* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DILEMMA & OTHER STORIES
  • Availability : Available
  • Translators : VANITA SAWANT
  • ISBN : 9788171619474
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE MARATHI TRANSLATION BY VANITA SAVANT, ORIGINALLY WRITTEN BY VIJAYDAN DETHA, IS A STORY COLLECTION OF `DVANDVA`. IN THE FIRST STORY OF `DUALITY`, IMMEDIATELY AFTER THE MARRIAGE, THE HUSBAND, WHO HAS BEEN ABROAD FOR FIVE YEARS ABROAD FOR TRADING WITH THE OBJECTIVE TO INCREASE HIS WIFE`S WEALTH AND LEAVE HIM ALONE, AND IN A SIMILAR FASHION, IT IS DESCRIBED AS A LIVING GHOST. POWER, WEALTH AND AUTHORITY CAN CAUSE MEN`S FEET TO FALL; WHAT DO WOMEN THINK IF THEY WANT TO OVERCOME THEM? THE EVENTS OF THIS EVENT ARE IN THE STORY OF `NYARI NYARI LIMAA`; THE GENIUS, THE GENUINE WEAVER KABIR, WHO HAS GONE BEYOND JOKE AND HIS SEPARATION KABIR`S LIFE PHILOSOPHY COMES IN THE STORY OF `KABIR KABIR`, IN HIS EXTRAORDINARY MEETING WITH THE KEEN PRINCESS AND KING WHO CAME TO KNOW. ALL THE WOMEN OF THE WORLD HAVE ONLY ONE RAMAYANA - MEN CAN GET FOOLS AND THEY ARE LAKSHU, A VETERAN WHORE, SAYS, "IT WILL BE THE RESULT OF THAT DECEPTION THROUGHOUT MY LIFE." THE DESCRIPTION OF THE WILD BEAST THAT PRODUCES A COWBOY (REALLY, PRINCE!) IS BROUGHT TO A HUMBLE MAN BY HIS GUARDIAN, IN THE STORY OF `GRIEVOUS QUESTIONS`. OTHER SUCH STORIES ARE IN THIS STORY. ALTHOUGH THE THREADS OF EACH STORY ARE SLIGHTLY DIFFERENT, THESE STORIES HIGHLIGHTING THE INTRICACIES OF GENDER EQUALITY, ANGER-GREED, COMPETITION, AND ENLIGHTENMENT HIGHLIGHT THE INTRICACIES OF TRADITIONAL IDEAS. ALTHOUGH THESE ARE MYSTERIOUS ENVIRONMENTS AND FANTASY, THESE GENUINE STORIES HAVE THE POWER TO EXHIBIT INTENSE REALITY.
’द्वंद्व’ या पहिल्याच कथेत विवाहानंतर लगेचच भरल्या घरात पत्नीला एकटी सोडून संपत्तीत वाढ करण्याच्या उद्देशाने व्यापारासाठी पाच वर्षे परदेशी जाणारा धनवान नवरा आणि तेवढ्या कालावधीत नवऱ्याचे रूप घेऊन नववधूसोबत राहाणारे भूत याचे वर्णन आहे. सत्ता, संपत्ती आणि अधिकारामुळे पुरुषांचा पाय घसरू शकतो; त्यांना आवर घालण्यासाठी स्त्रियानांही तसे वागावे असे वाटले तर काय? अशा अर्थाचे घटना-प्रसंग ’न्यारी न्यारी मर्यादा’ या कथेमध्ये आहेत; तर राग, लोभाच्या पलीकडे गेलेला अस्सल विणकर कबीर आणि त्याचा वेगळेपणा जाणून घेण्यासाठी आलेली उत्सुक राजकन्या व राजा यांच्या विलक्षण भेटीत कबीराचे जीवनविषयक तत्त्वज्ञान ’दुसरा कबीर’ कथेत येते. दुनियेतील तमाम स्त्रियांचं फक्त एकच रामायण आहे- पुरुषांच्या हातून फसवलं जाणं आणि आयुष्यभर त्या फसवणुकीचा परिणाम भोगणं, असा संदेश लक्खू ही अनुभवी वेश्या ’काकपंथ’ या कथेतून देते. आपल्या निगराणीने वनमानवाला माणसात आणून, गुराखी (खरे तर