डॉ. जयंत वडतकर.अमरावती मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले.
आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख.
जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते.
पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो.
अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे
नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले.
१९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत.
भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली.
अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही.
भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे.
...Read more
आबासाहेब कडू, अमरावती. एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह*
दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित
`अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले.
घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच.
वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते.
गांधीचौकात गांधी नाही
मालटेकडीवर माल नाही..
खेटरे झाली ब्रँडेड सगळी
मोची गल्लीत मोची नाही..
तपोवनात तपस्वी नाही
कल्याणनगरात कल्याण नाही…
लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो.
या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो.
स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो.
अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट.
अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात.
चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे
अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे
कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे.
अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात..
`अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे.
अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते.
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे.
लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे.
अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही.
खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते.
कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही.
हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य.
आणि शेवटी………..
मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे
आतमा-णित्य आहे
हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही.
हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की.
अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more