* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TOXIN
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177666168
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ONE EVENING, RECENTLY DIVORCED SURGEON DR. KIM REGGIS, TAKES BECKY TO A FAST-FOOD RESTAURANT FOR A FEAST OF BURGERS AND FRIES, BUT TRAGEDY STRIKES WHEN THE YOUNG GIRL FALLS ILL. SHE DIES HORRIFICALLY AS A RESULT OF POISONING BY E. COLI BACTERIA. EVERYTHING SUGGESTS THAT HER DEATH WAS THE RESULT OF SHODDY FOOD HANDLING PRACTICES, BUT WHO IS GOING TO ADMIT TO THAT? FRANTIC WITH GRIEF, KIM THROWS ALL HIS ENERGIES INTO TRACING THE CAUSE OF THE CONTAMINATION. HE IS WELL PREPARED FOR THE BUREAUCRATIC INDIFFERENCE, BUT IS SOON MET WITH TERRIFYING VIOLENCE AS POWERFUL VESTED INTERESTS CONSPIRE TO DISCOURAGE HIS ENQUIRIES. AIDED BY HIS EX-WIFE, KIM PURSUES A DEADLY TRAIL OF COMPLICITY AND GUILT STRETCHING FROM THE SLAUGHTER HOUSE FLOOR TO THE CORPORATE BOARDROOM.
नुकताच घटस्फोट घेतलेला डॉ. किम रेग्गीस आपल्या एकुलत्या एका मुलीला बेकीला घेऊन एका संध्याकाळी फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाताना ह्या शोकांतिकेची सुरवात झाली. `इ. कोलाय` जीवाणूच्या विषामुळे-टॉक्सिनमुळे बेकीचा भीषण अंत झाला. अन्न नीट प्रकारे न हाताळल्यामुळे बेकीला संसर्ग झाला हे उघड दिसत असते. पण ते कोण मानणार? लाडक्या लेकीच्या मृत्यूमुळे सैरभैर झालेला किम संसर्गाचे कारण शोधण्यासाठी जीवाचे रान करतो. त्याची माजी बायको त्याला या कामात मदत करू लागते. या कामामध्ये त्यांना काय अनुभव येतो? आपले हितसंबंध जपण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे, बीफ उद्योगातले प्रचंड ताकद असणारे बेबंद भांडवलदार आणि त्यांची नफा कमावण्यासाठी काहीही करायला मागेपुढे न पाहण्याची हिडीसवृत्ती.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarRajesh More

    मेडिकल थ्रिलर साठी प्रसिद्ध असलेले रॉबिन कुक यांची ही विचार करायला लावणारी कादंबरी. `इ कोलाय` हा जिवाणू. `अन्न विषबाधा` होण्यास कारणीभूत असा हा जिवाणू. या विषयावर ची ही कादंबरी. एक डॉक्टर. घटस्फोटित. त्याची एकुलती एक मुलगी, काही दिवस त्याच्या कडे ाहायला येते. तो तिला एका संध्याकाळी एका प्रसिद्ध अशा `फास्ट फूड` रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो. तिथे खाल्लेल्या बर्गर आणि फ्राईज मधून मुळे तिला त्रास पोटदुखी, मळमळ,उलट्या, जुलाब, व्हायला लागतात. नंतर शेवटी आजार वाढून तिचा यात दुर्देवी अंत होतो. बर्गर मधील मांसामुळे(तिकडे गायीचे मांस वापरतात) , जे चांगल्या प्रतीचे नसल्याने हा प्रकार झालाय हे माहीत असूनही सिद्ध कसे करायचे हे त्याला कळत नाही. तो मूळ कारण शोधण्यासाठी जीवाचे रान करतो. आणि त्याच्या पुढे येते काही मेंदू हलवणारी माहिती. निगरगट्ट व्यवसायिक, त्यांचे लागेबांधे, नफा मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मांस(अगदी रोगट प्राण्यांचे) वापरण्याची घाणेरडी वृत्ती. फास्ट फूड च्या व्यवसायात मुख्य दुकानात `पदार्थ` येईस्तोवर अनेक distribution साखळ्या असतात. एखाद्या साखळीतील `कच्चा दुवा` शोधून , असा गैर प्रकार केला जातो. डॉक्टर, घटस्फोटित पत्नी, मुलगी, त्यांच भावविश्व. शोध घेत असताना या व्यवसायातील दिसलेला निगरगट्ट पणा. हे सगळं `रॉबिन कुक` यांनी अतिशय समर्पक रीतीने मांडलं आहे. मी वाचली होती नंतर विकत सुद्धा घेतली. आपल्याकडे सुध्दा आपण असे `नीट अन्न` न हाताळल्याने होणारे आजार बघतो. रस्ता, गटारे यांच्या सानिध्यात असलेल्या वडा पाव, पाणी पुरी, दाबेली इत्यादी `चविष्ट`(?) बिनदिक्कत खाणारे आम्ही. तसेच रेस्टॉरंट/हॉटेल मधील `किचन` स्वच्छता नियम पाळतात की नाही, हे तर देवालाच माहीत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-05-2006

