* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANGANGA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661330
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR LAST SEVEN DECADES, THE SOUL RESIDED IN THIS PARTICULAR BODY WHICH WAS NOW EXTREMELY TIRED. HOW LONG IT COULD BE USED SUCH? HOW LONG CAN ONE STAY IN PARENTAL HOUSE? THIS BODY WAS BESTOWED WITH THE PRIME FUNCTION OF RELEASING THE SOUL. THERE WAS NO LUST TOWARDS THE BODY, RATHER A FEELING OF TOTAL RETIREMENT COMBINED WITH EAGERNESS TO GET DISSOLVED WITH ‘THE ULTIMATE’. THE MELODIOUS TANPURA WAS ACCOMPANYING BEGUM. SHE WAS SINGING: ‘NAIHAR CHHUTO JAI’… AS I LEAVE MY PARENTAL HOME. APART FROM THE BRIGHT WHITE LIGHT THE EYES COULD NOT SENSE ANYTHING ELSE. OH, THERE IS A BLUE LAKE AS WELL. AND WHAT IS IT AT ITS FAR END? A SNOW-COVERED MOUNTAIN PEAK. THE VERY TALL PEAK…KANCHANGANGA. FOR THE FIRST TIME IN HER LIFE, MAI COULD SEE VALUKESHWAR DEEP IN MEDITATION. OH, SO THIS DISPASSION HAD A MEANING AFTER ALL? IT ENABLED HER TO VIEW HIM THUS. ANJANI’S LIFE REACHED THE FLOW OF THE GANGA. HER PATH WAS LINED WITH KACHNAR FLOWERS. ANJANI HAD BECOME AS HOLY AS THE GANGA NOW. NOW THERE WAS NOTHING BUT ‘NADBRAHMA’ THE SOUND OF GOD…
गेली सात तपं...हा आत्मा या शरीरात वस्ती करुन होता. हे शरीर...आता थकलं होतं. ते किती वर्षं वापरायचं? नैहर झालं, म्हणून काय झालं?ज्या आत्म्याच्या उध्दारासाठी म्हणून हे शरीर लाभलं होतं, त्या शरीराची आता आसक्ती नव्हती, तर निवृत्ती होती. त्या भव्य सुरात आपला सूर मिळवण्याची आतुरता! तंबोरा झंकारत होता. बेगमचा आवाज कानांवर पडत होता. नैहर छुटो जाय... आता...मिटलेल्या डोळ्यांसमोर फक्त पांढराशुभ्र प्रकाश दिसत होता. एक निळं सरोवर...आणि त्या पलीकडलं हिमालयाचं बर्फाच्छादित शिखरही... एक उत्तुंग शिखर...कांचनगंगा! त्या शिखरावर ध्यानस्थ झालेला वालुकेश्वर माईला आज प्रथमच स्पष्ट दिसला. तो नजरेसा दिसावा, म्हणूनच तर होतं हे वैराग्य! कांचनाच्या पायघड्यांवरुन चालणारं, अंजनीचं जीवन पार गंगेच्या प्रवाहापाशी पोचलं होतं. गंगेइकंच् पवित्र, विशाल. अंजनी स्वतच बनली होती कांचनगंगा! जिथं..फक्त. नादब्रम्ह झंकारत होतं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarSmita Kawale

    Interesting read!

