* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A VERY IMPORTANT PERSON IN THE EPIC MAHABHARAT, IS BHEESHMA. PRINCE DEV-VRAT IS CALLED BHEESHMA, WHEN HE TAKES THE EXTREMELY HARSH VOW, THAT HE WILL NEVER MARRY AND WILL NEVER ASCEND THE HASTINAPUR THRONE. BADLY WOUNDED IN THE WAR, HE PREFERS TO LY ON THE BED OF ARROWS, WAITING FOR THE SUN TO CROSS OVER TO THE NORTHERN HEMISPHERE TO ACCEPT DEATH. KRISHNA TELLS HIM ONE NIGHT TO REMEMBER ALL THE WOMEN TO WHOM HE DID GREAT INJUSTICE. INSPITE OF REFUSING TO DO SO, HE STARTS THINKING, AND REALIZES THAT STARTING WITH HIS MOTHER THE GANGA RIVER, HE HAS BEEN UNJUST TO SATYAVATI, AMBA, AMBALIKA, AMBIKA, GANDHARI, AND DRAUPADI THIS FASCINATING NOVEL IS THE STORY OF ALL THESE LADIES AND HOW HIS STICKING TO HIS ROW AND REMAINING LOYAL TO THE THRONE OF HASTINAPUR HAS OFTEN BEEN THEREASON FOR MANY PROBLEMS AND THAT IS WHAT, ON KRISHNAS INSISTENCE OF REMEMBERING THE PAST HE REALIZES IN THE END!
शरपंजरी पडलेले भीष्म आपला जीवनपट पाहत आहेत. कुरुकुलासमोर आता राजगादीला वारस कोण, असा प्रश्न उभा राहिला त्या वेळी त्यांनी प्रतिज्ञा मोडण्यास दिलेला नकार... द्रौपदीला राज्यसभेत फरपटत आणलं तो प्रसंग... कौरव-पांडव युद्ध इ. प्रसंगांना त्यांची प्रतिज्ञाबद्धता कारणीभूत होती, असा आरोप त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून त्यांच्यावर केला गेला...हे सगळं त्यांना आठवतंय... भीष्मांवरच्या या आरोपाची आणि शरशय्येवर त्यांनी केलेल्या आत्मचिंतनाची नाट्यमय गाथा आहे ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#प्रतिश्रुतीस्मरणयात्राभीष्मांची #ध्रुवभट्ट #अंजनीनरवणे #अतरापी #तिमिरपंथी #तत्तवमसी #अकुपार #सागरतीरी #कथागुर्जरी #टर्निंगपॉइंट्स#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#PRATISHRUTISMARANYATRABHISHMANCHI #DHRUVABHATT #ANJANINARWANE #ATRAPI #TIMIRPANTHI #TATVAMASI#AKUPAR#SAGARTIRI#KATHAGURJARI#TURNINGPOINTS#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    बाणांच्या शय्येवर झोपलेले पितामह भीष्म उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहतायत. उत्तरायण सुरू झाले की त्यांना प्राण त्यागायचे आहेत. मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा जीवनपट तरळतो आहे आणि त्यांचे आत्मपरीक्षण ही चालू आहे. भीष्माच्या प्रतिज्ञमुळे अनेकांना त्रास झाला आहे तर काहीजण दुखावले गेले आहेत . इच्छामृत्यूचे वरदान मिळाल्यामुळे आज त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे .प्रतिज्ञाबद्धते विषयी स्वतः भीष्माना काय वाटते.. त्यांची बाजूही ऐकून घेऊ ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 22-12-2019

    भीष्म पितामहांची स्मरणगाथा... ‘महाभारता’ची गौरवगाथा अनादिकालापासून सर्वांच्या मनात घर करून आहे. त्यातील अनेक पात्रांचे गारूड आजही मानवी मनावर कायम आहे. त्याच्या पाठीमागे या पात्रांवर किंवा एकूण महाभारतावर जन्माला आलेले अजरामर साहित्य होय. महाभारतातल बहुचर्चित व तितकेच आकर्षणीय केंद्रबिंदू असलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भीष्म पितामह. भीष्म म्हणजे साक्षात ज्यांना स्वत:च्या मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याची संधी मिळालेले व्यक्तिमत्त्व. कौरव व पांडव या दोन्ही पक्षांमध्ये विश्वसनीय व मान्यताप्राप्त हे नाव. अशा अतुलनीय भीष्म पितामहांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा थरारक प्रवास लेखकाने नवीन केंद्रबिंदू घेत या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या भीष्म पितामहांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाचा नाश तसेच वेदनेचे कारण ठरले. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT, AKSHARYARTA, 8 DEC 2019

