- Pallavi Sarode
गेल्या आठवड्यात वाचनवेडा ग्रुपवर भैरप्पांच्या ‘पारखा’पुस्तकाबद्दल वाचले. किंडल वरून पुस्तक download केले आणि दोन दिवसात पूर्ण वाचून काढले.गोपालन, गायरान, गोहत्या हे विषय खूप छान पध्दतीने मांडले आहेत.
गोडाज्जा व त्याचा परिवार यांच्या भोवती फिरणारी ही कथा आपल्या भोवती घडत आहे असे वाटते.
पुस्तक वाचून झाल्यावर समजते की पुस्तकाचे ‘पारखा’हे नाव खूपच सर्मपक आहे.
एस.एल.भैरप्पांनी लिहीलेलं आणि मराठीमध्ये उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेलं ‘पारखा’ नक्की वाचा.
- Vijay Nimbalkar
ख्रिश्चन प्रिन्सिपलच्या घरात जेवताना त्याला अवघडल्यासारखं झालं होतं. जेवणात वाढलेलं मांस नेहमीसारखं नव्हतं. त्याचा वासही वेगळा होता. त्याने ते मांस कसंबसं पोटात ढकललं.
`आम्हाला वाढलेलं मांस कशाचं होतं?` घराबाहेर पडताना त्याने बटलरला विचारलं.
बटलरचं उत्तर ऐकताच त्याला उलटी करावीशी वाटली. पोटात मळमळल्यासारखं होऊ लागलं. तो तसाच बाहेर पडला. सायकलवर दोन फर्लांग आल्यावर ती मळमळ फारच वाढली. तो सायकलवरून खाली उतरला.
`आऽक्क्..` खाली वाकून पोटाला हात लावून तो ओकारी काढायचा प्रयत्न करू लागला. पण पोटातली ती मळमळ इतक्या सहज बाहेर पडणार नव्हती.
वाघाच्या तावडीत सापडलेल्या एका गाईने `मी माझ्या उपाशी वासराला पाजून परत येते` असं वचन दिलं. गोठ्यात जाऊन वासराला पाजल्यावर इतर गायांचा सल्ला न जुमानता ती पुन्हा वाघाकडे आली. त्या सत्प्रवृत्त गाईची वचनाला जागण्याची कृती पाहून वाघाने आपला जीव दिला. ती गाय पुण्यकोटी गाय म्हणून ओळखली जाऊ लागली.
पुण्यकोटी गाईची वर्षानुवर्षे पूजा केली जावी म्हणून ज्याच्या आजोबांनी त्या गाईचं मंदिर बांधलं, त्याच गौडज्जाच्या नातवाने आज एक पाप केलं होतं. पुण्यकोटी गाईच्या वंशातल्या एका गाईचा जीव वाचवण्यासाठी ज्याच्या वडिलांनी तरसाशी लढत स्वतःचा जीव दिला होता, त्याच कृष्णेगौडाच्या मुलाने आज गोमांस खाल्लं होतं.
शेवटी ब्राह्मणाला बोलावून नदीमध्ये आंघोळ, संध्यावंदन आणि शेवटी पंचगव्य (गोदधी, गोक्षीर, गोमूत्र, गोशकृत, गोमय यांचं मिश्रण) प्राशन करून काळिंगाने प्रायश्चित्त केलं.
गायीला देवता समजून तिची पूजा करणाऱ्या समाजात, विशेषतः गाईच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवता निवास करतात असं मानणाऱ्या, सनातन वैदिक परंपरा जपणाऱ्या गौडज्ज्याच्या घरातला हा मुलगा पुढे शिकत जातो. एका बाजूला धार्मिक रूढी, परंपरा, अवैज्ञानिकता आणि अंधश्रद्धा तर दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक व व्यावहारिक दृष्टीकोण. काळिंगाचा कल विज्ञानाकडे असतो.
अमेरिकेत जाऊन `अॅग्रीकल्चर व अॅनिमल हजबंडरी` या विषयात पदवी घेतल्यावर आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी तो भारतात परततो.
प्राण्यांविषयी असलेलं भारतीय समाजाचं अज्ञान दूर करणं, प्राण्यांचा व्यवहारात उपयोग करणं, परंपरागत पध्दती डावलून आधुनिक पद्धतीने शेती करणं, तसंच भारतातील गरीबी दूर करणं असे उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेऊन काळिंगाशी लग्न केलेली अमेरीकन स्त्री हिल्डादेखील त्याच्या पाठोपाठ भारतात येते.
नातवाला `जैमिनी भारत` वाचता आलं तरी पुरे आणि मुलांना तेवढ्याच शिक्षणाची गरज आहे असं समजणाऱ्या गौडज्जाचा नातू `जैमिनी भारत` सोडून दुसरंच काहीतरी शिकून येतो.
