Darshan Jadhavआज रणजित देसाई यांनी लिहलेली राधेय कादंबरी वाचून पूर्ण झाली. आयुष्यात कोणती कादंबरी आवडली असेल तर ती राधेय. धर्म आणि अधर्म यांच्या कात्रीत सापडलेला कर्ण वाचायला मिळाला.मैत्रीसाठी मृत्यूलाही तळहातावर ठेवणारा, दुर्योधनासारख्या बलाढय मित्राला जो अधर्माचया बाजूने असतांना सुद्धा शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहीन अस वचन देणारा, कोणताही विचार न करता कवचकुंडले काढून देणारा, मृत्यूच कोणतंही भय न बाळगणारा.. मृत्यूलाही मिठी मारणारा. नेहमी वचनबद्ध असणारा.. ३३ कोटी देवांना सुद्धा ज्याचा अभिमान, सुर्यासारखं प्रखर तेज, आपल्या दातृत्वान समस्त देवसभा ज्याचा आदर करायचे असा तो महारथी कर्ण.बालपणापासून ज्याचा सुतपुत्र म्हणून उल्लेख झाला.सतत अपमान, पितामह भीष्म विदुर ,श्रीकृष्ण यांना त्याच सत्य माहीत असून देखील हा कौतेय शेवटपर्यंत सुतपुत्रच राहिला. युद्धात माता कुंतीला दिलेल्या वचनानुसार आपल्या पाचही भावंडांना अभय देणारा तो जेष्ठ कौतेय. युद्धाच्या शेवटी चिखलात रुतलेल्या रथाच चाक काढण्यात उतरलेल्या कर्णाला कृष्णाच्या कुटणीतीची आठवण जागोजागी झाली.आपल्या तीक्ष्ण बाणांनी घायाळ केलेल्या आपल्या अर्जुनाला बघून माता कुंतीला दिलेलं वचन आठवलं .. आणि मग मनात आलं माते तुला तुझी पाच मुलंच मिळतील. सहावा कधी पाचवा होणार नाही.. संतापाने उठलेल्या अर्जुनाने धनुष्याची प्रत्यंचा खेचली. अर्जुनाचा नेम चुकू नये म्हणून कर्णाने आपली रुंद छाती कलती केली. खर तर कर्णाचा वध कधी झालाच नव्हता. कर्णाने ते दिलेलं दान होत..शेवट हा अश्रू टिपणारा होता. शेवटपर्यंत मित्रता आणि वचनबद्द असणाऱ्या या दानविराला, अंगराज कर्ण, कुरु साम्राज्याच्या सेनापतीला, जेष्ठ कौतेय, राधेय कर्णाला ही प्रस्तावना समर्पित .....
-दर्शन जाधव ...Read more
योगिता बुटाला ybsworldofbooks.wordpress.com
@YBook on Facebook
राधेय -
लेखक श्री. रणजित देसाई
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रथमावृत्ती : सन १९७३
पृष्ठसंख्या : २६९
“मी योद्धा आहे.
जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही.
जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध
अखेरच्या क्षणांपर्यंत मला चालवलं पाहिजे.
त्यातच माझ्या जीवनाचं
यश सामावलं आहे.”
– इति ‘राधेय’, ‘सूतपुत्र’, ‘अंगराज’ कर्ण.
‘राधेय’ म्हणजे कृष्णाच्या राधेसंबंधित नसून, नववाचकांची गफलत होऊ शकते. सारथी अधिरथ व त्याची पत्नी राधा यांनी पुत्रवत सांभाळलेल्या कर्णाने तिच्या सन्मानार्थ ‘राधेय’ हे नाव धारण केले. त्याला नेहमी ‘सूतपुत्र’ म्हणजे एक सर्वसामान्य सारथ्याचा मुलगा असे हिणवले जाई. त्यामुळे, पांडवांसमोर कौरवांना ‘अंधपुत्र’ असे म्हणून जशी अपमानास्पद वागणूक मिळते व या भावनेतून निर्माण झालेली वेदना समजून घेऊन, पांडवांना शह द्यायला दुर्योधनाने पांडवांच्या पराक्रमाच्या तोडीसतोड रथीमहारथी वीर कर्णाला ‘अंग’ या देशाचे राजेपद बहाल केले तर कर्णाला स्वतःहून ‘अंगराज’ ही पदवी प्रदान केली. पण याच गोष्टींमुळे कर्णाच्या आयुष्याला दिशा मिळाली की त्याची वाताहत झाली, हे लेखक वाचकांवर सोडतो.
