* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662788
  • Edition : 5
  • Publishing Year : MARCH 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOMETHING LIKE THIS.... IF I FOUND SOMETHING SIGNIFICANT, FASCINATING, BEAUTIFUL IN THE BOOKS FROM CHILDHOOD, I USED TO WRITE IT DOWN. CHILDHOOD PASSED, BUT THAT HOBBY DID NOT GO AWAY. ON THE OTHER HAND, WHEN I GOT CLOSE TO ENGLISH AND SANSKRIT ALONG WITH MARATHI IN MY CHILDHOOD, I FELT AS IF I HAD ACQUIRED A RICH COLLECTION OF SUCH SAYINGS. I ALSO TRANSLATED ENGLISH AND SANSKRIT POEMS AND INCLUDED THEM IN MY COLLECTION.
असे काही.... लहानपणापासून पुस्तकांत कुठे काही लक्षणीय, चित्तवेधक, सुंदर आढळले, तर ते मी जवळ लिहून ठेवत असे. बालवय गेले, पण तो छंद सुटला नाही. उलट मोठेपणी मराठीच्या जोडीने इंग्रजी, संस्कृत या भाषांशीही निकट परिचय झाला, तेव्हा तर अशा उक्तींचे समृद्ध भांडारच हाती गवसल्यासारखे वाटले. इंग्रजी, संस्कृत कवितांचे अनुवाद करून त्यांचाही मी माझ्या संग्रहात समावेश केला — उदाहरणार्थ : राष्ट्राची श्रेष्ठता तुमच्या राष्ट्रात किती मोटारी आहेत, किती टोलेजंग इमारती आहेत, यावर तुमचे राष्ट्र मोठे ठरत नाही. तुमच्या राष्ट्रात चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अशा नागरिकांची संख्या किती आहे ते मला सांगा, म्हणजे मी तुमचे राष्ट्र किती श्रेष्ठ आहे ते सांगू शकेन! — मार्टिन ल्यूथर किंग निवडक उतारे, वचने, सुभाषिते, कवितापंक्ती, मार्मिक विनोद–जे जे जसे मला आवडत गेले, ते मी या संकलनात घेत राहिले. माझ्या दृष्टीने हे मुद्रित शब्दधन म्हणजे सुवर्णमुद्राच आहेत. ते समृद्ध भांडार माझ्याप्रमाणे वाचकांनाही रंजक, कुतूहलजनक, उद्बोधक वाटेल, अशी मी आशा करते...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#सुवर्णमुद्रा #शान्ता ज. शेळके #ललितगद्य #SUVARNAMUDRA #SHANTA J. SHELAKE #LALITGADYA
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    ठसठशीत सुवर्णमुद्रा !!! शब्दव्रती शांताबाई शेळके या महान साहित्यिका होत्या . कथा,कविता गाणी , ललित लेख अनुवाद,निबंध,अशा कसदार साहित्य निर्मितीने मराठी भाषेला त्यांनी वैभवशाली केले मराठी साहित्य प्रांत समृद्ध केला त्यांच्या सहजसुंदर,प्रासादिक व ओघवत्या भाषाशैलीतील "सुवर्णमुद्रा " हे अद्वितीय पुस्तक माझ्या वाचनात आले व त्याने मी अक्षरशा भारावून गेलो त्याचा थोडा परीचय . लेखिकेने जेवढे लिहिले तेवढेच किंबहुना अधिक ब हुवीध दर्जेदार असे वाचन केले होते .संस्कृत,इंग्रजी भाषेतील अभिजात साहि त्य या विदुषीने वाचले हो ते. वाचन करताना त्याती ल निवडक उतारे,लक्षवेध क वचने,सुभाषित,काव्य पंक्ती,मार्मिक विनोद यांची टिपण नोंदवहीत करण्या ची त्यांना सवय होती पुढे या आगळ्या छंदाची व्याप्ती वाढली,कक्षा रुंदा वली त्यातुनच लेखिकेचे मधुसंचय व सुवर्णमुद्रा ही आगळीवेगळी पुस्तके निर्माण झाली.