* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: FOUR SEASONS
 • Availability : Available
 • ISBN : 9789353172008
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 352
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
Quantity
FOUR SEASONS STORY OPENS WITH THE NARRATIVE OF KAMAYANI , PROTAGONIST OF THE NOVEL. KAMAYANI’S FATHER HAS ALWAYS TRIED TO MAKE HER INDEPENDENT HUMAN BEING WHO WOULD HAVE FULL CONTROL OVER HER LIFE. BUT KAMAYANI HAS ALWAYS BEEN INFLUENCED BY THE MAN IN HER LIFE. HER LIFE HAS ALWAYS BEEN OVERSHADOWED BY HER MALE COMPANION. SO SHE HAVE HAD BUNCH OF SUFFERINGS BECAUSE OF HER FEMININE ROMANTICISM. BUT KAMAYANI’S LIFE TAKES TURN WHEN SHE VISITS GRASSLAND. FOUR SEASONS OF THE NATURE ENRICHES HER UNDERSTANDING TOWARDS THE LIFE. IN THIS NARRATIVE AUTHOR HAS USED THE SEASONS AS A DEVICE TO CONJURE MOOD, COLOUR A SETTING OR ILLUSTRATE FEELINGS. ETERNAL, CYCLICAL NATURE OF THE SEASONS PROVIDE A NATURAL METAPHOR FOR THE CYCLICAL NATURE OF LIFE, THE VARYING QUALITIES OF TRANQUILLITY, TEMPESTUOUSNESS WHICH EXIST WITHIN EACH SEASON PARALLEL THE EVERY CHANGING QUALITY OF HUMAN LIFE. THESE OBSERVATIONS OF THE SEASONS CHANGE THE PERSONA OF KAMAYANI & SHE STARTS THE NEW POSITIVE JOURNEY FROM THIS POINT OF THE LIFE…
कामायनी ही व्यक्तिरेखाच आपल्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडत आहे. निर्णय एकटीनं घेऊन तो परिणामांसकट जबाबदारीनं निभावण्याची हिंमत तिच्यात यावी ही तिच्या बाबाची अपेक्षा तिनं कधीच पूर्ण केली नाही. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या पुरुषांनी त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली तिचे निर्णय झाकोळून टाकले. आणि मग त्यांचे टेकू घेतले म्हणूनच तिचं आयुष्य आQस्थर राहिलं. आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या विचारांच्या पायावरच भक्कम आणि ठाम स्थिरावू शकतं, हे शिकायला तिला माळरानावरच्या या कणखर कातळावर यावं लागलं. इथल्या चार ऋतूंमध्ये ती जे शिकली ते आजवर मिळालेल्या धड्यांपेक्षा कितीतरी अधिक, जास्त सकारात्मक आहे. सगळं संपल्यानंतरही नव्याने जीवन सुरू करण्याची उमेद, जीवनचक्रातली लय, ठामपणा, चिवटपणा.. आयुष्याने जे दान दिलं ते स्वीकारून, अन्यायाने कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर, नवजीवन.. या कातळावर, इथल्या ओसाडीत तिच्यात बरंच काही नव्यानं रुजलं. निसर्गाचं- ऋतूंचं एक जीवनचक्र माळरानानं आश्वासकतेनं पूर्ण करून दिलं, अशीच भावना घेऊन ती या माळरानावरून पुढच्या प्रवासाकरता निघते.
Video not available
Keywords
#फोर सीझन्स#शर्मिला फडके# #FOUR SEASONS#SHARMILA PHADKE#
Customer Reviews
 • Rating StarASHUTOSH DIWAN

  -"फोर सीझन्स ही कादंबरी वाचून संपली.अलिकडे वाचलेली ही मला सर्वात जास्त आवडलेली कादंबरी आहे. मानवी मनाचे(मुलगी-स्त्री जास्त करुन)खोल गुंते उलगडण्याचा यात एक बय्रापैकी यशस्वी प्रयत्न केला आहे. निसर्गाची,व चित्रकलेची वर्णने यात या कादंबरीचा एक आशयाची रज या अर्थाने जैव भाग म्हणून आहेत.इतर वेळा दिसतात तशी उपयोगी ठिगळे म्हणून येत नाहीत. पर्यावरण संवर्धन(व त्याची नितांत गरज) व मानवी जगण्याच्या गरजा(व गरजा बनत चाललेल्या सुखसोयी) यांच्यातील संघर्ष व त्याच्या अपरिहार्य पणाचे आयाम ही कादंबरी बय्राच प्रमाणात शोधू पाहते. निसर्गाच्या सानिद्ध्यात एकरूप होऊन जगण्याने आयुष्यांच्या अवघड प्रश्नांची उकल होण्याचा मार्ग सापडतो,आपण वास्तवाला उघड्या डोळ्यांनी व खुल्या मनाने सामोरे जातो असे सुचवले जाते. ही एक बय्रापैकी काॅन्शसली,कसब वापरुन रचलेली कादंबरी आहे.मानसीक प्रक्रीयांचा खोल अनुभव शारिरीक वर्णनातून(म्हणजे नुसत्या मनुष्य शरिराच्या नव्हे,दृश्य ज्ञानेंद्रियांना कळणाय्रा)पोचवण्याची त्यांची क्षमता प्रचंड आहे.इतकी प्रचंड मनस्वीता कशी अशी काठावर उभारुन वर्णता येते याचा विस्मय वाटतो. अश्या अनेकच गोष्टी आहेत.सगळ्या लिहत नाही.आपल्या आपण प्रत्यय घेतल्यास नवेनवेच कोणाकोकोणाला दिसेल. एकंदरीत फारच वाचनीय व महत्वाची कादंबरी आहे हे नक्की. जाता जाता काही त्रूटी वाटल्या पण त्या अगदीच नगण्य आहेत. मागे माझे अत्यंत आवडते लेखक मकरंद साठे यांना मी एक पत्र लिहून,काय तुमची यमू?,स्टाॅकींग करणाय्रा बाईला कटवायला “बाई”कडे जायचे हा उपाय!वगैरे विचारले.त्यांनी पत्र लिहीले की तुम्ही गोष्ट पाहताय.त्यामागचा आशय विचारात घ्या.खरे आहे(म्हणजे असावे).या कादंबरीची गोष्टही कोणाला कमी वाटू शकेल. थोडी रिपीटीशन जाणवत राहते.समजा सरकारी यंत्रणांची अनास्था वगैरे. शेवटच्या वीसएक पानात सगळे थोड्या प्रयत्नाने गुंडाळल्यासारखे वाटते.ते कदाचीत थोडे आधी स्पेस करुन शेवटचा फोकस थोडा जास्त शार्प करता आला असता.निरवानिरवीची कुरतड फार प्रतिकात्मक वाटते(विहान).वगैरे. सारांश-एकतर आपल्या खास मराठी भावनादी गोष्टी दुसय्रा भाषेत अनुवादीत करता येतच नाहीत.मुद्दाम दुसय्रा भाषेत लिहीणारे आपले एक्झाॅटीक शो करुन विकण्याच्या प्राथमिक भानगडीत असतात.आणी वर आपल्याकडे मराठी इंग्रजी अनुवाद कला नाहीच.या कादंबरीचा चांगला इंग्रजी अनुवाद बुकर साठी शाॅर्टलीस्ट तरी नक्की होईल असे वाटत राहते. ...Read more

