Vijay Bhadaneठसठशीत सुवर्णमुद्रा !!!
शब्दव्रती शांताबाई शेळके या
महान साहित्यिका होत्या . कथा,कविता गाणी , ललित लेख अनुवाद,निबंध,अशा कसदार साहित्य निर्मितीने मराठी भाषेला त्यांनी वैभवशाली केले मराठी साहित्य प्रांत समृद्ध केला
त्यांच्या सहजसुंदर,प्रासादिक व
ओघवत्या भाषाशैलीतील "सुवर्णमुद्रा " हे अद्वितीय
पुस्तक माझ्या वाचनात आले व त्याने मी अक्षरशा भारावून गेलो त्याचा थोडा परीचय .
लेखिकेने जेवढे लिहिले तेवढेच किंबहुना अधिक ब
हुवीध दर्जेदार असे वाचन
केले होते .संस्कृत,इंग्रजी
भाषेतील अभिजात साहि
त्य या विदुषीने वाचले हो
ते. वाचन करताना त्याती
ल निवडक उतारे,लक्षवेध
क वचने,सुभाषित,काव्य
पंक्ती,मार्मिक विनोद यांची
टिपण नोंदवहीत करण्या
ची त्यांना सवय होती पुढे
या आगळ्या छंदाची
व्याप्ती वाढली,कक्षा रुंदा
वली त्यातुनच लेखिकेचे
मधुसंचय व सुवर्णमुद्रा ही
आगळीवेगळी पुस्तके निर्माण
झाली.नोंदवहीत अभिजात
साहित्यातील टिपनांचे संकलन म्हणजे एकापरीने
मुद्रीत शब्दधनच म्हणजेच
"अक्षरांच्या सुवर्ण मुद्राचं"
होय. ,,म्हणून सुवर्णमुद्रा असे समर्पक नाव लेखिकेने या
पुस्तकाला दिले आहे.
या अभिनव पुस्तकात
अनेक ज्ञात,अज्ञात प्रतिभा
वंत जुने जाणते ,नवोदित
साहित्यिक ,तत्वज्ञ ,विचा
रवंत,कवी,नाटककार अशा
गुणवंताच्या साहित्याची
झलक दृष्टीस पडते.प्रसिद्ध
संतकवी,नाटककार, लोक
वाङमयातील पारंपारिक
ओव्या, गीत,विनोद यांचा
उल्लेख आढळतो
दुबळी माणसे संधीची वाट बघत बसतात मात्र
कर्तृत्ववान माणसे स्वताच
संधी निर्माण करतात !
उत्कट दुःखाप्रमाणे उत्कट
आनंदही निशब्द असतो
प्रश्न विचारून अज्ञान दूर
करु बघणारा क्षणिक अडाणी परंतु मुळीच प्रश्न न विचारणारा जन्मभर
अडाणी राहतो !
असे सुविचार म्हणी यांची
रेलचेल पुस्तकात आढळते
लेखिकेचा पिंड प्रतिभावंत
कवयित्रीचा असल्याने काही प्रतिभावंत कवींच्या
काव्यपाक्तींचा उल्लेख पुस्तकात आढळतो उदा
माझं दुःख माझं दुःख
तळघरात कोंडले
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगले ।
बहिणाबाई चौधरी
कसा उच्छादी हा वारा
केळ झोडपून गेला
किती झाकशील मांडी
नाही मर्यादा ग ह्याला
पु .शि रेगे
या काव्यपंक्ती प्रातिनि
धिक ठराव्यात
शांताबाईंनी आपल्या तरल बुद्धीने लोकहितवादी
च्या डौलदार मराठी भाषा
शैलीचा नोंद करून ठेवले
ला खालील उतारा बघा
" शेवटच्या बाजीराव पेश
व्याच्या कारकिर्दीत सौदे
गिरी फार माजली होती.