नोंदवहीत अभिजात साहित्यातील टिपनांचे संकलन म्हणजे एकापरीने मुद्रीत शब्दधनच म्हणजेच "अक्षरांच्या सुवर्ण मुद्राचं" होय. ,,म्हणून सुवर्णमुद्रा असे समर्पक नाव लेखिकेने या पुस्तकाला दिले आहे. या अभिनव पुस्तकात अनेक ज्ञात,अज्ञात प्रतिभा वंत जुने जाणते ,नवोदित साहित्यिक ,तत्वज्ञ ,विचा रवंत,कवी,नाटककार अशा गुणवंताच्या साहित्याची झलक दृष्टीस पडते.प्रसिद्ध संतकवी,नाटककार, लोक वाङमयातील पारंपारिक ओव्या, गीत,विनोद यांचा उल्लेख आढळतो दुबळी माणसे संधीची वाट बघत बसतात मात्र कर्तृत्ववान माणसे स्वताच संधी निर्माण करतात ! उत्कट दुःखाप्रमाणे उत्कट आनंदही निशब्द असतो प्रश्न विचारून अज्ञान दूर करु बघणारा क्षणिक अडाणी परंतु मुळीच प्रश्न न विचारणारा जन्मभर अडाणी राहतो ! असे सुविचार म्हणी यांची रेलचेल पुस्तकात आढळते लेखिकेचा पिंड प्रतिभावंत कवयित्रीचा असल्याने काही प्रतिभावंत कवींच्या काव्यपाक्तींचा उल्लेख पुस्तकात आढळतो उदा माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडले माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगले । बहिणाबाई चौधरी कसा उच्छादी हा वारा केळ झोडपून गेला किती झाकशील मांडी नाही मर्यादा ग ह्याला पु .शि रेगे या काव्यपंक्ती प्रातिनि धिक ठराव्यात शांताबाईंनी आपल्या तरल बुद्धीने लोकहितवादी च्या डौलदार मराठी भाषा शैलीचा नोंद करून ठेवले ला खालील उतारा बघा " शेवटच्या बाजीराव पेश व्याच्या कारकिर्दीत सौदे गिरी फार माजली होती. उनाड लोक शेंडी संजाब दार ,पागोटे कंगनीदार, जोडा अनिदार , अंगरखा कळीदार,मिशा पिळदार, धोत्रे चुणीदार,भुवया कमा नदार,गंध साखळीदार, छाती गोलदार अशी ढोंगे करू लागले .पूर्वीचा साधे पणा गेला " ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विविध विषयांवरील चिंतनगर्भ अवलोकने... शांताबाई शेळके यांच्या व्यक्तितमत्त्वाला अनेक पैलू आहेत. मधुकर वृत्तीने कणाकणाने ज्ञानसंचय करण्यातील त्यांचा उत्साह साठीनंतरच्या काळातही अविरत अप्रतिहत चालूच आहे. शाळकरी वयात त्या आपल्याला आवडलेले सुविचार, सुभाषते, विनोद, गमतीदार माहिती, काव्यपंक्ती वगैरे टिपणवहीत लिहून ठेवत. पुढे संस्कृत, इंग्लिश साहित्याशी परिचय घडला. त्यातीलही नवलाईचा खजिना त्या आपल्या टिपणवहीत आणू लागल्या. मधमाशी जशी फुलाफुलांवर उड्या मारून कणाकणाने मधुर मध गोळा करते, तद्वतच शांताबार्इंचे सुंदर वचनांचे संकलन चालू असते. त्या वचनांमधील अर्थगांभीर्याने त्या भावविभोर होतात. त्याचा स्वत:शीच पुन:पुन्हा आस्वाद घेतात. वेळोवेळी जमवलेल्या या सुविचारवजा पंक्ती म्हणजे त्यांना सुवर्णमुद्रा वाटतात आणि त्या सुवर्णमुद्रांची झळाळी आपल्या मित्रमंडळींना दाखवण्याची त्यांची उर्मी उफाळून येते. त्यातून मधुसंचय, सुवर्णमुद्रा यासारखी संकलने वाचकांसमोर अवतरतात. ‘सुवर्णमुद्रा’मध्ये चारपाचशे मुद्रांचा समावेश आहे. त्या सर्वच सर्वांना बावनकशी वाटतील असे नाही; परंतु वीसबावीस कॅरटची तरी शुद्धता त्यात नक्कीच जाणवेल. या सुवर्णमुद्रा मूळ कुठल्या भांडांरातून घेतल्या आहेत तेही शक्य तेथे नमूद केले आहे. रामायण-महाभारत, वेदउपनिषदे ही भांडारे त्यांनी तूर्त बाजूला ठेवलेली असली तरी जपानी, चिनी, फ्रेंच म्हणी, सेनेकासारखे ग्रीक-रोमन योद्धे, ज्ञानेश्वर-तुकाराम-नामदेव-रामदास आदी संत, शंकराचार्य, कबीर, विवेकानंद, फादर स्टिफन्स