NEWSPAPER REVIEWमनाचे कंगोरे उलगडणाऱ्या कथा…
आहार, निद्रा, भय, मैथुन या माणसाच्या आदिम प्रेरणा आहेत. या प्रेरणा रोजच्या व्यवहारामधून, मानवी आचरणामधून व्यक्त होतात, तेव्हा त्यांचे एकेरी असणे, सुट्यासुट्या स्वरुपात नसते. यातल्या प्रत्येक प्रेरणेच्या व्यक्त होण्याशी मातले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे षड्विकार चिकटलेले असतात म्हणूनच मूळच्या मानवी आदिम प्रेरणा आणि सनातन म्हणता येतील, असे मानवी षड्विकार यांच्या सरमिसळीतून आणि सतत गतिमान, बदलणाऱ्या स्वरूपामुळे माणसाचा स्वभाव अनाकलनीय होतो. अनेकदा माणसाचे वागणे - अतर्क्यतेच्या पातळीवर जाते. रत्नाकर मतकरी यांच्या `गूढकथा` या मनोविश्लेषणात्मक आहेत म्हणूनच त्या कथांमध्ये मानवी मनात खोलवर दडून बसलेले `भय` आणि माणसाच्या आचरण, व्यवहारातून व्यक्त होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रेरणा, प्रवृत्तींचा मिलाफ झालेला आढळतो. म्हणूनच या भयकथा केवळ रहस्यमय, मनोरंजन करणाऱ्या, भीतीने थरकाप उडविणाऱ्या किंवा सुलभ अशा धक्कातंत्राचा उपयोग करुन रहस्यभेद करतात, असे होत नाही. मतकरींच्या गूढकथा संग्रहाची दुसरी आवृत्ती आता प्रकाशित झाली आहे. माणसाच्या मनात क्षणभर चमकून जाणारी अनामिक भीती, (उगीचच) चुकचुकणारी शंकेची पाल, बऱ्याचदा स्वत:लाही न उमगणारे भास-आभास यांना मतकरींच्या गूढकथेस खास स्थान असते. हे सारे घटक उठावदार होऊन त्यांच्या कथेमध्ये स्पष्ट होतात. एरवी आपल्याला अधूनमधून जाणवणाऱ्या आपल्याच मनाच्या खेळांकडे काळजीपूर्वक पाहिल्यास जाणवणाऱ्या संभाव्य शक्यतांना रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून कथारूप प्राप्त होते. म्हणूनच या कथांचा शेवट, म्हणूनच या कथांची सुरुवात, संपूर्ण कथेतील वातावरण आणि कथेची अखेर यांच्यामध्ये परस्परांना छेद देणारे, परस्परविरोधी असे काहीतरी घडते, त्यामुळेच या भयकथांचा शेवट भडक किंवा बटबटीत अशा प्रसंगाने किंवा तद्दन फिल्मी वाटावा असा नाटकी किंवा रंजक प्रकारचा नसतो. आपल्या मनात क्षणार्धात चमकून जाणाऱ्या चित्रविचित्र भावना, विचार, खोलवर दडलेले असुरक्षित असल्याचे भय आणि त्यातून मनात बराच काळ रेंगाळत राहणारी भीतीची भावना, भासआभास आणि या साऱ्यांनाच लगटून येणारे मनातले नाना विचार यांच्यामधून कथेतला घटनाक्रम उलगडत जातो. बऱ्याचदा आपल्या मनातले विचार, भावना आपल्याला चकवतात. त्यांचे स्वरुप आपल्याला नीट स्पष्ट होते. कालांतराने आपल्या विशिष्ट प्रसंगी आपल्या मनात आले, त्या त्यावेळचे विचार, विकार, भावना, त्यामागचे कारण स्वच्छ प्रकारे समजतात. रत्नाकर मतकरींच्या भयकथेत मानवी मनाला लागणारे चकवे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेले दिसतात.
रत्नाकर मतकरींच्या भयकथांची वैशिष्ट्यपूर्णता लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या काही कथांची उदाहरणे देणे आवश्यक आहे, असे वाटते. `हडळ` या कथेत खूप दारिद्र्यात जगणारी आई, तिचा आजारग्रस्त, मरणपंथाला लागलेला मुलगा, यांचे चित्रण येते. दु:खी आईचे असहायतेच्या पार्श्वभूमीवर उमटणारे वात्सल्य, मृत्यूनंतर मुलाला अग्नी दिला पाहिजे, त्यासाठी ही आई दुसऱ्या जळत्या चितेतील लाकडे चोरते. बघणारे लोक तिला हडळ समजतात. `हडळ इलीहा` असा एकच कल्लोळ गावात उठतो. चोरी करून मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी चोरी करून लाकडे गोळा करणारी आई घरी येते. पाहते तर तिचा मुलगा उठून बसलाय आणि तिला `आये` म्हणून हाका मारतोय. `हडळ आसंच रे मी - तुजी आये न्हई,` असे म्हणून ही आई रडू लागते. एकाच वेळी कारुण्य, भीती, वात्सल्य, भास-आभास, चकवणारे सत्य, वास्तव अशा अनेक भावभावनांची संमिश्र अभिव्यक्ती या कथेमध्ये झालेली दिसते म्हणून या कथांना `मनोविश्लेषणात्मक भयकथा आणि अर्थातच रंजक नव्हेत अशा कथा असे म्हणावे लागेल. `फँटास्टिक` या कथेत `स्टोरी रायटर` आणि मादक अभिनेत्री `राणी` लालजीला ठार करू पाहतात; पण तो सरणावर जिवंत होतो. इथे आपल्याला वाटते, चला दचकायला लावणारी घटना घडली, आपल्याला धक्का बसलाय, इथे कथा संपलीच की! पण तसे घडत नाही. लालजी वाचला का मेला, हा प्रश्न बाकी उरतोच. याचे उत्तर लेखक वाचकांवर सोपवतो. त्याने हे सारे समजून घ्यावे.
आपल्याला स्वत:च्या आणि इतरांच्या संदर्भात घडलेल्या सगळ्या सकारात्मक मानवी भावना, प्रेरणा समजावून घ्यायला, पुन्हा पुन्हा आठवायला आवडते, पण भीती, हिंसा, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार, आदी नकारात्मक, त्रासदायक, दु:ख देणाऱ्या त्रासदायक भावनांकडे काळजीपूर्वक पाहायला, नव्हे, विचार करायलासुद्धा आवडत नाही. रत्नाकर मतकरींच्या भयकथा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला लावतात. एका अर्थाने आपणच आपल्याला पुन्हा एकदा नव्या रूपात भेटतो. ...Read more