुढे उतरत जातात. या गुप्त मोहिमेचा नेता न्यूझीलंडचा गिर्यारोहक कॅप्टन मॅलरी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा ग्रीक अँड्रिया, अमेरिकन धूर्त-हिकमती मिलर, अनुनभवी-कोवळा स्टीव्हन्स, तंत्रज्ञ ब्राऊन आणि त्यांना नॅव्हारनमध्ये भेटणारे लुकी, पनायीस या सर्वांच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाय, युद्धकथा असली, तरी रक्तपाताची भडक वर्णने नसल्याने कादंबरी रक्तरंजित होत नाही. मॅक्लीन यांच्या युद्धकथेचा सर्व भर सहज वर्णन, खिळवून ठेवणारी शैली यावर आहे. हा सर्व थरार मराठी अनुवादातही तितक्याच सहजपणे उतरला आहे. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या अनेक कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केल्या आहेत. या मालिकेतील ही नवीन कादंबरी युद्धकथाप्रेमींच्या निश्चितच पसंतीस उतरेल, अशी आहे. ...Read more

 • Rating StarKIRAN BORKAR 16.03.17

  1961 साली प्रदर्शित झालेला" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या थकाची नियुक्ती होते . खैसर बेटाजवळ जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते . अतिशय थरारक अशी कादंबरी . ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

  दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन आणि इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावर चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी’ यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 13-03-2016