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-05

    एक वाचनीय चरित्रात्मक कादंबरी... माधवी देसाई यांची ‘कांचनगंगा’ ही चरित्रात्मक कादंबरी! गोमंतकन्या अंजनीबाई मालपेकर, हिरबाई पेडणेकर आणि सुरंगा मुळगावकर अशा तीन तेजस्वी स्त्रियांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी जितकी मनोरंजक तितकीच माहितीपूर्णही आहे. यातीन तेजस्विनींचे अप्रकाशित जीवन या कादंबरीने प्रकाशात आणले, हा या कादंबरीचा उल्लेखनीय विशेष! मराठी नाट्यवाङ्मयात स्त्री नाटककरांची आजही वानवाच आहे. अशा क्षेत्रात हिराबाई पेडणेकर या ‘महाराष्ट्रातील पहिली नाटक लेखिका’ म्हणून ओळखल्या जाणे अपूर्वाईचे आहे. त्यांच्या घरी होणाऱ्या साहित्यचर्चा, मोठमोठे नाटककार, लेखक यांचे येणे-जाणे याबद्दल अंजनीबाई आणि सुरंगा या आपल्या मैत्रिणीजवळ हिराबाई बोलत असतानाच, त्यामागे असलेली पुरुषीदृष्टी हिराबार्इंना अस्वस्थ करून सोडणारी आहे. ते आपल्या घरी कशासाठी येतात हे हिराबार्इंना चांगलं ठावूक असतं. या संबंधी त्या आपल्या मैत्रिणींजवळ म्हणतात- ‘त्या सर्वांना हवा असतो माझा सहवास. त्यांना माझ्या सौंदर्याचं वेड आहे म्हणून माझ्या घरी नट येतात, लेखक येतात. त्यांच्या पदांना मी चाली लावते. पण ते खरं नाही. मला त्यांचे हेतू समजतात.’ (पाठ नं. १२१) हिराबाई पेडणेकरांच्या या उद्गारातून तत्कालीन विदुषीकडे पुरुष कोणत्या दृष्टीने बघत यावर विदारक प्रकाश पडतो. कलावंत स्त्रीकडे येणार पुरुष केवळ कलेच्या वेडानं येतात असं नाही. त्यांनी केलेली स्तुती, त्यांचं गोड वागणं हे बरेचदा खोटं खोटं असतं. हिराबार्इंसारख्या विदुषीला हे खोटेपण कळत नाही असं नाही. तरीही आपल्याला हे सारं आवडतं कारण याचीही एक नशा असते. ‘कुणा एकावर आपण मनापासून प्रेम करावं, त्यानं आपल्याला फसवावं अशावेळी आधार देण्यासाठी तिसराच कुणी यावा, आपल्या भावूक अवस्थेचा त्यानंही फायदा घ्यावा आणि मग त्याचीच नशा चढत जाते...’ हे यावर हिराबार्इंचं उत्तर. स्त्रीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं. त्याला तडा जाता कामा नये. हिराबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी फार समंजस. त्या हिराबार्इंना समजवतात. आपलं चारित्र्य जपायला सांगतात. ‘हिरा, बाईचं खरं सौंदर्य कशात असेल तर ते तिच्या चारित्र्यात. ते चारित्र्य भंगलं की सारं संपलं. आपण कलावंत घरच्या मुली! आपण वयात येण्यापूर्वीच साऱ्याचं लक्ष आपल्यावर असतं.’ हिराबार्इंची मैत्रीण अंजनी मालपेकर हिच्या या उद्गारातून साऱ्या स्त्रीजातीच्या वाट्याला आलेल्या भागावर किती विदारक प्रकाश पडला आहे. अंजनीबाई मालपेकर ही एक श्रेष्ठ गायिका! भेंडीबाजार घराण्याचे अतिथी नजीरखां यांची अंजनी ही पट्टशिष्या. अंजनी अठरा वर्षांची असतानाच गाण्याची बैठक करू लागली होती. लावणी ठुमरी, गझल, दादारा हे सारं तयारीनं गाणारी अंजनी शास्त्रीय संगीतातही तरबेज होती. शास्त्रीय संगीताचा दळदार आवाज तिने तयार केला होता. उर्दू, हिंदी, संस्कृत, गुजराती, मराठी साऱ्या भाषा ती शिकली होती. मिशनरी शाळेत तिने शिक्षण घेतलं होतं. गोहरजान, चुन्ना, वैष्णवसंप्रदाय या सर्वांच्या गायकीचा तिने