    भीष्मांच्या जीवनाचं चिंतनीय पुनरवलोकन ‘महाभारत’ या महाकाव्याने विविध भाषांतील साहित्यिकांना प्रभावित केलेलं दिसतं. मानवी मनाची, जीवनाची जी अभेद्य व्यूहरचना महाभारतात केली गेली आहे, ती या साहित्यिकांना साद घालते, विचारप्रवृत्त करते. गुजरातीमधील नामंत साहित्यिक ध्रुव भट्ट यांनाही महाभारताने, विशेषत: त्यातील भीष्मांच्या व्यक्तिरेखेने आकर्षून घेतलं आणि त्यातून निर्मिती झाली ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची’ या कादंबरीची. या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे अंजनी नरवणे यांनी. भीष्म ही महाभारतातील एक वंदनीय व्यक्तिरेखा. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या डोळ्यांसमोरून गतजीवनाचा पट सरकतो आहे आणि ते आत्मपरीक्षण करत आहेत, अशी या कादंबरीची कल्पना आहे. वर्तमानकाळ-भूतकाळ-वर्तमानकाळ अशा साखळीतून ही कथा पुढे सरकत राहते. भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी एक होते. गायीचे हरण केल्यामुळे या अष्टवसूंना एका ऋषींनी शाप दिला होता, की पृथ्वीवर मनुष्यजन्माला येऊन तुम्हाला मनुष्ययोनीतील भोग भोगावे लागतील. या शापामुळे घाबरलेले वसू गंगा नदीला शरण गेले. त्यांच्यासाठी गंगेने मनुष्यरूप धारण केलं आणि ती शंतनू राजाची राणी झाली. शंतनू आणि गंगेला सात पुत्र झाले. या सातही बालकांना जन्मानंतर लगेच गंगानदीने पाण्यात बुडवलं. शंतनू राजा वचनबद्ध असल्यामुळे सातही वेळेला तिच्या या कृतीमागचं कारण त्याने विचारलं नाही; पण आठव्या वेळेला मात्र त्याने गंगेला अडवलं; मात्र राजाने तिच्याकडे विचारणा केल्यामुळे ती गुप्त झाली. जन्माला आलेल्या पुत्राला ती बरोबर घेऊन गेली. त्याचं नाव देवव्रत. देवव्रताने परशुरामांकडून शस्त्रास्त्र विद्या संपादन केली. त्यानंतर शंतनूराजाशी त्याची भेट झाली. गंगेने शंतून त्याचा पिता असल्याचं सांगितलं. शंतनू देवव्रताला आपल्याबरोबर हस्तिनापूरला घेऊन गेला. त्यानंतरची कथा सर्वज्ञातच आहे. शंतनूचा सत्यवतीशी विवाह, सत्यवतीला होणारी मुलंच भविष्यात राजगादीवर बसतील, अशी सत्यवतीच्या वडिलांची अट असल्यामुळे देवव्रताने आजन्म अविवाहित राहण्याची आणि राज सिंहासनावर कधीही न बसण्याची घेतलेली प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेमुळेच देवव्रताचा ‘भीष्म’ झाला. त्यानंतर सत्यवतीची मुलं अल्पायुषी ठरल्याने हस्तिनापूरच्या गादीला वारस कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहिले. त्यामुळे सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून देण्याचा एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे सत्यवती-पराशरमुनी यांच्या संबंधांतून जन्मलेल्या व्यासांना पाचारण करणे. सत्यवतीच्या विनंतीनुसार व्यासांनी सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून दिली. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर या व्यासपुत्रांच्या जीवनातील घटना, कौरव-पांडव यांच्या जीवनातील घटना आणि कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडव युद्ध या सगळ्या घटनांमध्ये भीष्मांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळेच द्रौपदीला राजसभेत फरपटत आणण्याचा प्रसंग ते टाळू शकले असते; पण केवळ प्रतिज्ञाबद्धतेमुळे त्यांना तसं करता आलं नाही. पांडवांचा वनवास, अज्ञातवास यालाही ते प्रतिबंध करू शकले नाहीत, कौरव-पांडव युद्धही त्यांना थांबवता आलं नाही. कारण एकच होतं, त्यांची प्रतिज्ञाबद्धता. भीष्मांच्या या प्रतिज्ञा घेण्यामागचं आणि जीवनभर त्याचं दृढतेने पालन करण्याचं कारण काय होतं, तर भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी आठवे वसू होते. परत