उनाड लोक शेंडी संजाब
दार ,पागोटे कंगनीदार,
जोडा अनिदार , अंगरखा
कळीदार,मिशा पिळदार,
धोत्रे चुणीदार,भुवया कमा
नदार,गंध साखळीदार,
छाती गोलदार अशी ढोंगे
करू लागले .पूर्वीचा साधे
पणा गेला "
NEWSPAPER REVIEWविविध विषयांवरील चिंतनगर्भ अवलोकने...
शांताबाई शेळके यांच्या व्यक्तितमत्त्वाला अनेक पैलू आहेत. मधुकर वृत्तीने कणाकणाने ज्ञानसंचय करण्यातील त्यांचा उत्साह साठीनंतरच्या काळातही अविरत अप्रतिहत चालूच आहे. शाळकरी वयात त्या आपल्याला आवडलेले सुविचार, सुभाषिते, विनोद, गमतीदार माहिती, काव्यपंक्ती वगैरे टिपणवहीत लिहून ठेवत. पुढे संस्कृत, इंग्लिश साहित्याशी परिचय घडला. त्यातीलही नवलाईचा खजिना त्या आपल्या टिपणवहीत आणू लागल्या.
मधमाशी जशी फुलाफुलांवर उड्या मारून कणाकणाने मधुर मध गोळा करते, तद्वतच शांताबार्इंचे सुंदर वचनांचे संकलन चालू असते. त्या वचनांमधील अर्थगांभीर्याने त्या भावविभोर होतात. त्याचा स्वत:शीच पुन:पुन्हा आस्वाद घेतात.
वेळोवेळी जमवलेल्या या सुविचारवजा पंक्ती म्हणजे त्यांना सुवर्णमुद्रा वाटतात आणि त्या सुवर्णमुद्रांची झळाळी आपल्या मित्रमंडळींना दाखवण्याची त्यांची उर्मी उफाळून येते. त्यातून मधुसंचय, सुवर्णमुद्रा यासारखी संकलने वाचकांसमोर अवतरतात.
‘सुवर्णमुद्रा’मध्ये चारपाचशे मुद्रांचा समावेश आहे. त्या सर्वच सर्वांना बावनकशी वाटतील असे नाही; परंतु वीसबावीस कॅरटची तरी शुद्धता त्यात नक्कीच जाणवेल. या सुवर्णमुद्रा मूळ कुठल्या भांडांरातून घेतल्या आहेत तेही शक्य तेथे नमूद केले आहे.
रामायण-महाभारत, वेदउपनिषदे ही भांडारे त्यांनी तूर्त बाजूला ठेवलेली असली तरी जपानी, चिनी, फ्रेंच म्हणी, सेनेकासारखे ग्रीक-रोमन योद्धे, ज्ञानेश्वर-तुकाराम-नामदेव-रामदास आदी संत, शंकराचार्य, कबीर, विवेकानंद, फादर स्टिफन्स वगैरे संतमहात्मे त्यांना प्रिय आहेत.
पाश्चात्य लेखकांमधील व्हिक्टर ह्युगो, टॉमस रीड, कान्ट, ऑस्कर वाइल्ड, शेक्सपियर, जॉर्ज इलियट, सॉमरसेट मॉम, मार्क ट्वेन, मार्टिन ल्युथर किंग, जॉन्सन, स्पेन्सर, बरट्रँड रसेल, अँड्र्यू कार्नेजी, ओ हेन्री, अब्राहम लिंकन, ट्रमर्सन, थोरो, मायकेल अँजेलो, जेम्स बॅरी, लुइझा अलकॉट, बाल्झॅक, आर्किटेक्ट फ्रॅंक लॉइड राइट, रॉबर्ट फ्रॉस्ट, वगैंरेंनी शांताबार्इंना भुरळ घातलेली दिसते.
