* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BOCHAKA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667790
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`BOCHKA` IS AN AUTOBIOGRAPHICAL NOVEL THAT DEPICTS MANY LAYERS OF SOCIETY. THE STORY OF NARAYAN`S MARRIAGE (1968) TO HIS MOTHER`S DEATH (2002) IS NOT JUST ABOUT NARAYAN, BUT ALSO THE PEOPLE ASSOCIATED WITH HIM.
`बोचकं` ही आत्मकथनात्मक कादंबरी समाजातल्या अनेक पदरांचं दर्शन घडवते. नारायणचं लग्न (१९६८) ते आईचा मृत्यू (२००२) या कालावधीतील ही कथा निव्वळ नारायणची नाही. गिरगावातील फूटपाथवर भाजी विकत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणा-या व मुलांना वाढवणा-या नारायणची आई सावित्राबाई; नारायणची पत्नी उर्मिला, नारायणचे अन्य नातेवाईक, नारायणला त्याच्या समाजोपयोगी कार्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारे कार्यकर्ते; नारायणला अनेक बरेवाईट अनुभव मिळवून देणारे अन्य अशा सर्वांची ही गोष्ट आहे. ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख हे त्याहूनही मोठं आहे’ हे प्रांजळपणे मांडलेले विचार वाचकाला अंतर्मुख करतात. `गटुळं` ही रवींद्र बागडे यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी नारायणच्या जन्मापासून लग्नापर्यंतच्या जीवनप्रवासाचं वर्णन करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BOCHAKA #BOCHAKA #बोचकं #FICTION #MARATHI #RAVINDRABAGDE #रवींद्रबागडे "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 21-01-2007

    वास्तववादी कादंबरी... १९५५ ते १९६८ सालातील घटना गटुळ कादंबरीत व्यक्त केलेल्या आहेत. त्याला वाचकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्यामुळे या वर्षात ‘बोचकं’चं आत्मकथात्मक कादंबरीचं आगमन झालेलं आहे आणि यातील घटना १९६८ सालानंतरच्या आहेत रवींद्र बागडे यांनी वास्तवादी जीवन मांडलेलं आहे. मुंबई बाजारात मटका पूर्वीपासून जुगार कसा खेळला जातो. शिवाय कांतीलाल या चर्मकार मित्राला बॅले शू बनविण्याची संकल्पना देऊन कसं प्रोत्साहन देतो हे चांगले प्रासंगिक उदाहरण सुरुवातीस सांगितले आहे. नारायणच्या मुलीचा जन्म १९६९ साली झाला तेव्हा बायकोच्या बाळंतपणाचे पैसे हॉस्पिटलमध्ये देण्याकरीताही नव्हते. शिवाय बाळंतिणीला सांभाळणारंही कुणी नव्हतं. ‘यह छोटा टॉवेल कितने का है?’ ‘दो रुपये का.’ ‘एक रुपये मे नही मिलेगा क्या?’ ‘लो लो.’फेरीवाल्याने तान्हुल्यालाल पाहिले होते. नारायणने एक रुपयाचा टॉवेल घेतला. या चट्टेरीपट्टेरी टॉवेलात चिमुकलीला लपेटलं. दोघंही रस्त्याने चालू लागले. बाळ-बाळंतिणीला घेऊन जाण्याकरिता रिक्षा-टॅक्सीला पैसेसुद्धा नव्हते. ही घटना नारायणाच्या दारिद्र्याची आहेत. परंतु सामाजिक कार्याची जाण असलेल्या नारायणला शेजारापाजाऱ्यांनी कसं कसे सहकार्य केले याचे चित्रण छान रेखाटले आहे. अंधेरीच्या झोपडीत राहताना नारायणला जी मुलं झाली त्यांची नावे नामकरण विधी न करता कशी ठेवली याचे