* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EVERYTHING HAPPENS FOR A REASON
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9788177667189
  • Edition : 3
  • Publishing Year : 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SOMETIMES YOU THINK THAT YOU WILL GET A PARTICULAR THING IN YOUR LIFE. AND WHAT IF YOU ARE BLESSED WITH THE SAME THING? THEN? SAY FOR EXAMPLE THE TYPE OF LIFE WHICH YOU REALLY WANT TO LEAD... PRIYA MARRIES A VERY HANDSOME INDIAN SETTLED IN AMERICA. FROM DELHI, SHE MOVES TO L.A.; LOS ANGELES. SHE STARTS MOVING INTO THE CIRCLES OF HOLLYWOOD, INTERMINGLES WITH THE STARS OF HOLLYWOOD. AT THE SAME TIME, AT HOME, SHE ACTS AS A TYPICAL OBEDIENT HINDU DAUGHTER-IN-LAW, RESPECTING EVERYBODY, KEEPING THE HOUSE CLEAN, COOKING, FULFILLING ALL HER IN-LAWS WISHES. WHEN HER MOTHER-IN-LAW SUGGESTS HER TO TAKE UP A JOB, SHE IS SURPRISED. MORE SURPRISED WOULD BE HER IN-LAWS AND HUSBAND IF THEY WOULD EVER COME TO KNOW THE EXACT NATURE OF HER JOB. PRIYA JOINS THE STREAM AND BECOMES A PAGE THREE JOURNALIST; VERY SOON SHE IS THE MOST POPULAR, MUCH SOUGHT AFTER AND ENVIED BY MANY. THOUGH ENTERTAINING, THIS NOVEL HAS AN EDGE. THE MAIN CHARACTER OF THE NOVEL IS SO LIVELY AND ENTHUSIASTIC THAT YOU WILL LOVE HER.
जे तुम्हाला कधीच मिळणार नाही असं तुम्हाला वाटलं होतं, तेच तुम्हाला मिळालं तर? म्हणजे जसं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल अगदी तसंच... अमेरिकेत राहणाऱ्या एका देखण्या भारतीय तरुणाशी प्रिया लग्न करते. ती दिल्लीतून लॉस एंजेलिसला जाते - हॉलिवूड आणि चित्रपट तारे तारकांमध्ये वावरते - आणि तरीही एकीकडे आज्ञाधारक हिंदू सुनेची भूमिका वठवते : स्वयंपाक, स्वच्छता, सासू सासऱ्यांच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण करणं हे सारं करते. त्यामुळेच जेव्हा तिची सासू तिला नोकरी कर असं सुचवते, तेव्हा प्रियाला जरा आश्चर्यच वाटतं. अर्थात तिच्या पतीला आणि सासू सासऱ्यांना तिच्या नोकरीचं स्वरुप काय आहे ते कळलं असतं तर त्यांना जास्तच आश्चर्य वाटलं असतं. प्रिया एक लोकप्रिय, सर्वांना हवीशी, आणि सगळ्यांनी हेवा करावा अशी मनोरंजन वार्ताहर बनते आणि त्यांना हे कधीच मान्य होणारं नसतं. मजेशीर तरीही योग्य तिथे धारदार, अशी ही कादंबरी. कादंबरीची नायिका इतकी उत्कट, उत्साही आहे, की तुम्हालादेखील ती नक्कीच आवडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #EVERYTHINGHAPPENSFORAREASON #एव्हरिथिंग हॅपन्स फॉर अ रीझन #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHITRAWALIMBE #KAVITADASWANI "
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    प्रीया लग्नानंतर नव-याच्या कुटुंबासमवेत अमेरिकेत येते.तिला नोकरी मी ळते स्वागतीकेची,पण अपघाताने ती पत्रकार होते आणि येथुन तिला दुहेरी भुमीका निभवणे भाग पडते.अतिशय वाचनीय आणि ऊपहासगर्भ कादंबरी !