अभ्यास केलाय. उच्चार, भाव, शब्दफेक, ताल, लय यात ती तरबेज आहे. कलावंताला आसनाचा मान असायला हवा हा तिचा हट्ट! आजवर कुण्याही स्त्री कलावंतानं हा हट्ट केला नाही. रात्रभर अदा करून, उभ्याने ठुमरी, दादरा कव्वाली पेश करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या बैठकी अन् लोडाला टेकून त्यांना वाहवा देणारे श्रीमंत श्रोते या परंपरेविरुद्ध आवाज उठवणारी अंजनी ही पहिली कलावंत! अन् राष्ट्रपतींच्या हातून पहिली नाट्य आणि संगीताची फेलोशिप प्रदापन केली गेली, अशी श्रेष्ठ गायिका! ‘बॉम्बे म्युझिकल सोसायटी’ या एका नव्या संस्थेचा मुंबईत शुभारंभ करणारी अशी श्रेष्ठ गायिका आणि सरतेशेवटी अगदी तृप्त मनाने तिने घेतलेला गानसंन्यास! अंजनी मालपेकरांची या कादंबरीतली व्यक्तिरेखा अशी चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान साकारली आहे. या कादंबरीतील तिसरी तेजस्विनी आहे सुरंगा मुळगावकर. राजा रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्ररेणा! हिरा, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्रेरणा! हिर, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्माच्या चित्रामधील सीता, शकुंतला, उर्वशी, दमयंती, पार्वती या सर्वामध्ये हुबेहूब उतरली ती सुरंगाच! राजाजींची पत्नी माहेरी राहते. कारण त्यांच्या प्रदेशात लग्न झालं की पुरुषानं पत्नीच्या घरी राहायला जायचं ही पद्धत. पण राजाजींना ती मान्य नाही. ते आपल्याच घरी राहतात. चित्रकलेच्या निमित्तानं अनेक स्त्रियांशी त्यांचा संबंध आलेला. त्यातही राजा रविवर्मा अन् सुरंगा यांच्यातले संबंध म्हणजे रेशीमबंधच! सुरंगामुळे राजाजींच्या कुंचल्यात एक वेगळीच जादू आलेली. अन् राजाजींच्या प्रेमानं सुरंगाचं झालेलं कृतकृत्य जीवन. सुरंगा राजाजींच्या प्रेमाबद्दल म्हणते, ‘त्यांनी मला कोणतीही जहागिरी दिलेली नाही. पण माझं प्रेम अजरामर केलं. या सुरंगाला त्यांनी केव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं? यापेक्षा आणखीन काही सुंदर असेल?’ सुरंगाच्या या उद्गारात राजाजींच्या प्रेमाबद्दल किती कृतज्ञता भरून राहिली आहे. हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर आणि सुरंगा मुळगावकर या तीन बाल मैत्रिणींच्या जीवनावरची ही कादंबरी! नवीवाडीमधील गोयंकारांचं जीवन, त्यांचे जगण्याचे संकेत या तीन मैत्रिणींचा असीम त्याग, त्यांचा संघर्ष या साऱ्यांचं मनोहारी चित्रण या कादंबरीतून आले आहे. या तिघींनाही एकमेकींच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. हिरा पेडणेकर अंजनीच्या गाण्याबद्दल म्हणते, ‘आज तू मोठी गायिका म्हणून नावलौकिक मिळवलास.’ सुरंगाबद्दल म्हणते, ‘आमचं’ हे नाजूक सुरंगीचं फूल राजाजींसारख्या कलावंताच्या हाती सुखरूप आहे. अंजनी हिराबद्दल म्हणते, ‘आपणा तिघीत खरी विदुषी तूच आहेस. आजवर कुणी बाईमाणसानं नाटक लिहिलंय्?’ कविता केल्या आहेत तुझ्यासारख्या? की गाण्याला चाली दिल्या आहेत?’ या तिघीही अशा एकमेकींच्या सुखदु:खात समरस झाल्या आहेत. ह्या कादंबरीचे कथाबीज लेखिकेच्या मनात कसे पडले? लेखिकेला या तिघींच्या जीवनावर कादंबरी का लिहावीशी वाटली? तर रणजित देसाई यांची ‘राजा रविवर्मा’ ही कादंबरी लेखिकेच्या वाचनात आल्यावर या कादंबरीची नायिका सुरंगा हिने लेखिकेच्या मनात घर केले. पुढे केव्हा तरी म्हापसा गोवा इथे अंजनीबाई मालपेकर संगीत सम्मेलन आविष्कार या संस्थेतर्फे अंजनीबार्इंवर बोलण्याचं निमंत्रण माधवी देसार्इंना आलेले. त्या निमित्ताने अंजनी मालपेकरांच्या जीवनाचा त्यांनी घेतलेला शोध. अन् मग अंजनी, हिरा आणि सुरंगा या तिघीही बालमैत्रिणी असल्याचा लेखिकेला लागलेला शोध. नवीवाडी, गिरगाव इथं वाढलेल्या, गोमंतकात जन्मलेल्या या तीन बालमैत्रिणी, त्यांचं मूकजीवन शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवण्याची लेखिकेच्या मनात निर्माण झालेली आकांक्षा अन् या आकांक्षेतून मूर्त रूपात साकारलेली ‘कांचनगंगा’ ही माधवी देसार्इंची कादंबरी! सुरंगाचं विषप्राशन, हिराबार्इंचा विजनवास आणि अंजनीचा गानसंन्यास या तीन घटनांची साखळी म्हणजे कांचनगंगा! या तीन बालमैत्रिणींच्या जीवनकहाणीत लेखिकेने काल्पनिकतेचे रंग भरताना अलंकारिक भाषेचा केलेला वापर, बरेच ठिकाणी पाल्हाळीकपणे केलेली वर्णनं यामुळे ही कादंबरी काहीशी पसरट आणि कृत्रिम व्याज झालेली असली तरी या तीन विदुषींचे अपरिचित जीवन या कादंबरीने वाचकांसमोर आणले हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 03-06-2001

    गानतपस्विनीच्या जीवनावरील लोभस कादंबरी... माधवी देसाई यांचं ‘कांचनगंगा’ हे तेरावं पुस्तक आहे. अंजनीबाई मालपेकर या सुप्रसिद्ध गायिकेच्या जीवनावर ही कादंबरी आधारलेली आहे. महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका हिराबाई पेडणेकर आणि ‘राजा रविवर्मा’ या महान अशाहिंदुस्थानी चित्रकाराची प्रेरणा असलेल्या सुरंगा मुळगावकर या अंजनीबार्इंच्या मैत्रिणींची आयुष्यंही लेखिकेने जोडून घेतली आहेत. अंजनीबाईसारख्या गोमंतक कन्येविषयी, तिच्या गानतपस्येविषयी, आणि तत्कालीन समाजाविषयी, परंपरेविरुद्ध केलेल्या संघर्षाविषयी आणि जपलेल्या मूल्यांविषयी लेखिकेने मोठ्या आस्थेनं लिहिलं आहे असं लक्षात येतं. गोमंतकात जन्म घेतलेल्या, छत्तीस वर्षे संगीत साधना केलेल्या आणि थोर गायक-कलावंत असलेल्या अशा अंजनीबाईच्या लावण्याविषयी कादंबरीत अनेकदा उल्लेख आलेले आहेत. “मोत्यासारखे स्वच्छ सूर, त्या सुरांना असणारी एक मुलायम किनार, प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार, अर्थाप्रमाणे चेहऱ्यावर उमटणारे भाव, अत्यंत शालीन वर्तन आणि डाळिंबी रंगाच्या इंदोरी साडीमधून उठून दिसणारं त्या गायिकेचं लावण्य पाहून सारेजण भारावून गेले होते.” असे लेखिका सहज लिहून जाते. अशा स्वर्गीय सौंदर्याची धनीण असलेल्या अंजनीबार्इंनी आपल्या गुरू नाजिरखाँकडे जाहीर बैठकीपूर्वी एक अट स्पष्टपणे घातली होती : “मी उभं राहून गाणार नाही. कलावंत एक स्त्री म्हणून तिनं उभ्यानं गायचं ही कुठली परंपरा? मला हा फरक मान्य नाही.” आश्चर्य म्हणजे, त्रिभुवन शेटजींकडे होणाऱ्या पाहिल्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या वेळी चिंतामण शास्त्रींनीसुद्धा स्पष्टपणे सांगितले, “मित्रहो, या आसनावर आजची गायिका बसणार आहे. हा मान आपण सर्वजण तिला देणार आहो. आजवर