सुंदर उदाहरण प्रकट केले आहे. त्याचं दारिद्र्याचं जीवन व गुदरलेली एक एक संकटं त्याला तोंड देत देत नारायण जीवनाची कालक्रमणा कशी करत राहिला अशा समयसूचकतेचं भान लक्षात ठेवण्यासारखे आहे. कौटुंबिक प्रश्न सोडवता सोडवता कुटुंबातील कलह विशेषत: आईबरोबरचं वागणं याचं स्पष्ट चित्रण चांगलेच रेखाटले असून सावित्रीबाई बागडे या स्त्रीने म्हणजे त्यांच्या आईने किती खस्ता खाल्ल्या, ती फुटपायरीवर लहान कच्चाबच्च्यांना ठेवून, उन्हातान्हात सांभाळून, मुलांच्या अंगावर वस्त्रं नसायची, लहानाचं मोठे करता करतात. ती वयात आलेली मुलं, त्याचं लग्न एवं तिने एकट्याच्या हिमतीने रस्त्यावर राहून कसं केलं हे विविध घटनांद्वारे ‘बोचकं’त मांडलेलं आहे. नवरा तर दारूडा होता. हा दारूडा नवरा तिला वारंवार त्रास द्यायचा. तरी ती भाजी विक्रीतले पैसे साठवून झोपडं विकत घ्यायची, तिथं राहायची, संसार कशी करायची हे आदर्श उदाहरण कादंबरीत रेखाटलेलं आहे. सावित्रीबार्इंची जी व्यक्तिरेखा दर्शवली आहे ती खरोखर वाचकांना विचार करायला लावणारी आहे. कारण दु:ख दारिद्र्यात, फूटपाथवर राहून चर्मकार स्त्रीने सात मुलांना कसे सांभाळले व तिचाच एक मुलगा नारायण कसा कार्यकर्ता व प्रसिद्ध लेखक झाला याचे जिवंत चित्रण आढळत आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख त्याहूनही मोठं आहे’ म्हणजे माझ्याकडून दुसऱ्याची काही सेवा होणार आहे का ही सद्भावना लेखकाने प्रकट केलेली आहे. हे सांगत असताना नारायणने आईच्या मृत्यूनंतर या बोचक्याची गाठ बांधलेली आहे. बोचक्यात आईचं कारुण्यरुदन व्यक्त केलेले असून ‘मदत इंडिया’तली आई, शामची आई, चार्ली चॅप्लीनची आई... तशीदेखील अस्पृश्य असलेली, दारिद्र्यतली आई, फुटपाथवर जगणारी, सात कच्च्याबच्च्यांना रस्त्यावर चिमणचारा घालणारी आई, दारूड्या नवऱ्याला कंटाळलेली, परंतु तराजूच्या एका काट्यात बोचकं असलेली तर दुसऱ्या बाजूला धैर्याचं वजन ठेवलेली आहे.’’ अशा प्रकारचं कारुण्यरुदन रवींद्र बागडे यांनी ३ जानेवारी रोजी गिरगावच्या बनाम हॉल लेनमधील, द्वारकादास मॅन्शनमधील भाजी मार्केटात मांडले. या पुस्तकाचे विमोचन जनाबाई प्रवीण बागडे या धाकट्या सुनेने, भाजीवालीने केले. याचे चित्रण ई टीव्हीने त्याच रात्री प्रसारित केले. मराठी साहित्य विश्वातील ‘बोचकं’ प्रकाशनचा अभिनव प्रयोग होता. -दत्तात्रय टोणपे ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 07-01-2007

    फुटपाथवरच्या कुटुंबाची व्यथा आणि कथा... मुंबईतली लाखो कुटुंबे अत्यंत घाणेरड्या झोपडपट्ट्यात राहतात. त्यातल्या हजारो गरीब कुटुंबांना अशी झोपडीही मिळत नाही. पोटाची खळगी भरायसाठी या महानगरीचा आश्रय घेतलेली अशी कुटुंबे या शहरातल्या रस्त्यावर, फुटपायरीवर संसार मांडतात. त्यांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाहीत. भर पावसात रात्र न् रात्र आपल्या कच्च्या बच्च्यांसह भिजत चिंबत काढावी लागते. रोजचे काम न मिळाल्यास उपासमारही सोसावी लागते. कुठेही स्थिरता नाही, डोक्यावर छप्पर नाही, आणि राहायचे ठिकाण नक्की