आज्ज्याला, आज्जीला आणि आईला आपलं पटणार नाही शिवाय आपली अमेरिकन बायको त्या घरात राहू शकणार नाही म्हणून काळिंगा गायरानात फार्महाऊस बांधतो. एवढंच नाही तर गायांसाठीच आरक्षित असलेल्या त्या गायरानाची जमीन तो शेतीखाली आणतो. गाईंच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवलेल्या गायरानात शेती करणं म्हणजे पापच. शिवाय पुण्यकोटी गायीच्या मंदिराशेजारी बांधलेल्या पुष्करणीचं पाणी काळिंगा शेतासाठी वापरतो.
इथून पुढे `काय काय ऐकावं-पहावं लागेल` या भयाने काळिंगाचे आज्जा-आज्जी जगाचा निरोप घेतात.
आज्जोबा-आज्जी गेल्यानंतर मुक्या आईला न जुमानता काळिंगा सगळ्या इतर गायांबरोबर पुण्यकोटी गाईदेखील फार्महाऊसच्या गोठ्यावर नेतो.
काळिंगाचे संबंध पोलीस इन्स्पेक्टर, अंमलदारापासून अगदी वरपर्यंत असतात. शिवाय त्याच्याकडे असलेल्या बंदूकीलाही गावकरी घाबरत असतात. काळिंगाच्या धर्मबाह्य आचरणाला जाब विचारणारा एकच माणूस तिथे असतो. तो म्हणजे ब्राह्मणपुत्र, वेंकटरमणा.
वेंकटरमणा काळिंगापेक्षा तीन वर्षांनी मोठा. काळिंगाला मित्राविषयी आदर होता पण त्याचे वैदिक परंपरा व देवधर्माविषयीचे विचार त्याला पटत नव्हते. इंग्रजी बोलू शकणाऱ्या या व्यासंगी वेंकटरमणाबद्दल हिल्डालाही एक अनामिक ओढ होती. पाश्चात्य व भारतीय जीवनशैलीबाबत दोघांमध्ये वाद-विवाद होत.
एकदा दोघांतला वाद विकोपाला गेला. हिल्डाच्या मते गाय इतर प्राण्यांसारखीच एक सामान्य प्राणी आहे. प्राण्यांना मारून खाणं काही वाईट नाही. वेंकटरमणाच्या मते माणसाने प्राणी मारून खाणं म्हणजे पापच. मारीकेरेची मारम्मा या जागृत देवतेच्या पूजेसाठी केलेल्या दोनशे रेड्यांची कत्तल हिल्डाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली असते.
`तुम्ही एका बाजूला गायीला देवता मानता आणि दुसऱ्या बाजूला रेड्यांची कत्तल करता. हे कसं?` असा प्रश्न विचारल्यावर वेंकटरमणा `ती खालच्या लोकांची पूजेची पध्दत आहे!` असं स्पष्टीकरण देतो.
एकमेकांना असंस्कृत म्हणत वेंकटरमणा व हिल्डा त्या दिवशी खूप भांडतात.
गाईच्या पोटात देव नसतात हे सिद्ध करण्यासाठी हिल्डा पुढे सरसावते. जमाल नावाच्या मुसलमान नोकराला सांगून ती गोठ्यातली एक पुण्यकोटी गाय कापते. अमेरिकेत राहून गोमांस खायला सरावलेला काळिंगा त्या दुपारी हिल्डाबरोबर पुण्यकोटी गाईचे गोमांस चवीने भक्षण करतो.
काळिंगाच्या फार्मवर झालेली गोहत्या व गोमांस भक्षणाची बातमी फार्मवरील इतर नोकरांमुळे गावभर पसरते. आतापर्यंत काळिंगाला घाबरणारे गावकरीसुध्दा लाठ्या-काठ्या घेऊन फार्मवर हल्ला करायला निघतात.