वगैरे संतमहात्मे त्यांना प्रिय आहेत. पाश्चात्य लेखकांमधील व्हिक्टर ह्युगो, टॉमस रीड, कान्ट, ऑस्कर वाइल्ड, शेक्सपियर, जॉर्ज इलियट, सॉमरसेट मॉम, मार्क ट्वेन, मार्टिन ल्युथर किंग, जॉन्सन, स्पेन्सर, बरट्रँड रसेल, अँड्र्यू कार्नेजी, ओ हेन्री, अब्राहम लिंकन, ट्रमर्सन, थोरो, मायकेल अँजेलो, जेम्स बॅरी, लुइझा अलकॉट, बाल्झॅक, आर्किटेक्ट फ्रॅंक लॉइड राइट, रॉबर्ट फ्रॉस्ट, वगैंरेंनी शांताबार्इंना भुरळ घातलेली दिसते. बाकी मराठी कवीलेखक तर घरचेच. फुले, खांडेकर, फडके, शिरवाडकर, र.वा. दिघे, लोकहितवादी, आगरकर, माडखोलकर, शशीकान्त पुनर्वसू, माडगूळकर, नानासाहेब गोरे, बालकवी, नाथमाधव, ग.ल.ठोकळ, आचार्य कालेलकर, सावरकर, शरच्चंद्र, मुक्तिबोध, श्री. दा. पानवलकर, द.भि. कुलकर्णी. खानोलकर, पु.शि.रेगे. गो.ब. देवल, अच्युत बळवंत कोल्हटकर, श्री.म.माटे, दुर्गा भागवत, मारुती चितमपल्ली. इ, पासून डॉ. अभय बंग यांच्यापर्यंत लेखककवींची संस्मरणीय वाक्ये या सुवर्णमुद्रांमध्ये झगमगतात. प्रत्येक सुविचाराला शीर्षक दिले आहे. तसे विषयवार वर्गीकरण व संकलन केलेले नाही त्यामुळे कुठेही कुठलाही विचार कुठल्याही क्रमाने आलेला आहे. या मुक्त उधळणीचा एक फायदा असा की कुठलेही पान उघडावे व वाचू लागावे. मागचा पुढचा संदर्भ बघायची गरज नाही. प्रत्येक वचन हे स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध असल्याने त्याचा मुक्त मनाने आस्वाद घ्यावा. काही मासले बघा. पवित्र - विद्वान माणसाने लेखनासाठी वापरलेली शाई ही हुतात्म्याने सांडलेल्या रक्ताहूनही अधिक पवित्र असते- महंमद पैगंबर प्रतिभा व बुद्धिमत्ता - अव्वल दर्जाची प्रतिभा बऱ्याच वेळा उपाशी मरते. बऱ्यापैकी बुद्धिमत्ता जरीची वस्त्रे घालून डौलाने मिरवते- सॉमरसेट मॉम. संधी - दुबळी माणसे संधीची वाट बघत बसतात. सामर्थ्यसंपन्न माणसे स्वत:साठी संधी निर्माण करतात. शेजाऱ्याचे अंगण - शेजाऱ्याच्या अंगणात साठलेल्या कचऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या घरासमारचे अंगण झाडून स्वच्छ करा. लढाई - दर दिवसाला जीवनमार्गी नवी पायरी चढतो मी, इतरांसंगे कमी परंतु अधिक स्वत:शी लढतो मी.- कबीर बदल - परिस्थिती बदलत नाही. आपण बदलतो. धिटाई - एखादे मांजर देखील राजाकडे धीट नजरेने बघू शकते. सत्य - सत्य ही अत्यंत महाग व दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून बोलताना तिचा वापर जपून करा. - मार्क ट्वेन धर्म - माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे - महात्मा गांधी वाट - पावलामागे पाऊल टाकत राहिले की वाट आपोआप सरते. फरक - प्रश्न विचारून आपले अज्ञान दूर करू बघणारा माणूस हा पाच मिनिटांपुरताच अडाणी असतो. पण जो मुळी प्रश्नच विचारत नाही तो जन्मभर अडाणी राहतो - चिनी म्हण श्रीमंती - कर्तव्यदक्ष प्रेमळ पत्नी आणि निकोप प्रकृती यापेक्षा वेगळी श्रीमंती काय असते? सुख - आपले विचार, बोलणे व प्रत्यच कृती यांच्यात एकमेळ, सुसंवाद असणे हे खरे सुख आहे. घातक - भलत्या वेळी सांगितलेले सत्य असत्याइतकेच घातक असते. उशीर - खरे सौख्य म्हणजे काय ते त्याला लग्न होईपर्यंत कळले नव्हते आणि तोवर फार उशीर झाला होता. स्वर्ग - सुखी कुटुंब म्हणजे आपल्याला इहलोकी लाभलेला स्वर्ग आहे. जुगार - लग्न हा एक जुगार आहे या. जुगारात पुरुष आपले स्वातंत्र्य पणाला लावतात तर स्त्रिया आपले सौख्य - फ्रेंच म्हण वादळे - जितकी जास्त वादळे अंगावरून जातात तितकी ओकवृक्षाची पाळेमुळे जमिनीत अधिक खोलवर शिरतात. कलावंताची प्रार्थना - परमेश्वरा, मला एकच वरदान दे. मला जे साधले आहे त्यापेक्षा सतत काहीतरी अधिक साध्य करण्याची इच्छा माझ्या मनात सतत राहू दे.- मायकेल अँजेलो. जुनी पत्रे - जुनी पत्रे वाचताना खूप गंमत वाटते. आनंदही होतो. या आनंदाचे एक कारण असे की त्या पत्रांना उत्तरे लिहिण्याची जबाबदारी आपल्यावर नसते. इशारा - तुम्ही जेव्हा आनंदात असता तेव्हा कुणालाही कसलेही वचन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा संतप्त असता तेव्हा कुणाच्याही पत्राला उत्तर देऊ नका - चिनी म्हण ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-08-2002

    ज्ञानविचारांची सुवर्णमुद्रा उमटविणारे पुस्तक... पुस्तके हा मानवी जीवनाचा अमोल ठेवा आहे तो यासाठी की ज्ञानाचा तो प्रमुख स्रोत आहे. आयुष्य जगण्यासाठी ज्या तात्त्विक व्यवहाराची गरज भासते ती अशा ज्ञानातून पूर्ण होत असते. आपल्या आजूबाजूला बऱ्याच चांगल्यागोष्टी असतात आणि त्या अर्थातच अनुकरणीय असतात. चांगल्या गोष्टीतील सौंदर्य हे चिरकाल टिकणारे असते आणि म्हणूनच मांगल्याचा ठेवा टिकून राहिलेला असतो. आपण ऐकलेल्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी इतरांनाही सांगाव्यात अशी उर्मी उठली की एका पिढीचे कल्याण होते असे म्हणणे अतिशयोक्ती वाटू नये. चांगले ऐकावे आणि ऐकवावे असे ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके यांना वाटले आणि ‘सुवर्णमुद्रा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मेहता प्रकाशनाने ही जबाबदारी लगेच स्वीकारली. परंपरेनुसार चालत आलेल्या पुस्तकी आणि मौखिक ज्ञानाचे काही कण आपल्यासाठी शेळकेंनी वेचले आहेत. जीवन जगण्यासाठी भाकरीखेरीज विचार लागत असतात आणि हे विचार धन मार्गदर्शक ठरणारे आहे. प्रख्यात विचारवंत, लेखक, कवी, चित्रकार, समाजसेवक इ. मानाच्या पातळीला चढलेल्या कलावंताचे आनुभविक शब्द नेमकेपणाने आपल्यासमोर येतात त्याचे प्रमुख कारण शांता शेळकेंची राजहंसवृत्ती. नेहमीच्या पद्धतीने परीक्षण करण्यासारखे हे पुस्तक नव्हे तर प्रत्येक वाचकाने आपल्याजवळ बाळगावे अथवा भेट देण्यासाठी सहज उचलावे असे पुस्तक आहे हे! या पुस्तकात विविध विषयांवरील मतांचा खजिना आहे. ज्याला तो आवडेल तो घ्यावा. काव्यपंक्ती, अभिप्राय, विशिष्ट वर्णन, विनोद, चुटके इ. सर्व काही येथे आहे. आधी याच धर्तीवरचे ‘मधुसंचय’ हे पुस्तक येऊन गेले आहेच. अर्थात वेचक आणि मोजकेच यात आहे आणि अजूनही अशा पुस्तकांची मालिका येऊ शकतेही. दुर्दैवाने आज त्या आपल्यात नाहीत. या पुस्तकाची ओळख करून देणे म्हणजे उदाहरणे देणे कारण त्या विचारांचा मागोवा वाचकांनी घ्यायचा आहे, नव्हे तो आपल्या आयुष्याला लावून पाहायचा आहे. ‘मी माझे अंतिम ध्येय कसे गाठू शकलो याचे रहस्य मी तुम्हाला सांगतो. त्याचा माझ्या बुद्धिमत्तेशी फारसा संबंध नाही. माझी सारी ताकद माझ्या चिकाटीत आणि अमर्याद कष्ट करण्याच्या स्वभावात आहे’ – लूई पाश्चर. मानवी जीवनाला मार्गदर्शक ठरणारी ही वाक्ये आहेत. मार्क ट्वेन म्हणतो– ‘सत्य ही अत्यंत महाग आणि दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून बोलताना तिचा वापर अगदी जपून, बेताबेताने करा.’ आचार्य अत्रेंविषयी प्र. श्री. कोल्हटकरांनी छानच लिहिले आहे. अत्रे यांचे आयुष्यच त्यातून प्रकट होते. मैत्रीविषयी बोलताना राल्फ वॉल्डो इमर्सन प्रांजळपणे म्हणतो– ‘जुन्या मित्रांचा एक असा फायदा आहे की त्यांच्या सहवासात आपण वाटेल तसे मूर्खासारखे बोलू किंवा वागू शकतो. ग्रंथाचे महत्त्व सांगणारा एक परिच्छेद विनायक कोंडदेव ओक यांनी लिहिताना म्हटलेय कुठे बरोबर न्यायचे असल्यास त्यांचे बोचके बांधावे त्याला ही ग्रंथांची ना नाही.’ शांताबाई शेळकेंना पारंपरिक काव्यगीतांचा सोस असल्याने त्याचेही प्रतिबिंब यात उमटले आहे. ही अर्थातच मौखिक परंपरा असते. ‘डावी तारी उजवी मारी । समोर करी घात पाठी उभा जगन्नाथ’ ‘नदीतीरावर बसून एकली । आसवे ढाळीत राही तिच्या आसावांनी नदीचा प्रवाह । अधिक सखोल होई’ अशी बरीच उदाहरणे देता येतील. संतांच्या अभंगांनीही येथे जागा मिळवली आहे. यात काहीच आश्चर्य नाही समर्थ रामदासांची सूर्यस्तुती ही प्रकाश द्विगुणीत करणारी आहे. ‘इतरांसंगे कमी परंतु अधिक स्वत:शी लढतो मी’ ही संत कबीरांची स्पष्टोक्ती मार्गदर्शक आहे. ऑस्कर वाईल्ड म्हणतो – ‘दु:ख हे निखळ स्वरूपात तुमच्यापुढे येते. ते सुखासारखे मुखवटा घालून येत नाही. दु:खाला एकप्रकारचा विलक्षण सच्चेपणा असतो. ते फार सधन असते. सुख हे सुंदर शरीरासाठी. पण दु:ख हे सुंदर आत्म्यासाठी. अनेक लेखकांची प्रसंग वर्णनेही दिली आहेत आणि ती सुंदरच आहेत. नाथमाधवांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी म्हटले ते देखील येथे आहे. अभंग जसे येथे आहेत तसा शृंगाराचाही थोडा बाज येथे आहे. मनाला सहज म्हणून चाळा लावणारी ही विचारसंपदा आहे. वाचकांचे कुतूहल वाढविणारी आणि सोबत जगण्याचे कारण शोधून देणारी ही पुस्तिका आहे. जुन्या आठवणीही यामुळे चाळवल्या जातात. चंद्रमोहन कुलकर्णींनी मुखपृष्ठावर मेहनत घेतलेली जाणवते. आपण हे पुस्तक सतत वाचनात ठेवावे. जमले तर इतरांनाही विचार सांगावेत. तीच खरी समृद्धी असते. तोच खरा हेतू असतो. -अशोक नारायण जाधव ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 31-03-2002

    साहित्यसोनियाच्या मुद्रा... कवयित्री शांता ज. शेळके यांनी संग्रहित केलेल्या साहित्याचे संकलन सुवर्णमुद्रा या नावाने मेहता प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. संस्कृत सुभाषिते, विनोद, माहितीवर मजकूर, सुंदर निसर्गचित्रे, थोरांची वचने अनुवाद करून संग्रहित ेलेली आहेत. या संकलनाचे हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. यापूर्वी मधुसंचय नावाने एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोन्याच्या मोहरा असा या संकलनाच्या शीर्षकाला समर्पक अर्थ आहेच; शिवाय मनावर उमटलेला सुवर्णठसा असाही अर्थ त्याला आहे. अतिशय उपयुक्त असे हे संकलन आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more