* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHUKRACHANDANI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662191
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS EVER PRESENT IN THIS WORLD? IS LIFE A NON-STOP GAME PLAYED BY HAPPINESS AND SORROW? WHAT MAKES US SURVIVE? WHAT DO WE WANT FROM LIFE? WHAT MAKES OUR LIFE COMPLETE? THERE IS SOME TRUTH HIDDEN DEEP WITHIN THE CORE OF LIFE. WHEN WE REMOVE THE MANIFOLDS ENVELOPING US WE COME ACROSS THE TRUTH; LIFE. HAD IT NOT HAD ANY MEANING TO IT, THE MANKIND WOULD NOT HAVE RACED BEHIND IT FOR SO LONG AND SO FAR. THE HUMAN LIFE IS NOTHING BUT A SWING. AS THE SWING RIDES HIGHER THINGS DOWN APPEAR BEAUTIFUL. IT LASTS ONLY FOR A FRACTION OF SECOND BEFORE THE SWING ZOOMS DOWNWARDS. IT WOULD NEVER REMAIN ON THE TOP. WHAT REMAINS IS THE VIEW THAT WE SEE FROM HIGH ABOVE OF WHICH WE GET JUST A GLIMPSE AND NOTHING ELSE. ALL THAT WE CAN DO IS REMEMBER IT AND GET DOWN FROM THE SWING, BACK ON THE LAND.
जगात नित्य काय? सुखदु:खाची पाठशिवण म्हणजेच जीवन? कशासाठी जगतो माणूस? त्याला शेवटी हवंय तरी काय? काय मिळाल्यानंतर त्याचं जगणं परिपूर्ण होतं? हा सगळा जीवनभरचा प्रवास कशासाठी?... ....या जीवनाच्या गाभ्याशी काहीतरी सत्य नक्कीच लपलेलं आहे. मनावर साचलेली सारी मळभं काढून, आत आत दडलेलं सत्य शोधणं म्हणजे तर जीवन नव्हे? ....या जीवनात काहीच अर्थ नसता, तर माणूस असा जीवनाच्या पाठीमागे धावला नसता. माणसाचं जीवन म्हणजे एक झोकाच! ....झोका उंचीवर गेला की तिथून खालचं जग किती मनोहर दिसतं! किती रम्य! पण क्षणभरच.. ते दृश्य नजरेत येतं न येतं, तोवर झोका खाली येतो. तो कधीच उंचीवर टिकत नाही. पण जे टिकतं ते तिथून बघितलेलं.. दिसतं न दिसतं, तोवर अदृश्य झालेलं ते सुंदर दृश्य.. तेच फक्त मनात साठवून झोक्यावरून जमिनीवर उतरायचं असतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarVishwas Kelkar

    सर्व कथा उत्तम आहेत जरूर वाचा.

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ठसठशीत नायिका आणि त्यांच्या जीवनातील मूल्यसंघर्ष चितारणाऱ्या चित्तरकथा... माधवी देसाई यांच्या अकरा कथांचा समावेश `शुक्रचांदणी` या पुस्तकात करण्यात आला आहे. हा त्यांचा सहावा कथासंग्रह. ठसठशीत नायिकांच्या व्यक्तिरेखा हे कथांचे वैशिष्ट्य. `अधांतर` या थेची नायिका आहे एक महिला पोलीस इन्स्पेक्टर. नीलांबरी. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यातील हवालदार रावराणे यांची एकुलती एक कन्या नीलांबरी. वडिलांप्रमाणेच थोराड, धिप्पाड, काळीसावळी. ती बी.