* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CONTAGION
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177662047
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS IS A NOVEL BASED ON THE MEDICAL BACKGROUND. A VERY INTELLIGENT TEAM OF CRIMINALS WHO ARE ALSO THE CLASS ONE IN THE FIELD OF SCIENCE, THEIR UNCOMMON WAYS OF CRIMES, A FIGHT BY AN EQUALLY INTELLIGENT BUT VIRTUOUS MAN WHO IS WELL AWARE THAT HE IS PLAYING WITH HIS LIFE, AND THE BEAUTIFULLY WOVEN FACTS PRESENTING YET ANOTHER NOVEL FULL OF SUSPENSE, MAINTAINING THE STATUS OF THE WELL KNOWN AUTHOR ROBIN COOK. IN THE WELL KNOWN MANHATTAN GENERAL HOSPITAL AT NEW YORK, PATIENTS START DYING SUDDENLY WITH SOME UNKNOWN, UNDETECTABLE INFECTIOUS DISEASE. THE CHIEF MEDICAL OFFICER AND THE MAIN DOCTOR IN THE AUTOPSY DEPARTMENT DR. JACK STAPLETON IS BAFFLED WITH THE FINDINGS AFTER POSTMORTEM. WHAT IS THIS INFECTIOUS DISEASE? INFLUENZA? PLAGUE? TULAREMIA? ROCKY MOUNTAIN SPOTTED FEVER? WHAT IS THIS DISEASE? HOW COME THE LONG ERADICATED VIRUSES HAVE FOUND THEIR WAY AGAIN? AND THAT TOO IN THE POSH AND MODERN HOSPITAL OF NEW YORK? HAVE THESE VIRUSES OCCURRED NATURALLY OR IS SOMEONE DOING THIS INTENTIONALLY? JACK SETS HIMSELF UP ON THE TASK OF FINDING THE CULPRIT BEHIND THESE MISHAPS. NATIONAL BIOLOGICAL… FRAZER LAB, THE FROZEN ESKIMOS IN ALASKA, WHAT IS AT THE BASE OF ALL THESE? A NOVEL FULL OF DRAMATIC SITUATIONS, IT WILL MAKE YOU HELD YOUR BREATH. THIS NOVEL MAKES YOU REALIZE THAT THESE MEDICAL MISHAPS CAN TAKE PLACE ANYWHERE ALL OVER THE WORLD.
‘कन्टेजन’ ही डॉ. रॉबिन कुक यांची वैद्यकीय पाश्र्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘इंटेलिजंट’ गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठावंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी जिवाच्या करारानं घेतलेला त्याचा शोध, या पद्धतीनं गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलमध्ये कोणत्यातरी अज्ञात संसर्गजन्य रोगानं एकापाठोपाठ एक माणसं मरू लागतात. मुख्य वैद्यकीय तपासनीस ऑफिसातील गुन्हाअन्वेषण विभागातील निष्णात डॉक्टर जॅक स्टेपलटन शवविच्छेदन केल्यावर चक्रावून जातो...! हा घातक संसर्गजन्य रोग कोणता? इन्फ्ल्युएंझा?... प्लेग?... टुलरेमिया?... रॉकी माउंटन स्पॉटेड फिव्हर?... ७०-७५ वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या या रोगांचे विषाणू पुन्हा या काळात आणि तेही न्यू यॉर्कमधल्या इतक्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये? हे विषाणू नैसर्गिकपणे उद्भवले, की कोणा माथेफिरू दहशतवाद्याचं हे कृत्य? जॅक हात धुऊन या प्रकरणाच्या मागे लागतो. नॅशनल बायॉलॉजिकल्स... फ्रेझर लॅब... अलास्कातील गोठलेले एस्किमो... शेवटी काय असतं याच्या मुळाशी? अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनी श्वास रोधायला लावणारी ही कादंबरी. या वैज्ञानिक शक्यता कोणत्याही देशात, कोणत्याही काळात प्रत्यक्षात येऊ शकतील, या जाणिवेनं मनाचा थरकाप होतो, हेच डॉ. रॉबिन कुक यांचं यश आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTARANG) 26-05-2002

    वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील खळबळजनक कादंबरी... ‘कन्टेजन’ म्हणजे स्पर्शजन्य रोग. स्पर्शजन्य रोग सहजासहजी नैसर्गिकरीत्या होणं निराळं आणि स्वार्थापोटी तो मुद्दाम पसरवणं निराळं. त्यात स्वार्थापोटी काही औषधी कंपन्याही सामील असतात. हेतू असा की, त्यांच्या षधांना उठाव मिळावा. स्पर्शजन्य रोग वाऱ्यासारखा पसरतो. उग्र स्वरूप धारण करतो. परिणामी औषधांचा खप वाढतो. संबंधितांचं उखळ पांढरं होतं. आपल्याकडे काही दिवसांपूर्वी ‘हिपेटायटीस बी’ या रोगावरील प्रतिबंधक लसीसंदर्भात अशीच जोरदार जाहिरातबाजी चालली होती. अगदी मोहीमच उघडण्यात आली होती. त्यामागे अंतस्थ हेतू हाच होता. जगातील सर्वच देशात हा धुमाकूळ चालतो की नाही माहीत नाही. पण अमेरिकेत तो चालत असावा. अमेरिका सर्वच बाबतीत पुढारलेला देश आहे. तेव्हा याही क्षेत्रात तो आघाडीवर असणारच. त्या अमेरिकेमधील ही कहाणी आहे. ती थोडक्यात अशी– जॉन टेंपलटन (पुढे तो जॅक टेंपलटन म्हणून वावरतो) हा अमेरिकेतील ‘शांपान’ गावातील एक नेत्रविशारद. त्याचं तसं छान चाललेलं असतं. पत्नी आणि दोन मुलींसमवेत तो आनंदात राहत असतो. पण त्याच्या दुर्दैवाने औषधनिर्मिती क्षेत्रातील ‘अमेरिकेअर’ ही महाकाय कंपनी त्या भागात आपलं जाळं पसरते आणि बघता बघता तेथील खासगी डॉक्टरांचे व्यवसाय मोडीत काढते. सगळ्या वैद्यकीय सुविधा ती कंपनी आपल्या प्रचंड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देते. त्यामुळे खासगी डॉक्टर बेकारीच्या खाईत लोटले जातात. त्यांना आपले दवाखाने बंद करावे लागतात. जॉन टेंपलटन त्याला अपवाद कसा असणार? मग तो आपलं कार्यक्षेत्रच बदलतो. पॅथॉलॉजीमध्ये तो पाच वर्षें शिकागोमध्ये शिक्षण घेतो. त्याच्या व्यतिरिक्त शवविच्छेदनातही तो कौशल्य संपादन करतो. त्यामुळे मृत्यू नेमका कोणत्या रोगामुळे झाला याचे तो अचूक निदान करू शकतो. शिकागोला शिक्षण घेण्यासाठी तो जातो तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या समवेत राहावं असं त्याला वाटतं. पण त्याच्या पत्नीच्या नोकरीमुळे ते शक्य नसतं. ती मुलींसमवेत परत आपल्या गावी विमानाने परत जायला निघते. पण दुर्दैवाने त्या विमानाला अपघात होतो आणि जॉनची बायको आणि दोन मुली त्या अपघातात मरतात. जॉन आता कौटुंबिक पाशातून मुक्त झालेला असतो. तो आपलं संपूर्ण आयुष्य वैद्यकीय संशोधनात विशेषत: हे सांसर्गीय रोगजंतू कुठून निर्माण होतात, त्याचा प्रसार कसा होतो यावरच तो आपलं लक्ष केंद्रित करतो. Associate Medical Examiner म्हणून तो काम करू लागतो. या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची रेखा म्हणजे टेरेस हेगन. जाहिरात क्षेत्रातील ती एक बडी असामी असते. ‘विलो अँड हिथ’ या न्यू यॉर्कमधील एका बड्या जाहिरात कंपनीत ती मोठ्या हुद्द्यावर काम करीत असते. ‘नॅशनल हेल्थ’ ही दुसरी एक औषधी कंपनी असते. त्या कंपनीची जाहिरात टेरेसची कंपनी करीत असते. त्या जाहिरातीची जबाबदारी टेरेसवर असते. वैवाहिक जीवनात टेरेस दु:खीच असते. तिचं अ‍ॅबॉर्शन तर होतंच. पण त्याचबरोबर अ‍ॅबॉर्शन करताना नाइलाजास्तव तिचं गर्भाशयही काढून टाकावं लागतं. आता ती कधी आई होऊ शकणार नसते. तिच्या पतीचा तिच्यामधला रस संपतो. तो तिला सोडून जातो. हा तिला जबरदस्त मानसिक आघात करतो. त्यातून वर येण्यासाठी ती स्वत:ला आकंठ कामात बुडवून घेते. योगायोगाने तिची आणि जॉन टेंपलटनची ओळख होते. त्याच्या संशोधनातील बित्तंबातम्या ती जॉनकडून काढून घेत असते. या दोन महत्त्वाच्या पात्रांभोवती कादंबरी गुंफलेली आहे. इतरही पात्रे आहेत. पण जॉन आणि टेरेस ही पात्रे महत्त्वाची. अमेरिकेअर कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये काही लोकांचा स्पर्शजन्य रोगाने मृत्यू होतो. तोही अगदी झटपट. लागण की लगेच मृत्यू. हॉस्पिटलचे लोक हवालदिल होतात. पुन्हा ही बातमी बाहेर फुटता कामा नये. हॉस्पिटलची बदनामी होईल ही भीती. हॉस्पिटलच्या औषध पुरवठा