* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983500
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 1989
  • Weight : 210.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN LIFE, MANY PEOPLE FOLLOW FAMILIAR PATHS. VERY FEW WHO MAKE A NEW PATH WITH THEIR OWN STEPS, REACH THE DESIRED PLACE! JUST A FEW....TIM SEVERIN, WHO TRAVELED SEVEN TIMES ACROSS THE SEAS LIKE SINDBAD. JANE GOODALL, WHO LIVED IN GOMBE NATIONAL PARK IN AFRICA AND RESEARCHED CHIMPANZEES.`ORIA`, WHO LIVED IN A HERD OF WILD ELEPHANTS IN TANZANIA`S LAKE MANYARA NATIONAL PARK IN AFRICA FOR FOUR TO FIVE YEARS.`KUNO STUBEN, A SOLITARY TRAVELER DETERMINED TO CROSS THE NILE.`SALIM ALI, A BIRD WATCHER WHO STUDIED BIRD LIFE FOR FIFTY YEARS. AND NATURE`S NADI `MARUTRAO CHITAMPALLI` BORN IN THE OPEN FOREST.
जीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात. स्वत:च्याच पावलांनी नव्या वाटा पाडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे अगदी थोडे! या थोड्यांमधलेच काही.... सिंदबादप्रमाणे समुद्र ओलांडून सात सफरी करणारा ‘टिम सेव्हरिन.’ आफ्रिकेतल्या गोम्बे नॅशनल पार्कमध्ये राहून चिंपांझी वानरांवर संशोधन करणारी ‘जेन गुडाल.’ उत्तर ध्रुवाकडील आर्क्टिकच्या ओसाड प्रदेशात प्रवास करणारा ‘फर्ले मोवॅट.’ आफ्रिकेतील टांझानियाच्या लेक मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जंगली हत्तींच्या कळपात चक्क चार-पाच वर्षे राहणारी ‘ओरिया.’ नाईल नदी तरून जाण्याच्या जिद्दीनं एकाकी प्रवास करणारा ‘कूनो स्टुबेन.’ पक्षिजीवनाचा पन्नास वर्षे अभ्यास करणारे पक्षिनिरीक्षक ‘सलीम अली.’ फॉरेस्ट खात्यात अधिकारी असूनही झाडांच्या सावलीत वाढलेले आणि उघड्या रानात जन्मलेले निसर्गनादी ‘मारुतराव चितमपल्ली.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarKrishna Diwate

    सुलभा प्रभुणे कोवळे दिवस, सत्तांतर, करूणाष्टके अशी अनेक पुस्तके लिहिणारे, जंगल वाटांबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांची वेगळी ओळख करुन द्यायला पाहिजे असे अजिबात नाही. कॉलजच्या त्या अधाशासारख्या वाचण्याच्या वयात माडगूळकर एकदा हातातपडल्यावर आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात कधी पडलो हे समजतच नाही. अतिशय बारकाईने केलेले निरिक्षण, प्रत्येक अनुभव अतिशय मनापासून घेतलेला, अतिशय साधी सरळ पण थेट हृदयाला हात घालणारी त्यांची भाषा, ह्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी अतिशय सुरेख आहेत. त्यांनीच लिहिलेले हे आणखी एक पुस्तक म्हणजे अशी माणसे : अशी साहसं. माडगूळकर स्वतः कायमच वेगळ्या वाटांनी चालत राहिले. त्यामुळे स्वतःच्या पावलांनी नव्या वाटा पाडणारे, कितीही कष्टदायक प्रवास असला तरी आपल्याला हवे ते मिळविण्याचा ध्यास घेतलेली माणसे हा त्यांच्या आवडीचा भाग. अशा अनेक लोकांची पुस्तके त्यांच्या संग्रहात असल्याने त्यांच्या वर वेळोवेळी लेख लिहिले. ते वाचकांना अतिशय भावले. त्यामुळे ही पुस्तके कुठे मिळतील? लेखकांबद्दल अधिक माहिती विचारणारे प्रश्न वाचक करत असत. तेव्हा श्री. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाचे संपादन करत होते. त्यांनी माडगूळकरांना अशा साहसी संशोधकांवर लेख लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार सामान्य वाचक, वन्य प्राण्यांवर प्रेम करणार्‍या, वेगळेच साहस करण्याची आवड असणार्‍यांना ओळख व्हावी म्हणून हे लेख लिहिले आहेत. ह्या पुस्तकात एकूण 8 लेख आहेत. जिम कॉर्बेट, सलीम अली, जेन गुडाल, फर्ले मोवॅट, मारूती चितमपल्ली वगैरे नावे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. पण तरीही सगळेच फक्त जंगलात हिंडणारे नाहीत. तर नाईल नदी एकट्यानेच पार करणारा कूनो स्टुबेन आहे, सिंदबादसारखा सात सफरी करणारा टिम सेव्हरिन आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचे त्यामागची कारणे वेगळी पण झपाटलेपण हे सगळ्यांमध्ये सारखॆच आहे. आपण एखादी अत्यंत अवघड गोष्ट ठरविणे आणि मग त्याचा न कंटाळा करता पाठपुरावा करणे हे सोपे नाही. ते ‘येरा गबाळ्याचे काम’ नाही. पहिला लेख टिम सेव्हरिनवरचा आहे. स्वतः आयरिश. भूगोल विषयाचा अभ्यासक, त्याने सिंदबादच्या सात सफरी वाचल्यावर ह्या गोष्टी खर्‍या आहेत का हे शोधण्यासाठी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपणही असा प्रवास करू या हे ठरविले. त्याप्रमाणे तयारीला लागला. त्यासाठी त्याने नवव्या शतकातील जहाजे कशी असत, अरबी व्यापाराचे स्वरुप काय होते हे सर्व अभ्यासायला सुरुवात केली.बरीच शोधाशोध केल्यावर त्याला सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा नकाश मिळाला. एकही खिळा ना वपरता अरबी जहाजे तयार होत असत ही माहीती मिळल्यावर तो त्याच्या शॊधासाठी ओमानला गेला. बरेच निरिक्षण केले. या मध्ये बहुधा त्याची इच्छाशक्ती फार जबर असणार त्यामुळे ओमानच्या सुलतानाने ह्या त्याच्या संपूर्ण सफरीचा खर्च करण्याची तयारी दाखवली. मग तिथंपासून ते जुन्या पध्दतीने जहाज बांधणे व ते प्रत्यक्ष पाण्यात उतरवणे हा अतिशय रोमहर्षक प्रवास पुस्तकातूनच वाचायला हवा. नंतर त्या सोहर जहाजातून पुढचा केलेला प्रवास हा खरोखरच सिंदबादच्या सफरीइतकाच विलक्षण आहे. 3 नोव्हेंबर 1980 ला निघालेले जहाज 1 जुलैला 1981 ला चीनला पोहचले. ‘द सिंदबाद व्हॉयेज’ हे प्रवासवृत्तावर लिहिलेले टिम सेव्हरिनचे पुस्तक 1982 मध्ये प्रसिध्द झाले. ते मोठ्या आकाराचे व 20 पानांचे आहे. त्याचा संक्षिप्त अनुवाद म्हणजे हा पहिला लेख आहे. त्यानंतरचा लेख चिंपाझींचा अभ्यास करून पीएच.डी मिळवलेल्या जेन गुडाल बद्दल आहे. पण तिने पुढे ह्युगो ह्या छायाचित्रकाराशी लग्न केल्यावर दोघांनी मिळून टांझानियातील गोरोंगारो इथे राहून रानकुत्री, तरस, कोल्ही यांचा अभ्यास केला. त्यावर ‘इनोसंट किलर्स’ हे पुस्तक लिहिले त्याची ओळख ह्या लेखातून करून दिली आहे. त्यांनी बरोबर आपला नऊ महिन्यांचा मुलगा नेला होता. हे वाचताना आपल्याच छातीत धडधडायला लागते. दोघांनी केलेले निरिक्षण, न कंटाळता तासनतास बारकाईने पहाण्यात घालवलेले दिवस हे वाचताना तर थक्कच व्हायला होते. इतक्या लहान मुलाला सोबत घॆऊन जंगलात राह्यचे हे सुध्दा आपल्या सारख्यांना किती कठीण वाटते मग अशा कोणत्या प्रेरणांमुळे असे साहस करावेसे वाटते हे कळत नाही. पुढचा लेख ‘हरिण पारधी’ नावाचा असून तो फर्ले मोवॅट बद्दल आहे. त्याने उत्तरध्रुवाकडील ओसाड प्रदेशात केलेला प्रवास ही एक अदभूत वाटावी अशी कथा आहे. मूळ पुस्तक 1952 मधले आहे. 