आपण हे कधी केलं नाही. आपण टेकून बसत होता आणि कलावती स्त्री रात्रभर उभी राहून गाताना ऐकत होता. हा एक फार मोठा उपमर्द आपल्या हातून होत होता. कलाकार कलेचा उपासक असतो. त्याने खडतर तपश्चर्या केलेली असते. सभागृहात येणाऱ्या अतिथी कलाकाराला आपण प्रथम आसन देणं उचित नव्हे का?” खाँ साहेब, पं. भातखंडे, त्रिभुवनशेठ आनंदले व अंजनीबार्इंना आसनाचा मान लाभला. परंपरेविरुद्ध बंड केल्याचा हा परिणाम होता. अंजनीबार्इंना धनाढ्य माणसांकडून, राजेरजवाड्यांकडून आमंत्रणे येऊ लागली तेव्हा आईनं जबाबदारीची जाणीव देऊन म्हटलं होतं, “बाय, आजवर तू या घरात सुखरूप होतीस. पिलाला पंख फुटले की, ते आभाळात प्रथम झेप घेतं, तो एकच क्षण काळजीचा असतो. नंतर मात्र त्याला आपोआपच समजायला लागतं की, आभाळाभर भरारी मारूनही घरट्यांत सुखरूप कसं परतावं आणि त्याच्या पंखांत आपोआपच उडण्याची शक्तीही येते.” अंजनीबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी तेवढ्या कणखर निघाल्या नाहीत. हिरा पेडणेकरच्या कविता कुठे कुठे छापून येत होत्या. तिच्या सौंदर्यानं लोभावून नट, लेखक, नाटककार येत पण त्यांच्या मनातले हेतू स्वच्छ नव्हते हे तिला उशिरा कळले. एका विद्ध हरिणीसारखी ती जगली. दुसरी मैत्रीण सुरंगा रविवर्म्याच्या चित्रांतून साकारली गेली तरी लोकांच्या टीकेला ती बळी पडली. विष प्राशन करून तिनं पुढं मृत्यूलाच कवटाळलं. हे दोन्ही प्रसंग आणि त्यातून कलावंत मनाची होणारी तगमग लेखिकेनं यथार्थपणे मांडली आहे. अंजनीबाईला वसनजी वेद या धनिकाचा आश्रय लाभतो. त्याच्याशी विवाह होऊन ती एका मुलाची आई बनते आणि गाण्याच्या बैठकीतून तिला अमाप असं यश पदरी पडते. तरीही प्रापंचिक आसक्तीतून ती विरक्त होत जाते. तिच्यावर केडगावच्या नारायण महाराजांच्या विचारांचा पगडा बसू लागतो. काही काळ ती नवऱ्यापासूनही दुरावते. नवरा कर्जबाजारी झाल्यावर त्याला धंद्यात उभं करण्यासाठी भांडवल गोळा करते, परंतु काही दिवसांतच नवऱ्याच्या मृत्यूनं ती पार कोसळते. उरलंसुरलं अवसानही गळून पडतं. हे कथानक अतिशय ओघवत्या शैलीतून मांडण्यात आलं आहे. अंजनीबार्इंचं व्यक्तिमत्त्व केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर वाचनानं, अनुभवानं, चिंतनानं परिपक्व झालेलं असं दर्शविलं आहे. नेपाळ ते कन्याकुमारीपर्यंतचा सारा भारत त्यांनी आपल्या स्वर्गीय गायकीनं जिंकला. चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान अशा गोमंतक कन्येच्या रूपात माधवी देसाई यांनी अंजनीबार्इंचं कादंबरीतून रेखाटलेलं चित्र मोठं विलोभनीय झालं आहे. एका गान-तपिस्विनीवर लिहिलेली ही कादंबरी मोठी वाचनीय आणि लोभस झाली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 03-06-2001