विभागातील लोकांना त्याची लागण होऊन ते मरतात. कोणत्या जंतूंमुळे हा रोग होतो हे शोधून काढण्यात जॉन व्यग्र होतो. त्याला तो ध्यासच लागतो. शवचिकित्सेचं काम तो करू लागतो. खरं तर हॉस्पिटलमधील वरिष्ठांना त्याचं अस्तित्व त्रासदायक होऊ लागतं. कारण त्यांचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. पण तो त्यांना दाद देत नाही. त्यांच्या विरोधाला न जुमानता तो आपलं काम चालूच ठेवतो. हे काम करीत असताना एकेक रहस्याचा उलगडा होऊ लागतो. त्यात त्याच्या असं लक्षात येतं की, जंतू मुद्दाम पसरविले जात आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू होतोय. एन्फ्लुएंझा, प्लेग, ग्रॅनुलोमा, टुलरोमिया, क्षय, नोसोकॉमियल इत्यादी रोग झपाट्यानं पसरविण्यात ही एकमेकांची सख्खी भावंडेच. जॉन चक्रावून जातो. मग हे जंतू कोण पसरवीत असावं याचा तो शोध घेऊ लागतो. या शोध कामात अनेक अडथळे येतात. त्याच्यावर मारेकरी घातले जातात. पण सगळ्या अग्निदिव्यातून तो पार पडतो. शेवटी गुन्हेगार शोधून काढण्यात तो यशस्वी होतो आणि ते सापडल्यावर तो चाट पडतो. ते असतात टेरेस आणि तिचा भाऊ रिचर्ड. ते आपल्या घरातच रोगजंतू वाढवीत असतात आणि ते पार्सलने निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये कंपन्यांच्या बनावट नावाने पाठवीत असतात. त्या उद्योगात ही बहीण-भावंडं स्वत:च त्या रोगजंतूंना बळी पडतात. जॉन मात्र सहीसलामत सुटतो. इथे कादबंरी संपते. -वसंत जहागिरदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 31-03-2002

    प्राणघातक रोगजंतूंच्या फ़ैलावाची रहस्यमय कथा... न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तुंग जुळ्या इमारतीवर ११ सप्टेंबर २००१ रोजी हल्ला होऊन दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या. त्या पाठोपाठच अमेरिकेत जागोजागी अ‍ॅथ्रॅक्स या अत्यंत घातक सांसर्गिक रोगकारकजंतूचा टपालामार्फत प्रसार होण्याचे प्रकार सुरू झाले. सारेजण विलक्षण धास्तावले. प्रत्यक्षात २००१ मध्ये घडलेल्या या घटनेच्या आधीच काही वर्षे कुणा माथेफिरूने असे प्राणघातक विषाणू आणि रोगजंतू पसरवण्याचा घाट घातला तर काय भयानक परिस्थिती उदभवू शकेल याचे प्रत्ययकारी रोमांचक चित्रण डॉ. रॉबिन कुक यांनी त्यांच्या ‘कन्टेजन’ या कादंबरीत केले कन्टेजन या शब्दाचा अर्थ प्राणघातक संसर्गजन्य रोगास कारणीभूत होणारा घटक-रोगजंतू किंवा विषाणू असा आहे. स्वार्थाने आणि सूडबुद्धीने प्रेरित होऊन न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलात प्लेग, टुलारेमिया, रॉकी माउंटन स्पॉटेड फिव्हर, १९१८ सालचा तडकाफडकी बळी घेणारा घातक इन्फ्लुएंझा अशा रोगांचे जंतू आणि विषाणूंचा प्रसार करण्याचा माथेफिरू गुन्हेगारी कट त्यातून सुरू झालेले एकापाठोपाठ एक अनेक निष्पाप माणसांचे तडकाफडकी रहस्यमय मृत्यू. या मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करताना चक्रावून जाणारा बुद्धिमान, निष्ठवंत डॉ. जॅक स्टेपलटन आणि त्याने हे कटकारस्थान शोधून काढून ते हाणून पाडण्यासाठी जिवाच्या कराराने केलेले प्रयत्न याची ही चित्तथरारक, उत्कंठावर्धक कहाणी आहे. डॉ. रॉबिन कुक यांनी कादंबरीची मांडणी एखाद्या रहस्यमय गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेसारखी केली आहे. कथेच्या सुरुवातीला १२ जून १९९१ या एकाच दिवशी अमेरिकेतील तीन अगदी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या वरवर पाहता परस्परांशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या तीन घटनांचे वर्णन केले आहे. पुढच्या कादंबरीचे सारे मध्यवर्ती सूत्र या तीन घटनांच्या परिणामावरच गुंफले गेले आहे. पहिली घटना म्हणजे