SARTH by DR. S. L. BHYRAPPA हेमंत सांबरे गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more