बाकी मराठी कवीलेखक तर घरचेच. फुले, खांडेकर, फडके, शिरवाडकर, र.वा. दिघे, लोकहितवादी, आगरकर, माडखोलकर, शशीकान्त पुनर्वसू, माडगूळकर, नानासाहेब गोरे, बालकवी, नाथमाधव, ग.ल.ठोकळ, आचार्य कालेलकर, सावरकर, शरच्चंद्र, मुक्तिबोध, श्री. दा. पानवलकर, द.भि. कुलकर्णी. खानोलकर, पु.शि.रेगे. गो.ब. देवल, अच्युत बळवंत कोल्हटकर, श्री.म.माटे, दुर्गा भागवत, मारुती चितमपल्ली. इ, पासून डॉ. अभय बंग यांच्यापर्यंत लेखककवींची संस्मरणीय वाक्ये या सुवर्णमुद्रांमध्ये झगमगतात.
प्रत्येक सुविचाराला शीर्षक दिले आहे. तसे विषयवार वर्गीकरण व संकलन केलेले नाही त्यामुळे कुठेही कुठलाही विचार कुठल्याही क्रमाने आलेला आहे. या मुक्त उधळणीचा एक फायदा असा की कुठलेही पान उघडावे व वाचू लागावे. मागचा पुढचा संदर्भ बघायची गरज नाही. प्रत्येक वचन हे स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध असल्याने त्याचा मुक्त मनाने आस्वाद घ्यावा.
काही मासले बघा.
पवित्र - विद्वान माणसाने लेखनासाठी वापरलेली शाई ही हुतात्म्याने सांडलेल्या रक्ताहूनही अधिक पवित्र असते- महंमद पैगंबर
प्रतिभा व बुद्धिमत्ता - अव्वल दर्जाची प्रतिभा बऱ्याच वेळा उपाशी मरते. बऱ्यापैकी बुद्धिमत्ता जरीची वस्त्रे घालून डौलाने मिरवते- सॉमरसेट मॉम.
संधी - दुबळी माणसे संधीची वाट बघत बसतात. सामर्थ्यसंपन्न माणसे स्वत:साठी संधी निर्माण करतात.
शेजाऱ्याचे अंगण - शेजाऱ्याच्या अंगणात साठलेल्या कचऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या घरासमारचे अंगण झाडून स्वच्छ करा.
लढाई - दर दिवसाला जीवनमार्गी नवी पायरी चढतो मी, इतरांसंगे कमी परंतु अधिक स्वत:शी लढतो मी.- कबीर
बदल - परिस्थिती बदलत नाही. आपण बदलतो.
धिटाई - एखादे मांजर देखील राजाकडे धीट नजरेने बघू शकते.
सत्य - सत्य ही अत्यंत महाग व दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून बोलताना तिचा वापर जपून करा. - मार्क ट्वेन
धर्म - माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे - महात्मा गांधी
वाट - पावलामागे पाऊल टाकत राहिले की वाट आपोआप सरते.
फरक - प्रश्न विचारून आपले अज्ञान दूर करू बघणारा माणूस हा पाच मिनिटांपुरताच अडाणी असतो. पण जो मुळी प्रश्नच विचारत नाही तो जन्मभर अडाणी राहतो - चिनी म्हण
श्रीमंती - कर्तव्यदक्ष प्रेमळ पत्नी आणि निकोप प्रकृती यापेक्षा वेगळी श्रीमंती काय असते?
सुख - आपले विचार, बोलणे व प्रत्यच कृती यांच्यात एकमेळ, सुसंवाद असणे हे खरे सुख आहे.
घातक - भलत्या वेळी सांगितलेले सत्य असत्याइतकेच घातक असते.
उशीर - खरे सौख्य म्हणजे काय ते त्याला लग्न होईपर्यंत कळले नव्हते आणि तोवर फार उशीर झाला होता.
स्वर्ग - सुखी कुटुंब म्हणजे आपल्याला इहलोकी लाभलेला स्वर्ग आहे.
