* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAD TIBETAN:STORIES FROM THEN AND NOW
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9789386342263
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE MAIDEN ANTHOLOGY BY DEEPTI NAVAL, THE CRITICALLY ACCLAIMED ACTOR, PAINTER, DIRECTOR AND POET. EACH STORY IN THIS ANTHOLOGY CARRIES A VISUAL AND EMOTIONAL IMPACT AND VIVACITY OF A FILM. WHILE THULLI DRAWS YOU DEEP INTO THE SORDID AND BLEAK LIFE OF A PROSTITUTE IN KAMATHIPURA IN MUMBAI, THE PIANO TUNER GENTLY TUGS AT THE HEART WITH MUSIC. RUTH MAYBERRY INSPIRES WITH HER NEVER-SAY-DIE SPIRIT, YET GRAPPLES WITH LONELINESS. THE MORNING AFTER, THE MAD TIBETAN, PREMONITION, SISTERS, BIRDS ARE ALL FACETS OF LIFE ITSELF - EACH SPEAKS IN A VOICE THAT IS RESONANT OF HOPE, LOVE AND JOY OF ANOTHER DAY.
दीप्ती नवल या एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी आपलं अनुभवविश्व ‘द मॅड तिबेटियन’ या पुस्तकात कथारूपाने/लेखांच्या रूपाने चित्रित केलं आहे. ‘पियानो ट्युनर’ ही एका वृद्ध पियानो वादकाची कथा आहे. वयोमानामुळे तो पियानो वाजवू शकत नाही, त्याची अगतिकता आणि तरुणपणातील त्याच्या एका स्मृतीतून त्याला मिळणारा दिलासा, याचं संमिश्र चित्र या कथेतून प्रभावीपणे चित्रित केलं आहे. थर ‘दोघी बहिणी’ कथेतून गिनी आणि बनी या दोन बहिणींचं जगणं समोरं येतं. केवळ आई नसल्यामुळे या मुलींचं भावविश्व कसं उद्ध्वस्तझालंय हे एकाच घटनेतून ठाशीवपणे पुढे येतं. ‘अघटिताची चाहूल’ ही कथा वास या तरुणाचा मनोव्यापार अधोरेखित करते. थर ‘पाखरं’ लेखिकेची पाखरांबाबतची संवेद्यता मांडते. ‘मुंबई सेंट्रल’, ‘नवी सकाळ’, ‘द...द...दामन’, ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’ या कथा असचं नवल यांचं भावविश्वं उलगडतात. एकूण या कथा आणि अनुभव यातून मानवी मनाचे कंगोरे लेखिकेने टिपले आहेत. व्यक्तिचित्रांच्या कुशल रेखाटनातून जीवनाचं वास्तव दर्शन लेखिकेने घडवलं आहे. या कथा आणि अनुभव मुळातून वाचण्यासारखे आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
THE MAD TIBETAN #DEEPTI NAVAL THE PIANO TUNER# SISTERS# PREMONITION, BIRDS# BOMBAY CENTRAL# THE MORNING AFTER# THE MAD TIBETAN# D# THULLI# BALRAJ SAHANI# RUTH MAYBERRY SUNANDA AMRAPURKAR
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    कुंटणखाण्यातील वेश्या, त्यांची दलाली करणारे भडवे, त्यांच्यावर निगराणी ठेवणारी मालकीण, त्या वस्तीचा दादा आणि वासनेची आग विझवायला तिथे जाणारी सभ्य समाजातली गिर्‍हाईकं. सभ्यता व संस्कारांना नागडं करून त्यांचं प्रदर्शन मांडणारी ही दुनिया. त्या दुनियेचं बलणं, चालणं, वागणं सगळं कसं अंगावर येणारं. रेड लाईट एरियाला भेट द्यायची तर मनाची