प्रत्येक माणसाच्या मनात एक कर्ण असतो हे सत्य सांगून लेखक कादंबरीला सुरवात करतो आणि शेवटी, तिथेच वाचकांना आणून सोडतो.
काही प्रसंगी, वर्णनात भाषेची पकड सैल होत जाते तर अचानक घट्ट होत जाते. काही प्रसंग तपशिलाने खुलवणे शक्य होते, जसे लहानमोठी युद्धे व त्यातील वीर, साहसी कर्णाचे पराक्रम. तर, द्रौपदी-विटंबना व वस्त्रहरणाचा वेदनादायी प्रसंग कर्णाबद्दल चीड निर्माण करतो, जरी त्याने कितीही त्याची बाजू मांडली तरी. अर्जुनासह झालेले अंतिम निर्णायक युद्ध डोळ्यासमोर उभे राहते. कर्णाची पत्नी वृषालीसंदर्भातील माहितीमधे थोडी तफावत (उदाहरणार्थ, ती प्रथम की द्वितीय पत्नी याबाबत) ‘राधेय’ आणि ‘मृत्युंजय’ या कर्णविषयक दोन्ही कादंबर्यांमधे जाणवते. पण दोघांचे एकमेकांवरील निस्सीम प्रेम आणि परस्परांवरील विश्वास, ही कर्णाची जमेची बाजू आहे. शेवटपर्यंत प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार कर्णाला वापरून घेतले, हे त्याला उमगत जाते व त्यातून निर्माण झालेला उबग वाचकांच्या मनातही निर्माण होतो, हे या कादंबरीच्या भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. आपल्याच माणसांच्या भल्यासाठी आपल्याच माणसांशी लढाई करावी लागली, तर जिंकूनही हरणे किंवा त्यांच्या भल्यासाठी हरणे या दोन्ही गोष्टी किती अपमान, अवहेलना, तिरस्कार व वेदना पदरी पाडून घेण्यासारखे आहे, हे कादंबरी वाचताना कर्णासह वाचकांच्या मनाला पोखरत जाते आणि वाचक कादंबरीसह मनाने जोडले जातात. तत्वज्ञानयुक्त अनेक विचार वाचताना थांबून विचार करायला लावणारी वाक्ये या कादंबरीचे सौंदर्य आहेत, जसे की “माणसानं एवढं किर्तीवंत व्हावं की, त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं ती जागा व्यापण्याचं धाडस कुणाला होऊ नये” किंवा “जिंकल्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो”.
‘राधेय’ या कादंबरीच्या नव्या आवृत्तीचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ श्री. सुभाष अवचट यांनी आपल्या कलेतून निर्माण केले असून, त्यावर नजर फिरवताना त्यातील बारकावे लक्षात येतात आणि ‘कर्ण’ ही महाभारतातील व्यक्तिरेखा दिसते तितकी समजायला सोपी नाही हे जाणवते. तसेच, थेट सूर्यनारायणाकडून दैवी कवचकुंडले जन्मजात प्राप्त झालेल्या या माणसाचे पायही इतरांसारखे मातीचेच आहेत, ही बाजूदेखील या कादंबरीतून वाचकांसमोर मांडली आहे. कर्णाचे जगण्याचे प्रयोजन हे त्याच्या जन्मविषयक रहस्याभोवती फिरत राहते. मात्र हे सत्य उघडल्यानंतर कर्णाचे जगण्याचे प्रयोजनच नष्ट होईल, त्याचे आवेशपूर्ण लढाईचे अवसान गळून पडेल, या हेतूने कृष्ण व कुंती यांनी जाणीवपूर्वक कौरव-पांडव अंतिम युद्धापूर्वी सांगून पांडव सुरक्षित ठेवले, ही खंत त्याला सलत राहते. याच हेतूने खुद्द इंद्रदेव त्याच्याकडे कवचकुंडले दान म्हणून मागतो, आणि माता कुंती याचक म्हणून ‘माझे पाच पुत्र वाचव’ असे दान मागते, ते देखील तो मान्य करतो.