- Sandeep Jadhav
एस. एल. भैरप्पा म्हटलं की हमखास एका वेगळ्या साहित्याची सफर वाचकाला होणार हे नक्की! "साक्षी" ही भैरप्पांची मी वाचलेली पहिली कादंबरी आणि त्यातील भावलेल्या विषयाच्या वेगळेपणामुळेच त्यांच्या "आवरण", "उत्तरकांड" आणि आता "पारखा" या कादंबऱ्या देखील वाचून काढल्या. प्रत्येक पुस्तक वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं. मानसिक पातळीवर वाचून ते संपतच नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. पण एक गोष्ट नक्की की कोणताही पूर्वग्रह न ठेवता, अलिप्तपणे जर त्यांचं साहित्य वाचलं तरच त्याचा वेगळेपणा वाचकाच्या मनाचा ठाव घेतो आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. "पारखा" या शब्दाचा शब्दशः अर्थ घायचा झाला तर तो एखाद्या गोष्टीला परके होणे! प्राचीन भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आणि पाश्चात्य संस्कृतीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षांची कथा म्हणजे ही कादंबरी "पारखा". १९६८ साली कानडी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा विषय आजच्या घडीला देशात गायीवरून होणारं, चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर घेऊन येतो. वाघाच्या तावडीत सापडणाऱ्या पुण्यकोटी गायीची कथा बऱ्याच लोकांना परिचयाची आहे. वाघाला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या वासरांना दूध पाजून परत खरोखरच त्याच्या पुढ्यात त्याचं भक्ष म्हणून उभी राहणारी पुण्यकोटी, सत्यवचनी गाय आणि तिच्या याच गुणामुळे प्रभावित होऊन तिला न खाता स्वतःचा प्राण त्याग करणारा वाघ अशी ती कथा! याच कथेचा वापर करून भैरप्पांनी त्यांच्या या "पारखा" चा पाया रचला आहे. या पुण्यकोटी गायीचा वंश ज्याच्या गोठयात आहे असा काळेनहळी गावचा काळींगगौडा जो गायीमध्ये ३३ कोटी देव-देवतांचा वास असतो असे मानून भक्तिभावाने गायीची पूजा करून तिचा सांभाळ करतो आणि तिला केवळ दूध - मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांच्यामधील संघर्षाची ही कथा. पाश्चात्त्य संस्कृतीचा स्वीकार केल्यानंतर, अमेरिकन मुलीशी लग्न करून आपल्या शिक्षणाच्या जोरावर आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत भारतात परतल्यानंतर काळींगाला इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातली मूळची भारतीय संस्कृती जागी होते, तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि अर्थातच गोमातेलासुध्दा "पारखा" झालेला असतो अशी अगदी साधी कथा घेऊन भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली आहे. परंतु भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर होणारा दोन संस्कृतींमधील संघर्ष कादंबरीत ज्यापद्धतीने भैरप्पांनी दाखवला आहे त्याला खरोखरच तोड नाही. संस्कृती, श्रद्धा आणि व्यवहार यांच्या संघर्षाचं चित्रण भैरप्पा यांनी त्यांच्या या २७६ पानी कादंबरी "पारखा" मधून केलेलं आहे.
- Pranav Patil
(पुस्तक परिचय - प्रणव पाटील)
वंशवेल , आवरण आणि धर्मश्री या तीन कादंबर्यां नंतर पारखा ही भैरप्पांची चौथी कादंबरी वाचताना हळूहळू भैरप्पांच्या साहित्याच्या प्रेमात पडावं असं त्यांचं लिखाण आणि त्याचा उमा कुलकर्णी यांनी तेवढ्याचं समर्कपणे केलेला अनुवाद आहे.
भारतीय संस्कृती चा मोठा वारसा सांभाळता सांभाळता भारतीय समाज एकीकडे जागतिकीकरणाच्या वेगा बरोबर व बदला बरोबर जुळवून घेताना होणारे संघर्ष आणि त्यातून नव्या जून्या पिढीचा वैचारीक मतभेद या सगळ्याला कवेत घेऊन त्याचा प्रचंड आवाका सांभाळत भैरप्पा हे नेहमीच कादंबरी वाचकाच्या मनात नाना प्रश्न तयार करतात आणि वेगळ्या दृष्टी विचार करायला भाग पाडतात तर कधी दोलायमान मनस्थिती व्हावी अशी परिस्थिती आपल्या लिखानातून तयार करतात.
पारखा ही कर्नाटकातील काळेनहळ्ळी या गावात वोक्कलिंगम या पशुपालक समाजातील श्रध्दा आणि रुढींनी घडवलेल्या समाजात घडलेली कथा आहे. कळिंगगौडा हा आपल्या पुण्यकोटी गाईंसह इतर गाई बैलांचा भला मोठा गोठा सांभळणारा गावचा देवभोळा गौडा आहे आणि त्याचा नातू पुट्टकळिंग जो अमेरिकेत शिकून आलेला पाश्चिमात्य विचारांनी भारलेला नातू या दोघांमधल्या मानवी मुल्ये,श्रध्दा आणि व्यवहारवादातील संघर्षाची कथा या कादंबरीत वाचायला मिळते.
