* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177661965
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN HIS NOVEL, PROF. MORE ILLUSTRATES THE TRUTHFUL AND SCORCHING SIDE OF THE WORLD TODAY. VERY RARELY, THE SLUMS ARE DESCRIBED WITH SUCH INTENSITY REVELING THE UGLY FACTS AND TERRIBLE ACTUALITY. THE NOVEL HAS REACHED A HEIGHT OWING TO THE PERFECT PORTRAYAL OF THE TWO ENDS; RURAL CULTURE AND URBAN TENDENCY OF SELF-INDULGENCE IN ADDITION TO THE TENSIONS AND ATTEMPTS FOR MERE SURVIVAL. THE HERO POSSESSING MANY QUALITIES AND HAS IMMENSE CAPACITY TO BE IN HARMONY YET REMAIN NEUTRAL WITH HIS SURROUNDING OFFERS UNIQUE ANGLE TO THE OVERALL WRITING. THOUGH IN MARATHI, IT IS NOT CONFINED TO OUR STATE, RATHER WITH ITS FOCUS ON VARIOUS ASPECTS OF LIFE, IT HAS SIMPLY CONQUERED THE READERS AT A UNIVERSAL LEVEL. IT IS A MILE-STONE IN THE LITERARY WORLD. THIS NOVEL HAS INDEED SOUGHT A PROFOUND PLACE IN THE MARATHI LITERATURE.
’अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत प्रा. मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविलेले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ठाामीण जीवनातील खोलवर रूजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवादी जीवनाची ओढ, त्यातील ताणतणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी, एकूण मराठी कादंबरी वाङ्मयाला वेगळे परिमाण प्राप्त करून देणारी ठरली आहे. आजच्या युवा पिढीची मानसिकता, जगण्याची अपरिहार्यता उलगडत जाताना ही कादंबरी प्रादेशिकतेच्या, भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विकतेकडे झेप घेते. हेच या कादंबरीचे यश आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ANDHARACHE VARASDAR #DADASAHEB MORE #अंधाराचे वारसदार #दादासाहेब मोरे #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% MORE #अंधाराचे वारसदार #दादासाहेब मोरे
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    झोपडपट्टीतील कुटुंबावर कायम घोटाळणारे अस्थिरतेचे कृष्णमेघ... अंधाराचे वारसदार ही झोपडपट्टीच्या जीवनाची एक विदारक झलक दाखवणारी कादंबरी. `गबाळ` मध्ये कुडमुड्या जोशी जमातीचे चित्रण करणाऱ्या दादासाहेब मोरे यांनी आता त्या जमातीबाहेरच्या जगाकडे, शहरातील झपडपट्ट्यांमधील स्थलांतरितांच्या जीवनसंघर्षाकडे आपले लक्ष वळविले आहे. कॉलेजमध्ये नव्यानेच जाणारा तरुण रमेश सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकणाऱ्या एका टोळीत नकळत ओढला जातो आणि पहिल्याच झटक्यात पोलिसांच्या तावडीत सापडतो. गणपा हातभट्टीवाला व त्याचे साथीदार त्याला जामिनावर सोडवतात खरा, पण दारू, मटका, गर्द, वेश्या, पान सिगारेट– या सर्वांची चटक त्याला लागते; आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकून या व्यसनांची नशा पूर्ण करण्याची त्याची धडपड चालू राहते. पैसे मिळतात पण ते कधीच पुरे पडत नाहीत. नेहमीच कडकी चालू राहते. उधार उसनवार करावी लागते. तशात शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन स्थलांतर करण्याची योजना कार्यान्वित होते. आठ-दहा