* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482656
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 480
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘PLANTONE’ IS THE FIRST EVER ELABORATELY WRITTEN SCIENTIFIC NOVEL BY DR. SANJAY DHOLE, WHO IS ORIGINALLY A MAINSTREAM SCIENCE FICTION AUTHOR AND IS BRINGING THIS NOVEL TO THE WIDE SPREAD READERS IN MARATHI. INVOLVED WITH POLITICAL CHAOS, SOCIAL ASPECTS, LOVE ANGLE AND A MAJOR FIGHT AGAINST CORRUPTION, ‘PLANTONE’ IS BASED PRIMARILY ON PLANT SCIENCES AND THEIR RELATED ISSUES. PLANTONE IS THE NAME OF AN INSTRUMENT INDIGENOUSLY DEVELOPED BY DR. SAMEER, WHO IS THE WELL-KNOWN BOTANIST AND THE MAIN PROTAGONIST IN THE NOVEL. THIS INSTRUMENT ENABLES HIM TO LOOK INTO THE INTERNAL PROPERTIES OF PLANTS AND ALSO TO OBSERVE THE RESPECTIVE EMOTIONS. A MYSTERIOUS JOURNEY STARTS WITH ONE PARTICULARLY EXTRAORDINARY PLANT WHICH SPECIFICALLY CAPTURES AND RECORDS PERIPHERAL INCIDENCES AFTER PLANTONE IS USED. PLANTONE CERTAINLY TAKES ON ALL SECTIONS OF THE READERS CAPTIVATING WITH ITS FLOW TILL THE END.
डॉ. समीर ताटकरे यांनी तयार केलेलं ’प्लँटोन’ नावाचं इलेक्ट्रॉनिक उपकरण काय करतंय...तर काही वनस्पतींची विद्युत संकेतांद्वारे आजूबाजूचं अवलोकन करण्याची, प्रसंग, घटना साठवून ठेवण्याची व चित्रण करण्याची क्षमता दाखवू शकतंय... वनस्पतींमध्ये डोकावून, त्यातील सूक्ष्म मुळांचा शोध घेणं शक्य होत आहे, हेही सिद्ध करू शकतंय... थोडक्यात, हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि वनस्पतिशास्त्र यांची समीर यांनी यशस्वी रीतीने सांगड घातली आहे... या ’प्लँटोन’चा आणि वनस्पतिशास्त्रातील या संशोधनाचा फायदा होतो एका प्रामाणिक, निर्भय वनपाल अधिकाऱ्याला फाशीच्या शिक्षेतून मुक्त करण्यासाठी...रामपूर वनक्षेत्रातील अन्याय, अत्याचाराच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर ’प्लँटोन’रूपी विधायक विज्ञान संशोधन चेतवतं एक आश्वासक ज्योत...वनपाल क्षेत्रातील राजकारण आणि विज्ञान यांचा रंजकतेने समन्वय साधणारी डॉ. संजय ढोले यांची पहिली विज्ञान कादंबरी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#प्लँटोन #डॉसंजयढोले #विज्ञानकादंबरी #प्रेमाचारेणू #अश्मजीव #संकरित #डिंभक #अंतराळातीलमृत्यू #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #PLANTON #DRSANJAYDHOLE #VIDNYANKADAMBARI #PREMACHARENU #SANKARIT #ASHMAJEEV #DIMBHAK #ANTARALATILMRUTYU #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-06-2022

