* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BORN TO SHIVAJI AND HIS FIRST WIFE SAIBAI, SAMBHAJI WAS ENTRUSTED WITH CARRYING ON THE MARATHA EMPIRE WHICH SHIVAJI BEGAN. BORN AT PURANDAR FORT,HE WAS RAISED BY HIS PATERNAL GRANDMOTHER JIJABAI. SHIVAJI SIGNED THE TREATY OF PURANDAR WITH THE MUGHALS, AND SENT SAMBHAJI TO LIVE WITH RAJA JAI SINGH OF AMBER, AS A POLITICAL HOSTAGE. SAMBHAJI WAS RAISED AS A MUGHAL SARDARAND SERVED THE MUGHAL COURT OF AURANGZEB. AFTER SHIVAJI`S DEATH, SAMBHAJI FOUGHT AGAINST HIS STEPMOTHER, SOYARABAI MOHITE, WHO HAD HER SON RAJARAM CROWNED AS THE HEIR TO THE MARATHA KINGDOM. SAMBHAJI ESCAPED PRISON AND FORMALLY ASCENDED THE THRONE ON 20 JULY 1680. A BRILLIANT TACTICIAN, SAMBHAJI WAS WORTHY OF THE THRONE OF THE MARATHAS, ALTHOUGH HIS RULE WAS SHORT-LIVED. THIS BOOK REVEALS HIS LIFE STORY AND SHOWCASES HIM FOR THE RULER THAT HE WAS.
‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarVrushali Gawand

    नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आवडत्या लेखकाच्या , शिवाजी सावंत यांच्या "छावा" या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव. "छावा" या दोन अक्षरातच सर्व सार सामावलंय कादंबरीचं. सिंहाच्या पोटी छावाच जन्म घेतो नि जन्माला आल्यापासून ते अखेच्या श्वासापर्यंत तो सिंहच राहतो. संभाजीराजे सुद्धा असेच एक सिंहपुत्र होते. ज्या आदरणीय शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, मराठ्यांचे नाव देशात उज्ज्वल केले, हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, त्या मराठी स्वराज्याच्या मंदिरावर महाराजांच्या या पुत्रानं स्वतःच्या कर्तृत्वाने, बलिदानाने सुवर्ण कळस चढवला. या अशा अतिशय सुंदर कादंबरीचा मला आलेला अनुभव आणि त्यातून मी जे काही शिकले तेच आज मी तुमच्यासमोर मांडतेय. शब्दांमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या समजून घ्याव्यात अशी विनंती करते. संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे ते पुत्र. लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या संभाजीराजांना जीवनाचे धडे परिस्थितीनेच शिकवले. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगांनी ते काहीतरी शिकत गेले, स्वतःला घडवत गेले. परिस्थितीच्या प्रत्येक तडाख्यातून तावून-सुलाखून निघूनच त्यांच्या आयुष्याचा काळ हा सुवर्णकाळ बनून झळाळून उठला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्यावर पुरंदरच्या तहासाठी मुघलांकडे जामीन राहायची वेळ आली, पण तरीही ते डगमगले नाहीत. जसे महादेवास सर्वांच्या कल्याणासाठी विष पचवावे लागले, तसेच हे विष सुद्धा जनतेच्या कल्याणासाठी संभाजीराजांनी हसत हसत पचविले. त्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा, रयतेच्या कल्याणाचा वसा घेतलेल्या मनाचा याहून मोठा पुरावा काय असेल? ज्या वयात आई-बाबांचं प्रेमाचं, सुरक्षिततेचं छत्र सोडून दूर जाण्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही त्या वयात संभाजीराजे जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला शत्रूच्या गोटात जामीन म्हणून ठेवायला तयार झाले होते. पित्याच्या एका शब्दाखातर एवढं साहस करणारा पुत्र विरळाच. ज्या दैवानं त्यांना जन्मजातच लढवय्या वृत्ती, मुत्सद्दी राजकारणी मन दिल होत त्याच दैवानं त्यांना एक कवी मनही बहाल केलं होत. आजूबाजूची परिस्थिती पाहून जसे ते नवीन काहीतरी शिकत होते, तसेच त्यांच्यातला कवीही मोठा होत गेला नि यातूनच निर्मिती झाली बुद्धभूषण या ग्रंथाची. राजकारणावर आधारित असा हा ग्रंथ त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहला. याच ग्रंथामध्ये असलेल्या चार ओळी ज्या माझ्या मनाला अतिशय भिडल्या त्या अर्थासह खाली देत आहे. कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: । जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥ अर्थ - जेव्हा वाईट कालरूपी भुजंग, जनतेला त्रास देण्यासाठी, धर्माचा नाश करण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा सर्व जनतेला त्या वाईट लोकांपासून वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं एक युगपुरुष अवतरला, त्या महाराजांचा सदैव विजय होत राहूदे. या ओळींमधूनच आपल्याला समजून येईल कि संभाजीराजांचं आपल्या पित्यावर किती प्रेम होत, त्यांच्याबद्दल किती आदर होता. हे पुस्तक वाचल्यावर मला संभाजी महाराजांची ओळख अनेक रूपातून झाली. युवराज, एक शूर लढवय्या, कोणत्याही प्रसंगी माघार न घेता लढणारा वीर, धोरणी राजकारणी, प्रजाहितदक्ष राजा, तरल संवेदना जाणून त्या शब्दबद्ध करणारा कवी, कर्तव्यनिष्ठ पुत्र, प्रेमळ भाऊ नि आदर्श पती. पण या सर्वातही त्यांची खरी ओळख मला पटली ती माणूस म्हणून. मराठा साम्राज्याचे राजे असूनही त्यांनी गरीब जनतेवर कधी अन्य्याय होऊ दिला नाही. प्रसंग पडताच आप्तजणांना विरोध करून त्यांना शिक्षाही केल्या, पण निरपराध्यांचा बळी पडू दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव असायचा त्यांच्या मनी, कोणत्याही कैद्याला कधी त्यांनी सक्तीनं धर्मबदल करायला लावला नाही. औरंगजेबाच्या कुटील-कारस्थानी महासत्तेसमोर त्यांचं हे माणूसपण निश्चितच निविर्वादपणे मोठं वाटलं मला. संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेव्हा खरतर चुकी त्यांच्यापेक्षाही जास्त परिस्थितीची होती. सोयराबाई आणि दरबारातील काही महत्वाचे मंत्रीगण यांनी संभाजीराजांविरुद्ध अशी स्थिती निर्माण केली. इतकंच काय तर शिवाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा कट केल्याचा