झोपडपट्ट्यातील हजार-बाराशे कुटुंबांना शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या काळ्या रानात हलवण्यात येते. प्रत्येकी पंधरा बाय दहा फुटांची जागा, अशा चाळीस-पन्नास घरांची रांग, दोन रांगांमध्ये कच्चा मुरुम टाकून केलेले रस्ते– नगरपालिकेनं तयार केलेल्या यादीनुसार जागांचे वाटप होत राहते. घरे कधी बांधून होणार याचे वेळापत्रक कोणालाच ठाऊक नसते. तात्पुरती सोय म्हणून प्रत्येक कुटुंबाला थोडे कळक दिले होते. त्या बांबूच्या कळकांनी खोपटं किंवा झोपडी उभी करून तात्पुरता निवारा ज्याचा त्यानं उभा करायचा होता. त्याप्रमाणं लोक कुठून-कुठून पालापाचोळा, पत्रे, प्लॅस्टिक शीट वगैरे आणून आपला उघड्यावरचा संसार झाकण्याचा प्रयत्न करत होते. उघड्यावरच चुल धडधडत होत्या. खाणं-पिणं चालू होतं. बायाबापड्या चार-सहा घरात धुणं-भांडी करून संसाराला हातभार लावत. शाळा लांब. त्यामुळं मुलं आळस करत. झोपडपट्टीतल्या लोकांचे नाना उद्योग. कोणी माकडवाले होते, कोणी चिंध्या कागद गोळा करणारे. कोणी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करीत. कोणी आडत दुकानात हमाली करत. पोपटवाले जोशी पोपटाचा पिंजरा घेऊन भविष्य सांगत. कोणी भाकरीचे शिळे तुकडे वाळवून बिस्किटाच्या कारखान्यात, पाव-ब्रेडच्या बेकरीत देत. दादासाहेब मोरे या झोपडपट्टीतील वेगवेगळ्या माणसांचे व समस्यांचे वैविध्य दाखवू पाहतात. त्यासाठी रमेशच्या कुटुंबाप्रमाणेच सुनीलच्या कुटुंबालाही मध्यवर्ती स्थान देतात. स्थानांतरामुळे अनेकांच्या रोजी-रोटीतही व्यत्यय येतो. सुनीलचा बाप रामाप्पा व आई सावित्रीबाई चौथ्या मजल्यावरच्या स्लॅबचं सिमेंट ओतण्याच्या कामाला जातात. शिडीवरून पाट्या वर पोचवताना रामाप्पा खाली पडतो. लोखंडी सळ्यांवर पडल्याने, त्याच्या मांडीत सळ्या घुसतात. रक्त वाहू लागते. त्याला ठेकेदार हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सावित्रीबाईही त्याच्या मागोमाग जाते. डॉक्टर उजवा पाय मांडीपासून कापतात. ते म्हणतात, ``महिनाभर हालचाल करायची नाही. कुबड्या लावून चालायची सवय करावी लागेल. दर आठवड्याला तपासणीसाठी या.`` मुलगा सुनील शाळा चुकवू लागतो. आईलाही कामावर जाणे कठीण होते. इमारतीचा मालक औषध-पाण्यासाठी थोडे पैसे देतो. झोपडपट्टीवाल्यांच्या घरबांधणीच्या कामाकडे कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा मोर्चा काढण्याचे ठरते. सुदाम, नऱ्या, रमेश व इतर तरुण मोर्चाची तयारी करतात. ``तुम्ही मोर्चात आला तरच तुम्हाला घर मिळेल. निवेदनावर सही नाहीतर आंगठा करा.`` त्या निवेदनाच्या प्रती कलेक्टर, पोलीस स्टेशन, वृत्तपत्रे यांना देण्यात येतात. कापडी बॅनर्स तयार करण्यात येतात. मोर्चापुढे सुदामचे भाषण होते. निवेदन नगराध्यक्षांना देण्यात येते. रमेशचा दोस्त नऱ्या एकदा रमेशच्या बहिणीला– शेवंतीला एकटीच गाठतो. ``तुझ्या भावाचा दोस्त तर आहेच. मग तुझा दोस्त झालो तर काम बिघडलं? ... ``शेवंता त्याच्या अंगावर तांब्या भिरकावते. डोकं धरून तो झोपडीबाहेर पळतो. लोक झोपडीपुढे जमतात. पण गुंड नऱ्याशी वैर घ्यायला कोणीच तयार नसते. पण तेवढ्यात रमेश चाकू घेऊन नऱ्याचा बदला घ्यायला येतो. गणपाला बघून मात्र तो पाय मागे घेतो. नगरपालिकेच्या निवडणुकांची धांदल सुरू होते. तशात या झोपडपट्टीला आग लागते. अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत बहुतेक झोपड्या जळून खाक होतात. पुढारी झोपडपट्टीला भेट देतात. आश्वासने देतात. गुंड नऱ्या इतर टोळीवाल्यांना सांगतो, ``आपण मदतीसाठी फेऱ्या काढू. धान्य, पैसा इ. काही हाती लागले तर बघू. नाहीतर झोपडीही गेली आणि संधीही गेली असं होईल. आपल्यातली परस्परांची दुश्मनी या प्रसंगापुरती विसरून कामाला लागलं तरच! ज्याच्या ज्याच्या गँगच्या हाताला जे लागेल ते त्याचं.