N/A
काठीच्या टोकावर टेकलेल्या दोन्ही हातांच्या पंजावर हनुवटी टेकून; देवा टक लावून साहेबाकडे पाहात होता. बघता-बघता त्याचे डोळे वटारले, तांबडे-लाल झाले, नाकपुड्या फुरफुरू लागल्या, दातांवर दात घट्ट बसले आणि दंडांना कापरे भरले. डागदर ओरडला, ‘ऐकतोस काय, भ्यँचोत -’’ देवा सटक्याने खाली वाकला आणि पायातले धुळीने भरलेले तुटके पायताण उपसून घेऊन ओरडला, ‘अरं ए बांबलीच्या, चावडीचं जोतं उतरून खाली ये. शिव्या देणारं तुजं थोबाड फोडतो ह्या तुटक्या जोड्यानं!’’ दलित वाङ्मय ही संज्ञा आज ज्या अर्थाने रूढ झालेली आहे, त्याच्या कितीतरी अगोदर एका दलिताच्या मनातील विद्रोहाची भावना टिपणारी ‘देवा सटवा महार’ ही या संग्रहातील एक कथा. या व अशा इतर अनेक कथांमधून व्यंकटेश माडगूळकर गावरहाटीतील दलित जीवन त्यातील दारिद्र्य, दु:ख, संताप आणि अगतिकता यांसहित समर्थपणाने रेखाटतात. ग्रामीण आणि दलित असा एक बराचसा कृत्रिम भेद अलीकडील काळात मराठी साहित्यात रूढ होऊ पाहात आहे. माडगूळकरांच्या दलित जीवनावरील कथांचा हा संग्रह त्याला छेद देऊन मराठी ग्रामजीवनाच्या संदर्भात त्यांची एकसंध अशी जाणीव निर्माण करणारा आहे.