    विज्ञानातून गैरव्यवहाराला आव्हान!... विज्ञान कथालेखक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. संजय ढोले यांची ही पहिलीच विज्ञान कादंबरी, कथानक ज्या वेगाने पुढे जातं, त्याच वेगाने आजूबाजूची कल्पनासृष्टी आपल्यासमोर उभी राहते. खानदेशातील वनपरिक्षेत्र आणि कथानकाचा प्मुख नायक वनपाल सुनील सोनवणे आपल्या भेटीला येतात. त्यांचे स्वागतच वनपरिक्षेत्रात चालणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडींचं अचूक टिपण करतं. एकाच कादंबरीत दोन स्वतंत्र कथानकं - एक सामाजिक परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं, तर दुसरं विज्ञानजगताचा सारिपाट नेमक्या पद्धतीने मांडणारं! विशेष म्हणजे, ही दोन्ही कथानक समांतर असली तरी, परस्परांमध्ये आत्मीय सहसंबंध पाहायला मिळतो आणि त्यामुळेच वैज्ञानिक संकल्पनांपासून कोसो दूर असलेल्या वाचकालाही ‘प्लँटोन’ कादंबरी कवेत घेते. या कादंबरीत साहस, सामाजिक वास्तव, राजकीय कुरघोड्या, ध्येयवेडी माणसं, प्रेमाचा हळुवार स्पर्श, समर्पित जीवन, सर्वसामान्यांतला नायक आणि त्याहूनही सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वैज्ञानिक समुदायाची कार्यपद्धती आणि विज्ञानाचा अद्भुत आविष्कार असं सारं काही येतं. वाचकाला याच सुरुवातीच्या घडामोडींतून कादंबरीच्या उत्कटतेची ओढ लागते. सोनवणेंच्या कर्तव्यदक्ष कारकीर्दीचा लेखाजोखाच आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेतील जळजळीत वास्तव समोर ठेवतो. निसर्गसंपन्न रामपूर परिक्षेत्रात बदली होऊन आलेले सोनवणे, त्यांचे सहकारी जाधवकाका, साहाय्यक वनपाल निशिकांत ठाकरे, वाहनचालक नटवरसिंग या वनविभागातील प्राथमिक लोकांचे प्रयत्न दर्शवतात आणि त्यांच्याभोवती फिरणारं कथानक सर्वच भ्रष्ट यंत्रणांचा बीभत्स चेहरा समोर आणतं. विज्ञान कथानकाचा प्रमुख नायक सोनवणेंचा घनिष्ठ मित्र डॉ. समीर ताटकरे एका पत्राच्या रूपाने भेटायला येतात. हे पत्र मित्रप्रेमाची साक्ष तर देतंच, त्याचबरोबर वाचकाला अनपेक्षित धक्का देत नव्या समांतर कथानकाची रुजवण करतं. सोनावणेंच्या भ्रष्ट यंत्रणेविरुद्धाचा लढा आणि देशप्रेमापोटी भारतात परतलेल्या डॉ. समीर यांचा विज्ञानजगताला थक्क करणारा संशोधनाचा प्रवास हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. रामपूरमध्येच एका वनस्पती संरक्षण व संशोधन केंद्रात रुजू झालेले डॉ. समीर वनस्पतींमधील स्मृतिसदृश प्रथिनांचा शोध अशा ठळक अक्षरांत जेव्हा प्रबंध मांडतात, तेव्हा कादंबरीच्या बीजकथानकाला सुरुवात होते. वनस्पतींतील स्मृती प्रथिनांचा शोध घेणारं यंत्र म्हणजे ‘प्लँटोन’ कादंबरीचा नायक आहे. या यंत्राची निर्मिती केवळ विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या वाचकालाच थ्रिलर अनुभव देते असं नाही, तर सर्वसामान्य व्यक्तीही ‘वनस्पतींना मेंदू आहे का?’ या कल्पनेनेच प्रभावित होते. डॉ. समीर यांच्या सहकारी डॉ. अंजली सहसंशोधक म्हणून कार्य करतात. संशोधक संस्थेतील वातावरण देशातील आजच्या रखडलेल्या संशोधनामागचं कारण अगदी लिटमस टेस्टसारखं स्पष्ट करतं. कथानकाच्या निमित्ताने का होईना, सर्वसामान्यांना देशात संशोधन कसं चालतं, प्रकल्प कसे सादर होतात, चर्चा कशी होती आणि देशात कोणकोणत्या संशोधन संस्था आहेत याची तरी जाणीव होते. त्यांची कार्यपद्धती वाचकाच्या नकळत स्मरणात राहते. वनसंपदेने समृद्ध असलेल्या वनपरिक्षेत्रातील चंदन तस्करी रोखण्यासाठी सोनवणे आटोकाट प्रयत्न