DAINIK SAKAL 23-11-2003अभ्यासपूर्वक, तरीही पूर्वग्रहदूषित...
‘मदर टेरेसा - बिआँड द इमेज’ हे अॅन सेबा या ज्यू पत्रकार लेखिकेने अलीकडे लिहिलेले मदर तेरेसांचे चरित्र खूपच गाजले आहे. ‘मदर टेरेसा – प्रतिमेच्या पलीकडे’ हा अनंत बेदरकर यांनी केलेल्या त्या पुस्तकाचा अनुवाद अतिशय साळ आहे.
अॅन सेबा ही एक नामवंत पत्रकार आहे. तिच्या संपूर्ण लेखनात तिचा संशोधक स्वभाव स्पष्टपणे जाणवतो. मदरचे चरित्र लिहिण्याआधी तिने साधनांची जुळवाजुळव करताना घेतलेले कष्ट पाहून मन अचंबित होते. प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती मिळविणे, मुलाखती घेणे, थोरापासून सानापर्यंतच्या भेटीगाठी घेणे, वर्तमानपत्रांतील कात्रणांची जमवाजमव करणे, मदरविषयी लिहिल्या गेलेल्या चरित्रग्रंथांचा अभ्यास करणे, चरित्र नायिकेच्या कार्यासंबंधीच्या मुख्य आणि अनुषंगिक विषयांचे परिशीलन करणे, त्यासंबंधी शास्त्रीय आणि अद्ययावत माहिती मिळविणे, अशा अनेक गोष्टी अॅन सेबा यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे प्रस्तुत चरित्र अभ्यासपूर्ण झाले आहे.
पुस्तकांच्या पूर्वार्धात मदर तेरेसांच्या कार्याच्या अनेक पैलूंवर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. मदरचे गणगोत त्यांच्या अल्बेनियन देशाची राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यांची झालेली जडणघडण यासंबंधी मोलाची आणि आतापर्यंत उजेडात न आलेली माहिती प्रारंभीच्या प्रकरणांमध्ये वाचायला मिळते.
मदर तेरेसा यांना संशयित चारित्र्याच्या व्यक्तींकडून देणग्या स्वीकारल्या, असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. हैतीचे हुकूमशहा श्री. दुवालियर यांच्याकडून आर्थिक मदत स्वीकारल्याबद्दल प्रस्तुत लेखिकेने मदरवर टीकास्त्र सोडले आहे. मात्र, त्याचबरोबर गेल्डॉफ या जगप्रसिद्ध पॉप सिंगरने मदरसाठी निधी जमविण्याची योजना मांडली असताना मदरने त्याला सविनय नकार दिला होता. तसेच ‘स्वयंसेवक’ (को-वर्कर्स) म्हणून कार्य करणारी सर्व विचारांच्या लोकांची एक संघटना मदरने सुरू केली होती. काही उत्साही मंडळी निधी गोळा करीत आहेत, असे समजल्यावर मदरने त्यांना तसे करण्यास मज्जाव केला. ‘देणारा परमेश्वर आहे’ ही त्यांची त्यामागची भूमिका होती.
मेणाहून मऊ असलेल्या मदर कधी कधी वज्रदपी कठोर होत असत. गोरगरिबांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ब्रिटनच्या तत्कालिन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना इशारा देण्यासही मदर मागे आल्या नाहीत, याचा गौरवयुक्त निर्देश ग्रंथात केला आहे. रॉबर्ट मॅक्सवेल हे ‘डेली मिरर’चे मालक होते. त्यांनी मदरबरोबर मैत्री केली आणि त्या मैत्रीचा गैरफायदा घेतला म्हणून मदरविषयी गैरसमज निर्माण झाले. त्याबद्दल मदरना दोष देता येत नाही, असे सांगून लेखिकेने मदरची बाजू घेतलेली आहे. सातव्या अध्यायापर्यंत लेखिकेने मदरची उजल प्रतिमा रंगविली आहे.