1935 मध्ये फर्ले जेव्हा पंधरा वर्षांचा होता तेव्हा आपल्या काका बरोबर त्याने आर्क्टिकचा पहिला प्रवास केला होता. तेव्हा त्याने रेल्वेने जाताना अर्धामैल रुंदी असलेला आणि सुमारे तासभर संथ गतीने रेल्वे रूळ ओलांडून पलिकडे जाणारा कॅरिबू हरिणांचा कळप पाहिला. त्याची आठवण त्याच्या मनातून कधीच पुसली गेली नाही. पण त्यानंतर 1946 मध्ये सक्तीने सैनिक म्हणून महायुध्दात सामिल व्हावे लागले, त्यामध्ये भयंकर संहार पाहिल्यावर युध्द संपल्यावर आता कुठेतरी शांत ठिकाणी जावे म्हणून तो परत 1947 मध्ये अगदी जुजबी तयारी करून हडसन बे च्या किनार्‍यावरच्या चर्चील बंदरावर रेल्वेने गेला. नंतर तिथून तो बॅरन्स येथे संशोधनासाठी गेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थित तो तिथे काही काळ राहून एस्किमो लोकांचा इतिहास शिकला,त्यांची भाषा शिकला, त्यांच्या देवदेवता त्यांच्या ष्रध्दा , सुख-दुःख, त्यांच्या समस्या याबद्दल त्याने आपल्या पुस्तकात अतिशय प्रभावी वर्णन केले आहे. ते पुस्तक म्हणजे The country of the people of the deer. पुस्तकाविषयी माडगूळकरांनी अतिशय रसाळ भाषेत, प्रेमाने लिहिले आहे. खरंतर यावर आपण ही ते मूळ पुस्तकच वाचलं पाहिजे अगदीच शक्य नसेल तर निदान व्यंकटेश माडगूळकारांनी सविस्तरपणे करून दिलेला हा परिचय तरी वाचलाच पाहिजे. ह्याच फर्ले मोवॅट बद्दल अजून दोन दिवसांनी आपण परत वाचणार आहोत. ‘हत्तींच्या कळपात’ ह्या लेखात ओरिया या विलक्षण तरूणीची कहाणी आहे. ती आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या कळपात चार-पाच वर्षे राहिली. टांझानियातील मन्यारा नॅशनल पार्कमध्ये जिथे 450 हत्ती, सिंह, मस्तवाल रानरेडे, म्हशी होत्या विषारी सर्प होते अशा ठिकाणी राहिली तिथेच जोडीदार मिळाला, ती आईही झाली. ह्या सगळ्या जगावेगळ्या अनुभवांचे चित्रण तिने आपल्या वाचकांसाठी केले आहे. तिचे अनुभव वाचता वाचताना आपल्या तोंडाचा विस्फारलेला ‘आ’ खरोखरच मिटत नाही. कशी ही जगावेगळी माणसे असतील!! दोन तीन महिन्याच्या लहान बाळाला पाठीला बांधून हिंडणारी, अनेक प्राणी सहजपणे पाळणारी, हत्तींबद्दल अतिशय प्रेम असणारी, त्यांच्यांशी मैत्री करणारी अशी तिची विलक्षण रुपे म्हणजे थक्क करणारी आहेत. हे जोडपे तिथे पाच वर्षे हत्ती सोबत राहिले. हत्तींचा सखॊल अभ्यास केला, शंभरहून अधिक हत्तींशी मैत्री केली. अनेक चित्तथरारक अनुभवांना सामोरे गेले. वाचताना तो थरार आपल्याला केवळ शब्दांतून ही जाणवतो. जिम कॉर्बेट् या धाडशी शिकार्‍यावर माडगूळकरांनी लिहिलेला लेख तर अप्रतिम आहे. जिम कॉर्बेट् च्या पुस्तकातून म्हणजे मॅन इटर्स ऑफ कुमाऊं, मॅन इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, माय इंडीया अशा अनेक पुस्तकातून आपल्याला त्याचा परिचय तर झालेला आहेच. जिम कॉर्बेट् हा निष्णात शिकारी असूनही सहृदय होता. शेवटपर्यंत तो एकटाच राहिला, तो कधीच पोशाखी बनला नाही, तो अक्षरशः आदिवासींसारखेच आयुष्य जगला. अतिशय काटक असलेला जिम निरिक्षण करण्यात निष्णात होता, तो जंगलात असताना कोणत्याही डबक्यातील पाणी न शंका बाळगता पीत असे. लेखक म्हणून जागतिक कीर्ती मिळवून दिलेली त्याची पुस्तके त्याने केवळ स्मरणावर लिहिली आहेत. त्याने कधीच त्याच्यासाठी डायरी ठेवून त्याच्या