    स्वर्ग आणि नरक... आज संपूर्ण जगाच्या दृष्टीने अमेरिका हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. म्हणाल ती सुखं, म्हणाल त्या सोयी, अफाट वैज्ञानिक प्रगतीमुळे तिथे उपलब्ध आहेत. तसे पश्चिम युरोपातले देशही पुढारलेले आहेत. पण तिथले जीवन भयंकर महागडे आहे. अमेरिकेत सर्व परकारची श्रीमंती, सुबत्ता आहेच; पण तिथे स्वस्ताईदेखील आहे हे महत्त्वाचे. जगभरच्या हुशार आणि होतकरू तरुण-तरुणींना अमेरिकेत जाऊन नशीब काढायचे असते, ते त्याचमुळे. पण ही ‘घी देखा, लेकिन बडगा नही देखा’ अशी स्थिती आहे. दुनियेतील सर्व सुखं, अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य असणाऱ्या या देशातला उपभोगवाद आता अशा थराला जाऊन पोहोचलाय की, त्यांना इतर कोणत्याही मानवी मूल्यांची कसलीही पत्रास उरलेली नाही. त्यांना फक्त एक मूल्य माहीत राहिलेय - पैसा! डॉ. किम रेग्गीस हा स्वत: एक अव्वल दर्जाचा हृदयरोगतज्ज्ञ असतो. त्याची मुलगी बेकी ही एक कुशल खेळाडू असते. तिला ‘बीफ’ म्हणजे गोमांसयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विषाणू संसर्ग होतो. वेळेवर आणि योग्य ते उपचार न झाल्यामुळे बेकी मरते. डॉक्टर किम मुळापासून हादरतो. ज्या रुग्णालयात तो स्वत: प्रथम श्रेणीचा डॉक्टर असतो त्याच रुग्णालयात त्याला आणि त्याच्या मुलीला मिळालेली माणुसकीविहीन वागणूक पाहून तो भयंकर संतापतो. लेखकाने हा प्रसंग अशा कौशल्याने शब्दबद्ध केला आहे की, वैज्ञानिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झालेल्या अमेरिकेतही रुग्णांना अशाच म्हणजे आपल्याकडच्या सारख्याच बेपर्वाईने वागवले जाते, हे वाचून आपण थक्क होतो. मुलीच्या मृत्यूमुळे चिडलेला डॉ. किम बीफमध्ये विषाणू आले कुठून नि कसे याचा छडा लावू पाहतो आणि त्याच्यासमोर एक महाभयानक वस्तुस्थिती उलगडत जाते. अमेरिकेत गाई, म्हशी, शेळ्या या आपल्याकडल्याप्रमाणे दुधासाठी किंवा लोकरीसाठी पाळल्या जात नाहीत; तर त्यांच्या मांसासाठी पाळल्या जातात. या सर्व पशूंना भरपूर खायला घालून गलेलठ्ठ बनवायचे आणि त्यांना कापून त्यांच्या मांसाचे विविध पदार्थ बनवायचे. या उद्योगात प्रचंड पैसा गुंतलेला आहे. डॉ. किमला असे आढळते की, रोगट गार्इंचे मांस बेधडकपणे पुरवले जात आहे. त्यामुळेच हा जीवघेणा विषाणू संसर्ग होत आहे. पण ‘बीफ’ उद्योगातल्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना मरणाऱ्या माणसांची काडीचीही पर्वा नाही. त्यांना हवाय नफ! फक्त नफा! डॉ. रॉबिन कुक हा प्रस्तुत ‘टॉक्सिन’ या कादंबरीचा लेखक स्वत: वैद्यकीय व्यावसायिक आहे. त्यामुळे या कथानकातले शास्त्रीय तपशील त्याने अतिशय बारकाईने टिपले आहेत. वाचकाला सुन्न करून टाकण्याची ताकद त्याच्या लेखणीत आहे. प्रमोद जोगळेकर यांचा अनुवाद चंद्रमोहन कुलकणी यांचे मुखपृष्ठ मेहता प्रकाशनाची एकंदर निर्मिती उत्तम. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 05-02-2006