ए. झाल्यावर पोलीस इन्स्पेक्टर होण्याचे ठरवते. प्रशिक्षण काळात खाकी युनिफॉर्म आणि इतरांवर अधिकार गाजवण्याची ईर्षा यांचा संचार जणू तिच्या अंगात होतो. डिस्टिंक्शन घेऊन ती ग्रुपमध्ये पहिली येते. हवालदार बापाला अस्मान ठेंगणे होते. ठाणे जिल्ह्यातील एका महिला पोलीस स्टेशनवर तिची नेमणूक होते. हाताखालच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवते. गुन्हेगारांना ती कर्दनकाळ वाटते. त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढायचे काम मात्र ती असिस्टंटवर सोपवते. लग्नाचा बेत ती लांबणीवर टाकत राहते. तिचे वडील घोकत राहतात.``लेकीचं लगीन? चिल्लर गोष्ट. आधी डी.वाय.एस.पी. तर होऊ द्या.`` आई सुमन मात्र तिला सांगत राहते,``लग्न करून टाक पोरी. हे असं राहणं खरं नव्हे.`` एकदा चोरीच्या आरोपावरून एका आदिवासी कुटुंबातील चौघांना पकडून आणले जाते. ``माय, पोरं घरी उपाशी. जन्मात कधी चोरी केली न्हाय. तू बाईमाणूस दया कर. सोडून दे. ही लछमी पोटुशी हाय. बायामान्स आम्ही.`` त्या आदिवासीपैंकी म्हातारी गयावया करीत होती. पण नीलांबरीचा पोलिसी खाक्या. ``बायामाणसं? एवढं का कौतुक ह्या बाईपणाचं? कुणासाठी? चोरा करताना कुठे गेलं होतं बाईपण? घरी पोरं आहेत? आणि ही पोटुशी. हाच खरा उपयोग बाईपणाचा? की आणखीही काही?`` असं म्हणत ती कातडी पट्ट्याचे वार त्या दोन बायांवर सपासप करत राहते. म्हातारी खाली कोसळते. सुनेची साडी रक्तानं माखते. नीलांबरीचे असिस्टंट सांगतात,``मॅडम, आवरा स्वत:ला हे महिला पोलीस ठाणे आहे... आदिवासी... काही झालं तर पेपरवाले आणि सोशल वर्कर तुटून पडतील.`` त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असते. पण अंगावर वळ. कायद्याने गुन्हा . लछमी दम सोडते. ...पहाटे पहाटेच तिच्या बरोबरच कोर्सला असणारा आणि जवळच्याच पोलीस ठाण्यावर इन्स्पेक्टर असलेला जगताप आपल्या पत्नीबरोबर येतो आणि सांगतो,``मॅडम, लछमी, तिची सासू आमच्याच बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये राहतात. गरीब माणसं. चोरी करणंच शक्य नाही. त्यांना जामीनावर सोडा...`` -आणि नीलांबरी म्हणते.``लछमी? शी इज नो मोअर. मी मारलं तिला. नाऊ मिस्टर जगताप, अ‍ॅरेस्ट मी.`` अशी नाट्यपूर्ण तरीही भावस्पर्शी कथानकाची गुंफण करण्यात कथाकार माधवी देसाई तरबेज आहेत. हवालदार महत्त्वाकांक्षी बाप, त्याची तशीच अधिकार गाजविणारी लाडकी लेक, पोलिसी खाक्याचा अभिमान, अहंकार, स्त्री म्हणून सहकाऱ्याने डिवचणे, त्याचा राग गरीब आदिवासी स्त्रीवर काढणे, मारहाणीनं त्या स्त्रीचा मृत्यू घडणे. त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याची असिस्टंटची सूचना धुडकावून लावणे, आणि ते आदिवासी कुटुंब नेमके त्या परिचीत सहकारी पोलीस इन्स्पेक्टरच्या आऊटहाऊसमध्ये राहणारे निघणे आणि त्यानेच जामीनासाठी नीलांबरीकडे येणे -असे