यात एकीकडे गाईला देव मानणारी श्रध्दा आहे तरी दुसरीकडे गाईकडे व्यवसायिक दृष्टीने पाहणारी पाश्चिमात्य दृष्टी आहे ज्यात भाकड गाई कसायला विकणे हे त्यांना पोसण्या पेक्षा आर्थिक दृष्ट्या फायदेशिर असल्याचा व्यवहार शिकवते .
या बरोबरच जागतिकीकरणाच्या बदलामधे झालेले बदल पचवत पचवत आपलं गायरान टिकवणारा गौडा पुण्यकोटी गाईचं मंदिर बांधून मरुन जातो .या नंतर अमेरिकेतून परतलेला पुट्ट कळिंग हा त्याच्या अमेरिकन बायको बरोबर या गायरानात येऊन शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत घरच्या जनावरांनाही व्यवसायिक दृष्टी समोर ठेवून पाळू पाहतो. यात कळिंगाच्या बायकोने केलेले गोमांस भक्षण आणि देवस्थानात केलेली ढवळढवळ यात गावकरी विरुध्द कळिंग सघर्ष होऊन शेवटी आपल्याच देशात ,आपल्याच लोकांमधे कळिंग कसा एकटा पडत जाऊन पारखा होतो यांची सगळी कथा ही कादंबरीची मध्यवर्ती कथा आहे.
यात कर्नाटकातील खेड्यातील लोकांची श्रध्दा,यात्रा जत्रा , वेगवेगळ्या व्यक्तिरेखा इ.मुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे .कळिंगाचा मित्र आणि मंदिराचा पुजारी असलेला वेंकटण्णा यांच्यातील वैचारिक संवाद आणि वादविवाद विचार करायला लावणारा आहे. कादंबरीच्या शेवटी कळिंगाच्या विसर पडलेल्या संस्कारांवरचा पडदा दूर होऊन तो पुढे काय करतो हे वाचण्यासारखं असलं तरी पुढे काय होईल हा प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच कादंबरीचा शेवट झाला आहे.
भारतीय मुल्यांचां बदलत्या परिस्थितीत शोध घेण्याची दृष्टी या कादंबरीमुळे वाचकाला मिळते. याच कादंबरीवर कन्नड मधे चित्रपट तयार झाला तसा हिंदीतही `गोधुली` हा चित्रपट येऊन या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.
भारतीय समाजातील गाय या पूज्य मानले गेलेल्या श्रध्दे भोवतीच ही कथा फिरत फिरत आपल्याला विचार करायला भाग पाडते हे नक्की !
- Kaushik Lele
भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्त्य संस्कृती यांमधले द्वंद्व टिपणारी वाचनीय कादंबरी.
- स्वप्निल काकडे
नुकतंच ही कादंबरी वाचून पूर्ण केली. मुळात कन्नड भागात घडणारी ही कथा असली तरी मराठी अनुवाद उत्तम असल्याने कुठेच रसभंग न होता ही कथा आपल्या आजुबाजूलाच घडते आहे असं वाटतं रहाते. ही कथा आपल्याला पूर्णपणे जखडून ठेवते.
ह्या कादंबरीत अनेक पात्रं असली तरी मुळात मुख्य पात्रे दोनच कलिंग गौडा आज्जा आणि त्याचा नातू पुट्टू गौडा.
कलिंग गौडा आज्जा कलिंग घराण्यातला, ज्या घराण्यातल्या गोठ्यात पुण्यकोटी गाय होऊन गेली. त्या गायीच्या शब्दाला जागण्याच्या वृत्तीमुळे ती केवळ त्याच गावात नव्हे तर पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली. आजही त्या पुण्यकोटी गायीचा वंश कलिंग गौडा आज्जाच्या गोठ्यात वाढतोय.
आपली माय, गोठ्यातली गाय आणि माती माय ह्यांची सेवा करणं म्हणजे मोक्ष मिळवणं अशी गौडाज्जाची धारणा. गायींवर तर त्याचा विशेष जीव. "गायी आणि माणसं एकमेकांसाठी जन्मली आहेत" ह्यावर त्याची निष्ठा आणि ह्या साठी तो वेळोवेळी आपला मित्र/पुरोहित "जोईस" ह्यांच्याकडून वेळोवेळी वेद- पुराणातल्या कथा ऐकून त्यातले दाखले घेत असतो. त्या दोघामधली मैत्री पण गाढ.