नाही, अशा अक्षरश: निर्वासित असलेल्या एका चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या रवींद्र बागडे यांनी फुटपायरीवर संसार करणाऱ्या मुंबईतल्या गरीब कुटुंबाची व्यथा आणि कथा अत्यंत भेदकपणे ‘बोचकं’ या आत्मकथापर कादंबरीत यथार्थपणे सांगितली आहे. ‘बोचकं’ या कादंबरीचा नायक नारायण म्हणजे स्वत:च बागडेच आहेत. त्यांनी कादंबरीसाठी हे नाव घेतले आहे. फुटपायरीवर राहणारी सावित्रीबाई आपल्या सात मुलांचा काबडकष्ट करून सांभाळ करते. त्यांचे संगोपन करते, नवरा दारुडा, तो तिला मारहाणही करतो. पण आपल्या मुलांकडे पाहत ती जिद्दीने दिवस ढकलते. ही अत्यंत गरीब माता अत्यंत स्वाभिमानी होती. ती आपल्या नातेवाईकांकडे कधीही आश्रयाला गेली नाही. गरिबीला ती कंटाळली नाही. भाजी विक्रीचा व्यवसाय करत तिने आपल्या सातही मुलांना वाढवले, शिकवले आणि त्यांचे संसार मार्गाला लावले. आपल्या मुलांच्या लग्नासाठी या जिद्दी माऊलीने स्वत:च खर्च केला. नंतरच्या काळात तिने एक झोपडी विकत घेतली. पण आपल्या मुलाला संसार थाटता यावा, यासाठी ती वीस हजार रुपयांना विकून ते पैसे मुलाला देण्याचे दातृत्वही तिच्याकडे होते. पुन्हा ती फुटपायरीवर आली. तिच्या मोठ्या मुलाने भाड्याची खोली घेतली. नंतर फ्लॅट घेतला, पण ही स्वाभिमानी आई आपल्या मुलाकडे शेवटपर्यंत राहायला गेली नाही. नवरा मरण पावल्यावर थकली तरीही भायखळ्याला भाजी विक्रीचा व्यवसाय करीत राहिली. आपला भार तिने मुलावर टाकला नाही. शेवटी ती मरण पावली आणि मुलांचे मायेचे छत्रही नाहीसे झाले. या सावित्रीबाईचा सारा संसार एका बोचक्यात होता. तिचे बोचके तिच्याबरोबर गेले. चांगले संस्कार तिने घडवल्यामुळे मुलेही शिकली. आईने आपल्यासाठी काढलेल्या खस्ता विसरली नाहीत. ती सुखी झाली, पण त्यांचा संसार बोचक्यात राहिला नाही. त्यांना हक्काचे छप्पर मिळाले. सावित्रीबाईचा बोचक्याचा संसार मुलांच्या वाट्याला आला नाही. लेखकाने बोचके हे शीर्षक आपल्या कादंबरीला दिले, ते अत्यंत यथार्थ आहे. आपण फुटपायरीवर वाढलो. फुटपायरीवरच शिकलो, पण आपल्या पेक्षाही जास्ती दु:खी कुटुंबे आहेत, याचे भान लेखकाला आहे. माझं दु:ख हे जगाचं आहे, पण जगाचं दु:ख त्यापेक्षाही मोठं आहे. असं तो म्हणतो. एका साध्या सरळ गरीब माणसाची ही जीवनकहाणी मानवी जीवनातल्या दु:खानी व्यापली आहे. आपल्या भावंडांचा संसार सुखाचा व्हावा, त्याला चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी तो प्रयत्न करतो. एक भाऊ दारुच्या व्यसनाधीन होतो आणि बेवारशासारखा रस्त्यावरच मरून पडतो. मुलगा आकाश शिकतो, प्रेम विवाह करतो, पण अकाली आत्महत्या करतो. मुलगी नीलकमल बी. डी. एस. होते. ती दातांचा दवाखाना मुंबईत सुरु करते. लेखकाला त्याच्या पहिली साहित्यकृतीसाठी अनेक पुरस्कार मिळतात. राष्ट्रपतींचे आमंत्रण येते. अनेक समारंभाला तो उपस्थित राहतो. लौकिक अर्थाने त्याला सुख मिळते, पण पुत्र निधनाची दु:खाची झालरही त्या सुखाला आहे. पत्नीच्या पहिल्या बाळंतपणाठी नारायणकडे पन्नास रुपयेही नसतात. तो ही ते सरकारी कार्यालयातल्या