  • Rating Starव्यंकटेश शिवाजी साळे

    या कादंबरीचं कथानक वेगवान, विचाराला चालना देणारे प्रसंगी मजेशिर तर काही ठिकाणी टोकदार असे आहे. ‘एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन’ हे शीर्षक ही सार्थ आहे व यथार्थ आहे. कादंबरी मनोरंजक, वेधक आहे. तितकीच धारदार आहे या बाबत मी दासवाणी आणि मा. मेहता साहेब ांचे बरोबर चित्रा वाळिंबे आपलेही कौतुक करतो. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 21-01-2007

    अमेरिकनायझेशनचे दर्शन घडवणारी कादंबरी… कविता दासवानी यांची ही दुसरी कादंबरी. मराठीत येणारी मात्र त्यांची ही पहिलीच कादंबरी. पहिल्या पृष्ठापासूनच ती वाचकांच्या मनाची पकड घेते. ‘आमच्या घरातल्या कोणीही स्त्रीनं आजवर नोकरी केली नव्हती... त्यामुळे माझया सासूच्या बोलण्याने मी थक्क झाले. माझ्या पोटाला लाकडी चमच्यानं टोचत सासूनं तक्रार केली. अजून तू मला आजी बनवलं नाहीस. मग निदान नोकरी कर.. काहीतरी तुझा उपयोग होईल. अमेरिका महागडा देश आहे. हा काही भारत नाही. या देशात प्रत्येकजण काम करतो.’ विवाहनंतर लगेच आठवडाभराने नवऱ्याबरोबर दिल्लीहून अमेरिकेला गेलेल्या नववधूच्या नव्हाळीच्या साजात असलेल्या लॉस एंजेलिसच्या अमेरिकन वातावरणाशी नव्यानेच जमवून घेऊ पाहणाऱ्या प्रियाला आपल्या सासूकडून मिळालेली ही नोकरी करण्याची सूचना काहीशी चक्रावून सोडते. खरं तर मी अजून इथं पुरती रुळले नव्हते. देश आणि घरातील सर्व कुटुंबीय माझ्यासाठी नवखेच होते. पत्नी आणि सून या नव्या नात्यानं मला स्वयंपाकीण, घर सांभाळणारी गृहिणी आणि स्वच्छता करणारी बाई अशा नव्या भूमिकाही दिल्या होत्या. संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सज्ज असणारी सासू मला आल्या आल्या नोकरी शोधायला सांगेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. माझ्या घराण्यातल्या आजवरच्या बायकांमध्ये नोकरी करणारी मी पहिली स्त्री असणार होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं मी एक आदर्श उदाहरण बनणार होते. त्यामुळे मला खरं तर सर्वांच्या पुढं गेल्यासारखं वाटायला हवं होतं, पण मलाही कल्पना हादरवून गेली.’ प्रियाला अमेरिकेत सगळेच नवे असते. पत्नीची आणि सुनेची भूमिका बजावण्याचा ती इमानेइतबारे प्रयत्न सुरू करते. प्रियाच्या -अमेरिकनायझेशन’ची ही सगळी प्रक्रिया नर्मविनोदी शैलीत प्रियाच्याच तोंडून ऐकायला मिळते. अमेरिकेतील प्रत्येक गोष्ट प्रियाला नवलाईचा एकेक नमुना पेश करणारी वाटते. ती व्यायामासाठी जिममध्ये जाते. तेथे तिला काय दिसते? ‘चेंजिंग रुममध्ये व्यायामाचे कपडे चढवून ती टॉयलेट क्युबिकलच्या मागे उभी होते. तिथे विवस्त्र स्त्रिया पायांना मॉइश्चरायझर लावत होत्या. काहीजणी ओले केस सुकवत होत्या, एकमेकांशी कार्डिओ, कार्ब आणि कॅलरीबद्दल बोलत होत्या. त्यांच्या शरीरावर कुठेही केस नव्हते. माझ्या एरोबिकच्या वर्गात त्या तंग शॉर्ट आणि ब्रा टॉप घालत आणि मी भली थोरली ट्रॅकपँट आणि मांडीपर्यत टीशर्ट घालून तिथल्या निळ्या मॅटवर सर्वांत मागे उभी राहत असे. शॉवर स्टँड पूर्ण झाकला जाईल असे पडदेदेखील तिथे नव्हते. तिचा नवरा संजय याचा भारतातून लेदर बॅग्जची आयात करून विकण्याचा व्यवसाय होता. वडिलांच्या बरोबर चाललेला. आपल्या पत्नीकडून त्याची अपेक्षा साधी सरळ, स्पष्ट ‘तू फक्त तुझ्या सासू-सासऱ्यांच्या मनाप्रमाणं, म्हणण्याप्रमाणं वाग. सगळं काही ठीक होईल. माझे आई-वडिल तसे समजूतदार आहेत. तू त्यांच्याशी वाद घालत नाहीस तोवर सगळं काही ठीक असेल. ते सांगतील तसं कर.’’ एक सुसंस्कृत हिंदू पत्नी, कर्तव्यदक्ष, स्वत:ला इतरांसाठी वाहून घेणारी, कितीही अपमान झाला तरी आनंदी आणि हसतमुख राहणारी... यासारख्या प्रतिमेची जपणूक करीत प्रिया अमेरिकेतले आरंभीचे दिवस घरातच जास्तीत जास्त काढते, पण सासू जेव्हा नोकरी बघायला सांगते, तेव्हा हे चित्र बदलणे अपरिहार्य ठरते. तेव्हा या कादंबरीत ‘प्रियाची नोकरी’ हा पुढचा महत्त्वाचा भाग असणार हे उघडच आहे तसेच घडतेही. प्रियाला खरं तर पत्रकार व्हायचे असते, पण तिची सासू फटाककन ती कल्पना मोडीत काढते. कॉन्व्हेंटचे इंग्लिश आणि आकर्षक व्यक्तिमत्व या बळावर प्रिया ‘हॉलिवूड इनसायडर’ या मासिकात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीसाठी मुलाखतीला जाते. फ्रेंचचे कामचालाऊ ज्ञान, संगणकाचं ज्ञान आणि साहित्यातील पदवी यांचाही फायदा तिला मिळतो. सध्याची रिसेप्शनिस्ट जाणार असल्याने तिच्या जागी तातडीने कोणीतरी ठेवणे भागच असते. ही देखील अंदर की बात असतेच. लिनेट डव्ह ही तेथील संपादकीय प्रमुख.. तिच्या मर्जीप्रमाणे तेथील कारभार चालतो. खांद्यापर्यंत रुळणारे गडद तपकिरी केस, तंग रेशमी विजार, उंच टाचेचे बूट, सुटसुटीत टॉप, महागड जाकीट... उत्तम कपड्यांची जाण. तिची कृष्णवर्णीय सहकारी शॅनीस. ती प्रियाला आपुलकीने वागवते. ‘तुझ्या बोलण्याला एक छान लय आहे.’ तिच्या कपड्यांमध्ये बघून ती म्हणते, ‘तू जिप्सी दिसते आहेस.’ शॅनीस तिला एका मॉलमध्ये घेऊन जाते. तिच्यासाठी भराभर नवे कपडे घेते. तंग ट्राउझर्स... स्वेडच स्मार्ट जाकीट. सुंदर डिझाइन्सचे टॉप्स, ब्लश आयशॅडोचा सेट, शूज, खांद्यावर लटकावयाची बॅग’ एवढंच नाही, जवळ सलूनमध्ये नेऊन केस दोन इंच कापायला लावते.. व्यायामशाळेत लॉकर भाड्याने घेऊन नवीन घातलेले कपडे त्यात ठेवते. शॅनीस सांगते, ‘घरून तू इथं ये. हे कपडे घाल. ऑफिसला ये. परत जाताना इथं थांबून कपडे बदल. घरचे कपडे घाल. घरी जा. तुझी सासू तुझे सासरे कोणाला पत्ता लागणार नाही.’ त्या दिवशी हे नवे कपडे घालून प्रिया ऑफिसला जाते. जो तो तिच्याकडे बघत राहतो. ‘हाय’ म्हणतो. ‘प्रिया तू सेन्सेशनल दिसत आहेस. खूप सुंदर आहेत हे कपडे मस्त. या स्मार्ट डेस्कमागे आता तू शोभून दिसते आहेस.’ डिअ‍ॅआ आल्या आल्या प्रतिक्रिया देते. प्रियाचे हे दुहेरी जिणे सुरू राहते. नोकरीला तीन महिने होतात. घरीची कामे, सुनेची कर्तव्ये आणि ऑफिसमधले वातावरण दोहोंचा मेळ ती घालते. पुढे प्रियाच्या पगारात एकदम १५ हजार डॉलर्सची वाढ होते. माया मुर्तास या ख्यातनाम अभिनेत्रीची तिने घेतलेली मुलाखतही प्रचंड गाजते. त्यामुळे हॉलीवूडमध्ये तिचा प्रचंड दबदबा निर्माण होतो. सेलीब्रिटी रिपोर्टर असा तिचा लौकिक होतो. एकदिवस तिच्या