एकेदिवशी गौडाज्जाचा मुलगा कृष्णा चरणाऱ्या गायींना तरसा पासून वाचवताना मारला जातो आणि त्याच्या मुलाची म्हणजे पुत्तू कलिंगा ची जबाबदारी येते गौडाज्जा वर. पुत्तु गौडा हा लहानापासून खूप हुशार. तो आणि वेंकटरमण (जोईसाचा मुलगा) हे पक्के दोस्त. दोघे लहानपणी एकत्रपणे गावातल्या शाळेत शिकले. मोठे झाल्यावर म्हैसूर ला शिकले. वेंकटरमण वेदशास्त्र पुराणात पारंगत झाला तर पूत्तू गौडा बी. एससी. झाला. पण पूत्तु गौडा च मन शांत बसेना, त्याला आपल्या आज्जा- बापा प्रमाण गुरांवर जीव नव्हता. गुर चरायला नेण त्याला कमीपणाचे वाटे. त्याला अजून शिकायचं होत. ह्यासाठी हट्टाने आज्जाची समजूत घालून तो अमेरिकेत प्राणी शास्त्र शिकायला जातो. तिथे शिक्षण पूर्ण करून तिथल्याच मुलीशी लग्नही करतो.
शिकून गावी परतलेल्या पुट्टु गौडा ला आता गावाच्या परंपरा थोतांड वाटू लागतात. काही फायदा नसताना गोठ्यातल्या म्हाताऱ्या, भाकड गायी पाळण त्याच्या अमेरिकन शिक्षणाला अव्यवहारी वाटतं. "सर्व जनावर ही माणसाच्या फायद्यासाठी असतात आणि त्यांचा फायदा होणं बंद झाली की ती विकावित" असा त्याचा गौडाज्जाच्या विपरीत विचार.
"गायींसाठी माणूस की माणसासाठी गाय" ह्या दोन विचारांचा होणारा संघर्ष म्हणजे ही कादंबरी. ह्या कथेतली सगळीच पात्र मनात घर करून बसतात. निष्ठावंत गौडाज्जा, त्याला साथ देणारी त्याची बायको गौडाज्जी, त्याची मुकी सून तायव्वा, जोइस, वेंकटरमण, पुटू गौडा आणि त्याची अमेरिकन बायको हिल्डा, गाईंवर निष्ठा असलेले सगळे गावकरी.
कादंबरी अखेरीस आपल्याला विचार करायला भाग पाडते की नक्की चूक कोण आणि बरोबर कोण? परंपरेने वागणारा गौडा आज्जा की त्याचा व्यावहारिक नातू?
~~~ स्वप्निल काकडे
- Swapnil kakade
सध्या एस. एल. भैरप्पा ह्यांचे "पारखा" वाचतोय. एकच प्रकरण पूर्ण झालंय पण पुस्तकाने गारूड घालायला सुरुवात केलीय. मला वाटतं ह्याच श्रेय जितकं भैरप्पा ह्यांच आहे तितकच मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी ह्यांच पण आहे.
- DAINIK SAMANA 01-05-2016
मूल्य संघर्ष...
सर्व सजीव प्राण्यांप्रमाणेच निर्जीव वस्तूंमध्ये परमेश्वर भरून राहिला आहे असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. प्राण्यांमध्ये गाईला हिंदू मन सर्वाधिक श्रद्धेने मानते.
काळेनहळ्ळी गावाचा पाटील काळिंगा याच्याकडे पुण्यकोटी या जातीच्या गाईचे मोठे खिल्लार असते. एकदा रानात चरणाऱ्या गाईवर एक तरस हल्ला करतो. काळिंगाचा मुलगा कृष्णा गाईच्या बचावासाठी तरसावर बेधडक प्रतिहल्ला करतो. तरस मरतो. पण कृष्णालाही ठार मारतो. गाईला वाचवताना मेला म्हणून काळिंगासकट अख्ख्या गावाला कृष्णाचा अभिमान वाटतो.
कृष्णाचा मुलगा काळिंगा मोठा होतो. आजोबांचे नाव नातवाला ठेवण्याच्या पद्धतीमुळे त्याचे नाव काळिंगाच. तो खूप शिकतो. अमेरिकेला जाऊन शेतकी शास्त्र आणि पशुपालन शास्त्रातली मोठी पदवी मिळवतो. गावी परतताना गोरी अमेरिकन बायकोही घेऊन येतो. दोघे मिळून आधुनिक शेती आणि आधुनिक पशुपालन सुरू करतात.
आणि इथेच हिंदू मूल्ये आणि पश्चिमी मूल्ये यांचा संघर्ष सुरू होतो. काळिंगाची बायको हिल्डा हिच्या पश्चिमी मूल्यांनुसार जमीन ही भूमाता नसते. तर पैसा मिळवून देणारी वस्तू असते. त्यामुळे ती धान्याची लागवड न करता तंबाखूची लागवड करते. हिल्डाच्या मते गाय ही गोमाता नसतेच, तर दूध देणारी म्हणजेच पैस देणारी सजीव यंत्रेच असतात. काळिंगाचा मित्र आणि गावचा पुजारी असलेला वेंकटरमणा तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की, आम्हा हिंदूंच्या श्रद्धेनुसार गाईच्या शरीरात तेहतीस कोटी देव राहतात. हिल्डा सरळ गोठ्यात जाते आणि एका गाईला ठार मारून तिचे शरीरविच्छेदन करून देव कुठे दिसतात का पाहते.
