* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172039
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A NEW INNOVATIVE EXPERIMENT GIVING LIFE TO DEAD BY USING NANO TECHNOLOGY. THE BRAIN FROM A DEAD PERSON IS TRANSPLANTED INTO A BITCH, THE POWER OF THE CHAIR AND ITS MISUSE BY THE POLITICIAN, A SCIENTIST ACQUIRING WEALTH BY BEING ABLE TO TURN THE ATOMS OF LEAD INTO THAT OF GOLD, DIMBHAK FROM SOME FAR OFF PLANET, A SCIENTIST RECEIVING MIRACULOUS POWERS AND USING THEM TO ERADICATE THE TERRORISTS, FORMING OF A CLONE, SCIENTISTS FIGHTING SUCCESSFULLY WITH THE TUMOUR GROWING ALONG WITH THE FOETUS, RESEARCH ON THE ATOMS OF GRIFFIN, SCIENTIST REACHING THE MURDERER BY USING A PARTICULAR EXPERIMENT, A WEIRD INSECT; VARIOUS UNIQUE SCIENTIFIC CONCEPTS PUT TO GOOD USE, OR WORST BY SOME SCIENTISTS, PRESENTING THE VARIOUS ASPECTS OF HUMAN MIND…. SCIENTIFIC CONCEPTS AND HUMAN MIND WOVEN TOGETHER TO PRESENT READABLE, ENTERTAINING SCI-FI STORIES.
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग... मृत माणसाच्या मेंदूचं रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे... भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर... शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ ...परग्रहावरील डिंभक...पिंजकांमुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...क्लोननिर्मिती...गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्यूमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...ग्राफीनच्या कणांवरचं संशोधन...विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यांपर्यंत पोचणारा शास्त्रज्ञ...एक विचित्र कीटक...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग, दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ...त्यातून घडणारं मानवी मनाचं दर्शन... वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या गुंफणीतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह.
कै.श्री.ज.जोशी ग्रंथ पुरस्कार 2019 - पुणे नगर वाचन मंदिर

No Records Found
No Records Found
Keywords
#डिंभक#डॉ. संजय ढोले# #DIMBHAK#DR SANJAY DHOLE#
Customer Reviews
  • Rating StarKudekar Subhash

    It`s best readable collection of scientific concepts and ideas of the human mind. Great sir...

  • Rating StarTUSHAR KUTE

    डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्यानंतर मी वाचलेले डॉ. संजय ढोले हे चौथे विज्ञान कथा लेखक आणि त्यांचा "डिंभक" हा विज्ञान कथासंग्रह! आपल्या आवडत्या विषयात वाचन करण्याची मजाच काही और असते. `मनोरंजनाबरोबरच कुतूहल जागृत करणाऱ्या लक्षवेधक वज्ञानकथा` या सारांशाने मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विज्ञानाला अनुसरून लिहीलेल्या जवळपास सर्वच कथांची भट्टी छान जमून आलीये. पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे कथांचा सारांश असा... नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग... मृत माणसाच्या मेंदूचे रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे... भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर... शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ... परग्रहावरील डिंभक... पिंजकामुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा... क्लोननिर्मिती... गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्युमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात... ग्राफीनच्या कणांवरचे संशोधन... विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यापर्यंत पोहोचणारा शास्त्रज्ञ... एक विचित्र कीटक. अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग व दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ. त्यातून घडणारे मानवी मनाचं दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह... थोडसं वेगळं सांगायचं तर बऱ्याच कथांमध्ये ध्येयवेडे शास्त्रज्ञ व त्यांची प्रयोगशाळा अशी कथा रचना तयार झाली आहे. त्यामुळे कथेचा मूळ गाभा जरी वेगळा असला तरी त्यात सारखेपणा जाणवत राहतो. लेखकाने विज्ञानाच्या सर्व अंगांचा विचार केल्याचेही दिसते. एकंदरितच विज्ञान प्रेमींनी हे पुस्तक वाचावे असेच आहे. ...Read more

