* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
KALINGAJJA , A PURE COMMON MAN, USE TO WORKSHIP HIS COW WHOLEHEARTEDLY. ON THE OTHER HAND, AMERICA RETURNED NATU USE TO THINK OF HIS COW, AS ONLY MILK AND MEAT GIVING DOMESTIC ANIMAL.THIS NOVEL NARRATES THE CONFLICTS BETWEEN THE VALUES, EMOTIONS AND ETHICS OF THESE CONTRAST PEOPLE. THE NOVEL STARTS WITH A SONG ON COW, TRANSLATED IN ALMOST EVERY KNOWN LANGUAGE, AND SEEKS THROUGH FINDING THE IMPORTANCE OF VALUES ROOTED DEEPLY IN INDIAN CULTURE. ARTWORKS BASED ON THIS NOVEL IN KANNAD AND “GODHULI” IN HINDI MOVIES HAVE RECEIVED ACKNOWLEDGEMENTS AT NATIONAL AND INTERNATIONAL LEVELS.EVEN TODAY, THIS NOVEL PUBLISHED IN 1968, IS COUNTED AS ONE OF THE EPIC AND INCREDIBLY NARRATED NOVEL.THIS POWERFUL AND CONVINCING NOVEL, VIGILANT THE TWO CONTRADICTIONS, LOVE AND ANGER, PREDOMINANTLY, FOR SURE!!
गाईला सर्व देवतांचं स्वरूप मानून तिची पूजा करणारा काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा त्याचा अमेरिकेतून परतलेला नातू या दोघांच्या मूल्यसंवेदनांवरील संघर्ष हा या कादंबरीचा विषय. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये प्रचलित असलेल्या गाईच्या गाण्यानं सुरू होत असलेली ही कादंबरी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन काही मूल्यांचा शोध घेताना दिसते. या कलाकृतीवर आधारलेल्या कन्नड आणि `गोधुली` या हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवले आहेत. १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला आजही काही जण `उत्कृष्ट साहित्यकृती` मानतात. प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे, हे निश्चित!
आपटे वाचन मंदिर - म.बा. जाधव पुरस्कार २०१५

Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAMANA 01-05-2016

  मूल्य संघर्ष... सर्व सजीव प्राण्यांप्रमाणेच निर्जीव वस्तूंमध्ये परमेश्वर भरून राहिला आहे असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. प्राण्यांमध्ये गाईला हिंदू मन सर्वाधिक श्रद्धेने मानते. काळेनहळ्ळी गावाचा पाटील काळिंगा याच्याकडे पुण्यकोटी या जातीच्या गाईचे मोठ खिल्लार असते. एकदा रानात चरणाऱ्या गाईवर एक तरस हल्ला करतो. काळिंगाचा मुलगा कृष्णा गाईच्या बचावासाठी तरसावर बेधडक प्रतिहल्ला करतो. तरस मरतो. पण कृष्णालाही ठार मारतो. गाईला वाचवताना मेला म्हणून काळिंगासकट अख्ख्या गावाला कृष्णाचा अभिमान वाटतो. कृष्णाचा मुलगा काळिंगा मोठा होतो. आजोबांचे नाव नातवाला ठेवण्याच्या पद्धतीमुळे त्याचे नाव काळिंगाच. तो खूप शिकतो. अमेरिकेला जाऊन शेतकी शास्त्र आणि पशुपालन शास्त्रातली मोठी पदवी मिळवतो. गावी परतताना गोरी अमेरिकन बायकोही घेऊन येतो. दोघे मिळून आधुनिक शेती आणि आधुनिक पशुपालन सुरू करतात. आणि इथेच हिंदू मूल्ये आणि पश्चिमी मूल्ये यांचा संघर्ष सुरू होतो. काळिंगाची बायको हिल्डा हिच्या पश्चिमी मूल्यांनुसार जमीन ही भूमाता नसते. तर पैसा मिळवून देणारी वस्तू असते. त्यामुळे ती धान्याची लागवड न करता तंबाखूची लागवड करते. हिल्डाच्या मते गाय ही गोमाता नसतेच, तर दूध देणारी म्हणजेच पैस देणारी सजीव यंत्रेच असतात. काळिंगाचा मित्र आणि गावचा पुजारी असलेला वेंकटरमणा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की, आम्हा हिंदूंच्या श्रद्धेनुसार गाईच्या शरीरात तेहतीस कोटी देव राहतात. हिल्डा सरळ गोठ्यात जाते आणि एका गाईला ठार मारून तिचे शरीरविच्छेदन करून देव कुठे दिसतात का पाहते. हे गावात कळल्यावर मधमाश्यांचे मोहोळच उठते. पुढे याच हिल्डाची तान्ही मुलगी दुधावाचून तळमळत असताना मल्लेशा नावा नोकर त्या बाळा सरळ गाईच्या आचळाशीच धरतो. मुलगी बचावते. ते दृश्य पाहून हिल्डा आत कुठेतरी हलते. पण आपण माणसांवर प्रेम करतो. तसे मुक्या जनावरांवरही प्रेम करायचे असते ही भावना तिला कळतच नाही. तिच्या दृष्टीने गाई या दूध देणारी यंत्रे असतात. त्यामुळे काळिंगा घरात नसताना ती भाकड गाय सरळ कसायाला विकून टाकते. काळिंगा खाटिकखान्यात जातो, पण तिथल्या शेकडो गार्इंमधून तो आपल्या गाई वेगळ्या ओळखू शकत नाही. गाई देखील त्याला ओळखून त्याच्या जवळ येत नाहीत. मग काळिंगाला जाणीव होते की, आपण गोठ्यात जाऊन गार्इंच्या पाठीवर कधी प्रेमाने हात फिरवलाच नाही. त्यांचा गळा कधी खाजवलाच नाही. त्यांना आपले प्रेम लागणारच कसे? गार्इंसाठी प्राण झोकून देणाऱ्या बापाचा पुत्र असून आपणही गाईला यंत्रच समजलो. पण मग आता मी काय करावे? ट्रॅक्टर सोडून नांगराला बैल जुंपू? मशीनच्या नळ्यांनी गाईचे दूध काढण्याच्या सोयीऐवजी हाताने दूध काढण्याचा वेळ आणि श्रम घेणारा मार्ग पत्करू? काळिंगा अशा ‘कन्फ्यूज्ड’ मन:स्थितीत असताना कादंबरी संपते. एकापरीने आज संपूर्ण देशातल्या सर्वच सुशिक्षितांची ही प्रातिनिधिक अवस्था आहे. हिंदू मूल्ये महान आहेत. पण अमेरिकन मूल्ये पैसा देतात. सुखसोयी देतात, प्रतिष्ठा देतात. मग हेही हवे नि तेही हवे अशी सर्वांचीच स्थिती आहे. डॉ. एस. एल. भैरप्पा या देशातल्या एका समर्थ आणि लोकप्रिय कादंबरीकाराच्या लेखणीतून हा विषय उतरला आहे. ...Read more

 • Rating StarAIKYA 17-01-2016

  गाईला सर्व देवतांचं स्वरूप मानून तिची पूजा करणारा काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा त्याचा अमेरिकेतून परतलेला नातू या दोघांच्या मूल्यसंवेदनांवरील संघर्ष हा या कादंबरीचा विषय. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये प्रचलित असलेलया गाईच्या गाण्यानं सुरू होत असलेली ही कादंबरी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन काही मूल्यांचा शोध घेताना दिसते. या कलाकृतीवर आधारलेल्या कन्नड आणि गोधुली या हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवले आहेत. १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला आजही काहीजण ‘उत्कृष्ट साहित्यकृती’ मानतात. प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे, हे निश्चित! ...Read more