आपल्या महिला सहकाऱ्याकडून उसने घेतो. मुलगा गेल्यावर विम्याचे आलेले दीड लाख रुपये त्याला व्यक्तिगत सुखासाठी नकोसे वाटतात. हे दु:ख विसरण्यासाठी तो या पैशाचा वापर जेजुरी येथे आकाशच्या नावे स्मृतिकेंद्र सुरु करायसाठी करतो. धारावीच्या झोपडपट्टीत तेथील लोकांना संघटित करून सुधारणाही घडवून आणतो. नारायणचे मन हळवे आणि संवेदनशील आहे. त्यामुळेच दु:खाचा तो बाऊ करीत नाहीत्र. आपल्यापेक्षाही दु:खी लोक आहेत, याची जाणीव त्याला सदैव आहे. आपली आई गेल्यावर तो म्हणतो, ‘जिने आयुष्यात नुसतेच काबाडकष्ट केले. नवऱ्याचा जाच सहन केला, मुलांचा संसार थाटून दिला. त्यांना मुलंबाळं झाली, त्यांचा संसार तोंड भरून पाहिला, दारिद्र्याची तमा तिने कधीच बाळगली नाही. अगदी मर्दासारखे तिने कष्ट केले. हाल सोसले, नातवंडं परतुंडाची तोंड तिने पाहिली. मुलांना चांगली वर्तणूक शिकवली. त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं. लोभ, मोह माया, मत्सर, द्वेष या पंच दोषांना स्वीकारून तिने या पंचमहाभूतात राहायला शिकवले. भाजीचं गठुळं विक्रीसाठी डोक्यावर घेवून वणवण फिरणारी आणि संसाराच्या ओझ्याच्या बोचक्यानं बदलेली भारतीय बहिष्कृत श्रमिकांची ही इंडियन मदर संसारातून मुक्त झाली होती. नारायणच्या दु:खाच्या काळात त्याला मदत करणाऱ्यांची त्याला सदैव जाणीव आहे. जगात थोरांची संख्या कमी असली तरी त्या परोपकारी सदाचारी लोकांच्यामुळं सहाशे कोटीचं हे जग चाललं आहे, असं लेखक जाणीवपूर्वक म्हणतो. बोचकंही बागडे यांची आत्ममथात्मक कादंबरी उपेक्षित आणि निराधार कुटुंबांच्या होरपळीचे, ससेहोलपटीचे यथार्थ दर्शन घडवते. कादंबरीची भाषा कुठेही आर्वाच्य झालेली नाही. सत्य कथन करताना आपल्याला सहानुभूती मिळावी, असाही हेतू लेखकाने ठेवलेला नाही. आपले दु:ख उगाळून त्याला मोठेपणाही मिळवायचा नाही, तळागाळातल्या समाजाचे दु:ख त्यांनी या कादंबरीद्वारे वाचकांसमोर मांडले आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

  • Rating StarLALIT MASIK, APRIL 2007

    मराठीत अलीकडे ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ असा कादंबरी लेखन प्रकार अस्तित्वात येऊ लागला आहे. आनंद यादव यांनी हा शब्दप्रयोग केला असून त्यांच्या ‘झोंबी’ला अखेरीला या प्रकारचे विश्लेषण करणारी विस्तृत प्रस्तावना त्यांनी जोडली आहे. त्यापूर्वी लेखक आपल्या वैय्तिक जीवनातील अनुभवांची मांडणी कादंबरीलेखनात करीत असत पण हे लेखन ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ आहे असा दावा मात्र करीत नसत. श्री. रवींद्र बागडे यांनी ‘गटुळं’ही ‘आत्मकथात्मक कादंबरी लिहिली; वाचकांना ती आवडली. म्हणून तिचा पुढील भागाचे चित्रण त्यांनी ‘बोचकं’ या त्याच प्रकारच्या कादंबरीत केले आहे. ‘आत्मकथे’चं कादंबरीत रूपांतर करण्यामुळे काही नावे बदलेली आहेत. काही तशीच मूळ नावे ठेवलेली आहेत. सर्व घटना सत्य स्वरूपातील असून त्यामध्ये कुणाचाही अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही. दीनदलित समाजातील कौटुंबिक अवस्था व त्यातून