DAINIK TARUN BHARAT 02-07प्रयोगाअंती आनंदप्राप्ती करून देणारे मार्गदर्शक...
‘चला, प्रयोग करू या! हा बारा पुस्तिकांचा संच आहे. श्रीमती मीना किणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या या लेखनात प्रयोगातून विज्ञान शिकण्याची उत्तम रीत दाखविण्यात आली आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल बारा विष निवडून प्रकाशकांनी ज्ञानाच्या विशाल आवाक्यातील महत्त्वाचा टप्प्यांच्या वाटचालीचा मनोवेधक परिचय छोट्यांबरोबरच जिज्ञासू वाचकांना करून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रांजलपणे म्हणावे लागेल. पालक आणि शिक्षण यांना हा संच खचितच उपयोगी ठरणार आहे.
विजेरीमधील बल्ब लावण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा त्यातील विद्युत घट पुरवतात या आपल्या परिचयातील घटनेपासून सुरुवात करून ऊर्जेचे यांत्रिक, विद्युत, रासायनिक, किरणोत्सर्जक, चुंबकीय, औष्णिक, ध्वनी, आण्विक या वेगवेगळ्या प्रकारांविषयीची माहिती जिज्ञासूंना जाणून घेता येते. तसेच या प्रत्येक ऊर्जेशी संबंधित अशा प्रयोगांतून त्या त्या ऊर्जेची ओळख परिपूर्णतेने होते.
या संचातील ‘परिस्थितीशास्त्र’ या पुस्तिकेचा उल्लेख विशेषत्वाने करावासा वाटतो. ‘परिस्थितीशास्त्र म्हणजे पृथ्वीवर असणारी सजीवसृष्टी आणि सभोवतालचे पर्यावरण यांच्यातील परस्पर (अन्योन्य) प्रतिक्रियांचे शास्त्र’ अशी सरळ सोपी व्याख्या प्रथमत:च वाचावयास मिळते. कृषिशास्त्र, वनशास्त्र, वन्यजीव, मृदा संवर्धन, पर्यावरण, प्रदूषण आदी विषयांचा अंतर्भाव परिस्थितीशास्त्रात केला जातो. हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, तेल प्रदूषण याविषयी प्रयोगांसह माहिती दिली आहे. मृदा संवर्धन, वनस्पतींची वाढ, हरितगृह याबरोबर वातऊर्जा, सौरऊर्जा, जैववस्तूजात ऊर्जा यांच्याविषयी माहिती प्रयोगाच्या माध्यमातून देत असतानाच गांडूळ व कीटकांचे परिस्थितीशास्त्र ही माहितीदेखील योग्य अशीच आहे.
‘रसायनशास्त्राविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकेत अन्य प्रयोगांबरोबरच अदृश्य शाई तयार करणे, आगशमन उपकरण तयार करणे, फसफसणारे सॉफ्ट ड्रिंक तयार करणे, दुधापासून प्लास्टिक तयार करणे, साधा विद्यत घट तयार करणे, ज्वालामुखीची प्रतिकृती तयार करणे असे प्रयोग समजावून दिलेले आहेत. रसायनांच्या संदर्भात प्रयोग करताना घ्यावयाची काळजी जागरूकतेने दिलेली आहे.
‘हवे’विषयीच्या पुस्तिकेत आपल्या फुप्फुसाची क्षमता, हवेला वजन असते, फुग्यांचे रॉकेट, हॉवरक्राफ्ट तयार करणे, स्प्रेगन तयार करणे, कागदाची पवनचक्की, कागदाचे हेलिकॉप्टर असे कितीतरी प्रयोग समजावून दिलेले आहेत. अणूची प्रतिकृती, साखरेचा स्फटिक तयार करणे, प्लॅस्टिसीनची बोट तयार करणे, तरंगणारे पट्टे, तरंगणारा धातू, जादूची बोट आदी प्रयोगांची माहिती ‘पदार्थ’ या पुस्तिकेत दिली आहे.
या संचातील आजच्या काळाशी अधिक सुसंगत ठरणारी पुस्तिका ‘अवकाश’ ही आहे. पृथ्वीच्या वातावरणापलीकडील विश्वातील निर्वात पोकळी म्हणजे अवकाश (अंतराळ, अंतरिक्ष) अवकाश या शब्दामागोमाग आपणास सहजपणे सुचणारे विचार म्हणजे अवकाशातील प्रयोगशाळा, अवकाशयात्रींचा गणवेश, अवकाशयान, अग्निबाण, अवकाशातील स्थानके. या सर्वांसंबंधीची काटेकोर माहिती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने करावयाचे प्रयोग खरोखरच बुद्धीला चालना देणारे आहेत. पुस्तिकेच्या शेवटी अंतराळस्थानक बनवण्याची कृती दिलेली आहे. आहे की नाही गंमत?