जुगार - लग्न हा एक जुगार आहे या. जुगारात पुरुष आपले स्वातंत्र्य पणाला लावतात तर स्त्रिया आपले सौख्य - फ्रेंच म्हण
वादळे - जितकी जास्त वादळे अंगावरून जातात तितकी ओकवृक्षाची पाळेमुळे जमिनीत अधिक खोलवर शिरतात.
कलावंताची प्रार्थना - परमेश्वरा, मला एकच वरदान दे. मला जे साधले आहे त्यापेक्षा सतत काहीतरी अधिक साध्य करण्याची इच्छा माझ्या मनात सतत राहू दे.- मायकेल अँजेलो.
जुनी पत्रे - जुनी पत्रे वाचताना खूप गंमत वाटते. आनंदही होतो. या आनंदाचे एक कारण असे की त्या पत्रांना उत्तरे लिहिण्याची जबाबदारी आपल्यावर नसते.
इशारा - तुम्ही जेव्हा आनंदात असता तेव्हा कुणालाही कसलेही वचन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा संतप्त असता तेव्हा कुणाच्याही पत्राला उत्तर देऊ नका - चिनी म्हण
DAINIK TARUN BHARAT 18-08-2002ज्ञानविचारांची सुवर्णमुद्रा उमटविणारे पुस्तक...
पुस्तके हा मानवी जीवनाचा अमोल ठेवा आहे तो यासाठी की ज्ञानाचा तो प्रमुख स्रोत आहे. आयुष्य जगण्यासाठी ज्या तात्त्विक व्यवहाराची गरज भासते ती अशा ज्ञानातून पूर्ण होत असते. आपल्या आजूबाजूला बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात आणि त्या अर्थातच अनुकरणीय असतात. चांगल्या गोष्टीतील सौंदर्य हे चिरकाल टिकणारे असते आणि म्हणूनच मांगल्याचा ठेवा टिकून राहिलेला असतो. आपण ऐकलेल्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी इतरांनाही सांगाव्यात अशी उर्मी उठली की एका पिढीचे कल्याण होते असे म्हणणे अतिशयोक्ती वाटू नये. चांगले ऐकावे आणि ऐकवावे असे ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके यांना वाटले आणि ‘सुवर्णमुद्रा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मेहता प्रकाशनाने ही जबाबदारी लगेच स्वीकारली.
परंपरेनुसार चालत आलेल्या पुस्तकी आणि मौखिक ज्ञानाचे काही कण आपल्यासाठी शेळकेंनी वेचले आहेत. जीवन जगण्यासाठी भाकरीखेरीज विचार लागत असतात आणि हे विचार धन मार्गदर्शक ठरणारे आहे. प्रख्यात विचारवंत, लेखक, कवी, चित्रकार, समाजसेवक इ. मानाच्या पातळीला चढलेल्या कलावंताचे आनुभविक शब्द नेमकेपणाने आपल्यासमोर येतात त्याचे प्रमुख कारण शांता शेळकेंची राजहंसवृत्ती. नेहमीच्या पद्धतीने परीक्षण करण्यासारखे हे पुस्तक नव्हे तर प्रत्येक वाचकाने आपल्याजवळ बाळगावे अथवा भेट देण्यासाठी सहज उचलावे असे पुस्तक आहे हे! या पुस्तकात विविध विषयांवरील मतांचा खजिना आहे. ज्याला तो आवडेल तो घ्यावा. काव्यपंक्ती, अभिप्राय, विशिष्ट वर्णन, विनोद, चुटके इ. सर्व काही येथे आहे. आधी याच धर्तीवरचे ‘मधुसंचय’ हे पुस्तक येऊन गेले आहेच. अर्थात वेचक आणि मोजकेच यात आहे आणि अजूनही अशा पुस्तकांची मालिका येऊ शकतेही. दुर्दैवाने आज त्या आपल्यात नाहीत.
या पुस्तकाची ओळख करून देणे म्हणजे उदाहरणे देणे कारण त्या विचारांचा मागोवा वाचकांनी घ्यायचा आहे, नव्हे तो आपल्या आयुष्याला लावून पाहायचा आहे.