    श्रेष्ठ कलावतीची हृदयस्पर्शी जीवनगाथा-कांचनगंगा… कांचनगंगा ही माधवी देसाईची कादंबरी भेंडीबाझार घराण्याचे गायक नजिरखाँ यांची परमशिष्या गोमंतक कन्या अंजनीबाई मालपेकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अंजनीबाईनी आपल्या स्वर्गीय गायकीने सारा भारत जिंकला. त्याच्या जाण्यामुळे कला आणि सांस्कृतिक प्रांगणात फार मोठी पोकळी निर्माण झाली. अंजनीबाईच्या दोन मैत्रीणी - हिराबाई पेडणेकर महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका आणि संगीततज्ज्ञ कवयित्री आणि दुसरी सुरंगा मूळगावकर ही राजा रविवर्मा या श्रेष्ठ चित्रकाराची प्रेरणाशक्ती या तिघी गायन, लेखन, चित्र या कलाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या स्त्रिया. त्यांच्या जीवनप्रवासाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठीच लेखिकेने हे शब्दशिल्प निर्माण केले आहे. अंजनीला सौंदर्य आणि मधुर आवाज या दैवी देणग्या लाभल्या होत्या. तसेच तिचे नशीबही बलवत्तर होते. म्हणूनच नजिरखॉसारख्या संगीत शिक्षक मिळाला. त्याने बिदागीची अपेक्षा न ठेवता आपल्या संगीतज्ञानाचे पूर्ण भांडार या शिष्येच्या स्वाधीन केले. शिष्येने निष्ठेने ज्ञान आत्मसात केले. कमीत कमी स्वरात जास्तीत जास्त आशयपूर्ण फुलोरा असणारे स्वरशिल्प निर्माण करण्यात आपले कसब दाखवले. वाचनाची आवड असलेली आणि गाण्याचे वेड असलेली अंजनी, वसनजी या देखण्या, दिलदार, संगीत रसिकाची पत्नी झाली. वसनजी गिरण्यांचा मालक, उत्तम व्यापारी आणि शेअर दलाला होता. आर्थिक सुबत्ता असूनही त्याने अंजनीला गाण्याच्या बैठका घेण्यास अनुमती दिली. कारण गाणे हा तिचा श्वास आहे हे जो जाणून होता. त्याचे अंजनी आणि तिचे गाणे या दोन्हीवर अकृत्रिम प्रेम होते. अंजनी स्वतंत्र बंगलीत छानदार मोठ्या प्रशस्त जागेत आई-आजीसह राहूल लागली. श्रेष्ठ गायिकेचे मानमरातब तिला मिळत गेले. कीर्ती वाढली. प्रतिष्ठ उंचावली तरीही ती आपल्या जुन्या मैत्रिणींना आणि गुरूंना मुळीच विसरली नाही. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत राहिली. अनुभवातून अधिक परिपक्व होत गेली. तिची वर्गमैत्रिण सुधा जातीने ब्राह्मण केवळ आठव्या वर्षी विधवा झाली. त्यावेळी शाळेच्या फादरने आणि सेवाभावी शिक्षिका मेरीने दु:ख व्यक्त करताना जे विचार मांडले ते अंजनीच्या काळजात घर करून राहिले. तेव्हाच परंपरा हा शब्द असा काही तिच्या हृदयात रुतला की भावी आयुष्यात परंपरा तोडण्यात ती सतत पुढाकार घेत गेली. परंपरेच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करून कृती करू लागली. मैत्रिणींनादेखील तिने घातक परंपरा न मानण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांना भावनिक आधार दिला. तिघींनी व्यक्तिगत जीवनात परिस्थितीचे चटके सोसले. कलेची पूजा करताना परंपरा मोडण्याचे धाडस केले. त्यामुळे समाजाकडून विरोधाचे घाव बसले. ह्या सोसले, चारित्र्य आणि निष्ठा ही जीवनाची मूल्य बघून कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली. अशी ही तीन तेजस्वीनींच्या जीवनावरची सुंदर कादंबरी आहे. कादंबरीचे निवेदन ओघवत्या शैलीतील भावपूर्ण आहे. अंजनीची आजी कुटुंबियांची गोमंतकीय बोली तर नजिरेखा इ. ची उर्दू मुस्लीम मिश्रीत मराठी यांचा मार्मिक वापर लेखिकेने केला आहे. शास्त्रीय गायकीतले बारकावे, संदर्भ परिश्रमपूर्वक मिळवून योग्य प्रकारे वापरल्याचे जाणवते. वाचकाचे शीर्षकाला संगीताचे ज्ञान नक्कीच वाढते. मुखपृष्ठ विषयाला व शीर्षकाला साजेलसे आहे. -डॉ. विभा शहा ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more