निर्माण होणाऱ्या घरगुती समस्या आणि समस्येच निराकरण करणारा सावित्रीबाईचा थोरला मुलगा नारायण व त्याला असणारी समाजकार्याची आवडत यात हे कथानक गुंफलेलं आहे’ असे ‘गटुळं’ नंतरच्या ‘बोचक’ या कादंबरीसंबंधी प्रस्तावनेत श्री. रवींद्र बागडे यांनी लिहिले आहे. साधारणपणे नायक नारायण याचा ऊर्मिलेशी विवाह होतो इथपासून त्याची सावित्रीबाई वार्ध्यक्याने अर्धांगवात होऊन शेवटी मरण पावते. इथपर्यंतच्या घटनाचं चित्रण त्यात आढळते. म्हणजे १९६८ ते २००२ या कालंखंडातील घटना कादंबरीत येतात. सात मुलं आणि दारूड्या नवरा नवरा यांचा संसार भाजी विकून सावित्रीबाई करते आणि त्यात तिला तिचा थोरला मुलगा नारायण आणि त्याची पत्नी ऊर्मिला साथ करतात. या कुटुंबाचे आणि नारायण व त्याचा एक भाऊ नामदेव सोडल्यास इतरांचे राहणे तसे झोपडपट्टीतील आहे. गिरगाव, अंधेरी (गुंदवली), बोरीवली, धारावी इथल्या झोपडपट्टी जीवनाचे गेल्या ३५-४० वर्षांतील घटनांचे व आणीबाणीकाळातील स्थित्यंतराचे व त्यातही नारायणने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चित्रण लेखकाने केले आहे. नारायण आयकर खात्यात नोकरीला, पत्नी उर्मिला प्रथम ठाणे जिल्ह्यातील उचाट गावी, नंतर डोंबविलीजवळच्या देसाई गावी शिक्षिका; पुढे माधुरीबेन शहा यांच्या कृपेने मुंबई नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करून नारायणला संसारात मदत करते. नारायण ऊर्मिलेच्या संसारकहाणीला भिन्न भिन्न पदर आहेत. नारायणने आईवडील न भांवडे यांच्यासाठी काही ना काही करत राहणे, ज्येष्ठ मुलगा – कर्ता पुरुष म्हणून भावंडांवरील प्रेमापोटी सुखदु:खात सहभागी होणे, नव्हे प्रतिकूल काळातही त्यांना साथ करणे हे महत्त्वाचे ठरते. ऊर्मिलेचीही त्याला संमती असायची. त्यामुळे भावंडाचे आजार, व्यसने, लग्न आणि काहीचे झालेले मृत्यू या सर्व प्रसंगी नारायण-उर्मिलेची धडपड लक्षात येते. नामदेव-निमा-अश्विनी, लक्ष्मण-सुषमा, बाळू-शांता, काळू-निम्मी असे हे विवाह होताना नारायणला जबाबदारी घ्यावी लागली. यात आप्तांचे मृत्यूही चितारण्यात आले आहेत. वडिलांचा मृत्यू, ऊर्मिलेच्या आईचा मृत्यू, असे मृत्यू आणि त्यामुळे लेखनाला कारुण्याची झालर प्राप्त झालेली. त्यातही हातातोंडाशी आलेला मुलगा एल.आय.सीत नोकरीला लागलेला आकाश आपल्या पसंतीने लग्न करतो. पुढे घटस्फोट होतो आणि आकाश झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करतो. पण हे दु:खही नारायणने पचविले. आपल्या वाचनाने त्याना जी समज आली त्यातून उर्मिलेलाही त्याने सावरले. त्यावर कडी म्हणजे त्यांनी आकाशच्या पॉलिसीतून जेजुरीला ‘स्मृतिमंदिरे’ बांधले. नारायणच्या आयुष्यातही साळवीसाहेब, उमेश ढग्या, अण्णा, विनायक परब, खाडिलकरबाई, तोडणकरबाई, मालन यांच्यासारखे सहाय्यकर व सुहृद आले. किंबहुना नारायण आणि ऊर्मिला यांचे सुखद सहजीवन हा या लेखनाचा आल्हाददायक भाग आहे. उचाट गावी राहत असताना ऊर्मिला आगीने भाजणे, शिक्षिका म्हणून काम करीत असताना प्रवासात तावडे मास्तरांनी ठेवण्यासाठी दिलेली वस्तू दारूची बाटली निघणे, प्रवासात