डॉ. शरद जाधव एम.डी.(मेडिसीन) ठाणे *मेळघाटच्या अख्ख्या जीवनाचा ठसा मनावर उमटवणारे पुस्तक `कुलामामाच्या देशात`*
वानखडे साहेबांचे अनुभव आणि देशमुखांचे कथन घेऊन निघालेले कुलामामा मेळघाटातून सह्याद्रीत पोहोचलेच. हा एक उत्तम ,अस्सल साहित्याचा ठेवा आहे..
वर्तमानपत्रात मेळघाटाील बातम्या म्हणजे भूकबळी, आदिवासी, वाघाने घेतलेले आणि वाघांचे बळी याबद्दल मनात एक पुसट चित्र तयार झाले होते. वेळोवेळी मेळघाटच्या सौंदर्याचे वाचलेले बहारदार वर्णन उत्सुकता वाढवत होतेच.
खरे सांगायचे तर पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्यासारख्या मंडळींनी सह्याद्रीला ओलांडून कधी परशुरामाचा कोकण नीट पाहिलं नाही. ऊसशेती, भाज्या, फळे पिकविणाऱ्या देशावराच्या मंडळीना डोंगर, समुद्र, भातशेती, आंबा, काजू, पोफळी, मासेमारी करणारे कोळीबांधव यांच्या जीवनाविषयी फार जुजबी माहिती, तीही साहित्य आणि टीव्ही या माध्यमातून होते. खरे तर, कोकण बघण्यासाठी लहान गावात किंवा वाडीत राहायला पाहिजे. केवळ सहल करून खरा अनुभव येईल असे वाटत नाही. आदिम मानव आणि निसर्ग यांच्याजवळ जाण्याची ना वृत्ती ना संधी असे वाटत असताना हे पुस्तक हाती आले.
भारत वाघसाठी ओळखला जातो. जंगल वाघ, शिकार, सफारी एवढ्यापुरतच मर्यादित आहे काय?
दुर्बिणीतून वाघ बघणे आणि छायाचित्र
टिपणे आणि त्यात कृतकृत्य होणे म्हणजे गुलहौशीपणा असे वाटायला लागले.
भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली वाचलेली माणूस आणि निसर्गाची माहिती वाचतांना तिथली माणसे आणि जीवन कसे असेल याची केवळ कल्पना मनात होती.
आज या पुस्तकाने ते बंद दार किलकीले केले आणि मेळघाट चा एक कवडसा आत आला आहे.
कथनाच्या मध्यस्थानी असलेल्या कुलामामाचाच नव्हे तर मेळघाटच्या अख्ख्या जीवनाचा ठसा मनावर उमटला.
आठवण झाली ती माडगूळकरांच्या माणदेशी माणसांची आणि मालगुडी डेज ची. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या हलाखीच्या दिवसात मुंबई सकाळ मध्ये आठवड्याला एक माणदेशी माणूस उभा केला आणि पुढे त्याची पुस्तक झाली. त्यातील प्रत्येक माणूस अस्सल होता. देशमुख वानखेडे
यांच्या बाबतीत असेच घडले असावे. मला तर वानखडे साहेबांच्या कारमध्ये आपण सुद्धा मागच्या सीटवर बसून ऐकतो आहोत असे पुस्तक वाचताना वाटले. मेळघाट म्हणजे केवळ आदिवासी, केवळ निसर्ग सौंदर्य केवळ वाघ आणि त्याच्या कथा नसून
मनुष्य, निसर्ग, जीवन, माणसाच्या भावना, कल्पना, श्रद्धा, अंधश्रद्धा सर्वांचा एक रंगपट उभा राहिला. कधी मेळघाटात यायचे भाग्य लाभले तर या पुस्तकातील प्रत्येक माणूस, प्रत्येक जागा हुडकण्याचा माझे मन प्रयत्न करेल. फॉरेस्ट खात्याच्या खाकी वर्दीतील माणसाच्या आत एक एक संवेदनशील साहित्यिक, रसिक, जीवनाकडे तटस्थ पण हसऱ्या वृत्तीने बघणारा माणूस दिसतो.