    सामाजिक प्रश्नावरील थरारक कादंबरी... डॉ. रॉबिन कूक यांच्या वैद्यकीय पार्श्वभूमीवरच्या थरारक कथांनी जगभरच्या वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोमा वगैरे थरार कथांवरचे चित्रपटही गाजलेले आहेत आणि व्यावसायिक दृष्टीनेही त्यांनी तुफान यश संपादन केले आहे. टॉक्सिन’ या त्यांच्या थरारकथेचा एकूण भर अमेरिकेतील मांस प्रक्रिया उद्योगांवर आणि रुग्णालयातील संघटित सेवासुविधांच्या बाजारीकरणावर आहे; आणि हे काम त्यांनी अत्यंत आक्रमक अभिनिवेशाने केले आहे. अमेरिकेतील (आणि आता भारतासारख्या देशातही वेगाने फैलावणाऱ्या) मॅकडोनॉल्ड, वेंडी, अंकल जॉन्स, वगैरे अगणित शाखा असणाऱ्या रेस्टॉरन्टच्या शृंखलांमधून ठराविक चवीने पदार्थ खाणाऱ्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे. या रेस्टॉरन्टस्मध्ये मिळणारे पदार्थ पोषणमूल्यांनी युक्त असतात आणि ते तयार करताना स्वच्छता तसेच दक्षता घेण्यात येते. अशी जाहिरात प्रत्यही होत असते. त्यांच्या विश्वासार्हतेचा तो भाग असतो. डॉ. रॉबिन कूक यांनी अशा हॉटेल्समधील पदार्थांच्या आणि त्यांना मांस वगैरे पुरवणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या निर्दोषपणाच्या दाव्याबद्दल शंका उपस्थित केली आहे आणि त्या सर्वांच्या विश्वासार्हतेबद्दलच अनेकविध प्रश्न उभे केले आहेत. ‘टॉक्सिन’मध्ये किम रेगीस एक सेवाभावी डॉक्टरची दहा वर्षांची मुलगी बेकी प्रेअरी हायवेवरच्या ‘ओनियन रिंग’ या रेस्टॉरंटमध्ये बर्गरची ऑर्डर देते. व त्या बर्गरबरोबर फ्राइज आणि व्हॅनिला शेकही घेते. तेथील बर्गर खाल्ल्यावर काही तासांनी बेकीचे पोट दुखू लागते. जुलाब होतात. जुलाबातून रक्त पडते. औषधे देऊनही बरे वाटत नाही तेव्हा किम तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण त्या हॉस्पिटलमध्ये तो स्वत: तेथे डॉक्टर असूनही पेशंटकडे तातडीने लक्ष दिले जात नाही. ते हॉस्पिटल अमेरिकअर या संस्थेतर्फे चालवण्यात येत असते आणि त्याचे काम कोणालाही चीड यावी अशा पद्धतीने, खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने, चाललेले असते. त्यामुळे लेकीकडे तातडीने लक्ष देण्यात कसूर होते... आणि तिचे दुखणे वाढतच जाते. त्यातच तिचा अंत होतो. डॉ. रॉबिन कूक यांची ही थरारकथा म्हणजे हॉस्पिटल्सचे संस्थात्मक बाजारीकरण, मांसप्रक्रिया उद्योग यांच्यावरचे जळजळीत टीका-अस्त्र आहे. कथानकात खूप तपशील येतात; घटना वेगाने घडतात त्या वेगाने कधी कधी वाचकांचा गोंधळही उडू शकतो. पण शेवटी जो संदेश ही कादंबरी देते, तो वाचकाला अस्वस्थ करणारा असतो. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 04-06-2006

    वात्सल्याची, साहसाची कथा… एका सहृद्य पित्याच्या परमवात्सल्याची व वात्स्ल्यापोटी केलेल्या अचाट साहसाची ही कथा मनाला चटका लावणारी आहे. एकदा हातात घेतलेली ही कादंबरी पूर्ण करूनच वाचक ती खाली ठेवतात. पण, त्यांच्यापुढे अंतर्मुख करणारे अनेक प्रश्न उभे राहात. अन्नातून ‘इ. कोलाय ०१५७ : एच ७’ या विषाणुमुळे (टॉक्सिनं) अकाली मृत्यू पावलेल्या आपल्या दहा वर्षांच्या मुलीच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, याचा एका कार्डियाक सर्जनने जीवघेण्या साहसातून लावलेला शोध ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे. हा शोध साधासुधा नसून भयचकित करणारा रहस्यपटच आहे. त्यात डॉ. किम (कार्डियाक सर्जन) व त्याच्या माजी पत्नीने तीन वेळा मृत्यूला चकवा दिला आहे, पण प्रयत्न सोडलेला नाही. या प्रयत्नात त्या दाम्पत्याने दिलेली ‘झुंज’ ही अंगावर शहारे आणणारी आहे. अमाप पैसा व सामर्थ्य असलेल्या