Meghana Rairikarआज पुस्तक साखळीतला तिसरा दिवस, नेहमी तिसरी घंटा झाली की अद्भुत, गूढ, रहस्य डोळ्यसमोर येते, काहीतरी विलक्षण घडणार असे मन सांगते, अगदी एकाग्रतेने आपण पडद्याची चाहूल घेतो, तसेच कायम आपल्या विलक्षण शैलीने, वाचकांवर परिस्थिती, पात्रे आणि शब्दांचे गारुड घलणारे वाचकप्रिय लेखक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे गाजलेले पुस्तक निवडले आहे खेकडा
खेकडा कथासंग्रहात अकरा छोटया गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट गूढरम्य, थरार वाटणारी, काहीतरी वेगळी अनुभूती देणारी आहे. त्यांच्या गोष्टीत कमी पात्रे असतात, बघता बघता त्यातल्या कथानकात आपण गुंतून जातो, भीतीचा, रहस्याचा पगडा मनावर बसू लागतो आणि अतिशय वेगळाच धक्का बसून कथा संपते. त्यांच्या सगळ्याच गोष्टीत एक दृश्यमयता जाणवते, संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहते, काही दिवस झोप उडेल इतकी ताकद त्यांच्या लेखणीत जाणवते. त्यांचे सर्वच कथासंग्रह वाचनीय आहेत. त्यांची नावे, गहिरे पाणी, एक टोल वाजतायेत, रंगांधळा अशी लेखकांची वेगळी वाट सुचवणारी.मी ग्रंथालयात अगदी प्रतीक्षा यादीत नाव घालून एकापेक्षा एक मतकरींची पुस्तकं आणून वाचली आहेत. विलक्षण भीती, थरार आणि औत्सुक्य वाटून पुढे काय असे नेहमी त्यांच्या कथा वाचताना होते, कथा पुस्तकात आणि चलबिचल होणाऱ्या वाचकाच्या मनातही घडत असते. कधीतरी कॉलेज दिवसात वाचलेल्या या खेकड्याने अजूनही भयकथांची पकड आणि आवड कायम ठेवली आहे.
दुर्दैवाने गूढ, रहस्यमय अशा कोविडमुळेच या प्रतिभावंत लेखकाने आपला निरोप घेतला हा विचित्र योगायोग. साहित्यविश्वात वेगळ्या धाटणीच्या कथांनी वाचकांना समृद्ध करणाऱ्या मतकरींचे कृतज्ञ स्मरण ...Read more
Mrunal Joshiकाही काही लेखकांच्या साम्राज्यात मी गेलोच नव्हतो, का जावेसे वाटले नाही ह्या आणि तत्सम असल्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने काही काहीच उत्तर नसते. नसावे. घराच्या जवळ एक छोटे पण अत्यंत सुंदर असे वाचनालय आहे, तिथला सदस्य झालो, अनेक विविध विषयांवर पुस्तक तिथेवाचली, पण एक मोठे पुस्तक विश्व माझी वाट पाहत होते किंबहुना मीच त्या विश्वाची वाट पाहत होतो हे कटाक्षाने जाणवले. एका कोपऱ्यात सुमारे २२-२३ पुस्तकांची थपकी मारलेली दिसली, थोडा जवळ गेलो तर अक्षरशः अतोनात आनंद व्हावा असं माझं झालं. एक अतुलनीय लेखक, जितकी पुस्तके वाचली त्याहून काही वेगळी पुस्तके एक वेगळी शैली, कन्टेन्ट युक्त पुस्तकं म्हणजे एकच नाव आणि ते म्हणजे "रत्नाकर मतकरी", मनात फार काळापासून संपूर्णपणे मतकरी, एलकुंचवार, भाऊ पाध्ये, विलास सारंग, गौरी देशपांडे, नगरकर ह्या लेखकांना वाचावं असं वाटत होतं त्यातील पहिला टप्पा रत्नाकर मतकरी इतक्या लवकर वाचायला मिळावेत, त्यातून मी अनेक लेखकांचे विविध कथासंग्रह वाचले पण त्यातच एक सुंदर कथासंग्रह म्हणजे मतकरींच्या "खेकडा" हा कथासंग्रह आहे.