गौप्याचा स्फोट ती करते. आपण स्वागतिका नाही, तर वार्ताहर आहे असे ती सांगते. तेव्हा तिचे सासरे तिची खोटारडी म्हणून संभावना करतात. एवढा पगार तू कुठे ठेवतेस, असे विचारतात. तेव्हा तिचा हा प्रचंड पगार तिने बँकेत ठेवलेला आहे असे तिने सांगितल्यावर तिच्या सासूला हायसे वाटते. पैशाची लोभी सासू तू नोकरी सुरू ठेव असे सांगते. तुझ्याकडे प्रचंड पैसा आल्यामुळेच तुझ्या सासरच्यांना तुझ्याबद्दल प्रेमाचा पन्हा फुटला आहे. अशी जाणीव तिची मैत्रीण देते. सासरच्या मंडळीकडून आणि नवऱ्याकडून भ्रमनिरास झालेली प्रिया एक दिवस नोकरी, नवरा, सासर सोडून माहेरी येते. संजयला तिच्या नवऱ्याला स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे, अस्तित्वाचे, संसाराचे भान येते. तो आपल्या आई-वडिलांच्या धाकातून बाहेर पडतो. आपण आपली बायको, आपला संसार, आपले घर, यांचा विचार करतो आणि पुन्हा प्रिया आणि तिचा नवरा संजय हे दोघेही एकत्र येतात, कादंबरीचा अपेक्षित शेवट येथे होतो. अमेरिकेतील समाजजीवन, पैशासाठी लोभी असलेली माणसे, लग्न झाले तरीही आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहणारा मुलगा, स्वत:च्या कर्तृत्वाच्या बळावर अमेरिकेत नोकरी करता करता यशाचे शिखर गाठणारी प्रिया, या साऱ्या व्यक्तिरेखा कविता दासवानी यांनी अत्यंत समर्थपणे रेखाटल्या आहेत. अमेरिकेत जाणाऱ्या नवविवाहित भारतीय तरुणींच्या आयुष्यातील आव्हाने तेथे मिळणारी संधी, तेथील खाओ-पिओ मजा करो, असे चंगळवादी जीवन, भौतिक सुखांना चटावलेला अमेरिकन समाज, व्यक्तीस्वातंत्र्य या साऱ्यांचे भेदक चित्रण दासवानी यांनी केले आहे. ही कादंबरी वाचकाचे अनुभव विश्वही समृद्ध करते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 21-10-2007

    कविता दासवानी यांची ही नायिकाप्रधान कादंबरी. अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका भारतीय तरुणाशी विवाहबद्ध झालेल्या प्रिया नावाच्या एका भारतीय तरुणीची ही कहाणी. दासवानी यांनी ही नायिका वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे, अशा ढंगात ही कादंबरी पेश केली आहे. भि्न संस्कृतीच्या अमेरिकेत राहताना एका भारतीय, हिंदू संस्कृतीत वाढलेल्या मुलीला जुळवून घेताना आलेले अनुभव वाचकांना कादंबरीशी समरस करतात. प्रियाच्या जागी भारतीय संस्कृतीत वाढलेली कोणतीही मुलगी असती तर तिला जे अनुभव आले असते तशाच अनुभवातून प्रियाला जाताना पाहून ती आपल्यातीलच एक वाटू लागते. एकीकडे भारतात मुलींना नोकरीसाठी कुटुंबियांकडून फारशी पसंती नसताना अमेरिकेत मात्र प्रियाला सासरची मंडळी नोकरीचा पर्याय ठेवतात, तेव्हा प्रियाचे गोंधळणे, त्यानंतर नोकरीचा शोध, मुलाखतींची मालिका, हॉलिवूड आणि त्यातील तारेतारकांमध्ये सातत्याने वावर असणारी नोकरी व ते करतानाही घरातील नेहमीची कामे सांभाळण्याची कसरत असे प्रियाला आलेले अनुभव वाचकांना खिळवून ठेवतात आणि विचार करायलाही भाग पाडतात. मूळ इंग्रजीतील या कादंबरीचा चित्रा वाळिंबे यांनी केलेला अनुवाद वाचकांना निश्चितच भावेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more