रश्मी मुसळे-साळगांवकर लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात...
शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३. बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे.
जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे.
ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.
दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते.
या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे.
या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more