कर्णाचे अनेक गुण-अवगुण, अहंकार, गर्व, पराक्रमाचा सार्थ अभिमान, असामान्य दातृत्व, स्वतःचा जन्मविषयक सत्याचा सातत्यानं शोध व त्यातून कुरुक्षेत्रावर होऊ घातलेल्या युद्धाच्या तोंडावर अचानक वर्मावर घाला घातल्याप्रमाणे जन्मविषयक सत्य जाणीवपूर्वक सामोरे आणले जाणे, वास्तवाची जाणीव होताच अवसानच गळून पडणे, आप्तस्वकीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी विजयी असूनही पराजयी होणे, सर्व काही असूनही काहीच हाती न उरणे किती गुंतागुंत निर्माण करणारे आहे हे कळते…. पदोपदी अपमान, अवहेलना, दुःख, वेदना, साहस, प्रेम, स्नेह, मैत्री, स्पष्टवक्तेपणा, असे अनेक कंगोरे पानोपानी उलगडत जातात. मोठा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेत, माता कुंतीला दान म्हणून दिलेले वचन पाळायला, लढणे शक्य असूनही मृत्यूला सामोरे जाणे, ही बाब दुर्योधनाला फसवणे नसून दुर्योधनाच्या निस्सीम मैत्रीत आणि माता कुंतीला दिलेल्या वचनाच्या कात्रीत सापडून तात्विक लढाईमधे जिंकणे की हरणे, हे सर्व लेखक वाचकांच्या पारड्यात टाकतात. या निर्णयामुळे कर्णावर लागत आलेला चुकीचा व खोटा ‘पळपुटेपणा’चा आरोप परत एकदा शेवटच्या निर्णायक क्षणी स्वतःहून सिद्ध करण्यासारखं झालं. या निर्णयामुळे कर्णाने आत्तापर्यंत अनेकदा अहंकारातून केलेल्या चुका व पापांचे प्रायश्चित्त घेणे असे तो मानतो, तरीही दुर्योधनाला सगळ्यात जवळचा मित्र म्हणून शेवटचे भेटण्यासाठी आणि त्याला सत्याची जाणीव देण्यासाठी अतिशय जखमी असूनही स्वतःचे प्राण जाण्यापासून रोखून धरणे, हे कोणत्याही संवेदनशील मनाला उद्विग्न करणारे आहे.
मराठी भाषाप्रेमींना आणि मनातील वेदना ठसठसत राहिलेल्य सर्वांना आपलासा वाटेल असा हा ‘राधेय’ वाचलाच पाहिजे, मात्र, ‘मृत्युंजय’ ही अधिक सखोल कादंबरी वाचण्यापूर्वी, दोन्हीची तुलना न करता, तरच खऱ्या अर्थाने ‘कर्ण’ ही व्यक्तिरेखा कुणा एका माणसाची नसून, पिढ्यानपिढ्या मानसिक द्वंद्व लढणार्या प्रत्येक माणसाची भावना आहे हे लक्षात येईल.
एकदा नक्की वाचा, श्री. रणजित देसाई लिखित ‘राधेय’!
माझे ‘राधेय’ या कादंबरीला स्टार रेटिंग्स : ४-स्टार्स ⭐⭐⭐⭐ ...Read more