राजकुमार!) बनवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बंजारनचे वर्णन ’बिकट प्रश्न’ कथेत आहे. अशाच इतर काही कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. प्रत्येक कथेचे सूत्र थोडेफार वेगळे असले, तरी स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, राग-लोभ, स्पर्धा, असूया यांवर प्रकाश टाकणाऱ्या या कथा पारंपरिक कल्पनांचे अंतरंग उलगडून दाखवतात. गूढ वातावरण आणि कल्पनारम्यता असली तरी या अस्सल कथांमध्ये प्रखर वास्तवाचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DVANDA#NYARINYARIMARYADA#DUSARAKABEER#KAKAPANTH#BIKATPRASHNA#VEGALAGHARKUL#KAAT#LAAJALU#SWAPNPRIYA#SWAP#SAVADHGIRI#NISHARANICHARUSAVA#CHOR#
Customer Reviews
  • Rating Starअनिल कसूरकर / वनिता सावंत

    ‘द्वंद्व’ हे आपण हृदयांतरीत केलेलं पुस्तक आत्ताच वाचून संपलं. ग्रेट कलाकृतीचा अनुभव एक श्रीमंत अशी तृप्ती देतो. त्या तृप्तीचा अक्षरउद्गार तुम्हाला पाठवीत आहे. ‘विजयदान देथा’ ह्या लेखकाची कथा मी प्रथम ‘अक्षर’ (बहुदा) दिवाळी अंकात ९७ सालाच्या आसपास वाल्याचं मला पुसट स्मरतं आहे. प्रतिमा जोशी यांनी ती ‘काकपंथ’ ह्या गावात आशयांतरीत केलेली होती. त्या कथेनंही मला उखडून काढलं होतं मुळापासून. त्यानंतर मी अनेकांना त्या कथेबद्दल बोललो. थोर कलाकृतीचा सुगंध इतरांच्या ओंजळीत देत राहिल्याशिवाय कसं रहावेल? ‘द्वंद्व’ हे पुस्तक मला अनिल किणीकरांनी दिलं. आता मी ते ह्याला त्याला देत राहीन. त्यावर बोलत आणि ऐकत राहीन. अक्षरकला आपलं जगणं दुपदरी करते असा माझा अनुभव आहे. मला काही असे मित्र आहेत की जे अभिप्राय म्हणून ‘छान, ठीक, बरं आहे...’ अशी चिऊकाऊची भाषा वारण्याऐवजी ‘अरे... सत्तेच्या सामर्थ्यासमोर सत्त्याचं सामर्थ्य कुठवर टिकणार?’ हे वाक्यं काय सॉलीड आहे नाही?... असं उदाहरणासहित मनभर बोलतात. अशा आस्वादात्मक संवादाचंही एक सुख असतं. पण अर्थातच खूप जणांना फक्त असलं सुख लेखक या नात्यानं ‘घेणं’, ठाऊक असतं. वाचक ह्या नात्यानं ‘देणं’ नाही! असो. राजस्थानातून तुम्ही हे अस्सलं देसी तूप महाराष्ट्रात आणलंत आणि ते ही त्याच्या मूलभूत सौंदर्याला धक्का न पोहोचता आणलत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमची भाषा मौल्यवान आहे. तिचं मी कौतुक करतो. असं दर्जेदार भाषांतर वाचणं हे एक सुख असतं. भाषांतर हे कलाकाराचं काम आहे. येऱ्यागबाळ्याचं नव्हे. भाषांतर ही एक कलाकृतीच असते, हे मान्य करायलाच हवं. तुम्हाला मूळ आशयाची खोलसमज आहे हे भाषांतरातून जाणवतं. कृत्रिम संकोच तुम्ही पाळलेला नाही हे पाहूनही फार समाधान वाटलं. आस्वाद ही पंचेद्रियांनी अनुभवण्याची चीज आहे. तिच्या आड लज्जेचं कुठलही वस्त्र देता कामा नये. तुम्ही केलेली ही अक्षरपूजा फार विशुद्ध आहे. सर्वच कथा एका हारातल्या आहेत पण प्रत्येक फुलाला स्वत:चं असं एक स्थान आहे. फुलं ह्या धरतीवरची वाटू नयेत इतकी स्वर्गीय आहेत. ‘काकपंथ’ ची अखेर डोळ्यांत पाणी आणते. ‘बिकटप्रश्न’ मधील निसर्ग दृष्ये स्वत:चाच विसर पाडतात. कथांचा आशय सत्त्यावर आधारीत असल्याने दणकट आहे. ‘गोष्ट हा रपकासारखा वापरून लेखकाने साऱ्या अवकाशाचं अंगण भरारीसाठी वापरलं आहे. ‘कात’ नावाची कथा चित्रपट काढण्यासाठी सर्वोकृष्ट आहे. मी तो चित्रपट पाहिला आहे वाचत असतानाच अमोल पालेकरचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होईल. असो आभार. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-07-2000