करतात; परंतु अगदी वनरक्षकापासून वरिष्ठ अधिकारी, आमदार ते मंत्री अशा अनेकांच्या कुटील साखळीमुळे हे प्रयत्न अपुरे ठरतात. अगदी जीवघेण्या प्रसंगांचाही सामना त्यांना करावा लागतो. अशा वेळी त्यांना दैनिक चव्हाट्यावर या वृत्तपत्राचे वार्ताहर जयंत पाटील, पोलीस सबइन्स्पेक्टर गोविंद पवार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष संरक्षक लाभतात. डॉ. समीर यांनी वनस्पतींमधील स्मृती प्रथिनांचा घेतलेला शोध, त्याचा चंदनतस्करी रोखण्यासाठी होणारा उपयोग आणि त्याहीपेक्षा सोनवणेंना न्याय मिळवून देण्यासाठी वनस्पतीने दिलेली साक्ष, एक थ्रिलर अनुभव वाचकाला देते. वैज्ञानिक तथ्यांशी कोणतीही तडजोड न करता लेखक अगदी सहजतेने सर्वसामान्य व्यक्तीला विज्ञानाच्या उत्कटतेची सफर घडवून आणतो. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचं समाजातील महत्त्व अधोरेखित होतं. कथानकाबरोबरच उत्कटतेचा प्रवासही परमोच्च बिंदू गाठतो. वाचकाला जाणवणाऱ्या उत्कटतेला न्याय देणारा वेग कादंबरीने साधला आहे. म्हणजे कादंबरीच्या शेवटी वाढलेला वेग उत्कटतेला पूरक ठरतो. मराठी विज्ञान कादंबरीच्या प्रवासात ही कादंबरी एक मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. – सम्राट कदम ...Read more

  • Rating Starकैलास ताराचंद ढोले

    वनस्पतींना सुद्धा स्मृती असू शकते ही कल्पना सूचणे सर्वसामान्यांच्या कल्पने पलीकडील गोष्ट आहे. पहिले दोन प्रकरण वर्णनात्मक असल्याने थोडसं हळूवार वाचले गेले पण त्यानंतर एक एक पात्राची एन्ट्री होत गेली आणि कथेला हळू हळू स्पीड प्राप्त होत गेला तसतसा ाझा वाचनाचा वेगही कथानकाच्या गतीनुसार वाढला. मी तीन ते अकरा भाग एका दमात एका जागी बसून न उठता पाणीही न पिता एका बैठकीत वाचन केले. यावरुन कादंबरीची ओघवती शैली, उत्कंठा, रंजकता लक्षात येते. प्रकरण क्रमांक 12 मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये वनस्पतीचे विविध कार्य त्याची रचना हे सगळं आलेला आहे त्यात ज्याचा शास्त्राशी संबंध नाही त्याला तेवढं ते दोन-तीन पान वाचताना थोडसं जड जातात आणी वाचनाचा वेग थोडासा मंदावतो परंतु विज्ञान कादंबरीची ती मागणी आहे ते क्लासिफिकेशन येणे जरुरी आहे आणि ते अत्यंत चपखल पणे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बसवले आहे. पुढील काही भागातही वनस्पतीचे वैज्ञानिक वर्णन आलेलं आहे परंतु कथेतील रंजकता ओघ आणि वेग यामुळे तो भाग त्याच वेगाने निघून जातो. डॉक्टर समीर दवाखान्यात असताना आदिवासी लोक एक पिशवी परत करून जातात त्यावेळी असं वाटतं की या पिशवीतच पुढे काहीतरी घडणार आहे परंतु डॉक्टर समीर ला डीस्चार्ज देताना ती पिशवी परत केली जात नाही त्यावेळेस मनात थोडीशी खंत राहून जाते नंतर ती पिशवी पुन्हा डॉक्टर समीर कडे पान नंबर 212 वर येते. उपकरणात साठवून ठेवलेले मेमरी तील माहिती का पुसली गेली हा प्रश्न मात्र शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिला. बऱ्याच ठिकाणी भावनिक गुंफण अतिशय उत्कृष्टपणे निर्मिती केली आहे जसे मित्रांची ओळख आणि तेही एकाच ठिकाणी नोकरीला