`` मग हे तरुण गटागटानं शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून पैसे– मदत गोळा करतात. लोकही कमी-जास्त मदत करतात. धान्य, कपडे, भांडी, ब्रेड, पैसे– निवडणुकीतले उमेदवारही साड्या, चादरी वाटतात. मताला शंभर रुपये भाव देतात. प्रत्येक टोळी प्रमुखाला उमेदवार गणपा दहा-दहा हजार रुपये देतो. मते न आणली तर मात्र जिवंत ठेवणार नाही असा दमही भरतो. गणपा दारूवाला निवडून येतो. ब्लॅकने तिकिटे विकताना रमेशची आणि अरुणची मारामारी होते. नऱ्याही रमेशला मारतो. रमेश कसाबसा पळत घरी येतो. आई त्याला हळद मलमपट्टी करते. रमेश रात्री नऱ्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूचे वार करतो. त्याच्याबरोबरचे सुनील व अकबर पळ काढतात. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रमेशही पळ काढतो. आपण पोलिसांच्या हाती सापडलो तर अंधारकोठडीत डांबले जाणार; नाहीतर झोपडपट्टीत लपून राहून अंधाराचे वारसदार म्हणून दिवस काढणार. आपल्या जीवनाला लागलेले हे भेसूर भयानक वळण; त्यातून आपली सुटका नाही. या विचाराने तो त्या भेसूर अंधारात रस्ता दिसेल तिकडे धावत सुटतो... त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. झोपडपट्टीत राहण्याची पाळी आलेल्या तरुणांना जी संगत मिळते ती त्यांना गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे नेते आणि शेवटी त्यांना अंधाराचे वारसदार बनवते. दादासाहेब मोरे यांनी या झोपडपट्टीतील गरीब रहिवाशांच्या आयुष्यातील परवड वेगवेगळ्या संदर्भासह वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश हा नायक म्हणून प्रामुख्याने त्यांनी रंगवला आहे. नऱ्या हा खलनायक. सुनील व इतर गँगवाले, रमेश व सुनील यांची कुटुंबे व त्या झोपडपट्टीतील एकमेव धनिक गणपा दारूवाला– या मोजक्या पात्रांनिशी झोपडपट्टीतील लोकांच्या सुख-दु:खाची एक झलक या कादंबरीत मोरे यांनी दाखवली आहे. तटस्थपणे झोपडपट्टीवासीयांच्या ससेहोलपलटीचे भिन्न-विभिन्न प्रकार मोरे पेश करतात; गुन्हेगारी जगाचाही फेरफटका घडवून आणतात. क्रौर्याला सामोरे जाताना मोरे हे काहीसे दचकत दबकतच पुढे जातात. फार खोलात जाण्याचे टाळतात. झोपडपट्टीबद्दल लिहितानाही त्यांना आपण अप्रिय कर्तव्य करत आहो असे काहीतरी जाणवत असावे. त्यात तसा त्वेष नाही. चीड नाही. असहाय अगतिकता आहे. साक्षीभावाने सगळे अध:पतन बघताना या जीवनाचा भेसूर भयानक शेवट होणार ही खंत त्यांना सर्वाधिक सतावते. ``उद्याच्या भेसूर जीवनाची कल्पना कोणीतरी आपल्याला वेळीच द्यायला हवी होती`` अशी पश्चात्तापाची भावना रमेशमध्ये शेवटी जागी होते. पण आता ती निरुपयोगी असते. सरळ रेषेत जायचे कितीही मनात असो, अंधारात वाट वाकडी-तिकडी होण्याची शक्यता अंधाराच्या वारसदारांबाबत विशेषच राहते– असा इशारा ही कादंबरी देते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-06-2002