‘मी माझे अंतिम ध्येय कसे गाठू शकलो याचे रहस्य मी तुम्हाला सांगतो. त्याचा माझ्या बुद्धिमत्तेशी फारसा संबंध नाही. माझी सारी ताकद माझ्या चिकाटीत आणि अमर्याद कष्ट करण्याच्या स्वभावात आहे’ – लूई पाश्चर.
मानवी जीवनाला मार्गदर्शक ठरणारी ही वाक्ये आहेत. मार्क ट्वेन म्हणतो– ‘सत्य ही अत्यंत महाग आणि दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून बोलताना तिचा वापर अगदी जपून, बेताबेताने करा.’
आचार्य अत्रेंविषयी प्र. श्री. कोल्हटकरांनी छानच लिहिले आहे. अत्रे यांचे आयुष्यच त्यातून प्रकट होते. मैत्रीविषयी बोलताना राल्फ वॉल्डो इमर्सन प्रांजळपणे म्हणतो– ‘जुन्या मित्रांचा एक असा फायदा आहे की त्यांच्या सहवासात आपण वाटेल तसे मूर्खासारखे बोलू किंवा वागू शकतो. ग्रंथाचे महत्त्व सांगणारा एक परिच्छेद विनायक कोंडदेव ओक यांनी लिहिताना म्हटलेय कुठे बरोबर न्यायचे असल्यास त्यांचे बोचके बांधावे त्याला ही ग्रंथांची ना नाही.’
शांताबाई शेळकेंना पारंपरिक काव्यगीतांचा सोस असल्याने त्याचेही प्रतिबिंब यात उमटले आहे. ही अर्थातच मौखिक परंपरा असते.
‘डावी तारी उजवी मारी । समोर करी घात
पाठी उभा जगन्नाथ’
‘नदीतीरावर बसून एकली । आसवे ढाळीत राही
तिच्या आसावांनी नदीचा प्रवाह । अधिक सखोल होई’
अशी बरीच उदाहरणे देता येतील. संतांच्या अभंगांनीही येथे जागा मिळवली आहे. यात काहीच आश्चर्य नाही समर्थ रामदासांची सूर्यस्तुती ही प्रकाश द्विगुणीत करणारी आहे. ‘इतरांसंगे कमी परंतु अधिक स्वत:शी लढतो मी’ ही संत कबीरांची स्पष्टोक्ती मार्गदर्शक आहे.
ऑस्कर वाईल्ड म्हणतो – ‘दु:ख हे निखळ स्वरूपात तुमच्यापुढे येते. ते सुखासारखे मुखवटा घालून येत नाही. दु:खाला एकप्रकारचा विलक्षण सच्चेपणा असतो. ते फार सधन असते. सुख हे सुंदर शरीरासाठी. पण दु:ख हे सुंदर आत्म्यासाठी.
अनेक लेखकांची प्रसंग वर्णनेही दिली आहेत आणि ती सुंदरच आहेत. नाथमाधवांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी म्हटले ते देखील येथे आहे. अभंग जसे येथे आहेत तसा शृंगाराचाही थोडा बाज येथे आहे. मनाला सहज म्हणून चाळा लावणारी ही विचारसंपदा आहे. वाचकांचे कुतूहल वाढविणारी आणि सोबत जगण्याचे कारण शोधून देणारी ही पुस्तिका आहे. जुन्या आठवणीही यामुळे चाळवल्या जातात. चंद्रमोहन कुलकर्णींनी मुखपृष्ठावर मेहनत घेतलेली जाणवते. आपण हे पुस्तक सतत वाचनात ठेवावे. जमले तर इतरांनाही विचार सांगावेत. तीच खरी समृद्धी असते. तोच खरा हेतू असतो.
-अशोक नारायण जाधव
DAINIK TARUN BHARAT 31-03-2002साहित्यसोनियाच्या मुद्रा...