 • Rating StarLOKSATTA 03-01-2016

  श्रद्धा, मानवी मूल्ये आणि व्यवहारवादातील संघर्ष… ‘पारखा’ हा एस. एल. भैरप्पा यांच्या ‘तब्बलियु नीनादे मगने’ या कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद. ‘तू पोरका झालास...म्हणजेच सर्व गोष्टींना पारखा झालास’ असा या शीर्षकाचा अन्वयार्थ. कादंबरीचा विषय हा गायीकडे पहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षचा आहे. १९६८ मध्ये ही मूळ कानडी कादंबरी प्रकाशित झाली आणि आता २०१५ मध्ये उमा कुलकर्णींनी ती मराठीत आणली आहे. दरम्यान जवळजवळ ५० वर्षांचा गेल्यानंतरही ती कालबाह्य झालेली नाही असेच म्हणावे लागेल. कारण आजघडीला ‘गाय’ या विषयाचे राजकारण पुनश्च ऐरणीवर आलेला आहे. नाट्यात्म उपरोधिकता हे भैरप्पांच्या कादंबऱ्यांचे मोठे वैशिष्ट्य राहिले आहे. १९६८ मधली ही कादंबरी आता मराठीत येणे हीसुद्धा एक नियतीची नाट्यत्म उपरोधिकताच म्हणता येईल. गायीमध्ये ३३ कोटी देवदेवता वास करतात असे मानून भक्तिभावाने तिची पूजा करणार काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांची ही कथा आहे. ‘पारखा’ वाचताना दोन इंग्रजी कादंबऱ्यांची आठवण होते. एक म्हणजे पर्ल बक या अमेरिकन लेखिकेची ‘द गुड अर्थ’ आणि चिनुआ अचेबे या आफ्रिकन लेखकाची इंग्रजी कादंबरी ‘थिंग्ज फॉल अपार्ट’! या तीन कादंबऱ्यांमधील साम्यस्थळे विलक्षण आहेत. पहिली जरी अमेरिकन लेखिकेची असली तरी ती चिनी जीवनाबद्दलची आहे. चीन, भारत आणि आफ्रिका या तिन्ही ठिकाणी मुळात प्राचीन कृषीसंस्कृती होती. पाश्चात्यांशी आलेला संपर्क म्हणा, किंवा भारत आणि आफ्रिका यांच्याबाबतीत केवळ संपर्कच नव्हे, तर पाश्चात्य आक्रमणामुळेही इथे यंत्रसंस्कृती आली. हे चांगलं की वाईट वगैरे सोडून देऊ. पण या संपर्कामुळे इथल्या प्राचीन संस्कृतीला मोठाच धक्का पोहोचला. तो बाह्यत: जरी भौतिक स्वरूपाचा होता तरी त्यातून या संस्कृतीच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला गेला. एक प्रकारे गाय आज राजकाराणत कळीचा मुद्दा ठरू पाहत असली तरी ही कादंबरी मात्र तिच्यावरून होणाऱ्या राजकारणासंबंधी नाही, तर ती ‘द गुड अर्थ’ व ‘थिंग्ज फॉल अपार्ट’ प्रमाणेच या सांस्कृतिक धक्क्याची कहाणी सांगते. कृषीसंस्कृतीची मूल्यं आणि यंत्रसंस्कृतीची मूल्यं फार वेगळी असतात. श्रद्धाभाव, निष्ठा, माणुसकीसाठी त्यागाची तयारी, समाधानी वृत्ती, अधिक पैशाची लालसा नसणं ही कृषीसंस्कृतीची मुख्य वैशिष्ट्यं. याउलट, यंत्रसंस्कृतीमध्ये या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. अधिकाधिक फायदा व पैसा हेच तिचे मुख्या अधिष्ठान असते. बाकी मानवी मूल्यं वगैरे गोष्टी यंत्रसंस्कृतीच्या लेखी फिजूल ठरतात. युरोपियन मिशनरी आफ्रिकेतल्या इग्बो संस्कृतीच्या मूल्यांचा नाश करतात. ‘द गुड अर्थ’मधील ओ लान ही खरीखुरी शेतकरी स्त्री आहे. कष्टाळू, मातीला आई मानणारी. तिच्या नवऱ्याच्या हातात बायकोमुळेच प्रचंड संपत्ती येते. त्याची नियत, दानत बदलते आणि तो या मातीला विसरतो. ‘पारखा’मधला काळिंगा अमेरिकेत पाश्चात्य यंत्रसंस्कृतीचा अंगीकार करतो. अमेरिकन स्त्रीशी लग्न करतो आणि तिथली मूल्यंही स्वीकारतो.