* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY TIDE
  • Availability : Available
  • Translators : SUNIL KARMARKAR
  • ISBN : 9789357200783
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2023
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 404
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HUNGRY TIDE IS A RICH, EXOTIC SAGA SET IN CALCUTTA AND IN THE VAST ARCHIPELAGO OF ISLANDS IN THE BAY OF BENGAL. AN INDIAN MYTH SAYS THAT WHEN THE RIVER GANGES FIRST DESCENDED FROM THE HEAVENS, THE FORCE OF THE CASCADE WAS SO GREAT THAT THE EARTH WOULD HAVE BEEN DESTROYED IF IT HAD NOT BEEN FOR THE GOD SHIVA, WHO TAMED THE TORRENT BY CATCHING IT IN HIS DREADLOCKS. IT IS ONLY WHEN THE GANGES APPROACHES THE BAY OF BENGAL THAT IT FREES ITSELF AND SEPARATES INTO THOUSANDS OF WANDERING STRANDS. THE RESULT IS THE SUNDARBANS, AN IMMENSE STRETCH OF MANGROVE FOREST, A HALF-DROWNED LAND WHERE THE WATERS OF THE HIMALAYAS MERGE WITH THE INCOMING TIDES OF THE SEA. IT IS THIS VAST ARCHIPELAGO OF ISLANDS THAT PROVIDES THE SETTING FOR AMITAV GHOSH’S NEW NOVEL. IN THE SUNDARBANS THE TIDES REACH MORE THAN 100 MILES INLAND AND EVERY DAY THOUSANDS OF HECTARES OF FOREST DISAPPEAR ONLY TO RE-EMERGE HOURS LATER. DENSE AS THE MANGROVE FORESTS ARE, FROM A HUMAN POINT OF VIEW IT IS ONLY A LITTLE LESS BARREN THAN A DESERT. THERE IS A TERRIBLE, VENGEFUL BEAUTY HERE, A PLACE TEEMING WITH CROCODILES, SNAKES, SHARKS AND MAN-EATING TIGERS. THIS IS THE ONLY PLACE ON EARTH WHERE MAN IS MORE OFTEN PREY THAN PREDATOR. AND IT IS INTO THIS TERRAIN THAT AN ECCENTRIC, WEALTHY SCOTSMAN NAMED DANIEL HAMILTON TRIED TO CREATE A UTOPIAN SOCIETY, OF ALL RACES AND RELIGIONS AND CONQUER THE MIGHT OF THE SUNDARBANS. IN JANUARY 2001, A SMALL SHIP ARRIVES TO CONDUCT AN ECOLOGICAL SURVEY OF THIS VAST BUT LITTLE-KNOWN ENVIRONMENT AND THE SCIENTISTS ON BOARD BEGIN TO TRACE THE JOURNEYS OF THE DESCENDANTS OF THIS SOCIETY.
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #आध्यात्मिक #धार्मिक #दहंग्रीटाइड #अमितावघोष #सुंदरबन #खारफुटीजंगल #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #THEHUNGRYTIDE #AMITAVGHOSH #SUNDARBAN #MANGROVEFOREST #ENVIRONMENT #FICTION #MARATHITRANSLATION #SUNILKARMARKAR
Customer Reviews
  • Rating Starजयश्री सोनवणे

    बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more

  • Rating Starपुरुदत्त रत्नाकर

    पुस्तक: द हंग्री टाईड मराठी अनुवाद: सुनील करमरकर प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस प्रथमावृत्ती: ऑगस्ट २०२३ मूळ कादंबरी: (इंग्लिश) the hungry tide, अमिताभ (Amitav) घोष हा अनुवाद आहे असं केवळ आधी माहिती होतं म्हणून त्याच्या खुणा सापडल्या. अन्यथा हीमूळ मराठी कादंबरी आहे असे समजून वाचता आली असती इतका हा अनुवाद सरल, ओघवता. अस्सल झाला आहे. यात हल्ली दुर्मिळ होत चाललेले अनेक मराठी शब्द सहजपणे वापरले आहेत. कुठेही मुद्दाम, प्रयत्नपूर्वक लालित्य आणले आहे असे वाटत नाही. परभाषेतून मातृभाषेत अनुवाद करणे हे मातृभाषेतून परभाषेत अनुवाद करण्यापेक्षा किचकट आणि वेळखाऊ असते. कादंबरी मुळातच मोठी असते. गोष्ट, कथा यापेक्षा बरीच मोठी. त्यातही तुलनेने अधिकच मोठ्या असलेल्या या कादंबरीचा अनुवाद करणं आणि तो निर्दोष करणं याला प्रचंड चिकाटी, जिद्द, संयम आणि आवड असावी लागते. त्यासाठी साजेसा असा स्वभाव अनुवादक श्री. सुनील करमरकर यांना लाभला आहे हे नक्की. ज्ञानपीठ, साहित्य अकॅडमी विजेत्या लेखकाच्या या कादंबरीचा त्यांनी यशस्वीपणे, तोडीस तोड अनुवाद केला आहे. सुनीलजी लीना सोहोनी यांच्या अनुवादतंत्र कार्यशाळेचा या यशामध्ये वाटा असल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगतात. कादंबरी काल्पनिक आहे. ती सुंदरबन या अस्तीत्वात असलेल्या प्रदेशाभोवती घडते. लेखक बंगाली आहे त्यामुळे बंगाली पार्श्वभूमी असणं लिखाणाच्या गुणवत्तेला पूरक आहे. नद्या, बेटं, खाडी.. अहाहा... या सगळ्यांपासून शेकडो मैल दूर राहणार्‍या माझासारख्याला तर याचं फारच आकर्षण वाटतं. पण कोकणवार्‍या आणि अशा पुस्तकातून तिथे जगणं म्हणजे येर्‍या-गबाळ्याचं काम नाही हे समजतं. तिथल्या जीवनाचं सुरेख वर्णन लेखकाने केलं आहे. तसं पाहायला गेलं तर या,जवळपास ४०० पानी भरगच्च कादंबरीमध्ये ७-८ च मुख्य पात्र आहेत. पण कथानक तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि दोन वेगवेगळ्या काळांमध्ये घडत, उलगडत जाते. पाठोपाठची प्रकरणे आळीपाळीने या भिन्न ठिकाणी आणि भिन्न काळात फिरत राहतात. त्यामुळे १००-१२५ पानांनंतर माझ्यासारख्या वाचकाचा पात्रांमध्ये थोडा गोंधळ उडतो आणि संदर्भासाठी आधीचे परत वाचले की कादंबरीची लांबी आणखी वाढते. अमिताभ घोष यांचं निरीक्षण अफलातून आहे. एखाद्या ठिकाणाचं त्यांनी केलेलं वर्णन हे शब्दचित्र या स्तरावरचं असतं. मी असं वर्णन कधी करू शकेन, असा विचार केला तर एकाच शक्यता दिसते... छायाचित्रं किंवा चित्र समोर ठेवून त्याचं वर्णन करायला घेतलं तरच. पण तरीही एवढं आखीव येणार नाही आणि अशी किती चित्रं समोर ठेवणार?! व्यक्तिचं वर्णनही जणू व्यक्तिरेखेसारखं आणि प्रसंगही अगदी जीवंत! `चंद्रप्रकाशाने दिवसा दिसणार्‍या दृश्याची जणू चंदेरी काळी प्रतिमा बनवली होती.` अशी वाक्य त्या दोन्ही प्रतिमा वाचकाच्या मनात लख्ख उभ्या करतात. कुटुंबीय व्यक्तीबद्दल आणि परक्या व्यक्तीच्या सान्निध्यात मानवी मनात नैसर्गिकरित्या उमटणारे तरंग, भावना; संकटात असतांनाचं क्षणिक नैसर्गिक प्रेम; आयुष्यभरात आपल्याच जोडीदाराबद्दल निर्माण झालेला तिटकारा, टोकाची मतं; एकच माणूस बायकोला कसा दुष्ट, निरुपयोगी वाटतो पण तोच परक्या स्त्रीशी कसा आब राखून वागतो, जीवाची बाजी लावून निरपेक्षपणे तिचं रक्षण करतो; हे सगळं अतिशय विचित्र पण शक्य वास्तव यात आलं आहे. कादंबरीतल्या