लोकमत २५.९.२०२३ शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल.
मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.
सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा.
या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे.
जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना
बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना
त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला)
कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये
गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो!
मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे.
...Read more
पुस्तकप्रेमी मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more