NEWSPAPER REVIEW‘तिळा उघड’चा मंत्र देऊन बहुमोल अनुभवांची गुहा खुले करणारे ललित लेख…
विख्यात गीतकार आणि ललित लेखिका शांता शेळके यांना स्तंभलेखनाची आवड आहे आणि त्यांच्या स्तंभलेखनाची आजवर अनेक पुस्तके निघाली आहेत. ‘रंगरेषा’ हे नवे पुस्तक म्हणजे केसरीच्या रविवारी पुरणीत त्यांनी त्याच नावाने जे सदर चालवले होते, त्यात आलेल्या २९ लेखांचे संकलन आहे. प्रास्ताविकात त्यांनी म्हटले आहे, ‘‘ दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, या साऱ्यांमधून मला सदर लेखनासाठी विषय सुचतात. जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, असे बरेचसे काही व्यक्त करण्यासाठी सदर लेखनासारखे अन्य माध्यम नाही असा माझा अनुभव आहे.
शांताबार्इंचे वाचन संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, उर्दू, मराठी असे सार्वदेशीय आहे; त्यांचे लोकसाहित्यातील अवगाहन अफाट आहे, पाठांतरही विस्मयकारक आहे. पत्रकारिता-लेखन-प्रकाशन-कार्यक्रम या निमित्ताने अमाप मित्रपरिवार आणि चाहत्यांचा वर्ग त्यांना लाभला आहे. नवीन प्रवाहांशी कौतुकाने त्या सलगी करतात परंतु आपल्या मूळ स्मरणरंजनाशी त्यांच्या निष्ठा अविचल आहेत. एकूण भूमिका आस्वादकाची असल्याने आपल्या प्रौढत्वीही त्यांनी आपले शैशव मनोभावे जपले आहे. शांताबाई गोष्टीवेल्हाळ आहेत; गप्पांचा त्यांना कंटाळा कधी येत नाही. त्यामुळे त्यांच्या ललित लेखांमधून त्या आपल्याशी मोकळ्या मनाने गप्पा मारत आहेत असेच जाणवत राहते; आणि त्यांच्या विविध विषयांवरील आत्मीयतेच्या टीकाटिपणीने आपल्या रसिकतेच्या कक्षा अलगदपणे विस्तारत जातात. मग एखादा हायकूही त्यांच्या स्पर्शाने आपल्या लेखी परीसाचे काम करून आपल्या भावजीवनाला सुवर्णाची झळाळी आणतो. शांताबार्इंच्या लेखनाचे जे चहाते आहेत, ते त्यांच्या शब्दांच्या परीसस्पर्शासाठी असे आतुर असतात, ते उगाच नव्हे. नेहमीच्या चिरपरिचित गोष्टींनाही शांताबाई आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वलयाने अलीबाबाच्या गुहेतील अमाप खजिन्याची श्रीमंती बहाल करतात.
‘रंगरेषा’मधील लेख वाचतानाही या त्यांच्या किमयेची प्रचीती येते. लेखांचे विषय तसे नेहमीचेच आहेत, पण त्याकडे पाहण्याची शांताबार्इंची जी दृष्टी ती वेगळी आहे; त्यामुळे खरी मजा येते. वाङ्मयीन संदर्भांनी त्यांचे सारे लेखन दुथडी भरून वाहन असते. आत्मचरित्रात्मक व व्यक्तिपरिचयात्मक उल्लेखही सतत येतात. सहजपणे येतात.
विषय नेहमीचे म्हणजे काय? तर या संग्रहातल्या काही लेखांची शीर्षकेच त्याबद्दल सांगतील. पेशवेकालीन पुणे, मैत्रीचे निकष आणि मर्यादा, शब्दांची गंमत-गमतीचे शब्द. नातेसंबंध-जुने आणि नवे, रिमझिम पाऊस पडतो बाई, जुनी फाईल, बातमीचा बळी (डायनाचा मृत्यू), इ. आणि आपल्याच जीवनातील काही आठवणींना उजाळा देणारे प्रसंग व व्यक्तिविशेष टिपणारे लेख उदा. सेन्सॉर बोर्डाचे दिवस, बिऱ्हाडकरू, आजीची ताटली लोटी, लेखक असल्यामुळे, प्रतिबिंब (फोटो काढण्याचे अनुभव), जीवनाविषयी
थोडेसे, इ.