भारतात परतल्यावर इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातील मूळची संस्कृती जागी होते. तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि गोमातेला पुरता पारखा झालेला असतो. या कादंबरीतली काळिंगज्जा ही गोपाल संस्कृतीची प्रतिनिधी असलेली हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आहे. या संस्कृतीत तो मुरलेला आहे. या संस्कृतीच्या बाहेरच्या व्यावहारिक गोष्टी त्याच्या आकलनापलीकडच्या आहेत. कोंडवाड्यातल्या एका गाभण गायीचा मालक तिला शोधायला येत नाही म्हटल्यावर काळिंगज्जा तिचं ‘लेकमाणसासारखी आली’ म्हणून यथासांग बाळंतपण करतो. तो मालक आपल्या गायीला शोधत आल्यावर त्याला दोन दिवसांनी यायला सांगतो, कारण ओल्या बाळंतिणीला त्याने चालवत घरी न्यायला नको. नंतरही कोवळ्या वासराला चालायला न लावता त्याला हातात घेऊन जायला काळिंगज्जा सांगतो, इतका तो हळवा आहे. आपल्या शिकलेल्या नातवाचे बोलणे त्याला समजत नाही. ‘ज्यानं घरातलं ज्ञानच समजवून घेतलेलं नाही, तो परदेशातून काय आणि किती शिकणार आहे?’ असे त्याला वाटते. त्यामुळे तो परदेशातून परत येईल की नाही; आणि आल्यावर घरात राहील की नाही, याची त्याला शाश्वती नाही. काळिंगज्जाच्या मरणाचे वर्णन म्हणजे भैरप्पांची जणू कविता आहे. त्याने यंग्टाकडे आपल्या गोठ्याची जबाबदारी सुपूर्द केली. गायींचे रोग, त्यावरची औषधे, निगा घेण्याची पद्धत वगैरे सारं त्याला सांगितलं. गायीच्या औषधाचे पैसे घेतलेस तर तुझा वंश टिकणार नाही, असेही वर बजावले. सगळी निरवानिरव केली. त्याने यंग्टाला पावा घेऊन यायला सांगितले आणि तो आपल्या गोठ्यातच झोपला. खिडकीतून चांदणं आत आलं होतं. यंग्टानं पान खाऊन गोठ्यात पावा वाजवायला सुरुवात केली. जणू कृष्णच आपला पावा बाहेर काढतो. तो आवाज ऐकताच वळू भांडण थांबवतात. त्या वातावरणात पाव्याचा स्वर एखाद्या दीपज्योतीप्रमाणे भासतो. मध्यरात्र संपून आकाशात शुक्राची चांदणी दिसेपर्यंत यंग्टा पावा वाजवत होता. ‘गोठ्यातला दिवा शांतपणे जळत होता. काळिंगज्जाही शांतपणे झोपला होता. सकाळी तो जिवंत नव्हता. रात्री झोपेतच केव्हातरी त्याचा जीव गेलेला होता. अजूनही त्याचा चेहरा पावा ऐकत असल्यासारखा दिसत होता.’ अशिक्षित काळिंगज्जाच्या मरणाच्या वर्णनातून भैरप्पा त्या प्राचीन गोपाल संस्कृतीचे सत्त्वच जणू दर्शवतात आणि भारतीय तत्त्वज्ञानातले कर्मयोगाचे एक सूत्रही प्रकट करतात. आपल्या वाट्याचे कर्म गाढ श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पितभावाने करणाऱ्या काळिंगज्जाला तत्त्वज्ञानासारखे शांत सुंदर मरण येते. पण या एका बाजूमुळे भावविवश न होता भैरप्पा तटस्थपणे दर्शवतात ही, कालगतीने या संस्कृतीचा ऱ्हास होणे अपरिहार्यच आहे. तिच्या जागी येणाऱ्या यंत्रसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार करणे पाश्चात्य जीवनशैली स्विकारून आधुनिक झालेल्या काळिंगालाही जमत नाही. तो विचार करतो, ‘‘विद्युतशक्ति, वैज्ञानिक खतं यासारख विज्ञान मलाही हवं आहे. पशुंना आजार झाले तर त्यांना बरं करणारं विज्ञान मला पाहिजे. पण ते (पशु) केवळ माणसाच्या उपयोगासाठीच आहेत असं मानणारा दृष्टिकोन मला अजिबात नकोय! आपणा भारतीयांची गोष्ट वेगळी आहे. आम्हाला ट्र्रॅक्टर पाहिजे आणि गोपूजाही पाहिजे.’’ हा या कादंबरीतल्या समस्येचा गाभा ते मांडतात. श्रद्धा आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय व्हायला हवा असे ते सुचवतात. भैरप्पा यांच्यातला कथनकार कादंबरीच्या पहिल्याच पानापासून वाचकांचे बोट धरतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते बिलकूल सोडत नाही. तीच प्रवाही शैली उमा कुलकर्णींनी या कादंबरीच्या अनुवादातही तंतोतंत राखली आहे. वाचायलाच हवी अशी ही कादंबरी आहे. ...Read more