बीफ उद्योगातील बेबंद भांडवलदारांशी सामना करणे म्हणजे साक्षात मृत्यूशी सामना करण्याइतके कठीण कर्म! पण, भविष्यात निष्पाप बालकांचा बळी जाऊ नये, या सद्हेतूने ते कठीण काम हे दाम्पत्य सगळे धोके पत्करून स्वत:च्या अंगावर घेते. या कथेची सुरुवात हिगीन्स व हॅनकॉक नावाच्या कत्तलखान्यातून होते प्रचंड वेगाने घडणाऱ्या घटनांचा शेवटही तिथेच होऊन वर्तुळ पूर्ण होते. नऊ जानेवारीला सुरुवात झालेली गोष्ट २७ जानेवारीला संपते. डॉ. किम रेग्गीस यांची दहा वर्षांची मुलगी रिबेका ही प्रेअरी हायवेवरच्या ओनियन रिंग रेस्टॉरंटमध्ये हॅम्बर्गर खाते (नऊ जानेवारी) व तेथूनच तिच्या दुर्दैवाला सुरुवात होते. ते हॅम्बर्गर कच्चे राहिल्याने तिला विषबाधा होऊन इस्पितळात दाखल करावे लागते. तिथे बड्या बड्या डॉक्टरांनाही तिच्या रोगाचे पक्के निदान न झाल्याने शेवटी एक एक अवयव निकामे होऊन त्या बालिकेचा यातनामय मृत्यू होतो. डॉ. किमला मनोमन वाटते, की तिने खाल्लेले हॅम्बर्गर हेच तिच्या मृत्यूचे कारण आहे. त्या दृष्टीने मग त्यांचा व त्यांच्या माजी पत्नीचा ट्रेसीचा शोध सुरू होतो. ते डिटेक्टिव्ह बनतात. या कार्यात अन्नप्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या यू. एस. डी. या सरकारी खात्यातील अधिकारी बाईची मार्शाची त्यांना मदत मिळते. या घटनेचा माग काढत काढत डॉ. किम त्या कत्तलखान्यात गेले असता प्राण्यांच्या मुंडक्यांमध्ये त्यांना मार्शाचे मुंडके दिसते. त्यांचा थरकाप होतो. कत्तलखान्यावर देखरेख करणाऱ्या सरकारी स्त्री अधिकाऱ्याची– मार्शाची– कत्तल केली जाते. हे सर्व त्या दाम्पत्याला असह्य होऊन जाते. पुढे काय होते, हे कथा वाचूनच कळेल कथा संपते; पण वाचकांपुढे अनेक प्रश्न उभे राहतात. निष्पाप बालकांचा बळी घेणारा हा धंदा असाच तेजीत चालू राहणार का? त्यांना यूएसडीए (सरकार) अडवू शकणार नाही, तर कोण आवरणार? केवळ नफा मिळविण्यासाठी माणूस इतके हिडीस निघृण कृत्य करतो का? टीव्हीसारख्या प्रभावी प्रसिद्धिमाध्यमाला डॉ. किमने दिलेल्या पुराव्याचे पुढे काय झाले? खरे गुन्हेगार पकडले जाऊन त्यांना शिक्षा झाली का? इत्यादी. वाचकांना विचार करायला लावणारे ते ‘खरे साहित्य’ याची प्रचिती इथे येते. युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर व समीरन हॉस्पिटल (यांचे विलिनीकरण झालेले असते.) या ठिकाणी रिबेका (बेकी) हिच्यावर उपचार चालू असताना डॉ. किम व इतर डॉक्टर यांची सततची जी चर्चा चालू असते, त्यावरून अमेरिकेतल्या अनेक वैद्यकीय संकल्पनांची माहिती वाचकांना होते. त्या अनुषंगाने तेथील अतिप्रगत वैद्यकीय व्यवसाय, त्यातील स्पेशलायझेशनच्या अनेक शाखा, उपशाखा व सूक्ष्म शाखा, हॉस्पिटलमधील स्वयंसेवक ही संकल्पना, वैद्यकीय शाखेतील नैतिक बंधने, वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंतची कार्यपद्धती इ. गोष्टींची माहिती वाचकांना होते. तसेच, पान ३३५ ते ३३७ वर दिलेल्या वैद्यकीय परिभाषा व त्यांच्या संकल्पना वाचकांचे सामान्यज्ञान वाढविणाऱ्या वाटतात. पान ३३४ वर आरोग्यविषयक (चौकटीत) मांडलेले विचार सार्वत्रिक व मोलाचे वाटतात. रॉबिन कुक या गाजलेल्या इंग्रजी लेखकाची ही उत्कंठावर्धक कादंबरी. सत्याच्या धाग्याच्या आधाराने इतक्या मोठ्या कादंबरीची रचना त्याने केली असावी. तसे ते वास्तव असेल तर त्याच्या धाडसाला दाद द्यावी लागेल. डॉ. जोगळेकर यांनी याला मराठीचा सुंदर साज चढविला आहे. -डॉ. चंद्रकांता चव्हाण ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more