 • Rating StarSAYALI PARANJAPE

  ऋतूचक्र: आतलं आणि बाहेरचं... शर्मिला फडके यांच्या फोर सीझन्स या कादंबरीचं शीर्षक पहिल्यांदा डोळ्याखालून गेलं तेव्हा वाटलं होतं की, परदेशातलं सेटिंग दिसतंय. आपल्याकडे कुठे असतात चार ऋतू. एकतर वसंत, ग्रीष्म, वर्षा वगैरे सहा ऋतू किंवा उन्हाळा, ावसाळा आणि हिवाळा असे तीन. हल्ली एखादी कादंबरी किंवा कोणतंही फिक्शन वाचण्यापूर्वी मुद्दामहून त्याबद्दल दुसऱ्या कोणी लिहिलेलं, छापून आलेलं फारसं काही वाचत नाही. अगदी ब्लर्ब आणि प्रस्तावनाही कादंबरी वाचून झाल्यानंतर वाचते. खूप तपशील कळले असले तर त्या साहित्यकृतीचा अनुभव त्या तपशिलांच्या छायेत घेतला जातो असं वाटतं. मनाची पाटी कोरी ठेवून पुस्तक उघडलं की काहीतरी वेगळा अनुभव गवसतो. तरीही शीर्षकावरून, मुखपृष्ठावरून काहीतरी आडाखे बांधले जातातच. तेव्हा परदेशातलं सेटिंग असावं आणि ऋतूबदल, निसर्ग असं काहीतरी असावं अशा रेघोट्या पाटीवर उमटत होत्या. त्याकडे दुर्लक्ष करून कादंबरी वाचायला सुरुवात केली. त्यानंतरचे दोन-तीन दिवस या कादंबरीने जी काही उलथापालथ मनात केली (ती पाटी वगैरे जाऊदे, पाटीवर उमटावं इतकं सरळ, एकरेषीय यात काही नाही आणि ते प्रत्यक्षात तरी कुठं असतं?) आणि तिचे जे काही तरंग नंतरही उमटत राहिले ते कागदावर उतरवलं पाहिजे असं आतून वाटत राहिलं. कादंबरीची आणखी दोन पारायणं झाल्यावर आता लिहिल्यावाचून मोकळं वाटणार नाही असं काहीसं वाटलं आणि शेवटी लिहायला घेतलं. परीक्षण वगैरे करण्याची तर पात्रताच नाही पण कादंबरीचा विषय, पार्श्वभूमी, कालखंड, आकृतीबंध, कथा आणि उपकथांची गुंफण, व्यक्तिरेखा यांचा आलेखही यात मांडायचा नाही. हे सगळं फिक्शनला आकार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, लेखकाचं कसब पणाला लावणारं आहे पण या सगळ्यांतून त्या पलीकडचं काहीतरी आकाराला आलं तर या सगळ्याला अर्थ असतो आणि जेव्हा ते आकाराला येतं तेव्हाही या सगळ्या बाबी निव्वळ पार्श्वभूमीला उरतात. कादंबरी किंवा कोणतीही फिक्शनल साहित्यकृती वाचणाऱ्याला एका काल्पनिक जगात नेते आणि त्या जगातून वास्तवाचं जे काही दर्शन घडवते, आरसा दाखवते ते उलगडून बघण्याचा हा प्रयत्न आहे. हे सगळं सरळ रेषेत जाणारं, वरवरचं असेल तर त्याचा प्रभाव क्षणभंगूर ठरतो. मात्र, या काल्पनिक जगातून आपण आपल्या वास्तवाकडे नव्या दृष्टीने बघू लागतो, स्वत:च्या आत खोलवर शिरण्याचा प्रयत्न नकळत करू लागतो तेव्हा हा अनुभव अविस्मरणीय होऊन जातो. मिलिंद बोकिलांची `गवत्या` वाचताना अशाच प्रकारचा अनुभव आला होता, कमिला शम्सींची `ब्रोकन व्हर्सेस` वाचतानाही आला होता. फोर सीझन्स वाचतानाचा अनुभव म्हटलं तर त्या जातकुळीचा पण तरीही एक वेगळा, स्वत:चा चेहरा असलेला. माणसाच्या आयुष्यात, नात्यांमध्ये आणि एकंदर त्याच्या भवतालच्या निसर्गात कायम असं काहीच नाही, हे सगळं सतत बदलत असतं. हे बदल निसर्गात येतात ऋतूंचं नाव घेऊन पण हे ऋतू आणि ऋतूबदल खरं तर सगळीकडे असतात. सगळ्या ऋतूंमधून तावूनसुलाखून उरतं ते आपलं असतं. आयुष्यात, नात्यांत, निसर्गात सगळीकडेच. फोर सीझन्स नावावरून वाटलं होतं की कदाचित स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर या पाश्चिमात्य ऋतूंमध्ये घडणारी कथा असावी. ती तशी अर्थातच नाही. या कादंबरीत आहे पश्चिम घाटातलं एक माळरान. या माळरानापासून पूर्णपणे वेगळ्या सुंदरबनाचा संदर्भ यातल्या संघर्षाला आहे. तरीही अखेरीस हे सगळं काही निमित्तमात्रच. कारण, यातून आकाराला येणारा संघर्ष आहे तो आपल्या आतलाच आहे. त्याला देशा-परदेशाच्या, डोंगरा-पठाराच्या मर्यादा नाहीत. या अर्थाने ही एक वैश्विक कादंबरी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही आकाराला येऊ शकते अशी. पर्यावरण आणि माणूस यांच्यातील संघर्ष हा विषय तसा नवीन नाही. आपल्या रोजच्या जगण्यात तो प्रकर्षाने समोर येतो, जाणवतो. अर्थात `फोर सीझन्स`चा विषय निव्वळ हा संघर्ष एवढाच नाही. हा संघर्ष किती चेहरे घेऊन आपल्या आयुष्यात येतो, त्याचे किती पदर समोर येऊ शकतात हे बघण्याची दृष्टी यातून मिळते. यातला एक वर्षाचा कालखंड त्यातून जाणाऱ्या मुलीने चार भागांत विभागला आहे. हे यातले चार ऋतू- फोर सीझन्स. ती या माळरानात पाऊल टाकते तिथून सुरू होतो तो पहिला ऋतू. मात्र, त्यामुळे ऋतूंच्या स्थित्यंतरात एक सुरेख कंटिन्युटी साधली गेली आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे झाले ढोबळ ऋतू पण या ऋतूंहून महत्त्वाचे असतात त्यांना साधणारे दुवे. ग्रीष्माचा वणवा पेटण्यापूर्वी थंडीचे उरलेसुरले तुकडे वितळवून टाकणारी वसंताची कोवळी उन्हं, शिशिराचा गारठा सुरू होण्यापूर्वी वातावरणात पसरलेली हेमंताची गुलाबी थंडी, पावसाची झड थांबल्यानंतर निरभ्र आकाशात पसरलेलं शरदाचं चांदणं हे सगळं काही ऋतूबदलाचे धक्के पचवण्यासाठी आवश्यक तो अवधी देतात. तेच माणसाच्या आयुष्याचं आणि नात्यांचंही. माणसाच्या आयुष्याला ऋतूंमध्ये बांधणं आजपर्यंत साहित्यात फार ढोबळपणे केलं गेलं आहे. त्यामुळे यापूर्वी ते काहीसं क्लिशेड वाटत होतं पण