  • Rating StarDAILY LOKSATTA LOKRANG 29.9.19

    मराठीत कसदार विज्ञानकथालेखन हे अभावानेच आढळते. विज्ञानकथांचा उद्देश हा विज्ञान समजून सांगण्याचा नसला, तरी त्यातून नकळत वाचकाला विज्ञानातील संकल्पनांचा आपोआप परिचय होत जातो. त्याशिवाय विज्ञानातील शक्यतांचा आवाकाही लक्षात येतो. अर्थात या विज्ञानकथांचे ूत्र हे नेहमीच मानवी मूल्यांशी नाळ जोडणारे असावे लागते. डॉ. संजय ढोले यांच्या ‘डिंभक’ या विज्ञानकथासंग्रहात आपल्याला जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान अशा असंख्य विज्ञान शाखांतील नवनव्या संकल्पनांची सांगड घातलेली बघायला मिळते. ‘डिंभक’ हा त्यांचा पाचवा विज्ञानकथासंग्रह. नव्या दमाचे विज्ञानकथाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहेच. त्याला साजेशा अशाच या कथा आहेत. त्यांच्या या कथांमधील नायक हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने वाचकाला या कथा परक्या वाटत नाहीत. यातील कथासूत्रे मांडताना त्यांना ते विज्ञान विषयाचे प्राध्यापक असल्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. कुठलीही संकल्पना आधी माहीत असेल तरच ते कथासूत्र विस्तारणे व सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडणे शक्य असते. त्यामुळे त्यांचे लेखन हे सामान्य माणसाला समजेल असे आहे. त्यासाठी वाचकाला विज्ञान शाखेचा परिचय असलाच पाहिजे, असे मुळीच नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वच प्रश्नांना विज्ञानात उत्तरे आहेत असे नाही, कारण त्याहीपलीकडे असे काही आहे तेही यातून जाणवते. निसर्गचक्रात बदल करून आपण वाटेल ते करू शकतो हा माणसाचा अहंगंड असतो. त्यालाही टाचणी लावणाऱ्या कथा यात आहेत. त्यामुळेच या कथा वाचकाला अंतर्मुख करतात. क्लिष्ट वैज्ञानिक परिभाषा सोपी करत ते या कथांची गुंफण अशा लालित्यपूर्ण पद्धतीने करतात की, कथाबीज भाषेशी एकरूप होऊन जाते. कुठेही तांत्रिक पद्धतीने माहितीवजा काही तरी सांगितले आहे, असे वाटत नाही. कथांतील वैज्ञानिक प्रयोगातील शक्यता व प्रसंगी धोकेही अंगावर शहारे आणतात. यातील कथांमध्ये समाजजीवन, त्यातील भावभावनांची गुंतागुंत, मानवी संवेदना, विज्ञान परिकल्पना, रहस्यमयता, अद्भूतता आहे. वाचकांची उत्कंठा ताणून धरण्याचे कसब ढोले यांना साध्य झालेले आहे. ‘डिंभक’ या मुख्य कथेत उल्केवर सापडलेल्या अंडकोशाच्या फलनातून निर्माण झालेला डिंभक कसा बाटलीतला राक्षस बनून जातो.. हे दाखवले आहे. त्याला स्वत:ची बुद्धी व शक्ती असण्याची वेगळी कल्पना या कथेत दिसते. मग त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रा. शेंडे व प्रा. नाथ यांची धावपळ, खोल खड्डा खणून त्यात ती उल्का व ती डिंभकाची बाटली शिशाच्या वेष्टनात घालून गाडून टाकण्याची युक्ती.. हे सगळे वेगळे जग आहे. यात डॉ. नाथ हे प्राणिशास्त्रज्ञ आहेत, तर प्रा. शेंडे हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत. याचा अर्थ, एखाद्या संशोधनात केवळ एकाच शाखेचे ज्ञान असूनही उपयोगाचे नसते. काही वेळा त्यात इतर ज्ञानशाखांची जोड लागते- ती शेंडे यांच्या रूपाने दिली आहे. ‘सुगाव’ या कथेतही गुन्ह्यंच्या तपासात भूतकाळातील ध्वनिलहरींची जशीच्या तशी निर्मिती करण्याच्या तंत्रज्ञानाने गुन्ह्यचा छडा लावण्याची युक्ती तशी गुंगवून ठेवणारी. यातील परिसर व पात्रे मात्र जवळची वाटणारी, त्यामुळे ही कथा प्रभाव पाडून जाते. आजकाल लोकसंख्या वाढतच असली तरी अनेक जोडपी ही अपत्यसुखापासून वंचित असतात. ‘विळख’ या कथेतील मीनल व मिलिंद या कलावंत दाम्पत्याची कथा अशीच वेगळ्या अंगाने जाणारी आहे. मीनलच्या गर्भाशयात एकाचवेळी बाळ व कर्करोगाच्या पेशी वाढत असतात. यात सरतेशेवटी मीनलला वाचवण्यासाठी गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते, पण मीनलची अपत्याची आस तसे होऊ देत नाही. मग बाळ जन्मालाही येते, पण नंतर मीनलच्या पोटात कर्करोग वाढतो. अशा वेळी भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सुरेश गोसावी तिला वाचवण्यात मदत करतात. या कथेतील आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलवणारे चित्रण खिळवून ठेवणारे आहे. यात कोणतेही एक शास्त्र एकटय़ाने आपल्या समस्या सोडवण्यास पुरेसे नाही, हेच पुन्हा डॉ. ढोले येथे दाखवून देतात.‘सोनियाची खाण’ ही कथा माणसाला असलेल्या सोन्याच्या हव्यासाची आहे. यात डॉ. शिवराम मानेशिंदे हे सोने तयार करण्याच्या वेगळ्या प्रक्रियेचा शोध लावून श्रीमंत होतात, पण त्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. निसर्गातील रंगद्रव्यांवर आधारित ‘पिंजक’ या कथेत मूळ काश्मीरचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हमीद रेहमान हे व्यक्तीला अदृश्य करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढतात, पण नंतर ते तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागू नये यासाठी प्राणांचे बलिदान देतात. या संग्रहातील प्रत्येक कथा काही तरी वेगळेपण घेऊन आलेली आहे. त्यामुळे आपण शेवटच्या कथेपर्यंत कधी येऊन ठेपतो ते कळतही नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTRANG) 28-04-2019