भक्कम तयारी हवी. मुंबईच्या फाॅकलंड परिसरातली वेश्यावस्ती. चार जणांना घेऊन एक अँबेसिडर त्या भागात पाच चकरा मारते व शेवटी एका ठिकाणी थांबते. तोकडे कपडे, भडक मेकअप, तोंडात अर्वाच्य शिव्या असलेली एक उत्तान पोरगी गिऱ्हाईकांना पागल करणारे हावभाव करत कडेला उभी असते. अ‍ॅम्बेसिडरचा ड्रायव्हर तिच्याकडे पाहतोय हे लक्षात येताच एक दलाल गाडीजवळ येऊन काच खाली करायला सांगतो. ‘क्या मंगता है साऽब? बोलो ना! एकदम झकास माल देगा! तुम लोग के स्टँडर्ड का, साब!’ दलालाने प्रस्ताव दिला पण त्याच्या बोलण्यावर गाडीतल्या लोकांना काय बोलावं ते सुचलं नाही. ‘क्या बोलते साब? तीनों को ले लेगी! मंगता क्या?’ त्या वेश्येकडे बघत दलालाने या तिघांना डोळा मारला आणि गाडीतले तिन्ही पुरूष तोंड लपवून खाली बघू लागले. गाडीतल्या पुरुषांपैकी एक चित्रपट दिग्दर्शक तर दुसरे दोन अभिनेते होते. दलालाच्या बोलण्याने ते शरमिंदा झालेले. त्या वस्तीत ते `तसल्या` कामासाठी आले नव्हते. तेवढ्यात दलालाचं लक्ष गाडीत बसलेल्या, तोंडाला स्कार्फ गुंडाळलेल्या स्त्रीकडे गेलं. ‘बाजू में एक धरेली है, फिर भी इधरीच घूम रहेले साले!’ दलालाची शिवी त्या स्त्रीच्या जिव्हारी लागली. आणि ती स्त्री होती अभिनेत्री दीप्ती नवल. तिच्या बरोबर गाडीत बसलेल्या पुरुषांमध्ये एक होता तिच्या `चिरूथा` नावाच्या चित्रपटाचा दिग्दर्शक तन्वीर तर दुसरे पुरूष त्याच चित्रपटातील तिचे सहअभिनेते होते. विकृत शेवट असलेल्या एका घटनेविषयी दीप्तीने वर्तमानपत्रात वाचलेलं. एका वेश्येच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटनेचा विषय अतिशय संवेदनशील व अस्वस्थ करणारा होता. त्या घटनेचं कात्रण दीप्तीने तन्वीरला दाखवलं आणि त्यांनी त्या विषयावर चित्रपट बनवायचं ठरवलं. पण वेश्येची भूमिका करण्याअगोदर आपण स्वतः वेश्यावस्तीत जाऊन, एखाद्या वेश्येला भेटून, तिच्याशी चर्चा करून ती भूमिका साकारावी असं दीप्तीला वाटलं. त्यासाठीच ते चौघे पावसाच्या रात्री त्या वेश्यावस्तीत आलेले. प्रसिध्द अभिनेत्री असल्याने तसंच तिथले लोक ओळखत असल्याने दीप्तीला एका वेश्येच्या खोलीत प्रवेश मिळाला. तिचं नाव थुल्ली. अंधारी, अतिशय छोटी खोली. उजेड नावालाच. हवा येण्या-जाण्यासाठी एकही खिडकी नाही. अस्वच्छ, घाणेरडी जागा. दीप्ती खोलीत आली त्यावेळी रात्रीचे तीन वाजलेले. थुल्ली, खोलीची मालकीण, खिडकीत बसलेली तर तिच्या देखरेखीखाली शरीरविक्रय करणाऱ्या नऊ वेश्या भुईवर आडव्या तिडव्या झोपलेल्या. त्या वेश्यांत दहा-बारा वर्षांच्या मुलीही होत्या. खोलीत दोन छोट्या खाटा मांडलेल्या. जागा इतकी अपुरी की नऊ पोरी एकमेकींत हात पाय अडकवून झोपल्यावर तिथे फुटभरही जागा शिल्लक नव्हती. थुल्ली व दीप्तीमध्ये गप्पा सुरू झाल्या. `आणि... ते पुरुष आल्यावर कुठे झोपतात?` दीप्तीने बिचकत विचारलं. `इथेच! एका वेळी दोन बेडवर दोन!