पुस्तकाच्या उत्तरार्धात ग्रंथकर्तीने मूर्तिभंजनाची भूमिका स्वीकारली आहे. मदरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या मुलाखती लेखिकेने घेतलेल्या आहेत. मदरवर त्यांनी आरोप आणि हेत्वारोप उघडपणे केले आहे. मदर हयात असताना लेखिका माहिती गोळा करीत होत्या; परंतु प्रत्यक्ष मदरची भूमिका मदरकडून किंवा मदरच्या निकटवर्ती सिस्टरांकडून समजून घेण्याची तसदी लेखिकेने घेतलेली दिसत नाही. आपल्या माहितीचा स्रोत लेखिकेने सतत लपवून ठेवला आहे. त्यामुळे त्या मतांबद्दल शहानिशा करणे अशक्य झाले आहे. लेखिका पत्रकार असल्याने स्रोत प्रकट न करण्याच्या कवचकुंडलाचा तिने आधार घेतला आहे.
मदर तेरेसा या देवदूत नव्हत्या; त्या मानवी होत्या. त्या ‘आकाशाएवढ्या’ झाल्या होत्या. तरी त्यांच्या कार्याचे आणि कार्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक मूल्यमापन करण्यात काही गैर नाही. संशयास्पद व्यक्तीकडून आर्थिक मदत स्वीकारताना किंवा चाल्र्स किटींगसारख्या व्यक्तीसाठी न्यायालयाकडे दयायाचना करताना मदरने सावध राहायला हवे होते, ही लेखिकेची टीका समजू शकते; परंतु क्लिंटनने सहकुटुंब कोलकत्त्याला येऊन मदरच्या आश्रमात छायाचित्र काढले म्हणून मदरना दोषी ठरविणे अप्रस्तुत आहे.
जगभर अनेक प्रकारच्या संघटना आपल्यापरी समाजसेवेचे कार्य करीत आहेत. अशा अनेक परिचित आणि अपरिचित संस्थांच्या कार्याची सविस्तर माहिती लेखिकेने सादर केली आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ मदरच्या चरित्राबरोबर स्वयंसेवी संघटनांचे जणू संदर्भ ग्रंथ झालेले आहे.
उदा. डॉक्टर प्रेगरचे कोलकत्ता येथील कार्य, सिसिलि साँडर्सचे इंग्लंडमधील कार्य, डॉ. लुसियो डिसोजांचे मरणोन्मुखांसाठी मुंबई येथील कार्य, रामकृष्ण मिशनचे कार्य इत्यादी तुलना नेहमी अप्रस्तुत असतात, असे इंग्रजीत म्हटलेले आहे. प्रत्येक संघटनेत अधिक आणि न्यून असते. अॅन सेबा प्रत्येक तुलनेवेळी अन्य संघटनांचे कार्य कसे उजवे आहे आणि मदरचे कार्य कसे निकृष्ट आहे, अशी तुलना करतात.
अनंत बेदरकर यांनी मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद करताना खूप परिश्रम घेतले आहेत.
-फादर फ्रान्सिस दिब्रिटो ...Read more
DAINIK KESRI 18-04-2004मदर टेरेसांच्या कर्तृत्वाचे यथार्थ चित्रण…
जगातील अगदी मोजक्या व्यक्तिमत्वांना ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असे वर्णन खऱ्या अर्थाने लागू पडते. त्यामध्ये अलीकडच्या काळातील ‘मदर टेरेसा’ यांचे नाव वरच्या श्रेणीत समाविष्ट करावे लागेल. भारतरत्न, शांततेचानोबेल पुरस्कार आणि जगाच्या कानाकोपऱ्यांतील अगणित सन्मान पारितोषिके, बहुमान यांनी सन्मानित केलेल्या मदर टेरेसांचा जीवनपट म्हणजे मानवतेच्या सेवेची महानगाथा आहे.
