Maharashtra Times Samwad 24-2-2020 `एकलव्यां` ना विश्वास देणारे पुस्तक ....एक कर्तव्यदक्ष, धाडसी पोलीस अधिकारी इतकीच विश्वास नांगरे पाटील यांची ओळख मर्यादित नाही. हे नाव विश्वासार्ह `ब्रँड` बनले आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी तर ते जणू दैवतच. बहुसंख्य विद्यार्थी त्यानाच आदर्श मानून या परीक्षांची तयारी करतात. अशा या `आयपीएस` अधिकाऱ्याची आत्मकथा `मन मै है विश्वास!` या पुस्तकातून पुढे आली होती, त्यातून `आयपीएस` बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसमोर आला होता.`कर हर मैदान फतेह` हे पुस्तक या आत्मकथेचा दुसरा टप्पा आहे.यात `आयपीएस` झाल्यानंतरचा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास उलगडत जातो. `आयपीएस` अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर आवश्यक प्रशिक्षण घेऊन `ड्युटी` सांभाळताना सुरुवातीच्या टप्प्यात करावा लागणार संघर्ष आणि उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नेतृत्व करताना आलेले अनुभव यात वाचायला मिळतात. प्रस्तावनेतच कॉमर्समधील परिभाषांचा वापर करत, ज्ञान व शिक्षणातल्या गुंतवणुकीच्या आधारे जीवनाचा ताळेबंद कसा उत्तम राहील, हे लेखकाने मांडले आहे. आयुष्यातील वेळेचे काटेकोर नियोजन, तीन `एफ` , तीन `एच`, आणि तीन `एस` चे महत्वही त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. `आयपीएस` पदी निवड झाल्यानंतर या ग्रामीण युवकाला प्रशिक्षणासाठी जावे लागले. सुरुवातीला मसुरी येथील `लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी` त दाखल होताना, तिथली व्यवस्था आणि वातावरण पाहून आलेलं दडपण; त्यावर केलेली मात, त्यानंतर हैद्राबाद येथील `सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी` तील `भारतीय पोलिस सेवेचे ` प्रशिक्षण आणि शेवटी `प्रॅक्टिकल` प्रशिक्षण या सर्वांचे सविस्तर वर्णन आपल्याला वाचता येते. या प्रशिक्षणामुळे लागलेल्या सकारात्मक सवयी; त्यामुळे व्यक्तिमत्वात झालेले रचनात्मक बदल, त्याचा भविष्यातल्या आव्हानांना तोंड देताना झालेला फायदा, या बाबी लेखकाने प्रांजळपणे मांडल्या आहेत. ज्यांना या अकादमीत जाऊन प्रशिक्षण घेता येत नाही, त्यांना हि प्रक्रिया समजावून देण्याचा प्रयत्न नांगरे पाटील यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. या प्रशिक्षणात उलगडत गेलेले कायद्याचे स्वरूप, तपासाचे कौशल्य, व्यूहरचना, निरीक्षणक्षमता, पुरावे गोळा करण्याचे कसब, नेतृत्वगुण, काम्युनिटी पोलिसिंग आदींचा उल्लेख पुस्तकात ओघाने येत राहतो. प्रशिक्षणानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलादी चौकटीत शिरतानाचे अनुभव, सेवेदरम्यान रोज नवी आव्हाने, बदलत्या अपेक्षा, गणवेषाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न, मुथूट दरोडा, चाकण दंगल, डॉल्बीमुक्त गणेशोस्तव अशा काही घटनांचे तपशीलही या पुस्तकात येत जातात. सुभाषिते, वचने, श्लोक, अवतरणे, संदेशांचा वापर केल्याने, हे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत झाले आहे. विशेष म्हणेज, हे पुस्तक त्यांनी पोलीस दलातील सर्व करोना योद्ध्यांना समर्पित केले आहे. `माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्टेनं कुठल्या तरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक `एकलव्यां` ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे,` असे नांगरे पाटील म्हणतात. एकूणच अशा एकलव्यांना मैदान फतेह` करण्याचा `विश्वास` देणारे हे पुस्तक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ...Read more
SANJOSH SANAS खूप दिवसांनी वाचायला मिळालेले एक अप्रतिम पुस्तक!