नोंदी केल्या नाहीत. आपल्या हयातीत त्याने एकूण पंचेचाळीस नरभक्षक वाघ मारल्याची नोंद आहे. कुमाऊ आणि गढवाल इथल्य़ा लाखो लोकांची त्याने मरणाच्या भयानक भीतीपासून सुटका केली. पण असे असले तरी जंगलाला आग लावणे, पाण्यावर बसून शिकार करणे, कारण नसताना जनावर मारणे या गोष्टीचा त्याला अतिशय राग होता. तो शिकारी असला तरीही निसर्गाचा समतोल बिघडणार नाही इतकीच शिकार करणारा, नियम पाळणारा शिकारी होता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा ठिकाणी तो जंगलावर व्याख्याने देत असे. त्यामध्ये तो जंगलातील जनावरे कोणता आवाज काढून एकमेकांशी बोलतात, वाघ उठला की पाखरं कसे इशारे देतात ह्याचे प्रात्यक्षिक तो दाखवे. वाघ झाडाझुडूपात दिसेनासा होताना त्याचे आवाज कसे बदलत जातात हे तो दाखवत असे. पण व्याख्यानाच्या शॆवटी वने, आणि त्यातील जीव यांचा संभाळ करणे आपल्या सगळ्याच्या हिताचे आहे हे तो आवर्जून सांगत असे. तराईतील प्राण्यांची, पक्ष्यांची छायाचित्रे त्याने काढली आहेत. तोंडाने आवाज काढून वाघाला जवळ बोलावायचे विलक्षण कसब त्याच्याकडॆ होते. 1955 मध्ये प्रसिध्द झालेले ‘ट्री टॉप्स’ हे त्याचे शेवटचे पुस्तक. पुस्तकाच्या शेवटी पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि मारूती चितमपल्ली यांच्या वरचे दोन छोटे लेख आहेत. सगळेच लेख आपल्याला भारावून टाकणारे. कोणत्या मूशीतून अशी माणसे जन्माला येत असतील. अशी कोणती प्रेरणा असेल की ज्यामुळे ती असे आपल्या दृष्टीने वेडे साहस करायला धजत असतात, आपल्या सारख्यांना हे कळणं ही कठीण आहे आणि जरी कळले तरी आपली रोजची रुळलेली वाट सोडून आपण अशा अनवट वाटांवर जायला तयार तरी होऊ का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात नक्कीच तयार होतात हीच त्या पुस्तकाची ताकद आहे असे मला वाटते. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    आशी माणसं : अशीसाहसं लेखक व्यंकटेश माडगुळकर सिध्दहस्त लेखक.14 साहसवीरांच्या कथा बारकाव्या सकट त्यांच्या खास शैलीत,उत्क्रुष्ट व वाचनीय !

  • Rating StarGirish Waingankar

    व्यंकटेश माडगुळकर यांचे अशी माणसं :अशी साहसं हे पुस्तक नुकतंच हातावेगळे केले. माडगुळकर त्यांच्या कथा संग्रह, ललित लेखन, कादंबऱ्या, चित्रपट नाटक अश्या विपुल लेखनाद्वारे आपल्याला परिचित आहेतच. मात्र त्यांनी निसर्गात ही खूप भटकंती केली आहे. निसर्ग भ्रंती, चित्रे रेखाटने करणे हे त्यांचे विशेष छंद होते v निसर्गाशी एकरूप झाल्याने त्यांच्या सर्वच लिखाणाला एक वैयक्तिक अनुभूतीचा स्पर्श झाल्याचे त्यांच्या पुस्तकातून वाचकाला सतत जाणवते. या पुस्तकात त्यांनी वेगळ्याच वाटा धुंडाळून असीम साहसी जीवनानुभव अनुभवणाऱ्या निसर्गप्रेमींचे कथन केले आहे. त्यात समुद्रावर स्वार होणारा टीम Saverin, आफ्रिकेत तरस आणि चिंपांझी वर संशोधन करणारी Jane Gudal, arctic expedition करणारा Farley Movat, wild elephants सोबत राहणारी Oriya, Nile river cross करणारा Kuno Stuben, संपूर्ण आयुष्य जंगलासाठी वेचणारा जिम कॉर्बेट, पक्षी तज्ञ सलीम अली आणि वृक्षमित्र मारुती चितमपल्ली यांच्या अप्रतिम शब्द रेखाटनाने हे पुस्तक खूप वाचनीय झाले आहे एक नितांत सुंदर अनुभव जरूर वाचा... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more