कवयित्री शांता ज. शेळके यांनी संग्रहित केलेल्या साहित्याचे संकलन सुवर्णमुद्रा या नावाने मेहता प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
संस्कृत सुभाषिते, विनोद, माहितीवर मजकूर, सुंदर निसर्गचित्रे, थोरांची वचने अनुवाद करून संग्रहित केलेली आहेत. या संकलनाचे हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. यापूर्वी मधुसंचय नावाने एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोन्याच्या मोहरा असा या संकलनाच्या शीर्षकाला समर्पक अर्थ आहेच; शिवाय मनावर उमटलेला सुवर्णठसा असाही अर्थ त्याला आहे. अतिशय उपयुक्त असे हे संकलन आहे.
DAINIK PUDHARI 18-08-2002आशयगर्भ शब्दधनाचे संकलन ‘सुवर्णमुद्रा’...
अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात. कुणाला नाणी, पोस्टाची तिकिटे, जुन्या वस्तू इत्यादींचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्या छंदातच त्यांना आनंद लाभतो. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा छंद अगदी आगळावेगळा होता. पुस्तकात कुठं कांही वेधक, सुंदर आणि लक्षणीय आढळलं, की त्या ते स्वत:जवळ लिहून ठेवत असत. बालवयातील हा छंद मोठेपणी वाढत गेला. मराठी, इंग्रजी, संस्कृत वाङ्मयातील सुंदर वचने, सुभाषिते, निवडक उतारे, काव्यपंक्ती, मार्मिक विनोद असे जे जे त्यांना आवडले त्याचा त्यांनी संग्रह केला आणि अशा शब्दधनांचा संग्रह म्हणजेच ‘सुवर्णमुद्रा’ हे पुस्तक होय. मेहता पब्लिशिंग हाऊसद्वारा हे पुस्तक अतिशय देखण्या रूपात प्रकाशित झाले आहे. उत्कृष्ट शुभ्र कागद, उत्तम मांडणी आणि आकर्षक मुखपृष्ठ यामुळे प्रथमदर्शनीच पुस्तक मनात भरते.
पुस्तकातील विचारधन खरोखरच लक्षणीय आहे. ‘माणसे हवे तसे पैसे खर्च करतात. आयुष्याचा असाच अपव्यय करतात. गेलेल्या आयुष्याचा कुठे विचार करतात?’ ‘सत्य नेहमी सुळावर चढविले जाते. असत्याची सोन्याच्या सिंहासनावर गौरवपूर्वक प्रतिष्ठापना होते?’ ‘खिन्नता म्हणजे धर्म नव्हे.’. ‘गुरूच्या शब्दावर विश्वास हवा. गुरू म्हणजे सच्चिदानंद?’ ‘तुम्ही उत्कट आनंदाच्या भरात कुणाला वचन देऊन नका. संतापला असाल तर कुणाला पत्राने उत्तर देऊ नका.’ ‘दुसऱ्याच्या प्रकाशात चालण्यापेक्षा स्वत:च्या सावलीत चालणे सुरक्षित’ ‘एकटेपणाचे भय वाटणे, स्वत:ची संगत स्वत:ला नकोशी वाटणे, यासारख दुर्दैव नाही.’ ‘पुस्तक म्हणजे परमआनंदाचे निधान’ यासारखे विचार धन सुवर्णमुद्रेच्या रूपाने आपणास पानोपानी भेटते. मनन करण्यास भाग पाडते.
या पुस्तकात गमतीदार विनोदही आहेत, त्यातील मार्मिकता भावते. काव्यपक्ती मधून मधून नक्षत्रांचा सडा शिंपतात. ‘गर्द हिरव्या रम्य या आहेत राई. थांबण्या येथे परंतु वेळ नाही’, ‘कवितेने शब्द दिला शब्दाला अर्थ दिला अर्थाच्या पाठीशी प्रतिभेचा मंत्र दिला’, ‘माझं दु:ख जशी अंधारली रात’, माझं सुख माझं सुख हातातली काडवात,’ ‘फुलास काही चिंता नाही दिवस आजचा जाईल कसा?’ या सारख्या काव्यपंक्ती कुणाचे मन मोहित करणार नाहीत?