प्रत्येकच पात्राचे स्वतःच्या जोडीदाराशी जमत नाही पण परक्या व्यक्तींना, समाजाला मात्र ते जवळ करतात, जवळचे वाटतात. लिखाण खूपच अभ्यासपूर्ण, संशोधित आहे. ते प्रस्तावनेतही सांगितलं आहे. डॉल्फिनवर शोधकार्य करण्यासारख्या किचकट आणि जोखमीच्या कामात या कादंबरीची एक नायिका पिया स्वतःला कसं झोकून देऊ शकते हे वर्णन छान आलं आहे. अमिताभ घोष हे स्वतः लेखकप्रवृत्तिचे आहेत आणि त्यांची पत्नी देबोरा अमेरिकन आहे. त्यामुळे निर्मल आणि इंग्लंडमध्ये वाढलेली नायिका पिया ही पात्रं या दोघांवरच बेतलेली असावीत असा विचार मनाला शिवून गेला. पण असा काही निष्कर्श काढणं फारच धाडसाचं होतं. कारण घोष यांनी ही एकच कादंबरी लिहिलेली नाही किंवा ही त्यांची पहिलीच कादंबरीही नाही. शिवाय `चाकोरीबद्ध आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्यातला फोलपणा कळतो तेव्हा फार उशीर झालेला असतो.` हे निर्मलच्या तोंडचं वाक्य लेखकाला नक्कीच लागू होत नाही. मी कादंबरी वाचून झाल्यावर प्रस्तावना वाचली आणि कदाचित घोष यांनी ऋणनिर्देश केलेल्या आंनेकांमधल्या दोघांवर ही पात्र बेतलेली असू शकतात असे वाटले. पण हे सगळे जर-तर आहे. कादंबरी ज्या प्रकारे वास्तव ठिकाणं आणि लोककथा यांच्याशी काल्पनिक पात्रांचा मेळ घालते त्यामुळे असे संबंध जोडावे वाटले असावे. यातली सगळीच स्त्री पात्रं ध्येयवादी आणि चिकाटीची घेतली आहेत ते वर्णन वास्तविक वाटते. त्यामानाने पुरुष पात्रं थोडी भरकटलेली आहेत. तेही वास्तवाला सोडून वाटत नाही. नायिका पियाच्या होडीचा गळ एकदाचा मातीत रुतला की वाचकाचा जीवही भांड्यात पडतो. कथानायक कनाईच्या कथानकात काही खास घडण्याची वाट बघता बघता वाचकाला भरतीच्या प्रदेशातल्या दमट हवामानात बसल्या बसल्या फुटावा तसा घाम फुटतो. कथेत खूप काही घडतं. तरीही सुरूवातीला नदी किंवा समुद्र शांत असतांना त्या परिस्थितीचा, तिथल्या जीवनाचा वेग असतो त्या वेगाने, गतीने कथानक संथपणे सरकते आणि वादळाच्या परमोच्च बिन्दुकडे जातांना घटनाक्रमाचा वेगही वाढतो. एखाद्या चित्रपटसारखंच हे वाटतं. काही ठिकाणी न पटणारा मजकूर आहे. सुंदरबनातल्या एका जागेला स्थानिक रहिवासी `हॅमिल्टनबाद` नाव ठेवततात. हे शक्य वाटत नाही कारण जिथे मुघल आक्रमक घुसून त्यांनी ते ठिकाण `बाद` केले तिथे प्रमुख आक्रमकाच्या नावापुढे `बाद` लावून त्या जागेचे मुघलीकरण केले जायचे. स्थानिक लोकांच्या इच्छेने नाही. आणि या कथेतली ठिकाणं मुघल अमलाखाली नव्हती. म्हणून हे पटत नाही. या कथेतल्या एका पौराणिक मान्यतेच्या गोष्टीत राक्षस हा साधारण हिंदू नावाचा स्थानिक आणि देवी मुस्लिम नावाची परकीय आहे. ती देवीही ओढूनताणून कुठूनतरी अरबस्तानातून आणवली आहे. हे मला पटले नाही. पण माहितीच्या आंतरजालात चौकशी केली असता, म्हणजे गूगल सर्च केला असता, ही लोकमान्यता घोष यांनी कल्पिलेली नसून बंगभूमीत मान्यताप्राप्त आहे असे कळले. पण या देवतेचे नाव हिंदू जनता वेगळ्या प्रकारे घेते, ती दुर्गाच आहे, हा उल्लेख घोष यांनी केलेला नाही. इंटरनेटवरचे अगदी नगण्य इतके संदर्भ सोडता बाकीचे, ती देवता मुस्लिम असल्याचे, संदर्भ हे `द हंग्री टाईड` २००४ साली प्रकाशित झाल्यानंतरचे आहेत, हे विशेष. `वन` ला हिंदीत `बन` म्हणतात. त्या बनचं बंगालीत `बोन` होऊ शकतं आणि `देवी` चा अपभ्रंश होऊन देबी आणि त्यापासून बिबी होऊन वनदेवता म्हणजेच `बोनबीबी` होऊ शकते अशीही कल्पना करता येईल. शेवटी `बीबी` असल्याने ती मुस्लिम देवता आहे ह्यापेक्षा मला ते जास्त पटतं. कथानायिका