` थुल्ली सहज बोलली. `एखाद्या कष्टमरला घाई असली की माझी पोरगी त्याला जिन्यातच घेते.` `हे सगळं चालतं त्यावेळी तुम्ही कुठे जाता?` मती गुंग झालेल्या दीप्तीने पुढचा प्रश्न विचारला. `कुठं जाणार? इथंच असतो! एखादी बाई खाटेवर गिऱ्हाईक घेत असली की त्याच खाटेखाली दुसरी पोरगी खेळत असते...` `काय?` थुल्लीला मध्येच थांबवत दिप्तीने विचारलं. `तुम्हाला `ते` आवाज येत नाहीत का?` `सगळे आवाज येतात! त्यांचं आरडणं, ओरडणं, चित्कार, घाण बोलणं... आम्हाला त्याची सवय झालेय.` कान बंद करावेत, डोळे झाकावेत आणि असंच इथून पळून जावं असं दीप्तीला वाटलं. वेश्येच्या जीवनाचा अभ्यास करावा म्हणून तिथे आलेली दीप्ती प्रचंड अस्वस्थ झाली. अभिनेत्री होण्यासाठी दीप्ती अमेरिका सोडून मुंबईला आलेली तसंच थुल्लीलाही `तू सुंदर आहेस. पिच्चरमध्ये छोटी-मोठी काम देतो` म्हणून कुणीतरी मुंबईत आणलेलं. दोघीही कामासाठी मुंबईत आलेल्या स्त्रिया. पण त्यांचं जग किती भिन्न होतं. एक स्त्री म्हणून दीप्तीला थुल्लीची कहाणी ऐकवेना पण त्याच वेळी तिच्यातील अभिनेत्रीचं थुल्लीच्या जगाविषयीचं कुतूहल वाढलं होतं. पहाटेचे चार वाजले आणि खाली गोंधळ सुरू झाला. कुंटणखाण्याचा दादा जिन्याने वर येत होता. `तिथे येणाऱ्या प्रत्येक नव्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा पहिला हक्क आपलाच` असं समजणारा दादा खोलीत आल्यावर काय होईल याची दीप्तीला कल्पना नव्हती. - विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे #दमॅडतिबेटियन #दीप्तीनवल #सुनंदाअमरापूरकर #मेहतापब्लिशिंगहाऊस #कथासंग्रह ...Read more

  • Rating StarChitra Rajendra Joshi

    फेसबुकच्या आठवणींतून वर आलेली ही चार वर्षांपूर्वीची पोस्ट. त्यावेळी हा ग्रुप नव्हता बहुधा, म्हणून इथे देत आहे. ------------------------ द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या! दीप्ती नवल - अनुवाद: सुनंदा अमरापूरकर - मेहता पब्लिशिं हाऊस - प्रथमावृत्ती: जानेवारी २०१७ - किंमत: रु.१५०/- पृष्ठे:१३० कोणताही कथासंग्रह वाचताना त्या कथा `कोणी` लिहिल्या आहेत याला कितीसं महत्त्व असावं-द्यावं? त्यातील कथाभाग काय आहे, त्या कशा मांडल्या-विस्तारल्या आहेत, त्यात ‘पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाटतेय, त्या गुंगवून ठेवताहेत की कंटाळवाण्या वाटताहेत, त्यातील मतितार्थ काय आहे ... कथांमधे निसर्ग आहे, शहरं आहेत, डोंगराळ भागातील गावं आहेत, वेगवेगळ्या वयाची-वातावरणातील माणसं आहेत. थोडक्या आणि प्रभावी शब्दांतील अनुभव वाचून आपल्याला आनंद मिळाला, आपल्या परिघात नसलेल्या पण आपल्याला नवीन वाटणार्‍या दुनियेचं दर्शन घडलं. हे पुरेसं न ठरता त्या `कोणी` लिहिल्या आहेत याचं इतकं महत्त्व का वाटतं? लेखिका जर झगमगत्या चित्रपट दुनियेतील सुप्रसिध्द अभिनेत्री शिवाय आवडतीही असेल तर कुतूहल जरा जास्तच जागं होतं. अभिनेत्री, चित्रकार, फोटोग्राफर, कवयित्री आणि कथालेखिका