  मनाची पकड घेणारी कादंबरी… गन्स ऑफ नॅव्हारन ही मुळातील अ‍ॅरिस्टर मॅक्लिन यांची कादंबरी. ते स्वत: दुसऱ्या महायुद्धात होते. त्यावेळी ब्रिटिश नौदलामध्ये आलेल्या अनुभवांवरून कादंबरीची रचना केली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा अनुवादही प्रभावीरीतीने केला आहे.नॅव्हारन बेटावरील किल्ल्याच्या बुरुजावर दोन तोफा जर्मनांनी बसविल्या होत्या. त्या तोफा चारशेहे फूट उंचीच्या पुढे आलेल्या सुळक्यावर बसविल्याने त्यांना महत्त्व आले होते. भूमध्य समुद्रात खेरोस नावाच्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक होते. त्यांना सोडवायचे तर नॅव्हरन बेटावरील तोफांचा अडथळा होता. अशा मोक्याच्या ठिकाणी रडारयुक्त तंत्रांनी समृद्ध या तोफा जर्मनांनी अशा जागेवर बसविल्या होत्या की समुद्रमार्गातून शत्रूच्या बोटी जाऊच शकत नव्हत्या. या तोफा नष्ट करण्यासाठी मोजक्या माणसांची एक तुकडी मागील बाजूने कड्यावर जाऊन पोचते व अनेक संकटांना तोंड देत त्या तोफा नष्ट करून समुद्रमार्ग निर्वेध करते. हे कथानक मॅक्लिन यांनी या कादंबरीत रंगविले आहं. रविवारपासून बुधवारपर्यंतच्या चार दिवसांतील दोस्त सैन्यातील पथकाचा पराक्रम, त्याची दिनचर्या, त्या अधिकाऱ्यांचे संवाद यांचे चित्रण या कादंबरीत आहे. ३२० पृष्ठांच्या या कादंबरीत नाचगाणी, प्रणय प्रसंग, बाष्कळ विनोद, वेगवेगळ्या शहरांचे छायाचित्रण यांना अजिबात स्थान न देता केवळ साहसदृश्ये रंगवून मॅकलीन यांनी या कादंबरीची रचना केली. कथाकार किंवा कादंबरीकार कितीही हुशार असला तरी त्याला पटकथा लिहिणे जमेल असे नाही. यासाठी चित्रपट कंपनीमध्ये पटकथा विभाग हा वेगळाच असून पटकथेचे तांत्रिक ज्ञान असणारे लेखक त्यामध्ये असतात. त्यामुळे चित्रपट लक्षात घेऊन पटकथेवरती संस्कार होतात. अशोक पाध्ये यांनी गो. नि. दांडेकरांच्या साहसकथेवर आधारित चित्रपट न निघाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या कथेमध्ये एक डोंबरी कुटुंब महाकाय तोफ निकामी करते असे दाखविले आहे. पण चित्रपटनिर्मितीत घातलेला पैसा वसूल होण्याची खात्री निर्मात्यात नसल्याने असे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत दिसून येत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. या कादंबरीचे सामर्थ्य पाश्चात्य चित्रपटसृष्टीला पटल्याने त्यावर चित्रपट झाला व तोही विलक्षण गाजला. बेळगावला त्यावेळी असणाऱ्या श्रीकृष्ण टॉकीजमध्ये पाश्चात्य युद्धपटांची मांदियाळी होती, आता किर्लोस्कर रोडला जे टॉकीज होते असे सांगावे लागते. त्या ठिकाणी आता रेडिमेड कपड्याची दुकाने झाली आहेत. ‘द ग्रेट एस्केप’, ‘टु हेल अँड बॅक’, ‘गन्स ऑफ नॅव्हारन’, ‘द लाँगेस्ट डे’ सारखे युद्धपट पाहिल्यावर मला असे वाटले की युद्धपट बनवावेत तर त्यांनीच. पटकथेपासून नेपथ्य, पात्रांची निवड, प्रसंग प्रभावी होण्यासाठी केलेले छायाचित्रण इ.गोष्टींचा विचार त्यामध्ये झाल्याने आपण सिनेमा न पाहता प्रत्यक्ष युद्धच पाहात आहोत, असा प्रेक्षकांचा समज होण्यात आश्चर्य नसे. रामायण, महाभारतावर आधारित टीव्हीवर मालिका दाखविल्या गेल्या तरी हा तपशीलवार विचार त्यावर झालेला दिसत नाही. या मालिका पाहणे हे पुण्यकृत्य ही भावनाच त्यामागे होती. नॅव्हारनच्या तोफा नष्ट करण्याची मोहीम फक्त ४ दिवसांची आहे. त्यासाठी केवळ ५ जणांची टीम, पराक्रम करते. या मोहिमेचा निर्माता ब्रिटिश नौदालातील विध्वंसक मोहिमांचा प्रमुख कॅप्टन जेम्स जेन्सन हा होता. शत्रूला फसविणे, चकवा देणे, गोंधळात टाकणे, वेशांतर यात तो प्रवीण असल्याने त्याच्या निकटच्या सहकाऱ्यांच्याही लक्षात त्याचे वेशांतर येत नसे. कॅप्टन कीथ मॅलरी याच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट अन्डी स्टीव्हन्स, सैन्यात ४० वर्षे काढलेला डस्टी मिलर, कॅसी ब्राऊन आणि लेफ्टनंट अँड्रिया ही ग्रीक व्यक्ती यांचे मिळून हे पथक होते. त्यातील प्रत्येक सदस्य हा वेगवेगळ्या कामात प्रवीण होता. याआधी नॅव्हरनवर पॅराशूटद्धारे उतरण्याचे दोन प्रयत्न विफल झाले होते. त्यापासून बोध घेऊन जेन्सने मोठ्या हुषारीने ही मोहीम बनविली होती. जर्मन शत्रूच्या