मराठी लेखक, कवींबरोबर पाश्चात्य लेखक कवी, तत्त्वज्ञ, विचारवंत तसेच ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, कबीर यांची भेटही या पुस्तकात होईल वाचकांना कोठेही कंटाळा येणार नाही त्याची जिज्ञासा वाढेल ते महत्त्वाच्या विचारांचे चिंतन करतील. मनोबल वाढविण्यास त्याची गरज असते. जे आपणास संकलित करण्याची इच्छा असून जमले नाही ते ते सर्व शांता शेळके यांनी आपणांसाठीच संकलित केलेला हा मधुसंच आहे असे वाचकांना जाणवेल. कितीतरी मनोरंजक माहिती, विनोद, उतारे आणि कविता आपणास इथे सोबत करतील. कुतूहल जनक, उद्बोधक माहिती विचार मंथन घडवेल.
DAINIK SAMANA 02-06-2002ज्येष्ठ साहित्यिक शांता शेळके यांचा व्यासंग आणि पाठांतर दांडगे आहे. त्यांना सवय अशी आहे, की वाचताना जे जे काही स्वत:ला आवडेल ते ते वहीत लिहून ठेवायचे. यात कवितांच्या ओळी, थोरांची वचने, सुभाषिते, विनोद, दुर्मीळ माहितीपर मजकूर असे सगळे असते. या संग्रहित केलेल्या मजकुराचे संकलन यापूर्वी ‘मधुसंचय’ या नावाने प्रकाशित झाले होते. पण त्यांचे भांडारच इतके मोठे आहे की दुसरा संग्रह येणे अपरिहार्यच होते. त्याप्रमाणे ‘सुवर्णमुद्रा’ या नावाने हे पुस्तक मेहता पब्लिशिंगने प्रकाशित केले आहे. सोन्याच्या मोलाच्या मुद्रित साहित्याचे संकलन असाही अर्थ शीर्षकातून निघू शकेल म्हणूनच या पुस्तकाला ‘सुवर्णमुद्रा’ असे नाव दिले आहे. या पुस्तकात संत कबीर, संत तुकाराम, विनोबा भावे, संत रामदास अशा संतांचे अभंग आहेत तसेच समिरसेट मॉम, मार्टिन ल्यूथर किंग, मायकेल अँजेलो अशांचे काही विचार आहेत. कधीतरी कोणत्याही लेखकाचे नाव नसलेला पण विलक्षण चित्रमय शैलीतला एखादा परिच्छेदही (पृ.१९ मांजराचे पिल्लू) वाचायला मिळतो. शांताबार्इंची रसिकता, सौदर्यदृष्टी, सहृदयता, उत्कटतेची ओढ या सगळ्याचा प्रत्ययच या पुस्तकात येतो. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हे समृद्ध भांडार वाचकांना खात्रीने रंजक व उद्बोधक वाटेल.
DAINIK LOKSATTA 16-06-2002‘व्यासंगाचे कंगोरे…
खरं रसिक मन सुंदर आणि मनस्वी गोष्टींचा मागोवा घेत जातं आणि त्याच वेळेला स्वत:ला दिसलेल्या गोष्टी तितक्याच तन्मयतेनं इतरांना सांगतं. आकाशात उमटलेलं इंद्रधनुष्य जेव्हा आपण जीव भरून पाहतो आणि त्याच वेळी ‘ते बघ’ म्हणून शेजारच्याला दाखवतो, तेव्हा आपण खरे रसिक असतो...