येणे त्यानंतर सोनवणे यांनी फॅमिली आणल्यानंतर प्रसंग यातील भावनिक प्रसंग त्यानंतर डॉ. समीर दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतरचा प्रसंग अप्रतिम. कादंबरी लिखाणात वर्णन अप्रतिम. वर्णन हे 4D चित्रपट पाहिल्यासारखे, चौफेर सुक्ष्म केल्याने कादंबरी वाचत असताना आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो आणि तो प्रसंग आपण प्रत्यक्ष जवळ उभे राहून बघतोय असं वाटतं. कादंबरी चा सुरुवातीचा प्रसंग मन मानायला तयार नव्हतं सोनवणें सोबत रेल्वेत प्रथम श्रेणीत मी ही चढलो होतो.आणी प्रथम श्रेणीत सोनवणे यांनी खिडकी उघडून हवेचा चा थंड झोत अंगावर घेतला होता मी मात्र प्रथम श्रेणीत चढल्या बरोबर ACच्या गार हवेने आधीच थंड झालेलो होतो त्यामुळे सोनवणे यांचे खिडकी उघडणे मला थोडे जड गेले. मग मी सर्च केल्यावर असे समजले की, काही रेल्वेत प्रथम श्रेणीत non AC सुविधा आहे. आणी माझे समाधान झाले. कादंबरी लिहिण्यासाठी जवळपास वीस वर्षाचा कालावधी लागला. त्यात भरपूर अडचणी आल्या.असे असताना मधेच कादंबरी लिखाण थांबल्याने व पुन्हा जेव्हा ते कादंबरी लेखन सुरू झाले यावेळेस मागचे सर्व संदर्भ लक्षात ठेवणे खरंच आपले कौशल्य आहे.आणी एवढी मोठी कादंबरी लिहिणे ही सोपी गोष्ट नव्हती . लिखाणातील खंडानंतर घटना पात्र नेमके लक्षात ठेवून पुढे लिहिणे यात तुमच्या स्मृतीचाही कस लागला आहे. बऱ्याच दिवसानंतर कादंबरी वाचन केले कादंबरी उत्कंठा वाढवत नेणारी व रंजक असल्याने चार बैठकीत मी कादंबरी पूर्ण संपवली शेवटपर्यंत कुठेही कंटाळवाणे वाटले नाही . आणि विज्ञानात रंजकता आणून मांडणे ही धुरा आपण समर्थपणे सांभाळली आहे. शेवटी एवढी मोठी कादंबरी लिहिणे खरच ग्रेट. मनापासून सलाम🙏🙏 - कैलास ताराचंद ढोले ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-04-2022

    वनस्पतींच्या जगतातील ‘सायन्स थ्रिलर’... मराठी साहित्यात विज्ञानकथा आणि कादंबऱ्यांचे दालन प्रशस्त होत आहे. विज्ञानकथा किंवा कादंबरी लिहिणे ही सोपी बाब नव्हे; परंतु वैज्ञानिक कथावस्तू आणि वाङ्मय यांची अजोड अशी गुंफण घालणाऱ्या शास्त्रज्ञ-लेखकांची एक परपरा मराठीत विकसित होत आहे. डॉ. संजय ढोले हे त्या परंपरेतील एक महत्त्वाचे नाव. ‘प्रतिशोध’, ‘अश्मजीव’, ‘अंतराळातील मृत्यू’, ‘डिंबक’, ‘संकरित’ हे विज्ञानकथासंग्रह त्यांच्यातील साहित्यिक अधोरेखित करणारे आहेत. आता त्यांनी विज्ञान कादंबऱ्यांच्या दालनात प्रवेश केला आहे. ‘प्लँटोन’ ही त्यांची पहिलीच विज्ञान कादंबरी. वनस्पतींच्या भावभावनांना केंद्रस्थानी ठेवून, डॉ. ढोले यांनी साकारलेली ही कादंबरी विज्ञान साहित्याच्या सर्व कसोट्यांना उतरणारी तर आहेच; परंतु त्याचबरोबर एका निखळ थरारक कादंबरीची अनुभूती देणारीही आहे. ‘प्लँटोन’ ही खरे तर ‘सायन्स थ्रिलर’ आहे. वनखात्यातील काही मतलबी अधिकारी आणि वजनदार राजकीय नेते यांच्या भ्रष्ट युतीतून जंगलातील काळे व्यवहार रोखण्यासाठी, प्राण्यांची पर्वा न करणाऱ्या प्रामाणिक वनाधिकाऱ्यांचा संघर्ष या कादंबरीत डॉ. ढोले यांनी वेधकपणे मांडला आहे. वैविध्यपूर्ण वनस्पतींनी संपन्न