"खेकडा" कथासंग्रहात एकूण कथेचा गाभा, कथेत येणारे ट्विस्ट, पात्रांची निर्मिती आणि सर्वात महत्वाचा एकूण त्या कथेचा क्लायमॅक्स इतका जबरजस्त आहे ज्याला खरोखर तोड नाही, जवळ जवळ सर्वच कथेत "भय" हा मुख्य भाव आहे, आणि हेच भय वाचकाला वेळोवेळी दंश करत जाते, जिव्हारी लागत जातं, कथा वाचताना आपण त्यात अविरत गुंतत जातो, आणि एके ठिकाणी मतकरी आपल्याला त्यातून बिनबोभाट पणे बाहेर काढतात, खरं म्हणजे त्या वेळी मला लेखकावर भयंकर प्रेममयी राग येतो, तो यासाठी कि आपण मोठ्या हिम्मतीने त्या कथेच्या पात्रात रमलेले असताना कथेला ट्विस्ट करून आपल्याला त्यातून बाहेर का काढावे? आणि ते ही मोठ्या शिताफीने. इथे खरी लेखकाची शैलीचा कस लागतो, इतकी साधी - लाघवी भाषा, आणि सुंदर लिखाण शैली मतकरींची आहे. निर्विवाद.
कथासंग्रहात एकूण ११ कथांचा समावेश आहे - खेकडा, कुणास्तव कुणीतरी, अंतराय, कळकीचे बाळ, पावसातील पाहुणा, शाळेचा रस्ता, ती- मी आणि तो, निमाची निमा, एक विलक्षण आरसा, आल्बम, आणि तुमची गोष्ट. प्रत्येक कथा वेगळ्या उंचीवर घेऊन जाते, प्रत्येक कथेचा प्लॉट अत्यंत रेखीव - आखीव आणि तितकाच भयकारी.
शेवटल्या कथेत म्हणजेच "तुमची गोष्ट" ह्यात एक वाक्य आहे - "ही गोष्ट तुमची आहे, म्हणजे तुमच्या बाबतीत ही घडू शकेल अशी" आणि ह्या कथेचा शेवट आहे - "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली एक शक्यता सांगितलेली एवढेच". खरं म्हणजे हाच भाव मतकरींच्या प्रत्येक कथेत जाणवतो, कथेची सुरवात अतिशय लाघवी असते, सगळं काही गोडी - गुलाबीने चाललेलं असतं, कथा हळू हळू पुढे जाते, इथे आवर्जून सांगावेसे वाटते कि कथा आपोआप पुढे जाते तिला जबरजस्तीने पुढे ढकलावे नाही लागत आणि अचानक कथेच्या पात्रांसोबत आपल्याही गळ्याभोवती एक अदृश्य फासाचा स्पर्श होऊ लागतो, आपण त्यात गुरफटून जातो, आणि ह्यावेळी आपण त्या पात्राचे काय होणार ह्याचे मनोरे आपल्या मनात बांधू लागतो, हा प्रयोग हमखास फसतो, कारण मतकरींच्या "स्पेशल ट्विस्ट" पुढे कुठल्यातरी वळणावर आपली लपून वाट पाहत असतोच, आणि आपण कथेत त्यांच्या पात्रांसोबत गाफील अस्ताला मोठ्या शिताफीने त्यात आपण अडकतो.
सगळ्या कथा वाचल्यावर कुठेतरी मला एक छुपा स्त्रीवाद दिसला - जाणवला, तो स्त्रीवाद प्रत्येकाला जाणवेलच असेही नाही. प्रेयसीसाठी आपल्या खेकड्याप्रमाणे वावरणारी पोलियो ग्रस्त मुलीला मारणे किती जिकीरचे आहे हे खेकडा कथेत जाणवते, इथे आपल्याला प्रेयसीची चीड येते कारण आपण इथे आजाराला सहनशक्तीची कड ह्या भूमिकेतून पाहतो- ह्या कथेत प्रेयसी विरुद्ध मुलगी हे तुलनात्मक विश्लेषण फार वेगळे ठरते.