सगळे आदर्शवादी धागेदोरे गुंफत आपल्या मेलोड्रामिक कथावस्तूची रंगत वाढवत नेणे ही माधवी देसाई यांची हातोटी वाचकांच्या परिचयाची आहे. घराण्याचा अभिमान आणि कलावंताचे उत्तरदायित्व यांच्यातील संघर्ष `शुक्रचांदणी` या कथेत दिसतो. राजगढचे राजगायक रहेमखां आपल्या तिन्ही मुलांना गायनवादनाचे धडे देतात. त्यातल्या अमिनकडे ते भावी राजगायक म्हणून बघत असतात. अठरा वर्षांच्या प्रदीर्घ तपश्यर्येनंतर रहेमखां या मुलाला सांगतात,``बेटा, माझ्या गुरूनं मला दिलेला संगीताचा खजिना तुझ्या हाती देऊन आज मी गुरु ऋणातून मुक्त झालोय. ही उत्तरेच्या संगीताची कावड तू दक्षिणेत पसरू दे. या घराण्याचा वारसा टिकवेल असा एखादा शागीर्द तयार कर.`` अमिनखां मुंबईत येऊन संगीतक्षेत्रात आपले बस्तान बसवण्यासाठी खूप परिश्रम घेतात. शिकवण्या घेतात. छोट्यामोठ्या बैठकी करतात. त्यांची कन्या गुलबदन जेव्हा त्यांच्याच गायकीची झलक दाखवते तेव्हा मात्र ते संतापतात,``खबरदार, पुन्हा तानपुऱ्याला हात लावशील तर...तानपुरा खांद्यावर ठेवून गायला तू कोणा कोठीवालीची मुलगी नाहीस. या घरच्या मुलींनी असं गाताना कुणी ऐकलंय? तो रिवाज नाही या घरचा`` ते तिचं लग्न आपला आवडता शिष्य दिलावर याच्याशी लावून देतात... काही वर्षे जातात. दिलावर कात्यायनीच्या कोठीवर दिवसेंदिवस राहू लागतो; गुलबदनशी प्रतारणा, गुरूशी प्रतारणा, गाण्याशी प्रतारणा -अमिनखां संतप्त होतात. आपल्या घराण्याच्या गायकीचा वारस कोण या प्रश्नाने अस्वस्थ होतात; आणि एक दिवस कन्या गुलबदनला म्हणतात, ``ये बेटी बैस, तो तानपुरा घेऊन षड्ज लाव... जातोय कुठे दिलावर? दिवसभर भटकलेला राही रात्री घरी येतोच ना? तसं दिलावरला यावं लागेल. तुझे सूर त्याला खेचून आणतील.`` लग्नाला वर्ष होऊनही सगुणाला तिचा नवरा विश्वास देशमुख अस्पर्शितच ठेवतो हे कळल्यावर सगुणाची मैत्रीण आसमा अस्वस्थ होते. सगुणा हे कोणालाही कळू देत नाही; कारण आपल्या नवऱ्याचे दु:ख तिला ठाऊक असते. त्याची एकेकाळची प्रेयसी स्वप्ना हिच्यावर गुंड बलात्कार करतात; पुराव्याअभावी गुंड निर्दोषी म्हणुन सुटतात, स्वप्नाचे लग्न मोडते. ...या कथेला लेखिका नंतर वेगळीच कलाटणी देतात. एकदा स्वप्ना कर्तव्यभावनेने रक्तदान करायला येते तेव्हा डॉक्टर तिच्या रक्ताची तपासणी करतात आणि तुमचं रक्त चालणार नाही म्हणतात. कारण रक्तात एच.आय.व्ही. पॉझिटिव्हची लक्षणे दिसतात. जगावर सूड उगवायचा म्हणून ती विश्वासला जवळ करते. त्याच्याबरोबर फार्महाऊसवर दोन महिने राहते... आणि विश्वासची तब्येत झपाट्याने बिघडत जाते. तपासणीत कळते की तोही एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहे. सगुणा त्याची सेवाशुश्रुषा करते... पण दुसरीकडे देवाला धन्यवाद देते. कारण विश्वासने तिला स्पर्शही केलेला नसतो. आसमा म्हणते,``विश्वास दुबळा होता; आणि स्वप्ना नियतीची शिकार. तसं तर तूही नियतीचाच बळी. तू धीरानं वाटचाल केलीस... दया, क्षमा, शांती, धैर्याची पुतळी... या जगात तुझ्यासारखी माणसं आहेत म्हणून तर हे जग सुंदर आहे.