एका काँग्रेस कार्यकर्त्यांचा खून होताना पाहण्याची वेळ येणे या अनपेक्षित घटला घडताना दिसतात. पुढे ऊर्मिलाचे ऑपरेशन आणि आजारपण आणि त्यात उमेश ढग्याने केलेली साथ मोलाची ठरलेली. लहानपणी ज्या भोसलेमास्तरांनी तिला सांभाळले त्यांच्या मृत्यूने ती व्यथित होणे स्वाभाविक वाटते. नारायणने तिला आपल्याबरोबर वैष्णदेवीला नेणे, गंमत म्हणून तिला एकदा ऑरेंजमधून होडका प्यायला लावणे यातून त्यांच्यातील परस्पर प्रेम दिसून येते. नाही म्हटले तरी नारायणच्या आयुष्यात २/३ दिवस येऊन गेलेली बसंती प्रकरण व त्यात त्याचे वागणे – पत्नीचा धाक व तिच्यावरील प्रेम – दोन्ही दाखवणारे आहे. ऊर्मिलेच्या नोकरीमुळे आणि नारायणच्या लुद्रीक मित्राच्या ओळखीने त्यांना बोरिवलीत प्रशस्त फ्लॅट मिळतो आणि ती दोघं आपल्या आकाश आणि नीलकमल या मुलांना शिकवतात. नीलकमल तर बीडीएस होते व स्वत:च निवडलेल्या मुलाशी लग्न करून सुखाने संसार करते. अशा प्रतिकूल परिस्थितीत ऊर्मिलेच्या साहाय्याने नारायणचे आयुष्य व्यतीत होते असताना त्याच्यात समाजकार्याची ऊर्मी जागी होते नि धारावी, गोंदवली व बोरिवली येथील झोपडपट्ट्यांमधून तो स्वच्छता मोहिमांचे कार्यक्रम राबवतो, त्याकरिता अधिकारी, मंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहितो व त्याचा परिणाम म्हणून नारायणचा ‘नारायणराव’ होतो. ‘नवाकाळ’चे नीळकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत तो जाऊन पोहोचतो. राजकारण त्याला खुणावतं, पण तो स्वत:ची आवड ओळखून त्याला नकार देतो. दलितमित्र शंकरराव अडसूळ यांचा त्याना मिळालेला सहवास त्याला मोलाचा वाटतो. उलट नामदेवने घेतलेल्या फ्लॅटमध्ये तो राहायला गेल्यावर ‘तू भावाची जागा बळकावायला आलास का?’ असे आप्त विचारतात तेव्हा ऊर्मिलाने आपली खोली सोडून जाऊ नये म्हणून दिलेला सल्ला आपण नाकारला याचे त्याला दु:ख होते. कांतीलाल पवार या मित्राला त्याने केलेली मदत, राजेश खन्नाचे चरित्रलेखन करण्याचा केलेला विचार व त्याचा कटू अनुभव आल्यावर तो तसाच सोडून देणे हे जसे त्याने मोकळेपणाने लिहिले आहे तसेच नामांतर चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सुरू केलेली चळवळ जवळून पाहूनही त्यासंबंधी इथे फारसे लेखन नाही. राजीव गांधी, फक्रुद्दिन अली अहमद यांना त्याने पाठवलेली पत्रं व त्यांची त्याला आलेली उत्तर, हिंदी निबंध स्पर्धेत त्याला मिळालेलं पारितोषिक, गुजराथचा भूकंप आणि त्यावर त्यानं लिहिलेलं ‘विश्वकाव्य’, ‘नवाकाळ’मधलं त्याचं लेखन असे लेखनासंबंधीचे उल्लेख आढळतात आणि आईच्या मृत्यूपूर्वी त्याच्या भावंडांनी त्यांनी लिहिलेली ‘गटुळं’ ही कादंबरी तिला दाखवत ‘दादानं ही लिहिलीय’ असे सांगण्याचा केलेला प्रयत्न यातून त्याच्या लेखनाचे उल्लेख येतात. प्रारंभीचे पारश्याच्या हॉटेलमधलं मित्रमंडळ, दोन गटातील मारामारी, बाळूनं भय्याला पोटात सुऱ्याने भोसकणं, मित्राबरोबर दारू पिणं हॉटेलात खाणं, ब्लू फिल्म पाहणं याचे उल्लेख त्याच्या व्यक्तिमत्त्वातील पारदर्शकपणा दाखवणारे आहेत. गायकवाड नावाच्या एका कुटुंबाने