असलेले जंगल, तेथील साधेभोळे आदिवासी, स्थानिक राजकीय नेत्यांची आणि गुंडांची दहशत, त्यांच्याकडून होणारे आदिवासींचे शोषण या पार्श्वभूमीवरील संघर्ष वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा आहे. रहस्यमय घटनांद्वारे उलगडणाऱ्या या कादंबरीत धडाडीचा अधिकारी सुनील सोनवणे, कुशाग्र बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॉ. समीर ताटकरे, प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत, निष्टेने आरोग्यसेवा देणारी आदिवासी डॉक्टर इला गावित ही या कादंबरीतील प्रमुख पात्रे; परंतु खरा कथानायक आहे. ‘प्लँटोन’. वनस्पतींच्या अंतरंगातील गुणधर्माचा वेध घेण्यासाठी, तसेच त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपकरणाची या कादंबरीत अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कादंबरीतील थरार मांडताना विज्ञानाला केवळ पार्श्वभूमीवर न ठेवता समोर आणून, त्याद्वारे कथेला वळण देण्याचा डॉ. ढोले यांनी केलेला प्रयोग वाचनीयता वाढविणारा आहे. कादंबरीतील घटना-घडामोडी अतिशय जलदतेने घडणाऱ्या असल्या, तरी तिचा पट मोठा आहे. कथानक घडते, ते रामपूर वनक्षेत्रात. संपूर्ण कादंबरीभर हे वनक्षेत्र पार्श्वभूमीच्या स्वरूपात आहे. त्यामुळेच कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाने त्याची सफर घडवून आणली आहे. एखाद्या कॅमेऱ्याने विहंगम दृश्य टिपावे, तशा पद्धतीने लेखकाने या वनक्षेत्राचा भूगोल उलगडला आहे. या क्षेत्रात सोनवणे अधिकारी म्हणून, तर याच क्षेत्रात असलेल्या संशोधन संस्थेत डॉ. ताटकरे येतात. ते येण्याच्या आधीपासून तिथे सुरू असलेली तस्करी, काळे व्यवहार आणि हे सारे लपविण्यासाठी होत असलेला दहशतवाद रहस्यमय घटनांद्वारे मांडत कथानकाला लेखकाने गती दिली आहे. वनस्पतींच्या गुणधर्माचे संशोधन उलगडत कथानक पुढे नेताना, लेखकाने मानवी नातेसंबंधांचाही सूक्ष्मपणे वेध लेखकाने घेतला आहे. विज्ञानातील, विशेषत: ‘प्लँटोन’चा तपशील मांडताना तो वाचकांना सहज उमगेल, इतकेच नव्हे तर त्याला त्यात रस निर्माण होईल आणि कथानकाचा वेग कमी होणार नाही, याची काळजी डॉ. ढोले यांनी घेतली आहे. ‘प्लँटोन’द्वारे विशिष्ट वनस्पतीतील मेंदूसदृश प्रथिनांचा शोध लागल्यानंतर कादंबरी अधिक गतिमान होते. जंगलातील गूढ घटनांची उकल होण्यास मदत होऊ लागते आणि संघर्षही वाढतो. कथानकातील ‘प्लँटोन’ची भूमिका आणि कादंबरीचा शेवट विलक्षण आहे. कादंबरीतील सर्व पात्रे अस्सल वाटतात. कादंबरीची भाषाही साधी-सोपी आहे, त्यामुळे कादंबरी मोठी असली आणि बरीक सारीक तपशील टिपणारी असली, तरी कंटाळवाणी होत नाही. विज्ञानकथा भविष्यवेधी असतात. उद्याचे जग कसे असू शकेल, विज्ञानामुळे आपल्या जीवनात काय बदल होऊ शकेल, हे विज्ञानकथा सहजपणे सांगत असतात. ‘प्लँटोन’द्वारे डॉ. ढोले यांनीही वनस्पती आणि मानवी नात्याचा वेध घेतला आहे. मानवी जीवनात वनस्पती आणखी काय भूमिका बजावू शकतात, हे मांडले आहे. विज्ञानात रुची नसली, तरी ‘प्लँटोन’ वाचाविशी वाटते. यातच लेखकाचे यश आहे. – श्रीधर लोणी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more