    गूढ, कल्पनारम्य कथा... विजयदान देथा यांच्या मूळ राजस्थानी कथांचा वनिता सामंत यांनी अनुवाद केलेला ‘द्वंद्व’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. तेरा कथांचा हा संग्रह आहे. समाजात वावरताना स्त्री-पुरुष समाजाची बंधने, रूढी, रीिरिवाज यांचे ओझे वाहत जगत असतात. अशांचा आढावा घेत लिहिलेल्या या कथा वाचल्यानंतर माणूस अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. वनिता सावंत यांनी हा अनुवाद केला आहे. ‘द्वंद्व’ या कथेत एका धनवान सेठजीच्या एकुलत्या एका मुलीचा विवाह पार पडून वरात परत येताना जंगलात एका झाडाच्या सावलीत विश्रांतीसाठी थांबते. त्याच झाडावर एका भुताचा मुक्काम असतो. अत्तर, तेल्याच्या सुगंधाने दरवळणाऱ्या दुल्हनच्या उघड्या चेहऱ्याकडे जेव्हा भुताचे लक्ष जाते तेव्हा त्याचे डोळे दिपतात. तिचे सौंदर्य पाहून भुताच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. ढगातील मुक्काम सोडून बिजली तर नाही ना खाली आली, असे त्याला क्षणभर वाटून जाते. तिच्या झाडाखाली बसण्याने त्या झाडाची सावलीसुद्धा चमकू लागते. दुल्हनच्या शरीरात प्रवेश करण्याचा विचार त्याच्या मनात येतो, परंतु त्याला पुन्हा असेही वाटते की, त्यामुळे हिला त्रास होईल. अशा रूपाला त्रास कसा देता येईल आणि पतीला त्रास दिल्यास पत्नीचे मन तडफडणारच. हे रूप तडफडू लागल्यास ना मेघ बरसतील, ना बिजली चमकेल, ना सूर्य उगवेल ना चंद्र. निसर्गाचं सारं दृश्यच बिघडून जाईल. या सुंदर रूपाला दु:ख देण्याऐवजी स्वत: दु:ख सहन करणं चांगलं. अशातऱ्हेचे दु:ख तरी कुठे नशिबात असतं, असे अनेक विचार भुताच्या मनात येतात. विश्रांतीसाठी थांबलेला दुल्हा-दुल्हनचा रथ अदृश्य होताच तो मूर्च्छा येऊन पडतो. विवाहास झालेला खर्चाचा हिशेब लागत नव्हता म्हणून कपाळावर आठ्या चढवून आकड्यांचा जमाखर्च करणारा दुल्हा सौंदर्याकडे पाठ करून लगेच व्यापारासाठी परदेशी निघणार असतो, ते इकडे दुल्हनच्या सौंदर्याने वेडं झालेलं भूत आपण तिच्या कसे जवळ जाऊ याचाच विचार करत असते. जेव्हा दुल्हा भुताच्या वृक्षाजवळून जातो तेव्हा तो त्याला ओळखून विचारतो, ‘भाई, अजून विवाहाची मंगलगाठसुद्धा सुटली नाही, इतक्या लवकर कुठे चाललात?’ तेव्हा दुल्हा सांगतो, ‘मंगलगाठ काय परदेशात सोडता येत नाही?’ भूत खूप दूरवर सेठजींच्या मुलाबरोबर चालत राहून सगळी हकीकत जाणून घेतो आणि सेठजींच्या मुलाचं रूप धारण करून हवेलीत जाण्याचं ठरवतो. पाच वर्षे तरी आपल्याला कोणी विचारणार नाही. हवेलीत येताच सेठजींना सांगतो, मी परदेशी जात असतानाच एका महात्म्याने मला वरदान दिलं की रोज पलंगावरून खाली उतरताच पाच मोहरा मिळतील. हे ऐकून सेठजी मोहरांच्या लालचीने मुलाला आनंदाने इथेच राहण्यास मान्यता देतो. जिथे जन्मदाते आई-वडील भुताला आपला मुलगा मानतात त्या हुबेहूब चेहऱ्याच्या पुरुषाला आपला पती मानण्यास ती का संकोच करील. पुढे तिला दिवस जातात. परदेशात एका विश्वासू शेजाऱ्याकडून दुल्ह्याला इकडची खरी परिस्थिती समजते. तेव्हा तो मायदेशी परततो. परंतु त्याला अनेक कसोट्यांना उतरावे लागते. शेवटी एका गावंढळ मेंढपाळाच्या न्यायानुसार भुताला जेरबंद केलं जातं. यातूनच दुल्ह्याला दाखवून दिलं की, नुसत्या विवाहाने काय होतं. व्यापार वस्तूंचा होतो, प्रीतीचा नाही. या व्यापारात असाच लाभ होतो. असं विचार करायला लावणारं द्वंद्व. ‘दुसरा कबीर’ या कथेतील कबीराची कला म्हणजे गालिचा, शाल आणि कांबळ्यांवर वेलबुट्ट्या, झाडं-झुडपं आणि फुलं-पानं असं विणीत असे की जणू खरोखरीच आहेत. कबीराची लहर मात्र निराळी होती. खुद्द राजाचं बोलावणं आलं असताना सुद्धा राजाच्या भेटीसाठी न येणारा कबीर. राजकन्येच्या आग्रहाखातर स्वत: राजाच कबीराच्या भेटीस निघतो. तेव्हा कबीराला विचारलं जातं. ‘तू कुणाला आपल्या वस्तू विकत नाहीस, कुणाला भेट देत नाहीस. मग या आहेत कशासाठी?’ यावर कबीराचं उत्तर असतं, ‘गरज असूनसुद्धा ज्यांच्याकडे या वस्तू खरेदी करण्याची क्षमता नाही त्या लोकांसाठी माझी कारागिरी आहे.’ याचाही राग न धरता राजा म्हणतो, इच्छेला येईल ती किंमत माग. तुला पूर्ण सवलत आहे. तेव्हा निर्लोभी कबीर सांगतो, ‘माझ्या गरजा इतक्या कमी आहेत की आपण दिलेली सवलत माझ्या कसल्याच उपयोगी पडणार नाही. आपलं येणं व्यर्थ ठरलं म्हणून पुन्हा एकदा माफी मागतो.’ कोणती असूया, लालच याच्या आहारी न जाणारा निर्लोभी कबीर या कथेतून वाचावयाच मिळतो. ‘काकपंथ’ या कथेत मोती आणि माणिक खाणाऱ्या हंसांना सावकाराचा मुलगा पाणी पाजतो, त्यांना आपल्याजवळील मोत्याचा दाणा खाऊ घालतो. सेठजीला मात्र आपल्या मुलाच्या या कृत्याचा राग येतो. सेठजीच्या मुलाची बायकोही हंसाची देखभाल करते. हंसावर जीवापाड प्रेम करते. हंस परतताना हंस आणि बहू ओक्साबोक्शी रडतात तेव्हा दोघांचे अश्रू एकमेकात मिसळतात आणि अनमोल मोती बनू लागतात. हे पाहून सेठजी खूश होऊन मुलाला दूर मानस सरोवराला मुखिया हंसाच्या भेटीस पाठवतात. तिथे चक्रवाक ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार जर मध्यरात्री याच पत्नीशी मीलन झाले तर कडक नक्षत्रात मुलाचा जन्म होईल. बालपणी त्याच्या लाळेचे अनमोल मोती बनतील आणि मोठा झाल्यावर खोकला की खाकऱ्यातून सव्वा लाखाचं रत्न पडेल. परंतु पाच महिन्यांचा प्रवास असलेल्या ठिकाणी मध्यरात्रीस कसं पोहोचता येणार. तेव्हा उपकाराची परतफेड करणारे हंस त्याला आश्वासन देतो, ‘स्वप्नात पोहोचता येईल की नाही ते स्वप्न पडल्यावरच समजेल, पण मी मध्यरात्रीच्या आधीच तुला बहूच्या शेजघरात पोहोचवून देईन.’ तेव्हा तो स्वत:च्या पंखावर त्याला बसवून घेऊन जातो. अमृतघडीच्या शुभमुहूर्तावर बहूला गर्भधारणा होते. इथेच तिला अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागते. तिला घराचे दार बंद होते. तेव्हा घोरपडीच्या पापाने पिंपळाला जळावं लागतं हेच इथे सिद्ध होतं. ‘काकपंथा’त सांगितल्याप्रमाणे लख्खू सेठानीला समजावते, ‘बेटी, हे धर्म, कर्म, ज्ञान, भक्ती, कल्याण, अहिंसा, रीतिरिवाज परंपरा आणि मान्यताचे सगळे भ्रम खोटे आहेत. खरा आहे तो फक्त काकपंथ. फरक नसला तरी प्रत्येक रामायणात फरक दिसून येतो. दुनियेतील तमाम स्त्रियांचं फक्त एकच रामायण आहे. पुरुषांच्या हातून फसवलं जाणं आणि त्या फसवणुकीचा आयुष्यभर परिणाम भोगणं. कोणतीही स्त्री या रामायणापासून अस्पर्श नाही. परंतु संसाराच्या भ्रमपाशात ही गोष्ट नीट ध्यान्यात येत नाही.’ ‘वेगळं घरकुल’ या कथेतील बिजा-तिजा यांची कहाणी लक्षवेधी ठरते. त्यांनी घेतलेले निर्णय आणि स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत इथे वाचावयास मिळते तर ‘कांत’ या कथेतील गवळ्याची बायको गावातील ठाकुराला तो अंगचटीला आला असता जोरात हिसका देते आणि घरी येऊन नवऱ्याला आपण केलेले कृत्य ऐकवते. परंतु जुन्या वृत्तीचा गवळी उलट तिलाच तू आपल्या अन्नदात्याच्या बाबतीत असं करायला नको होतं असं सुनावतो. तेव्हा नंतर तिने लढविलेली एकेक शक्कल मात्र वाखणण्यासारखी आहे. तिच्यामध्ये कुठेतरी आजची स्त्री डोकावताना दिसते. एकूणच या सर्व राजस्थानी लोककथांमधून स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, लोभ-लालसा, ईर्षा, असूया उघड करून दाखविण्याचे सामर्थ्य दिसून येते. अनेक कथांमध्ये गूढ वातावरण आणि कल्पनाशक्तीचा आधार असला तरी सर्व कथा वाचनीय आहेत. -अभिषेक ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT 09-07-2000

    मानवीमनाचा वेध घेणारा कथासंग्रह… लोक कथात वास्तव व कल्पना यांचं मिश्रण असलं तरी त्यातील सत्याचा अंश हा मानवीजीवनातील वास्तवावरच आधारलेला असतो. लोककथांना असलेला गूढ व कल्पिताचा स्पर्श त्यातील मूळ गाभ्याला बाधा आणत नाही. उलट वातावरणनिर्मिती व मनोभूमिक तयार करण्यास हातभारच लावत असतो. अशा लोक कथांतून तत्कालिन समाजजीवनाचे, रूढी परंपरांचे चित्र उभे राहते. ‘द्वंद्व’ हा राजस्थानी लोककथांवर आधारित कथासंग्रह मूळ लेखक विजयदला देथा यांच्या १३ कथांचा अनुवाद केला आहे. वनिता सावंत यांनी स्त्री-पुरुष यांचे विविध स्तरांवरील नातेसंबंध, त्यातून निर्माण होणारे स्त्रीजातीचे दु:ख प्रस्तुत कथांतून व्यक्त झाले आहे. स्त्री कोणत्याही जातीधर्मातील, वर्गातील असो. तिची कथा, व्यथा, वेदना तिचं प्राक्तन एकच असतं, पुरुष जातीकडून होणारी वंचना. ‘द्वंद्व’ या कथेस गूढ, अंधश्रद्धेच्या कल्पनेचा आधार आहे. ऐहिक जीवनातील सुखसंपत्तीच्या, खोट्या प्रतिष्ठेच्या मागे असणारा व्यवहारी दुल्हा व त्याच वृत्तीचा पिता दुल्हनच्या दु:खास कारणीभूत होतात. स्त्री जन्माचीच ही करुण कहाणी आहे. ती एक बाहुलंच असते म्हणून दुल्हनही भूतयोनीतील पतीचे रूपासही ती शरण जाते. परस्त्री व परपुरुषासाठी कुणाचं मन लालचावत नाही पण सामाजिक प्रतिष्ठेमुळे पडदा हटवता येत नाही, पण पडद्याच्या मागे जे घडायचं