* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IN THE NAME OF HONOUR
  • Availability : Available
  • Translators : ULKA RAUT
  • ISBN : 9788184980059
  • Edition : 3
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 103
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NATASHA WAS EVERY INCH A COMMON GIRL, RAISED IN AN ORPHANAGE, A CITIZEN OF RUSSIA, BUT SHE WAS FELICITATED WITH THE AWARD, `CERTIFICATE OF HONOUR`. HER JOURNEY STARTED OUT OF THE LOVE AND CONCERN SHE HAD FOR THE OTHER ORPHANS LIKE HER. AFTER MARRIAGE, SHE AND HER HUSBAND DAVID CAME TO KNOW THAT SHE WOULD NEVER BE ABLE TO CONCEIVE THEIR OWN CHILD. SO, INSTEAD OF CURSING THE DESTINY FOR THEIR BAD LUCK, TOGETHER THEY DECIDED TO DO SOMETHING CONCRETE FOR THE ORPHAN CHILDREN. THEY STARTED SHELTERING THE ORPHANS BY BRINGING THEM HOME, BY BEING THEIR PARENTS. THEY CONTRIBUTED THEIR EFFORTS, MONEY, LOVE; EVERYTHING THEY HAD FOR THE BETTERMENT OF THESE CHILDREN. THIS BOOK REVEALS THE GOOD AND BAD EXPERIENCES THEY HAD DURING THIS JOURNEY.
जून २००२ मध्ये भावाने केलेल्या तथाकथित गुन्ह्याची शिक्षा म्हणून मुख्तार माईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. प्रतिष्ठेपायी घडलेल्या ह्या कृत्याची खबर पाकिस्तानातील पत्रकारांना मिळाल्यानंतर मुख्तार माईची कहाणी उजेडात आली. त्या भयानक बलात्कारानंतर रिवाजाप्रमाणे तिने आत्महत्या करावी अशी अपेक्षा होती. परंतु मुख्तार माईने ती परंपरा मोडली. अभूतपूर्व धैर्य दाखवून तिने बलात्का-यांना कोर्टात खेचलं. पुराण्या रीतिरिवाजांनी जखडलेल्या समाजव्यवस्थेशी मुख्तार माईने असामान्य धैर्याने आणि सर्वस्व पणाला लावून अथक झुंज दिली.खटल्यातील काही आरोपींची सुटका झाल्याने मुख्तार माईच्या जिवाला अजूनही धोका आहेच. असं असलं तरी मुख्तार माईने घाबरून पळ काढलेला नाही. पाकिस्तान सरकारकडून नुकसान भरपाईदाखल जे पैसे मिळाले, त्यातून तिने मुलींसाठी शाळा चालू केली. विशेष म्हणजे ह्या शाळेत ती स्वत:ही मोठ्या उत्साहाने शिकत आहे. ह्या हृदयद्रावक आणि प्रेरणादायक कहाणीमधून मुख्तार माईने आपली कैफियत जगासमोर मांडली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INTHENAMEOFHONOUR #INTHENAMEOFHONOUR #इनदनेमऑफऑनर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ULKARAUT #उल्काराऊत #MUKHTARMAI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-5-2009

    मदर तेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांच्या सान्निध्यात प्रतीत होणारी विशुद्ध महानता मुख्तार मार्इंच्या व्यक्तिमत्त्वातही जाणवते. मीरवाला या लहानशा खेडेगावात राहणारी मुख्तार माई प्रथमदर्शनी शांत, काहीशी बुजरी वाटते. परंतु गावात तिच्याबरोबर फिर असताना ‘बलात्कार, निरक्षरता, स्त्रियांवरील अत्याचार’ याविरुद्ध लढणाऱ्या मुख्तारमधील ताकद जाणवते. साऱ्या पाकिस्तानात, इतकंच नव्हे तर संपूर्ण जगातच तिने सुरू केलेल्या