आरोप हि त्यांच्यावर लावला. सततच्या या कट कारस्थानांमुळे नाईलाजाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना या सर्वांपासून दूर ठेवलं, आपल्या दक्षिण भारतातील स्वारींसोबतही संभाजीराजांना त्यांना नेता आलं नाही. आणि या सर्वातूनच कळत-नकळत संभाजीराजांचं मन दुखावलं गेलं. त्यांनी बंड पुकारलं खर पण हा त्यांचा उठाव शिवाजीमहाराजांविरुद्ध किंवा स्वराज्याविरुद्ध कधीच नव्हता. त्यांचा लढा हा स्वतःविरुद्धच होता. मला तर तो एक युवराज विरुद्ध एक स्वराज्यासाठी लढणारा शूर सेनापती असाच वाटला. केवळ युवराजपणामुळे नव्हे तर एक स्वतंत्र व्यक्ती, या स्वराज्यासाठी झगडणारा एक मावळा म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची ती धडपड त्यांच्या दृष्टीनं योग्यच होती. पण त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग मात्र चुकला. या मार्गावरून ते परतलेही पण तोपर्यंत बरंच काही घडून गेलं होत. त्यांच्या नावाच्या खऱ्या खोट्या कितीतरी बातम्या एव्हाना मराठी मुलखात पसरल्या होत्या. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी गमावलेल सर्वकाही परत मिळवलंही कारण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या त्या छाव्याला औरंगजेबाच्या सामर्थ्याची भीती कधी वाटलीच नाही. पण दोन तुटलेली दोरखंड जोडताना जशी एक गाठ मध्यभागी राहते तशी गाठ राहिली होती. बरेच आप्तस्वकीय, विश्वासू लोक औरंगजेबाच्या भीतीनं म्हणा किंवा त्यांनी दाखवलेल्या आमिषानं म्हणा संभाजीराजांना फितूर झाले. पुस्तकाचा शेवट वाचताना तर अक्षरशः रडू कोसळते. सिंहासमान आयुष्यभर लढणारा तो वीर फसवला गेला तो स्वकीयांकडून. ज्याला शत्रूच भय कधीच वाटलं नाही त्याला आपल्याच माणसांनी फुटकळ विलोभनांपायी फसवलं. त्या महान राजाची जी विटंबना औरंगजेबाने केली त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. त्यांची विदूषकाचे कपडे घालून मिरवणूक काढली, जीभ कापण्यात आली, डोळे सुद्धा काढले पण इतकं सगळं होऊनही तो छावा औरंगजेबापुढे नमला नाही. खरतर मला संभाजी महाराज विरुद्ध औरंजेब असं युद्ध या पुस्तकातून जाणवलंच नाही. संभाजी महाराज आणि औरंगजेब या दोन व्यक्ती नसून प्रवृत्ती असाव्यात इतक्या त्या एकमेकांशी एकरूप झाल्यासारखं वाटलं. आणि खरचं त्या दोन प्रवृत्तीच होत्या, तो लढा होता चांगल्या वृत्तीविरुद्ध वाईट वृत्तींचा. औरंगजेबाचं सैन्य, त्याची सत्ता निश्चितच मोठी होती. पण त्या मागचा इतिहास मात्र काळाकुट्ट होता. औरंगजेब आणि संभाजीराजांना माणुसकीच्या पारड्यात तोलायचं झालं तर निविर्वादपणे महाराजांचं पारडं विजयी ठरलंय पाठोपाठ असंही वाटतंय कशाला करू हि तुलना? कारण स्वतःच्या जन्मदात्याला कैदेत टाकणारा, सख्ख्या भावाला जीवे मारणारा, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा औरंगजेब आणि स्वतःच्या पित्याचा एक शब्दही खाली पडू न देणारे, सावत्र आईनं ज्यांच्या मृत्यूचा कट रचला, ज्यांच्या चारित्र्यावर कलंक लावायचा प्रयत्न केला तरीही ज्यांनी तिला माफ केलं, स्वतःच्या सावत्र भावाचा जराही दुस्वास न करता त्याच्यावर निर्भेळ प्रेम करणारे संभाजीराजे यांची तुलना होऊच शकत नाही. पण तरीही मला हि तुलना कुठंतरी गरजेची वाटली ती यासाठी कि माणूस म्हणून जगताना आपण जरी चुकलो तरी ती चुकी सुधारून सुद्धा आपल्याला आपल्या स्वबळावर जगासाठी प्रेरणास्रोत बनता येत. अनंत कालापर्यंत समाजाच्या मनावर राज्य करता येत. त्यांचे आदर्श होऊन त्यांना मार्ग दाखवता येतो. कारण संभाजीराजांना माहित होत त्यांच्या वाहून गेलेल्या रक्ताच्या एक एक थेंबातुन पुन्हा असे लाखो संभाजी जन्माला येतील जे या मातृभूमीचे सगळ्या वाईट प्रवृतींपासून रक्षण करतील. तो गेला पण जगाला एक कायमची शिकवण देऊन गेला. कितीही खडतर परिस्थिती आली तरी हार न मानता लढायची, कारण चुकतो तो माणूस असतो पण त्याची माणुसकी तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तो या चुकांपासुन काहीतरी शिकतो. संभाजीराजांची हीच शिकवण मला या पुस्तकातून मिळाली. आयुष्यात स्वतःहून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे आपल्याला. कदाचित त्या निर्णयांमुळे तुम्ही चुकाल पण त्यातून सुद्धा काहीतरी शिकाल. आपल्या ध्येयासाठी अंतिम श्वासापर्यंत लढा कारण असं बलिदान कधीच व्यर्थ जात नसत. त्या बलिदानातूनच पुढच्या पिढीला जगण्याची नवीन आशा मिळते नि आपलं बलिदान त्यामुळं कृतार्थ होत. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या छाव्याला मी विनम्र अभिवादन करते, त्यांची शिकवण सदैव आपल्या मनात राहूदे हीच अपेक्षा. जयतु शंभूराजे!! ...Read more

