* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PAVSA AADHICHA PAUS
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617050
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 1985
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANTABAI HAS A QUALITY OF GAUGING THE DEPTHS OF MINDS. SHE DOES IT VERY CASUALLY. `NISARGAKADE PARAT` SHOWS US A DIFFERENT ASPECT TO LOOK AT OUR LIFE. `BHULBHULAYYA` MAKES US REALISE THAT SOMETIMES IT IS VERY DIFFICULT TO UNDERSTAND THE BEHAVIOUR, TO KNOW THE DIFFERENCE BETWEEN TRUTH AND ILLUSION. `GULAB, KATE, AANI KALYA` HELP US TO NOTICE THAT IN DAYTODAY LIFE, WE VERY EASILY AND CONVENIENTLY CHANGE OUR THORNY NATURE. `WARKOHOLIC` EXPLAINS THAT SOMETIMES WORKING CONTINUOUSLY AND DEDICATEDLY BECOMES A MAJOR PROBLEM. `MANATALA KILLA` REVEALS THE TRUTH THAT SOMETIMES FREEDOM IS UNWANTED. `OLAKH` TEACHES US TO FACE SMALL DEFEATS AND TRUTHS. `CHORBAJAR` IS BASED ON THE FACTS OF LIFE. THROUGH ALL THE STORIES, THE AUTHOR HAS SUCCEEDED IN SHOWING VARIOUS SURPRISING ASPECTS OF LIFE, EXPOSING US TO THE NAKED TRUTHS.
माणसाच्या मनात खोलवर पाहण्याचा सहजपणा शान्ताबाईंच्या लेखनात नेहमीच दिसून येतो. ‘निसर्गाकडे परत’ आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन दाखवतो. वागण्याबोलण्यात नक्की खरंखोटं काय हे कधी कधी समजणं कठीण असतं, असं ‘भूलभुलय्या’ सांगून जातो. समाजात वावरताना आपल्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे काटे आपण किती सहज खुडून टाकतो ते ‘गुलाब, काटे, कळ्या’ मधून जाणवत राहतं. अति काम करणं ही एक समस्या होते आहे ते ‘वर्कोहोलिक’ तीव्रतेनं दाखवून देतो. स्वातंत्र्यदेखील कधीतरी नकोसं वाटतं असं ‘मनातला किल्ला’ दाखवतो. छोट्याशा प्रसंगातून लहानपणीच अपयशांना, सत्याला कसं सामोरं जायचं याची ‘ओळख’ होते. मानवी स्वभावाचे असे विविध पैलू दाखवतानाच ‘चोरबाजार’मधून लेखिका आपल्याला वास्तवाकडे नेते. सामान्य माणसाची नस न् नस पकडत हा ‘पावसाआधीचा पाऊस’ चिंब आनंदानुभव देतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    इतरांशी संवाद साधण्याची निकड हीच ललित लेखनाची प्रेरणा… पावसाआधीचा पाऊस हा ललितलेखांचा संग्रह. त्याच शीर्षकाचा लेखही संग्रहात आहे आणि त्यात पावसाची चाहूल लागल्यावर सर्वच निसर्गात जाणवणाऱ्या तरतरीप्रमाणेच मनालाही कशी तरतरी आली आहे ते शांताबार्इंनी खुलून सांगितले आहे. ‘‘झाडांच्या फांद्या खालीवर डोलत होत्या, पाने सळसळत होती, गच्च डवरलेल्या पिवळ्याजर्द फुलांच्या झाडांवरून भरभर पाकळ्या सुटत होत्या. खालच्या जमिनीवर त्यांचे पिवळे गालिचे पसरले होते. हवा ढगाळ होती. आभाळ गडद काळसर झाल होते. पण त्या ढगाळ हवेत एक उत्सुक भाव होता. आभाळाचा काळसर रंग लाघवी वाटत होता. साऱ्या वातावरणातच एक सावळे लाडकेपण लाडिवाळपण काठोकाठ दाटून आले होते...’’ असे काव्यमय वर्णन करताकरताच आपल्या शाळेचे दिवस, आपल्या कॉलेजचे दिवस त्यांच्यापुढे उभे राहतात. जूनमध्ये पावसाळा सुरू होता होता नव्या पुस्तकांबरोबर नवी बॅग, नवे कपडे, नवी छत्री या साऱ्या साजशृंगारासकट पहिल्या पावसाने भिजलेल्या वाटेवरून चालत जाणे आनंददायक असे. कॉलेजच्या दिवसात प्रत्यक्ष पावसापेक्षा कवितेतून भेटणारा पाऊस अधिक भारावून टाकणारा होता. रविकिरण मंडळाच्या कवींनी पावसाचे, पावसाळ्याचे एक वेगळे आकर्षण मनात रुजवले. त्यातील वर्षाऋतूची धुंद उन्मादक शब्दचित्रे, कालिदासाच्या मेघदूतातील वर्णने व प्रेमसंदेश हे सारे पुढेही मनात हिरवेगार, अम्लान, टवटवीत राहिले आहे. व्यवहारी प्रापंचिक प्रौढ वयात मात्र प्रत्यक्ष पावसातला सारा धुंद उन्माद, सारी काव्यात्मता हरवून जाते, परंतु खऱ्याखुऱ्या पावसापेक्षा पावसाआधीचा पाऊस हा अधिक आकर्षक वाटतो. प्रत्यक्षातल्या पावसाचा उपद्रवीपणा या पावसात नसतो; तो पाण्यावाचून भिजवतो; शरीरवृत्तींना चिंब करून टाकतो. माणसातल्या आदितत्त्वाला आवाहन करतो आणि निसर्गाशी देहापलीकडच्या मनावर, आत्म्यावर झेलता येतो आणि भाववृत्तींना तरतरी देत असतो. ‘आला पाऊस आला’ या लेखात माणसापेक्षा पशुपक्षी हे परस्परांशी अधिक सरळ, बिनगुंतागुंतीचे आणि निरोगी वर्तन ठेवतात हे सूत्र केंद्रस्थानी आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे वात्सल्य, त्यांचे शत्रुत्व हे सर्व प्राथमिक पातळीवर वावरत असते. पशुपक्ष्यांच्या या जगात एक प्रकारची निष्ठुरता असते. या निसर्गात दुबळेपणाला क्षमा नसते. जगण्याची ताकद असेल तोच जगतो. इतर मरुन जातात. पशुपक्ष्यांना आपले जीवन कधी संपवावे हे कळते. माणसाला ते कळत नाही. शब्दांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध घेण्याचा शांताबार्इंना लळा आहे. छंद आहे. अल्कोहोलिकच्या धर्तीवर बनवलेल्या वर्कोहोलिक या शब्दांची त्यांना गंमत वाटते. वर्कोहोलिक म्हणजे कामाच्या आहारी गेलेला माणूस असे सांगतानाच त्या सावधपणे पुस्ती जोडतात. ‘‘इथे काम शब्दाचा अर्थ नेहमी आपल्या मनात आधी येतो तो घ्यायचा नाही’’ अशी वर्कोहोलिक माणसे मग त्यांना आठवतात. सदैव घर आरशासारखे लख्ख ठेवणाऱ्या बाई शांताबार्इंचे कौतुकाचे शब्द ऐकूण घेतात आणि खुलासा करतात, ‘‘अग तूच पाहा. घरात पोर ना बाळ. मग पसारा कोण करणार ? केरकचरा कोण करणार ? मग आपलं आपणचं पुन:पुन्हा सारं जागेवरून काढायचं अनु पुन:पुन्हा नीटनेटकं लावायचं. वेळ बरा जातो. जिवाची तेवढीच करमणूक होते.’’ ‘शब्दांचे चेटूक’ या लेखात आपल्याला रंगगंध रूपांसह भेटलेल्या अनेक शब्दांच्या कहाण्या शांताबाई जाग्या करतात. लाललाल यासारखे रुमझुमणाऱ्या नादाचे शब्द, चट्टक, बरं का, टिंगुश, तोठरा, न्याहार, चुणचुणखडा, चिमखडी, धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती, स्फटिकघराचे दीप, चिमणचेटके चांदणे अशा अनेक शब्दांचे चेटूक त्या स्पष्ट करतात. ‘शब्द सोडलेले धडे’मध्ये कोऱ्या जागांतले गूढ प्रकट होते. ‘मला ओळखलंत का’ असा प्रश्न विचारून आपल्याला पेचात टाकणाऱ्या माणसाशी ‘आव्हान स्वीकारून’ पूर्वभेटीचे तपशील पुरवण्यातले थ्रिल ‘भेट’ मध्ये शांताबाई अनुभवतात तर आपल्यावर निर्हेतुकपणे स्तुतीचा व कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव करणारे ‘मिस्टर कॉम्प्लिमेंट’ भेटल्याने त्यांना आनंद होतो. अवतीभवतीच्या इतर अनेक अनाकलनीय, गूढ, विचित्र गोष्टींप्रमाणेच त्याचा स्वीकार करणे इष्ट असे आपले मत देतात. ‘‘हा लेख त्यांना वाचून दाखवला तर त्यात त्या मख्खी त्यांना कळली न कळली तरी ते म्हणणार वा ! काय छान लेख आहे ! एक्सलंट.’’ कॅलिडोस्कोपला झटका दिला की आतील आकृत्यांची रचना बदलते. पहिल्या आकृतीच्या पोटातच दुसरी आकृती दडलेली असते. त्याप्रमाणे एका माणसाच्या मनात आणि व्यक्तिमत्त्वातही अनेक माणसे दबा धरून बसलेली असतात आणि ती अनपेक्षितपणे बाहेर येऊन आपले वेगळे रूप प्रकट करतात. अँथनी क्विन या अभिनेत्याला एका मुलाखतकाराने विचारले, ‘‘तुम्हांला अनेक स्त्रियांचे प्रेम लाभते. स्त्रियांना वश करणारी कोणती जादू तुमच्यापाशी आहे ?’’ त्यावर त्याने उत्तर दिले, ‘‘वेश्येबरोबर वागावे तसा मी राणीशी रंगेलपणाने वागतो तर वेश्येला राणीसारखे सन्मानाने वागतो. कारण प्रत्येक राणीत एक वेश्या दडलेली असते आणि प्रत्येक वेश्येत एक राणी दडलेली असते हे मला माहीत आहे. माणसाच्या साध्या सोप्या रूपात अनेक रूपे दडलेली असतात हे लक्षात घेतले तर त्यांच्याशी आपले मैत्र अधिक बहरू शकेल. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वे एकाच वेळी विद्यमान असतात. त्यांना एकत्र नांदवणे कधीकधी अवघड होते. कधी माणसाचा हॅम्लेट होतो तर कधी अर्जुन. काही वेळा ही रूपे स्वत:लाच थक्क करतात, असा हा तिढा शांताबाई ‘कॅलिडोस्कोप’च्या प्रतिमेद्वारे आपल्यापुढे ठेवतात. माणूस हा गर्दीत असला की त्याचे वर्तन वेगळ्या प्रकारचे होते. पब्लिक सायकॉलॉजी, झुंडीचे मानसशास्त्र वेगळे असते. बस अचानक थांबल्यावर जमाव ड्रायव्हरवर उखडतो. समोरची गर्दी बघून प्रवासी घाबरतात. काय झालं? कुणी बसखाली आलं तर नाही ना ? म्हणून एकमेकांकडं भीतीच्या नजरेनं पाहतात... पण लोक हसत असतात, नाचत असतात, समोर चित्रपटाचं शूटिंग चालू असल्याने गर्दी झालेली असते, म्हणून बस थांबलीय हे कळल्यावर साऱ्यांना हुश्श वाटते. पण तेवढ्या वेळात झुंडीच्या पाशवी शक्तीचे जे भयानक दर्शन होते ते हादरवून सोडते. ‘बिनशिराचे कबंध’ मधील हा अनुभव आपल्या अंगावरही काटा आणणारा आहे. ‘खिडक्या झरोके’ या लेखात ‘एखाद्या खिडकीतून बाहेरचे दृश्य बघून, त्यावर कल्पनेचे रंग मनसोक्त चढवण्यातले कलाकाराचे कौशल्य अधोरेखित केले आहे. एका इंग्रज लेखकाने पोस्टकार्डवरील जपानी चित्राचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘‘या चित्राच्या खिडकीतून मी जो जपान बघतो तो आता खास माझा जपान झाला आहे. हा जपान माझ्या एकट्याच्या मालकीचा आहे. तुम्ही कदाचित जपानला भेट देऊन जपान प्रत्यक्ष बघाल. पण माझ्या रंगीत चित्रातून मला दिसणारा जपान फक्त माझ्याच डोळ्यांना दिसणारा आहे, तुम्हाला तो कधीच दिसणार नाही.’’ प्रतिभावंत जेव्हा आपल्या अनुभवाच्या खिडकीतून जन्म, मृत्यू, प्रेम, वात्सल्य, विरक्ती वगैरे सनातन भावनांचे चित्रण करतात तेव्हा त्यांना त्यातून पलीकडचे एक जग दिसत असते. हे जग खास त्यांचे असते. कलावंत प्रतिसृष्टी निर्माण करतो याचा अर्थ त्याने हे स्वत:चे जग आपल्या कलेतून दाखवलेले असते असा असतो. अशा प्रकारचे स्पष्टीकरण शांताबाई देतात आणि कलावंताला होणाNया जीवनदर्शनाच्या वेगळेपणाचे रहस्य प्रकट करतात. मुंबईच्या विश्वविख्यात चोरबाजारात जाऊन खरेदी करण्याचा अनुभवही असाच उद्बोधक आहे. ‘‘चोरबाजार आहे हा ! इथं कुठलीही चीज केवढ्याही कमी किंमतीत मागता येते’’ असे बरोबर असणाऱ्या सतीशने सांगूनही पंचाहत्तर रुपयांचा चिनी दगडाच्या गणपतीच्या मूर्तीचा भाव पंचवीसतीसपर्यंत खाली आणण्याची घासाघीस करायचा धीर होत नाही. त्या बाजारातील वेगवेगळ्या वस्तू बघताना अनेक शंकाकुशंकांचे वादळ त्यांच्या मनात घोंगावते. मुंबईत आहोत की दुसऱ्याच अपरिचित दुनियेत अशा प्रश्न त्यांना पडतो. लांब देठ ठेवून खुडलेले आठदहा गुलाब एक मैत्रीण शांताबार्इंना देते. त्या देठांचे काटे काढलेले असतात, त्यामुळे शांताबार्इंना त्या खुडून टाकलेल्या काट्यांची कीव वाटते. बिनकाट्याचे गुलाब भुंडे वाटतात. मैत्रिणीला त्याबद्दल विचारल्यावर ती सांगते. ‘‘खरं सांगायचं तर या अगदी साध्या व्यावहारिक सोयीच्या गोष्टी आहेत. त्यात खंत करण्याजोगे, व्याकुळ होण्याजोगे काहीसुद्धा नाही. तुझ्या हळहळण्यात एक छुपा अहंकार आहे. या दुष्ट, निर्दय, संवेदनाशून्य माणसांच्या जगात आपण मात्र वेगळ्या, हळव्या, संवेदनाक्षम आहोत हा तुझा अविर्भाव होता. आपलं तथाकथित दु:ख तू एन्जॉय करीत होतीस. मी ढोंगीपणा म्हणते तोच हाच ! गुलाबाचे काटे सोयीनुसार खुडले तर त्यात काय मोठंसं बिघडलं ?’’ शाळेतला भज्या हा शाळासोबती. व्हिलनसारखा वागणारा. लहान मुलांना दमदाटी करणारा. पाट्या फोडणारा. त्रास देणारा. या भज्यासारखी माणसं आयुष्यात सतत भेटत राहतात आणि आपण करीत असलेल्या कामाची वासलात लावत असतात. त्यात दोष काढत असतात. दुसऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडायचे, त्याची पाटी फोडायची, त्याला फटाफट शाब्दिक कानफटात मारण्याची अशी कामे ही माणसे करीत असतात. ‘ए कंट्री डायरी ऑफ एडर्विडयन लेडी’ या दैनंदिनीद्वारे एडिथ होल्डन या संशोधक महिलेने वर्षभरातील आपल्या निसर्गविषयक निरीक्षणांची नोंद केली. निसर्गातील पशू, पक्षी, कीटक, ढग यावर लिहिताना वाचलेल्या साहित्यातील व काळातील नेमके संवादी उतारेही जोडलेले आहेत. इंग्रजी कवितांमधील निसर्गविषयक उतारे हे या दैनंदिनीला काव्यात्मकता प्रदान करतात, तसेच तिने स्वत: रेखाटलेली जलरंगातील सुंदर चित्रे या दैनंदिनीच्या देखणेपणात भर घालतात. ‘‘सुंदर चित्रांची नाजुक हलक्या तरल कोवळ्या रंगांची नेत्रसुखद उधळण’’ त्यामुळे होत राहते. १९०६ साली लिहिलेली ही दैनंदिनी तिच्या मृत्यूनंतर ५७ वर्षांनी, १९७६ साली प्रथम प्रसिद्ध झाली. एडिथचे मूळ हस्तलिखितच आपण पाहत आहोत असे वाटावे अशा प्रकारे याचे यथामूल मुद्रण केलेले आहे. १०११ साली एडिथचे लग्न झाले. १५ मार्च १९२० साली लंडनच्या क्यू गार्डनमध्ये अक्रोडाच्या कळ्या गोळा करताना