लेखनाने पैसा फारसा मिळत नाही. लेखनाने आपल्याला फारसे द्रव्य दिलेले नाही, फारसे निर्मितीचे समाधानही अजून लाभलेले नाही; आपल्या लेखनातील उणिवा व कलात्मक मर्यादा यांची आपल्याला जाण आहे, असे शांताबाई म्हणतात. ‘‘मी सर्वसामान्य माणूस आहे आणि कधी कधी थोडीशी लेखक आहे, हीच माझी माझ्यापुरती स्वत:शी असलेली ओळख (आयडेंटिटी) आहे.’’ असेही त्या सांगतात. व्यवसाय म्हणून लेखनाचा मार्ग स्वीकारल्यामुळे आपण ‘केवळ कलानिर्मितीसाठी एकाग्र, व्रतस्थ आणि उग्र साधना करणाऱ्या ‘‘थोर लेखकांपैकी नाही हेही त्या कबूल करतात. परंतु लेखन ही माझ्या जीवनातली आनंदाची गोष्ट आहे आणि लिहिताना मला जे समाधान लाभते तीच माझ्या लेखनाची फलश्रुती आहे... पानेच्या पाने लिहिणे, डोळे-हात-मान दुखेपर्यंत लिहिणे ही माझी गरजच आहे, केवळ मानसिक नव्हे तर शारीरिकसुद्धा.’’ अशी त्यांची श्रद्धा आहे.
आपल्या लेखनाला दाद देणारे वाचक त्यांना भेटतात; त्याबद्दल त्यांना मोठा आनंद वाटतो. कुणाशी तरी आपला सूर जुळतो याचे समाधान मिळते. वाचक-लेखक जवळीक हा प्रकार उभयपक्षी आनंददायक असतो. कधी कधी त्यामुळे अनेक जण आपल्या आयुष्यातले पेचप्रसंग सांगायलाही त्यांच्याकडे येतात. ‘‘तुम्ही माझ्या जीवनावर एक कादंबरी लिहा. नाहीतर झकास नाटकच लिहून टाका. बेफाम होईल बघा...’’ असाही कोणी पाठपुरावा करतात.
पेशवेकालीन पुण्याचे वर्णन प्रा. चिं. ग. भानू यांच्या शृंगेरीची लक्ष्मी या कादंबरीच्या आधारे त्या करतात, आणि सवाई माधवरावाच्या काळातील पुण्यातील रंगढंग आणि श्रीमंती याकडे लक्ष वेधतात. त्यावेळी सराफ कट्ट्याजवळच्या शाक्ताश्रमात नेमनिष्ठ ब्राह्मण ताडी प्यायला जात असाही प्रसंग त्या कादंबरीत आहेत; आणि लक्ष्मी ही नायिका गाण्याद्वारे अर्थार्जन करीत असली तरी शृंगेरी धर्मपीठाला ती बहुतांश कमाई देते असे दाखवले आहे.
य. गो. जोशी यांच्या ‘हेमगर्भाची मात्रा’ या कथेची नायिका आसन्नमरण व्यक्तीला हेमगर्भाची मात्रा देऊन बरे करते. ती तशा मृत्युशय्येवर असणाऱ्या व्यक्तींच्या शोधातच राहते. हे शांताबार्इंना चमत्कारिक वाटते. तिच्याजवळ अभिमान वाटावा अशी हेमगर्भाची मात्रा हीच एक वस्तू आहे; आणि आपला अहंकार वा प्रतिमा हेमगर्भाच्या मात्रेची मालकीण म्हणूनच तिला मिरवणे शक्य होते. त्यावरून आपल्या इगोसाठी लोक काय काय करतात याबद्दलचे विवेचन शांताबाई करतात. काहीशा खोडकर-खट्याळपणे त्या म्हणतात, ‘‘आपला इगो टांगून ठेवण्यासाठी लोक कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. जन्मभर जपत राहतात.’’ तर काही माणसे अहंकार दुखावला गेल्यामुळे जन्मभर कडवटपणे प्रत्येक गोष्टीवर टीकेचा भडिमार करीत राहतात. इतरांची टवाळी करीत राहतात; कुत्सित बोलत राहतात. आपले जिवलग मित्रही काही वेळा मानसिक आधार देण्याऐवजी मत्सराच्या पोटी भांडणे, चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा यांच्या आहारी जातात. शांताबाई त्यावर भाष्य करतात, ‘‘जगामध्ये सारेच काही सुंदर, विलोभनीय नसते. इथे हेवेदावे आहेत, असूया आहे. मत्सर आहे. कुजकेपणा आहे. जे दुसऱ्याला मिळाले ते मला मिळाले नाही, कदाचित माझी लायकी त्याच्यापेक्षा जास्त असूनही मिळाले नाही या जाणिवेमुळे मनातून उमटणारे असंतोषाचे फणकारे आहेत. सारे काही आहे आणि मुख्य म्हणजे आपणांपैकी कुणीही साऱ्या मनोविकारांवर प्रभुत्व मिळवून स्थितप्रज्ञतेच्या पदवीला पोचलेला नाही. पण म्हणून तर मैत्रीचे महत्त्व, प्रेमाचे महत्व. त्याचा बळी देऊन मिळवावे इतके मोलाचे आणि आनंददायक असे दुसरे काही नाही. अगदी आपले आत्मप्रेमसुद्धा.’’
–असा आपुलकीचा सल्लाही या लेखांमध्ये सहजपणे मिळत राहतो. म्हणून हा लेखसंग्रह सतत जवळ ठेवायला हवा. शांताबार्इंचे मित्रपण त्यांच्या प्रत्येक लेखांतून आपल्याला साद घालत राहते. ...Read more