ते घडतच. या प्रखर वास्तवावर लेखक प्रकाश टाकतो. वर्षानुवर्षं स्त्रीला बंधनात ठेऊन तिला जिवंतपणी, मरणयातना भोगायला लावणं हे आपल्या समाजव्यवस्थेचं वैशिष्ट्य. ‘न्यारी न्यारी मर्यादा’ कथेत स्त्री व पुरुष यांच्या मर्यादा, त्यासंबंधीचे समाजाचे नीतीनियम, दंडक हे वेगवेगळे असतात. पुरुषाची नित्य नवी तृष्णा जागी होत असते. रवीला मात्र असे स्वातंत्र्य नसतेच. स्त्रीच्या मनावरचे दडपण दूर झाले. युगान् युगाच्या बंधनातून मुक्त झालेले जुने संस्कार नष्ट झाल्यावर स्त्री अतिशय धीट बनते. स्त्रीच्या मनाच्या तळघरात दडून राहिलेला भावनांना वाट मिळते. उधाण येते. पुरुषीसत्ता झुगारून देणाऱ्या आधुनिक स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी कथेची नायिका राणीपुढे अनेक प्रश्न उभे राहतात. पारतंत्र्य कसे झुगारता येईल? पुरुषांच्या आचरणाची नक्कल करून? कुणाच्या समजावण्यानं समजून घेणारे नाहीत पुरुष. स्त्रियांची मोकळीक पाहूनच यांना आपल्या मोकळीकीतील काळिमा दिसेल. असा आशावादही व्यक्त होतो. स्त्री मुक्तीच्या वाटेवरची ही कथा ‘दुसरा कबीर’ मधील नायक कबीर हा एक डोळस, निगर्वी, निधड्या छातीचा व मानवताधर्म श्रेष्ठ मानणारा पुरुष. सुंदर स्त्रीच्या रूपाला, तिच्या नजरेतील आव्हानाला, राजाच्या संपत्तीलाही बळी न पडणारा नि:संग कबीर, म्हणूनच मृत्यूसंबंधी तो म्हणू शकतो. ‘‘तलवार आणि सिंहासन या दहशतीनं मृत्यू भयभीत झाला असता तर गोष्ट वेगळी!’’ आणि देशाचा स्वामी हीन होऊन विचारता होतो, ‘‘क्षुद्र रयतेप्रमाणे मलासुद्धा एक दिवस मरावं लागेल काय?’’ कबीराच्या व्यक्तीचित्रणातून लेखक मानवजातीवरील महत्त्वाचे भाष्य करतो. ‘‘दुसऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आणि उच्च समजण्याच्या गैरसमजुतीमुळेच माणसाचा अत्यंत ऱ्हास झाला आणि होतच राहिला आहे. माणसाच्या दृष्टीनं ही किती शरमेची गोष्ट आहे की, धर्म आणि पंथाच्या बहाण्याने मृत झालेले अवतार अजूनपर्यंत जिवंत माणसांवर राज्य करीत आहेत.’’ समाजातील सारे भेदभाव नष्ट होऊन मानवताधर्म हाच श्रेष्ठ धर्म मानला जावा असा विचार मांडला गेलेली ही कथा वाचकाला विचारप्रवृत्त करते. ‘काकपंथ’ ही कथा म्हणजे माणसांमधील कावळ्याच्या वृत्तीची कथा. माणसंच माणसाला टोचून टोचून तचा जीव नकोसा करतात. माणुसकी विसरून मानवतेला कलंक लावण्यासारखं वर्तन करतात आणि या व्यवस्थेला बळी पडते ती स्त्री. प्रत्यक्ष पतीकडून फसवली गेलेली स्त्री अगतिक होऊन जाते. कारण स्त्रीचं सौंदर्य व तारुण्य आजही विकलं जातं. लक्खूच्या तोंडचं ‘‘हे दुष्ट अश्रूच आपल्याला हरवतात. स्त्रीचा यांच्यापेक्षा मोठा वैरी कोणी नाही.’’ हे वक्तव्य समस्त स्त्रीजातीला जागे करते. माणसांच्या जगात माता कुमाता नसते या विश्वासालाही तडा जातो आणि या पाखंडी दुनियेची ओळख खऱ्या अर्थाने पटते तेव्हा स्त्री उरी फुटून जाते हे कठोर वास्तव लेखक सांगतो. ‘‘धर्म-कर्म, ज्ञान, भक्ती, कल्याण, अहिंसा, रीतीरिवाज, परंपरा आणि मान्यतांचे सगळे भ्रम आहेत. खरा आहे तो फक्त काकपंथ. आपला स्वार्थच सगळ्यात महान.’’ हे मानवीजीवनातलं उघडंनागडं सत्य लक्खू वेश्येच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. ‘अकलेचा शिरोमणी असलेला हा माणूस आपल्या दोन पायांच्या बळावर नेहमी कुमार्गावरूनच चालत राहणार?’ असे प्रश्नचिन्ह लेखकाने ‘बिकट प्रश्न’ कथेत उपस्थित केले आहे. वनमानवाच्या रानटी अवस्थेतून प्रगत अवस्थेतील माणसाच्या अवस्थेपर्यंचा त्याचा प्रवास हा एका स्त्रीच्या अथक प्रयत्नांचे फलित होते. स्वार्थानं आंधळा बनून सैतानासारख्या माणसापेक्षा वनमानवाच्या संगतीत राहणे तिने पत्करले. त्याचा अंतर्बाह्य कायापालट केला. वनमानवाचा गुराखी होताच त्याचं सगळं जीवन बदललं आणि स्त्रीच्या दु:खद जीवनप्रवासास सुरुवात झाली. ‘वेगळं घरकुल’ कथेद्वारा समलिंगी संभोगासारखी ज्वलंत व आगळीवेगळी सामाजिक समस्या मांडण्यात आली आहे. ‘‘स्त्रीचं पाण्याशिवाय चालू शकेल, पण पुरुषाच्या घामाशिवाय चालणार नाही.’’ या भाष्यातून स्त्री जुन्या रूढीपरंपरांत गुंतलेलीच आहे आणि ती स्वत:च दास्य पत्करते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. माणसाच्या सामाजिक स्थानावर त्याच्या मानमर्यादा अवलंबून असतात. गावपातळीवर तर हे अधिक प्रकर्षाने जाणवते, अन्नदाता व रयत यांच्यामधील संबंधात ठाकुराशी वैर धरताच येत नाही. येथे पौरुषही हतबल ठरते. कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करण्यापलीकडे रयतेला पर्यायच नसतो. ‘कात’ कथेचा नायिका लाछी ही अशीच हतबल स्त्री. ती म्हणते, माणसाच्या वागणुकीत खूप गुंतागुंत असते. कथनी व करणी यात फरक असतो आणि त्याची फळं भोगावी लागतात स्त्रीला. ‘सावधगिरी ‘सारख्या रूपकथेतून लेखक स्त्री-पुरुष नातेसंबंधातील विलक्षण गुंतागुंतीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. परक्या स्त्रीचं शील भ्रष्ट करण्यामुळे पुरुषांच्या हाती काय लागतं कुणास ठाऊक?’ असं म्हणत असतानाच दुसरीकडे स्त्रीलाही परक्या पुरषात रस असू शकतो. हे जरी अभावानेच आढळत असले तर संपूर्ण असत्य नाही. या सत्यावर प्रकाश टाकलाय. प्रस्तुत कथासंग्रहातील कथांत स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, प्रेम, लोभ, लालसा, कामभावना उलगडून दाखवण्यासाठी माणसाच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समाजातील पारंपरिक रूढी, रीतीरिवाज, अलिखित दंडक आणि त्यामुळे स्त्रीजातीवर होणारा अन्याय या वास्तवावर प्रखर-प्रकाश टाकला आहे. बुद्धी भ्रष्ट झालेल्या माणसातील माणूसपणच हरवून गेलं आहे. माणसातील पशुवृत्ती अधिक प्रबळ ठरल्याने तो पशू पातळीवर येऊन हीन; क्रूर कृत्ये करतो. यास बळी पडलेली स्त्री आमरण परिणाम भोगत राहते. स्त्रीच्या दु:खास केवळ व्यक्ती, पुरुष कारणीभूत आहेत असं नव्हे तर संपूर्ण समाजव्यवस्था पुरुषप्रधान समाजव्यवस्था कारणीभूत आहे या सत्यावर प्रकाश पडतो. माणसाचे अंतर्मन उलगडून दाखवणाऱ्या या कथा वास्तवाशी जवळीक साधतात आणि वाचकाला खिन्न करतात. म्हणूनच त्या उत्तम कथा असे म्हणता येईल. -माधुरी महाशब्दे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more