    सामाजिक जाणिवांच्या विज्ञानकथा... डॉ. संजय ढोले यांचा ‘डिंभक’ हा विज्ञानकथांचा संग्रह अलीकडंच प्रकाशित झाला आहे. डॉ. ढोले यांचा हा पाचवा विज्ञानकथासंग्रह. नव्या पिढीचे ते वैशिष्ट्यपूर्ण कथाकार आहेत. ‘डिंभक’मध्ये बारा कथा आहेत. प्रत्येक कथा दुसऱ्या केपेक्षा निराळी आहे. आशय, विज्ञानसूत्र असो वा व्यक्तिरेखांचं चित्रण असो. या कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. विज्ञानकथेमध्ये आत्तापर्यंत निर्माण झालेल्या परंपरेला वेगळी दिशा देणारी ही कथा आहे. ढोले यांची पार्श्वभूमी दुर्गम आदिवासी भागातली आहे. पुढं संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही त्यांना या पार्श्वभूमीचं विस्मरण झालेलं नाही. हे या कथा वाचताना सतत जाणवत राहतं. त्यांचे कथानायक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्या विज्ञानकथांमधून चित्रीत झालेल्या प्रश्न आणि समस्यांचा पायाही सामान्य समाजजिवनाचाच आहे. त्यांचे कितीतरी कथानायक प्रतिकूल परिस्थितीशी झगडून विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात स्थिर झाल्यावर त्यांची पाळंमुळं विसरत नाहीत, हे ढोले यांच्या कथानायकांचं वेगळेपण आहे. ‘डिंभक’मधल्या कथा वाचल्यानंतर त्यातली चार सूत्रं लक्षात येतात. पहिलं सूत्र म्हणजे निसर्गात माणसानं हस्तक्षेप केला, तर निसर्ग माणसाला क्षमा करू शकणार नाही, या वास्तवाची जाणीव जितक्या लवकर मानवी समाजाला होईल तितकं ते त्यांच्या भल्याचं आहे. दुसरं सूत्र म्हणजे इतर क्षेत्रांप्रमाणं विज्ञान-संशोधनक्षेत्रातदेखील नैतिकता हे मूल्य पाळणं गरजेचं नव्हे अटळ आहे. विज्ञान-संशोधनात हे विचारात घेतलं नाही, तर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि याबाबतची जबाबदारी वैज्ञानकिांना नाकारता येणार नाही. तिसरं सूत्र म्हणजे विज्ञानाचा समाजासाठी विधायक वापर व्हायला हवा. चौथं सूत्र म्हणजे कोणत्याही क्षेत्रात मानवी संवेदना महत्त्वाची असते. ही संवेदनाच खऱ्या अर्थानं मानवाबद्दल करुणा, प्रेम, सहानुभूती निर्माण करू शकते. डॉ. संजय ढोले यांच्या कथांमधून प्रकटणारी ही सूत्रं पाहिली, तर त्यांच्या लेखनाची प्रेरणा आणि प्रयोजन लक्षात येतं. केवळ रंजन म्हणून या कथा लिहिल्या गेल्या नाहीत. या कथांमध्ये काही प्रमाणत रहस्यमयता, अद्भुतता, उत्कंठा या गोष्टी आढळतात; पण या रहस्यकथा नाहीत. डॉ. ढोले हे चांगल्या रहस्यकथा लिहू शकतात. त्याच्या खुणा या कथालेखनात आढळतात. मात्र, त्यांना विज्ञानकथाच लिहायच्या असल्यामुळं कथानकाची गरज म्हणून रहस्यमयता, अद्भुतता या कथांमध्ये आली आहे. विज्ञानातली परिभाषा ही बऱ्याचदा क्लिष्ट आणि बोजड असते. सर्वसामान्य