    संयमित आविष्कार... समकालीन जीवनाचा तलस्पर्शी वेध घेणारा साहित्य प्रकार म्हणून ‘कादंबरी’चा उल्लेख केला जातो. त्यामुळे जीवनात प्रत्यही घडणारी परिवर्तने कादंबरीतून पाहायला मिळतात. मध्यमवर्गीय जीवनातली स्थित्यंतरे हा अगिणत कादंबऱ्यांचा गाभा आहे, त्याच्य जोडीला साठोत्तरी कालखंडात झोपडपट्टीवासीयांचे जीवन, त्यांच्या व्यथा वेदनांसह टिपण्याचा प्रयत्न सुरू झाला. शहरांशी निगडीत झोपडपट्ट्यांची दखल मराठीत ‘चक्र’, ‘वासूनाका’, ‘माहीमची खाडी’ आदी कादंबऱ्यांनी प्रथमच प्रभावीपणाने घेतली, त्यांच्यामधून झोपडपट्टीचे सांस्कृतिक अनुबंध, सामाजिक संबंध, आर्थिक आकृतिबंध यांचा मराठी वाचकांना परिचय होत गेला. हा संपन्न वारसा सांभाळत दादासाहेब मोरे यांची ‘अंधाराचे वारसदार’ ही कादंबरी अवतरली आहे. तिच्यात झोपडपट्टीतील जीवनकलहाचा मुकाटपणा, सोशिकपणा आणि भाबडेपणाही अनेक घटना, प्रसंगांतून वर्णन केलेला आहे. ग्रामीण भागातील माणसे जिवंत राहण्यासाठी शहरात येऊन स्थायिक होतात, त्यांना झोपडपट्टीचा आश्रय मिळतो. अशा माणसांना शहरी जीवनात रुळताना दुभंगलेपणाचा भोग अटळपणाने भोगावा लागतो. भकासपणा त्यांच्या जीवनाचा भाग बनतो. अशा माणसांच्या पुढील पिढीला बकालपणा शाप वाट्याला येतो. भय, भूक आणि भ्रष्टाचार यांच्या विळख्यात झोपडपट्टीचे जीवन सापडते. साहजिकच एकेकाळी प्रकाशाचे शिल्पकार असलेल्या ग्रामीण कुटुंबातून शहरी पर्यावरणात ‘अंधाराचे वारसदार’ कसे निर्माण होतात याचे हृदय आणि सुरेख चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही आदिम काळापासूनची मानवी शुभेच्छा असूनही जगातील अगणित मानवगटांना अंधारातून अंधाराकडे वाटचाल करावी लागत आहे. अशा अभावग्रस्त ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत असाच एक उल्लेखनीय प्रयत्न झाला आहे. स्वत:च्या पोटासाठी, मुलांच्या पाटी, पेन्सिलीसाठी शहराच्या आश्रयाला आलेल्या ग्रामीण समूहाच्या नशिबी ‘आगीतून फुफाट्यात पडणे’ कसे येते याचे विदारक चित्रण या कादंबरीत केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ही कादंबरी सिद्रामचे कुटुंब, नऱ्याची टोळी, गणपा दादाचा गोतावळा, झोपडपट्टीची दिनचर्या यांच्याशी निगडीत आहे. सिद्राम आपली पत्नी राधाबाई आणि मुले रमेश, सुरेश शेवंतासह लवंगी गावाहून सांगली शहराच्या झोपडपट्टीत राहू लागतो. इथे त्याला आणखी दोन मुले होतात. एकवीस वर्षांचा रमेश महाविद्यालयीन युवक आहे. तो सिनेमाची तिकिटे काळ्या बाजारात विकणाऱ्या नऱ्याच्या टोळीकडे ओढला जातो. यानिमित्ताने पहिल्या प्रकरणात सिनेमा तिकिटांच्या काळ्या बाजाराच्या यंत्रणेवर भेदक प्रकाश टाकला आहे. सहज मिळणाऱ्या पैशामुळे नऱ्या, सुनील, विलास, अकबर, रमेश असे अनेक युवक व्यसनांच्या आहारी जातात. मद्यप्राशन, वेश्यागमन, धूम्रपानही त्यांच्या अंगवळणी पडतात. एका झोपडपट्टीची दिनचर्या हा कादंबरीचा गाभा आहे. दुसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी रिमांड होमजवळील झोपडपट्टीचे नव्या जागेत पुनर्वसन होणार म्हणून तेथील लोकांच्या आशा पल्लवित होतात. तिसऱ्या प्रकरणात झोपडपट्टीला पुनर्वसन मंत्री ना. पोटारते साहेब भेट देतात. त्यांच्या कार्यक्रमाचा आँखो देखा हाल सादर केलेला आहे. पाचव्या