मीना कश्यप शाह शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत.
प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं.
पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे.
त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे.
अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक.
शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!)
शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!!
अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे...
घटकाभर संग बसून घालवा वेळ,
जमल्यास मनांचा जमून येईल मेळ,
नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ,
पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा,
माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!!
एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता!
अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात...
प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे,
भुकेल्या देहाचे सारे मागणे,
जन्माच्या नात्याचे फुका बहाणे,
कुणाला सतत इथे राहणे?
इथल्या महाली घडीची वस्ती,
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती,
घडीत वरती घडीत खालती
ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच.
"ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं.
एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣
श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं.
ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण....
"शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले.
शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे.
तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच...
काय वाजले प्रिय ते पाऊल,
तो तर वारा तिची न चाहूल,
भास हो फसवा वरचेवरी,
शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more
मीना कश्यप शाह भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...)
मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं.
अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं.
मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात.
ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच...
मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना...
स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ...
पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल...
जुलमाचा प्रतिशोध...
अतिमानवीय शक्तींनी झपाटणे...
भूतबाधा, भूतांशी गाठभेट...
मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा...
मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम.
ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट!
मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं.
अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत.
...Read more