स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर त्यागमय जीवनच जगायला हवं, सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं, असं त्यांना वाटत होतं; मात्र त्यांच्या या प्रतिज्ञेच्या दृढ पालनामुळे बरेच अनर्थ ओढवले, असा आरोप गंगा, सत्यवती, द्रौपदी, अंबा यांनी भीष्मांवर केला. तेव्हा भीष्मांच्या प्रतिज्ञाबद्धतेभोवती फिरणारी ही कादंबरी एका वेगळ्या पद्धतीने महाभारतातील नाट्य अधोरेखित करते. शरपंजरी पडलेल्या भीष्मांना कृष्ण आत्मचिंतन करायला भाग पाडतो, या प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि महाभारतावरील एक कलात्मक साहित्यकृती वाचल्याचा आनंद देते. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, (LOKRANG) 03-NOV-2019

    भीष्म आजच्या संदर्भात... ‘भीष्म’ ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. महाभारत हीच एक अजरामर साहित्यकृती असल्याने, त्यातील विविध व्यक्तिरेखांवर भरपूर साहित्यनिर्मिती झालेली आहे. पौराणिक कथा-कादंबऱ्यांमध्ये अशा व्यक्तिरेखांचे विविध पैलू विविध अंगंनी उलगडून दाखवले आहेत. पुराणकालीन घटना, प्रसंगांचे नव्याने अन्वयन केलेले, या इतिहासाला आजच्या परिप्रेक्ष्यात पाहिल्याचे अनेक साहित्यकृतींमधून दिसते. ध्रुव भट्ट या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाची ‘प्रतिश्रुती’ ही कादंबरी अशाच प्रकारची एक वेगळी पौराणिक साहित्यकृती आहे. अंजनी नरवणे यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. भीष्मांच्या आयुष्यातील नाटय़मय प्रसंग व त्या प्रसंगांचा अन्वयार्थ सांगणारी ही कादंबरी असून, स्वत: भीष्मच वाचकांना आपली कथा सांगत आहेत, असे कादंबरीचे निवेदन आहे. पुराणातील एखादी व्यक्तिरेखा स्वत:च स्वत:ची कथा सांगते- ही निवेदनशैली वाचकाला मोहवणारी आहे. मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याचं वरदान भीष्मांना प्राप्त झालं आहे, त्यामुळे मृत्युशय्येवर उत्तरायणाची वाट पाहताना ते आत्मपरीक्षण करतात, तो नाटय़मय प्रसंग कादंबरीत परिणामकारकपणे रंगवला आहे. भीष्मांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाच्या नाशाला कारणीभूत ठरल्यामुळे ते शरशय्येवर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञाबद्धतेला दोष दिला जातो. याबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल भीष्म आत्मपरीक्षण करतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात. आपल्याच मनाशी चाललेल्या या संघर्षांचे, द्वंद्वाचे प्रभावी चित्रण या कादंबरीत केले आहे. जुनी मिथकं, धारणा, परंपरा यांचे आजच्या काळात नव्याने अर्थ लावून चिकित्सकपणे पौराणिक इतिहासाकडे पाहणाऱ्यांसाठी ही कादंबरी हा एक उत्तम साहित्यिक ऐवज आहे. ऐतिहासिक, पौराणिक घटनांना आपल्या नव्या साहित्यकृतीतून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न मोजक्याच साहित्यिकांनी केलेला आहे. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत भेटणारी पात्रं आपल्याला त्याच कथेवर गिरीश कार्नाडांसारख्या नाटककारानं लिहिलेल्या ‘ययाती’ नाटकामधून वेगळ्याच रुपात भेटतात. या दोन भिन्न साहित्यकृतींची कथा, आशय सारखेच आहेत, आशयाकडे समाजरचना, काळ, मूल्यं यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा दृष्टीकोन मात्र भिन्न आहे. खांडेकरांच्या ‘ययाती’तील व्यक्तिरेखांचे अनेक नवे पैलू कार्नाडांच्या ‘ययाती’ नाटकातून समोर येतात. दोन्हीचेही महत्त्व आहेच. त्यामुळेच पौराणिक घटनांचे समकालीन परिप्रेक्ष्यात अन्वयन वाचकांना नवी दृष्टी देते. ध्रुव भट्ट यांची ही कादंबरी अशी नवी दृष्टी देऊ पाहणारी आहे. पौराणिक व्यक्तिरेखांना समाजमान्य नैतिकतेच्या काचातून मोकळं करून, त्यांच्याकडे मानवी दृष्टीनं पाहायला लावणारी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more