फोर सीझन्स यातले सुक्ष्म गुंते फार बारकाईने दाखवते. रणरणत्या उन्हाळ्यात होणारा पावसाचा शिडकावा, कडाक्याच्या थंडीत अचानक जाणवणारी सुखद उब याचं सौंदर्य निसर्गात जसं जाणवतं, तसंच माणसाच्या आयुष्यात आणि नात्यांमध्येही. पावसाच्या सुरुवातीला प्रसन्न भासणाऱ्या सरी कधीकधी धुवांधार वर्षावाचं रौद्ररूप घेतात. हा अनुभव नात्यांमध्येही येतोच कधीतरी. हे विविध ऋतूंचं एकमेकांत मिसळणं फोर सीझन्समध्ये फार सुंदर हाताळलं आहे. यातले गुंते उकलण्याचा अट्टाहास यात नाही. ते प्रत्यक्षात तरी कुठे जमतं? त्या गाठींवर बोट ठेवणं आहे फक्त. जसा प्रत्येक कालखंडाचा एक ऋतू, ढोबळ मानाने का होईना असतो, तसाच माणसाचाही असतो. आपल्या आयुष्यातली एखादी व्यक्ती ग्रीष्माच्या पेटलेल्या निखाऱ्यासारखी असते,तर एखादी हेमंताच्या गुलाबी गारव्यासारखी. एखादी हिवाळ्या-उन्हाळ्यातला दुवा साधणाऱ्या वसंतासारखी. एखादी व्यक्ती प्रेमाचा वर्षाव करणारी पण त्या वर्षावात कोंडून टाकणारी,तर एखादी काहीशी अलिप्त राहून स्वत:चा शोध घेण्याचं स्वातंत्र्य देणारी. पावसाच्या संततधारेने सगळीकडे मळभ दाटलेलं असताना काही क्षणांपुरतंच येऊन ते दूर करणाऱ्या सूर्यकिरणांसारखी एखादी व्यक्ती. मात्र, एक व्यक्ती नेहमीच अशी टोकावर किंवा दुवा म्हणून राहील असंही नाही. तिच्या आयुष्यातही ऋतूबदल सुरूच असतात. त्यातूनच या कादंबरीतला एक महत्त्वाचा विचार पुढे येतो- स्वत:ला एक वर्ष देऊन बघावं. हे वर्ष म्हणजे काय नेमकं? अर्थातच ऋतूचक्र. स्वत:बद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, नात्याबद्दल,आजूबाजूच्या निसर्गाबद्दल कोणत्याही निष्कर्षावर जाऊन पोहोचण्यापूर्वी एकदा हे ऋतूचक्र पूर्ण होऊ द्यावं. या ऋतूचक्रातून जाताना पुढचे-मागचे, देशा-परदेशातले अनेक संदर्भ येतात. काही रहस्यं अर्धवट उकलतात, काही तशीच राहतात. टोकाच्या विरोधाभासातली साम्यस्थळं चमकून जातात. काही नात्यांना पूर्णविराम दिला जातो, काही नव्याने सुरू होतात, तर काही नात्यांना पुन्हा तोंड देण्याचं धैर्य हे ऋतूचक्र मिळवून देतं. फोर सीझन्स वाचताना किंवा वाचून झाल्यानंतर प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक गोष्ट. ही कादंबरी घडते तिशी उलटलेल्या एका मुलीच्या- कामायनीच्या- नजरेतून. नंतर विचार केल्यावर लक्षात येतं की यात कामायनीची व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे आणि तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या नात्यांनी, संदर्भांनी आलेल्या पुरुषांच्या व्यक्तिरेखाही ठळक आहेत. तिच्या रूपाची वर्णनं आहेत, पुरुषांच्या वागण्याचे संदर्भ आहेत, क्वचित शृंगारिक वर्णनंही आहेत. तिचं स्त्री असणं मुद्दाम अनुल्लेखित करण्याचा प्रयत्न यात अजिबात नाही. तरीही ही एका`बाई`ची किंवा `मुली`ची कथा आहे असं वाटत नाही. या कादंबरीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखा स्त्री आहे हे निव्वळ `इन्सिडेंटल` वाटतं हे लेखनाचं मोठं यश आहे. कादंबरीची भाषा, स्ट्रक्चर, व्यक्तिरेखा, पार्श्वभूमी, ग्रीन मॅनेजमेंट, अॅडव्हर्टायजिंग आणि बॉटनीसारख्या विषयांचे बारीकसारीक संदर्भ यांवर प्रचंड कष्ट घेतले आहेत हे नंतर विचार करताना जाणवतं आणि प्रस्तावना वाचताना त्याची खात्री पटते. कादंबरी वाचताना मात्र सगळं सहज घडून आल्यासारखं वाटतं. याचं कारण अर्थातच या सगळ्या तांत्रिक बाबींतून साकारणारं सृजन त्या पलीकडचं आहे. एखादं काम करताना तांत्रिक बाबींवर एवढी सफाई यावी की त्या पार्श्वभूमीला राहाव्यात आणि गाभा उजळून निघावा असं काहीतरी. यातली कामायनी लहान असताना काळ्या शाईत पाणी मिसळायला तयार नसते. कारण, त्यामुळे त्या काळ्या रंगाचा दाटपणा कमी होईल म्हणून. मग त्या काळ्या शाईचा ठिपका तर छान उमटायचा पण तिची रेष व्हायची नाही. `फोर सीझन्स`मध्येही असे अनेक संदर्भांचे, उपकथानकांचे काही ठळक, काही पुसट ठिपके आहेत. मात्र, ते एकमेकांशी जोडण्याचा आग्रह नाही. प्रत्येक उपकथेला, नात्याला रूढ शेवटापर्यंत पोहोचवण्याचा किंवा साच्यात बसवण्याचा अट्टाहास नाही. त्या ठिपक्यांच्या रेषा होऊन ते जोडले जातीलच असं नाही.म्हणूनच यातून मिळणारा अनुभव सघन, सखोल राहतो, कुठेही विरळ, एकरेषीय होत नाही. ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 12-05-2019

  चित्रात्म शैलीतली काव्यात्म कथा... एकदा हातात घेतली की खाली ठेवावी वाटू नये, पण त्यातली महत्त्वाची माहिती मेंदूत मुरवून घ्यायला किंचित थबकावं वाटावं, अशी ही कादंबरी : ‘फोर सीझन्स’! त्यातील एका मनस्वी मुलीच्या मनातला कल्लोळ एका माळरानावरचे चार ऋतू अनभवताना कसा आपोआप निवत जातो, ते उलगडत जाताना बघणं हा अतिशय आनंददायी अनुभव आहे. १३ वर्षांच्या मुलीला मुंबईत तिच्या वडिलांकडे ठेवून तिची आई घर सोडून परदेशी निघून गेलीय. वडील डॉक्टर. त्यांचा मुंबईत खारसारख्या ठिकाणी स्वत:चा बंगला. शेजारी राहणाऱ्या बंगाली कुटुंबात ही कामायनी नावाची मुलगी घरपण शोधतेय. त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या प्रेमात आकंठ बुडलीय. वडिलांचा मित्र हिचाही सखा, मित्र आणि सतत पाठीशी खंबीरपणे उभा असणारा वडीलही. जाहिरात विषयात सुवर्णपदक मिळवून, थोडे दिवस काम करून ही पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या प्रियकरासोबत सुंदरबनात निघून जाते. तिथं रुजायचा मन:पूर्वक प्रयत्न करते. जगापासून स्वतला पूर्णपणे तोडणं मात्र तिला जमत नाही. प्रियकराच्या आयुष्यात जेवढं स्थान सुंदरबनातल्या पर्यावरणाला, तेवढं हिला नाही. तो दूरस्थ आणि निर्मम. लहानपणापासून जोपासलेल्या सनातन आकर्षणाला मिळालेला हा प्रतिसाद तिला मुंबईत परत यायला भाग पाडतो. असं परत येण्याचा ताण मनावर कायम ओझं बनून ती बाळगते. पुढे युरोपला जाणं, तिथं घेतलेलं ग्रीन मॅनेजमेंटमधलं उच्च शिक्षण. सहा वर्षांनी परत मुंबई. तोपर्यंत वडिलांचा अकस्मात झालेला मृत्यू आणि घर पडलेलं असणं. चोहोबाजूंनी निराशा दाटलेली कामायनी सुरुवातीच्या पानांत आपल्याला दिसत राहते. जाहिरात क्षेत्रात ग्रीन कन्सल्टंटसारख्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या मुलीला इतकी टोकाची निराशा कशामुळे आलीय, ही उत्सुकता वाचकाला वेधून घेते. ग्रीन कन्सल्टंट म्हणून ज्या प्रकल्पांवर ती काम करतेय, ते प्रकल्प ती अर्धवट सोडून देतेय. कारण त्याच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी करायला ती नकार देतेय. ते करणं तिला भ्रष्टाचाराचा भाग वाटतंय, म्हणून. अशा निराश अवस्थेत तिला नागपठाराला लागून असलेल्या अंजनमाळावर सुरू असलेल्या एका प्रकल्पावर ग्रीन कन्सल्टंट म्हणून रुजू व्हायचा सल्ला तिचा वडीलधारा, काळजीवाहू मित्र देतो. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला सरकारी इको-टूरिझम प्रकल्प. पण पर्यावरणवाद्यांनी त्यात अडथळे आणल्यानं आता त्यांनी ग्रीन कन्सल्टंट नेमायचा निर्णय घेतलाय. याचा उघड अर्थ असा की, प्रकल्प मुळात ग्रीन नव्हता, आता तसा फक्त कागदावर करून हवाय. हे काम करायचं, तर कामातल्या तडजोडींना पर्याय नाही. त्या आपण करू इच्छित नाही; सबब हे काम आपण स्वीकारू नये, असं तिचं मन तिला सांगत असतं. तिच्या मते, पर्यावरण हे तिचं क्षेत्र नाही, त्यातला फार अभ्यास नाही. जाहिरात आणि पर्यावरण अशा परस्पर विरोधी क्षेत्रांची सांगड घालायला जाणं चुकलंच. ती नकार देत राहते. मग तिचा तो मित्र तिला सांगतो, की त्या माळरानावर एक बोटॅनिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट आहे आणि त्याचे संचालक आहेत त्यांच्या मुंबईच्या जुन्या बंगल्यातले बंगाली शेजारी- ज्यांच्या मुलासोबत ती सुंदरबनात जाऊन एकटीच परतलेली असते. ही मात्रा परिणामकारक ठरते. मुंबईत राहायला तसंही कारण नसतंच. इथल्या कंटाळा व्यापून राहिलेल्या आयुष्यातून पळून जाण्याचा उपाय म्हणून ती माळावर येते. हातात त्यानं दिलेली हँडमेड कागदाची डायरी. माळावरचे चार ऋतू अनुभवताना लिहिलेली डायरी म्हणजे ही कादंबरी! डायरी लिहिण्याचा आधीचा काही काळ सोडला, तर पुढे सगळं प्रथमपुरुषी निवेदनातून आपण वाचत जातो. मुंबईतील ऑफिसातल्या बैठकीत अंजनमाळ ग्रीन प्रोजेक्ट या परिसराची जिओ- बायो-अ‍ॅन्थ्रोपॉलॉजिकल माहिती तिला मिळत नाही. काही फुटकळ भौगोलिक माहिती मिळते; त्यावरून हा परिसर निर्जन, खडकाळ, लांबलचक मदान असावा एवढय़ा अंदाजावरून ती ऐन मध्यरात्री जवळच्या रेल्वे स्थानकावर उतरते. या मुलीचे आई-वडील विभक्त झाल्यावर हिचं बालपण नेमकं कसं गेलं असेल? १३ वर्षांच्या मुलीला वडिलांजवळ ठेवून आई अशी कशी परदेशी निघून गेली? शेजाऱ्यांच्या अनिर्बन नावाच्या मुलासोबत ही तरुण मुलगी अचानक सुंदरबनात का निघून जाते? बरं जाते तर परत का येते? आणि त्या परत येण्याचं भळभळतं दु:ख अंगावर का बाळगते? मग युरोपात शिक्षण, काम करून परत कशासाठी येते? येते ती थेट बंगल्यात आणि तिथं फक्त मातीचे ढिगारे? हिच्या वडिलांच्या पश्चात एवढा मोठा निर्णय घेताना आई हिला सांगत का नाही? हिच्या तीव्र निराशेचं कारण काय असेल? ग्रीन कन्सल्टंट म्हणून कामाचं नेमकं स्वरूप काय असेल? कादंबरीच्या या टप्प्यावर आपल्याला असे अनेक प्रश्न पडतात. आणि इथून सुरू होतात डायरीतल्या नोंदी : ‘ऋतू पहिला (ऑक्टोबर- नोव्हेंबर- डिसेंबर).. पानगळ आणि निष्प्राण उन्हं’; ‘ऋतू दुसरा (जानेवारी- फेब्रुवारी- मार्च).. स्थिरावलेली थंडी आणि उबदार वसंताची चाहूल’; ‘ऋतू तिसरा (एप्रिल- मे- जून).. उबदार उष्ण उन्हाळा आणि रंगांची उधळण’; ‘ऋतू चौथा (जुल- ऑगस्ट- सप्टेंबर).. धुवाधार पाऊस आणि पंथविराम.’ प्रत्येक प्रकरणाची सुरुवात कामायनीचा बदलत गेलेला मूड दाखवणारी. पानगळ आणि निष्प्राण उन्हं यांपासून तिचा माळरानावरचा प्रवास सुरू होतो. ‘कोरडय़ा घोटाभर गवताचा अथांग, मातकट पिवळा महासागर लखलखीत उन्हात हेलकावे घेतो आहे. क्षितिजाची कडाही न दिसणारा अंतहीन रखरखाट. हा अंजनमाळ? या पिवळ्या महासागरात अनंतकाळ पोहत राहिलो तरी किनाऱ्याचा काहीच थांग लागायचा नाही.’ क्षणभर आपलंही काळीज गलबलतं. यात माळरानाच्या उजाडपणाची वर्णनं येतात, ज्यातून आपण तिचं भकासपण अनुभवत राहतो. ‘थोरोने मानसिक कोलाहलावर त्याच्यापुरता उपाय शोधला आणि तो एकांतवास मिळवायला तळ्याकाठी जाऊन राहिला. मी या माळरानावर आलेय. स्वतहून नाही, जोसेफनं आणि परिस्थितीनं ढकललं म्हणून. तरीही मानसिक कोलाहल हे साम्य जास्त महत्त्वाचं आहे.’ असं मान्य करत ती तिथं नव्यानं जगायला किमान सुरुवात तरी करते. या प्रकरणाच्या शेवटी मात्र ती कबूल करते की, ‘जे झालं ते टाळता येण्यासारखं नव्हतं. वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगासारखी पाच र्वष युरोपात काढूनही काहीच फरक पडला नाही. जी देणी चुकवायची ती चुकवायलाच हवीत. त्याची ही सुरुवात. अजून किती ऋतू ओलांडायचेत, भटकायचंय माहीत नाही. पण इथं एकांत आहे. विखुरलेले तुकडे गोळा करायला माळरान मदत करत आहे. त्याबद्दल मी त्याचे आणि त्याच्याकडे मला पाठवणाऱ्या जोसेफचे आभार मानते.’ माळरानावरच्या जुन्या गेस्टहाऊसमध्ये तिचा मुक्काम असतो. तिथली व्यवस्था बघणारा त्याच्या बायको-मुलीसोबत बाहेरच्या खोपटात राहतो. इथल्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केला गेलेला तो एक स्थानिक आदिवासी. त्याला इथल्या निसर्गाची बारीकसारीक माहिती आहे. त्याची छोटी मुलगी कामायनीबरोबर फिरायला जाते, इथल्या रुढींविषयी तपशील सांगते. या गेस्टहाऊसमध्ये कामायनीला नोंदी असलेली एका ब्रिटिश अभ्यासिकेची वही सापडते. मागच्या शतकातली. या जागेवर ब्रिटिश सनिकांच्या विश्रांतीसाठी हिलस्टेशन वसवायला आलेल्या एका गोऱ्या अधिकाऱ्याच्या बायकोची. त्यात या जागी आढळणाऱ्या फुलं- पानं- पशू-पक्ष्यांची चित्रं, माहिती आहे. कामायनी ते बघताना सुरुवातीला चकित होते, की आता इतका उजाड असलेला हा माळ पूर्वी इतक्या विविधतेनं नटलेला होता? मग त्या नोंदींची शहानिशा करणं, त्यासाठी तिथल्या बोटॅनिकल इन्स्टिटय़ूटचं ग्रंथालय वापरणं असं सगळं सुरू होतं. तिथं काम करणाऱ्या एका मुलाशी ओळख आणि नंतर मत्री होते. तोही पर्यावरणप्रेमी, पण तिच्या पहिल्या प्रियकरासारखा टोकाचा विचार करणारा नाही. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे, असं मानणारा. ओसाड माळरानावर हळूहळू असं मन रमत जातं. दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी कामायनी डायरीत नोंदवते : ‘या खोलीतली माळरानावरची पहिली सकाळ आठवते. असाच शुभ्र, पांढरा प्रकाश उघडय़ा खिडकीतून आत ओतला जात होता. त्रासिकपणे मी गच्च आवळून धरलेल्या पापण्या. त्या उघडून प्रकाशाचे किरण डोळ्यांत घ्यायची मुळी तयारीच नव्हती. आजचा तोच प्रकाश किती कोवळा आणि शीतल झालाय. ऋतू बदलतात पाहता पाहता. आपणही बदलत जातो.’ कामायनी या वातावरणात गुंतत चाललीय. ऋतूनुसार होत जाणारे बदल न्याहाळणं, बोटॅनिकल इन्स्टिटय़ूटमध्ये सुरू असलेल्या प्रयोगांची माहिती घेणं, स्थानिक लोकांच्या रुढी-परंपरा, त्यांचं निसर्गाबद्दल असलेलं भान या साऱ्यात ती रमलीय. बोटॅनिकल इन्स्टिटय़ूटमध्ये काम करणारा विहान, त्याचे काका आस्ताद तिला माणूस आणि निसर्गातलं नातं उलगडून दाखवतात. मार्गारेटच्या जुन्या नोंदी तिला आजचा निसर्ग वाचायला मदत करतात. कामायनी म्हणते, ‘परिसंस्था वाचायला शिकवून पर्यावरण या शब्दाची धास्ती मनातून कायमची काढून टाकल्याबद्दल मी विहान, आस्ताद आणि मार्गारेटची आयुष्यभर ऋणी राहीन.’ कामायनीला डायरी लिहिताना आपोआप उमजत जातं, की या फक्त निसर्गबदलाच्या नोंदी नाहीत. नाती, भावना, प्रेम यांचंही एक स्वतंत्र पर्यावरण असतं. पर्यावरण आणि माणूस यांचं नाळेचं नातं असल्याची समजूत तिला डायरीतून व्यक्त होताना येत जाते. ती ज्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आलीय, त्याच्या मार्गात मात्र अनंत अडचणी आहेत. मुळातून पर्यावरणस्नेही नसलेला प्रकल्प तसा भासवायचा, हे तिला आधीपासूनच पटलेलं नसतं. त्यात इथं आल्यावर, निसर्गाच्या जवळ राहिल्यावर, स्थानिकांना, अभ्यासकांना भेटल्यावर तर ती कामात कुठलीही तडजोड खपवून घेत नाही. व्यवसाय आणि नतिकता यापकी काय निवडायचं, याचं भान तिला माळरानावरच्या मुक्कामात येतं. याच वैचारिक गोंधळलेपणातून तिचा युरोपमधला प्रियकर दुरावलेला असतो. एकूणच आयुष्यात आलेल्या माणसांचा, त्यांच्याशी असलेल्या नात्याचा, त्यातल्या तुटलेपणाचा, अपेक्षांचा, उपेक्षांचा अर्थ तिला या मुक्कामात गवसत जातो. मुंबईत, युरोपात राहून शिकता न आलेलं तिला इथला कातळ शिकवून गेला. सगळं संपलं असं वाटल्यानंतर नव्यानं आयुष्य सुरू करण्याची उमेद, जगण्यातली लय, ठामपणा, चिवटपणा, आयुष्यानं दिलेलं दान स्वीकारून कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर आणि नवजीवन.. माळरानाचे पुन:पुन्हा भंगूनही सांधले गेलेले मातीचे थर तिला भक्कमपणे पाय रोवायला शिकवतात. इथला मुक्काम संपवून कामायनी परत निघालीय ती अशी संपूर्णपणे बदलून. तिचे गुंते तिनंच उकललेत. कामायनीचा गोरा रंग उन्हानं काळवंडलाय, पण तिचं उजळलेलं अंतर्मन आपल्याला लखलखीत करून टाकतं. ही बदलत चाललेली कामायनी आपल्याला टप्प्याटप्प्यानं अंतर्बा दिसत राहते, कळत जाते. तिच्या सुखदु:खाशी आपण एकरूप होतो. म्हणून प्रदीर्घ असली, तरी ही कादंबरी दीर्घकथेशी जवळीक साधणारी वाटते. यातल्या व्यक्तिरेखांना आपण भेटतो ते फक्त तिच्या नजरेतून. तिला त्या जशा दिसतात तशा. तिच्या त्यांच्याप्रतीच्या भावना थेट आपल्यापर्यंत पोहोचतात, पण तरीही यातल्या व्यक्तिरेखा अधिक फुलवलेल्या बघायला जास्त आवडलं असतं. तसंच अनेक व्यक्तिरेखा असल्या तरी त्यांच्यातली व्यामिश्रता तितकीशी समोर येत नाही. म्हणून या कथेला कादंबरी म्हणावं का, असा प्रश्न पडतो. तरी अतिशय वेगळ्या वातावरणात नेऊन सोडणारं, अभ्यासू, वाचनीय असं हे लेखन आहे हे सर्वात महत्त्वाचं. काव्यात्म आणि चित्रात्म शैलीमुळे वाचक त्यात गुंतत जातो, एवढं नक्की! –नीलिमा बोरवणकर ...Read more