मी सोलापूरकर. वऱ्हाडात रमलेल्या चींत्तमपल्ली यांच्या गावचा, त्यांच्याच शाळेत आणि कॉलेज मध्ये शिक्षण घेतले हे बिरूद मिरविणारा. मारोतराव साहित्यात निसर्ग, जंगल घेऊन आले आणि अख्खा महाराष्ट्र विदर्भात जाण्याची स्वप्ने बघू लागला. असे वाटते की मारोतराव जर विदर्भाचे गदिमा असतील तर देशमुख-वानखडे व्यंकटेश असावेत.
...Read more
डॉ. तेजपाल अग्रवाल, कोल्हापूर चन्या (म्हणजे अमरावतीचे सुप्रसिद्ध डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी) कुलामामाच्या देशात या पुस्तकाबद्दल तू केलेलं सविस्तर परीक्षण त्या पुस्तकाची केलेली स्तुती मीना, शरद यांचे अभिप्राय व सर्वमान्य लेखिका डॉ. किरण पाटणकर, सोलापूर हिचे रसाळ रसग्रहण ह्यामुळे हे पु्तक घ्यायचं ठरवलं. कोल्हापुरातील मेहता पब्लिसिंग मध्ये जाऊन पुस्तक खरेदी केले. कींमत २०० रुपये, सवलतीची कींमत १७० रुपये. आल्या आल्या लेखक जी.बी.देशमुख यांचा परिचय, शेवटच्या आतील पानावर असलेला रविंद्र वानखडे वनाधिकारी यांची ओळख नि त्यानंतर शेवटचं पान वाचल्यावर लेखक जी.बी. देशमुखांचे हितगुज वाचून चन्याला व्हाट्सपवर कळवलं. त्यानंतर पहिली कथा झटक्यात वाचून काढली.
एखाद्याला आवडीचं अन्न मिळावं , ते चवदार व्हावं, अशावेळी ते अन्न आधाशाप्रमाणे खाऊन संपवावं वाटत नाही ! तसंच काहीसं हे पुस्तक वाचताना झालं. मुळात मला जंगलाची आवड , त्यात हे अतिशय सुंदर पुस्तक. जे पहिली कथा वाचल्यावरच लक्षात आलं. त्यामुळे प्रत्येक कथेचा हळूहळू आनंद घेत आज हे पुस्तक वाचून झालं. एक नि एक कथा खूपच छान. एक कथा वाचली की लगेच दुसरी वाचावी असं वाटायचं पण मुद्धाम दम धरून दुसरी वाचायची. मी बरीच जंगल पालथी घातली. बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी पहाटे उठून जंगल सफारी केल्या. पण वाघ काय दिसायचा नाही.किरकोळ जंगली पक्षी, प्राणी दिसायचे पण वाघ नाही. बऱ्याच वेळा इतर प्राणीसुद्धा इतरांना दिसायचे, ते मला दाखवायला बघायचे पण मला काहीच दिसायचं नाही ! शैला वैतागायची ! पण वाघ तर कुणलाच दिसला नाही ! वाघ बघितला ते पूर्वी सर्कशीत, किंवा प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्यात, किंवा खुल्या प्राणिसंग्रहालयात एकतर सारखा फेऱ्या मारत असलेला किंवा सुस्तावून पडलेला ! पण ह्या कथा वाचताना मात्र प्रत्यक्ष वाघ बघत आहे, असं वाटायचं ! वनअधिकारी रवींद्र वानखडे यांचे निरिक्षण, जंगलावरील प्रेम, जंगलचे कायदे, वनांचे कायदे, जंगलातील प्राण्यांचे कायदे, येथील लोकांची गरिबी, जंगलावरील, तेथील प्राण्यांवरील प्रेम, प्राण्यांचे स्वभाव, हे सगळं प्रत्यक्ष दीर्घकाळ अनुभवलेलं. निस्पृहपणे, झोकुन देऊन, आनंदाने केलेली नोकरी आणि ह्या सर्वांच जी.बी.देशमुख यांनी कुठेही धक्का लागू देता केलेलं ओघवत वर्णन,फारच, फारच सुंदर. दोघांचंही कौतुक करावं तितकं थोडंच.प्रत्येकानं वाचावा असा हा जंगलातील गोष्टींचा खजिना.
...Read more