ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३ कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही.
एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते.
तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते.
`अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात.
`अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे.
उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते.
रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही.
भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत.
`तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात.
`कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे.
`इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात.
त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे.
त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते.
या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात.
कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत.
प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा.
असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more
जयश्री सोनवणे बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत.
कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे.
पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे.
निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे.
मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे.
फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे.
होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो.
सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे.
खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही.
फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची.
आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं.
श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे.
आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात.
श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे.
...Read more