दीप्ती नवल. ती अभिनय-दिग्दर्शन करते, पेंटिंग करते, फोटोग्राफी करते, तिला कविता होतात आणि ती कथा लिहिते. मनातली अभिव्यक्तीसाठी निरनिराळ्या माध्यमांवर तिचं प्रभुत्व आहे. ‘लम्हा लम्हा’ हा आसावरी काकडे यांनी मराठीत अनुवादित केलेला कवितासंग्रह आणि नुकताच वाचलेला, सुनंदा अमरापूरकरांनी मराठीत अनुवाद केलेला कथासंग्रह - द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या! हे दोन्ही वाचल्यानंतर प्रश्न पडला - ह्यातील कोणती दीप्ती नवल जास्त आवडते? दृश्य माध्यमातून निरनिराळ्या भूमिका साकारणारी की थोडक्या शब्दांतील कवितांतून स्वत:च्या भावनांना मोकळं करणारी की कथांतून ‘तेव्हाच्या आणि आत्ताच्या’ गोष्टी सांगणारी? ह्याचं साधं सोपं उत्तर इतकंच आहे की प्रत्येक माध्यमातून अस्सलपणे व्यक्त होणारी दीप्ती नवल आवडली/ आवडते. तिची एक कविता आहे, ‘आठवणी’. त्या ‘आठवणीं’ना काळाचं बंधन नाही, त्यांत इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी असणार्‍या सुंदर गाठीभेटी आहेत, हरवलेली स्मितं-विखुरलेल्या प्रतिमा आहेत. हिरवेगार डोंगरघाट अन त्यात थांबून थांबून पडणारा पाऊस आहे. आणि ह्याच आठवणींचा विस्तार म्हणजे ‘द मॅड तिबेटियन.. गोष्टी तेव्हाच्या आणि आत्ताच्या!’ आहेत. एकूण अकरा कथांचा हा संग्रह! लेखिकेच्या नजरेने टिपलेलं आणि नेटकेपणे साकारलेलं मुंबई, लडाख, दिल्ली, उ. हिंदुस्थान अशा अनेक ठिकाणी वास्तव्य करणार्‍या माणसांचं जगणं जसं ह्यात आहे तद्वतच आत्मकथनाप्रमाणे वाटणारे खास अनुभवही कथा-रूपाने व्यक्त झाले आहेत. देहबोली अथवा शब्दबोलीतून भूमिका साकारणे हे ह्या कलावतीत मुरलेलं आहे. चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्या भूमिका साकारताना त्यांच्यात देहप्रवेश करणे असो वा कथेनुसार त्या-त्या व्यक्तिरेखांचा विस्तार करण्यासाठी शब्दांच्या माध्यमातून त्यांच्यात शिरणे असो. ‘सहजता’ हा उपजत स्वभाव तिच्या प्रत्येक आविष्कारात आहेच आहे. कामाठीपुर्‍यातील दोन खोल्या-चार खाटा यावर कुंटणखाना चालवणारी मूळ नेपाळची असणारी ‘थुल्ली’. ती निव्वळ एक वेश्या नव्हे तर एक स्त्री म्हणून असणारी तिची अगतिकता ह्या कथेत सार्थ व्यक्त झाली आहे. एका सिनेमात वेश्येच्या भूमिकेचा पूर्वाभ्यास करण्यासाठी लेखिका तिला थेट तिकडेच जाऊन भेटते. अंदाधुंदपणे कोसळणार्‍या मुसळधार पावसातून आपल्या तीन पुरूष सहकार्‍यांसह उपनगरातून ती निघते. कामाठीपुर्‍यात वाटा चुकत, रस्ता शोधत, रात्री अपरात्री थुल्लीच्या खोल्यांवर पोचते. लेखिका एकटीच आत जाऊन थुल्लीशी गप्पा मारते, तिच्या व्यवसायाची(!) माहिती घेत रहाते. तिथून निघेपर्यंत उशीर होत रहातो, जवळ-जवळ पहाट होते. त्याच वेळी कुंटणखान्याचा तथाकथित मालक असलेला दादा दारू पिरून झिंगलेल्या अवस्थेत पोचतो. कुणी नवीन पाखरू इथे आलाय अशी त्याला कुणकुण लागलेली असते. त्याच्यापासून वाचण्यासाठी लेखिकेला अक्षरश: तिथून पळ काढावा लागतो. तिला तिथून निसटता यावं यासाठी थुल्ली जे काही करते ते वाचताना आपलाही जीव थुल्लीसाठी व्याकुळतो. दिल्लीत अत्यंत घाई-गडबडीत असताना शाळेतील एक जुनी मैत्रीण भेटते. लेखिका तिला ओळखते. तिच्याशी बोलताना एकीकडे तिचं नाव खूप प्रयत्न करूनही लेखिकेला आठवत नाही. ‘ही आता मोठी अभिनेत्री झालीये तरीही आपली ओळख ठेवतेय. परंतु हिला आपलं नावही आठवत नाही म्हणजे ही आपल्याला विसरली आणि तोंडदेखलेपणाने ती आपल्याशी बोलतेय’ असं समजून ती मैत्रीण नाराज होत ‘सॉरी, तुमचा वेळ घेतला’ असं म्हणून निघून गेल्यानंतर लेखिकेला काही क्षणांतच तिचं नाव आठवतं आणि ती हाका मारते तोवर मैत्रीण निघून गेलेली असते. ओशाळून गेलेली लेखिका आपल्या मनाशी विचार करत रहाते की मी खोटी ओळख दिली का? माणसांच्या अति वावरापासून अजूनही बर्‍यापैकी दूर असलेला लेह-लडाखचा पहाडी-बर्फाळ-रंगीबेरंगी निसर्ग आणि तिथल्या एकांतवासात अवचितपणे भेटलेला द मॅड तिबेटियन.. न्योनबा! ह्या कथेतील गूढता शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. ३ नोव्हेंबर १९६३. दीप्ती नवल नऊ वर्षांची होती. तिच्या गावात, अमृतसर, बलराज साहनींना नाटकात बघण्याची, त्यांची सही घेण्याची संधी तिला मिळाली आणि त्याचवेळी तिचा निश्चय झाला की - ‘मी बलराज साहनीसारखी रुबाबदार होणार.. त्याच्यासारखीच तरल.. कुठलीही भूमिका केली किंवा आयुष्यात काहीही केलं, तरी ते अस्सल असेल. मी अभिनेत्री झाले तर बलराज साहनीसारखी होणार, अस्सल!’ तिने अंमलात आणलेला हा निश्चय, तिचं ‘अस्सलपण’ जसं आपण तिच्या सगळयाच चित्रपटांमधून अनुभवलेलं आहे तेच तिच्या कविता-कथांमधून झिरपलेलं आहे. चित्रा राजेन्द्र जोशी.... 9.5.2017 ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार दीप्ती नवल यांचा हा कथासंग्रह .यातील कथा छोट्या आहेत .पण त्या वाचताना आपण त्यात गुंतून जातो .जणूकाही आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या या गोष्टी आहेत.त्यांच्या पियानो ट्युनर मधील हताश म्हातारा .तर डोके भादरले म्हणून सैरभैर ालेल्या दोन छोट्या बहिणी .अपघाताची जाणीव झालेला आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करणारा तरुण.या कथा वाचून मन हेलावून जाते . ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 12-08-2017

    ठसा उमटवणाऱ्या कथा... दीप्ती नवल एक संवेदनशील अभिनेत्री, चित्रकार, कवयित्री आणि लेखिका. १९८०च्या सुमारास आलेल्या ‘चष्मेबद्दूर’ सिनेमातील तीच ती मिस चमको... हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक भूमिकेवर एक उत्कट ठसा उमटवणारी अभिने्री. अमेरिकेत राहून फाइनआर्टचे शिक्षण घेतलेली. तरुणपणीच ‘लम्हा लम्हा’ सारख्या रोमन्टिक मूड टिपणाऱ्या कविता लिहिणारी आणि आता आपली चित्रकाराची आणि फोटोग्राफीची नजर घेऊन, आयुष्याची गुंतागुंत जाणत शब्दातून कथा उभी करणारी दीप्ती नवल ‘द मॅड तिबेटियन’ या कथासंग्रहात भेटते आहे. तिच्या शैलीचा उत्कट स्वर सुनंदा अमरापूरकर यांनी मराठी अनुवादात उत्तम उमटवला आहे. खूप वेळा सेलिब्रेटीजनी लिहिलेल्या लेखनाचे स्वरूप त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाने वाचावे इतपतच असते किंवा त्यांच्या स्वत:च्या प्रमोशनचा भाग असते. साहित्य म्हणून त्याचा विचार करण्याइतके त्याचे आयुष्य नसते. पण दीप्ती नवल यांच्या लेखनाचे छोटेखानी अवकाशाची ताकद ओळखून त्यांचे शब्द कधी एखाद्या व्यक्तीच्या भावना, मनातील स्पंदनं, आशा, प्रेम, आनंद, एकाकीपणा, जगण्याचा परीघ दाखवत जातात. वृत्तीची काव्यात्मता, प्रवासीपण, सिनेमा तंत्राचा प्रभाव या गोटींनी त्यांची शैली घडवलेली आहे असे म्हणण्यापेक्षा ही शैली सहज घडली आहे असे म्हणणे योग्य ठरेल. एकेकाळच्या उत्तम पियानो वादक आणि आजचा ‘पियानोट्यूनर’, आयुष्याच्या एकटेपणाची चौकट बांधली गेल्यावरही आपल्यापुढे ठसा ठेवतो तो एका निर्धाराचा! ‘अघटिताची चाहूल’ लागलेला तरुण प्रवासी अघटित घडून गेल्यावर ‘ती’ वाचत असलेले पुस्तक दडपण्यासाठी धडपडतो. ‘ती’ तर गेली, तिचं नावही कळणार नाही आता, पण तिचे पुस्तक सुरक्षित होतं, तो पान उघडून पाहतो तर त्या यु. आर. अनंतमूर्तींच्या कथा असतात. ‘दोघी बहिणी’च्या मनातली आई परत येईल ही आशा स्वातंत्र्यापेक्षा मोठी ठरते. ‘मुंबई सेंट्रल’ कथेतील सोळा वर्षाच्या मुलाला अचानक मोठा करून गेलेला अनुभव. एका रात्रीत लीलीच्या आयुष्यात सुरू झालेली नवी सकाळ आणि नवा दिवस. खूप घाई-गर्दीच्या दिवसात केवळ वेळेवर नाव न आठवल्याने दुखावून दूर गेलेली ‘द... द... दामन’ या कथा एका ओघात वाचकांना बरोबर नेतात. ‘द मॅड तिबेटियन’, ‘थुल्ली’, ‘बलराज साहनी’, ‘रुथ मेबेरी’ या कथा खास दीप्ती नवलचा स्पेशल टच ठळक करतात. लडाखच्या दऱ्या-खोऱ्यात फोटोग्राफीसाठी भटकंती करताना भेटलेला ‘द मॅड तिबेटियन’ त्याला भेटण्याचा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणं म्हणजे अन्याय केल्यासारखेच. त्याच्या या मॅडपणातली स्वभावाची आनंदी फकिरी छटा कॅमेऱ्यात कशी पकडता येणार म्हणून शब्दबद्ध झालेली. तर भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या कामाठीपुऱ्यात गेल्यावर भेटलेली ‘थुल्ली’ एक स्त्री म्हणून नातं जोडताना मानवी संबंधाचे विस्कटलेले समीकरणच समोर ठेवून थक्क करते. ‘रुथ मेबेरी’ ही एका पटकथा लेखिकेची अशीच सुन्न करणारी कहाणी. सतरा वर्षे एका पटकथेचं लेखन करणारी रुथ, तिची लेखननिष्ठा (जीवननिष्ठा?), तिचे उतारवयाने येत चाललेले एकाकीपण, काहीसे विक्षिप्तपण, तिला एक्झिट घेण्याची वेळ आल्याची झालेली जाणीव आणि सर्व डिलीट करून टाकण्याचा निर्णय, त्याचा भोवतालच्या जगावर एखादा तरंगही न उठणं जगाच्या संवेदनशीलतेलाच प्रश्न करते. उत्कट जाणिवेच्या प्रवासाला नेणाऱ्या कथांचा वाचनीय असा कथासंग्रह. -आशा साठे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more