हे गावात कळल्यावर मधमाश्यांचे मोहोळच उठते. पुढे याच हिल्डाची तान्ही मुलगी दुधावाचून तळमळत असताना मल्लेशा नावा नोकर त्या बाळा सरळ गाईच्या आचळाशीच धरतो. मुलगी बचावते. ते दृश्य पाहून हिल्डा आत कुठेतरी हलते. पण आपण माणसांवर प्रेम करतो. तसे मुक्या जनावरांवरही प्रेम करायचे असते ही भावना तिला कळतच नाही. तिच्या दृष्टीने गाई या दूध देणारी यंत्रे असतात. त्यामुळे काळिंगा घरात नसताना ती भाकड गाय सरळ कसायाला विकून टाकते.
काळिंगा खाटिकखान्यात जातो, पण तिथल्या शेकडो गार्इंमधून तो आपल्या गाई वेगळ्या ओळखू शकत नाही. गाई देखील त्याला ओळखून त्याच्या जवळ येत नाहीत. मग काळिंगाला जाणीव होते की, आपण गोठ्यात जाऊन गार्इंच्या पाठीवर कधी प्रेमाने हात फिरवलाच नाही. त्यांचा गळा कधी खाजवलाच नाही. त्यांना आपले प्रेम लागणारच कसे? गार्इंसाठी प्राण झोकून देणाऱ्या बापाचा पुत्र असून आपणही गाईला यंत्रच समजलो. पण मग आता मी काय करावे? ट्रॅक्टर सोडून नांगराला बैल जुंपू? मशीनच्या नळ्यांनी गाईचे दूध काढण्याच्या सोयीऐवजी हाताने दूध काढण्याचा वेळ आणि श्रम घेणारा मार्ग पत्करू?
काळिंगा अशा ‘कन्फ्यूज्ड’ मन:स्थितीत असताना कादंबरी संपते. एकापरीने आज संपूर्ण देशातल्या सर्वच सुशिक्षितांची ही प्रातिनिधिक अवस्था आहे. हिंदू मूल्ये महान आहेत. पण अमेरिकन मूल्ये पैसा देतात. सुखसोयी देतात, प्रतिष्ठा देतात. मग हेही हवे नि तेही हवे अशी सर्वांचीच स्थिती आहे. डॉ. एस. एल. भैरप्पा या देशातल्या एका समर्थ आणि लोकप्रिय कादंबरीकाराच्या लेखणीतून हा विषय उतरला आहे.
- AIKYA 17-01-2016
गाईला सर्व देवतांचं स्वरूप मानून तिची पूजा करणारा काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा त्याचा अमेरिकेतून परतलेला नातू या दोघांच्या मूल्यसंवेदनांवरील संघर्ष हा या कादंबरीचा विषय. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये प्रचलित असलेल्या गाईच्या गाण्यानं सुरू होत असलेली ही कादंबरी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन काही मूल्यांचा शोध घेताना दिसते.
या कलाकृतीवर आधारलेल्या कन्नड आणि गोधुली या हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवले आहेत.
१९६८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला आजही काहीजण ‘उत्कृष्ट साहित्यकृती’ मानतात. प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे, हे निश्चित!
- LOKSATTA 03-01-2016
श्रद्धा, मानवी मूल्ये आणि व्यवहारवादातील संघर्ष…
‘पारखा’ हा एस. एल. भैरप्पा यांच्या ‘तब्बलियु नीनादे मगने’ या कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद. ‘तू पोरका झालास...म्हणजेच सर्व गोष्टींना पारखा झालास’ असा या शीर्षकाचा अन्वयार्थ. कादंबरीचा विषय हा गायीकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांतील संघर्षचा आहे. १९६८ मध्ये ही मूळ कानडी कादंबरी प्रकाशित झाली आणि आता २०१५ मध्ये उमा कुलकर्णींनी ती मराठीत आणली आहे. दरम्यान जवळजवळ ५० वर्षांचा गेल्यानंतरही ती कालबाह्य झालेली नाही असेच म्हणावे लागेल. कारण आजघडीला ‘गाय’ या विषयाचे राजकारण पुनश्च ऐरणीवर आलेला आहे. नाट्यात्म उपरोधिकता हे भैरप्पांच्या कादंबऱ्यांचे मोठे वैशिष्ट्य राहिले आहे. १९६८ मधली ही कादंबरी आता मराठीत येणे हीसुद्धा एक नियतीची नाट्यत्म उपरोधिकताच म्हणता येईल. गायीमध्ये ३३ कोटी देवदेवता वास करतात असे मानून भक्तिभावाने तिची पूजा करणार काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा अमेरिकेतून शिकून आलेला त्याचा नातू काळिंगा यांची ही कथा आहे.