अन्नासाठी व अस्तित्वासाठी खिश्चन झाल्याची घटना नोंदवण्यात आली आहे. नारायण-ऊर्मिला-आकाश-नीलकमल हे पहिलं, नारायणचे आईवडिल, भावंडं, नातेवाईक हे दुसरं, कार्यकर्ता म्हणून नारायणचे स्नेहीसोबती व इतर हे तिसरं, तर नीळकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे, लताबाई मंगेशकर यांचया काही काळ संपर्कात येणं हे चौथं अशा वेगवेगळ्या परिघावरील नारायण-ऊर्मिलाचं सहजीवन चित्रण हा ‘बोचक’चा लक्षणीय विशेष आहे. मुंबईतील झोपडपट्टी, झोपडपट्टीवासीयांचे जीवन, त्यांचे जगण्याचे प्रश्न, त्यांची सुखं नि दु:ख यांचं ‘बोचकं’ मध्ये साक्षात दर्शन आढळते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 01-04-2007

    अखंड संघर्षाच्या अनुभवाचं ‘बोचकं’... रवींद्र बागडे यांची ‘बोचक’ ही दुसरी आत्मचत्रिात्मक कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ‘गुटलं’ ही प्रस्तुत लेखकाची पहिली आत्मचरित्रात्मक कादंबरी. एका स्त्रीने गिरगावातील फूटपायारीवर एका बाकड्यावर भाीविक्रीचा धंदा करीत आपल्या मुलांना कसे घडविले याची कथा या कादंबरीत होती. ‘बोचकं’ हा ‘गटुलं’चा पुढचा भाग. या स्त्रीच्या - सावित्राबार्इंच्या मोठ्या मुलाच्या नारायणाच्या लग्नापासून ते सावित्राबार्इंच्या मृत्यूदरम्यानचा कालखंड या कादंबरीत आहे. मुलांना भाजीविक्रीच्या बाकड्यावर, फूटपायरीवर जागा नाही म्हणून शाळेत पाठवायचं इतकी बिकट परिस्थिती असलेलं कुटुंब. भारतातील आर्थिक व्यवहाराचं केंद्र म्हणून ज्या मुंबईचा उदोउदो होतो, त्या मुंबईतील अत्यंत मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या गिरगावमध्ये एक अख्खं कुटुंब या पद्धतीने फूटपायरीवर राहून जगलं ही आश्चर्यकारक व विदारक वस्तुस्थिती! पण या पद्धतीने संघर्ष करून शिक्षण घेतल्यावर सरकारी नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर सुखवस्तू जीवन न जगता वेगवेगळ्या उपनगरातील तळागाळातील दीनदलित लोकांसाठी आणि झोपडपट्ट्यांच्या सुधारासाठी नारायणने म्हणजे कादंबरीच्या नायकाने काम केले. धारावी येथील उत्कर्षनगर वस्तीसाठी रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतागृहे इ. अत्यावश्यक नागरी सुविधा मिळविण्यासाठी नारायणने उभी केलेली संघटनाशक्ती व केलेला अविरत संघर्ष यामुळे ही वस्ती अक्षरश: दलदलीतून वर आली. याचप्रमाणे अंधेरी येथील गुंदवली गावठाण येथील नाल्यात पडून अपमृत्यू झालेल्या एका सहा वर्षांच्या बालिकेच्या जागी नारायणला जणू स्वत:ची तेवढ्याच वयाची मुलगी दिसते आणि मग या गावठाणाची प्रगती सुरू होते सुधारणेकडे! अशा रितीने मुंबईतल्या उपनगरात विविध ठिकाणी निरपेक्षपणे कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडून न घेता, केवळ सामाजिक बांधिलकीच्याच जाणिवेने नारायणने केलेल्या कार्याची कथा उलगडत जाते. नारायणाच्या सर्व भावंडांची आईने स्वत:च्या हिमतीवर लग्ने करून त्यांचे संसार कस उभे केले, त्यांना मार्गी कसे लावले आणि त्यानंतरही आराम न करता शेवटच्या क्षणापर्यंत ती स्वत:च्या कमाईवरच कशी जगत राहिली, याचे