मदर टेरेसांच्या वागण्यातील नम्रता, लीनता, निष्ठा, चतुरता, संभाषण चातुर्य, प्रचंड आत्मविश्वास, स्वयंप्रेरणा, दीनदुबळ्यांच सेवाहाच प्रत्येक धर्माचा पाया आहे. यावरचा दृढ विश्वास, निर्भिडपणा, समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रवृत्ती, जागतिक नेते, धनिक यांच्याशी वाटाघाटी करून, सेवाव्रत संस्थात्मकदृष्ट्या आर्थिक पाठबळ मिळवण्याची हातोटी असे अनेकविध गुण यांच्यात सामावलेले आहेत. त्यांची चतुस्रता पाहून आपण थक्क होतो. अॅन सेबा या नामवंत ज्यू लेखिकेने परिश्रम करून ‘मदर’चे जीवनचरित्र १९९७मध्ये यशस्वीपणे साकारले. बेदरकर यांनीही परिश्रमपूर्वक त्याचा अनुवाद सुलभ मराठीत करून मराठी वाचकांना एका जागतिक व्यक्तिमत्वाची ओळख यथार्थपणे करून दिली आहे.
१९१० मध्ये अल्बेनिया या छोट्या राष्ट्रात सामान्य कुटुंबात जन्मलेली अॅग्नेस नावाची बालिका. ऑस्ट्रिया, हंगेरी राष्ट्रे एका बाजूस व दुसऱ्या बाजूस काल्कन राष्ट्रांपैकी स्लॉव यांच्या कात्रीत सापडलेल्या अल्बेनियाला अनेक वर्षे अशांततेच्या शापाबरोबर अन्याय, अत्याचार, संघर्ष यांची साथ घ्यावी लागली. स्वातंत्र्यलढ्यात होरपळून निघालेल्या कुटुंबात अॅग्नेसचे बालपण उडून गेले. लहानपणापासून धार्मिकता, एकत्रित प्रार्थना, शांतता, समंजसपणा, ऐक्य, खिस्ताची शिकवण ‘अग्नेस’मध्ये भिनत गेली. प्रा. ईगन (१९८५), डेव्हिड पोर्टर (१९८६) यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांमधून टेरेसाच्या लहानपणाचा तपशील समजतो. गोरगरिबांची सेवा, खिस्तधर्माचा अभ्यास व भारताबद्दल आकर्षण यामुळे ती डिसेंबर १९२८ मध्ये भारताकडे निघाली.
भारतात पोहोचल्यानंतर भूगोलाची शिक्षका, प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका, संन्यासीन, मुख्याध्यापिका, समाजसेविका, स्वयंसेविका, मिशनरीज ऑफ चॅरिटीची अध्यक्षा व संस्थापिका, १९५०मध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारून कोलकत्यामध्ये अभूतपूर्व सर्व समाजसेवा केंद्र उभारून अथकपणे केलेली वाटचाल., १९९०मध्ये चार हजार सिस्टर्स, १३० देशांमध्ये ६००च्या जवळपास विविध प्रकारची सेवा केंद्रे व त्या सर्वांचे समर्थपणे नेतृत्व करणारे हे असामान्य व्यक्तिमत्व तेरा प्रकराणांतून वाचकांसमोर सादर केले आहे.
संस्था आणि पंथ उभारणी, संस्थात्मक विकास विस्तार, विश्वभ्रमण, प्रस्थापना, धर्म आणि शास्त्र ही प्रकरणे म्हणजे टेरेसांच्या कर्तृत्वाच्या आलेखाचे यथार्थचित्रण आहे. या ठाम परंतु काहीशा अबोल, निगर्वी व्यक्तिमत्त्वाचे सेवाभावी व्रतचे ते व्यक्तिमत्त्व लहान लहान वाक्यांतून, घटनांमधून ठिकठिकाणी वाचकाला खिळवून ठेवते.
त्यांनी अल्बेनियन वंशाची नम्रता, लीनता आणि निष्ठा जगभर प्रसारित केली. जागतिक नेते आणि जबरदस्त धनिक व्यक्ती यांच्याबरोबर त्यांनी निपुणतेने व्यवहार पार पाडले. मार्केटिंग तंत्रज्ञान कुशलतेने वापरून प्रति वर्षी तीन कोटी डॉलर इतका निधी मदर टेरेसांकडे येत असावा, असा अंदाज रॉयटर्स नावाच्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने खात्रीलायकरित्या व्यक्त केला. त्यावरून त्यांच्या व्यावहारिक सक्षमतेची कल्पना येऊ शकते.