पिया युरोपात वाढलेली हिंदू आहे. तिला तिचा नावाडी सोबती मुस्लिम आहे असं वाटत असतं. पण त्याचं लग्न कसं झालं असेल याची कल्पना करतांना तिच्या डोळ्यासमोर पेटलेला होम येतो. असो. काल्पनिक कथेत एवढं माफ असतं. लेखकाच्या कल्पनेची आणि संशोधनाची झेप बघता हे मुद्दे बाजूला सारता येतील. मी यापूर्वी ऐतिहासिक कादंबर्‍या सोडता अन्य काल्पनिक कादंबर्‍या फार वाचलेल्या नाहीत. सर्वात अलीकडे रणजीत देसाईंची `बारी` आणि वि. स. खांडेकरांची `रिकामा देव्हारा` वाचली आहे. लेखकाच्या स्वयंप्रतिभेतून आलेल्या या कादंबर्‍यांमद्धे अस्तीत्वात असलेली ठिकाणं, काही ऐतिहासिक प्रसंग, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आली तरी त्याचे संदर्भ तपासून पहावेप असं वाटत नाही. पण भरपूर अभ्यास, संशोधन करून लिहीलेल्या काल्पनिक कथेतल्या अशा बाबींवर शंकाही येतात आणि त्याचे संदर्भ शोधल्यास सापडू शकतात, असे ढोबळमानाने म्हणता येईल. मेहता पब्लिशिंग हाऊस या अतिशय नावाजलेल्या प्रकाशकांनी हा अनुवाद आणला आहे, हे स्तुत्य आहे. पण का कोण जाणे कादंबरीचं आणि मूळ लेखकाचं नाव ठसठशीत, मधोमध आहे आणि अनुवादकाचं नाव मात्र खाली कोपर्‍यात, अगदी छोट्या अक्षरात आणि मुखपृष्ठाच्या रंगसंगतीत विरून जाईल असं आहे. शिवाय मूळ कादंबरीचं मूल्य ३००च्या आत आणि भाषांतरित कादंबरी ४५०. ह्या `व्यस्त`तेला काही कारणं असतीलच, पण ती व्यस्तता कमी करता आली तर बरं. महाराष्ट्रातून जगभर व्यवसाय करणार्‍या प्रकाशकांनी मराठी माणसाचं नाव मोठं करावं ही अपेक्षा अवास्तव नक्कीच नाही. कादंबरीवाचन हे वाचनातून शेवटी काही तथ्य निघतं का, यासाठी नसतंच. ते असतं त्या व्यक्तिरेखांमध्ये, ठिकाणांमध्ये, प्रसंगांमध्ये, प्रसंगांच्या शृंखलेमध्ये बुडून जाण्यासाठी. त्यातून आपली माहिती, अनुभवविश्व, कल्पनाशक्ति, ज्ञान समृद्ध करण्यासाठी. भाषेचा आनंद घेण्यासाठी. या सगळ्या कसोट्यांवर ही कादंबरी सोळा आणे उतरते. निर्मल या पात्राच्या मनःस्थितीतून सांगायचं तर हल्लीच्या माझ्या `चाकोरीबद्ध जीवनाच्या` चाकोरीतून वाचन हा छंद मला दूर नेतो आणि `फोलपणा`पासून वाचवतो. ही कादंबरी सांगते, `जी व्यक्ति ३० वर्षं एकच काम करते ती भिंतीला आलेल्या बुरशीगत होते.` जणू मी वाचतो ती अशा कादंबर्‍यांमधली अक्षरं माझ्या मनावरची बुरशी पुसून त्याची शाई बनवून लिहिलेली असतात असे म्हणायला हरकत नाही. त्यासाठी कादंबर्‍या आणखी वाचायला हव्यात. सुनीलजींचे अनुवाद तर मी वाचणारच आहे पण अमिताभ घोषही आणखी वाचू शकतो. ...Read more

  • Rating StarSatish Kulkarni

    श्री सुनिल करमरकर यांनी केलेला हंग्री टाईड ( मूळ लेखक श्री. अमिताव घोष) या कादंबरीचा अनुवाद नुकताच वाचनात आला. अप्रतिम अनुवाद. असं म्हणतात अत्तराच्या एका कुपीतून दुसऱ्या कुपीत अत्तर घालताना मध्ये वास उडून जातो. पण सुनिल ने केलेला अनुवाद वाचत असताना आण मराठीतील वेगळी कादंबरी वाचतो आहोत असे जाणवत होते. मराठी भाषेचे सौंदर्य जपून ओघवता अनुवाद त्यांनी वाचकांना दिला आहे. असे अनेक अनुवाद करून जागतिक कीर्तीच्या लेखकांचा परिचय सु नीलजी वाचकाना करून देतील असा विश्वास वाटतो. पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 👍 ...Read more

  • Rating StarPradeep Karmarkar

    अतिशय सुंदर अनुवाद श्री सुनील करमरकर यांनी केला आहे. भाषा सरळ, सुंदर आणी ओघवती आहे. कोठेही ढोबळ भाषांतर केलेले नाही.त्यामुळे कादंबरीचा दर्जा वाढला आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more