‘पारखा’ वाचताना दोन इंग्रजी कादंबऱ्यांची आठवण होते. एक म्हणजे पर्ल बक या अमेरिकन लेखिकेची ‘द गुड अर्थ’ आणि चिनुआ अचेबे या आफ्रिकन लेखकाची इंग्रजी कादंबरी ‘थिंग्ज फॉल अपार्ट’! या तीन कादंबऱ्यांमधील साम्यस्थळे विलक्षण आहेत. पहिली जरी अमेरिकन लेखिकेची असली तरी ती चिनी जीवनाबद्दलची आहे. चीन, भारत आणि आफ्रिका या तिन्ही ठिकाणी मुळात प्राचीन कृषीसंस्कृती होती. पाश्चात्यांशी आलेला संपर्क म्हणा, किंवा भारत आणि आफ्रिका यांच्याबाबतीत केवळ संपर्कच नव्हे, तर पाश्चात्य आक्रमणामुळेही इथे यंत्रसंस्कृती आली. हे चांगलं की वाईट वगैरे सोडून देऊ. पण या संपर्कामुळे इथल्या प्राचीन संस्कृतीला मोठाच धक्का पोहोचला. तो बाह्यत: जरी भौतिक स्वरूपाचा होता तरी त्यातून या संस्कृतीच्या मूल्यव्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला गेला. एक प्रकारे गाय आज राजकाराणत कळीचा मुद्दा ठरू पाहत असली तरी ही कादंबरी मात्र तिच्यावरून होणाऱ्या राजकारणासंबंधी नाही, तर ती ‘द गुड अर्थ’ व ‘थिंग्ज फॉल अपार्ट’ प्रमाणेच या सांस्कृतिक धक्क्याची कहाणी सांगते. कृषीसंस्कृतीची मूल्यं आणि यंत्रसंस्कृतीची मूल्यं फार वेगळी असतात. श्रद्धाभाव, निष्ठा, माणुसकीसाठी त्यागाची तयारी, समाधानी वृत्ती, अधिक पैशाची लालसा नसणं ही कृषीसंस्कृतीची मुख्य वैशिष्ट्यं. याउलट, यंत्रसंस्कृतीमध्ये या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. अधिकाधिक फायदा व पैसा हेच तिचे मुख्या अधिष्ठान असते. बाकी मानवी मूल्यं वगैरे गोष्टी यंत्रसंस्कृतीच्या लेखी फिजूल ठरतात. युरोपियन मिशनरी आफ्रिकेतल्या इग्बो संस्कृतीच्या मूल्यांचा नाश करतात. ‘द गुड अर्थ’मधील ओ लान ही खरीखुरी शेतकरी स्त्री आहे. कष्टाळू, मातीला आई मानणारी. तिच्या नवऱ्याच्या हातात बायकोमुळेच प्रचंड संपत्ती येते. त्याची नियत, दानत बदलते आणि तो या मातीला विसरतो. ‘पारखा’मधला काळिंगा अमेरिकेत पाश्चात्य यंत्रसंस्कृतीचा अंगीकार करतो. अमेरिकन स्त्रीशी लग्न करतो आणि तिथली मूल्यंही स्वीकारतो.भारतात परतल्यावर इथे आलेल्या अनुभवांनी त्याच्या मनातील मूळची संस्कृती जागी होते. तो तळमळायला लागतो. पण तोपर्यंत साहजिकच तो इथल्या संस्कृतीला, मातीला, कुटुंबाला, आईला आणि गोमातेला पुरता पारखा झालेला असतो.
या कादंबरीतली काळिंगज्जा ही गोपाल संस्कृतीची प्रतिनिधी असलेली हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आहे. या संस्कृतीत तो मुरलेला आहे. या संस्कृतीच्या बाहेरच्या व्यावहारिक गोष्टी त्याच्या आकलनापलीकडच्या आहेत. कोंडवाड्यातल्या एका गाभण गायीचा मालक तिला शोधायला येत नाही म्हटल्यावर काळिंगज्जा तिचं ‘लेकमाणसासारखी आली’ म्हणून यथासांग बाळंतपण करतो. तो मालक आपल्या गायीला शोधत आल्यावर त्याला दोन दिवसांनी यायला सांगतो, कारण ओल्या बाळंतिणीला त्याने चालवत घरी न्यायला नको. नंतरही कोवळ्या वासराला चालायला न लावता त्याला हातात घेऊन जायला काळिंगज्जा सांगतो, इतका तो हळवा आहे. आपल्या शिकलेल्या नातवाचे बोलणे त्याला समजत नाही. ‘ज्यानं घरातलं ज्ञानच समजवून घेतलेलं नाही, तो परदेशातून काय आणि किती शिकणार आहे?’ असे त्याला वाटते. त्यामुळे तो परदेशातून परत येईल की नाही; आणि आल्यावर घरात राहील की नाही, याची त्याला शाश्वती नाही.