१९२८मध्ये अॅग्नेसने (टेरेसा) लेफ्टनंट बोयाझिक यांना पत्र लिहिले. ‘२० लाख लोकांच्या राजाची तू सेवा करशील. मी संपूर्ण जगाच्या राजाची, स्वामीची सेवा करणार आहे.’ (पान ३३) १९२५मध्ये टेरेसाचे नाव पोपनी संतांच्या यादीत समाविष्ट केले. (पान ५०) चौरंगी परिसरात पुढच्या बाजूस भव्य इमारती, तर परसदारी घाणेरडे वातावरण, पदपथावर रहात असलेले लोक, सारे घाणेरडे गलिच्छ, अस्वच्छ, भीक मागणारे कुष्ठरोगी, देवी रोगाचे थैमान, कचरापेटीत नवजात अर्भके. (पान ५५) १९२४ मधील तुफानी वादळ, भयानक पूर, १९४३ मधील अभूतपूर्व दुष्काळ, लोअर सेक्र्युलर रोडवर दहा फूट अंतरावरूनही फासळ्या मोजता येतील, अशा प्रकारचे असंख्य निर्वासित, बेघर, १९९४४ मध्ये ३५ लाख व्यक्ती मृत झालेला दुष्काळ, १९४७ मध्ये हिंदुस्तानची फाळणी व त्यानंतर पूर्व बंगालमधून आलेले लक्षावधी निर्वासित, ऐतिहासिक हत्याकांड, दंगली, १९७१च्या बांगला युद्धामुळे भारतात घुसलेले दीड कोटी निर्वासित या संकटाच्या वेळी मदतीसाठी कार्य केलेली टेरेसा खऱ्या अर्थाने समाजसेविका म्हणून मान्यताप्राप्त ठरली.
कोलकत्यामधील त्यांनी स्थापन करून वृद्धिंगत केलेल्या प्रेम-धन, शिशु-भक्त, फिरता दवाखाना, मरणोन्मुखांसाठी मदत केंद्र, निर्मळ हृदय वसतिगृह इत्यादी समाजोपयोगी भरीव कार्यांमधील क्षमता डॉ. बी सी. रॉय (मुख्यमंत्री) यांना उमगली. शासनतर्फे जमिनी बहाल करण्यास सुरुवात झाली. मदर टेरेसा यांना कट्टर कम्युनिस्ट विचारसरणीच्या कोलकत्याने आपले मानले. रवींद्रनाथ टागोरानंतर तुम्हीच जगमान्य व्यक्ती आहात, याची मनोमन पावती दिली. सरकारतर्फे झालेल्या भव्य नागरी सत्कारात ज्योती बसूसारखा राजकारणी हेलावला. त्याने उद्गार काढले, ‘आजपर्यंत तुम्ही कोलकत्याच्या मदर होतात; परंतु आता मात्र तुम्ही अखील जगाच्या मदर झालेल्या आहात.
निराश्रित, मरणोन्मुख झोपडवासीय, दीनदुबळे, कुष्ठोगी, कुमारी माता, नवजात अर्भके, लाखोंच्या संख्येने आलेले निर्वासित, गर्भपाताला कडाडून विरोध करताना हजारो नवजात बालकांना सांभाळण्याची मर्दुमकी, व्यसन मुक्ती केंद्र, प्राथमिक आरोग्यसेवा, मोफत औषधोपचार, औषधे वाटणे, कुपोषितांना मदत, समाजातील अनेक पीडितांना सेवाभावी वृत्तीने त्यांनी सहकार्य केले. एड्सवर त्यांनी केलेले कार्य म्हणजे सेवाभावाचा मेरुमणी ठरला. मोफत शाळा, वसतिगृहे, महिलांसाठी अनाथालये यांची साखळीच भारतभर उभी केली.
या पार्श्वभूमीवर १९९५मध्ये शहीद कपूर या मुस्लिम विवाहित मुलीवर व तिच्या मुलावर झालेला अन्याय, दलित ख्रिश्चनांबदलचा त्यांचा दृष्टिकोन या अप्रतिम घटना क्लेशदायक वाटतात. अशात या अभूतपूर्व चरित्रात्मक पुस्तकात मोजकी छायाचित्रे, त्यांचा ठळक जीवनपट समाविष्ट केल्यास ग्रंथाची वाचनीयता वाढेल.
-अनिल दांडेकर ...Read more