अलास्कातील गोठलेल्या हिमभूमीत गाडल्या गेलेल्या एस्किमोच्या झोपडीतील मृत शवांच्या फुप्फुसातून डिक नावाचा सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ सूक्ष्मजंतूंचे नमुने काढून घेतो. ही मृत शरीरे १९१८ मध्ये उद्भवलेल्या इन्फ्लुइंझाच्या रोगाने गेलेल्या एस्किमोची असून बर्फात गाडली गेल्याने टिकून राहिलेली असतात. दुसरी घटना म्हणजे शंपान या छोट्या गावी नेत्रवैद्याचा व्यवसाय करणारा डॉ. जॅक स्टेपलटन याचा व्यवसाय आरोग्यविषयक महाप्रचंड अशा अमेरिकेअर कंपनीच्या मक्तेदारीमुळे साफ बसल्याने वेगळ्याच क्षेत्रातील वैद्यकीय शिक्षणासाठी तो शिकागोला येतो. शिकागोहून त्याचा निरोप घेऊन त्याची पत्नी व दोन छोट्या मुली शंपानला परत येत असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू होतो. तिसरी घटना म्हणजे न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलात दाखल झालेल्या टेरेस हेगेन या महिलेच्या गर्भवाहक नलिकेमध्ये वाढू लागलेल्या गर्भाचे ऑपरेशन करताना तिचे गर्भाशय काढून टाकावे लागते. त्यामुळे तिला पन्हा अपत्यप्राप्ती होण्याचा मार्ग खुंटतो. १९९१ मध्ये एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांनंतर पाच वर्षे उलटून गेल्यावर १९९६ च्या मार्च महिन्यात कादंबरीतील मुख्य घटनांना सुरुवात होते. या पाच वर्षांच्या काळात जॅक स्टेपलटन याने पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो आता निष्णात कुशल पॅथॉलॉजिस्ट झालेला असतो. वैद्यकीय गुन्हा अन्वेषण विभागात संशयास्पद मृत्यू झालेल्या शवांचे विच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण व परिस्थिती शोधून काढण्याचे काम तो करीत आहे. तो काहीसा मनस्वी, सडेतोड, परखड, स्पष्ट बोलणारा, जगावेगळा वागणारा, निग्रोच्या वस्तीत राहणारा, स्वच्छंदी वागणूक असणारा, पण हाती घेतलेले काम निष्ठेने अथक श्रमाने पूर्ण करणारा माणूस आहे. कथेच्या सुरुवातीला मॅनहटन हॉस्पिटलमधून कोणत्यातरी अज्ञात घातक संसर्गजन्य रोगाने एकापाठोपाठ मरू लागलेल्या माणसांची मृत शरीरे शवविच्छेदनासाठी येऊ लागतात. त्यांच्या वैद्यकीय तपासणीतून मिळणाऱ्या निष्कर्षाने जॅक चक्रावून जातो. न्यू यॉर्कच्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हे रोगजंतू उद्भवले की कुणा माथेफिरूने हे कृत्य केले आहे, अशी शंका जॅकला येते, तो त्याचा शोध घेतो. त्यानंतर अनेक नाट्यमय घटना घडतात. जॅकवर गुंडांचे हल्ले, निग्रो गुंडांच्या दोन टोळ्यांतील समझोता, जॅकच्या मित्रांनी त्याचे प्राण वाचवणे. याची चित्तथरारक वर्णने कादंबरीत आहेत. शेवटी या साऱ्या विषाणूंचा प्रसार करणारी बहीण भावांची जोडी स्वत:च या विषाणूंना बळी पडते. जॅक वाचतो आणि शेवट सुखद होतो. एका वेगळ्या विषयावरची वेगळ्याच क्षेत्रातील गुन्हेगारीचे चित्रण करणारी ही उत्कंठावर्धक कादंबरी मांडणीमुळे वाचकांच्या मनाची पकड घेते. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजीतील नामवंत व जगप्रसिद्ध लेखकांच्या उत्तम कलाकृतींचे अनुवाद ‘टी क्लब’ योजनेतून मराठी वाचकांना सादर करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यातीलच ही एक वाचनीय कादंबरी आहे. -प्रभाकर सोवनी ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 06-01-2002

    ही डॉ. रॉबिन कुक यांची वैद्यकीय पार्श्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठिा ‘इंटेलिजंट’ गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठवंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी, जीवाच्या करारानं घेतलेा त्याचा शोध, या पद्धतीने गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more