कौशिक लेले मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोहोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ...Read more