कुठल्यातरी मुलाला धरून भिकेला लावणे त्यातून त्याला अश्या जागी बसवणे जिथे एक म्हातारी धड मरत पण नाही धड जगत पण नाही त्यातून एक अनामिक हुरहूर त्या मुलाच्या मनात चाललेली, म्हातारी जगली पाहिजे कारण ती जगली तरच भिकेत पैसे जास्त मिळतील हा उद्देश्य, आणि मरताना म्हातारी एकदा डोळे उघडहून त्या मुलाकडे बघते आणि "कुणास्तव कुणीतरी" कथा इथे जिवंत होते.
आपल्या प्रेयसीच्या मरणानंतर तिच्या नवऱ्याच्या मनात मेलेल्या बायको विरुद्ध विष पेरणारा प्रियकर आणि मित्र ह्यात समाजातली विकृत माणसे कसे असतील हे "अंतराय" कथेत मांडले आहे, ही संपूर्ण कथा "पत्र फॉरमॅट" मध्ये पुढे सरकत जाते.
मला आवडलेली आणि अतिशय अंगावर येणारी कथा म्हणजे "कळकीचे बाळ" , बाळ नसणारी आईला ज्या वेळी बाळ होतं आणि अतिशय विकृत - बेढंगी बाळ निपजते, आणि नंतर तेच बाळ त्याच आईला मृत्यूच्या काळात कसे गडप करते ही कथा आपल्याला खिळवून तर ठेवतेच पण त्याच सोबत कथेचा वस्तुपाठ कसा असावा ह्याकडे मी आपले लक्ष निर्देशित करते.
इतिहासात एक जुन्या राजवटीत डोकावणारी "पावसातील पाहुणा" कथा अप्रतिम आहे.
टेलीपॅथी ह्या एका शास्त्राच्या आधारे "शाळेचा रस्ता" कथा खुलत जाते.
माणूस खून का करतो पासून सुरु झालेली "ती, मी आणि तो" अत्यंत छोटी कथा रंजकरित्या फुलात जाते.
लहानपणी मुलं सगळ्यात जास्त रमतात ते त्यांच्या बाहुली - गाडी यासम खेळण्यात, मुलांसोबत जसे आपण वागू तसे ते त्या खेळण्यांसोबत वागतात, बालमानास शास्त्र किती महत्वाचे आहे हे ह्या "निमाची निमा" ह्या कथेतून अधोरेखित होतं जाते, एक वेगळा प्लॉट असलेली आणि वेगळी उंची गाठलेली ही कथा.
अपंग मुलीच्या वैरण आयुष्यात उदासीनता काठोकाठ भरलेली असताना त्या उदासीनतेचे जिव्हार आणि दंश तिच्या अभिनेत्री बहिणीला कमी करता येत नाही, समोर एक वेगळा आरसा असताना आपण किती सुंदर आहोत हे अपंग मुलीला जाणवते ती हळू हळू सुधारते आणि एकाएकी कोसळून पडते त्यावेळी जाणवते कि आरसा दुभंगला आहे.
जुन्या विक्रम वेताळाच्या कथेप्रमाणे आल्बम ही कथा आहे, एकाच घरातले माणसे भराभर अपॉईनमेंट असल्या सारखी मरू लागली.
शेवटी साधारण आयुष्य चाल-ढकल करणाऱ्यांच्या आयुष्यात खुनांची आणि गुन्ह्यांची मालिका रचली जावी, इतकी क्रूर थट्टा आयुष्याने का करवून घ्यावी...शेवटी काय "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली एक शक्यता सांगितलेली एवढेच".
एक अतिशय सुंदर असा मेहता पब्लिकेशन ने काढलेला सिद्धहस्त असलेले लेखक रत्नाकर मतकरी यांचा "खेकडा" कथासंग्रह आवर्जून वाचावा.
मृणाल जोशी
२७.०३.२०२० ...Read more