प्रकरणात झोपडपट्टीचे नव्या जागेत स्थलांतर होते. त्यामुळे शिक्षण, सुविधा, रोजगारविषयक नव्या समस्या निर्माण होतात. सहाव्या प्रकरणात झोपडपट्टीला पाऊस झोडपून काढतो. आठव्या प्रकरणात गणपा दादाच्या पुढाकारने झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा काढण्यात येतो. दहाव्या प्रकरणात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने झोपडपट्टीचे जीवन ढवळून निघते. याच वेळी तिला भीषण आग लागते. अकराव्या प्रकरणात जळितग्रस्तांच्या मदतीसाठी झोपडपट्टीतील युवक गावभर फिरून मदत गोळा करतात. तिच्या वाटपात भ्रष्टाचार होतो. निवडणुकीच्या आदल्या रात्री पद्धतशीर पैसे वाटप होऊन गणपा दादा निवडून येतो, अशा झोपडपट्टीच्या दिनचर्येत दादासाहेब मोरेंनी अनेक नाट्यपूर्ण घटना, प्रसंग कौशल्याने गुंफले आहेत. दलित, मुस्लिम, मातंग, गोसावी, साप गारुडी, माकडवाले, मराठा, कुणबी अशा लोकांचीही बहुजिनसी झोपडपट्टी आहे. हे लोक उपजीविकेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करतात. त्यापैकी अहमद, रशीद आणि मुन्ना यांच्या नाग-मुंगसाचा सार्वजनिक खेळ तपशीलवार वर्णन केला आहे. त्यांची लुटुपुटूची लढाई खरोखरची होऊन त्यात मुंगूस नागाला मारून टाकतो. या कादंबरीच्या शेवटी रमेश नऱ्याचा खून करतो. या दोन्ही घटनांमधील सूचकता लक्षणीय आहे. झोपडपट्टी जीवनाच्या पार्श्वभूमीवर नऱ्या, रमेश, सुनील, विलास, अकबर अशा काही प्रातिनिधिक युवकांचा अध:पात दाखवणे हे या कादंबरीचे मध्यवर्ती अंत:सूत्र आहे. पहिल्या प्रकरणात साक्षीभूत असलेला रमेश पुढे गुन्हेगारी जगताचा एक भाग बनतो. त्याचे घरांपासून तुटत जाणे अधिक तपशिलात हवे होते. कदाचित, घुमेपणा, निमूटपणा, नेमस्तपणा हे रमेशचे व्यक्तिमत्त्व विशेष कादंबरीकाराला अभिप्रेत असावेत. आपल्या तरुण बहिणीवर- शेवंतावर नऱ्याने अतिप्रसंग केला म्हणून सूडाच्या भावनेने रमेश पेटतो. त्याच्या नैतिक कल्पनांना धक्का बसून तो नऱ्याची हत्या करतो. सुनील गर्दच्या आहारी गेला आहे. नशा करण्यासाठी तो घरातील भांडी विकतो. त्याचे वडील रामाप्पा आणि सावित्रीबाई यांची कहाणी करुणामय वाटते. या संपूर्ण कादंबरीत ‘अंधाराचा वारसदार’ म्हणून खऱ्या अर्थाने नऱ्या वावरतो. तो रगेल, रंगेल, दिलदार, बेंडर, समजदार अशा वृत्ती प्रवृत्तीचा आहे. सुरेश रमेशच्या पावलावर पावले टाकू लागतो. तेव्हा, रमेश, सुनील, सुरेश ही तरुण मुले प्रकाशाचे वारसदार होण्याचे टाळून अंधाराचे वारसदार कसे होतात, याचे प्रभावी चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ते करताना त्यांनी भडक, उथळ, बटबटीतपणा न दाखवता, सूक्ष्म, संयमशील, संवेदनायुक्त आविष्कार साधला आहे. आततायी, आक्रस्ताळी दृष्टी न ठेवता विवेकपूर्ण अभिव्यक्ती केली आहे म्हणून ही कादंबरी वाचनीय झाली आहे. प्रा. विजय काचरे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत दादासाहेब मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ग्रामीण जीवनातील खोलवर रुजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवाद जीवनाची ओढ, त्यातील ताण-तणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी एकूण मराठी कादंबरी वाङमयाला वेगळे परिणाम प्राप्त करून देणारी ठरेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more