 • Rating StarSAKAL 17-01-2016

  डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या या कादंबरीत गाईला दैवत मानणारे आजोबा आणि तिला उपयुक्त पशू मानणारा नातू कळिंगा यांच्यातला संघर्ष आहे. कळिंगा आणि गावातला पुजारी वेंकटरमण यांच्यातला वादही कसा वेगळंच रूप घेतो, तेही यातून कळतं. अखेर गाव त्याला एकटं पाडतं.

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TEEN HAJAR TAKE
TEEN HAJAR TAKE by SUDHA MURTY Rating Star
Purva

हे पुस्तक सुधा मुर्तींनी "T. J. S. George" ह्यांना अर्पण केले असून, इंग्रजी भाषेत लेखन करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त लेखनकौशल्य जागृत करून साहित्यातील विविध प्रयोग करून पाहण्यास George ह्यांनी त्यांना व अनेकांना उत्तेजन दिले हे असे त्या म्हणतात. पुस्तकातील कथा, सत्यकथा असून प्रत्येक कथा ही मनुष्य स्वभावाची सुंदर आणि घृणास्पद अशी दोन्ही रूपे उलगडत जाते."आयुष्य सन्मानाने कसं जगता येत" हे सुधा मूर्तींनी हिंमत आणि धैर्य दाखवून पारंपरिक प्रथांच्या गुलामगिरीत अजाणतेपणे अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून वास्तवात आणून त्याची जाणीव ह्या स्त्रियांना करून दिली आहे. सुधा मूर्तींनी इन्फोसिस फौंडेशनच काम करत असतानाच्या केलेल्या प्रवासात भेटलेल्या स्त्रियां,त्यांच्या कॉलेज जीवनातील अनुभव,वडिलांचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव आणि त्यांची परोपकारी वृत्ती व मार्गदर्शन,भारतीय भाज्यांचं उगम स्थान, सिनेसृष्टी संदर्भात इराण,पोलंड,क्यूबा, बहामाज, उझबेकिस्तान, आइसलँड ह्या देशांतील त्यांचे बॉलीवूडच्या चाहत्यांचे अनुभव असे सोप्पे विषय घेऊन कथा मांडल्या आहेत.. साधी, सोपी आणि प्रवाही भाषाशैली हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यांनी देवदासी समाजासाठी जे काम केलं ते वंदनीय आहे.देवदासी सारख्या निंद्य आणि घृणास्पद परंपरेतून त्यांनी 3000 स्त्रियांची मुक्तता केली.."तीन हजार टाके" म्हणजे प्रत्येक स्त्रीने गोधडीच्या नक्षीत तिचा लावलेला हात म्हणजेच एक टाका आहे असे हे तीन हजार टाके असलेली गोधडी त्या सर्व स्त्रियांनी सुधा मूर्तींना पतसंस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या सोहोळ्या दिवशी भेट म्हणून दिली आहे आणि त्या म्हणतात,"मला आजवर मिळालेली ही सर्वांत सुंदर भेट आहे...!!!" Inspiring and very beautiful book ..loved it.... Poorva....😊 ...Read more

BAAJIND
BAAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
Patel Dhirendra

Great Book must read