लक्षात येऊ नये म्हणून अ‍ॅलेक्सपासून वीस मैल अंतरावरून (सायप्रस) लांबचा पल्ला घेऊन कॅस्टेलरोसोपर्यंत विमानप्रवास केल्यानंतर या पथकाने मोटर बोटीने प्रवास केला. त्यानंतर जुन्यापुराण्या दोन डोलकाठ्या असणाऱ्या रेगिऑन नौकेतून नॅव्हारन बेटापर्यंत या पथकाचा प्रवास झाला आहे. हायकमांड केवळ किल्ल्यातला राजा कोण असावा याचाच खेळ खेळत असते. याठिकाणी प्याद्यांना महत्त्व नाही. अशी हजारो प्यादी त्यांना उपलब्ध असतात. फक्त या खेळातील काही प्यादी सरकवण्याची कृती महत्त्वाची, असा जेन्सनने हायकमांडबद्दल मारलेला शेरा या प्रसंगाची आठवण करून देतो. संबंध कादंबरीमध्ये लेखकाने साध्या भाषेचा वापर केल्याने अर्धशिक्षित वाचकालाही कथानक उत्तमरितीने समजते. नॅव्हारनपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात मॅक्लीन यांनी साध्या भाषेसह कथानक आणि पात्रांचे संवाद यात विलक्षण प्रभावी व सलग वेगाची जाण ठेवल्याने वाचक कथानकात पूर्णपणे बुडून जातो. इव्हिनिंग स्टँडर्डसारख्या वृत्तपत्रानेही ‘खिळवून ठेवणारे आणि वेगवान कथानक, ताण निर्माण करणारी आणि तपशीलातून ‘अ‍ॅक्शन’ निर्माण करणारी शैली यामुळे ही कादंबरी वाचनीय होते,’ अशी तिची भलावण केली आहे. ‘बॅटल’ आणि ‘वॉर’ यामध्ये फरक आहे. स्थानिक स्वरुपातील बॅटल मोठी असली तरी तिला लढाई म्हणतात. वॉरमध्ये युद्ध आघाडी विस्तीर्ण असते. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या लढायांतून अंतिम विजय किंवा पराभव यांचा निष्कर्ष काढला जातो. म्हणून त्याला युद्ध म्हणायचे. व्हर्सायच्या तहातून दोस्त राष्ट्रांनी जर्मनी अक्षरश: ओरबाडून काढला होता अशा अवसथेत हिटलरने सहासात वर्षे विस्तीर्ण आघाड्यांवर होणरे तसेच अधुनिक तंत्रज्ञानावर आधारित (अर्थात त्यावेळच्या) व तीन दलांनी युक्त अशा सैन्याचे व्यवस्थापन कसे केले असेल ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी दोस्तांचा विजय झाल्याने टीकास्तुती करण्याचा सर्व अधिकार त्यांना प्राप्त झाला व जर्मनी, इटली तसेच जपानवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नसली तरी साम्राज्यावर सूर्य न मावळण्याची प्रौढी मारणाऱ्या ब्रिटिश सत्तेबरोबर अमेरिका, रशिया व फ्रान्स सारख्या देशांना दीर्घकाळ झुंझवत ठेवणे व युद्धात अनेकवेळा ‘हाडे मोडण्याची परिस्थिती’ ब्रिटनवर आणणाऱ्या जर्मनीला कसे यश आले असेल या विचाराने मन खरोखर थक्क होते. युद्धविषयक कादंबऱ्यांचे व चित्रपट लोकप्रिय होण्यामागे शत्रूही तेवढाच सामर्थ्यवान होता, हे कोणालाही विसरता येणार नाही. अत्यंत कार्यक्षम असणाऱ्या जर्मनांचे लक्ष चुकवून हे पथक तोफांपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले तरी कोण्यत्याही वेळी आपण सापडू व आपली मोहीम अयशस्वी होईल याची धाकधूक पथकाच्या मनात शेवटपर्यंत आहे. खेरोसा बेटावरील १२०० ब्रिटिश सैनिकांना वाचविण्यासाठी ‘सरदार’ या विनाशिकेची योजना करण्यात आली होती. त्या विनाशिकेवर जर्मन गनर तोफ डागणार ही गोष्ट अटळ होती. त्यासाठी कोठारातून तोफगोळे लिफ्टने वर आणले जाणार ही अटकळ पथकाला होती. त्यामुळे लिफ्टची चाके इलेक्ट्रिक यंत्रणा सुरू करेल ती वर येताना स्फोट घडविणाऱ्या दोन उघड्या वायर्स जवळ आल्या व त्यापासून अर्धाइंच अंतरावर लिफ्टची चाके त्यावरून गेली की महास्फोट होण्याची यंत्रणा त्या पथकाने केली होती. त्यानुसार महास्फोट होऊन ‘हजारो टन’ वजनाचे खडक व महाकाय दोन तोफा खाली कोसळल्याने त्यांचे उद्दीष्ट साध्य झाले असे कथानक या कादंबरीत आहे. म्हणून तिला ‘गन्स ऑफ नॅव्हारन’ असे नाव दिलेले आढळते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

DHANA
DHANA by Ganesh Maanugade Rating Star
DAINIK SAKAL 19-08-2018

उत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more

SANVADU ANUVADU
SANVADU ANUVADU by Uma Kulkarni Rating Star
MAHARASHTRA TIMES १९-८-१८

अनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, "आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला." पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल! ... ...Read more