काळिंगज्जाच्या मरणाचे वर्णन म्हणजे भैरप्पांची जणू कविता आहे. त्याने यंग्टाकडे आपल्या गोठ्याची जबाबदारी सुपूर्द केली. गायींचे रोग, त्यावरची औषधे, निगा घेण्याची पद्धत वगैरे सारं त्याला सांगितलं. गायीच्या औषधाचे पैसे घेतलेस तर तुझा वंश टिकणार नाही, असेही वर बजावले. सगळी निरवानिरव केली. त्याने यंग्टाला पावा घेऊन यायला सांगितले आणि तो आपल्या गोठ्यातच झोपला. खिडकीतून चांदणं आत आलं होतं. यंग्टानं पान खाऊन गोठ्यात पावा वाजवायला सुरुवात केली. जणू कृष्णच आपला पावा बाहेर काढतो. तो आवाज ऐकताच वळू भांडण थांबवतात. त्या वातावरणात पाव्याचा स्वर एखाद्या दीपज्योतीप्रमाणे भासतो. मध्यरात्र संपून आकाशात शुक्राची चांदणी दिसेपर्यंत यंग्टा पावा वाजवत होता. ‘गोठ्यातला दिवा शांतपणे जळत होता. काळिंगज्जाही शांतपणे झोपला होता. सकाळी तो जिवंत नव्हता. रात्री झोपेतच केव्हातरी त्याचा जीव गेलेला होता. अजूनही त्याचा चेहरा पावा ऐकत असल्यासारखा दिसत होता.’ अशिक्षित काळिंगज्जाच्या मरणाच्या वर्णनातून भैरप्पा त्या प्राचीन गोपाल संस्कृतीचे सत्त्वच जणू दर्शवतात आणि भारतीय तत्त्वज्ञानातले कर्मयोगाचे एक सूत्रही प्रकट करतात. आपल्या वाट्याचे कर्म गाढ श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पितभावाने करणाऱ्या काळिंगज्जाला तत्त्वज्ञानासारखे शांत सुंदर मरण येते.
पण या एका बाजूमुळे भावविवश न होता भैरप्पा तटस्थपणे दर्शवतात ही, कालगतीने या संस्कृतीचा ऱ्हास होणे अपरिहार्यच आहे. तिच्या जागी येणाऱ्या यंत्रसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार करणे पाश्चात्य जीवनशैली स्विकारून आधुनिक झालेल्या काळिंगालाही जमत नाही. तो विचार करतो, ‘‘विद्युतशक्ति, वैज्ञानिक खतं यासारख विज्ञान मलाही हवं आहे. पशुंना आजार झाले तर त्यांना बरं करणारं विज्ञान मला पाहिजे. पण ते (पशु) केवळ माणसाच्या उपयोगासाठीच आहेत असं मानणारा दृष्टिकोन मला अजिबात नकोय! आपणा भारतीयांची गोष्ट वेगळी आहे. आम्हाला ट्र्रॅक्टर पाहिजे आणि गोपूजाही पाहिजे.’’ हा या कादंबरीतल्या समस्येचा गाभा ते मांडतात.
श्रद्धा आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय व्हायला हवा असे ते सुचवतात. भैरप्पा यांच्यातला कथनकार कादंबरीच्या पहिल्याच पानापासून वाचकांचे बोट धरतो आणि शेवटच्या पानापर्यंत ते बिलकूल सोडत नाही. तीच प्रवाही शैली उमा कुलकर्णींनी या कादंबरीच्या अनुवादातही तंतोतंत राखली आहे. वाचायलाच हवी अशी ही कादंबरी आहे.
- SAKAL 17-01-2016
डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या या कादंबरीत गाईला दैवत मानणारे आजोबा आणि तिला उपयुक्त पशू मानणारा नातू कळिंगा यांच्यातला संघर्ष आहे. कळिंगा आणि गावातला पुजारी वेंकटरमण यांच्यातला वादही कसा वेगळंच रूप घेतो, तेही यातून कळतं. अखेर गाव त्याला एकटं पाडतं.