चित्रणही या कादंबरीत आले आहे. या कादंबरीचे एक सामथ्र्यस्थान म्हणजे निवेदनाचा शांत सूर होय. सामान्यत: दलित साहित्यामध्ये जो एक आक्रोश, आक्रंदन असते आणि कधीकधी ते आक्रस्ताळे होण्याची भीती असते त्याचा लवलेशही या कादंबरीत नाही. खरं तर काल्पनिकता आणि वास्तव यांची सरमिसळ हे कादंबरी या प्रकारचे वैशिष्ट्य. पण ‘बोचकं’ या कादंबरीत वास्तविक काल्पनिक एकही प्रसंग नाही की पात्र नाही. खरं तर ते आत्मकथनच म्हणायला हवे. पण स्वत:चे अनुभव स्वत:च न सांगता, तृतीय पुरुषी निवेदकाच्या माध्यमातून ते उलगडत गेल्याने एक प्रकारची तटस्थता त्यातील अनुभवकथनाला मिळाली आहे. निवेदनाचा शांत सूर हो या तटस्थेतूनच निर्माण झाला असावा. सामान्यत: स्वत:च्या गतजीवनातील प्रत्येक कृतीचे समर्थन करणे लेखक टाळू शकला आहे ते अशा रीतीने आत्मकथनला कादंबरीच्या स्वरूपात संक्रमित केल्यामुळेच होय, असं वाटत राहते. स्वत:च्या चुका, काही गमतीशीर घटनाही त्यामुळे त्याने मोकळेपणाने मांडल्या आहेत. साधी, सरळ, अनलंकृत भाषा ही या बादंबरीचं दुसरं वैशिष्ट्य. शब्दांचा फुलोरा किंवा वर्णनाच्या ओघात वाहत जाणं टाळलेलं आहे. मात्र काही ठिकाणी आवश्यक तिथे भाषा वर्णनपरही झाली आहे. उदा. घरासमोरील तळ्यातील कमळांचे दृश्य पाहून नारायणला मुलीचे नाव ‘नीलकमल’ कसे ठेवावेसे वाटते. तो प्रसंग तसेच शेवटच्या आईच्या निधनाचा प्रसंग अशा प्रसंगांमध्ये भाषा भाववाही झाली आहे. पहिल्या कादंबरीची ‘गुटलं’ची भाषा काहीशी गिरगाव परिसरातील भजीविके, फूटपाथवरील माणसं याची मुसलमानी हिंदीचा प्रभाव असलेली बोली भाषा आहे. पण या कादंबरीत मात्र प्रमाणभाषेचाच वापर आहे. दारू, गुत्ते, जुगार, मटका, टपरी, गुंडांचे अड्डे यांचे काही ओझरते प्रसंग ‘बोचक’मध्ये येतात. त्यामुळे मटकावाले, जुगारवाले यांची जी विशिष्ट परिभाषा, पारिभाषिक शब्द यांचाही अनोखा परिचय जाता जाता सहजच झाला आहे. स्वत:कडे असणारी चांगली मूल्ये, सामाजिक बांधिलकीचा विचार, दुसऱ्यासाठी कार्य करत राहण्याची सद्भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे हीच लेखनामागची मुख्य प्रेरणा आहे. त्यामुळे साहित्यगुण वा रचनासौष्ठवाचा अभाव जरी या कादंबरीत असला तरी सशक्त मूल्यविचारांचा आशयामध्ये असणारा प्रभाव हे या कादंबरीचे बलस्थान ठरलं आहे. ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख हे त्याहूनही मोठं आहे.’ ‘अतिसामान्य ते सामान्य होतात व दुसऱ्यासाठी जीवन जगायला शिकतात तीच मोठी माणसं असतात आणि सहाशे कोटींचं हे जग मोठ्या माणसांवरच चाललेलं आहे,’ हे नारायणचे जीवनसूत्र आहे. नारायणच्या आई म्हणजे स्वत:च्या दलितत्वापलिकडे जाऊन परिस्थितीशी झुंजणारी भारतातील कोणत्याही गोरगरीब श्रमिकांची ‘मदर इंडिया’ होती आणि या आईचा वारसा घेऊन जात, धर्म, लिंग, पंथ, राजकारण यापेक्षाही ‘माणूस’ आणि त्याचं भलं यासाठी झटणाऱ्या नारायणच्या पोतडीत जे विविधरंगी विविध प्रकारचे अनुभव निर्माण झाले त्यांचं हे ‘बोचकं’ आहे. -नीलांबरी कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more