चळवळीचा डंका वाजतो आहे. मुख्तारच्या कहाणीची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहेच, तिच्या धाकट्या भावावर लफडं केल्याचा खोटा आळ घेण्यात आला. या अपराधासाठी मुख्तारवर सामूहिक बलात्काराची सजा पंचायतीनं फर्मावली. शिक्षेची अंमलबजावणीदेखील तात्काळ करण्यात आली. कुचेष्टा करणाऱ्या जमावाच्या नजरा चुकवीत अर्धवस्त्रावस्थेतील मुख्तार कशीबशी घरी पोहोचली होती. या प्रकारानंतर तिने निमूटपणे आत्महत्या करावी, अशी सर्वांची रास्त अपेक्षा होती. ती अपेक्षा मुख्तार पूर्ण करणारही होती, परंतु नंतर शरमेची जागा संतापाने घेतली. जीव देऊन अपराध्यांना मोकळं सोडण्याऐवजी तिने त्यांना कोर्टात खेचलं. साऱ्या जगासमोर आपली कैफियत मांडली. एवढ्यावरच मुख्तार थांबली असती, तर अन्य असंख्य पीडित स्त्रियांमध्ये तीही एक, असं समजून प्रकरणावर पडदा पडला असता, सुदैवाने तसं झालं नाही. नुकसानभरपाईदाखल मिळालेल्या पैशांमधून मुख्तारने गावात शाळा सुरू केली. जुलमी सरंजामशाहीविरुद्ध लढण्यासाठी लोकशिक्षण हा एकमेव मार्ग आहे. यावर तिचा दृढविश्वास होता. मुख्तारची कहाणी मीदेखील ऐकली होती. २००४ मध्ये पाकिस्तानला गेलो असताना मी तिला भेटण्यासाठी मीरवाला गावाला भेट दिली. (त्या वेळी ती मुख्तरनबीबी या नावाने ओळखली जाई.) इस्लामाबादहून लाहोर, तिथून मुलतान असा विमान प्रवास आणि नंतर अनेक तासांचा मोटार प्रवास, अशी मजल-दरमजल करीत मी मीरवाला गावी पोहोचलो. मीरवालात तेव्हा वीज पोहोचली नव्हती. तिच्या घरी तिचे भाऊ, वडिलांची भेट झाली. ती मात्र मागेच होती. एखादी तडफदार, तेजस्वी स्त्री भेटेल या अपेक्षेने गेलो असतो, तर माझी निराशाच झाली असती. मला ती संकोची स्वभावाची, काहीशी जुन्या वळणाची वाटली. बहुधा ‘बाईने जास्त बोलू नये.’ असा विचार करून ती फारसं बोलत नव्हती. सुरुवातीला तिचे वडील आणि भाऊच माझ्याशी संभाषण करीत होते. नंतर मात्र ती माझ्याबरोबर मोकळेपणाने बोलायला लागली. बलात्कारानंतर वाटलेली शरम, अखंड अश्रू गाळणं. कुटुंबियांची तिच्यामुळे झालेली बेअब्रू याविषयी ती नि:संकोचपणे बोलली. शाळेविषयी ती अतिशय उत्कटपणे सांगत होती. हळूहळू तिने संपूर्ण संभाषणाची सूत्रे स्वत:कडे घेतली. ‘शाळेसाठी पैसे कमी पडताहेत. शिक्षकांचा पगार देण्यासाठी घरातील दागिने विकावे लागले. ‘काय करावं समजेनासं झालंय.’ ती म्हणाली, ‘माझ्या संरक्षणासाठी तैनात केलेले पोलीस आता कंटाळलेत. त्यांच्याकडून ढिलाई झाली तर माझ्या जिवाला धोका आहे.’ असेही ती पुढे म्हणाली. मुलाखत संपल्यावर नंतर तिने मला एका बाजूला नेलं आणि ‘मदत करण्यासाठी’ कळकळीची विनंती केली. तिच्या आवाजात असा काही आवेश होता, की प्रथमदर्शनी बुजरी वाटलेली मुख्तार हीच का, असा विचार माझ्या मनात आला. मी मुख्तारवर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. अमेरिकेतील वाचक तिच्या कहाणीने हेलावून गेले. मदतीचा ओघ सुरू झाला. ‘चेक पाठवा. मी ते तिच्याकडे पोहोचते करीन.’ मी आनंदीत होऊन जाहीर केलं. ‘मर्सी कॉर्पस’च्या मदतीने मी सारे चेक मुख्तारकडे पाठवले. तब्बल एक लाख साठ हजार डॉलर्स जमले. त्यातून तिने व्हॅन खरेदी केली. अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्कूल बस असा दोन्हीसाठी या व्हॅनचा उपयोग होणार होता. उरलेल्या पैशांमधून माध्यमिक शाळा उभारायचं काम सुरू झालं. नंतर न्यूयॉर्क आणि मीरवाला अशा दोन्ही ठिकाणी मी मुख्तारला अनेकदा भेटलोय. अमेरिकेत ती भव्य मेजवान्या, व्हाइट हाऊसमधील स्वागतसमारंभ, आलिशान हॉटेलात सत्कार अशा प्रसंगी हजर असली, तरी ‘कधी एकदा मायदेशी परतते’ असं तिला वाटत राहतं. एकदा न्यूयॉर्कमधील अतिप्रतिष्ठित लोकांसमवेत मेजवानीला गेली असताना तिने चक्क पाकिस्तानी जेवण मागवलं! अमेरिकेतील अत्याधुनिक वातावरण पाहून तिला धक्का बसेल असं मला वाटलं होतं. ती मात्र सारंच सहजपणे अनुभवत होती. ‘ग्लॅमर’ मासिकात तिच्यावर आलेला लेख आणि फोटो पाहताना ती जराही लाजली वा संकोचली नाही. (ग्लॅमरसारख्या फ्याशनला वाहिलेल्या मासिकातील तिचे संपूर्ण अंग झाकणाऱ्या कपड्यांमधील फोटो, हा एक मोठाच विरोधाभास होता!) न्यूयॉर्कमध्येदेखील तिच्या मस्तकावर आच्छादन असतंच, पाकिस्तानी असल्याचा अभिमान तिच्या वागण्यातून जाणवत असतो. मुख्तारमुळे पाकिस्तानला जगभर प्रसिद्धी आणि सर्वांच्या सदिच्छा मिळाल्या हे खरं असलं तरी पाकिस्तान सरकारने मात्र तिला त्रासच दिला. याची दोन कारणं असतील. पाकिस्तानी समाजव्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगून ती देशाला बदनाम करते आहे असं सरकारला वाटतंय. दुसरं म्हणजे पंजाबमधील बारक्याशा खेडेगावातील एका य:कश्चित अडाणी बाईला जगभर नावलौकिक मिळतोय. तिच्या धाडसाचं कौतुक होतंय, या गोष्टीचा पाकिस्तानी नेत्यांना मत्सर वाटत असावा. परिणामत: त्यांनी सतत तिची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न केला आहे. मुख्तार अमेरिकेत एका परिषदेसाठी जाणार होती. तेव्हाचं उदाहरण घ्या : खुद्द राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी तिने देशाबाहेर जाऊ नये यासाठी ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये तिचं नाव टाकण्याचं फर्मान काढलं. अधिकाऱ्यांनी तिचा पासपोर्ट जप्त केला. त्याबद्दल तिने जाहीर तक्रार केली. परिणामी अधिकाऱ्यांनी तिचं अपहरण करून तिला इस्लामाबादला नेलं. तरीही मुख्तारचा आवाज बंद झाला नाही. राष्ट्राध्यक्ष मुशर्रफची चांगलीच नाचक्की झाली. झुंजार मुख्तारची प्रतिमा अधिकच उजळली. आमना बत्तारकडून समजली ती घटना सर्वात जास्त धक्कादायक आहे. ब्रिगेडियर ईजाज शाह हे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे अत्यंत निकटचे स्नेही. २००५ मध्ये आमना बत्तारला धमकी देण्यासाठी ते लाहोरला गेले होते. आमना पाकिस्तानी-अमेरिकन डॉक्टर असून, एक मानवी हक्क संघटना चालवते. (www.4anna.org) तिने मुख्तारला सतत प्रोत्साहन दिलं आहे. अमेरिकेच्या वाऱ्यांमध्ये तीच मुख्तारच्या सोबत जाई, तिच्या दुभाष्याचं कामही तीच करीत असे. पाकिस्तानी स्त्रियांच्या हक्कासाठी अखंडपणे झगडत असे. ब्रिगेडियर महाशय आमनाला धमकीवजा ताकीद देताना म्हणाले, ‘तू आणि मुख्तारने सांभाळून वागलेलं बरं. उगाचच संकटांना निमंत्रण कशाला देता?’ मुख्तार आणि आमनाच्या नियोजित न्यूयॉर्क भेटीचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, ‘आम्ही काहीही करू शकतो हे विसरू नका. न्यूयॉर्कमध्ये काळ्या लोकांना थोडे पैसे दिले तर त्या बदल्यात ते आम्ही सांगू त्याचा सहजपणे खून पाडतील.’ या बोलण्याला वर्णद्वेषाचा वास होताच, शिवाय आमना आणि मुख्तारचा अमेरिकेत खून होऊ शकतो, अशी प्रच्छन्न धमकीही त्यामागे होती. मी पाकिस्तान सरकारकडे याविषयी विचारणा केली असता, ब्रिगेडियर शहा आमनाला भेटल्याचं मान्य केलं; परंतु त्यांनी तिला कोणत्याही प्रकारची धमकी दिल्याचं मात्र साफ नाकबूल केलं! २००५ मध्ये मुख्तारचं यूएनमध्ये भाषण होणार होतं. कित्येक आठवड्यांपूर्वी सारी तयारी पूर्ण झाली होती. जाण्यापूर्वी ती माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आली असतानाच आयोजकांचा फोन आला. ‘पाकिस्तान सरकारच्या आदेशावरून मुख्तारचं भाषण रद्द करण्यात आलं.’ अशी बातमी त्यांनी दिली. पाकिस्तानी नेत्यांनी पुन्हा एकदा स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. अमेरिकेत काही लोकांनीच मुख्तारचं यूएनमधील भाषण ऐकलं असतं, परंतु बंदी घातल्याने न झालेल्या भाषणाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पाकिस्तान सरकारने मुख्तारवर सतत दबाव टाकायचा प्रयत्न केला. तिचा पत्रव्यवहार जप्त केला, फोन टॅप होत असे. सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांतून कायम तिच्याविषयी बदनामीकारक लेख छापून येत- ती परदेशात जाऊन मजा मारते; ती पाकिस्तान सरकारशी एकनिष्ठ नाही. ती परकीय (माझ्यासारख्या) तसंच भारतीय दलालांच्या तालावर नाचणारी बाहुली असून पाकिस्तानची बदनामी करण्यासाठी त्यांना मदत करत असते... वगैरे वगैरे. मुख्तार अतिशय संवेदनशील असल्याने अशा जहरी टीकेमुळे तिला कमालीचा त्रास होई. परंतु नंतर तिच्यामध्ये परिपक्वता आणि कणखरपणा येत गेला. भावांची परवानगी घेतल्याविना ही घराबाहेर पडत नसे हे पूर्वी पाहिलं होतं. परंतु नंतर तिची जगभर भटकंती सुरू झाली. परराष्ट्र मंत्र्यांच्या हातून सत्कार घडू लागले. अशा परिस्थितीत भावांची परवानगी मागणं हा चक्क वेडेपणाच ठरला असता. नीतिनियम तोडून कुठे जायचं हे निर्णय तीच घेऊ लागली. भावांना अर्थातच ही गोष्ट आवडली नाही. त्याची एकमेकांवर माया आहे, परंतु ‘स्त्रीला कितपत स्वातंत्र्य असावं’ या गोष्टीवरून मूलभूत विरोध आहेच. सर्वांनाच यामुळे मानसिक त्रास होत असतो. २००६ साली मार्चमध्ये मी पुन्हा एकदा मीरवाला गावी गेलो. मुख्तारच्या शाळा पाहून मी खूप प्रभावित झालो. बरीच नवीन साधनसामग्री आली होती. इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना चक्क इंग्रजी बोलता येत होतं! उच्च माध्यमिक शाळेचे बांधकाम चालू होतं. प्राथमिक शाळेच्या वार्षिक समारंभामध्ये छोट्या मुलांनी सुंदर नाटुकलं सादर केलं. ‘लवकर विवाह केल्याने होणारे तोटे’ हा विषय होता. (पत्नीचा खून होतो हा सर्वात मोठा तोटा दिसून आला.) मीरवाला गावातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मला जाणवली. ती म्हणजे मुलींना शाळेतून काढू नये म्हणून मुख्तार त्यांच्या आईवडिलांच्या हात धुवून मागे लागत असे. प्रसंगी