 • Rating StarYashodhara Katkar

  स्त्रीच्या आदिबंधांचा शोध घेणारी कादंबरी - फोर सीझन्स कथालेखक ,अनुवादक आणि कलासमीक्षक म्हणून मराठी कलाक्षेत्रात आपली एक वेगळी वाट निर्माण करणाऱ्या शर्मिला फडके यांच्या `फोर सीझन्स `या कादंबरीचे प्रकाशन अलीकडेच झाले .शर्मिला यांची ही पहिलीच कादंबरी,शिवाय मूळ पिंड अभ्यासू कलासमीक्षकाचा ,म्हणून ‘फोर सीझन्स’ असे नाव असणाऱ्या , पर्यावरणाशी नाते असणाऱ्या कादंबरीबद्दल सर्वांच्या मनात खूप उत्सुकता होती .ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी अलीकडेच मुंबईतल्या पिरोजा स्टुडिओत या कादंबरीचा परिचय आणि काही भागांचे वाचन अशा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम छोटा असला तरी या कार्यक्रमाला साहित्यिक ,संपादक ,डिझायनर्स , अनुवादक ,रंगकर्मी , चित्रकार आणि दर्दी वाचक अशा सर्जनशील मंडळींची उपस्थिती लाभल्यामुळे तिथे एक छोटे कला- संमेलनच भरले होते . आपल्या स्वगतपर प्रास्ताविकात शर्मिला यांनी कादंबरीचा थोडक्यात परिचय करून दिला . फ़ूड -लाइफ़स्टाईल ब्लॉगर आणि लेखिका सायली राजाध्यक्ष आणि आकाशवाणीच्या माजी अधिकारी मेधा कुलकर्णी यांनी या कादंबरीतल्या प्रकरणांचे अतिशय उत्तम सादरीकरण केले .त्यांनी निवडलेले उतारे एवढे बहुआयामी होते की त्यामुळे श्रोते तर तन्मय झालेच आणि कादंबरी वाचण्याची उत्सुकता ,ती ओढही वाढत गेली . या कादंबरीचा परिचय करून देताना शर्मिला म्हणाल्या “`फोर सीझन्स ` (चार ऋतू) या कादंबरीला पर्यावरणाची पार्श्वभूमी असली तरी हे पर्यावरण केवळ निसर्गातलं नाही, ते माणसाच्या अंतरंगातलं ,मानवी नातेसंबंधांचंही पर्यावरण आहे .कादंबरीतली प्रोटॅगॉनिस्ट आहे ,कामायनी .ती बरेच प्रदेश ,बरीच नाती ओलांडून आली आहे एका माळरानावर .तिचा स्वतःचा एक भूतकाळ आहे तसा माळरानाचाही भूतकाळ आहे .हे माळरान कधीकाळी विलक्षण समृद्ध होतं पण काही कारणांनी इथे आता कुठलीही जैविक संपदा अस्तित्वात नाहीये .कामायनीची करिअर पर्यावरण क्षेत्रातली आहे पण पर्यावरण हा व्यवसाय करत असताना आपण पर्यावरणाचं एका प्रकारे शोषण करतोय असा अपराधी भाव तिच्या मनात आहे .कारण ग्रीन प्रोजेक्ट्स उभारणं ,ग्रीन बिल्डिंग्ज बांधणं यामध्ये ग्रीन हा शब्द नावाला असतो ,त्या नावाखाली व्यवसायच होत असतो . ती जेव्हा माळरानावर येते तेव्हा केवळ व्यवसायच करायचाय , इको -टूरिझम प्रकल्प उभारायचा एवढाच मर्यादित हेतू तिच्यासमोर असतो .पण माळरानावर येण्यामागे तिची स्वतःची कारणंही असतात . ती तिथे राहू लागते आणि माळरान हळुहळु तिच्याशी बोलायला लागतं ,माळरानाचा भूतकाळ तिला समजत जातो .फार पूर्वी मार्गारेट फिलिप नावाची एक वनस्पतिशास्त्रज्ञ ती आता राहतेय त्याच बंगल्यात राहात होती ,तिची प्रवासवर्णनं ती वाचते तेव्हा हे आता उघडंबोडकं असलेलं माळरान किती समृद्ध होतं ,माळरानाचं खरं पर्यावरण तिच्यासमोर उलगडत जातं .निसर्ग म्हणजे केवळ हिरवागार ,समृद्ध नाही माळरानाचंही आपलं एक सौंदर्य असतं ते तिला सापडत जातं .तिथे ती चार ऋतू राहते ,या चार बदलत्या ऋतूंमध्ये तिला तिच्या आयुष्यातलं जे जे टाळायला ती इथे निघून आलेली असते त्यांचा सामना करायला शिकते ,ती स्वतःच स्वतःला सापडत जाते .तिला निसर्ग म्हणजे काय हे समजतं ,पर्यावरण म्हणजे काय हे समजतं ,त्यातून तिच्या पुढच्या प्रवासाला गती मिळते . या कथानकाला सुंदरबनचाही एक संदर्भ आहे कारण तिच्या भूतकाळाचे धागेदोरे त्याच्याशी निगडित आहेत .एकीकडे सुंदरबन आणि दुसरीकडे माळरान ,अशा दोन अतिशय वेगळ्या ,पण स्वतःचे एक सौंदर्य असणाऱ्या परिसंस्थांच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी घडत जाते ." ही कादंबरी का लिहिली याचे उत्तर देताना त्या म्हणाल्या ," माझा मूळ विषय वनस्पतीशास्त्र पण पुढे त्यात करिअर करावी असं काही वाटलं नाही ,पण निसर्ग ,त्याची ओढ आणि आवड मनात रुजून राहिली. पुढे मी शाश्वत पर्यावरणाच्या अभ्यासाकडे वळले तेव्हा माणूस आणि पर्यावरण यांच्यातलं गुंतागुंतीचं नातं उलगडत गेलं .पुढे मी सुंदरबनला गेले ,नानजच्या अभयारण्याला भेट दिली तेव्हा कथानक मनात आकार घेत गेलं ,त्यावर एखादा लेख किंवा कथा लिहून तो विस्तृत आवाका आणि पर्यावरण आणि माणसाच्या नातेसंबंधातले तिढे नेमके पकडता आले नसते म्हणून आपसूकच कादंबरीकडे वळले ,पण त्याचं तंत्र -मंत्र समजून तो फॉर्म पकडीत यायला खूप वेळ ,परिश्रम आणि ऊर्जाही द्यावी लागली " ही कादंबरी एका स्त्रीच्या भावविश्वाचा शोध घेते ,तिच्या अंतरंगातल्या पर्यावरणातल्या गुंतागुंतींचा वेध घेत ,त्यांचे तिच्या बाह्य विश्वाशी ,तिथल्या माणसांशी असणारे अनुबंध उलगडत जाते .एक निखळ स्त्री म्हणून तिचे निसर्गाशी ,पृथ्वी -मदर अर्थशी एक आदिम नाते आहेच . स्त्री ही त्या आदिमायेची लेक म्हणून निसर्गाने तिला सर्जनशीलतेची बीजे आणि गुणसूत्रे काहीशी जास्तच दिलेली आहेत . ती कामायनीला पर्यावरणातल्या निसर्गचक्राकडे ,त्या आदिम अनुबंधांच्या मुळांकडे वारंवार खेचून घेऊन जात राहतात . त्यातून तिची शोषणकर्ता ही भूमिका मागे पडत जाते आणि संरक्षकाच्या भूमिकेत ती येते , त्यातून ती स्वतःचीच स्वतःला सापडत जाते ,तिचे श्रेय तिला सापडते .पण तिचा प्रवास इथे संपतो का ?की कथानकाचा शेवट जिथे आहे असे वाटते तिथे क्षितिजापलीकडून कुणी हाका देऊ लागते ,नव्या यात्रेची सुरवात होणार असते ? मराठी साहित्यविश्वात अवतरलेली ही आगळीवेगळी कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी . ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