  • Rating StarGanesh Malleshe

    सह्याद्रीतून उगवलेल्या तेजवंत छत्रपती शिवाजी राजांच्या राजपुत्राची, रुद्ररुप धारण करून मोघलांच्या छातीवर रुद्रतांडव करणाऱ्या सिंहाची , स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी चाळीस दिवस मुघलांच्या छावणीत अमानुष अत्याचार सोसलेल्या धर्मवीर अशा स्वराज्याचे दुसरेछत्रपती क्षत्रियकुलावतंस सर्जा संभाजी राजे यांच्या जीवनाची गाथा सांगणारे अद्भुत अमरग्रंथ छावा । शिवाजी सावंतांनी रचलेल्या छावा या कादंबरीत संभाजी महाराजांचे ज्वलंत तेजस्वी जीवन हुबेहूब दिसून येते जणू काय त्या काव्यपंडित संभाजीनीच आपले स्वतःचे आयुष्य या छावा कादंबरीत रचले आहे । महाराजांच्या खडतर जीवनाच्या खळ खळत्या प्रवाहातून वाहणाऱ्या नावेचा ऐलतिरापासून पैलतीरापर्यंत चा प्रवास या कादंबरीत शिवाजी सावंतांनी आपल्या प्रतिभाशाली लिखाणातून दर्शविला आहे । प्रत्येक भावना शब्दात बांधून मनाच्या मातीत पेरणार्या सावंत गुरुजींच्या अप्रतिम लिखाणाची खरचं दाद दिली पाहिजे । या भावना माझ्या मनात सुद्धा ही कादंबरी वाचताना नकळतच पेरल्या गेल्या, आता या मनाच्या सुगंधित मातीवर या भावनांचे अंकुर फुटले आहेत, वाऱ्याच्या प्रवाहावर हे अंकुर डुलत आहेत फुलत आहेत । संभाजी राजांच्या खडतर जीवनाचा उल्लेख सावंतांच्या लिखाणातून वाचताना बहुतांश वेळा मनाची जेवढी कालवाकालव होते त्या पेक्षा किती पटीने जास्त अभिमान त्यांचा पराक्रम वाचताना वाचकांना होतो। शिवाजी सावंतांच्या या मौल्यवान लिखाणाला त्रिवार वंदन ...Read more

  • Rating Star LOKSATTA PUNE 2-2-2014

    मराठी वाड्मयामध्ये अजरामर ठरलेल्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या शिवाजी सावंत यांच्या तीन कादंबऱयांची विक्रमी विक्री झाली असून साहित्याच्या प्रांतामध्ये ‘जुने तेच सोने’ याची प्रचिती येत आहे. दोन प्रकाशकांमधील स्पर्धेचा वाचकांना मात्र लाभ होत सून ही तीन अक्षरलेणी केवळ एक हजार रुपयांमध्ये आपल्या संग्रहामध्ये ठेवणे शक्य झाले आहे. शिवाजी सावंत यांनी वयाच्या पंचविशीमध्ये लिहिलेल्या’मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यामध्ये ध्रुवताऱ्यासारखे अढळ स्थान प्राप्त केले. या कादंबरीमुळे शिवाजी सावंत यांच्या नावापुढे ‘मृत्युंजय’कार ही उपाधी लावली गेली. ५०वर्षानंतरही ही कादंबरी तितकीच लोकप्रिय आहे याची साक्ष मिळत आहे. छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील ‘युगंधर’ या सावंत यांच्या दोन कादंबऱयांनाही तेवढीच पसंती मिळाली. कॉन्टिनेन्टल प्रकाशनने या तीनही कादंबऱ्या प्रकाशित केल्या होत्या. शिवाजी सावंत यांच्या निधनानंतर सावंत कुटुंबीयांनी या कादंबऱयांच्या प्रकाशनाचे हक्क मेहता पब्लिशिंग हाउसला दिले. त्यामुळे कॉन्टिनेन्टल प्रकाशन आणि मेहता पब्लिशिंग हाउस या दोन प्रकाशकांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती अजूनही सुरू असल्याने सध्या तरी दोन्ही प्रकाशकांकडे या पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क आहेत. यामध्ये वाचकांचा मात्र लाभ होत असून सावंत यांच्या या कादंबऱ्या त्यांना सवलतीच्या दरामध्ये मिळत आहेत. मेहता पब्लिशिंग हाउसने नव्या वर्षाची भेट म्हणून १३३५ रुपये किमतीच्या या तीन कादंबऱ्या वाचकांना केवळ एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्या. एका महिन्यामध्ये पाच हजार संचाची विक्री झाली आहे. त्यामुळे एक आवृत्ती संपली असून पुढील आठवड्यामध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. काही पुस्तक विक्रेत्यांकडे ५०० संचांची ऑर्डर आली आहे, अशी माहिती सुनील मेहता यांनी दिली. कॉन्टिनेन्टल प्रकाशनने मूळ किंमत दीड हजार रुपये असलेल्या या तीन कादंबऱ्या एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. या कादंबऱयांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. वाचक संचाच्या स्वरुपात त्याचप्रमाणे स्वतंत्रपणेही कादंबरी घेत असल्यामुळे पुस्तकांच्या विक्रीची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही, असे देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी सांगितले. ...Read more

  • Rating Starpranjali

    Apratim...............dusara shabd nahi.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more