ती पुलावरून नदीत पडली आणि पाण्यात बुडून मरण पावली. इनग्रिड बर्गमनचा ‘इन ऑफ दि सिक्स्थ हॅपीनेस’ हा चित्रपट शांताबार्इंचा अत्यंत आवडता. या सहाव्या सुखाच्या सराईची नायिका इनग्रिड ही अमेरिकन नर्सच्या रुपात दिसते. सैन्याच्या सुरक्षापथकातला एक डॉक्टर तिच्या प्रेमात पडतो. युद्धाच्या धुमाळीत त्याच्या त्या प्रेमाच्या उच्चाराने इनग्रिड चकित होते, हर्षभरित होते आणि एक प्रकारच्या कृतार्थतेच्या भावनेने चिंब भिजून निघते. चिनी कल्पनेप्रमाणे सहा सुखे माणसाला हवी असतात. आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगली पत्नी, चांगली मुलं ही पाच सुखं. सहावं सुख हे ज्यांच त्यालाच हवंहवंस वाटणारं. प्रत्येकाच्या कल्पनेतलं श्रेय. या सहाव्या सुखाचा शोध आपोआप लागतो. तसा तो लागण्यातच खरी गंमत. शांताबाई आपल्या प्रास्ताविकात आपल्या ललितलेखनाच्या प्रेरणांबद्दल काही महत्त्वाची गुपिते सांगतात. ‘‘विषय कसे सुचतात ?’’ याचे उत्तर त्या देतात, ‘‘डोळे उघडे ठेवून वावरणाऱ्याला विषयाचा तुटवडा पडू नये. आपल्या भोवती इतके घडत असते, दिसत असते, हवेतून आपल्या संज्ञेवर आघात करीत असते की त्यातूनच लिहिण्यासाठी अनेक विषय मिळतात. माणसामाणसांतले गुंतागुंतीचे नातेसंबंध, त्यांच्या वर्तनातील सुसंगती-विसंगती, माणसांचे अपार एकाकीपण, नियतीच्या संदर्भातील त्याची संपूर्ण अगतिकता हे सारे मला फार कुतूहलजनक वाटते, करूण वाटते. त्यातूनही ललितलेखांचे विषय सुचतात. माणसाखालोखाल मला निसर्ग प्रिय आहे. तशाच माझ्या बाळपणच्या आठवणी. माझी वाचनाची आवड. लहानमोठे, बरेवाईट, भव्यक्षुद्र सारे मला वाचायला आवडते. माझ्या आवडत्या मांजरांनीही मला अनेकदा विषय दिले आहेत.’’ सदर लेखनाबद्दल त्या म्हणतात, ‘‘हे लेखन शाश्वत नसते, त्यात फक्त तात्कालिक घटनाप्रसंगांवरच लिहिले जाते, त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो, आजचे वृत्तपत्र ही उद्याची रद्दी इ. अनेक आक्षेप वृत्तपत्रांतील सदरांवर घेतले जातात. त्यातल्या काहींमध्ये सत्याचा अंश असू शकेल. तरीही असे सदर चालवणे यात लेखकाला कमीपणा आणणारे काही आहे असे मला वाटत नाही. वाहत्या प्रवाहात अंग झोवूâन पाण्यावर तरंगताना पोहणाराला जो अनुभव मिळतो तोच आनंद असे मुक्त लेखन करताना मला लाभला आहे.’’ ललितलेख लिहिण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात ? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या सांगतात, ‘‘पूर्वग्रहरहितता, मनाचे डोळसपण, जीवनाबद्दलचे उदंड कुतूहल, चटकन प्रतिसाद देणारी संवेदनाक्षम वृत्ती, लिहिण्याची हौस आणि कष्टांची तयारी. निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराने लाभणारी तृप्ती, इतरांशी संवाद साधण्याची निकड हीच अशा लेखनाची खरी प्रेरणा. खरे पारितोषिक. कविता लिहिताना जे समाधान मळते तीच तृप्ती या ललितलेखनानेही मला अनेकदा दिली आहे.’’ म्हणूनच हे ललितलेख वाचणे म्हणजे शांताबार्इंच्या विदग्ध सहवासात चार घटका काव्यशास्त्र विनोद मैफिल रंगवणे होय. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more