`` आसमा तिला नंतर म्हणते,``या घराशी तुझा असलेला ऋणानुबंध संपला. तू आता माझ्याकडे राहा. शिक्षण पूर्ण कर... विश्वासानं जग. खचू नकोस. जे घडेल ते चांगलेच असणार यावर विश्वास ठेव.`` `सगुणा`ची ही कथा नियतीच्या वादळवाऱ्यातही आसमाच्या दमदार मैत्रीच्या रूपात तिच्यातील आशावाद अभंग ठेवते. खानदानी कुळातील राजाक्का ही सुरजित हा वयस्क नवरा आपल्या नशिबी आला म्हणून नाराज असते. याच्यापासून आपल्याला मूल होता कामा नये असे ठरवते. तिला आवडलेला कुलदीप या तरुणाचे लग्न दुसऱ्याच कोणा मुलीशी झालेलं होतं. त्याचा राग तिच्या मनात होता. तरीही वीस वर्षं सुरजितचा संसार ती सजवते. सुरजितचे अचानक देहावसान होते; तेव्हा गुणाक्काचा विशीतला मुलगा चंद्रहास तिला माहेरी न्यायला येतो. गुणाक्का त्याला जन्म देताच मेलेली असते, त्याचे वडीलही जातात. आजीने त्याला वाढविलेले असते. चंद्राहासला बघितल्यावर राजाक्काला आपल्या जगण्याचे प्रयोजन सापडते. ती माहेरी येते. माहेरचा ताबा घेते. घरातले मासाहेबांचे साम्राज्य आपल्या हाती घेते. सारेजण तिला अघोरी म्हणतात. राजाक्काच्या अशा वागण्याने मासाहेबांचा मृत्यू होतो. चंद्रहासचे एका मुलीवर प्रेम जडते. तो तिची आपल्या मावशीशी ओळख करून देतो. आता चंद्रहास आपल्याला दुरावणार या भावनेनं राजाक्काचं मन, शरीर अतिशय अस्वस्थ होते. त्या धक्क्यानंच तिला मृत्यू येतो. आपल्या मावशीच्या अस्थिविसर्जनासाठी चंद्रहास नाशिकला जातो. बोटीतून प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन अस्थींचा कलश सोडण्यासाठी वाकतो; आणि नदीत पडतो. गटांगळ्या खाऊ लागतो. `शेवटी अघोरीनं डाव साधला` असे रघुभटजी म्हणतो... अशा `अघोरी`सारख्या कथेतही लेखिका अनेक कथासूत्रांची गुंफण करून कथेतली गुंतागुंत वाढवत जातात. अपघात योगायोग यांची रेलचेल त्यांच्या कथानकांची गाडी त्यांना अनपेक्षित त्या दिशेने वळवणे सुलभ करते. राजाक्काची आयुष्यभराची अतृप्ती. तिला अंतच नाही. त्याच्या उतारवयात त्यांना तृप्तीचे केवळ क्षणिक दर्शन होते. पण ती केवळ हुलकावणी ठरते. ``या शरीराच्या आत एक मनं असतं. त्या मनाला बरंच काही हवं असतं. चांगलं आणि वाईटही.`` हे नेल्सीचे शब्द गोव्याहून परतताना इन्स्पेक्टर चंद्रहासच्या जीवनाला झोके देत राहतात. साठीतली नेल्सी डान्टस् पन्नाशीतल्या चंद्रहासला आपल्या थॉमसबरोबरच्या सुखी सहजीवनाची कहाणी सांगते आणि त्याला म्हणते, ``चंद्रासाब, मला सोबतीची, मैत्रीची खूप गरज आहे. आता या साठ वर्षांच्या शरीराला काहीच नको आहे. पण शरीराच्या आत जे मन असतं ना त्याला खूप काही हवं असतं... त्यासाठी एक चांगली मैत्री हवी. चांगला सहवास हवा. द्याल तुम्ही तशी मैत्री! सर, बंगलीत याल राहायला?