सरोज काळे

#पुस्तकाचं शीर्षक वाचूनच अस वाटलं की यात काहीतरी वेगळं असेल...म्हनून वाचायला घेतलं ...सुरुवात रावणाच्या युद्धा तील अंताने होते...नंतर फ्लॅशबॅक ने (मराठी शब्द सापडला नाही ) कथा पुढे जाते ...रावण हा राक्षस कुळातील असला तरी महर्षी विश्रवाचा पुत्र आणि मर्षी पुलस्तीचा नातू असल्याने ज्ञानी होता..त्यामुळे युद्धाच्या शेवटी रावण मरणोन्मुख अवस्थेत असताना रामाने लक्ष्मणाला सांगितले की,दशाननाचा शिष्य होऊन त्याच्यापासून ज्ञान प्राप्त करून घे,नाही तर आपला जन्म वाया गेल्या सारखे आहे...त्याच्या बरोबर त्याचे ज्ञान लुप्त झाले तर आपण अपराधी ठरू,त्याचे ज्ञान समग्र मानव जातीला वंदनीय आहे, म्हणून लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्याला ज्ञान सांगण्यास सांगितले ,पण रावणाने ज्ञान सांगण्यास नकार दिला,लक्ष्मण परत रामकडे आला तेव्हा रामाने विचारले की,"तू कुठे उभा होतास" लक्ष्मण म्हणाला रावणाच्या चेहर्या जवळ,"नाही ज्ञान घेताना गुरुपदी लिन व्हावे म्हणून तू त्याच्या पायथ्याकडे उभा रहा आणि विनंती कर"त्याप्रमाणे धर्मानुसार लक्ष्मण याने हातात दर्भ घेतला आणि दशननाचा पायथ्याशी उभे राहून ज्ञान देण्याची विनंती केली,तेव्हा रावणाने धर्मनीती,अर्थनीती,आणी राजनीती याबद्दल ज्ञान सांगितले... रावणाची ही दुसरी स्वच्छ बाजू याच पुस्तकात वाचायला मिळाली नाहीतर आपण सीतेला पळविणारा दुष्ट रावणा बद्दल वाचलेले आहे 🌼🌼 #१) #राजनीती हाच मूलभूत सिद्धांत आहे की,जोवर देहात जीव आहे,तोवर शत्रुत्वाचा अंत झाला असे समजणे भोळेपणाचे ठरेल ... कधीही कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो...हाच राजनीतीचा सर्वात पहिला पाठ आहे...पिता, पुत्र,भ्राता हे एकही नाते विश्वास ठेवण्याजोगे नसते *** #सुग्रीव हा वालीचा भ्राता होता आणि बिभीषण हा रावणाचा,पण दोघानि भावांना दगा देऊन राज्य सिहासन मिळविले.. राजनीतीमध्ये स्वहिता पलीकडे दुसरे काहीच नसते, आणि त्या हिताच्या रक्षणा साठी जे काही केले जाते तोच धर्म तोच न्याय,तीच नीती ठरते 🏵️🏵️ 2)#अर्थनीती श्रीलंका सोन्याची आहे,जेव्हा की रावण राक्षस होता, अधर्म,अन्याय,अनितीचा अवतार होता...पण राम हा न्यायाने वागणारा होता,मग अयोध्या गरीब कशी काय?समृध्दीला काही कारण लागत नाही...लक्ष्मी अति चंचल असते,ती केव्हा कुठे वास करील आणि केव्हा तिथून निघून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही, लक्ष्मी चंचलतेचे उदाहरण म्हणजे आपल्या बुद्धी कौशल्यामुळे आणि अविश्रांत परिश्रमामुळे लक्ष्मीची प्राप्ती झाली असे जे मानतात ते निव्वळ बुद्धीहीन,गर्विष्ठ असतात ... उलट आपल्या दुर्भाग्यमुळे लक्ष्मी प्राप्त झाली नाही असे म्हणणारे निषफलता झाकण्याचा दुर्बळ आणि निर्बुद्ध प्रयत्न करतात, कोणीही ,कधीही लक्ष्मीचा स्वामी होवू शकणार नाही...देवाच्या संपत्तीचा कुबेर जसा देवलोकच्या कल्याणासाठी वापर करतो,स्वतः त्या संपत्तीचा उपभोग घेत नाही, तसेच समाजातही समृद्धी जपणार्यांनी तिचा विनियोग "बहुजन हिताय , बहुजन सुखाय "या पद्धतीने केला पाहिजे...रावणाने सांगितलेले हे ज्ञान मात्र आत्ताच्या काळात पुरेपूर लागू होते,लंकेने ही नीती अनुसरली होति म्हणून लंका सोन्याची होती 🌷🌷 #रावणाचे हे ज्ञान लक्ष्मणाच्या कल्पने पलीकडचे अतर्क्य होते, रावण महान योद्धा होता, शिवभक्त होता, लंकेत रोज प्रभातकाली यज्ञवेदीमध्ये मंत्रोच्चारासह आहुती दिली जात असे *** १)#तिसरे ज्ञान धर्मनीती -निर्भेळ असा धर्म आजपर्यंत कोणाला उपलब्ध झाला नाही,स्वतःचा प्रत्येक हेतू न्याय्य ठरविण्यासाठी आणि व्यापक जनसवर्धन मिळवण्यासाठी समर्थ माणूस धर्माचा आश्रय घेत असतो,धर्माचा अर्थ केवळ एकच, माझ्या कार्यात ज्यावेळी मला हे साहाय्यभूत ठरेल त्याचे समर्थन शोधून काढणे म्हणजे धर्म। 💐💐 #४)#मनुष्यनीती एक व्यक्ती एकाच माणसाशी एकदा जसा व्यवहार करते,ती दुसऱ्या वेळीही अगदी तसाच व्यवहार करेल असे मानणे व्यर्थ आहे,येथे कोणी कोणाचा स्वजन नाही. खरे तर माणूस स्वतःही स्वतःला ओळखू शकत नाही...आपण सदैव एकाच प्रकारचे वर्तन करू असे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही ही झाली मनुष्यनीती 🌸🌸 #सुमाली हा राक्षस कुळातील होता त्याने विश्वकर्मा कडून सोन्याची लंका तयार करून घेतली ,परंतु देवांना ते आवडले नाही,त्यांनी लंकेवर स्वारी करून ती उध्वस्त केली,सुमाली वनात राहायला लागला,तेव्हा वनात फिरत असताना त्यांना महर्षी विश्रवा यांचा आश्रम दिसला,आपल्या मुली साठी हे योग्य वर आहेत असा त्यांचा मनात विचार आला,त्यांची मुलगी केकसी हिने विश्रवाना विनांती केल्यावरून त्यांनी तिच्याशी विवाह केला...त्यांची पहिली पत्नी देववर्णीचा पुत्र वैश्रव ण होता,आता केकसी पासून त्यांना एक मुलगा झाला...