‘हवास्थिती’, ‘गती :चलन’, ‘ध्वनी’ आणि ‘मोजमापे’ या अन्य चार पुस्तिकांमधूनही त्या त्या विषयाशी सुसंगत अशी शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. हवास्थितीची अद्भूतता, हवास्थिती वर्तवणे, वेगाची चाचणी, स्थिरता व गती, न्यूटनचे गतीविषयक नियम, ग्लायडर तयार करणे, गतीस मदत करणारी साधी यंत्रे, ध्वनी कसा निर्माझ होतो, ध्वनी कसा पसरतो, ध्वनी ऐकू कसा येतो, ध्वनीचा वेग कसा मोजायचा, ध्वनीवर्धन करणारी उपकरणे, टेलिफोन, रेडिओ, मोजमापांची एकके व प्रमाणे, लांब अंतरांची मोजणी खगोलीय मापन, कलागणना, विद्युत मापन असे अनेक महत्त्वाचे विषय त्या त्या संबंधीच्या पुस्तिकांतून मनोरंजक पद्धतीने समजावून देण्यात आले आहेत.
बारा पुस्तिकांच्या या संचात तीनशेहून अधिक प्रयोगांविषयी माहिती आहे. मुबलक चित्रे, स्वच्छ छपाई, शास्त्रीय इंग्रजी शब्दांना पर्याय मराठी शब्द ही देखील या संचाची उपयुक्तता सिद्ध करते. एकूण संचात तुरळक मुद्रण दोष (इंग्रजी/मराठी) आढळतात. त्याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक वाटते.
-वसंत निगवेकर ...Read more
DAINIK SAMANA (KOLHAPUR)दोस्तांनो, एका पुस्तकाची मी ओझरती ओळख करून दिली होती. पुस्तकाचं नाव होतं – ‘चला, प्रयोग करूया.’ खरं पाहिलं तर ‘चला, प्रयोग करूया’ ही १२ पुस्तकांची मालिका. या मालिकेतील सर्व पुस्तकांची नावं सांगायची तर ती अशी – उर्जा / उष्णता / अन्न / परिस्थितीशास्त्र/ रसायने / हवा / पदार्थ / अवकाश / हवास्थिती / गती : चलन / ध्वनी / मोजमापे.
ही सर्व पुस्तकं लिहिलीत ती साडेतीन वर्षे पॅरिस विद्यापीठात संशोधन करून सध्या पुण्याच्या स.प. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या मीना किणीकर यांनी. या सर्व पुस्तकामागची भूमिका मांडताना त्या म्हणतात – ‘विज्ञान म्हणजे आनंद आहे, मौज आहे हे सांगण्याचा या पुस्तकांचा उद्देश आहे. या पुस्तकांतील साधे आणि सोपे प्रयोग छोट्या आईनस्टाईनना मोहात टाकतील, त्यांचे कुतूहल वाढवतील. एवढंच नव्हे तर ही पुस्तके तरुण वाचकांनाही विज्ञानाच्या अज्ञात, अद्भुत जगाचा शोध घेण्याची स्फूर्ती देतील, जिज्ञासा निर्माण करतील. प्रयोगातून विज्ञान हे नेहमीच एक आवाहन आणि आव्हान असते.’
दोस्तांनो, या १२ पुस्तकांपैकी आपण ओळख करून घेऊया ती ‘गती : चलन’ व ‘उष्णता’ या दोन पुस्तकांची. ‘गती : चलन’ या पुस्तकात एकूण सहा प्रकरणं आहेत. हालचाल, स्थिरता व गती, प्रेरणा (बल, शक्ती), दैनंदिन व्यवहारातील प्रेरणा, काही सामान्य हालचाली व गतीस मदत करणारी साधी यंत्रे ही ती सहा प्रकरणं.
पुस्तकात करण्यासारखे तसे खूप (साधे, सोपे, बिनखर्चिक व विज्ञानातील प्रत्येक) प्रयोग आहेत. उदाहरणार्थ, ‘हट्टी नाणे’ : एक ग्लास, एक पोस्टकार्ड, एक नाणे या वस्तू घेऊन तुम्ही हे हट्टी नाणे ग्लासातच कसे जाते हे मित्रांना दाखवू शकता किंवा एक गोटी, एक क्रिकेटचा चेंडू व वाळू भरलेला चौकोनी खड्डा याच्या साहाय्याने गोटीपेक्षा क्रिकेटचा चेंडू वाळूत जास्त खोलवर कसा जातो हे दाखवू शकता.