`` अरुंधतीच्या रूपात स्त्री जीवनाची कलंकित बाजू बघितलेल्या चंद्रहासला ही लखलखीत चांदणी जीवनाचे एक नवेच दर्शन घडवते; पण त्यामुळेच या कॅथॉलिक श्रीमंत भाटकरणीच्या त्या विनवणीला प्रतिसाद देणे जड वाटते. `उंच गेलेला झोका कधीच उंचीवर टिकत नाही... उंचीवर गेल्यावर क्षणभर दिसलेलं दृश्य मनात साठवून खाली जमिनीवर उतरायचं असतं` असा विचार त्याच्या मनात घोळत राहतो. `अनमोल हिरा` ही कथा अंजनी, सुरंगा, हिरा या तीन मैत्रिणींच्या जीवनकथांची गुंफण करणारी कहाणी . वयस्कर हिराला नेनेसारखा निस्सीम प्रेम करणारा माणूस लाभला, तर अज्ञातवासात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी राहण्यातही सुख लाभू नये असे म्हणून अंजनी सुरंगाची समजूत काढते आणि हिराला निरोप देताना सांगते.``जा हिरा विश्वासानं जा. तू ज्याचा शोध घेत होतीस ते तुला शोधतं आलं शेवटी.`` आपल्यावर प्रेम करणारा पुरुष लाभला -एवढचं तिला हिराच्या सुखाचं कारण वाटत नाही. तर निसर्ग, एकान्त अज्ञातवास हाही माणसाला अंतर्मुख करतो; आपल्याला काय हवं नको याचं भानं त्यामुळं येतं. स्नेह हाही आश्वासक असतो -असे अंजनीला वाटते. अनमोल हिराला नेने हे अचूक कोदण ठरेल असे ती मानते. माधवी देसाई यांची जीवनाकडे, स्त्री-पुरुष सहवासाकडे, नातेसंबंधांकडे, जगाकडे पाहण्याची दृष्टी आदर्शवादी आहे तशीच समंजसपणाची आहे. नियती या जीवनात खूप घोळ घालते, वादळे उठवते. पण मानवी मनाचा चांगुलपणा, भलेपणा त्या नियतीच्या भल्याबुऱ्या आघातांनीही पूर्णतया निष्प्रभ कधी होत नाही; तो टिकूनच राहतो. आपल्या आणि इतरांच्या दु:खवेदनांवर तो फुंकर घालतो. काळ हा देखील ही फुंकर घालण्यात पटाईत असतो. तरीही नियतीचे काही हिशेब असतातच. एकेकाचे भवितव्य घडवताना नियती त्या हिशेबाप्रमाणे खूप काही घडवून जमा-खर्चाच्या बाजूंची तोंड मिळवणी साधन असते. समानधर्म्याना जवळ आणत असते; आयुष्यात नवा आशय व अर्थ भरत असते. वेगवेगळे प्रश्न -कथावस्तूच्या पार्श्वभूमीसाठी निवडण्यातही माधवी देसाई यांची विविधतेची हौस जाणवते. भरपूर तपशील असणाऱ्या मेलोड्रॅमॅटिक परंपरेतल्या नाट्यपूर्ण घटनाप्रचुर कथांचा बाज त्यांना प्रिय आहे. बहुसंख्य वाचकांनाही त्यामुळे माधवी देसाई यांच्या कथा आकृष्ट करतात. अल्पावधीत निघालेले सहा संग्रह हे त्याचीच तर साक्ष पटवतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 19-01-2003