कविता, गीतलेखन, ललित लेखन, कथा, अनुवाद, समीक्षा, संपादन, अध्यापन अशा अनेक मार्गांनी मराठी भाषेमध्ये खोलवर मुळं रुजवलेल्या जेष्ठ साहित्यिका शांता शेळके जेव्हा एका रसिकाच्या भूमिकेत शिरतात तेव्हा ‘सुवर्णमुद्रा’ यासारख्या पुस्तकाची निर्मिती होते. मराठी साहित्यात स्वत:च्या प्रतिभेने मोलाची भर घातलेल्या शांताबाईनी मराठी रसिकांसाठी आपल्या संचिताचं हे जणू मृत्युपूर्व देणंच दिले आहे.
‘सुवर्णमुद्रा’ या पुस्तकाचं स्वरूप काहीसं वेगळं आहे. शांताबार्इंनी पुस्तकाच्या प्रास्ताविकात लिहिल्याप्रमाणे शाळकरी वयापासून त्यांना आवडलेल्या कवितांच्या ओळी, थोरांची वचनं, सुंदर निसर्गचित्र, सुभाषित, विनोद, दुर्मिळ माहितीपट मजकूर हे सारं वहीत लिहून ठेवण्याचा त्यांचा छंद होता. संस्कृत सुभाषिते आणि इंग्रजी कविता यांचे अनुवादही त्या करीत असत. या सर्व गोष्टींचे संकलन म्हणजे ‘सुवर्णमुद्रा’.
या पुस्तकात आपल्याला ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जनाबाई, रामदास, कबीर आदी संतकवी भेटतात. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, पंडित नेहरू, विनोबा भावे, इमॅन्यूएल काट आदी विचारवंताबरोबर सरोजिनी बाबर, अभय बंग यांचेही विचार वाचायला मिळतात. चिनी म्हणी आणि काही जपानी व इंग्रजी कवितांचे अनुवादही सामोरे येतात.
मराठी भाषेचं सौंदर्य दाखवणारे काही उतारे पुन:पुन्हा वाचावेसे वाटतात. ग. ल. ठोकळ (शेतीचे वैभव), सरोजिनी बाबर (आजोळ गावाकडचे), दुर्गा भागवत (नव्या लुगड्याचा आनंद), रा.भि.जोशी (गुलमोहर), र. वा. दिघे (मृगजळ), फादर स्टीफन्स (भाषा मराठी), मारुती चितमपल्ली (पाडस) अशी उदाहरणे या संदर्भात देता येतील. काही विचार इथे उद्घृत करण्याचा मोह टाळता येत नाहीत.
‘मी माझे अंतिम ध्येय कसे गाठू शकतो, याचे रहस्य मी तुम्हाला सांगतो. त्याचा माझ्या बुद्धिमत्तेशी फारसा संबंध नाही. माझी सारी ताकद माझ्या चिकाटीत आणि अमर्याद कष्ट करण्याच्या स्वभावात आहे.’ - लुई पाश्चर
‘प्रश्न विचारून आपले अज्ञान दूर करू बघणारा माणूस हा पाच मिनिटापुरताच अडाणी असतो. पण जो मुळी प्रश्न विचारत नाही, तो जन्मभर अडाणी रहातो’ - चिनी म्हण.
‘जगात जन्माला आलेले पहिले बाळ जेव्हा अगदी पहिल्यांदा हसले तेव्हा ते हसू लक्षावधी तुकड्यात फुटून सर्वत्र विखुरले. ते सारे तुकडे आनंदाने नाचत खिदळत सगळीकडे पसरले आणि त्या तुकड्यांतून पऱ्यांचा जन्म झाला.’ - जे. एम. बॅरी
आपल्या व्यासंगातून आणि आकलनातून सापडलेले महत्त्वपूर्ण कंगोरे वाचकांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवणाऱ्या शांताबार्इंना, या दोन्ही पुस्तकांच्या समर्पक मुखपृष्ठासाठी चंद्रमाहेन कुलकर्णी यांना आणि सुकब निर्मितीसाठी मेहता पब्लिशिंग हाऊसला निश्चितच धन्यवाद द्यायला हवेत.
-निरंजन उजगरे