रागवायचीसुद्धा. सिद्रा नावाच्या चौथीतील मुलींच्या आईवडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे शाळा बंद! मुख्तारला हे कळताच तिने सूत्रे हाती घेतली. दमदाटी करून त्यांना निर्णय बदलायला लावला. सिद्राची शाळा चालू आहे. तिला शिकून डॉक्टर व्हायचंय. याच कारणासाठी मुख्तारला गाव सोडून कुठेही जायचं नाही. तिला शहरात वा परदेशी सुरक्षितपणे आणि आरामात राहता येईल. परंतु काहीतरी केल्यानं समाधान मिळतंय. याचं मोल कितीतरी अधिक आहे. ध्येयपूर्तीसाठी मुख्तार अथक प्रयत्न करते आहे. अत्यंत व्यथित करणाऱ्या गोष्टी मुख्तारच्या घरी पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून पीडित, दु:खी स्त्रिया मुख्तारला भेटायला येत असतात. ती नक्कीच आपल्याला मदत करील, मार्ग दाखवील अशी आशा बाळगून त्या मिळेल ते वाहन पकडून तिच्या घरी येतात. प्रत्येकीची दर्दभरी कर्मकहाणी वेगळी, पण सर्वांत भयानक प्रकार म्हणजे बाईचं नाक कापून तिला जन्माची अद्दल घडवायची. पाकिस्तानात अशी शिक्षा सर्रास दिली जाते. मुख्तार सर्वांना जमेल तशी मदत करते. त्यांना डॉक्टर अथवा वकील मिळवून देते. काही मार्ग निघेपर्यंत त्या बायका मुख्तारच्या घरीच मुक्कामाला असतात. रोज रात्री किमान दहा-बारा जणी मुख्तारच्या खोलीतच जमिनीवर तिच्या बाजूला पथाऱ्या टाकून झोपायला असतातच. (मुख्तारने तिची कॉट, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नसीम अख्तर यांना दिली आहे.) एकमेकींच्या कुशीत, एकमेकींचं सांत्वन करीत साऱ्याजणी झोपायचा प्रयत्न करतात. अत्यंत कठीण परिस्थिती असली तरी त्यांनी आशा सोडलेली नसते. परिस्थिती बदलते आहे. स्त्रिया अन्यायाचा प्रतिकार करताहेत हे त्यांच्याकडे पाहून पटतं. बलात्कार झालेली स्त्री आत्महत्त्या करून सारं संपवून टाकीत असे. आता मात्र मुख्तारचा कित्ता गिरवणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. अत्याचाराला बळी पडलेल्या डॉक्टर शाझिया खालिदसारख्या स्त्रिया बलात्कार-विरोधी चळवळीचं नेतृत्व करीत आहेत. ‘मुख्तारमुळेच अन्यायाला प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळाली.’ हे डॉक्टर शाझिया सर्वप्रथम मान्य करते. आत्महत्त्या करण्याऐवजी अत्याचार करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचे प्रकार वाढत चालल्यामुळे मीरवाला भागातील बलात्काराचं प्रमाण कमी होत आहे. स्त्रियांवरील दडपशाही कमी व्हावी यासाठी मुख्तार करीत असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश येताना दिसून येतंय. पाकिस्तानी मनोवृत्ती बदलते आहे. ‘इन द नेम ऑफ ऑनर’ ही केवळ धैर्य आणि वैफल्य याची कहाणी नसून, त्यातून प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. आत्यंतिक धैर्य आणि मनोनिग्रह यांच्या बळावर मुख्तारने सामूहिक बलात्कारासारख्या भीषण प्रसंगावर मात केली. खचून न जाता झगडली, इतरांना आशेचा किरण दाखवला. मुख्तारला मी महान समजतो, त्याचं हेही एक कारण आहे. लाजऱ्याबुजऱ्या खेडवळ मुख्तारमध्ये मला एका धाडसी, झुंजार ‘हीरो’चा साक्षात्कार होतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more