    एकटेपणाच्या एकरंगी कथा… कोणताही लेखक शोध घेत असतो माणसांचा, त्यांच्यातल्या नातेसंबंधाचा. या प्रवासात तो माणसाच्या मनात खोल शिरतो, मुळाशी भिडण्याचा प्रयत्न करतो. माधवी देसाई यांचा कथाकार म्हणून चाललेला शोध हा प्रामुख्याने स्त्रीवर केंद्रित झालेला आहे स्त्री, तिचं भावविश्व, त्यात येणारी माणसं, त्यातही पुरुष, त्यांच्यात काही काळ तिचं रमणं, जगणं पण तरीही शेवटी एकाकी राहणं यात आहे. ही स्त्री तुटलेली, एकटेपणा सोसणारी, भोगणारी आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या त्यांच्या संग्रहात हा भाग वारंवार, येत राहतो. त्यांचे नव्याने आलेले कथासंग्रह ‘किनारा’ व ‘शुक्रचांदणी’ याच अनुभवावर प्रामुख्याने बेतलेले आढळतात. बेतलेला हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. सुरुवातीला त्यांच्या कथांत या प्रकारचे अनुभव उत्स्फूर्तपणे आले, पण आता त्या लेखनाचा साचा झालेला दिसतो. ‘शुक्रचांदणी’ या संग्रहातून त्याचा अनुभव येतो. स्त्रियांचे हे एकटेपण काही वेळा परिस्थितीतून तर कधी त्यांच्या मन:स्थितीतून आलेलं आहे. या स्त्रिया बहुतेक वेळा एकरंगी रंगवल्या आहेत. ‘अघोरी’ कथेतली राजाक्का पूर्ण खलनायिका दाखवली आहे तर ‘सगुणी’मधली नायिका सद्गुणांची पुतळी आहे. माणसांच्या वृत्तीमधली ही टोकं कथेला रंजकता देतात, त्या वाचनीय होतात. पण त्याच वेळी त्या वास्तवापासून दूर जातात. ‘हिस्सा’मध्ये दीपकच्या बहिणी दुष्ट प्रवृत्तीच्या तर बायको पराकोटीची सत्प्रवृत्त दिसते. या पार्श्वभूमीवर ‘अधांतर’ सारखी कथा उठून दिसते ती वेगळेपणामुळे. यात एका बाजूला स्त्रीत्व आणि दुसऱ्या बाजूला महत्त्वाकांक्षा यांच्या द्वंद्वात सापडलेली नीलांबरी आहे. संग्रहाला दिलेलं नाव ‘शुक्रचांदणी’ हे अर्थपूर्ण आहे. शुक्राची चांदणी हे सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. पण आकाशात ती एकटीच दिसते. (खरं वैज्ञानिकदृष्ट्या ती नव्हे तर तो शुक्र) रात्र संपत चालली आहे व पहाट सुरू होते आहे, अशा संधिकालात दिसणारी ही चांदणी आहे. या संग्रहातल्या बहुतेक स्त्रियासुद्धा सुंदर, देखण्या, भोगविलासात रमलेल्या आहेत. एकेकाळी त्यांनी जीवनाचे स्वैर रंग अनुभवले आहेत. पण आता त्यांच्या आयुष्यातला जणू संधिकाळ आहे. या टप्प्यावर मग त्यांचं चिंतन सुरू होतं. जसे ‘अनमोल हिरा’ मधील हिरा. आजपर्यंत तिला अनेक चाहते, रसिक भेटले. पण या कलावतीला खरी ओढ आहे ती अशा पुरुषाची, जो तिला मनापासून समजून घेईल, एक माणूस म्हणून पाहील. ‘जमीन आसमान’मधला प्रताप म्हणूनच विजयाला भावतो. तो म्हणतो, ‘स्त्री-पुरुष या संज्ञा काही वयानंतर संपून जातात आणि त्यापलीकडे उरतो तो फक्त माणूस! प्रेम करणारी माणूस! खरं प्रेम या जगात आहेच. खरं तर प्रेमच आहे फक्त!’ असं प्रेम करणारा प्रताप काय किंवा या भारतभूमीवर मनापासून रमणारी परकीय अ‍ॅना काय अशी आदर्शवादी माणसं आपल्याला वाचायला आवडतात, आपली आदर्शाची भूक ती पुरी करतात. या कथांतून येणारं तत्त्वचिंतन हा यातला लेखिकेच्या विचारशक्तीचा प्रत्यय देणारा भाग आहे. ‘झोका’ ही या दृष्टीने जमलेली आहे. ‘या जीवनाच्या गाभ्याशी काही तरी सत्य नक्कीच लपलेलं आहे. मनावर साचलेली सारी मळभं काढून आत दडलेलं सत्य शोधणं म्हणजे तर जीवन नव्हे?’ असं चिंतन कथेतल्या आशयांशी एकरूप होऊन येतं. एखाद्या पात्राभोवती गुंफलेली कथा आणि शेवटी तत्त्वचिंतन असा रचनाबंध आपल्याला उमगतो आणि मग त्यातलं नावीन्य ओसरू लागतं. ‘किनारा’, ‘सोळावं वर्ष’, ‘तेरा दिवस’ यासारख्या शीर्षकाच्या एकूण अकरा कथा ‘किनारा’त येतात. ही शीर्षकं बोलकी आहेत. त्यामुळे कथाविषयीची उत्सुकता मनात जागी होते. पुन्हा त्यातून कथानकातलं वेगळेपण, वैशिष्ट्य प्रगट होतं. जसे ‘किनारा’ ही एका अनाथालयात राहणाऱ्या सॅम या अनाथ मुलाची कहाणी आहे. पण कथेच्या शेवटी आपल्याला कळतं एकटेपणाने जगणारा सॅम एकटा नाही; त्याला वडिलांचा, घराचा किनारा आहे. ‘सोळावं वर्ष’मध्ये एका प्रौढ कुमारिकेच्या मनात एका परिचिताच्या सहवासाने उमलत जाणारे नवथर तारुण्य, त्याच्याविषयीची ओढ यांचे वर्णन येते. त्या कथेच्या शेवटी निवेदन येतं ‘तिला भेटलेलं सोळावं वर्ष तिचं होतं. फक्त तिचं. त्या वर्षाला निरोप द्यायला ती आज चालली होती. आनंदाने कारण निरोप दिला तरी ते सोळावं वर्ष तिच्या मनातच राहणार होतं.’ ही एक चांगली जमून आलेली कथा आहे. माणसाच्या मनात जी स्पंदनं, ज्या गोष्टी चालतात, कधी कळत तर कधी नकळत, ते टिपण्याचा प्रयत्न या कथेतून साकार होतो. तसेच ‘अर्थ’ ही कथा आहे. कुष्ठरोगाने शरीर पार जाऊनसुद्धा मनातून शरीराची अभिलाषा जात नाही, मोह सरत नाही. अशा प्रकारचं चिंतन आपल्याला अंतर्मुख करतं. परंतु काही कथांमध्ये ही तरलता, हे बारकावे पकडणं लेखिकेला अवघड गेलं आहे. जसे ‘झिंग’ मधला डी.एस.पी. रवींद्र, ‘वीस बाय दोन’मधली समष्टी, ‘सोनपुतळी’- मधली मित्रा या साऱ्या व्यक्तिरेखा दोन टोकांमध्ये दिसतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर त्या रंगेल, चैनी, विलासी आहेत आणि दुसऱ्या टप्प्यावर त्या एकदम चिंतनशील, विचारी, झाल्यासारख्या वाटतात. ‘सोनपुतळी’ मधली मित्रा व्यभिचार करते, नवऱ्याकडून सारं काही मिळूनही प्रतारणा करते; पण ही जाणीव तिला होते ती नवरा मरण पावल्यानंतर. म्हणजे इथे अशा काही ठळक, तीव्र घटना घडल्यानेच आयुष्यविषयक चिंतन येतं. वास्तविक पाहता माणसामध्ये सतत सत् आणि असत् हा संघर्ष चालू असतो. काही वेळा ‘एखाद्या लहानशा प्रसंगाने, उद्गाराने तो वेगळे वळण घेतो, ही प्रगल्भता या कथांमध्ये क्वचितच दिसते. ‘किनारा’ व ‘शुक्रचांदणी’ या दोन्ही संग्रहातील कथाबीज, काही वेळा येणारं तत्त्वचिंतन यात ताकद दडलेली आहे, पण व्यक्तिरेखांच्या सरधोपटपणांमुळं कथा फारशी उंची गाठत नाहीत. चंद्रमोहन कुलकर्णी यांची मुखपृष्ठे अंतरंगाशी मेळ खाणारी आहेत. -मनीषा र. रावराणे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more