माणसाला त्याचं आकलन होत नाही. याची जाणीव लेखकाला असल्यामुळं त्यांनी विज्ञानकल्पना, गृहितकं, परिभाषा सुबोध पद्धतीनं मांडली आहे. इंग्रजीतल्या अवघड संकल्पना त्यांनी सोप्या मराठीत उलगडून दाखवल्या आहेत. त्यामुळं वाचक अडखळत नाही. ‘डिंभक’ या कथासंग्रहातून मानवी भावभावनांचा गुंता अधोरेखित झाला आहे. त्याप्रमाणं समकालीन समाजातल्या प्रश्नांचा भविष्यकालीन वेध आहे. ‘विळखा’ कथेतल्या मीनल आणि मिलिंद या कलावंत दाम्पत्याला अपत्यप्राप्तीचं सुख लवकर प्राप्त होत नाही, परंतु डॉ. थत्ते यांच्यामुळं ते शक्य होतं; पण प्रसूतीकाळात जे नाजूक प्रश्न निर्माण होतात त्याची सोडवणूक डॉ. सुरेश गोसावी कशा पद्धतीनं करतात याचं चित्रण ढोले यांनी केलं आहे. ‘द डे आफ्टर’ या कथेत अणुबॉम्ब स्फोट झाल्यावर कोणत्या प्रकारचा विध्वंस होतो, त्याचं अंगावर काटे आणणारं, भयचकित करणारं चित्रण वाचायला मिळतं. एखाद्या माथेफिरूनं जाणीवपूर्वक असा स्फोट घडवला तर मानवी संहाराची काय अवस्था असू शकते याचं वर्णन सुजाण वाचकाला अंतर्मुख करतं. ‘अभय’ कथेतले प्रा. सोमादित्य बॅनर्जी हे शास्त्रज्ञ मृत माणसांना जिवंत करण्याचा शोध लावतात; पण हा शोध त्यांच्या अंगलट येतो. त्यांच्या मृत मित्राच्या शरीरावर प्रयोग करून ते त्याला जिवंत करतात आणि मित्राच्या मनातली डॉ. बॅनर्जी यांच्याविषयीची द्वेषभावना तीव्रतेनं उफाळून येते आणि तो डॉ. बॅनर्जींना ठार करतो. विज्ञानशोधामुळं मृत माणसं जिवंत झाली, तर मानवी जीवनव्यवहारात अधिकच गुंता निर्माण होऊ शकतो आणि तो विज्ञानाच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतो ही बाब ढोले यांनी फार समर्पकपणे समोर ठेवली आहे. ‘सोनियाची खाण’मधले डॉ. शिवराम मानशिंदे सोन्याचा शोध लावून प्रचंड श्रीमंत होतात; पण या शोधप्रक्रियेत त्यांच्याच शरीरावर विपरीत परिणाम होतात. ‘पिंजक’ कथेतले डॉ. हमीद रहेमान हे एखादी व्यक्ती अदृश्य होऊन दहशतवाद्यांना बिनदिक्कत कशी मारू शकते याचं प्रात्यक्षिक करतात; पण हे तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागलं, तर ते देशच उद्ध्वस्त करतील, या जाणिवेनं ते तंत्रज्ञान नाहीसं करून दहशतवाद्यांशी प्रत्यक्ष लढून धारातीर्थी पडतात. या संग्रहातल्या कथा मुळातूनच वाचाव्या अशा आहेत. एका वेगळ्याच शक्याशक्यतांचा वेध लेखकानं रंजकपणे घेतला आहे. वाचक त्यात गुंतून पडतो आणि विचारप्रवृत्तही होतो. विचारांना चालना देणं आणि मनात प्रश्न निर्माण करणं हे जर कथाकाराकडून घडत असेल, तर तो उत्तम कथाकार म्हटला पाहिजे. डॉ. संजय ढोले या निकषाला उतरतात. याबद्दल संदेह नाही. – डॉ. मनोहर जाधव ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more