तो जन्मला तेव्हा त्याच्या बारशाच्या दिवशी महाराणी चित्रदेवी भेटायला आली, तिच्या गळ्यात नवरत्नजडीत हार होता तो तीने बाळाच्या गळ्यात घातला,त्याक्षणी त्या रत्नांची प्रभा बाळाच्या मुखावर पडून प्रत्येक रत्नांचे रंगीबेरंगी प्रतिबिंब दिसू लागले...बाळाची जणू एक ऐवजी दहा मुखे असावीत असा संभ्रम निर्माण झाला ...नऊ प्रतिबिंबाच्या मध्यभागी त्याचा स्वतःचा मोहक असा चेहरा असावा असे भासत होते म्हणून त्या बाळाचे नाव दशानन ठेवण्यात आले 🌼🌼 #वैश्रवन हा पुलस्तीकडे ज्ञान घेऊन आल्यावर त्याच्या मुखावर तेज दिसायला लागले,हे पाहून दशाननाच्या मनात वादळ उठले, परंतू दशननाने पिता विश्रवा कडून ज्ञान संपादन केले होते,पण त्यावर त्याचे समाधान झाले नव्हते, दशाननाला दोन भाऊ कुंभकर्ण आणि बिभीषण आणि बहीण शूर्पणखा हे होते 🌹🌹 #विश्रवाणे लंका वैश्रवनाला दिली पण ती अन्याय समजून दशननाने ती परत घेतली,कारण त्याचे आजोबा सुमाली याने लंकेची निर्मिती केली होती,ती दशाननाने हस्तगत केली,ज्या नितिशून्य व्यवस्थेने हे वर्णभेद निर्माण केले त्या वर्णभेदा विरुद्ध मीही आता निव्वळ पाशवी बळाचाच वापर करेन, न्याय,नीती,धर्म केवळ शस्त्र बळानेच प्रस्थपित होणार असतील तर मीही पाशवी बळाचाच वापर करीन ,भ्रष्ट मापदंड प्रमाण मानणाऱ्या एकूण एकाला त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर द्यायला मी मागेपुढे पाहणार नाही ,त्यासाठीच मी कटिबद्ध आहे असा दशाननाचा निर्णय झाला ** #तो राजांचा पराभव करीत सुटला पराजित राजांना आपले दास्य स्वीकारायला लावण्यात त्याला धन्यता वाटू लागली,ऋषींच्या यज्ञात जाऊन तिथे विध्वंस करणे यात त्याला समाधान वाटायला लागले, त्यातच वनात असताना शूर्पणखाने रामाकडे लग्नाची मागणी केली, त्याला नकार मिळताच ती चिडली लक्ष्मणाने रागाने तिचे नाक,कान कापून पाठवले,त्याचा राग येऊन ती रावणाकडे गेली व रामाचा सूड म्हणून त्याने कपटाने सीताहरण केले...रामाने सुग्रीव,बिभीषण व इतर वानर यांच्या मदतीने लंकेवर हल्ला केला आणि पापी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली , तिने अग्निपरीक्षा दिली परंतु रामाचे मन शांत नव्हते...तेव्हा ते ऋषी वाशिष्ठकडे गेले व त्याचे कारण विचारले,ते म्हणाले "रामा तू म्हणालास त्याप्रमाणे तू केलेला रावनवध म्हणजे अधर्माशी, अनितीशी दिलेला लढा होता,लोक एव्हढेच समजतात की,आपली पत्नी परत मिळविण्यासाठी रामाने हजारो सैनिकांचे प्राण घेतले. परंतू हे पूर्ण सत्य नाही,याची तू लोकांना प्रचिती आणून दे,त्यासाठी तुला सीतेचा त्याग करावा लागेल, त्या प्रमाणे लक्ष्मण सीतेला वनात सोडून आला 💐💐 #पण लक्ष्मणाला तो आपला अपराध वाटला,आणि त्याने शरयू नदीत आपला देह अर्पण केला आणि त्यानंतर रामाने सुद्धा शरयू नदीत आपला देह अर्पण करून आपले अवतार कार्य संपविले ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
ASHUTOSH DIWAN

-"फोर सीझन्स ही कादंबरी वाचून संपली.अलिकडे वाचलेली ही मला सर्वात जास्त आवडलेली कादंबरी आहे. मानवी मनाचे(मुलगी-स्त्री जास्त करुन)खोल गुंते उलगडण्याचा यात एक बय्रापैकी यशस्वी प्रयत्न केला आहे. निसर्गाची,व चित्रकलेची वर्णने यात या कादंबरीचा एक आशयाची रज या अर्थाने जैव भाग म्हणून आहेत.इतर वेळा दिसतात तशी उपयोगी ठिगळे म्हणून येत नाहीत. पर्यावरण संवर्धन(व त्याची नितांत गरज) व मानवी जगण्याच्या गरजा(व गरजा बनत चाललेल्या सुखसोयी) यांच्यातील संघर्ष व त्याच्या अपरिहार्य पणाचे आयाम ही कादंबरी बय्राच प्रमाणात शोधू पाहते. निसर्गाच्या सानिद्ध्यात एकरूप होऊन जगण्याने आयुष्यांच्या अवघड प्रश्नांची उकल होण्याचा मार्ग सापडतो,आपण वास्तवाला उघड्या डोळ्यांनी व खुल्या मनाने सामोरे जातो असे सुचवले जाते. ही एक बय्रापैकी काॅन्शसली,कसब वापरुन रचलेली कादंबरी आहे.मानसीक प्रक्रीयांचा खोल अनुभव शारिरीक वर्णनातून(म्हणजे नुसत्या मनुष्य शरिराच्या नव्हे,दृश्य ज्ञानेंद्रियांना कळणाय्रा)पोचवण्याची त्यांची क्षमता प्रचंड आहे.इतकी प्रचंड मनस्वीता कशी अशी काठावर उभारुन वर्णता येते याचा विस्मय वाटतो. अश्या अनेकच गोष्टी आहेत.सगळ्या लिहत नाही.आपल्या आपण प्रत्यय घेतल्यास नवेनवेच कोणाकोकोणाला दिसेल. एकंदरीत फारच वाचनीय व महत्वाची कादंबरी आहे हे नक्की. जाता जाता काही त्रूटी वाटल्या पण त्या अगदीच नगण्य आहेत. मागे माझे अत्यंत आवडते लेखक मकरंद साठे यांना मी एक पत्र लिहून,काय तुमची यमू?,स्टाॅकींग करणाय्रा बाईला कटवायला “बाई”कडे जायचे हा उपाय!वगैरे विचारले.त्यांनी पत्र लिहीले की तुम्ही गोष्ट पाहताय.त्यामागचा आशय विचारात घ्या.खरे आहे(म्हणजे असावे).या कादंबरीची गोष्टही कोणाला कमी वाटू शकेल. थोडी रिपीटीशन जाणवत राहते.समजा सरकारी यंत्रणांची अनास्था वगैरे. शेवटच्या वीसएक पानात सगळे थोड्या प्रयत्नाने गुंडाळल्यासारखे वाटते.ते कदाचीत थोडे आधी स्पेस करुन शेवटचा फोकस थोडा जास्त शार्प करता आला असता.निरवानिरवीची कुरतड फार प्रतिकात्मक वाटते(विहान).वगैरे. सारांश-एकतर आपल्या खास मराठी भावनादी गोष्टी दुसय्रा भाषेत अनुवादीत करता येतच नाहीत.मुद्दाम दुसय्रा भाषेत लिहीणारे आपले एक्झाॅटीक शो करुन विकण्याच्या प्राथमिक भानगडीत असतात.आणी वर आपल्याकडे मराठी इंग्रजी अनुवाद कला नाहीच.या कादंबरीचा चांगला इंग्रजी अनुवाद बुकर साठी शाॅर्टलीस्ट तरी नक्की होईल असे वाटत राहते. ...Read more