गती म्हटलं की, न्यूटनचं नाव आलंच. पुस्तकात न्यूटनचे गतिविषयक नियम दिलेत तसेच जवळपास ५० पर्यंत छोटे-मोठे प्रयोग देत तुम्हाला ‘गती’चं ज्ञान करून दिलेय.
जी गोष्ट ‘गती’ची तीच उष्णतेची. लहानपणी ‘ते हाऽऽ आहे... हात लावशील ना तर चटका बसेल...’ असं मोठी माणसं म्हणत लहानांना ज्या गोष्टीची ओळख करून देतात ती ‘उष्णता’ ही गोष्ट तशी समजायला सोपी. आता तुम्हाला जर मी ‘एक किलोमीटर जाडीच्या बर्फाच्या थरात सूर्याला गुंडाळले तर नव्वद मिनिटांत सगळे बर्फ वितळून जाईल... सूर्याची उष्णता इतकी प्रचंड आहे...’ असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना!
पण दोस्तांनो, अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही साध्या-साध्या प्रयोगातून (प्रसंगी आई-वडिलांची वा शिक्षकांची मदत घेत) करू शकता. या प्रयोगांबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची तर इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतचा तुमचा विज्ञानाचा (प्रयोगासह) अभ्यास करून घेणारी ही सर्व पुस्तकं अतिशय सोप्या भाषेत लिहिली गेलीत. तेव्हा विज्ञानाच्या पूरक अभ्यासासाठी ही सर्व पुस्तकं तुम्ही अवश्य वाचा.
वरील सर्व पुस्तकं पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रसिद्ध केलेली असून प्रत्येक पुस्तकाची किंमत २० रुपये आहे आणि लेखिका आहेत मीना किणीकर.
तर दोस्तांनो, पुस्तकं मग ती गोष्टीची असो वा विज्ञानविषयक – त्यांच्याशी ‘मैत्री’ केली की ती मैत्री कधीच सुटत नाही. उलट ती हळूहूळ वाढतच जाते. आपण काय वाचावं याचं ज्ञान आपल्याला होऊ लागतं आणि हो, आपण खूपशा लेखकांचे दोस्त होत दोस्त मित्रमंडळात त्या पुस्तकांबद्दल बोलूही शकतो. तर परिचय करून दिलेली वा इतर पुस्तकं वाचा आणि आपल्या मित्रांपर्यंत ती पोहोचवा. धन्यवाद!
-चंद्रकांत भंडारी ...Read more
DAINIK SAKAL 16-04-2000विज्ञान हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो, शिवाय तो रुक्षही वाटतो, पण प्रत्यक्षात प्रयोग करण्याची संधी जर विद्यार्थ्यांना मिळाली, तर तेच विज्ञान मुलांना आनंद देऊन जाते हे लक्षात घे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘चला, प्रयोग करूया’ ही १२ पुस्तकांची एकमालिका प्रकाशित केली आहे. ऊर्जा, उष्णता, अन्न, परिस्थिती शास्त्र, रसायने, हवा, पदार्थ, अवकाश, हवास्थिती, गती:चलन, ध्वनी आणि मोजमाप अशा बारा विषयांवरील लहानसहान पुस्तकांचा हा संच आहे.
ऊर्जा या पहिल्या पुस्तकात ऊर्जा म्हणजे काय हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आपण लिहित असताना हात कार्य करत असतात आणि त्यासाठी ऊर्जेची गरज असते असे सांगून पुढील प्रकरणांमध्ये यांत्रिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, किरणोत्सर्जक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, आदी ऊर्जेचे प्रकार सांगितले आहेत. शिवाय त्यासाठी करण्याचे सोपे सोपे प्रयोगही आहेत. ऊर्जा कधीही नाश पावत नाही. तर तिचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर कसे होते हे स्पष्ट केले आहे. शेवटी ऊर्जेचे स्रोतही देण्यात आले आहेत. इतर विषयांच्या पुस्तकांमधूनही अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रयोगांच्या मदतीने विषय समजावून दिला आहे. प्रयोगांसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात सहजपणे उपलब्ध होईल असे आहे. त्यामुळे मुले कोणत्याही वेळी हे प्रयोग करू शकतील. त्यांना खेळ म्हणूनही यातील अनेक प्रयोग करता येण्यासारखे आहेत. हा संच मुलांना काहीतरी निमित्ताने भेट द्यायला हरकत नाही. ...Read more